श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। सप्तषष्टितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामेण मौर्वीमारोप्य धनुषः पूरणे कृते तस्य भङ्गो, विश्वामित्राज्ञया जनकेन राजानं दशरथमाह्वयितुं मन्त्रीणां प्रेषणम् - श्रीरामाच्या द्वारा धनुर्भङ्ग तथा राजा जनकाने विश्वामित्रांच्या आज्ञेने राजा दशरथांना बोलाविण्यासाठी मंत्र्यांना धाडणे -
जनकस्य वचः श्रुत्वा विश्वामित्रो महामुनिः ।
धनुर्दर्शय रामाय इति होवाच पार्थिवम् ॥ १ ॥
जनकांचे हे कथन ऐकून महामुनि विश्वामित्र म्हणाले, "राजन् ! आपण श्रीरामाला आपले धनुष्य दाखवावे.' ॥ १ ॥
ततः स राजा जनकः सचिवान् व्यादिदेश ह ।
धनुरानीयतां दिव्यं गन्धमाल्यानुलेपनम् ॥ २ ॥
तेव्हां राजा जनकांनी मंत्र्यांना आज्ञा दिली - 'चन्दन आणि मालांनी सुशोभित ते दिव्य धनुष्य येथे घेऊन या.' ॥ २ ॥
जनकेन समादिष्टाः सचिवाः प्राविशन् पुरीम् ।
तद्धनुः पुरतः कृत्वा निर्जग्मुरमितौजसः ॥ ३ ॥
राजा जनकांची आज्ञा मिळताच ते अमित तेजस्वी मंत्री नगरात गेले आणि त्या धनुष्याला पुढे करून पुरोहित बाहेर निघाले. ॥ ३ ॥
नृणां शतानि पञ्चाशद् व्यायतानां महात्मनाम् ।
मञ्जूषामष्टचक्रां तां समूहुस्ते कथंचन ॥ ४ ॥
ते धनुष्य आठ चक्रे असलेल्या लोखंडाच्या फार मोठ्या पेटार्‍यांत ठेवलेले होते. त्याला नवतरुण पाच हजार महामनस्वी वीर कसेतरी ओढून तेथपर्यंत आणू शकले. ॥ ४ ॥
तामादाय सुमञ्जूषामायसीं यत्र तद्धनुः ।
सुरोपमं ते जनकमूचुर्नृपतिमन्त्रिणः ॥ ५ ॥
लोखंडाचा तो पेटारा, ज्यात धनुष्य ठेवलेले होते, तेथे आणून मंत्र्यांनी देवोपम राजा जनकांना म्हटले - ॥ ५ ॥
इदं धनुर्वरं राजन् पूजितं सर्वराजभिः ।
मिथिलाधिप राजेन्द्र दर्शनीयं यदीच्छसि ॥ ६ ॥
'राजन् ! मिथिलापति ! राजेंद्र ! हे समस्त राजांच्याद्वारे सन्मानित श्रेष्ठ धनुष्य आहे. जर आपण या दोन्ही राजकुमारांना दाखवू इच्छित असाल तर दाखवावे.' ॥ ६ ॥
तेषां नृपो वचः श्रुत्वा कृताञ्जलिरभाषत ।
विश्वामित्रं महात्मानं तावुभौ रामलक्ष्मणौ ॥ ७ ॥
त्यांचे म्हणणे ऐकून राजा जनकांनी हात जोडून महात्मा विश्वामित्र आणि दोन्ही भाऊ श्रीराम आणि लक्ष्मण यांना म्हटले - ॥ ७ ॥
इदं धनुर्वरं ब्रह्मञ्जनकैरभिपूजितम् ।
राजभिश्च महावीर्यैरशक्तैः पूरितं पुरा ॥ ८ ॥
'ब्रह्मन् ! हेच ते श्रेष्ठ धनुष्य आहे ज्याचे जनकवंशी नरेशांनी सदा पूजन केले आहे आणि जे याला उचलण्यास समर्थ झाले नाहीत त्या महापराक्रमी नरेशांनीही याचा पूर्वकाली सन्मान केलेला आहे. ॥ ८ ॥
नैतत् सुरगणाः सर्वे नासुरा न च राक्षसाः ।
गन्धर्वयक्षप्रवराः सकिन्नरमहोरगाः ॥ ९ ॥
याला समस्त देवता, असुर, राक्षस, गंधर्व, मोठमोठे यक्ष, किन्नर आणि महानागही चढवू शकले नाहीत. ॥ ९ ॥
क्व गतिर्मानुषाणां च धनुषोऽस्य प्रपूरणे ।
आरोपणे समायोगे वेपने तोलने तथा ॥ १० ॥
मग या धनुष्याला खेंचणे, चढवणे, याच्यावर बाण संधान करणे, ह्याच्या प्रत्यञ्चेवर टणत्कार करणे आणि याला उचलून इकडे तिकडे हलविण्याची शक्ति मनुष्यांत कोठून असणार आहे ? ॥ १० ॥
तदेतद् धनुषां श्रेष्ठमानीतं मुनिपुङ्‍गव ।
दर्शयैतन्महाभाग अनयो राजपुत्रयोः ॥ ११ ॥
'मुनिवर ! हे श्रेष्ठ धनुष्य येथे आणले गेले आहे. महाभाग ! आपण हे दोन्ही राजकुमारांना दाखवावे. ॥ ११ ॥
विश्वामित्रः सरामस्तु श्रुत्वा जनकभाषितम् ।
वत्स राम धनुः पश्य इति राघवमब्रवीत् ॥ १२ ॥
श्रीरामा सहित विश्वामित्रांनी जनकांचे हे कथन ऐकून राघवास म्हटले - 'वत्स राम ! हे धनुष्य पहा.' ॥ १२ ॥
महर्षेर्वचनाद् रामो यत्र तिष्ठति तद्धनुः ।
मञ्जूषां तामपावृत्य दृष्ट्‍वा धनुरथाब्रवीत् ॥ १३ ॥
महर्षिंच्या आज्ञेने रामांनी ज्यात धनुष्य होते तो पेटारा उघडून ते धनुष्य पाहिले आणि म्हटले - ॥ १३ ॥
इदं धनुर्वरं दिव्यं संस्पृशामीह पाणिना ।
यत्‍नवांश्च भविष्यामि तोलने पूरणेऽपि वा ॥ १४ ॥
'ठीक आहे. आता मी या दिव्य आणि श्रेष्ठ धनुष्यास हात लावतो. मी याला उचलण्याचा आणि चढविण्याचा प्रयत्‍न करीन.' ॥ १४ ॥
बाढमित्यब्रवीद् राजा मुनिश्च समभाषत ।
लीलया स धनुर्मध्ये जग्राह वचनान्मुनेः ॥ १५ ॥

पश्यतां नृसहस्राणां बहूनां रघुनन्दनः ।
आरोपयत् स धर्मात्मा सलीलमिव तद्धनुः ॥ १६ ॥
तेव्हां राजा आणि मुनींनी एकसुरात म्हटले, "हां, असेच करा.' मुनिंच्या आज्ञेने रघुनन्दनाने, धर्मात्मा श्रीरामाने त्या धनुष्याला मध्यभागी पकडून लीलेने उचलले आणि जणु खेळ करीत त्याच्यावर प्रत्यञ्चाही चढविली. त्या समयी कित्येक हजार मनुष्यांची दृष्टि त्यांच्याकडे लागलेली होती. ॥ १५-१६ ॥
आरोपयित्वा मौर्वीं च पूरयामास तद्धनुः ।
तद् बभञ्ज धनुर्मध्ये नरश्रेष्ठो महायशाः ॥ १७ ॥
प्रत्यञ्चा चढवून महायशस्वी नरश्रेष्ठ श्रीरामांनी जसे ते धनुष्य कानापर्यंत खेंचले तसे ते मधेच भंग झाले. ॥ १७ ॥
तस्य शब्दो महानासीन्निर्घातसमनिःस्वनः ।
भूमिकम्पश्च सुमहान् पर्वतस्येव दीर्यतः ॥ १८ ॥
तुटते समयी त्याचा वज्रपात झाल्याप्रमाणे फार मोठा आवाज झाला. असे वाटत होते जणु पर्वत विदीर्ण होत आहे. त्या समयी महान् भूकंप झाला. ॥ १८ ॥
निपेतुश्च नराः सर्वे तेन शब्देन मोहिताः ।
वर्जयित्वा मुनिवरं राजानं तौ च राघवौ ॥ १९ ॥
मुनिवर विश्वामित्र, राजा जनक आणि दोन्ही राघव - राम आणि लक्ष्मण सोडून शेष तेथे जितके म्हणून लोक उभे होते ते सर्व धनुष्य तुटण्याच्या त्या भयंकर शब्दाने, आवाजाने मूर्छित होऊन खाली पडले. ॥ १९ ॥
प्रत्याश्वस्ते जने तस्मिन् राजा विगतसाध्वसः ।
उवाच प्राञ्जलिर्वाक्यं वाक्यज्ञो मुनिपुङ्‍गवम् ॥ २० ॥
थोड्या वेळाने जेव्हां सर्व सावध झाले तेव्हां संभाषण कुशल आणि वाक्याचे मर्म जाणणार्‍या, निर्भय झालेल्या राजा जनकांनी हात जोडून विश्वामित्रांना म्हटले - ॥ २० ॥
भगवन् दृष्टवीर्यो मे रामो दशरथात्मजः ।
अत्यद्‍भुतमचिन्त्यं च अतर्कितमिदं मया ॥ २१ ॥
'भगवन् ! मी दशरथनन्दन रामाचा पराक्रम आज आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे. महादेवांचे धनुष्य चढविणे ही अत्यंत अद्‌भुत, अचिंत्य आणि अतर्क्य घटना आहे. ॥ २१ ॥
जनकानां कुले कीर्तिमाहरिष्यति मे सुता ।
सीता भर्तारमासाद्य रामं दशरथात्मजम् ॥ २२ ॥
माझी कन्या सीता, दशरथकुमार रामास पतिरूपात प्राप्त करून जनकवंशाच्या कीर्तिचा विस्तार करील. ॥ २२ ॥
मम सत्या प्रतिज्ञा च वीर्यशुल्केति कौशिक ।
सीता प्राणैर्बहुमता देया रामाय मे सुता ॥ २३ ॥
'कौशिक ! मी सीतेला वीर्यशुल्का म्हणून जी प्रतिज्ञा केली होती ती आज सत्य व सफल झाली आहे. सीता मला प्राणांहूनही अधिक प्रिय आहे. आपली ही कन्या मी रामाला समर्पित करीन. ॥ २३ ॥
भवतोऽनुमते ब्रह्मञ्शीघ्रं गच्छन्तु मन्त्रिणः ।
मम कौशिक भद्रं ते अयोध्यां त्वरिता रथैः ॥ २४ ॥

राजानं प्रश्रितैर्वाक्यैरानयन्तु पुरं मम ।
प्रदानं वीर्यशुल्कायाः कथयन्तु च सर्वशः ॥ २५ ॥
'ब्रह्मन् ! कौशिक ! आपले कल्याण होवो ! जर आपली आज्ञा असेल तर माझे मंत्री रथारूढ होऊन शीघ्रच मोठ्या वेगाने अयोध्येस जातील आणि विनययुक्त वचनांच्या द्वारे महाराज दशरथांना माझ्या नगरात घेऊन येतील. त्या बरोबरच येथील समाचार सांगून हे निवेदन करतील की जिच्यासाठी पराक्रमाचेच शुल्क नियत केले गेले होते त्या जनककुमारी सीतेचा विवाह श्रीरामचंद्रांच्या बरोबर होणार आहे. ॥ २४-२५ ॥
मुनिगुप्तौ च काकुत्स्थौ कथयन्तु नृपाय वै ।
प्रीतियुक्तं तु राजानमानयन्तु सुशीघ्रगाः ॥ २६ ॥
हे लोक महाराज दशरथांना हेही सांगतील की आपले दोन्ही पुत्र श्रीराम आणि लक्ष्मण विश्वामित्रांच्या द्वारा सुरक्षित होऊन मिथिलेत पोहोंचले आहेत. या प्रकारे प्रीतियुक्त झालेल्या दशरथांना हे शीघ्रगामी सचीव लवकरच येथे बोलावून आणतील.' ॥ २६ ॥
कौशिकस्तु तथेत्याह राजा चाभाष्य मन्त्रिणः ।
अयोध्यां प्रेषयामास धर्मात्मा कृतशासनान् ।
यथावृत्तं समाख्यातुमानेतुं च नृपं तथा ॥ २७ ॥
विश्वामित्रांनी 'तथास्तु' म्हणून राजाच्या म्हणण्याचे समर्थन केले. तेव्हां धर्मात्मा राजा जनकांनी आपल्या आज्ञेचे पालन करणार्‍या मंत्र्यांना समज देऊन येथील समाचार यथायोग्यपणे महाराज दशरथांना सांगण्यासाठी आणि त्यांना मिथिलापुरीत घेऊन येण्यासाठी आज्ञा दिली. ॥ २७ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे सप्तषष्टितमः सर्गः ॥ ६७ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा सदुसष्टावा सर्ग समाप्त झाला. ॥ ६७ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP