[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ त्रिंशः सर्गः॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
सीतया स कर्तव्ये वार्तालापे हनुमतो विचारणा -
सीतेशी वार्तालाप करण्यासंबन्धी हनुमन्ताचे विचार करणे -
हनुमानपि विक्रान्तः सर्वं शुश्राव तत्त्वतः ।
सीतायास्त्रिजटायाश्च राक्षसीनां च तर्जितम् ॥ १ ॥
पराक्रमी हनुमन्तानेही सीतेचा विलाप, त्रिजटेची स्वप्नचर्चा आणि राक्षसस्त्रियांचे धमकावणे, दटावणे हे सर्व प्रसंग व्यवस्थित ऐकले. ॥१॥
अवेक्षमाणस्तां देवीं देवतामिव नन्दने ।
ततो बहुविधां चिन्तां चिन्तयामास वानरः ॥ २ ॥
नन्दनवनान्तील एखाद्या देवीप्रमाणे सीता दिसत होती. तिला पाहून वानरवीर हनुमान नाना प्रकारांनी चिन्ता करू लागले- ॥२॥
यां कपीनां सहस्राणि सुबहून्ययुतानि च ।
दिक्षु सर्वासु मार्गन्ते सेयमासादिता मया ॥ ३ ॥
ज्या सीतेचा शोध हजारो लाखो वानर सर्व दिशांमध्ये घेत आहेत, त्या सीतेला मी आज पाहिले आहे. ॥३॥
चारेण तु सुयुक्तेन शत्रोः शक्तिमवेक्षता ।
गूढेन चरता तावदवेक्षितमिदं मया ॥ ४ ॥

राक्षसानां विशेषश्च पुरी चेयं निरीक्षिता ।
राक्षसाधिपतेरस्य प्रभावो रावणस्य च ॥ ५ ॥
मी स्वामी द्वारा नियुक्त दूत, शत्रूचे सामर्थ्य अजमाविण्यासाठी बन्दोबस्ताने हेराचा वेष धारण करून गुप्तपणे संचार करीत असता माझ्या सर्व काही पहाण्यात आले आहे. राक्षसांच्या ठिकाणी विशेष काय आहे हेही दिसून आले आहे. या पुरीचे तसेच राक्षसराज रावणाच्या प्रभावाचेही मी निरीक्षण केले आहे. ॥४-५॥
युक्तं तस्याप्रमेयस्य सर्वसत्त्वदयावतः ।
समाश्वासयितुं भार्यां पतिदर्शनकांक्षिणीम् ॥ ६ ॥
ही सीता, जी असीम प्रभावशाली आणि सर्व जीवांवर दया करण्यार्‍या भगवान श्रीरामांची भार्या आहे. ती आपल्या पतिदेवाच्या दर्शनाची अभिलाषा करीत आहे, म्हणून तिचे सान्त्वन करणेच योग्य आहे. ॥६॥
अहमाश्वासयाम्येनां पूर्णचन्द्रनिभाननाम् ।
अदृष्टदुःखां दुःखस्य न ह्यन्तमधिगच्छतीम् ॥ ७ ॥
हिचे मुख पूर्ण चन्द्राप्रमाणे मनोहर आहे. तिने यापूर्वी कधी असे दुःख अनुभवले नव्हते परन्तु यावेळी तिच्या दुःखास पारावर राहिलेला नाही म्हणून मी तिला आश्वासन देईन. ॥७॥
यदि ह्यह्यं सतीमेनां शोकोपहतचेतनाम् ।
अनाश्वास्य गमिष्यामि दोषवद् गमनं भवेत् ॥ ८ ॥
ही शोकामुळे अत्यन्त व्याकुळ झालेली आहे. जर मी सती साध्वी सीतेचे सान्त्वन न करता येथून परत जाईन तर ते माझ्या दृष्टीने दोषयुक्त ठरेल. ॥८॥
गते हि मयि तत्रेयं राजपुत्री यशस्विनी ।
परित्राणमपश्यन्ती जानकी जीवितं त्यजेत् ॥ ९ ॥
मी निघून गेलो तर आपल्या रक्षणाचा कुठलाही उपाय दिसत नाही हे पाहून ही यशस्विनी राजकुमारी जानकी आपल्या जीवनाचा अन्त करील. ॥९॥
यथा च स महाबाहुः पूर्णचन्द्रनिभाननः ।

समाश्वासयितुं न्याय्यः सीतादर्शनलालसः ॥ १० ॥
पूर्णचन्द्राप्रमाणे मनोहर मुख असलेले महाबाहु श्रीरामचन्द्रही सीतेच्या दर्शनासाठी उत्सुक आहेत. ज्याप्रमाणे त्यांना सीतेचा सन्देश ऐकवून सान्त्वना देणे उचित आहे, त्याप्रमाणे सीतेलाही त्यांचा सन्देश ऐकवून आश्वासन देणे आवश्यक आहे, उचित आहे. ॥१०॥
निशाचरीणां प्रत्यक्षमक्षमं चाभिभाषितम् ।
कथं नु खलु कर्तव्यमिदं कृच्छ्रगतो ह्यहम् ॥ ११ ॥
परन्तु, ह्या राक्षसस्त्रियांच्या समोर तिच्याशी भाषण करणे माझ्या दृष्टीने ठीक नाही. या स्थितीत हे कार्य कसे साधावे याचा निश्चय करणे हीच सर्वात मोठी अडचण आहे, समस्या आहे. ॥११॥
अनेन रात्रिशेषेण यदि नाश्वास्यते मया ।
सर्वथा नास्ति सन्देहः परित्यक्ष्यति जीवितम् ॥ १२ ॥
जर ही रात्र संपत आली असता मी सीतेचे सान्त्वन केले नाही तर ती सर्वथा आपल्या प्राणांचा परित्याग करील, यात सन्देह नाही. ॥१२॥
रामस्तु यदि पृच्छेन्मां किं मां सीताब्रवीद् वचः ।
किमहं तं प्रतिब्रूयामसम्भाष्य सुमध्यमाम् ॥ १३ ॥
जर श्रीरामचन्द्रांनी मला विचारले की सीतेने माझ्यासाठी काय सन्देश धाडला आहे तर या सुमध्यमा सीतेशी न बोलता जर मी येथून गेलो तर मी त्यांना काय उत्तर देऊ ? ॥१३॥
सीतासन्देशरहितं मामितस्त्वरया गतम् ।
निर्दहेदपि काकुत्स्थः क्रुद्धस्तीव्रेण चक्षुषा ॥ १४ ॥
जर मी सीतेचा सन्देश न घेतां येथून ताबडतोब परत गेलो तर ते काकुत्स्थ कुळभूषण भगवान श्रीराम, आपल्या क्रोधाविष्ट दुःसह दृष्टीने मला जाळून भस्म करून टाकतील. ॥१४॥
यदि वोद्योजयिष्यामि भर्तारं रामकारणात् ।
व्यर्थमागमनं तस्य ससैन्यस्य भविष्यति ॥ १५ ॥
जर मी हिला सान्त्वना न देताच येथून परत गेलो आणि श्रीरामचन्द्रांच्या कार्यसिद्धिसाठी माझ्या स्वामींना, वानरराज सुग्रीवांना उत्तेजना दिली तरी वानरसेने सह त्यांचे येथपर्यन्त येणे व्यर्थच होईल (कारण त्यापूर्वीच सीता आपल्या प्राणांचा त्याग करील.) ॥१५॥
अन्तरं त्वहमासाद्य राक्षसीनामवस्थितः ।
शनैराश्वासयाम्यद्य सन्तापबहुलामिमाम् ॥ १६ ॥
ठीक आहे, या राक्षसी येथे असतांनाच त्या इकडे तिकडे पहात आहेत अशी सन्धी साधून मी येथे बसूनच आजच हळू हळू तिचे सान्त्वन करीन कारण ही मनात फारच सन्तप्त झालेली आहे. ॥१६॥
अहं ह्यतितनुश्चैव वानरश्च विशेषतः ।
वाचं चोदाहरिष्यामि मानुषीमिह संस्कृताम् ॥ १७ ॥
मी जरी अति सूक्ष्म रूप धारण केले आहे आणि विशेषतः मी जरी वानर आहे तरी येथे मी मानवोचित संस्कृत भाषेतच बोलेन. ॥१७॥
यदि वाचं प्रदास्यामि द्विजातिरिव संस्कृताम् ।
रावणं मन्यमाना मां सीता भीता भविष्यति ॥ १८ ॥
परन्तु असे करण्यात एक अडचण आहे. जर मी द्विजांच्या प्रमाणे संस्कृत वाणीचा प्रयोग केला तर मला रावण समजून सीता (अधिकच) भयभीत होईल. ॥१८॥
अवश्यमेव वक्तव्यं मानुषं वाक्यमर्थवत् ।
मया सान्त्वयितुं शक्या नान्यथेयमनिन्दिता ॥ १९ ॥
अशा परिस्थिती मध्ये मला त्या सार्थक भाषेचाच प्रयोग केला पाहिजे (जी अयोध्येच्या आसपासच्या लोकांची बोलभाषा असेल) अन्यथा या सती साध्वी सीतेला मी उचित सान्त्वना देऊ शकणार नाही. ॥१९॥
सेयमालोक्य मे रूपं जानकी भाषितं तथा ।
रक्षोभिस्त्रासिता पूर्वं भूयस्त्रासं उपैष्यति ॥ २० ॥
मी जर एकदम समोर गेलो तर माझे हे वानररूप पाहून आणि माझ्या मुखान्तून मानवोचित भाषा ऐकून, जी प्रथमच राक्षसांच्या द्वारा भयभीत झालेली आहे, ती जनकनन्दिनी सीता अधिकच घाबरून जाईल. ॥२०॥
ततो जातपरित्रासा शब्दं कुर्यान्मनस्विनी ।
जानाना मां विशालाक्षी रावणं कामरूपिणम् ॥ २१ ॥
मनात भय उत्पन्न झाले असता ती विशालाक्षी सीता मला इच्छेनुसार रूप धारण करणारा रावण समजून मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागेल. ॥२१॥
सीतया च कृते शब्दे सहसा राक्षसीगणः ।
नानाप्रहरणो घोरः समेयादन्तकोपमः ॥ २२ ॥
सीता ओरडू लागली तर यमराजासारख्या भयानक राक्षसस्त्रिया निरनिराळ्या प्रकारची हत्यारे घेऊन येतील आणि तिला धमकावतील. ॥२२॥
ततो मां सम्परिक्षिप्य सर्वतो विकृताननाः ।
वधे च ग्रहणे चैव कुर्युर्यत्‍नं यथाबलम् ॥ २३ ॥
नन्तर त्या आक्राळ विक्राळ तोंडे असलेल्या महाबलवान राक्षसस्त्रिया मला सर्व बाजूनी घेरून मारण्याचा अथवा पकडण्याचा प्रयत्‍न करतील. ॥२३॥
तं मां शाखाः प्रशाखाश्च स्कन्धांश्चोत्तमशाखिनाम् ।
दृष्ट्‍वा च परिधावन्तं भवेयुः परिशङ्‌किताः ॥ २४ ॥
नन्तर मला मोठमोठ्या वृक्षांच्या शाखा, उपशाखा आणि मोठमोठ्या फान्द्यावरून धावतांना पाहून त्या सर्वच्या सर्व संशयात पडतील. ॥२४॥
मम रूपं च सम्प्रेक्ष्य वने विचरतो महत् ।
राक्षस्यो भयवित्रस्ता भवेयुर्विकृतस्वराः ॥ २५ ॥
वनात संचार करणार्‍या माझ्या त्या विशाल रूपास पाहून राक्षसस्त्रियाही भयभीत होऊन विकृत स्वरात ओरडू लागतील. ॥२५॥
ततः कुर्युः समाह्वानं राक्षस्यो रक्षसामपि ।
राक्षसेन्द्रनियुक्तानां राक्षसेन्द्रनिवेशने ॥ २६ ॥
त्यानन्तर त्या निशाचरी राक्षसराज रावणाच्या महालात, त्याने नियुक्त केलेल्या राक्षसांना बोलावून आणतील. ॥२६॥
ते शूलशक्तिनिस्त्रिंश विविधायुधपाणयः ।
आपतेयुर्विमर्देऽस्मिन् वेगेनोद्वेगकारणात् ॥ २७ ॥
या गडबड गोन्धळात ते राक्षसही मनातून उद्विग्न होऊन शूल, बाण, तलवार आणि विविध प्रकारची शस्त्रास्त्रे घेऊन अत्यन्त वेगाने येथे येऊन धडकतील. ॥२७॥
संरुद्धस्तैस्तु परितो विधमे राक्षसं बलम् ।
शक्नुयां न तु संप्राप्तुं परं पारं महोदधेः ॥ २८ ॥
त्यांच्या द्वारा सर्वबाजूनी घेरले गेल्यावर मी राक्षसांच्या सेनेचा संहार तर करू शकतो परन्तु (दमल्याने) समुद्राच्या परतीरास मात्र पोहोचू शकणार नाही. ॥२८॥
मां वा गृह्णीयुरावृत्य बहवः शीघ्रकारिणः ।
स्यादियं चागृहीतार्था मम च ग्रहणं भवेत् ॥ २९ ॥
जर अत्यन्त चपळ राक्षसांनी मला घेरून पकडले तर सीतेचा मनोरथ मात्र पूर्ण होणार नाही आणि मीही येथे कैदी बनून जाईन. ॥२९॥
हिंसाभिरुचयो हिंस्युः इमां वा जनकात्मजाम् ।
विपन्नं स्यात् ततः कार्यं रामसुग्रीवयोरिदम् ॥ ३० ॥
याशिवाय हिंसेची आवड असणार्‍या या राक्षसांनी जर कदाचित जनकनन्दिनी सीतेस मारून टाकले तर श्रीरघुनाथ आणि सुग्रीव यांचे जे सीतेची प्राप्तीरूप अभीष्ट कार्य, तेही नष्ट होऊन जाईल. ॥३०॥
उद्देशे नष्टमार्गेऽस्मिन् राक्षसैः परिवारिते ।
सागरेण परिक्षिप्ते गुप्ते वसति जानकी ॥ ३१ ॥
हे स्थान सर्व बाजूनी राक्षसांनी घेरलेले आहे. येथे येण्याचा मार्ग दुसर्‍या कुणी पाहिलेला अथवा जाणलेला नाही तसेच हा प्रदेश समुद्राने चारी बाजूने वेढलेला आहे. अशा गुप्त स्थानात जानकी निवास करीत आहे. ॥३१॥
विशस्ते वा गृहीते वा रक्षोभिर्मयि संयुगे ।
नान्यं पश्यामि रामस्य सहाय्यं कार्यसाधने ॥ ३२ ॥
जर राक्षसांनी मला संग्रामात मारून टाकले अथवा पकडले तर मग श्रीरघुनाथाचे कार्य पूर्ण करण्यासाठी कोणी दुसरा सहायकही मला आढळून येत नाही आहे. ॥३२॥
विमृशंश्च न पश्यामि यो हते मयि वानरः ।
शतयोजनविस्तीर्णं लङ्‌घयेत महोदधिम् ॥ ३३ ॥
खूप विचार करूनही मला दुसरा कोणी वानर असा आढळूनच येत नाही की जो मी मारला गेलो तर शत योजनांचा विस्तृत महासागराचे उल्लंघन करू शकेल. ॥३३॥
कामं हन्तुं समर्थोऽस्मि सहस्राण्यपि रक्षसाम् ।
नतु शक्ष्याम्यहं प्राप्तुं परं पारं महोदधेः ॥ ३४ ॥
मी इच्छेनुसार हजारो राक्षसांना ठार करण्यास समर्थ आहे परन्तु जर मी युद्ध करण्यातच गुन्तलो तर महासागराच्या दुसर्‍या तीरास परत जाऊ शकणार नाही. ॥३४॥
असत्यानि च युद्धानि संशयो मे न रोचते ।
कश्च निःसंशयं कार्यं कुर्यात् प्राज्ञः ससंशयम् ॥ ३५ ॥
युद्ध नेहमी अनिश्चयात्मक असते (त्यात कुठल्या पक्षाचा विजय होईल हे निश्चित नसते) आणि मला संशययुक्त कार्य प्रिय नाही. कोण असा बुद्धिमान असेल की जो संशयरहित कार्यास संशययुक्त बनविण्याची इच्छा करील ? ॥३५॥
एष दोषो महान् हि स्यान्मम सीताभिभाषणे ।
प्राणत्यागश्च वैदेह्या भवेदनभिभाषणे ॥ ३६ ॥
सीतेशी संभाषण करण्यात मला मुख्य हाच मोठा अडथळा प्रतीत होत आहे. आणि जर मी संभाषण केले नाही तर विदेहनन्दिनी सीता निश्चितच प्राणत्याग करील. ॥३६॥
भूताश्चार्था विरुध्यन्ति देशकालविरोधिताः ।
विक्लवं दूतमासाद्य तमः सूर्योदये यथा ॥ ३७ ॥
सूर्याचा उदय झाल्यावर ज्याप्रमाणे सर्वत्र पसरलेला अन्धःकाराचे काही चालत नाही, तो निष्फळ होतो, नष्ट होतो त्याप्रमाणे अविवेकी किंवा असावधान दूताच्या हाती पडल्यावर जवळ जवळ पूर्ण होत आलेले कार्यही देश-काळ विरोधी होऊन असफळ, अयशस्वी ठरते. ॥३७॥
अर्थानर्थान्तरे बुद्धिः निश्चितापि न शोभते ।
घातयन्ति हि कार्याणि दूताः पण्डितमानिनः ॥ ३८ ॥
कर्तव्य आणि अकर्तव्य या विषयी निश्चित झालेली स्वामीची बुद्धिही अविवेकी दूतामुळे शोभून दिसत नाही कारण स्वतःला मोठा बुद्धिमान अथवा पण्डित समजणारा दूत आपल्या बेअक्कल वागण्याने कार्याचा नाश करून टाकतो. ॥३८॥
न विनश्येत् कथं कार्यं वैक्लव्यं न कथं मम ।
लङ्‌घनं च समुद्रस्य कथं नु न वृथा भवेत् ॥ ३९ ॥

कथं नु खलु वाक्यं मे श्रुणुयान्नोद्विजेत च ।
इति संचिन्त्य हनुमान् चकार मतिमान् मतिम् ॥ ४० ॥
म्हणून काय केले असता हे कार्य बिघडणार नाही, काय केले असता माझ्याकडून कुठल्याही प्रकारे असावधानी होणार नाही आणि माझे समुळ घनही व्यर्थ ठरणार नाही, कुठल्या प्रकारे सीता माझे सर्व म्हणणे ऐकून तर घेईल पण घाबरणार मात्र नाही - या सर्व गोष्टी संबन्धी विचार करून बुद्धिमान हनुमन्तानी हा निश्चय केला - ॥३९-४०॥
राममक्लिष्टकर्माणं स्वबन्धुमनुकीर्तयन् ।
नैनामुद्वेजयिष्यामि तद्‌बन्धुगतचेतनाम् ॥ ४१ ॥
जिचे चित्त आपल्या जीवनबन्धु श्रीरामाच्या ठिकाणी जडलेले आहे, त्या सीतेला मी तिच्या प्रियतम श्रीरामाचे, की जो अनायास महान कर्म करणारा आहे, त्याचे गुण वारंवार गाऊन ऐकवीन आणि तिला उद्विग्न होऊ देणार नाही. ॥४१॥
इक्ष्वाकूणां वरिष्ठस्य रामस्य विदितात्मनः ।
शुभानि धर्मयुक्तानि वचनानि समर्पयन् ॥ ४२ ॥
मी इक्ष्वाकु कुळभूषण विदितात्मा भगवान श्रीरामाची सुन्दर व धर्मानुकूल वचने ऐकवीत येथेच बसून राहीन. ॥४२॥
श्रावयिष्यामि सर्वाणि मधुरां प्रब्रुवन् गिरम् ।
श्रद्धास्यति यथा हीयं तथा सर्वं समादधे ॥ ४३ ॥
मी मधुर वाणीने श्रीरामाचा सर्व सन्देश याप्रकारे ऐकवीन की ज्यायोगे सीतेचा त्या वचनावर विश्वास बसेल. तिच्या मनातील सन्देह दूर होईल अशाप्रकारे मी सर्व गोष्टींचे समाधान करीन. ॥४३॥
इति स बहुविधं महाप्रभावो
जगतिपतेः प्रमदामवेक्षमाणः ।
मधुरमवितथं जगाद वाक्यं
द्रुमविटपान्तरमास्थितो हनूमान् ॥ ४४ ॥
याप्रमाणे विविध प्रकारे विचार करून अशोक वृक्षाच्या शाखांमध्ये लपून बसलेला महाप्रभावशाली हनुमान पृथ्वीपती श्रीरामचन्द्रांच्या भार्येकडे बघत मधुर आणि यथार्थ भाषण करू लागला. ॥४४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे त्रिंशः सर्गः ॥ ३० ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा तिसावा सर्ग पूरा झाला ॥३०॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP