श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ अष्टमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सुग्रीवेण श्रीरामं प्रति निजदुःखनिवेदनं, श्रीरामेण तमाश्वास्य तयोरुभयोर्भ्रात्रौर्वैरस्य किं कारणं इति प्रश्न करणम् - सुग्रीवांनी श्रीरामांना आपले दुःख निवेदन करणे आणि श्रीरामांचे त्यांना आश्वासन देऊन दोघा भावांमधे वैर होण्याचे कारण विचारणे -
परितुष्टस्तु सुग्रीवस्तेन वाक्येन वानरः ।
लक्ष्मणस्याग्रतो राममिदं वचनमब्रवीत् ॥ १ ॥
श्रीरामांनी जे सांगितले त्यामुळे सुग्रीवाला अत्यंत संतोष झाला. ते हर्षित होऊन लक्ष्मणाचे मोठे भाऊ शूरवीर श्रीरामांना याप्रकारे बोलले- ॥१॥
सर्वथा ऽहमनुग्राह्यो देवतानामसंशयः ।
उपपन्नगुणोपेतः सखा यस्य भवान्मम ॥ २ ॥
’भगवन् ! यात संदेह नाही की देवतांची माझ्यावर कृपा आहे- मी सर्वथा त्यांच्या अनुग्रहास पात्र आहे, कारण आपल्या सारखा गुणवान् महापुरुष माझा सखा झाला. ॥२॥
शक्यं खलु भवेद्राम सहायेन त्वया ऽनघ ।
सुरराज्यमपि प्राप्तुं स्वराज्यं किं पुनः प्रभो ॥ ३ ॥
’प्रभो ! निष्पाप श्रीरामा ! आपल्या सारख्या सहाय्यकाच्या सहयोगाने तर देवतांचे राज्य ही अवश्य प्राप्त केले जाऊ शकते; मग आपले गमावलेले राज्य प्राप्त होईल यात काय मोठेसे आश्चर्य आहे. ॥३॥
सो ऽहं सभाज्यो बंधूनां सुहृदां चैव राघव ।
यस्याग्निसाक्षिकं मित्रं लब्धं राघववंशजम् ॥ ४ ॥
’राघवा ! आतां मी आपल्या बंधुंच्या आणि सुहृदांच्या विशेष सन्मानास पात्र झालो आहे; कारण की आज रघुवंशाचे राजकुमार आपण अग्निला साक्षी ठेऊन मला माझ्या मित्राच्या रूपांत प्राप्त झाला आहांत. ॥४॥
अहमप्यनुरूपस्ते वयस्यो ज्ञास्यसे शनैः ।
न तु वक्तुं समर्थो ऽहं स्वयमात्मगतान् गुणान् ॥ ५ ॥
’मीही आपल्या योग्य मित्र आहे. याचे ज्ञान आपल्याला हळूहळू होईल. या समयी आपल्या समोर मी स्वतःच्या गुणांचे वर्णन करण्यास असमर्थ आहे. ॥५॥
महात्मनां तु भूयिष्ठं त्वद्विधानां कृतात्मनाम् ।
निश्चला भवति प्रीतिर्धैर्यमात्मवतामिव ॥ ६ ॥
’आत्मज्ञान्यांमध्ये श्रेष्ठ श्रीरामा ! आपल्या सारख्या पुण्यात्मा महात्म्यांचे प्रेम आणि धैर्य अधिकाधिक वाढते अणि अविचल होत असते. ॥६॥
रजतं वा सुवर्णं वा वस्त्राण्याभरणानि च ।
अविभक्तानि साधूनामवगच्छंति साधवः ॥ ७ ॥
’चांगल्या स्वभावाचे मित्र आपल्या घरातील सोने-चांदी अथवा उत्तम आभूषणांना आपल्या चांगल्या मित्रासाठी अविभक्तच मानतात - त्या मित्रांचा आपल्या धनावर आपल्या सारखाच अधिकार समजतात. ॥७॥
अढ्यो वापि दरिद्रो वा दुःखितः सुखितो ऽपि वा ।
निर्दोषो वा सदोषो वा वयस्यः परमा गतिः ॥ ८ ॥
’म्हणून मित्र धनी असो वा दरिद्री असो, सुखी असो वा दुःखी अथवा निर्दोष असो वा सदोष, तो मित्रासाठी सर्वात मोठा सहाय्यक असतो. ॥८॥
धनत्यागः सुखत्यागो देहत्यागो ऽपि वा पुनः ।
वयस्यार्थे प्रवर्तंते स्नेहं दृष्ट्‍वा तथाविधम् ॥ ९ ॥
’हे अनघा ! साधुपुरुष आपल्या मित्राचे अति-उत्कृष्ट प्रेम पाहून आवश्यकता पडल्यास त्याच्यासाठी धन, सुख आणि देशाचाही परित्याग करतात.’ ॥९॥
तत्तथेत्यब्रवीद्रामः सुग्रीवं प्रियवादिनम् ।
लक्ष्मणस्याग्रतो लक्ष्म्या वासवस्येव धीमतः ॥ १० ॥
हे ऐकून लक्ष्मी (दिव्यकान्ती) ने उपलक्षित श्रीरामांनी इंद्रतुल्य तेजस्वी बुद्धिमान् लक्ष्मणाच्या समोरच प्रिय वचन बोलणार्‍या सुग्रीवास म्हटले- ’सख्या ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे.’ ॥१०॥
ततो रामं स्थितं दृष्ट्‍वा लक्ष्मणं च महाबलम् ।
सुग्रीवः सर्वतश्चक्षुर्वने लोलमपातयत् ॥ ११ ॥
त्यानंतर (दुसर्‍या दिवशी) महाबली श्रीराम आणि लक्ष्मणांना उभे असलेले पाहून सुग्रीवांनी वनात चारी बाजूस आपली चञ्चल दृष्टी फिरवली. ॥११॥
स ददर्श ततः सालमविदूरे हरीश्वरः ।
सुपुष्पमीषत्पत्राढ्यं भ्रमरैरुपशोभितम् ॥ १२ ॥
त्या समयी वानरराजाने जवळच एक साल वृक्ष पाहिला; ज्याच्यावर थोडीशीच सुंदर पुष्पे लागलेली होती, परंतु त्याच्यावर खूपच पाने होती. त्या वृक्षावर भ्रमर गुंजारव करून त्याची शोभा वाढवीत होते. ॥१२॥
तस्यैकां पर्णबहुलां भङ्‌क्त्वा शाखां सुपुष्पिताम् ।
सालस्यास्तीर्य सुग्रीवो निषसाद सराघवः ॥ १३ ॥
त्याची एक फांदी जिच्यावर खूप पाने होती आणि जी पुष्पांनी सुशोभित होती ती सुग्रीवांनी तोडली आणि ती रामांसाठी पसरून ते स्वतः ही त्यांच्या बरोबर तिच्यावर बसून गेले. ॥१३॥
तावासीनौ ततो दृष्ट्‍वा हनूमानपि लक्ष्मणम् ।
सालशाखां समुत्पाट्य वीनीतपवेशयत् ॥ १४ ॥
त्या दोघांना आसनावर विराजमान झालेले पाहून हनुमानांनी सालाची एक फांदी तोडली आणि तिच्यावर विनयशील लक्ष्मणांना बसविले. ॥१४॥
सुखोपविष्टं रामं तु प्रसन्नमुदधिं यथा ।
फलपुष्पसमाकीर्णे तस्मिन् गिरिवरोत्तमे ॥ १५ ॥

ततः प्रहृष्टः सुग्रीवः श्लक्ष्णं मधुरया गिरा ।
उवाच प्रणयाद्रामं हर्षव्याकुलिताक्षरम् ॥ १६ ॥
त्या श्रेष्ठ पर्वतावर, जेथे सर्वत्र सालाची पुष्पे विखुरलेली होती, सुखपूर्वक बसलेले श्रीराम शान्त समुद्रासमान प्रसन्न दिसत होते. त्यांना पाहून अत्यंत हर्षित झालेल्या सुग्रीवांनी श्रीरामांशी स्निग्ध आणि सुंदर वाणीमध्ये वार्तालाप करण्यास आरंभ केला. त्यासमयी आनंदातिरेकाने त्यांची वाणी अडखळत होती- अक्षरांचे स्पष्ट उच्चारण होत नव्हते. ॥१५-१६॥
अहं विनिकृतो भ्रात्रा चराम्येष भयार्दितः ।
ऋश्यमूकं गिरिवरं हृतभार्यः सुदुःखितः ॥ १७ ॥
’प्रभो ! माझ्या भावाने मला घरांतून घालवून देऊन माझ्या स्त्रीलाही हिरावून घेतले आहे. मी त्याच्याच भयाने अत्यंत पीडित तसेच दुःखी होऊन या पर्वतश्रेष्ठ ऋष्यमूकावर विचरत राहिलो आहे.’ ॥१७॥
सो ऽहं त्रस्तो भये मग्नो वसाम्युद्‌भ्रां तचेतनः ।
वालिना निकृतो भ्रात्रा कृतवैरश्च राघव ॥ १८ ॥
’मला सारखा त्याचा त्रास होत आहे. मी भयात ग्रस्त राहून भ्रान्तचित्त होऊन या वनात भटकत फिरतो आहे. राघवा ! माझा भाऊ वाली याने मला घरातून घालवून दिल्यावरही माझ्याशी वैर धरले आहे. ॥१८॥
वालिनो मे भयार्तस्य सर्वलोकभयङ्‌क र ।
ममापि त्वमनाथस्य प्रसादं कर्तुमर्हसि ॥ १९ ॥
’प्रभो ! आपण सर्व लोकांना आश्रय देणारे आहात. मी वालीच्या भयाने दुःखी आणि अनाथ झालो आहे. म्हणून आपण माझ्यावर कृपा केली पाहिजे.’ ॥१९॥
एवमुक्तस्तु तेजस्वी धर्मज्ञो धर्मवत्सलः ।
प्रत्युवाच स काकुत्स्थः सुग्रीवं प्रहसंनिव ॥ २० ॥
सुग्रीवाने असे म्हटल्यावर तेजस्वी, धर्मज्ञ आणि धर्मवत्सल भगवान् श्रीरामांनी त्यांना हसत हसत याप्रकारे उत्तर दिले- ॥२०॥
उपकारफलं मित्रमपकारो ऽरिलक्षणम् ।
अद्यैव तं हनिष्यामि तव भार्यापहारिणम् ॥ २१ ॥
’सख्या ! उपकार हेच मैत्रीचे फळ आहे आणि अपकार शत्रुतेचे लक्षण आहे, म्हणून मी आजच तुझ्या स्त्रीचे अपहरण करणार्‍या त्या वालीचा वध करीन.’ ॥२१॥
इमे हि मे महावेगाः पइत्रणस्तिग्मतेजसः ।
कार्त्तिकेयवनोद्‌भूथताः शरा हेमविभूषिताः ॥ २२ ॥
’महाभाग ! माझ्या या बाणांचे तेज प्रचण्ड आहे. सुवर्णभूषित हे शर कार्तिकेयाच्या उत्पत्तिच्या स्थानभूत शरांच्या वनात उत्पन्न झालेले आहेत. (म्हणून अभेद्य आहेत). ॥२२॥
कङ्‌करपत्रप्रतिच्छन्ना महेंद्राशनिसंनिभाः ।
सुपर्वाणः सुतीक्ष्णाग्राः सरोषा भुजगा इव ॥ २३ ॥
’हे कंकपक्ष्यांच्या पिसांनी युक्त आहेत आणि इंद्राच्या वज्राप्रमाणे अमोघ आहेत. यांच्या गांठी सुंदर आणि अग्रभाग तीक्ष्ण आहेत. हे रोषयुक्त भुजंगाप्रमाणे भयंकर आहेत. ॥२३॥
भ्रातृसञ्ज्ञममित्रं ते वालिनं कृतकिल्बिषम् ।
शरैर्विनिहतं पश्य विकीर्णमिव पर्वतम् ॥ २४ ॥
या बाणांनी तुम्ही आपल्या वाली नामक शत्रुला जो भाऊ असूनही तुमचे वाईट करीत आहे, विदीर्ण झालेल्या पर्वताप्रमाणे मरून पृथ्वीवर पडलेला पहाल.’ ॥२४॥
राघवस्य वचः श्रुत्वा सुग्रीवो वाहिनीपतिः ।
प्रहर्षमतुलं लेभे साधु साध्विति चाब्रवीत् ॥ २५ ॥
राघवांचे हे बोलणे ऐकून वानर सेनापती सुग्रीवांना अनुपम प्रसन्नता प्राप्त झाली आणि ते वारंवार त्यांना साधुवाद देत म्हणाले- ॥२५॥
राम शोकाभिभूतो ऽहं शोकार्तानां भवान् गतिः ।
वयस्य इति कृत्वा हि त्वय्यहं परिदेवये ॥ २६ ॥
’श्रीरामा ! मी शोकाने पीडित आहे आणि शोकाकुल प्राण्यांची परमगती आपण आहात. मित्र समजून मी आपल्याजवळ माझे दुःख निवेदन करीत आहे. ॥२६॥
त्वं हि पाणिप्रदानेन वयस्यो मे ऽग्निसाक्षिकम् ।
कृतः प्राणैर्बहुमतः सत्येनापि शपामि ते ॥ २७ ॥
’मी आपल्या हातात हात देऊन अग्निदेवा समोर आपल्याला माझा मित्र बनविले आहे. म्हणून आपण मला आपल्या प्राणांहूनही अधिक प्रिय आहात. ही गोष्ट मी सत्याची शपथ घेऊन सांगत आहे. ॥२७॥
वयस्य इति कृत्वा च विस्रब्धं प्रवदाम्यहम् ।
दुःखमंतर्गतं यन्मे मनो हरति नित्यशः ॥ २८ ॥
’आपण माझे मित्र आहात, म्हणून आपल्यावर पूर्ण विश्वास करून मी अंतरातील दुःख, जे सदा माझ्या मनाला व्याकुळ करीत राहिले आहे, आपल्याला सांगत आहे.’ ॥२८॥
एतावदुक्त्वा वचनं बाष्पदूषितलोचनः ।
बाष्पोपहतया वाचा नौच्चैः शक्नोति भाषितुम् ॥ २९ ॥
इतके बोलत असताच सुग्रीवांच्या नेत्रात अश्रु दाटून आले. त्यांची वाणी अश्रुग‌द्‌गद झाली. म्हणून ते उच्च स्वराने बोलण्यास समर्थ राहिले नाहीत. ॥२९॥
बाष्पवेगं तु सहसा नदीवेगमिवागतम् ।
धारयामास धैर्येण सुग्रीवो रामसंनिधौ ॥ ३० ॥
तत्पश्चात सुग्रीवाने एकाएकी वाढलेल्या नदीच्या वेगाप्रमाणे वाढणार्‍या अश्रूंच्या वेगास रामसन्निध धैर्यपूर्वक रोखले. ॥३०॥
संनिगृह्य तु तं बाष्पं प्रमृज्य नयने शुभे ।
विनिःश्वस्य च तेजस्वी राघवं वाक्यमब्रवीत् ॥ ३१ ॥
अश्रूंना रोखून धरून आपल्या दोन्ही सुंदर नेत्रांना पुसल्यानंतर तेजस्वी सुग्रीव पुन्हा दीर्घश्वास घेऊन राघवास म्हणाले- ॥३१॥
पुराहं वालिना राम राज्यात् स्वादवरोपितः ।
परुषाणि च संश्राव्य निर्धूतो ऽस्मि बलीयसा ॥ ३२ ॥
’रामा ! पूर्वीची गोष्ट आहे बलिष्ठ वालीने कटु वचने ऐकवून बलपूर्वक माझा तिरस्कार केला आणि आपल्या राज्यावरून (युवराज पदावरून) मला खाली उतरविले. ॥३२॥
हृता भार्या च मे तेन प्राणेभ्यो ऽपि गरीयसी ।
सुहृदश्च मदीया ये संयता बंधनेषु ते ॥ ३३ ॥
’इतकेच नाही, माझ्या स्त्रीला, जी मला प्राणांहूनही अधिक प्रिय होती त्याने हिरावून घेतले आणि जितके माझे सुहृद होते त्या सर्वांना कैदेत टाकले.’ ॥३३॥
यत्‍नहवांश्च सुदुष्टात्मा मद्विनाशाय राघव ।
बहुशस्तत् प्रयुक्ताश्च वानरा निहता मया ॥ ३४ ॥
’राघवा ! यानंतर तो दुरात्मा वाली माझ्या विनाशासाठी प्रयत्‍न करीत राहिला आहे. त्याने धाडलेल्या बर्‍याचशा वानरांचा मी वध करून चुकलो आहे.’ ॥३४॥
शङ्‌कहया त्वेतया चेह दृष्ट्‍वा त्वामपि राघव ।
नोपसर्पाम्यहं भीतो भये सर्वे हि बिभ्यति ॥ ३५ ॥
’राघवा ! आपल्या पाहून माझ्या मनात असा संदेह आला म्हणून भयभीत झाल्यामुळे मी प्रथम आपल्याजवळ येऊ शकलो नाही; कारण की भयाचा अवसर आल्यावर प्रायः सर्व घाबरून जातात. ॥३५॥
केवलं हि सहाया मे हनुमत् प्रमुकास्त्विमे ।
अतो ऽहं धारयाम्यद्य प्राणान् कृच्छ्रगतो ऽपि सन् ॥ ३६ ॥
’केवळ हे हनुमान् आदि वानरच माझे सहायक आहेत म्हणून महान् संकटात पडूनही मी अद्याप प्राण धारण करीत आहे. ॥३६॥
एते हि कपयः स्निग्धा मां रक्षंति समंततः ।
सह गच्छंति गंतव्ये नित्यं तिष्ठंति च स्थिते ॥ ३७ ॥
’या लोकांचा माझ्यावर स्नेह आहे म्हणून हे सर्व वानर सर्व बाजूनी सदा माझे रक्षण करीत राहात आहेत. जेथे जावयाचे असेल तेथे ते सोबत बरोबर येतात आणि जेव्हा मी कोठे राहातो तेव्हा हे नित्य माझ्या बरोबर राहातात. ॥३७॥
सङ्‌क्षे्पस्त्वेष ते राम किमुक्त्वा विस्तरं हि ते ।
स मे ज्येष्ठो रिपुर्भ्राता वाली विश्रुतपौरुषः ॥ ३८ ॥
’रामा ! ही मी थोडक्यात आपली स्थिति सांगितली आहे. आपल्या समोर विस्तारपूर्वक सांगून काय फायदा ? वाली माझा ज्येष्ठ भाऊ आहे, तरीही यावेळी माझा शत्रु झाला आहे. त्याचा पराक्रम विख्यात आहे. ॥३८॥
तद्विनाशाद्धि मे दुःखं प्रनष्टं स्यादनंतरम् ।
सुखं मे जीविनं चैव तद्विनाशनिबंधनम् ॥ ३९ ॥
(जरी भावाचा नाश हे दुःखाचे कारण आहे तथापि) या समयी जे माझे दुःख आहे, ते त्याचा नाश झाल्यानेच नष्ट होऊ शकते. माझे सुख आणि जीवन त्याच्या विनाशावर निर्भर आहे. ॥३९॥
एष मे राम शोकांतः शोकार्तेन निवेदितः ।
दुःखितः सुखितो वापि सख्युर्नित्यं सखा गतिः ॥ ४० ॥
’श्रीरामा ! हाच माझ्या शोकाच्या नाशाचा उपाय आहे. मी शोकाने पीडित झाल्यामुळे आपल्याला ही गोष्ट निवेदन केली आहे, कारण की मित्र दुःखात असो अथवा सुखात तो आपल्या मित्राची सदा सहायता करतो. ॥४०॥
श्रुत्वैतद्वचनं रामः सुग्रीवमिदमब्रवीत् ।
किन्निमित्तभूद्वैरं श्रोतुमिच्छामि तत्त्वतः ॥ ४१ ॥
हे ऐकून रामांनी सुग्रीवास म्हटले- ’तुम्हा दोघा भावात वैर उत्पन्न होण्याचे काय कारण आहे, हे मी ठीक ठीक ऐकू इच्छितो. ॥४१॥
सुखं हि कारणं श्रत्वा वैरस्य तव वानर ।
आनंतर्यं विधास्यामि संप्रधार्य बलाबलम् ॥ ४२ ॥
’वानरराज ! तुमच्यातील शत्रुतेचे कारण ऐकून तुम्हां दोघांच्या प्रबलता आणि निर्बलतेचा निश्चय करून नंतर मी तात्काळच तुम्हांला सुखी बनविण्याचा उपाय करीन. ॥४२॥
बलवान् हि ममामर्षः श्रुत्वा त्वामवमानितम् ।
वर्तते हृदयोत्कंपी प्रावृड्वेग इवांभसः ॥ ४३ ॥
’ज्याप्रमाणे वर्षाकाळी नदी आदिंचा वेग फारच वाढतो त्याप्रकारे तुमचा अपमान झाल्याची गोष्ट ऐकून माझा प्रबल रोष वाढत चालला आहे आणि माझ्या हृदयाला कंपित करीत आहे. ॥४३॥
हृष्टः कथय विस्रब्धो यावदारोप्यते धनुः ।
सृष्टश्च हि मया बाणो निरस्तश्च रिपुस्तव ॥ ४४ ॥
’मी धनुष्य चढविण्यापूर्वीच तुम्ही आपली सर्व हकिगत प्रसन्नतापूर्वक सांगून टाका; कारण ज्या क्षणी मी बाण सोडीन त्याच क्षणी तुमचा शत्रु तात्काळ काळाच्या मुखात निघून जाईल.’ ॥४४॥
एवमुक्तस्तु सुग्रीवः काकुत्स्थेन महात्मना ।
प्रहर्षमतुलं लेभे चतुर्भिः सह वानरैः ॥ ४५ ॥
महात्मा काकुत्स्थांनी असे म्हटल्यावर सुग्रीवांना आपल्या चारी वानरांसह अपार हर्ष झाला. ॥४५॥
ततः प्रहृष्टवदनः सुग्रीवो लक्ष्मणाग्रजे ।
वैरस्य कारणं तत्त्वं आख्यातुमुपचक्रमे ॥ ४६ ॥
त्यानंतर सुग्रीवांच्या मुखावर प्रसन्नता पसरली आणि त्यांनी लक्ष्मणाग्रज रामांना वाली बरोबर वैर निर्माण होण्याचे यथार्थ कारण सांगण्यास आरंभ केला. ॥४६॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे अष्टमः सर्गः ॥ ८ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा आठवा सर्ग पूरा झाला. ॥८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP