श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ एकोनषष्टितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

प्रहस्तस्य वधेन दुःखितस्य रावणस्य युद्धाय प्रस्थानं, तेन सहागतानां वीराणां परिचयो रावणस्य प्रहारेण सुग्रीवस्य मूर्छा, लक्ष्मणस्य रणभूमावागमनं हनुमद्-रावणयोर्मिथस्तलप्रहारो, रावणकर्तृकं नीलस्य विसंज्ञत्वम्, शक्तिप्रहारेण लक्ष्मणस्य मूर्छा ससंज्ञता च, श्रीरामात् पराजितस्य रावणस्य लंकायां प्रवेशः -
प्रहस्त मारला गेल्याने दुःखी झालेल्या रावणाचे स्वतःच युद्धासाठी येणे, त्याच्या बरोबर आलेल्या मुख्य वीरांचा परिचय, रावणाच्या माराने सुग्रीवाचे अचेत होणे, लक्ष्मणांचे युद्धात येणे, हनुमान्‌ आणि रावणात थपडांचा मारा, रावणद्वारा नीलाचे मूर्च्छित होणे, लक्ष्मणाचे शक्तिच्या आघाताने मूर्च्छित आणि सचेत होणे, तसेच श्रीरामांच्या द्वारे परास्त होऊन रावणाचे लंकेत घुसणे -
तस्मिन् हते राक्षससैन्यपाले
प्लवंगमानामृषभेण युद्धे ।
भीमायुधं सागरवेगतुल्यं
विदुद्रुवे राक्षसराजसैन्यम् ॥ १ ॥
वानरश्रेष्ठ नीलाच्या द्वारा युद्धस्थळी तो राक्षस सेनापति प्रहस्त मारला गेल्यावर समुद्रासमान वेग असलेली आणि भयानक आयुधांनी युक्त ती राक्षसराजाची सेना पळू लागली. ॥१॥
गत्वाऽथ रक्षोधिपतेः शशंसुः
सेनापतिं पावकसूनुशस्तम् ।
तच्चापि तेषां वचनं निशम्य
रक्षोधिपः क्रोधवशं जगाम ॥ २ ॥
राक्षसांनी निशाचरराज रावणाजवळ जाऊन अग्निपुत्र नीलाच्या हस्ते प्रहस्त मारला गेल्याचा समाचार ऐकविला. त्यांचे हे बोलणे ऐकून राक्षसराज रावणाला फार क्रोध आला. ॥२॥
संख्ये प्रहस्तं निहतं निशम्य
क्रोधार्दितः शोकपरीतचेताः ।
उवाच तान् राक्षसयूथमुख्यान्
इंद्रो यथा निर्जरयूथमुख्यान् ॥ ३ ॥
युद्धस्थळी प्रहस्त मारला गेला हे ऐकतांच तो क्रोधाने खळवून उठला, परंतु थोड्‍याच वेळाने त्याचे चित्त प्रहस्तासाठी शोकाने व्याकुळ झाले, म्हणून तो मुख्य मुख्य देवतांशी चर्चा करणार्‍या इंद्राप्रमाणे राक्षससेनेच्या मुख्य अधिकार्‍यांना म्हणाला- ॥३॥
नावज्ञा रिपवे कार्या यैरिन्द्रबलसूदनः ।
सूदितः सैन्यपालो मे सानुयात्रः सकुञ्जरः ॥ ४ ॥
शत्रुंना नगण्य समजून त्यांची अवहेलना करता कामा नये. मी ज्यांना फार लहान समजत होतो त्याच शत्रुने माझा असा सेनापतिस, जो इंद्राच्या सेनेचा संहार करण्यासही समर्थ होता, सेवकांसह आणि हत्तीसहित मारून टाकले आहे. ॥४॥
सोऽहं रिपुविनाशाय विजयायाविचारयन् ।
स्वयमेव गमिष्यामि रणशीर्षं तदद्‌भुतम् ॥ ५ ॥
आता मी शत्रूंचा संहार करण्यासाठी आणि आपल्या विजयासाठी कुठलाही विचार न करता स्वतःच या अद्‌भुत युद्धाच्या तोंडावर जाईन. ॥५॥
अद्य तद्वानरानीकं रामं च सहलक्ष्मणम् ।
निर्दहिष्यामि वाणौघैः वनं दीप्तैरिवाग्निभिः ।
अद्य संतर्पयिष्यामि पृथिवीं कपिशोणितैः ॥ ६ ॥
ज्याप्रमाणे प्रज्वलित आग वनाला जाळून टाकते, त्याचप्रमाणे आज मी आपल्या बाणसमूहांनी वानरांची सेना तसेच लक्ष्मणासहित रामाला भस्म करून टाकीन. आज वानरांच्या रक्ताने मी या पृथ्वीला तृप्त करीन. ॥६॥
स एवमुक्त्वा ज्वलनप्रकाशं
रथं तुरंगोत्तमराजियुक्तम् ।
प्रकाशमानं वपुषा ज्वलन्तं
समारुरोहामरराजशत्रुः ॥ ७ ॥
असे म्हणून तो देवराजाचा शत्रु रावण अग्निप्रमाणे प्रकाशमान रथावर स्वार झाला. त्याच्या रथाला उत्तम घोड्‍यांचे समूह जोडलेले होते. तो आपल्या शरीराने प्रज्वलित अग्निसमान उद्‍भासित होत होता. ॥७॥
स शङ्‌खभैरीपणवप्रणादैः
आस्फोटितक्ष्वेलितसिंहनादैः ।
पुण्यैः स्तवैश्चाप्यभिपूज्यमानः
तदा ययौ राक्षसराजमुख्यः ॥ ८ ॥
त्याच्या प्रस्थानाच्या वेळी शंख, भेरी आणि पणव आदि वाद्ये वाजू लागली. योद्धे षड्‍डू ठोकणे (दंड थोपटणे), गर्जना करणे आदि सिंहनाद करू लागले. बंदीजन पवित्र स्तुतींच्या द्वारा राक्षसराज शिरोमणी रावणाची उत्तम प्रकारे समाराधना करू लागले. याप्रकारे त्याने यात्रा केली. ॥८॥
स शैलजीमूतनिकाशरूपैः
मांसाशनैः पावकदीप्तनेत्रेः ।
बभौ वृतो राक्षसराजमुख्यो
भूतैर्वृतो रुद्र इवामरेशः ॥ ९ ॥
पर्वत आणि मेघांसमान काळ्या आणि विशालरूप असलेल्या मांसाहारी राक्षसांनी, ज्यांचे नेत्र प्रज्वलित अग्निप्रमाणे उद्दीप्त होत होते; घेरलेला राक्षसराजाधिराज रावण भूतगणांनी घेरलेल्या देवेश्वर रूद्रासमान शोभून दिसत होता. ॥९॥
ततो नगर्याः सहसा महौजा
निष्क्रम्य तद् वानरसैन्यमुग्रम् ।
महार्णवाभ्रस्तनितं ददर्श
समुद्यतं पादपशैलहस्तम् ॥ १० ॥
महातेजस्वी रावणाने लंकापुरीतून एकाएकी निघून महासागर आणि मेघांसमान गर्जना करणार्‍या त्या भयंकर वानर सेनेला पाहिले, जी हातात पर्वतशिखरे आणि वृक्ष घेऊन युद्धासाठी तयार होती. ॥१०॥
तद् राक्षसानीकमतिप्रचण्डं
आलोक्य रामो भुजगेन्द्रबाहुः ।
विभीषणं शस्त्रभृतां वरिष्ठं
उवाच सेनानुगतः पृथुश्रीः ॥ ११ ॥
त्या अत्यंत प्रचण्ड राक्षससेनेला पाहून नागराज शेषाप्रमाणे भुजा असणारे, वानर सेनेने घेरलेले तसेच पुष्ट - शोभा संपत्तिने युक्त श्रीरामचंद्रांनी शस्त्रधार्‍यांमध्ये श्रेष्ठ विभीषणास विचारले- ॥११॥
नानापताकाध्वजशस्त्रजुष्टं
प्रासासिशूलायुधशस्त्रजुष्टम् ।
कस्येदमक्षोभ्यमभीरुजुष्टं
सैन्यं महेन्द्रोपमनागजुष्टम् ॥ १२ ॥
जी नाना प्रकारच्या ध्वजा- पताका आणि छत्रांनी सुशोभित, प्रास, खड्ग आणि शूल आदि अस्त्र-शस्त्रांनी संपन्न, अजेय, निर्भय योद्धांनी सेवित आणि महेंद्रपर्वतासारख्या विशालकाय हत्तीनी भरलेली आहे, अशी ही सेना कोणाची आहे ? ॥१२॥
ततस्तु रामस्य निशम्य वाक्यं
विभीषणः शक्रसमानवीर्यः ।
शशंस रामस्य बलप्रवेकं
महात्मनां राक्षसपुङ्‌गवानाम् ॥ १३ ॥
इंद्रासमान बलशाली विभीषणांनी श्रीरामांचे उपर्युक्त बोलणे ऐकून महामना राक्षस शिरोमणीच्या बल आणि सैनिक शक्तिचा परिचय करून देत त्यांना म्हटले- ॥१३॥
योऽसौ गजस्कन्धगतो महात्मा
नवोदितार्कोपमताम्रवक्त्रः ।
प्रकम्पयन्नागशिरोऽभ्युपैति
ह्यकम्पनं त्वेनमवेहि राजन् ॥ १४ ॥
राजन्‌ ! हा जो महामनस्वी वीर हत्तीच्या पाठीवर बसलेला आहे, ज्याचे मुख नवोदित सूर्यासमान लाल रंगाचे आहे तसेच जो आपल्या भाराने हत्तीच्या मस्तकात कंपन उत्पन्न करीत इकडे येत आहे, त्याला आपण अकंपन(*१) समजा. ॥१४॥ (*१- हा अकंपन हनुमानद्वारा मारल्या गेलेल्या अकंपनाहून भिन्न आहे.)
योऽसौ रथस्थो मृगराजकेतुः
धून्वन् धनुः शक्रधनुःप्रकाशम् ।
करीव भात्युग्रविवृत्तदंष्ट्रः
स इन्द्रजिन्नाम वरप्रधानः ॥ १५ ॥
तो जो रथावर आरूढ झालेला आहे, ज्याच्या ध्वजेवर सिंहाचे चिह्न आहे, ज्याचे दात हत्तीसमान उग्र आणि बाहेर आलेले आहेत तसेच जो इंद्रधनुष्याच्या समान कांतिमान्‌ धनुष्य हलवत येत आहे, त्याचे नाव इंद्रजित्‌ आहे. तो वरदानाच्या प्रभावाने फार प्रबल झालेला आहे. ॥१५॥
यश्चैष विन्ध्यास्तमहेन्द्रकल्पो
धन्वी रथस्थोऽतिरथोऽतिवीरः ।
विस्फारयंश्चापमतुल्यमानं
नाम्नाऽतिकायोऽतिविवृद्धकायः ॥ १६ ॥
हा जो विंध्याचल, अस्ताचल आणि महेंद्रगिरि समान विशालकाय, अतिरथी आणि अतिशय वीर धनुष्य घेऊन रथावर बसलेला आहे तसेच आपल्या अनुपम धनुष्यास वारंवार खेचत आहे, त्याचे नाव अतिकाय आहे. याची काया फार मोठी आहे. (वृद्ध आहे) ॥१६॥
योऽसौ नवार्कोदितताम्रचक्षुः
आरुह्य घण्टानिनदप्रणादम् ।
गजं खरं गर्जति वै महात्मा
महोदरो नाम स एष वीरः ॥ १७ ॥
ज्याचे नेत्र प्रातःकाळी उदित झालेल्या सूर्यासमान लाल आहेत, तसेच ज्याचा आवाज घण्टेच्या ध्वनीहूनही उत्कृष्ट आहे असा क्रूर स्वभावाचा, गजराजावर आरूढ होऊन जो जोरजोराने गर्जना करीत आहे, तो महामनस्वी वीर महोदर नावाने प्रसिद्ध आहे. ॥१७॥
योऽसौ हयं काञ्चनचित्रभाण्डं
आरुह्य सन्ध्याभ्रगिरिप्रकाशम् ।
प्रासं समुद्यम्य मरीचिनद्धं
पिशाच एषोऽशनितुल्यवेगः ॥ १८ ॥
जो सांयकालीन मेघानेयुक्त पर्वताच्या सारखी आभा असलेला आणि सुवर्णमय आभूषणांनी विभूषित घोड्‍यावर चढून चमकदार प्रास (भाले) हातात घेऊन इकडे येत आहे, याचे नाव पिशाच आहे. तो वज्रासमान वेगवान्‌ योद्धा आहे. ॥१८॥
यश्चैष शूलं निशितं प्रगृह्य
विद्युत्प्रभं किंकरवज्रवेगम् ।
वृषेन्द्रमास्थाय गिरिप्रकाशं
आयाति योऽसौ त्रिशिरा यशस्वी ॥ १९ ॥
ज्याने वज्राच्या वेगालाही आपले दास बनविले आहे आणि ज्याच्यापासून विजेप्रमाणे प्रभा पसरत आहे, अशा तीक्ष्ण त्रिशूलाला हातात घेऊन हा चंद्रम्याप्रमाणे श्वेत कांतिचा बैलावर चढून युद्धभूमीमध्ये येत आहे, हा यशस्वी वीर त्रिशिरा** आहे. ॥१९॥ (** - हा त्रिशिरा जनस्थानात मारला गेलेल्या त्रिशिराहून भिन्न आहे. हा रावणाचा पुत्र आहे आणि तो भाऊ होता.)
असौ च जीमूतनिकाशरूपः
कुंभः पृथुव्यूढसुजातवक्षाः ।
समाहितः पन्नगराजकेतुः
विस्फारयन् भाति धनुर्विधून्वन् ॥ २० ॥
ज्याचे रूप मेघासमान काळे आहे; ज्याची छाती उभारलेली, रूंद आणि सुंदर आहे. ज्याच्या ध्वजेवर नागराज वासुकीचे चिह्न बनविलेले आहे तसेच जो एकाग्रचित्त होऊन आपल्या धनुष्याला हलवत आणि खेचत येत आहे, तो कुंभ नामक योद्धा आहे. ॥२०॥
यश्चैष जाम्बूनदवज्रजुष्टं दीप्तं
सधूमं परिघं प्रगृह्य ।
आयाति रक्षोबलकेतुभूतो
योऽसौ निकुंभोऽद्‌भुतघोरकर्मा ॥ २१ ॥
जो सुवर्ण आणि वज्राने जडित असल्यामुळे दीप्तीमान्‌ आणि इंद्रनील मण्याने मंडित असल्यामुळे धूमयुक्त अग्निसारखा प्रकाशित होणार्‍या परिघाला हातात घेऊन राक्षससेनेच्या ध्वजेप्रमाणे येत आहे, त्याचे नाव निकुंभ आहे, त्याचा पराक्रम घोर आणि अद्‌भुत आहे. ॥२१॥
यश्चैष चापासिशरौघजुष्टं
पताकिनं पावकदीप्तरूपम् ।
रथं समास्थाय विभात्युदग्रो
नरान्तकोऽसौ नगशृङ्‌गयोधी ॥ २२ ॥
हा जो धनुष्य, खड्ग आणि बाणसमूहांनी भरलेल्या, ध्वजपताकांनी अलंकृत तसेच प्रज्वलित अग्निसमान देदिप्यमान रथावर आरूढ होऊन अतिशय शोभत आहे, तो उंच शरीरयष्टीचा योद्धा नरान्तक*** आहे. तो पहाडांच्या शिखरांनी युद्ध करत असतो. ॥२२॥ (*** - हा नरान्तक रावणाचा पुत्र आहे)
यश्चैष नानाविधघोररूपैः
व्याघ्रोष्ट्रनागेन्द्रमृगाश्ववक्त्रैः ।
भूतैर्वृतो भाति विवृत्तनेत्रैः
सोऽसौ सुराणामपि दर्पहन्ता ॥ २३ ॥

यत्रैतदिन्दुप्रतिमं विभाति
च्छत्रं सितं सूक्ष्मशलाकमग्र्यम् ।
अत्रैष रक्षोधिपतिर्महात्मा
भूतैर्वृतो रुद्र इवावभाति ॥ २४ ॥
हा जो व्याघ्र, ऊंट, हत्ती, हरणे आणि घोड्‍यासारखे तोंड असलेले, डोळे चढलेले तसेच अनेक प्रकारच्या भयंकर रूपाच्या भूतांनी घेरलेला आहे, जो देवतांचा दर्पही दलन करणारा आहे तसेच जेथे ज्याच्यावर पूर्ण चंद्रम्यासारखे श्वेत आणि पातळ कमानी असलेले सुंदर छत्र शोभत आहे, तोच हा राक्षसराज महामना रावण आहे, जो भूतांनी घेरलेल्या रूद्रदेवाप्रमाणे सुशोभित होत आहे. ॥२३-२४॥
असौ किरीटी चलुकुण्डलास्यो
नगेन्द्रविन्ध्योपमभीमकायः ।
महेन्द्रवैवस्वतदर्पहन्ता
रक्षोधिपः सूर्य इवावभाति ॥ २५ ॥
याने मस्तकावर मुकुट धारण केला आहे. याचे मुख कानांतील हलणार्‍या कुण्डलांनी अलंकृत आहे. याचे शरीर गिरिराज हिमालय आणि विंध्याचलाप्रमाणे विशाल आणि भयंकर आहे तसेच हा इंद्र आणि यमराजाचा गर्व चूर करणारा आहे. पहा, हा राक्षसराज साक्षात्‌ सूर्यासमान प्रकाशित होत आहे. ॥२५॥
प्रत्युवाच ततो रामो विभीषणमरिन्दमम् ।
अहो दीप्तो महातेजा रावणो राक्षसेश्वरः ॥ २६ ॥
तेव्हा शत्रुदमन श्रीरामांनी विभीषणाला याप्रकारे उत्तर दिले - अहो ! राक्षसराज रावणाचे तेज तर फारच वरचढ आणि देदीप्यमान आहे. ॥२६॥
आदित्य इव दुष्प्रेक्षो रश्मिभिर्भाति रावणः ।
न व्यक्तं लक्षये ह्यस्य रूपं तेजःसमावृतम् ॥ २७ ॥
रावण आपल्या प्रभेने सूर्याप्रमाणे असा शोभत आहे की याच्याकडे पहाणे ही कठीण होत आहे. तेजोमण्डलांनी व्याप्त झाल्यामुळे याचे रूप मला स्पष्टपणे दिसून येत नाही आहे. ॥२७॥
देवदानववीराणां वपुर्नैवंविधं भवेत् ।
यादृशं राक्षसेन्द्रस्य वपुरेतद् विराजते ॥ २८ ॥
या राक्षसराजाचे शरीर जसे सुशोभित होत आहे, तसे तर देवता आणि दानव वीरांचेही होणार नाही. ॥२८॥
सर्वे पर्वतसंकाशाः सर्वे पर्वतयोधिनः ।
सर्वे दीप्तायुधधरा योधास्तस्य महात्मनः ॥ २९ ॥
या महाकाय राक्षसाचे सर्व योद्धे पर्वतांसारखे विशाल आहेत. सर्व पर्वतांनी युद्ध करणारे आहेत आणि सर्वच्या सर्व चमकदार अस्त्रे-शस्त्रे घेतलेले आहेत. ॥२९॥
विभाति राक्षसराजोऽसौ प्रदीप्तैर्भीमविक्रमैः ।
भूतैः परिवृतस्तीक्ष्णैः देहवद्‌भिरिवान्तकः ॥ ३० ॥
जे दीप्तिमान्‌, भयंकर दिसणारे आणि तीक्ष्ण स्वभावाचे आहेत अशा राक्षसांनी घेरलेला हा राक्षसराज रावण देहधारी भूतांनी घेरलेल्या यमराजा समान वाटत आहे. ॥३०॥
दिष्ट्यायमद्य पापात्मा मम दृष्टिपथं गतः ।
अद्य क्रोधं विमोक्ष्यामि सीताहरणसंभवम् ॥ ३१ ॥
सौभाग्याची गोष्ट आहे की हा पापात्मा माझ्या दृष्टिपथात आला आहे. सीताहरणामुळे माझ्या मनात जो क्रोध सांठलेला आहे त्याला आज याच्यावर काढीन. ॥३१॥
एवमुक्त्वा ततो रामो धनुरादाय वीर्यवान् ।
लक्ष्मणानुचरस्तस्थौ समुद्धृत्य शरोत्तमम् ॥ ३२ ॥
असे म्हणून बल-विक्रमशाली श्रीराम धनुष्य घेऊन उत्तमबाण काढून युद्धासाठी सज्ज झाले. या कार्यात लक्ष्मणांनीही त्यांना साथ दिली. ॥३२॥
ततः स रक्षोधिपतिर्महात्मा
रक्षांसि तान्याह महाबलानि ।
द्वारेषु चर्यागृहगोपुरेषु
सुनिर्वृतास्तिष्ठत निर्विशङ्‌काः ॥ ३३ ॥
त्यानंतर महामना राक्षसराज रावणाने आपल्या बरोबर आलेल्या त्या महाबली राक्षसांना म्हटले- तुम्ही लोक निर्भय आणि सुप्रसन्न होऊन नगरांच्या द्वारांवर आणि राजमार्गावरील घरांच्या पायर्‍यांवर उभे राहा. ॥३३॥
इहागतं मां सहितं भवद्‌भिः
वनौकसश्छिद्रमिदं विदित्वा ।
शून्यां पुरीं दुष्प्रसहां प्रमथ्य
प्रधर्षयेयुः सहसा समेताः ॥ ३४ ॥
कारण वानरलोक माझ्या बरोबर तुम्हां सर्वांना येथे आलेले पाहून, ही आपल्यासाठी चांगली संधी आहे असे समजून एकाएकी एकत्र होऊन माझ्या शून्य नगरीत, जिच्यामध्ये प्रवेश होणे दुसर्‍यांसाठी फार कठीण आहे, घुसून जातील आणि हिला मथून नष्ट करून टाकतील. ॥३४॥
विसर्जयित्वा सहितांस्ततस्तान्
गतेषु रक्षःसु यथानियोगम् ।
व्यदारयद् वानरसागरौघं
महाझषः पूर्णमिवार्णवौघम् ॥ ३५ ॥
याप्रकारे जेव्हा त्यानी आपल्या मंत्र्यांना निरोप दिला आणि ते राक्षस त्याच्या आज्ञेनुसार त्या त्या स्थानी निघून गेले, तेव्हा रावण, महामत्स्य (तिमिङ्‌गल) पूर्ण महासागरास जसा विक्षुब्ध करून टाकतो, त्याच प्रकारे समुद्रासारख्या वानरसेनेला विदीर्ण करू लागला. ॥३५॥
तमापतन्तं सहसा समीक्ष्य
दीप्तेषुचापं युधि राक्षसेन्द्रम् ।
महत् समुत्पाट्य महीधराग्रं
दुद्राव रक्षोधिपतिं हरीशः ॥ ३६ ॥
चमकणारे धनुष्य-बाण घेऊन राक्षसराज रावणाला एकाएकी युद्धस्थळी आलेला पाहून वानरराज सुग्रीवाने एक फार मोठे पर्वतशिखर उपटून घेतले आणि ते घेऊन त्या निशाचर राजावर आक्रमण केले. ॥३६॥
तच्छैलशृङ्‌गं बहुवृक्षसानुं
प्रगृह्य चिक्षेप निशाचराय ।
तमापतन्तं सहसा समीक्ष्य
बिभेद बाणैस्तपनीयपुङ्‌खैः ॥ ३७ ॥
अनेक वृक्ष आणि शिखरांनी युक्त त्या महान शैलशिखरास सुग्रीवाने रावणावर फेकून मारले. ते शिखर आपल्याकडे येतांना पाहून रावणाने एकाएकी सुवर्णमय पंख असलेले अनेक बाण मारून त्याचे तुकडे तुकडे करून टाकले. ॥३७॥
तस्मिन् प्रवृद्धोत्तमसानुवृक्षे
शृङ्‌गे विदीर्णे पतिते पृथिव्याम् ।
महाहिकल्पं शरमन्तकाभं
समादधे राक्षसलोकनाथः ॥ ३८ ॥
उत्तम वृक्ष आणि शिखराचा तो महान शैलशृंग जेव्हा विदीर्ण होऊन पृथ्वीवर पडला, तेव्हा राक्षसलोकांचा स्वामी रावणाने महान्‌ सर्प आणि यमराजाप्रमाणे एका भयंकर बाणाचे संधान केले. ॥३८॥
स तं गृहीत्वाऽनिलतुल्यवेगं
सविस्फुलिङ्‌गज्वलनप्रकाशम् ।
बाणं महेन्द्राशनितुल्यवेगं
चिक्षेप सुग्रीववधाय रुष्टः ॥ ३९ ॥
त्या बाणाचा वेग वायुसमान होता. त्यातून ठिणग्या निघत होत्या आणि प्रज्वलित अग्निप्रमाणे प्रकाश फाकत होता. इंद्राच्या वज्राप्रमाणे भयंकर वेगवान्‌ त्या बाणाला रावणाने रूष्ट होऊन सुग्रीवाच्या वधासाठी सोडला. ॥३९॥
स सायको रावणबाहुमुक्तः
शक्राशनिप्रख्यवपुः प्रकाशम् ।
सुग्रीवमासाद्य बिभेद वेगाद्
गुहेरिता क्रौञ्चमिवोग्रशक्तिः ॥ ४० ॥
रावणाच्या हातांतून सुटलेल्या त्या सायकाने जसे स्वामी कार्तिकेयांनी सोडलेल्या भयानक शक्तिने क्रौञ्चपर्वताला विदीर्ण करून टाकले होते, त्याप्रमाणे इंद्राच्या वज्राप्रमाणे, कांतिमान्‌ शरीराच्या सुग्रीवांजवळ वेगपूर्वक जाऊन त्यांना घायाळ करून टाकले. ॥४०॥
स सायकार्तो विपरीतचेताः
कूजन् पृथिव्यां निपपात वीरः ।
तं प्रेक्ष्य भूमौ पतितं विसंज्ञं
नेदुः प्रहृष्टा युधि यातुधानाः ॥ ४१ ॥
त्या बाणाच्या आघाताने वीर सुग्रीव अचेत झाले आणि आर्तनाद करत पृथ्वीवर कोसळले. सुग्रीवांना बेशुद्ध होऊन गरकन्‌ फिरून पडतांना पाहून त्या युद्धस्थळी आलेले सर्व राक्षस मोठ्‍या हर्षाने सिंहनाद करू लागले. ॥४१॥
ततो गवाक्षो गवयः सुषेणः
त्वथर्षभो ज्योतिमुखो नलश्च ।
शैलान् समुद्यम्य विवृद्धकायाः
प्रदुद्रुवुस्तं प्रति राक्षसेन्द्रम् ॥ ४२ ॥
तेव्हा गवाक्ष, गवय, सुषेण, ऋषभ, ज्योतिर्मुख आणि नल - हे विशालकाय वानर पर्वतशिखरांना उपटून राक्षसराज रावणावर तुटून पडले. ॥४२॥
तेषां प्रहारान् स चकार मोघान्
रक्षोधिपो बाणशतैः शिताग्रैः ।
तान् वानरेन्द्रानपि बाणजालैः
बिभेद जाम्बूनदचित्रपुङ्‌खैः ॥ ४३ ॥

ते वानरेन्द्रास्त्रिदशारिबाणैः
भिन्ना विपेतुर्भुवि भीमकायाः ।
परंतु निशाचरांचा राजा रावण याने शेकडो तीक्ष्ण बाण सोडून त्या सर्वांचे प्रहार व्यर्थ करून टाकले आणि त्या वानरेश्वरांनाही सोन्याचे विचित्र पंख असणार्‍या बाण-समूहांच्या द्वारा क्षत-विक्षत करून टाकले. देवद्रोही रावणाच्या बाणांनी घायाळ होऊन ते भीमकाय वानरेंद्रगण जमिनीवर कोसळले. ॥४३ १/२॥
ततस्तु तद् वानरसैन्यमुग्रं
प्रच्छादयामास स बाणजालैः ॥ ४४ ॥

ते वध्यमानाः पतिताश्च वीरा
नानद्यमाना भयशल्यविद्धाः ।
नंतर तर रावणाने आपल्या बाणसमूहांच्या द्वारा त्या भयंकर वानरसेनेस आच्छादित करून टाकले. रावणाच्या बाणांनी पीडित झालेले आणि घाबरलेले वीर वानर त्याचा मार खाऊन जोरजोराने चीत्कार करीत धराशायी होऊ लागले. ॥४४ १/२॥
शाखामृगा रावणसायकार्ता
जग्मुः शरण्यं शरणं स्म रामम् ॥ ४५ ॥

ततो महात्मा स धनुर्धनुष्मान्
आदाय रामः सहसा जगाम ।
तं लक्ष्मणः प्राञ्जलिरभ्युपेत्य
उवाच रामं परमार्थयुक्तम् ॥ ४६ ॥
रावणाच्या सायकांनी पीडित होऊन बरेचसे वानर शरणागत वत्सल भगवान्‌ श्रीरामांना शरण आले. तेव्हा धनुर्धर महात्मा श्रीराम एकाएकी धनुष्य घेऊन पुढे झाले. त्याच समयी लक्ष्मण त्यांच्या समोर येऊन हात जोडून त्यांना हे यथार्थ वचन बोलले - ॥४५-४६॥
काममार्यः सुपर्याप्तो वधायास्य दुरात्मनः ।
विधमिष्याम्यहं चैतं अनुजानीहि मां विभो ॥ ४७ ॥
आर्य ! या दुरात्म्याचा वध करण्यासाठी तर मीच पर्याप्त आहे. प्रभो ! आपण मला आज्ञा द्यावी. मी त्याचा नाश करीन. ॥४७॥
तमब्रवीन् महतेजा रामः सत्यपराक्रमः ।
गच्छ यत्‍नःपरश्चापि भव लक्ष्मण संयुगे ॥ ४८ ॥
त्यांचे बोलणे ऐकून महातेजस्वी सत्यपराक्रमी श्रीरामांनी म्हटले -ठीक आहे लक्ष्मणा ! जा ! परंतु संग्रामात विजय प्राप्त करण्यासाठी पूर्ण प्रयत्‍नशील राहा. ॥४८॥
रावणो हि महावीर्यो रणेऽद्‌भुतपराक्रमः ।
त्रैलोक्येनापि संक्रुद्धो दुष्प्रसह्यो न संशयः ॥ ४९ ॥
कारण रावण महान्‌ बल-विक्रमाने संपन्न आहे. हा युद्धात अद्‌भुत पराक्रम दाखवत आहे. रावण जर जास्त कुपित झाला आणि युद्ध करू लागला तर तीन्ही लोकांसाठी त्याचा वेग सहन करणे कठीण होऊन जाईल. ॥४९॥
तस्यच्छिद्राणि मार्गस्व स्वच्छिद्राणि च लक्षय ।
चक्षुषा धनुषाऽऽत्मानं गोपायस्व समाहितः ॥ ५० ॥
तू युद्धात रावणाचे छिद्र पहा. त्याच्या उणीवांचा लाभ करून घे आणि आपल्या छिद्रावरही लक्ष्य ठेव. (शत्रू त्यांचा लाभ घेऊ शकता कामा नयेत.) एकाग्रचित्त होऊन सावधान राहून आपली दृष्टी आणि धनुष्य यांच्यायोगे आत्मरक्षण कर. ॥५०॥
राघवस्य वचः श्रुत्वा संपरिष्वज्य पूज्य च ।
अभिवाद्य च रामाय ययौ सौमित्रिराहवे ॥ ५१ ॥
राघवांचे हे बोलणे ऐकून सौमित्र लक्ष्मणांनी त्यांना मिठी मारली आणि श्रीरामांचे पूजन आणि अभिवादन करून ते युद्धासाठी रवाना झाले. ॥५१॥
स रावणं वारणहस्तबाहुः
ददर्श भीमोद्यतदीप्तचापम् ।
प्रच्छादयन्तं शरवृष्टिजालैः
तान् वानरान् भिन्नविकीर्णदेहान् ॥ ५२ ॥
त्यांनी पाहिले की रावणाच्या भुजा हत्तीच्या सोंडे समान आहेत. त्याने फार भयंकर आणि दीप्तिमान्‌ धनुष्य उचलून घेतले आहे आणि बाण समूहांची वृष्टि करून वानरांना झाकून टाकत आहे तसेच त्यांच्या शरीरांना छिन्न भिन्न करून टाकत आहे. ॥५२॥
तमालोक्य महातेजा हनुमान् मारुतात्मजः ।
निवार्य शरजालानि प्रदुद्राव स रावणम् ॥ ५३ ॥
रावणाला याप्रकारे पराक्रम करतांना पाहून महातेजस्वी पवनपुत्र हनुमान त्याच्या बाण-समूहांचे निवारण करत त्याच्याकडे धावले. ॥५३॥
रथं तस्य समासाद्य भुजमुद्यम्य दक्षिणम् ।
त्रासयन् रावणं धीमान् हनुमान् वाक्यमब्रवीत् ॥ ५४ ॥
त्याच्या रथाच्या जवळ पोहोचून आपला उजवा हात उचलून बुद्धिमान्‌ हनुमानांनी रावणाला भयभीत करत म्हटले- ॥५४॥
देवदानवगन्धर्वैः यक्षैश्च सह राक्षसैः ।
अवध्यत्वं त्वया प्राप्तं वानरेभ्यस्तु ते भयम् ॥ ५५ ॥
निशाचरा ! तू देवता, दानव, गंधर्व, यक्ष आणि राक्षसांकडून न मारला जाण्याचा वर प्राप्त केलेला आहेस, परंतु वानरांपासून तर तुला भय आहेच. ॥५५॥
एष मे दक्षिणो बाहुः पञ्चशाखः समुद्यतः ।
विधमिष्यति ते देहे भूतात्मानं चिरोषितम् ॥ ५६ ॥
पहा, पाच बोटांनी युक्त माझा हा उजवा हात वर उचलेला आहे. तुझ्या शरीरात चिरकालापासून जो जीवात्मा निवास करत आहे, त्याला आज हा, या देहापासून विलग करून टाकील. ॥५६॥
श्रुत्वा हनुमतो वाक्यं रावणो भीमविक्रमः ।
संरक्तनयनः क्रोधाद् इदं वचनमब्रवीत् ॥ ५७ ॥
हनुमानाचे हे वचन ऐकून भयानक पराक्रमी रावणाचे डोळे क्रोधाने लाल झाले आणि त्याने रोषपूर्वक म्हटले- ॥५७॥
क्षिप्रं प्रहर निःशंकं स्थिरां कीर्तिमवाप्नुहि ।
ततस्त्वां ज्ञातविक्रान्तं नाशयिष्यामि वानर ॥ ५८ ॥
वानरा ! तू निःशंक होऊन शीघ्र माझ्यावर प्रहार कर आणि सुस्थिर यश प्राप्त कर. तुझ्यांमध्ये किती पराक्रम आहे हे जाणून घेतल्यावरच मी तुझा नाश करीन. ॥५८॥
रावणस्य वचः श्रुत्वा वायुसूनुर्वचोऽब्रवीत् ।
प्रहृतं हि मया पूर्वं अक्षं स्मर सुतं स्मर ॥ ५९ ॥
रावणाचे बोलणे ऐकून पवनपुत्र हनुमान्‌ म्हणाले - मी तर प्रथमच तुझा पुत्र अक्ष यास मारून टाकले आहे. या गोष्टीची आठवण तर कर ? ॥५९॥
एवमुक्तो महातेजा रावणो राक्षसेश्वरः ।
आजघानानिलसुतं तलेनोरसि वीर्यवान् ॥ ६० ॥
त्यांनी इतके म्हणताच बल-विक्रम संपन्न महातेजस्वी राक्षसराज रावणाने त्या पवनकुमाराच्या छातीवर एक ठोसा मारला. ॥६०॥
स तलाभिहतस्तेन चचाल च मुहुर्मुहुः ।
स्थित्वा मुहूर्तं तेजस्वी स्थैर्यं कृत्वा महामतिः ॥ ६१ ॥

आजघान च संक्रुद्धः तलेनैवामरद्विषम् ।
त्या थप्पडीच्या आघाताने हनुमान्‌ वारंवार इकडे तिकडे चक्करा मारू लागले, परंतु ते फार बुद्धिमान्‌ आणि तेजस्वी होते, म्हणून एकाच मुहूर्तामध्ये आपल्याला सुस्थिर करून उभे राहिले. नंतर त्यांनीही अत्यंत कुपित होऊन त्या देवद्रोह्याला थप्पडीनेच मारले. ॥६१ १/२॥
ततः स तेनाभिहतो वानरेण महात्मना ॥ ६२ ॥

दशग्रीवः समाधूतो यथा भूमितलेऽचलः ।
त्या महात्मा वानराच्या थप्पडीचा मार खाऊन दशमुख रावण भूकंप झाला असता पर्वत जसा हलू लागतो, त्याप्रमाणे कापू लागला. ॥६२ १/२॥
संग्रामे तं तथा दृष्ट्‍वा रावणं तलताडितम् ॥ ६३ ॥

ऋषयो वानराः सिद्धा नेदुर्देवाः सहासुरैः ।
संग्रामभूमीमध्ये रावणाला थप्पड खाताना पाहून ऋषि, वानर, सिद्ध, देवता आणि असुर सर्व हर्षध्वनी करू लागले. ॥६२ १/२॥
अथाश्वास्य महातेजा रावणो वाक्यमब्रवीत् ॥ ६४ ॥

साधु वानर वीर्येण श्लाघनीयोऽसि मे रिपुः ।
त्यानंतर महातेजस्वी रावणाने (स्वतःस) संभाळून म्हटले- शाबास वानरा ! शाबास, तू पराक्रमाच्या दृष्टीने माझा प्रशंसनीय प्रतिद्वंदी आहेस. ॥६४ १/२॥
रावणेनैवमुक्तस्तु मारुतिर्वाक्यमब्रवीत् ॥ ६५ ॥

धिगस्तु मम वीर्येण यत् त्वं जीवसि रावण ।
रावणाने असे म्हटल्यावर पवनकुमार हनुमानांनी म्हटले - रावणा ! तू अद्यापही जिवंत आहेस म्हणून माझ्या पराक्रमाचा धिक्कार आहे ! ॥६५ १/२॥
सकृत् तु प्रहरेदानीं दुर्बुद्धे किं विकत्थसे ॥ ६६ ॥

ततस्त्वां मामको मुष्टिः नयिष्यति यमक्षयम् ।
दुर्बुद्धे ! आता तू एक वेळ आणखी माझ्यावर प्रहार कर. बढाया कशाला मारतो आहेस ? तुझ्या प्रहारानंतर जेव्हा माझा बुक्का खाशील तेव्हा तो तुला तात्काळ यमलोकात पोहोचवून देईल. ॥६६ १/२॥
ततो मारुतिवाक्येन कोपस्तस्य प्रजज्वले ॥ ६७ ॥

संरक्तनयनो यत्‍नाीन् मुष्टिमावृत्य दक्षिणम् ।
पातयामास वेगेन वानरोरसि वीर्यवान् ॥ ६८ ॥
हनुमानाचे हे बोलणे ऐकून रावणाचा क्रोध प्रज्वलित झाला. त्याचे डोळे लाल झाले. त्या पराक्रमी राक्षसाने मोठ्‍या प्रयत्‍नांनी उजव्या हाताचा बुक्का ताणून हनुमानाच्या छातीवर वेगाने प्रहार केला. ॥६७-६८॥
हनुमान् वक्षसि व्यूढे संचचाल पुनः पुनः ।
विह्वलं तु तदा दृष्ट्‍वा हनुमन्तं महाबलम् ॥ ६९ ॥

रथेनातिरथः शीघ्रं नीलं प्रति समभ्यगात् ।
छातीवर आघात लागल्यावर हनुमान्‌ पुन्हा विचलित झाले. महाबली हनुमानांना त्या समयी विव्हळ झालेले पाहून अतिरथी रावण रथाच्या द्वारे शीघ्रच नीलावर चढाई करून गेला. ॥६९ १/२॥
राक्षसानामधिपतिः दशग्रीवः प्रतापवान् ॥ ७० ॥

पन्नगप्रतिमैर्भीमैः परमर्माभिभेदनैः ।
शरैरादीपयामास नीलं हरिचमूपतिम् ॥ ७१ ॥
राक्षसांचा राजा प्रतापी दशग्रीव याने शत्रुंच्या मर्माला विदीर्ण करणारे सर्पतुल्य भयंकर बाणांद्वारे वानर-सेनापति नीलाला संताप देण्यास आरंभ केला. ॥७०-७१॥
स शरौघसमायस्तो नीलः कपिचमूपतिः ।
करेणैकेन शैलाग्रं रक्षोधिपतयेऽसृजत् ॥ ७२ ॥
त्याच्या बाणसमूहांनी पीडित झालेल्या वानर सेनापति नीलाने राक्षस राजावर एकाच हाताने पर्वताचे एक शिखर उचलून फेकले. ॥७२॥
हनुमानपि तेजस्वी समाश्वस्तो महामनाः ।
विप्रेक्षमाणो युद्धेप्सुः सरोषमिदमब्रवीत् ॥ ७३ ॥

नीलेन सह संयुक्तं रावणं राक्षसेश्वरम् ।
अन्येन युध्यमानस्य न युक्तमभिधावनम् ॥ ७४ ॥
इतक्यात तेजस्वी महामना हनुमानांनीही स्वतःला संभाळले आणि पुन्हा युद्धाच्या इच्छेने ते रावणाकडे पाहू लागले. त्या समयी राक्षसराज रावण नीलाशी युद्ध करण्यात गुंतलेला होता. हनुमानांनी त्यास रोषपूर्वक म्हटले- ऐ निशाचरा ! या समयी तू दुसर्‍या बरोबर युद्ध करत आहेस; म्हणून आत्ता तुझ्यावर हल्ला करणे माझ्यासाठी उचित ठरणार नाही. ॥७३-७४॥
रावणोऽपि महातेजाः तं शृंगं सप्तभिः शरैः ।
आजघान सुतीक्ष्णाग्रैः तद् विकीर्णं पपात ह ॥ ७५ ॥
तिकडे महातेजस्वी रावणाने, नीलाने फेकलेल्या पर्वत-शिखरावर तीक्ष्ण अग्रभाग असलेले सात बाण मारले, ज्यामुळे त्याचे तुकडे तुकडे होऊन ते पृथ्वीवर विखुरले गेले. ॥७५॥
तद् विकीर्णं गिरेः शृङ्‌गं दृष्ट्‍वा हरिचमूपतिः ।
कालाग्निरिव जज्वाल क्रोधोन परवीरहा ॥ ७६ ॥
त्या पर्वतशिखरास विखुरलेले पाहून शत्रुवीरांचा संहार करणारे वानर-सेनापती नील अग्निसमान क्रोधाने प्रज्वलित झाले. ॥७६॥
सोऽश्वकर्णान् धवान् सालान् चूतांश्चापि सुपुष्पितान् ।
अन्यांश्च विविधान् वृक्षान् नीलश्चिक्षेप संयुगे ॥ ७७ ॥
त्यांनी युद्धस्थळावर अश्वकर्ण, साल, फुललेला आम्र तसेच अन्य नाना प्रकारचे वृक्ष उपटून रावणावर फेकण्यास आरंभ केला. ॥७७॥
स तान् वृक्षान् समासाद्य प्रतिचिच्छेद रावणः ।
अभ्यवर्षच्च घोरेण शरवर्षेण पावकिम् ॥ ७८ ॥
रावणाने ते सर्व वृक्ष समोर येताच त्यांना छाटून टाकले आणि अग्निपुत्र नीलावर बाणांची भयानक वृष्टि केली. ॥७८॥
अभिवृष्टः शरौघेण मेघेनेव महाचलः ।
ह्रस्वं कृत्वा ततो रूपं ध्वजाग्रे निपपात ह ॥ ७९ ॥
जसे मेघ एखाद्या महान्‌ पर्वतावर जलाची वृष्टि करतो, त्याच प्रकारे रावणाने जेव्हा नीलावर बाणसमूहांची वृष्टि केली तेव्हा ते लहानसे रूप घेऊन रावणाच्या ध्वजेच्या शिखरावर चढले. ॥७९॥
पावकात्मजमालोक्य ध्वजाग्रे समवस्थितम् ।
जज्वाल रावणः क्रोधात् ततो नीलो ननाद च ॥ ८० ॥
आपल्या ध्वजेवर बसलेल्या अग्निपुत्र नीलाला पाहून रावण क्रोधाने भडकून गेला आणि तिकडे नील जोरजोराने गर्जना करू लागले. ॥८०॥
ध्वजाग्रे धनुषश्चाग्रे किरीटाग्रे च तं हरिम् ।
लक्ष्मणोऽथ हनूमांश्च रामश्चापि सुविस्मिताः ॥ ८१ ॥
नीलांना कधी रावणाच्या ध्वजेवर, कधी धनुष्यावर आणि कधी मुकुटावर बसलेला पाहून श्रीराम, लक्ष्मण आणि हनुमानासही फार विस्मय वाटला. ॥८१॥
रावणोऽपि महातेजाः कपिलाघवविस्मितः ।
अस्त्रमाहारयामास दीप्तमाग्नेयमद्‌भुतम् ॥ ८२ ॥
वानर नीलांची ही चपलता (हे लाघव) पाहून महातेजस्वी रावणालाही फार आश्चर्य वाटले आणि त्याने अद्‌भुत तेजस्वी आग्नेयास्त्र हातात घेतले. ॥८२॥
ततस्ते चुक्रुशुर्हृष्टा लब्धलक्षाः प्लवंगमाः ।
नीललाघवसंभ्रान्तं दृष्ट्‍वा रावणमाहवे ॥ ८३ ॥
नीलांच्या लाघवाने रावण घाबरलेला पाहून हर्षाचा अवसर मिळून सर्व वानर अत्यंत प्रसन्नतेने किलकिलाट करू लागले. ॥८३॥
वानराणां च नादेन संरब्धो रावणस्तदा ।
संभ्रमाविष्टहृदयो न किञ्चित् प्रत्यपद्यत ॥ ८४ ॥
त्या समयी वानरांच्या हर्षानादाने रावणाला फार क्रोध आला आणि त्याच बरोबर हृदयात भितीही निर्माण झाली, म्हणून तो कर्तव्याचा काही निश्चय करू शकला नाही. ॥८४॥
आग्नेयेनापि संयुक्तं गृहीत्वा रावणः शरम् ।
ध्वजशीर्षस्थितं नीलं उदैक्षत निशाचरः ॥ ८५ ॥
त्यानंतर निशाचर रावणाने अग्नेयास्त्राने अभिमंत्रित बाण हातात घेऊन ध्वजेच्या अग्रभागावर बसलेल्या नीलाकडे पाहिले. ॥८५॥
ततोऽब्रवीन्महातेजा रावणो राक्षसेश्वरः ।
कपे लाघवयुक्तोऽसि मायया परया सह ॥ ८६ ॥
पाहून महातेजस्वी राक्षसराज रावणाने त्यांना म्हटले -वानरा ! तू उच्चकोटीच्या मायेबरोबरच आपल्या ठिकाणी लाघव ही बाळगून आहेस. ॥८६॥
जीवितं खलु रक्षस्व यदि शक्तोऽसि वानर ।
तानि तान्यात्मरूपाणि सृजसि त्वमनेकशः ॥ ८७ ॥
तथापि त्वां मया मुक्तः सायकोऽस्त्रप्रयोजितः ।
जीवतं परिरक्षन्तं जीविताद् भ्रंशयिष्यति ॥ ८८ ॥
वानरा ! जर तू शक्तिशाली असशील तर माझ्या बाणापासून आपल्या जीविताचे रक्षण कर. जरी तू आपल्या पराक्रमास साजेशी भिन्न भिन्न प्रकारची कर्मे करत आहेस तरीही मी सोडलेला दिव्यास्त्र प्रेरित बाण, जीवन-रक्षणाचा प्रयत्‍न केल्यावरही तुला प्राणहीन करून टाकील. ॥८७-८८॥
एवमुक्त्वा महाबाहू रावणो राक्षसेश्वरः ।
सन्धाय बाणमस्त्रेण चमूपतिमताडयत् ॥ ८९ ॥
असे म्हणून महाबाहू राक्षसराज रावणाने अग्नेयास्त्रयुक्त बाणाचे संधान करून त्याच्या द्वारे सेनापति नीलास मारले. ॥८९॥
सोऽस्त्रमुक्तेन बाणेन नीलो वक्षसि ताडितः ।
निर्दह्यमानः सहसा स पपात महीतले ॥ ९० ॥
त्याच्या धनुष्यापासून सुटलेल्या त्या बाणाने नीलाच्या छातीवर जबरदस्त आघात केला. ते त्याच्या आंचेने जळत असल्याप्रमाणे पृथ्वीवर कोसळले. ॥९०॥
पितृमाहात्म्यसंयोगाद् आत्मनश्चापि तेजसा ।
जानुभ्यामपतद् भूमौ न च प्राणैर्व्ययुज्यत ॥ ९१ ॥
जरी नीलांनी पृथ्वीवर गुडघे टेकले होते तरी पिता अग्निदेवाच्या माहात्म्याने आणि आपल्या तेजाच्या प्रभावाने त्यांचे प्राण निघून गेले नाहीत. ॥९१॥
विसंज्ञं वानरं दृष्ट्‍वा दशग्रीवो रणोत्सुकः ।
रथेनाम्बुदनादेन सौमित्रिमभिदुद्रुवे ॥ ९२ ॥
वानर नीलांना अचेत झालेले पाहून रणोत्सुक रावणाने मेघाच्या गर्जनेसमान गंभीर ध्वनी करणार्‍या रथाच्या द्वारे सौमित्र लक्ष्मणांवर हल्ला चढवला. ॥९२॥
आसाद्य रणमध्ये तु वारयित्वा स्थितो ज्वलन् ।
धनुर्विस्फारयामास राक्षसेंद्रः प्रतापवान् ॥ ९३ ॥
युद्धभूमीमध्ये सार्‍या वानरसेनेला पुढे येण्यापासून रोखून धरून तो लक्ष्मणाजवळ जाऊन पोहोचला आणि प्रज्वलित अग्निसमान समोर उभा राहून प्रतापी राक्षसराज रावण आपल्या धनुष्याचा टणत्कार करू लागला. ॥९३॥
तमाह सौमित्रिरदीनसत्त्वो
विस्फारयन्तं धनुरप्रमेयम् ।
अभ्येहि मामेव निशाचरेन्द्र
न वानरांस्त्वं प्रतियोद्धुमर्हसि ॥ ९४ ॥
त्यासमयी आपल्या अनुपम धनुष्यास खेचत असलेल्या रावणास उदार शक्तिशाली सौमित्राने म्हटले- निशाचरराज ! समजून घे, मी आलो आहे, म्हणून आता तू वानरांशी युद्ध करता कामा नये. ॥९४॥
स तस्य वाक्यं प्रतिपूर्णघोषं
ज्याशब्दमुग्रं च निशम्य राजा ।
आसाद्य सौमित्रिमवस्थितं तं
रोषान्वितो वाक्यमुवाच रक्षः ॥ ९५ ॥
लक्ष्मणाचे ते बोलणे गंभीर ध्वनीने युक्त होते आणि त्यांच्या प्रत्यञ्चे पासूनही भयानक टणत्कार ध्वनी होत होता. तो ऐकून युद्धासाठी उपस्थित झालेल्या सौमित्राच्या जवळ जाऊन राक्षसांचा राजा रावण याने रोषपूर्वक म्हटले - ॥९५॥
दिष्ट्याऽसि मे राघव दृष्टिमार्गं
प्राप्तोऽन्तगामी विपरीतबुद्धिः ।
अस्मिन् क्षणे यास्यसि मृत्युदेशं
संसाद्यमानो मम बाणजालैः ॥ ९६ ॥
राघवा ! सौभाग्याची गोष्ट आहे की तू माझ्या डोळ्यासमोर आला आहेस. तुझा लवकरच अंत होणार आहे म्हणून तुझी बुद्धि विपरीत झाली आहे. आता तू माझ्या बाणसमूहांनी पीडित होऊन याच क्षणी यमलोकाची यात्रा करशील. ॥९६॥
तमाह सौमित्रिरविस्मयानो
गर्जन्तमुद् वृत्तसिताग्रदंष्ट्रम् ।
राजन् न गर्जन्ति महाप्रभावा
विकत्थसे पापकृतां वरिष्ठ ॥ ९७ ॥
सौमित्र लक्ष्मणास त्याचे बोलणे ऐकून काहीही विस्मय वाटला नाही. त्याचे दात फारच तीक्ष्ण आणि उत्कट होते आणि तो जोरजोरात गर्जना करत होता. त्या समयी सौमित्राने त्यास म्हटले - राजन्‌ ! महान्‌ प्रभावशाली पुरुष तुझ्याप्रमाणे केवळ गर्जना करत नाहीत. (काही पराक्रम करुन दाखवतात) पापाचार्‍यांमध्ये अग्रगण्य रावणा ! तू तर उगीच खोट्‍याच बढाया मारत आहेस. ॥९७॥
जानामि वीर्यं तव राक्षसेन्द्र
बलं प्रतापं च पराक्रमं च ।
अवस्थितोऽहं शरचापपाणिः
आगच्छ किं मोघविकत्थनेन ॥ ९८ ॥
राक्षसराज ! (तू शून्य घरातून जे चोरून एका असहाय नारीचे अपहरण केले आहेस, त्यायोगे) मी तुझे बळ, वीर्य, प्रताप आणि पराक्रम चांगल्या प्रकारे जाणतो, म्हणून हातात धनुष्यबाण घेऊन समोर उभा आहे. चल ये, युद्ध कर. व्यर्थ बढाया मारून काय होणार आहे ? ॥९८॥
स एवमुक्तः कुपितः ससर्ज
रक्षोधिपः सप्त शरान् सुपुङ्‌खान् ।
तान् लक्ष्मणः काञ्चनचित्रपुङ्‌खैः
चिच्छेद बाणैर्निशिताग्रधारैः ॥ ९९ ॥
त्यांनी असे म्हटल्यावर कुपित झालेल्या राक्षसराजाने त्यांच्यावर सुंदर पंख असलेले सात बाण सोडले. परंतु लक्ष्मणांनी सोन्यांनी बनविलेल्या विचित्र पंखांनी सुशोभित आणि तीक्ष्ण धार असलेल्या बाणांनी ते सर्व छाटून टाकले. ॥९९॥
तान् प्रेक्षमाणः सहसा निकृत्तान्
निकृत्तभोगानिव पन्नगेन्द्रान् ।
लङ्‌केश्वरः क्रोधवशं जगाम
ससर्ज चान्यान् निशितान् पृषत्कान् ॥ १०० ॥
जसे मोठ मोठ्‍या सर्पांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले जावेत त्याप्रकारे आपले समस्त बाण एकाएकी खण्डित झालेले पाहून लंकापति रावण क्रोधाच्या वशिभूत झाला आणि त्याने दुसरे तीक्ष्ण बाण सोडले. ॥१००॥
स बाणवर्षं तु ववर्ष तीव्रं
रामानुजः कार्मुकसंप्रयुक्तम् ।
क्षुरार्धचन्द्रोत्तमकर्णिभल्लैः
शरांश्च चिच्छेद न चुक्षुभे च ॥ १०१ ॥
परंतु रामानुज लक्ष्मण यामुळे विचलित झाले नाहीत. त्यांनी आपल्या धनुष्याने बाणांची भयंकर वृष्टि केली आणि क्षुर, अर्धचंद्र, उत्तमकर्णी तसेच भल्ल जातिच्या बाणांच्या द्वारे रावणानी सोडलेल्या त्या सर्व बाणांना छाटून टाकले. ॥१०१॥
स बाणजालान्यपि तानि तानि
मोघानि पश्यं स्त्रिदशारिराजः ।
विसिस्मिये लक्ष्मणलाघवेन
पुनश्च बाणान् निशितान् मुमोच ॥ १०२ ॥
ते सर्व बाणसमूह निष्फळ झालेले पाहून राक्षसराज रावण लक्ष्मणाचे लाघव पाहून आश्चर्यचकित झाला आणि त्यांच्यावर पुन्हा तीक्ष्ण बाण सोडू लागला. ॥१०२॥
स लक्ष्मणश्चाशु शरान् शिताग्रान्
महेन्द्रतुल्योऽशनिभीमवेगान् ।
सन्धाय चापे ज्वलनप्रकाशान्
ससर्ज रक्षोधिपतेर्वधाय ॥ १०३ ॥
देवराज इंद्राप्रमाणे पराक्रमी लक्ष्मणानेही रावणाच्या वधासाठी वज्रासमान भयानक वेग आणि तीक्ष्ण धार असलेले टोंकदार बाण, जे अग्निसमान प्रकाशित होत होते, धनुष्यावर चढविले. ॥१०३॥
स तान् प्रचिच्छेद हि राक्षसेन्द्रः
शितान् शरांल्लक्ष्मणमाजघान ।
शरेण कालाग्निसमप्रभेण
स्वयंभुदत्तेन ललाटदेशे ॥ १०४ ॥
परंतु राक्षसराजाने त्या सर्व तीक्ष्ण बाणांना छाटून टाकले आणि ब्रह्मदेवांनी दिलेल्या कालाग्निसमान तेजस्वी बाणाने लक्ष्मणांच्या ललाटावर आघात केला. ॥१०४॥
स लक्ष्मणो रावणसायकार्तः
चचाल चापं शिथिलं प्रगृह्य ।
पुनश्च संज्ञां प्रतिलभ्य कृच्छ्राद्
चिच्छेद चापं त्रिदशेन्द्रशत्रोः ॥ १०५ ॥
रावणाच्या त्या बाणाने पीडित होऊन लक्ष्मण विचलित झाले. त्यांनी हातात धनुष्य धरून ठेवलेले होते, त्यांची मूठ ढिली झाली. नंतर त्यांनी मोठ्‍या कष्टाने स्वतःस संभाळले आणि देवद्रोही रावणाचे धनुष्य तोडून टाकले. ॥१०५॥
निकृत्तचापं त्रिभिराजघान
बाणैस्तदा दाशरथिः शिताग्रः ।
स सायकार्तो विचचाल राजा
कृच्छ्राच्च संज्ञां पुनराससाद ॥ १०६ ॥
धनुष्य तोडल्यावर दाशरथि लक्ष्मणांनी रावणास तीन बाण मारले, जे अत्यंत तीक्ष्ण होते. त्या बाणांनी पीडित होऊन राजा रावण व्याकुळ झाला आणि मोठ्‍या कष्टाने तो परत सचेत होऊ शकला. ॥१०६॥
स कृत्तचापः शरताडितश्च
मेदार्द्रगात्रो रुधिरावसिक्तः ।
जग्राह शक्तिं समुदग्रशक्तिः
स्वयंभुदत्तां युधि देवशत्रुः ॥ १०७ ॥
जेव्हा धनुष्य तोडले गेले आणि बाणांचा जबरदस्त आघात सहन करावा लागला तेव्हा रावणाचे सारे शरीर मेद आणि रक्तानी भिजून गेले. त्या अवस्थेत त्या भयंकर शक्तिशाली देवद्रोही राक्षसाने युद्धस्थळी ब्रह्मदेवानी दिलेली शक्ति उचलून घेतली. ॥१०७॥
स तां सधूमानलसंनिकाशां
वित्रासनां संयति वानराणाम् ।
चिक्षेप शक्तिं तरसा ज्वलन्तीं
सौमित्रये राक्षसराष्ट्रनाथः ॥ १०८ ॥
ती शक्ति धूमयुक्त अग्निप्रमाणे दिसून येत होती आणि युद्धात वानरांना भयभीत करणारी होती. राक्षसांच्या राष्ट्राचे स्वामी रावणाने ती जळत असलेली शक्ति अत्यंत वेगाने सौमित्रावर सोडली. ॥१०८॥
तामापतन्तीं भरतानुजोऽस्त्रैः
जघान बाणैश्च हुताग्निकल्पैः ।
तथापि सा तस्य विवेश शक्तिः
भुजंतरं दाशरथेर्विशालम् ॥ १०९ ॥
आपल्याकडे येत असलेल्या त्या शक्तिवर भरतानुज लक्ष्मणांनी अग्नितुल्य तेजस्वी बर्‍याचशा बाणांचा आणि अस्त्रांचा प्रहार केला, तथापि ती शक्ति दाशरथि लक्ष्मणांच्या विशाल वक्षःस्थळात घुसली. ॥१०९॥
स शक्तिमान् शक्तिसमाहतः सन्
जज्वाल भूमौ स रघुप्रवीरः ।
तं विह्वलन्तं सहसाऽभ्युपेत्य
जग्राह राजा तरसा भुजाभ्याम् ॥ ११० ॥
रघुकुलातील प्रधान वीर लक्ष्मण जरी अत्यंत शक्तिशाली होते, तरीही त्या शक्तिने आहत होऊन पृथ्वीवर पडले आणि जळू लागले. त्यांना विव्हळ झालेले पाहून राजा रावण एकाएकी त्यांच्या जवळ जाऊन पोहोचला आणि त्यांना वेगपूर्वक आपल्या दोन्ही भुजांनी उचलू लागला. ॥११०॥
हिमवान् मन्दरो मेरुः त्रैलोक्यं वा सहामरैः ।
शक्यं भुजाभ्यामुद्धर्तुं न शक्यो भरतानुजः ॥ १११ ॥
ज्या रावणात देवतांसहित हिमालय, मंदराचल, मेरूगिरी अथवा तीन्ही लोकांना भुजांच्या द्वारा उचलून घेण्याची शक्ति होती, तोच भरतांचे लहान भाऊ लक्ष्मण यांना उचलण्यास समर्थ होऊ शकला नाही. ॥१११॥
शक्त्या ब्राह्मया तु सौमित्रिः ताडितोऽपि स्तनांतरे ।
विष्णोरमीमांस्यभागं आत्मानं प्रत्यनुस्मरत् ॥ ११२ ॥
ब्रह्मदेवांच्या शक्तिने छातीवर आघात होऊनही लक्ष्मणांनी भगवान्‌ विष्णुंच्या अचिंत्य अंशरूपाने आपले चिंतन केले. ॥११२॥
ततो दानवदर्पघ्नं सौमित्रिं देवकण्टकः ।
तं पीडयित्वा बाहुभ्यां न प्रभुर्लङ्‌घनेऽभवत् ॥ ११३ ॥
म्हणून देवशत्रु रावण दानवांचा दर्प चूर्ण करणार्‍या लक्ष्मणांना आपल्या दोन्ही भुजांमध्ये दाबून धरून हलविण्यासही समर्थ होऊ शकला नाही. ॥११३॥
ततः क्रुद्धो वायुसुतो रावणं समभिद्रवत् ।
आजघानोरसि क्रुद्धो वज्रकल्पेन मुष्टिना ॥ ११४ ॥
त्याच समयी क्रोधाविष्ट झालेले वायुपुत्र हनुमान्‌ रावणाकडे धावले आणि त्यांनी आपल्या वज्रासारख्या मुष्टिने रावणाच्या छातीवर मारले. ॥११४॥
तेन मुष्टिप्रहारेण रावणो राक्षसेश्वरः ।
जानुभ्यामगमद् भूमौ चचाल च पपात च ॥ ११५ ॥
त्या मुष्टिच्या प्रहाराने राक्षसराज रावणाने जमिनीवर गुडघे टेकले, तो कापू लागला आणि शेवटी जमिनीवर कोसळला. ॥११५॥
आस्यैश्च नेत्रैः श्रवणैः पपात रुधिरं बहु ।
विघूर्णमानो निश्चेष्टो रथोपस्य उपाविशत् ॥ ११६ ॥
त्याचे मुख, नेत्र आणि कानातून खूप रक्त वाहू लागले आणि त्याला घेरी येऊन तो रथाच्या मागील भागात निश्चेष्ट होऊन जाऊन बसला. ॥११६॥
विसंज्ञो मूर्च्छितश्चासीन् न च स्थानं समालभत् ।
विसंज्ञं रावणं दृष्ट्‍वा समरे भीमविक्रमम् ॥ ११७ ॥

ऋषयो वानराश्चैव नेदुर्देवाश्च सासुराः ।
तो मूर्छित होऊन आपली शुद्धि हरवून बसला. तेथेही तो स्थिर राहू शकला नाही - तडफडत आणि तळमळत राहिला. समरांगणात भयंकर पराक्रमी रावणाला अचेत झालेला पाहून ऋषि, देवता, असुर आणि वानर हर्षनाद करू लागले. ॥११७ १/२॥
हनुमानथ तेजस्वी लक्ष्मणं रावणार्दितम् ॥ ११८ ॥

आनयद् राघवाभ्याशं बाहुभ्यां परिगृह्य तम् ।
त्यानंतर तेजस्वी हनुमान्‌ रावणपीडित लक्ष्मणांना दोन्ही हातांनी उचलून राघवांजवळ घेऊन आले. ॥११८ १/२॥
वायुसूनोः सुहृत्त्वेन भक्त्या परमया च सः ।
शत्रूणामप्यकंप्योपि लघुत्वमगमत् कपेः ॥ ११९ ॥
हनुमानांचे सौहार्द आणि उत्कट भक्तिभाव यामुळे लक्ष्मण त्यांच्यासाठी हलके झाले. शत्रुंसाठी तर ते अद्यापही अकंपनीयच होते. ते त्यांना हलवू शकत नव्हते. ॥११९॥
तं समुत्सृज्य सा शक्तिः सौमित्रिं युधि निर्जितम् ।
रावणस्य रथे तस्मिन् स्थानं पुनरुपागमत् ॥ १२० ॥
युद्धात पराजित झालेल्या लक्ष्मणांना सोडून ती शक्ति पुन्हा रावणाच्या रथावर परत आली. ॥१२०॥
रावणोऽपि महातेजाः प्राप्य संज्ञां महाहवे ।
आददे निशितान् बाणान् जग्राह च महद्धनुः ॥ १२१ ॥
थोड्‍या वेळाने शुद्धिवर आल्यावर महातेजस्वी रावणाने परत विशाल धनुष्य उचलले आणि तीक्ष्ण बाण हातात घेतले. ॥१२१॥
आश्वस्तश्च विशल्यश्च लक्ष्मणः शत्रुसूदनः ।
विष्णोर्भागममीमांस्यं आत्मानं प्रत्यनुस्मरन् ॥ १२२ ॥
शत्रुसूदन लक्ष्मणांनी ही भगवान्‌ विष्णूंच्या अचिंतनीय अंशरूपाने आपले चिंतन केले आणि ते स्वस्थ आणि निरोगी झाले. ॥१२२॥
निपातितमहावीरां वानराणां महाचमूम् ।
राघवस्तु रणे दृष्ट्‍वा रावणं समभिद्रवत् ॥ १२३ ॥
वानरांच्या विशाल वाहिनीतील मोठ मोठे वीर मारले गेले आहेत हे पाहून रणभूमीमध्ये राघवांनी रावणावर हल्ला केला. ॥१२३॥
अथैनमुपसंक्रम्य हनुमान् वाक्यमब्रवीत् ।
मम पृष्टं समारुह्य राक्षसं शास्तुमर्हसि ॥ १२४ ॥

विष्णुर्यथा गरुत्मन्तं आरुह्यामरवैरिणम् ।
त्या समयी हनुमानांनी त्यांच्या जवळ जाऊन म्हटले - प्रभो ! जसे भगवान्‌ विष्णु गरूडावर चढून दैत्यांचा संहार करतात, त्याच प्रकारे आपण माझ्या पाठीवर चढून या राक्षसांना दण्ड द्यावा. ॥१२४ १/२॥
तच्छुत्वा राघवो वाक्यं वायुपुत्रेण भाषितम् ॥ १२५ ॥

अथारुरोह सहसा हनूमंतं महाकपिम् ।
पवनकुमारांनी सांगितलेली ही गोष्ट ऐकून राघव एकाएकी त्या महाकपि हनुमानांच्या पाठीवर चढले. ॥१२५ १/२॥
रथस्थं रावणं संख्ये ददर्श मनुजाधिपः ॥ १२६ ॥
तमालोक्य माहतेजाः प्रदुद्राव स रावणम् ।
वैरोचनमिव क्रुद्धो विष्णुरभ्युद्यतायुधः ॥ १२७ ॥
महाराज श्रीरामांनी समरांगणात रावणाला रथात बसलेला पाहिले. त्याला पहाताच महातेजस्वी श्रीराम, ज्याप्रमाणे महाकुपित झालेले भगवान्‌ विष्णु आपले चक्र घेऊन विरोचनकुमार बलिवर तुटून पडले होते त्याप्रमाणे रावणाकडे धावले. ॥१२६-१२७॥
ज्याशब्दमकरोत् तीव्रं वज्रनिष्पेषनिष्ठुरम् ।
गिरा गंभीरया रामो राक्षसेन्द्रमुवाच ह ॥ १२८ ॥
त्यांनी आपल्या धनुष्याचा तीव्र टणत्कार प्रकट केला जो वज्राच्या गडगडाटा पेक्षाही अधिक कठोर होता. यानंतर श्रीरामचंद्र राक्षसराज रावणाला गंभीर वाणीने म्हणाले- ॥१२८॥
तिष्ठ तिष्ठ मम त्वं हि कृत्वा विप्रियमीद्दशम् ।
क्व नु राक्षसशार्दूल गतो मोक्षमवाप्स्यसि ॥ १२९ ॥
राक्षसांमध्ये वाघ बनलेल्या रावणा ! उभा रहा, उभा रहा. माझा असा अपराध करून तू कोठे जाऊन प्राणसंकटातून सुटका प्राप्त करू शकतोस ? ॥१२९॥
यदीन्द्रवैवस्वतभास्करान् वा
स्वयंभुवैश्वानरशंकरान् वा ।
गमिष्यसि त्वं दश वा दिशो वा
तथापि मे नाद्य गतो विमोक्ष्यसे ॥ १३० ॥
जरी तू इंद्र, यम अथवा सूर्याजवळ अथवा ब्रह्मदेव, अग्नि अथवा शंकराजवळ अथवा दाही दिशांमध्ये पळून जाशील तरीही आता माझ्या हातून तू वाचू शकणार नाहीस. ॥१३०॥
यश्चैव शक्त्या निहतस्त्वयाद्य
इच्छन् विषादं सहसाभ्युपेत्य ।
स एष रक्षोगणराज मृत्युः
सपुत्रपौत्रस्य तवाद्य युद्धे ॥ १३१ ॥
तू आज आपल्या शक्तिच्या द्वारा युद्धात जात असलेल्या ज्या लक्ष्मणांस आहत केलेस आणि जे त्या शक्तिच्या आघाताने एकाएकी मूर्छित झाले होते, त्यांच्याच त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आज मी युद्धभूमीमध्ये उपस्थित झालो आहे. राक्षसराज ! मी पुत्रपौत्रांसहित तुझा मृत्यु बनून आलो आहे. ॥१३१॥
एतेन चात्यद्‌भुतदर्शनानि
शरैर्जनस्थानकृतालयानि ।
चतुर्दशान्यात्तवरायुधानि
रक्षःसहस्राणि निषूदितानि ॥ १३२ ॥
रावणा ! तुझ्या समोर उभे असलेल्या या रघुवंशी राजकुमारानेच आपल्या बाणांच्या द्वारा जनस्थाननिवासी त्या चौदा हजार राक्षसांचा संहार करून टाकला होता, जे अद्‌भुत आणि दर्शनीय योद्धे होते आणि उत्तमोत्तम अस्त्र-शस्त्रांनी संपन्न होते. ॥१३२॥
राघवस्य वचः श्रुत्वा राक्षसेन्द्रो महाबलः ।
वायुपुत्रं महावीर्यं वहन्तं राघवं रणे ॥ १३३ ॥

रोषेण महताऽऽविष्ट पूर्ववैरमनुस्मरन्
आजघान शरैर्दीप्तैः कालानलशिखोपमैः ॥ १३४ ॥
राघवांचे हे म्हणणे ऐकून महाबली राक्षसराज रावण अत्यंत रोषाने भरून गेला. त्याला पूर्वीच्या वैराचे स्मरण झाले आणि त्याने कालाग्निच्या शिखेसमान दीप्तीशाली बाणांच्या द्वारा राघवांचे वाहन बनलेल्या महान्‌ वेगवान्‌ वायुपुत्र हनुमानांना अत्यंत घायाळ करून टाकले. ॥१३३-१३४॥
राक्षसेनाहवे तस्य ताडितस्यापि सायकैः ।
स्वभावतेजोयुक्तस्य भूयस्तेजोऽभ्यवर्धत ॥ १३५ ॥
युद्धस्थळात त्या राक्षसाच्या सायकांनी आहत होऊनही स्वाभाविक तेजाने संपन्न हनुमानांचे शौर्य अधिकच वाढले. ॥१३५॥
ततो रामो महातेजा रावणेन कृतव्रणम् ।
दृष्ट्‍वा प्लवगशार्दूलं कोपस्य वशमेयिवान् ॥ १३६ ॥
वानर शिरोमणी हनुमानास रावणाने घायाळ करून टाकले हे पाहून महातेजस्वी श्रीराम क्रोधाच्या वशीभूत झाले. ॥१३६॥
तस्याभिसंक्रम्य रथं सचक्रं
साश्वध्वजच्छत्रमहापताकम् ।
ससारथिं साशनिशूलखड्गं
रामः प्रचिच्छेद शितैः शराग्रैः ॥ १३७ ॥
नंतर तर भगवान्‌ श्रीरामांनी आक्रमण करून चाके, घोडे, ध्वजा, पताका, छत्र, सारथि, अशनि, शूल आणि खङ्‌गासहित त्याच्या रथाला आपल्या तीक्ष्ण बाणांनी तिळ तिळ करून तोडून टाकले. ॥१३७॥
अथेन्द्रशत्रुं तरसा जघान बाणेन वज्राशनिसंनिभेन ।
भुजान्तरे व्यूढसुजातरूपे वज्रेण मेरुं भगवानिवेन्द्रः ॥ १३८॥
जसे भगवान्‌ इंद्रांनी वज्राच्या द्वारे मेरू पर्वतावर आघात केला असावा, त्याप्रकारे प्रभु श्रीरामचंद्रांनी वज्र आणि अशनि समान तेजस्वी बाणाने इंद्रशत्रु रावणाच्या विशाल आणि सुंदर छातीवर वेगपूर्वक आघात केला. ॥१३८॥
यो वज्रपाताशनिसंनिपातान्
न चुक्षुभे नापि चचाल राजा ।
स रामबाणाभिहतो भृशार्तः
चचाल चापं च मुमोच वीरः ॥ १३९ ॥
जो राजा रावण वज्र आणि अशनि यांच्या आघातानेही कधी क्षुब्ध आणि विचलित झाला नव्हता, तोच वीर त्या समयी श्रीरामांच्या बाणांनी घायाळ होऊन अत्यंत आर्त आणि कंपित होऊन गेला आणि त्याच्या हातांतून धनुष्य सुटून खाली पडले. ॥१३९॥
तं विह्वलन्तं प्रसमीक्ष्य रामः
समाददे दीप्तमथार्धचन्द्रम् ।
तेनार्कवर्णं सहसा किरीटं
चिच्छेद रक्षोधिपतेर्महात्मा ॥ १४० ॥
रावणाला व्याकुळ झालेला पाहून महात्मा श्रीरामांनी एक चमकणारा अर्धचंद्राकार बाण हातात घेतला आणि त्याच्याद्वारा राक्षसराजाचा सूर्यासमान देदिप्यमान मुकुट एकाएकी छेदून टाकला. ॥१४०॥
तं निर्विषाशीविषसंनिकाशं
शान्तार्चिषं सूर्यमिवाप्रकाशम् ।
गतश्रियं कृत्तकिरीटकूटं
उवाच रामो युधि राक्षसेन्द्रम् ॥ १४१ ॥
त्यासमयी धनुष्य नसल्याने रावण विषहीन सर्पाप्रमाणे आपला प्रभाव गमावून बसला होता. सायंकाळी ज्याची प्रभा शान्त झाली असावी त्या सूर्यदेवाप्रमाणे तो निस्तेज झाला होता आणि मुकुटांचा समूह छेदल्या जाण्याने श्रीहीन दिसत होता. त्या अवस्थेतच श्रीरामांनी युद्धभूमीमध्ये राक्षसराजास म्हटले - ॥१४१॥
कृतं त्वया कर्म महत् सुभीमं
हतप्रवीरश्च कृतस्त्वयाहम् ।
तस्मात् परिश्रान्त इति व्यवस्य
न त्वां शरैर्मृत्युवशं नयामि ॥ १४२ ॥
रावणा ! तू आज फार भयंकर कर्म केले आहेस. माझ्या सेनेतील मुख्य मुख्य वीरांना मारून टाकले आहेस. इतके असूनही तू थकला आहेस हे जाणून मी बाणांच्या द्वारे तुला मृत्युच्या अधीन करत नाही. ॥१४२॥
गच्छानुजानामि रणार्दितस्त्वं
प्रविश्य रात्रिंचरराज लङ्‌काम् ।
आश्वास्य निर्याहि रथी च धन्वी
तदा बलं द्रक्ष्यसि मे रथस्थः ॥ १४३ ॥
निशाचरराज ! मी जाणतो की तू युद्धाने पीडित झाला आहेस, म्हणून आज्ञा देत आहे, जा, लंकेत प्रवेश करून काही वेळ विश्राम कर. नंतर रथ आणि धनुष्यासहित बाहेर पड. त्या वेळी रथारूढ राहून तू परत माझे बळ पहा. ॥१४३॥
स एवमुक्तो हतदर्पहर्षो
निकृत्तचापः स हताश्वसूतः ।
शरार्दितः कृत्तमहाकिरीटो
विवेश लङ्‌कां सहसा स्म राजा ॥ १४४ ॥
भगवान्‌ श्रीरामांनी असे म्हटल्यावर राजा रावण एकाएकी लंकेमध्ये घुसला. त्याचा हर्ष आणि अभिमान मातीत मिळाला होता. धनुष्य तोडले गेले होते, घोडे तसेच सारथि मारले गेले होते, महान किरीट खण्डित झाला होता आणि तो स्वतःही बाणांनी खूपच पीडित झाला होता. ॥१४४॥
तस्मिन् प्रविष्टे रजनीचरेन्द्रे
महाबले दानवदेवशत्रौ ।
हरीन् विशल्यान् सह लक्ष्मणेन
चकार रामः परमाहवाग्रे ॥ १४५ ॥
देवता आणि दानवांचा शत्रु महाबली निशाचरराज रावण लंकेत निघून गेल्यावर लक्ष्मणासहित श्रीरामांनी त्या महायुद्धाच्या तोंडावरच वानरांच्या शरीरांतून बाण बाहेर काढले. ॥१४५॥
तस्मिन् प्रभग्ने त्रिदशेन्द्रशत्रौ
सुरासुरा भूतगणा दिशश्च ।
ससागराः सर्षिमहोरगाश्च
तथैव भूम्यम्बुचराः प्रहृष्टाः ॥ १४६ ॥
देवराज इंद्राचा शत्रु रावण जेव्हा युद्धस्थळातून पळून गेला, तेव्हा त्याच्या पराभवाचा विचार करून देवता, असुर, भूते, दिशा, समुद्र, ऋषिगण, मोठ मोठे नाग तसेच भूचर आणि जलचर प्राणीही फारच प्रसन्न झाले. ॥१४६॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे एकोनषष्टितमः सर्गः ॥ ५९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकोणसाठावा सर्ग पूरा झाला. ॥५९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP