[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ चत्वारिंशः सर्गः॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
श्रीरामस्य कृते सीतया पुनः सन्देशस्य दानं तामाश्वास्य हनुमत उत्तरदिशायां प्रस्थानम् -
सीतेने श्रीराम यांना सांगण्यासाठी पुन्हा सन्देश देणे तसेच हनुमन्तानी तिला आश्वासन देऊन उत्तर दिशेकडे जाणे -
श्रुत्वा तु वचनं तस्य वायुसूनोर्महात्मनः ।
उवाचात्महितं वाक्यं सीता सुरसुतोपमा ॥ १ ॥
वायुपुत्र महात्मा हनुमानांचे भाषण ऐकून देवकन्येप्रमाणे तेजस्वी सीता आपल्या हिताचा विचार करून त्यांना म्हणाली - ॥१॥
त्वां दृष्ट्‍वा प्रियवक्तारं सम्प्रहृष्यामि वानर ।
अर्धसञ्जातसस्येव वृष्टिं प्राप्य वसुन्धरा ॥ २ ॥
"हे वानरवीरा ! तू मला अत्यन्त प्रिय असे भाषण ऐकविले आहेत. तुला पाहून हर्षाने माझे शरीर रोमांचित होत आहे. अर्धवट मृतप्राय झालेल्या पृथ्वीला (पृथ्वीवरील वर्षा अभावी सुकत असलेल्या धान्यशेतीला) जशी वृष्टी प्राप्त व्हावी, त्याप्रमाणे माझी अवस्था झाली आहे. ॥२॥ "
यथा तं पुरुषव्याघ्रं गात्रैः शोकाभिकर्शितैः ।
संस्पृशेयं सकामाहं तथा कुरु दयां मयि ॥ ३ ॥
हनुमाना ! माझ्यावर कृपा कर. शोकामुळे दुर्बल झालेल्या मला नरश्रेष्ठ श्रीरामांना प्रेमपूर्वक स्पर्श करता यावा अशी व्यवस्था कर ॥३॥
अभिज्ञानं च रामस्य दद्या हरिगणोत्तम ।
क्षिप्तामिषीकां काकस्य कोपादेकाक्षिशातनीम् ॥ ४ ॥
हे वानरश्रेष्ठा ! श्रीरामांनी क्रोधवश होऊन काकपक्षाचा एक डोळा इषीकास्त्र सोडून नाहींसा करून टाकला होता तो प्रसंग तू ओळख पटण्यासाठी खूण म्हणून आठवण करून देण्यासाठी सांग. ॥४॥
मनःशिलायास्तिलको गण्डपार्श्वे निवेशितः ।
त्वया प्रनष्टे तिलके तं किल स्मर्तुमर्हसि ॥ ५ ॥
आणि त्यांना माझ्या वतिने असेही सांग की पूर्वीचा तिलक पुसून गेला असता माझ्या गालावर तुम्ही एक जो मनःशिलेचा तिलक लावला होता, त्याची आठवण करा. ॥५॥
स वीर्यवान् कथं सीतां हृतां समनुमन्यसे ।
वसन्तीं रक्षसां मध्ये महेन्द्रवरुणोपमः ॥ ६ ॥
हे महेन्द्र वरूणतुल्य पराक्रमी प्रियतम ! आपण वीर्यवान असूनही रावणाने हरण केल्यामुळे सीता राक्षसगृही राहात आहे, हे तुम्हांला सहन तरी कसे होत आहे ? माझा, या सीतेचा अपमान तुम्हांला कसा सहन होत आहे ? ॥६॥
एष चूडामणिर्दिव्यो मया सुपरिरक्षितः ।
एतं दृष्ट्‍वा प्रहृष्यामि व्यसने त्वामिवानघ ॥ ७ ॥
हे निष्पाप प्राणेश्वरा ! हे रामा ! हा दिव्य चूडामणी (दिव्य शिरोभूषण) मी फारच प्रयत्‍नपूर्वक जपून ठेवला होता, कारण संकटामध्ये तुमचे दर्शन झाल्यावर मला जसा आनन्द होतो तसा आनन्द ते शिरोरत्‍न (चूडामणी) अवलोकन करून मला होत असे. ॥७॥
एष निर्यातितः श्रीमान् मया ते वारिसम्भवः ।
अतः परं न शक्ष्यामि जीवितुं शोकलालसा ॥ ८ ॥
जलोत्पन्न हे कान्तिमान मणिरत्‍न मी आज तुम्हाण्ला परत करते आहे. आता दुःखातुर झाल्यामुळे मी अधिक काळपर्यन्त जिवन्त राहू शकेन असे मला वाटत नाही. ॥८॥
असह्यानि न दुःखानि वाचश्च हृदयच्छिदः ।
राक्षसैः सह संवासं त्वत्कृते मर्षयाम्यहम् ॥ ९ ॥
असह्य अशी दुःखे, हृदयास भेदून जाणारी मर्मभेदक भाषणे आणि अत्यन्त घोर राक्षसस्त्रियांमध्ये राहाणे, हे सर्व मी तुझ्याकरिता सहन करीत आहे. ॥९॥
धारयिष्यामि मासं तु जीवितं शत्रुसूदन ।
मासादूर्ध्वं न जीविष्ये त्वया हीना नृपात्मज ॥ १० ॥
हे राजपुत्रा ! हे शत्रुसूदना ! तुमच्या प्रतीक्षेत एक महिनाभर मी कशीतरी जीव धरून राहीन. महिन्यानन्तर मात्र तुमच्या वाचून मी जिवन्त राहू शकणार नाही. ॥१०॥
घोरो राक्षसराजोऽयं दृष्टिश्च न सुखा मयि ।
त्वां च श्रुत्वा विषज्जन्तं न जीवेयमपि क्षणम् ॥ ११ ॥
हा राक्षसराज रावण अत्यन्त क्रूर आहे. माझ्यावर याची दृष्टीही चांगली नाही. तेव्हा इतके असून तुही आणखी इकडे येण्यास उशीर करीत आहात असे जर माझ्या कानावर आले, तर मी एक क्षणभरही जिवन्त राहू शकणार नाही." ॥११॥
वैदेह्या वचनं श्रुत्वा करुणं साश्रुभाषितम् ।
अथाब्रवीन्महातेजा हनुमान् मारुतात्मजः ॥ १२ ॥
डोळ्यामध्ये अश्रु आणून सीतेने केलेले हे दीन भाषण ऐकून महातेजस्वी पवनपुत्र हनुमान म्हणाले- ॥१२॥
त्वच्छोकविमुखो रामो देवि सत्येन ते शपे ।
रामे दुःखाभिभूते तु लक्ष्मणः परितप्यते ॥ १३ ॥
हे देवी ! मी तुला शपथपूर्वक खरे सांगतो की तुझ्या शोकामुळेच श्रीरामांची स्थिति अशी झाली आहे की ते सर्व कामापासून विमुख झाले आहेत. श्रीराम शोकातुर झाल्याने लक्ष्मण ही फार दुःखी झाले आहेत. ॥१३॥
दृष्टा कथंचिद् भवती न कालः परिदेवितुम् ।
इमं मुहूर्तं दुःखानामन्तं द्रक्ष्यसि भामिनि ॥ १४ ॥
परन्तु आता कसा कां होईना, तुझा शोध लागला आहे, तेव्हा आता शोक करण्याची वेळ उरलेली नाही. हे साध्वी ! या घटकेलाच तुझ्या सर्व दुःखाचा शेवट झालेला तू पहाशील. ॥१४॥
तावुभौ पुरुषव्याघ्रौ राजपुत्रावनिन्दितौ ।
त्वद्दर्शनकृतोत्साहौ लङ्‌कां भस्मीकरिष्यतः ॥ १५ ॥
निन्देला पात्र नसलेले ते दोन्ही पुरुषसिंह राजपुत्र बन्धु तुझ्या दर्शनाकरिता उत्सुक असल्यामुळे लङ्‌कापुरीला भस्म करून टाकतील. ॥१५॥
हत्वा तु समरे रक्षो रावणं सहबान्धवैः ।
राघवौ त्वां विशालाक्षि स्वां पुरीं प्रति नेष्यतः ॥ १६ ॥
हे विशाललोचने ! युद्धामध्ये राक्षसराज रावणाचा कुळासहित वध करून ते दोघे रघुवंशीय बन्धु तुला आपला राजधानीला (पुरीला) घेऊन जातील. ॥१६॥
यत्तु रामो विजानीयादभिज्ञानमनिन्दिते ।
प्रीतिसञ्जननं भूयः तस्य त्वं दातुमर्हसि ॥ १७ ॥
हे सती साध्वी देवी ! ज्याची श्रीरामाला चांगली ओळख पटेल आणि जी पाहिली असता त्यांच्या हृदयात प्रेम आणि प्रसन्नता यांचा संचार होईल, अशी आणखी एखाद्यी खूण तू रामाला दे." ॥१७॥
साब्रवीद् दत्तमेवाहो मयाभिज्ञानमुत्तमम् ।
एतदेव हि रामस्य दृष्ट्‍वा यत्‍नेन भूषणम् ॥ १८ ॥

श्रद्धेयं हनुमन् वाक्यं तव वीर भविष्यति ।
यावर सीता म्हणाली - "अरे ! मी उत्तमातही उत्तम अशी खूण दिलीच आहे. वीर हनुमान ! या आभूषणाला यत्‍नपूर्वक नीट अवलोकन केल्यावर श्रीरामांना तुझे सर्व बोलणे विश्वसनीय वाटेल." ॥१८ १/२॥
स तं मणिवरं गृह्य श्रीमान् प्लवगसत्तमः ॥ १९ ॥

प्रणम्य शिरसा देवीं गमनायोपचक्रमे ।
असे सीतेने सांगितल्यावर ते श्रेष्ठ मणिरत्‍न घेऊन तेजस्वी वानरश्रेष्ठ हनुमानांनी, सीतादेवीला मस्तक नमवून प्रणाम केला आणि ते तेथून जाण्यास उद्युक्त झाले. ॥१९ १/२॥
तमुत्पातकृतोत्साहमवेक्ष्य हरियूथपम् ॥ २० ॥

वर्धमानं महावेगमुवाच जनकात्मजा ।
अश्रुपूर्णमुखी दीना बाष्पगद्‌गगदया गिरा ॥ २१ ॥
तेव्हा उड्‍डाण करण्यास सिद्ध होऊन वृद्धिंगत होऊ लागलेल्या त्या महान वेगवान वानराधिपतीकडे पाहिल्यावर त्या दीन सीतेच्या मुखावर अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि कंठ दाटून आल्यामुळे अडखळत- अडखळत ती त्याला म्हणाली - ॥२०-२१॥
हनुमन् सिंहसङ्‌काशौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।
सुग्रीवं च सहामात्यं सर्वान् ब्रूया अनामयम् ॥ २२ ॥
"हे हनुमाना ! सिंहासारखे शूर बन्धु रामलक्ष्मण आणि अमात्यासहित सुग्रीव या सर्वांना तू माझ्या वतीने, माझे कुशल-मंगल सांग. ॥२२॥ "
यथा च स महाबाहुः मां तारयति राघवः ।
अस्माद्दुःखाम्बुसंरोधात् त्वं समाधातुमर्हसि ॥ २३ ॥
आणि ते महापराक्रमी राघव या दुःखसागरान्तून लवकर माझा उद्धार करतील, याप्रकारे तू त्यांना समजाव. ॥२३॥
इमं च तीव्रं मम शोकवेगं
रक्षोभिरेभिः परिभर्त्सनं च ।
ब्रूयास्तु रामस्य गतः समीपं
शिवश्च तेऽध्वास्तु हरिप्रवीर ॥ २४ ॥
वानरश्रेष्ठा ! तू श्रीरामाञ्जवळ गेल्यावर हा माझा तीव्र शोक आणि या राक्षसांकडून होत असलेली माझी निर्भत्सना तू त्यांना सांग. जा ! तुझा मार्ग सुखकर मंगलमय होवो." ॥२४॥
स राजपुत्र्या प्रतिवेदितार्थः
कपिः कृतार्थः परिहृष्टचेताः ।
अल्पावशेषं प्रसमीक्ष्य कार्यं
दिशं ह्युदिचीं मनसा जगाम ॥ २५ ॥
राजकुमारी सीतेचा याप्रमाणे अभिप्राय जाणल्यावर अन्तःकरणात अतिशय आनन्दित झालेले ते हनुमान, सीतेचा शोध लागल्यामुळे कृतार्थ झाले आणि राहिलेले कार्य अगदीच थोडे आहे, असे समजून त्यांनी उत्तरदिशेकडे जाण्याचे मनामध्ये आणले. ॥२५॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे चत्वारिंशः सर्गः ॥ ४० ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा चाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४०॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP