श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। पञ्चत्रिंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
शोणभद्रमुत्तीर्य श्विवामित्रप्रभृतीनां गङ्गातटं गत्वा तत्र रात्रौ वासः श्रीरामानुयुक्तेन विश्वामित्रेण तस्मै गङ्गोत्पत्तिकथाश्रावणम् - शोणभद्र पार करून विश्वामित्र आदिंचे गंगेच्या तटावर पोहोचून तेथे रात्री वास करणे तथा श्रीरामांनी विचारल्यावरून विश्वामित्रांनी त्यांना गंगेच्या उत्पत्तिची कथा सांगणे -
उपास्य रात्रिशेषं तु शोणाकूले महर्षिभिः ।
निशायां सुप्रभातायां विश्वामित्रोऽभ्यभाषत ॥ १ ॥
महर्षिंच्यासह विश्वामित्रांनी रात्रिच्या शेषभागात शोणभद्राच्या तटावर शयन केले. जेव्हा रात्र सरली आणि प्रभात झाली, तेव्हा ते श्रीरामचंद्रास म्हणाले - ॥ १ ॥
सुप्रभाता निशा राम पूर्वा संध्या प्रवर्तते ।
उत्तिष्ठोत्तिष्ठ भद्रं ते गमनायाभिरोचय ॥ २ ॥
श्रीरामा ! रात्र सरली आहे. सकाळ झाली आहे. तुमचे कल्याण असो ! उठा, उठा आणि चलण्याची तयारी करा.' ॥ २ ॥
तच्छ्रुत्वा वचनं तस्य कृत पौर्वाह्णिकक्रियः ।
गमनं रोचयामास वाक्यं चेदमुवाच ह ॥ ३ ॥
मुनिंचे म्हणणे ऐकून, पूर्वाह्नकालाचा नित्यनियम पूर्ण करून श्रीराम प्रयाणासाठी तयार झाले आणि म्हणाले - ॥ ३ ॥
अयं शोणः शुभजलोऽगाधः पुलिनमण्डितः ।
कतरेण पथा ब्रह्मन् संतरिष्यामहे वयम् ॥ ४ ॥
'ब्रह्मन् ! शुभ जलानी परिपूर्ण आणि आपल्या तटानी सुशोभित होणारा हा शोणभद्र अथांग वाटत आहे. आपण कुठल्या मार्गाने जाऊन याला पार करणार आहोत ?' ॥ ४ ॥
एवमुक्तस्तु रामेण विश्वामित्रोऽब्रवीदिदम् ।
एष पन्था मयोद्दिष्टो येन यान्ति महर्षयः ॥ ५ ॥
श्रीरामांनी असे म्हटल्यावर विश्वामित्र म्हणाले - "ज्या मार्गाने महर्षिगण शोणभद्रास पार करतात त्याचा मी पहिल्यानेच निश्चय केला आहे. तो मार्ग हा आहे." ॥ ५ ॥
एवमुक्ता महर्षयो विश्वामित्रेण धीमता ।
पश्यन्तस्ते प्रयाता वै वनानि विविधानि च ॥ ६ ॥
बुद्धिमान विश्वामित्रांनी असे म्हटल्यावर ते महर्षि नाना प्रकारच्या वनांची शोभा पहात पहात तेथून प्रस्थान करते झाले. ॥ ६ ॥
ते गत्वा दूरमध्वानं गतेऽर्धदिवसे तदा ।
जाह्नवीं सरितां श्रेष्ठां ददृशुर्मुनिसेविताम् ॥ ७ ॥
फार लांबचा पल्ला पार करून दुपार होत असतानाच त्या सर्व लोकांनी मुनिजनसेवित, सरितांमध्ये श्रेष्ठ गंगेच्या तटावर पोहोचून तिचे दर्शन केले. ॥ ७ ॥
तां दृष्ट्‍वा पुण्यसलिलां हंससारससेविताम् ।
बभूवुर्मुनयः सर्वे मुदिताः सहराघवाः ॥ ८ ॥
हंस आणि सारसांनी सेवित पुण्यसलिला भागीरथीचे दर्शन करून श्रीरामचंद्रांसहित समस्त मुनि अत्यंत प्रसन्न झाले. ॥ ८ ॥
तस्यास्तीरे तदा सर्वे चक्रुर्वासपरिग्रहम् ।
ततः स्नात्वा यथान्यायं सन्तर्प्य पितृदेवताः ॥ ९ ॥

हुत्वा चैवाग्निहोत्राणि प्राश्य चामृतवद्धविः ।
विविशुर्जाह्नवीतीरे शुभा मुदितमानसाः ॥ १० ॥

विश्वामित्रं महात्मानं परिवार्य समन्ततः ।
त्या समयी सर्वांनी गंगेच्या तटावर मुक्काम ठोकला. नंतर विधिवत् स्नान करून देवता आणि पितरांचे तर्पण केले. त्यानंतर अग्निहोत्र करून अमृतासमान मधुर हविष्याचे भोजन केले. नंतर ते सर्व कल्याणकारी महर्षि प्रसन्न चित्त होऊन महात्मा विश्वामित्रांना चारी बाजूने घेरून गंगेच्या तटावर बसले. ॥ १० १/२ ॥
विष्ठिताश्च यथान्यायं राघवौ च यथार्हतः
सम्प्रहृष्टमना रामो विश्वामित्रमथाब्रवीत् ॥ ११ ॥
ज्यावेळी सर्व मुनि स्थिरभावाने विराजमान झाले आणि श्रीराम तथा लक्ष्मणही यथायोग्य स्थानावर बसले तेव्हा प्रसन्नचित्त होऊन श्रीरामांनी विश्वामित्रांना विचारले - ॥ ११ ॥
भगवञ्छ्रोतुमिच्छामि गङ्‍गां त्रिपथगां नदीम् ।
त्रैलोक्यं कथमाक्रम्य गता नदनदीपतिम् ॥ १२ ॥
'भगवन् ! मी हे ऐकू इच्छितो की तिन्ही मार्गांनी प्रवाहित होणारी ही गंगा नदी कशा प्रकारे तिन्ही लोकात फिरून नद आणि नद्यांचे स्वामी समुद्रामध्ये मिळते ?' ॥ १२ ॥
चोदितो रामवाक्येन विश्वामित्रो महामुनिः ।
वृद्धिं जन्म च गङ्‍गाया वक्तुमेवोपचक्रमे ॥ १३ ॥
श्रीरामाच्या या प्रश्नाने प्रेरीत होऊन महामुनि विश्वामित्रांनी गंगेच्या उत्पत्तिची आणि वृद्धिची कथा सांगण्यास सुरुवात केली. ॥ १३ ॥
शैलेन्द्रो हिमवान् नाम धातूनामाकरो महान् ।
तस्य कन्याद्वयं राम रूपेणाप्रतिमं भुवि ॥ १४ ॥
'श्रीराम ! हिमवान् नामक एक पर्वत आहे, जो समस्त पर्वतांचा राजा तथा सर्व प्रकारच्या धातूंचा फार मोठा खजिना आहे. हिमवानाच्या दोन कन्या आहेत, ज्यांच्या सुंदर रूपाची बरोबरी या भूतलावर कुणी कुठेही करू शकत नाही (त्यांच्या रूपाची तुलना कुठे होऊच शकत नाही). ॥ १४ ॥
या मेरुदुहिता राम तयोर्माता सुमध्यमा ।
नाम्ना मेना मनोज्ञा वै पत्‍नी हिमवतः प्रिया ॥ १५ ॥
'मेरू पर्वतावर मनोहारिणी कन्या मेना हिमवानाची प्रिय पत्‍नी आहे. सुंदर कटिप्रदेश असलेली मेना हीच त्या दोन कन्यांची जननी आहे. ॥ १५ ॥
तस्यां गङ्‍गेयमभवज्ज्येष्ठा हिमवतः सुता ।
उमा नाम द्वितीयाभूत् कन्या तस्यैव राघव ॥ १६ ॥
'रघुनंदना ! मेनेच्या गर्भापासून प्रथम जी कन्या उत्पन्न झाली तीच ही गंगा आहे. ही हिमवानाची ज्येष्ठ पुत्री आहे. हिमवानाची दुसरी कन्या, जी मेनेच्या गर्भापासून उत्पन्न झाली ती उमा नावाने प्रसिद्ध आहे. ॥ १६ ॥
अथ ज्येष्ठां सुराः सर्वे देवकार्यचिकीर्षया ।
शैलेन्द्रं वरयामासुर्गङ्‍गां त्रिपथगां नदीम् ॥ १७ ॥
'काही कालानंतर सर्व देवतांनी देवकार्याच्या सिद्धिकरिता ज्येष्ठ कन्या गंगा, जी पुढे स्वर्गातून त्रिपथगा नदीच्या रूपाने अवतीर्ण झाली, तिला गिरिराज हिमलयाकडून मागून घेतली. ॥ १७ ॥
ददौ धर्मेण हिमवांस्तनयां लोकपावनीम् ।
स्वच्छन्दपथगां गङ्‍गां त्रैलोक्यहितकाम्यया ॥ १८ ॥
'हिमवानाने त्रिभुवनाचे हित करण्याच्या इच्छेने स्वच्छंद पथावर विचरण करणार्‍या आपल्या लोकपावनी कन्येला गंगेला धर्मपूर्वक त्यांना दिले. ॥ १८ ॥
प्रतिगृह्य त्रिलोकार्थं त्रिलोकहितकाङ्‌क्षिणः ।
गङ्‍गामादाय तेऽगच्छन् कृतार्थेनान्तरात्मना ॥ १९ ॥
'तिन्ही लोकांच्या हिताची इच्छा करणार्‍या देवता त्रिभुवनाचे कल्याण व्हावे म्हणून गंगेला घेऊन मनातल्या मनात कृतार्थतेचा अनुभव करीत तेथून निघून गेले. ॥ १९ ॥
या चान्या शैलदुहिता कन्याऽऽसीद् रघुनन्दन ।
उग्रं सुव्रतमास्थाय तपस्तेपे तपोधना ॥ २० ॥
'रघुनंदन ! गिरिराजाची जी दुसरी कन्या उमा म्हणून होती, ती उत्तम आणि कठोर व्रताचे पालन करीत घोर तपस्येत गढून गेली. तिने तपोमय धनाचा संचय केला. ॥ २० ॥
उग्रेण तपसा युक्तां ददौ शैलवरः सुताम् ।
रुद्रायाप्रतिरूपाय उमां लोकनमस्कृताम् ॥ २१ ॥
'गिरिराजाने उग्र तपस्येत गढून गेलेली आपली ही विश्ववंद्य कन्या उमा अनुपम प्रभावशाली भगवान् रुद्रास विवाहाने अर्पण केली. ॥ २१ ॥
एते ते शैलराजस्य सुते लोकनमस्कृते ।
गङ्‍गा च सरितां श्रेष्ठा उमादेवी च राघव ॥ २२ ॥
'रघुनंदना ! या प्रकारे सरितांमध्ये श्रेष्ठ गंगा तथा भगवती उमा, या दोघीही गिरिराज हिमालयाच्या कन्या आहेत. सर्व संसार त्यांच्या चरणी मस्तक नमवीत आहे. ॥ २२ ॥
एतत्ते सर्वमाख्यातं यथा त्रिपथगामिनी ।
खं गता प्रथमं तात गतिं गतिमतां वर ॥ २३ ॥

सैषा सुरनदी रम्या शैलेन्द्रतनया तदा ।
सुरलोकं समारूढा विपापा जलवाहिनी ॥ २४ ॥
गतिशीलात श्रेष्ठ रामा ! गंगेच्या उत्पत्तिविषयी या सार्‍या गोष्टी मी तुला सांगितल्या. ही त्रिपथगामिनी कशी झाली हेही ऐक. प्रथम तर ही आकाशमार्गात गेली होती. तत्पश्चात् गिरिराजकुमारी गंगा रमणीय देवनदीच्या रूपात देवलोकात आरूढ झाली होती. नंतर जलरूपाने प्रवाहित होऊन लोकांचे पाप दूर करीत रसातलात पोहोचली होती. ॥ २३-२४ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे पञ्चत्रिंश सर्गः ॥ ३५ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा पस्तीसावा सर्ग समाप्त झाला. ॥ ३५ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP