[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। द्वादशाधिकशततमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
ऋषीणां भरतं प्रति श्रीरामाज्ञया निवर्तितुं सम्मतिर्भरतस्य श्रीरामचरणयोः प्रणिपत्य पुरीं प्रति चलितुं तत्प्रति प्रार्थना श्रीरामेण तं प्रबोध्य स्वीयां चरणपादुकां दत्त्वा तेषां सर्वेषां ततः प्रस्थापनम् - ऋषिंनी भरताला श्रीरामांच्या आज्ञेनुसार परत जाण्याचा सल्ला देणे, भरतांनी पुन्हा श्रीरामांच्या चरणी पडून चलण्याची प्रार्थना करणे, श्रीरामांनी त्यांना समजावून आपल्या चरण पादुका देऊन त्या सर्वांना निरोप देणे -
तमप्रतिमतेजोभ्यां भ्रातृभ्यां रोमहर्षणम् ।
विस्मिताः सङ्‌गमं प्रेक्ष्य समवेता महर्षयः ॥ १ ॥
त्या अनुपम तेजस्वी भ्रात्यांचा तो रोमांचकारी समागम पाहून तेथे आलेल्या महर्षिंना अत्यंत विस्मय वाटला. ॥ १ ॥
अन्तर्हिता मुनिगणाः स्थिताश्च परमर्षयः ।
तौ भ्रातरौ महाभागौ काकुत्स्थौ प्रशशंसिरे ॥ २ ॥
अंतरिक्षात अदृष्य भावाने उभे असलेले मुनि तसेच तेथे प्रत्यक्षरूपाने बसलेले महर्षी त्या महान् भाग्यशाली काकुत्स्थवंशी बंधूंची या प्रकारे प्रशंसा करू लागले - ॥ २ ॥
सदार्यौ राजपुत्रौ द्वौ धर्मज्ञौ धर्मविक्रमौ ।
श्रुत्वा वयं हि सम्भाषामुभयोः स्पृहयामहे ॥ ३ ॥
हे दोन्ही राजकुमार सदा श्रेष्ठ, धर्माचे ज्ञाते आणि धर्ममार्गावरच चालणारे आहेत. या दोघांचे संभाषण ऐकून आम्हाला वारंवार ते ऐकत राहण्याची इच्छा होत आहे.॥ ३ ॥
ततस्त्वृषिगणाः क्षिप्रं दशग्रीववधैषिणः ।
भरतं राजशार्दूलमित्यूचुः सङ्‌गता वचः ॥ ४ ॥
त्यानंतर दशग्रीव रावणाच्या वधाची अभिलाषा बाळगणार्‍या ऋषिंनी मिळून राजसिंह भरताला तात्काळच ही गोष्ट सांगितली - ॥ ४ ॥
कुले जात महाप्राज्ञ महावृत्त महायशः ।
ग्राह्यं रामस्य वाक्यं ते पितरं यद्यवेक्षसे ॥ ५ ॥
महाप्राज्ञ ! तुम्ही उत्तम कुळात उत्पन्न झाला आहात. तुमचे आचरण फारच उत्तम आणि यश महान आहे. जर तुम्ही आपल्या पित्याकडे पहाल, त्यांना सुख देण्याची इच्छा करीत असाल, तर तुम्ही श्रीरामांचे म्हणणे मान्य करावयास हवे. ॥ ५ ॥
सदानृणमिमं रामं वयमिच्छामहे पितुः ।
अनृणत्वाच्च कैकेय्याः स्वर्गं दशरथो गतः ॥ ६ ॥
’आम्ही सर्व या श्रीरामांना पित्याच्या ऋणांतून सदा उऋण (मुक्त) झालेले पाहू इच्छितो. कैकेयीचे ऋण चुकते केल्यानेच राजा दशरथ स्वर्गात पोहोचले आहेत. ॥ ६ ॥
एतावदुक्त्वा वचनं गन्धर्वाः समहर्षयः ।
राजर्षयश्चैव तदा सर्वे स्वां स्वां गतिं गताः ॥ ७ ॥
इतके म्हणून तेथे आलेले गंधर्व, महर्षि आणि राजर्षि सर्व आपापल्या स्थानी निघून गेले. ॥ ७ ॥
ह्लादितस्तेन वाक्येन शुभेन शुभदर्शनः ।
रामः संहृष्टवदनस्तानृषीनभ्यपूजयत् ॥ ८ ॥
ज्यांच्या दर्शनाने जगताचे कल्याण होत असते ते भगवान श्रीराम महर्षिंच्या वचनांनी अत्यंत प्रसन्न झाले. त्यांचे मुख हर्षोल्लासाने खुलले. त्यामुळे त्यांची फार शोभा दिसू लागली आणि त्यांनी त्या महर्षिंची सादर प्रशंसा केली. ॥ ८ ॥
त्रस्तगात्रस्तु भरतः स वाचा सज्जमानया ।
कृताञ्जलिरिदं वाक्यं राघवं पुनरब्रवीत् ॥ ९ ॥
परंतु भरताचे सारे शरीर कापू लागले. ते अडखळत अडखळत हात जोडून राघवांना (रामांना) म्हणाले - ॥ ९ ॥
राम धर्ममिमं प्रेक्ष्य कुलधर्मानुसंततम् ।
कर्तुमर्हसि काकुत्स्थ मम मातुश्च याचनाम् ॥ १० ॥
"काकुत्स्थ रामा ! आमच्या कुलधर्माशी संबंध असणारे जे ज्येष्ठ पुत्राचे राज्यग्रहण आणि प्रजापालनरूपी धर्म आहे त्याकडे दृष्टी टाकून आपण माझी आणि मातेची याचना सफल करावी. ॥ १० ॥ "
रक्षितुं सुमहद् राज्यमहमेकस्तु नोत्सहे ।
पौरजानपदांश्चापि रक्तान् रञ्जयितुं तथा ॥ ११ ॥
’मी एकटा या विशाल राज्याचे रक्षण करू शकत नाही. तसेच आपल्या चरणी अनुराग ठेवणार्‍या या पुरवासी तसेच जनपदवासी लोकांनाही आपल्या शिवाय प्रसन्न राखू शकत नाही. ॥ ११ ॥
ज्ञातयश्चापि योधाश्च मित्राणि सुहृदश्च नः ।
त्वामेव हि प्रतिक्षन्ते पर्जन्यमिव कर्षकाः ॥ १२ ॥
’ज्याप्रमाणे शेतकरी मेघांची प्रतिक्षा करीत राहतात, त्याप्रकारे आपले बंधु-बांधव, योद्धे, मित्र, आणि सुहृद सर्व लोक आपलीच वाट पहात आहेत. ॥ १२ ॥
इदं राज्यं महाप्राज्ञ स्थापय प्रतिपद्य हि ।
शक्तिमान् स काकुत्स्थ लोकस्य परिपालने ॥ १३ ॥
’महाप्राज्ञ ! आपण या राज्याचा स्विकार करून दुसर्‍या कोणावर याच्या पालनाचा भार सोपवावा. तोच पुरुष आपला प्रजावर्ग अथवा लोकांचे पालन करणास समर्थ होऊ शकतो." ॥ १३ ॥
इत्युक्त्वापतद् भ्रातुः पादयोर्भरतस्तदा ।
भृशं सम्प्रार्थयामास राघवोऽतिप्रियं वदन् ॥ १४ ॥
असे म्हणून भरत आपल्या भावाच्या चरणावर पडले. त्या समयी त्यांनी राघवाशी अत्यंत प्रिय वचन बोलून त्यांनी राज्यग्रहण करावे म्हणून फार प्रार्थना केली. ॥ १४ ॥
तमङ्‌के भ्रातरं कृत्वा रामो वचनमब्रवीत् ।
श्यामं नलिनपत्राक्षं मत्तहंसस्वरः स्वयम् ॥ १५ ॥
तेव्हां श्रीरामांनी श्यामवर्ण कमलनयन भाऊ भरत यास उठवून मांडीवर बसवून घेतले आणि मदमत्त हंसाप्रमाणे मधुर स्वरात स्वयं त्यांनी असे म्हटले - ॥ १५ ॥
आगता त्वामियं बुद्धिः स्वजा वैनयिकी च या ।
भृशमुत्सहसे तात रक्षितुं पृथिवीमपि ॥ १६ ॥
"तात ! तुम्हाला ही जी स्वाभाविक विनयशील बुद्धि प्राप्त झाली आहे त्या बुद्धिच्या द्वारा तुम्ही समस्त भूमंडलाचे रक्षण करण्यासही पूर्ण रूपाने समर्थ होऊ शकता. ॥ १६ ॥ "
अमात्यैश्च सुहृद्‌भिश्च बुद्धिमद्‌भिश्च मन्त्रिभिः ।
सर्वकार्याणि सम्मन्त्र्य महान्त्यपि हि कारय ॥ १७ ॥
’याशिवाय अमात्य, सुहृद, आणि बुद्धिमान मंत्र्यांचा सल्ला घेऊन त्यांच्या द्वारा सर्व कार्य, मग ते कितीही मोठे का असेना, करवून घेत जा. ॥ १७ ॥
लक्ष्मीश्चन्द्रादपेयाद् वा हिमवान् वा हिमं त्यजेत् ।
अतीयात् सागरो वेलां न प्रतिज्ञामहं पितुः ॥ १८ ॥
चंद्रम्यापासून त्याची प्रभा अलग होईल, हिमालय हिमाचा परित्याग करेल अथवा समुद्र आपली सीमा ओलांडून पुढे सरकेल; परंतु मी पित्याची प्रतिज्ञा तोडू शकत नाही. ॥ १८ ॥
कामाद् वा तात लोभाद् वा मात्रा तुभ्यमिदं कृतम् ।
न तन्मनसि कर्तव्यं वर्तितव्यं च मातृवत् ॥ १९ ॥
तात ! माता कैकेयीने कामनेमुळे अथवा लोभवश तुमच्यासाठी जे केले आहे ते मनावर घेऊ नका; आणि तिच्या प्रति पुत्र आपल्या पूजनीय मातेच्या प्रति जसे आचरण करतो तसेच आचरण नेहमी करा."॥ १९ ॥
एवं ब्रुवाणं भरतः कौसल्यासुतमब्रवीत् ।
तेजसाऽऽदित्यसङ्‌काशं प्रतिपच्चन्द्रदर्शनम् ॥ २० ॥
जे सूर्यासमान तेजस्वी आहेत, तसेच ज्यांचे दर्शन प्रतिपदेच्या (बीजेच्या) चंद्रम्याप्रमाणे आल्हाददायक आहे, त्या कौसल्यानंदन श्रीरामांनी या प्रकारे सांगितल्यावर भरत त्यांना म्हणाले - ॥ २० ॥
अधिरोहार्य पादाभ्यां पादुके हेमभूषिते ।
एते हि सर्वलोकस्य योगक्षेमं विधास्यतः ॥ २१ ॥
आर्य ! या दोन सुवर्णभूषित पादुका आपल्या चरणी अर्पित आहेत. आपण यांच्यावर आपले चरण ठेवावे. त्याच संपूर्ण जगताच्या योगक्षेमाचा निर्वाह करतील.॥ २१ ॥
सोऽधिरुह्य नरव्याघ्रः पादुके व्यवमुच्य च ।
प्रायच्छत् सुमहातेजा भरताय महात्मने ॥ २२ ॥
तेव्हां महातेजस्वी पुरुषसिंह श्रीरामांनी त्या पादुकांवर चढून त्यांना परत अलग केले आणि महात्मा भरतांच्या हाती त्या सोपविल्या. ॥ २२ ॥
स पादुके सम्प्रणम्य रामं वचनमब्रवीत् ।
चतुर्दश हि वर्षाणि जटाचीरधरो ह्यहम् ॥ २३ ॥

फलमूलाशनो वीर भवेयं रघुनन्दन ।
तवागमनमाकांक्षन् वसन् वै नगराद् बहिः ॥ २४ ॥

तव पादुकयोर्न्यस्य राज्यतन्त्रः परंतप ।
त्या पादुकांना प्रणाम करून भरतांनी श्रीरामास म्हटले, "वीर रघुनंदन ! मीही चौदा वर्षेपर्यंत जटा आणि चीर धारण करून फलमूलाचे भोजन करीत आपल्या आगमनाच्या प्रतीक्षेत नगराच्या बाहेरच राहीन. परंतप ! इतक्या दिवसपर्यंत राज्याचा सारा भार आपल्या या चरण पादुकांवरच ठेवून मी आपली वाट पहात राहीन. ॥ २३-२४ १/२ ॥
चतुर्दशे हि सम्पूर्णे वर्षेऽहनि रघूत्तम ॥ २५ ॥

न द्रक्ष्यामि यदि त्वां तु प्रवेक्ष्यामि हुताशनम् ।
रघुकुलशिरोमणे ! जर चौदा वर्षे पूर्ण झाल्यावर नूतन वर्षाच्या प्रथम दिवशीच मला आपले दर्शन झाले नाही तर मी जळत्या आगीमध्ये प्रवेश करीन."॥ २५ १/२ ॥
तथेति च प्रतिज्ञाय तं परिष्वज्य सादरम् ॥ २६ ॥

शत्रुघ्नं च परिष्वज्य भरतं चेदमब्रवीत् ।
श्रीरामांनी ’फार चांगले’ असे म्हणून आपली संमति दर्शविली आणि मोठ्या आदराने भरतांना हृदयाशी धरले. नंतर शत्रुघ्नालाही हृदयाशी धरून त्याला या प्रमाणे म्हणाले - ॥ २६ १/२ ॥
मातरं रक्ष कैकेयीं मा रोषं कुरु तां प्रति ॥ २७ ॥

मया च सीतया चैव शप्तोऽसि रघुनन्दन ।
इत्युक्त्वाश्रुपरीताक्षो भ्रातरं विससर्ज ह ॥ २८ ॥
रघुनंदन ! मी तुला आपली आणि सीतेची शपथ घालून सांगतो आहे की तुम्ही माता कैकेयीचे रक्षण करावे. तिच्या प्रति कधीही क्रोध करू नये"- इतके बोलता बोलताच त्यांच्या नेत्रांतून अश्रु गळू लागले. त्यांनी व्यथित हृदयाने भाऊ शत्रुघ्न यास निरोप दिला. ॥ २७-२८ ॥
स पादुके ते भरतः स्वलङ्‌कृते
     महोज्ज्वले सम्परिगृह्य धर्मवित् ।
प्रदक्षिणं चैव चकार राघवं
     चकार चैवोत्तमनागमूर्धनि ॥ २९ ॥
धर्मज्ञ भरतांनी उत्तम प्रकारे अलंकृत केलेल्या त्या परम उज्ज्वल चरणपादुकांना घेऊन श्रीरामांची परिक्रमा केली; तसेच त्या पादुकांना राजाच्या स्वारीसाठी उपयोगात येणार्‍या सर्वश्रेष्ठ गजराजाच्या मस्तकी स्थापित केले. ॥ २९ ॥
अथानुपूर्व्या प्रतिपूज्य तं जनं
     गुरूंश्च मन्त्रिन् प्रकृतीस्तथानुजौ ।
व्यसर्जयद् राघववंशवर्धनः
     स्थिरः स्वधर्मे हिमवानिवाचलः ॥ ३० ॥
त्यानंतर आपल्या धर्मामध्ये हिमालयाप्रमाणे अविचल भावाने स्थिर राहणार्‍या रघुवंशवर्धन श्रीरामांनी क्रमशः तेथे आलेल्या जनसमुदायाचा, गुरू, मंत्री तसेच दोन्ही भावांचा यथायोग्य स्त्कार करून त्यांना निरोप दिला. ॥ ३० ॥
तं मातरो बाष्पगृहीतकण्ठ्यो
     दुःखेन नामन्त्रयितुं हि शेकुः ।
स चैव मातॄरभिवाद्य सर्वा
     रुदन् कुटीं स्वां प्रविवेश रामः ॥ ३१ ॥
त्या समयी कौसल्या आदि सर्व मातांचा गळा अश्रुंनी रुद्ध झाला. दुःखामुळे त्या श्रीरामांना संबोधीतही करू शकल्या नाहीत. श्रीराम देखील सर्व मातांना प्रणाम करून रडत आपल्या कुटीमध्ये निघून गेले. ॥ ३१ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे द्वादशाधिकशततमः सर्गः ॥ ११२ ॥
या प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकशे बारावा सर्ग पूरा झाला ॥ ११२ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP