[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ द्वादश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
सीतामरणशङ्‌कया हनुमतः शैथिल्यं पुनरुत्साहमवलम्ब्य स्थानान्तरेषु तेन तस्या अन्वेषणं कुत्रापि तामनवाप्य तस्य पुनश्चिन्ता च -
सीतेच्या मरणाच्या शंकेने हनुमन्तांचे गर्भगळित होणे, परत उत्साहाचा आश्रय घेऊन अन्य स्थानी तिचा शोध घेणे आणि कुठेही पत्ता न लागल्यामुळे पुन्हा चिन्तित होणे -
स तस्य मध्ये भवनस्य संस्थितो
लतागृहांश्चित्रगृहान् निशागृहान् ।
जगाम सीतां प्रति दर्शनोत्सुको
न चैव तां पश्यति चारुदर्शनाम् ॥ १ ॥
त्या राजभवनाच्या आत असलेले हनुमान सीतेला पाहण्याविषयी अत्यन्त उत्सुक झाले होते. यानन्तर ते क्रमश: लता मण्डप, चित्रशाळा आणि रात्री ज्यामध्ये वस्ती करण्यात येते अशा विश्राम गृहातही गेले परन्तु तेथेही त्यांना परम सुन्दर मनोहर अशा सीतेचे दर्शन झाले नाही. ॥१॥
स चिन्तयामास ततो महाकपिः
प्रियामपश्यन् रघुनन्दनस्य ताम् ।
ध्रुवं हि सीता ध्रियते यथा न मे
विचिन्वतो दर्शनमेति मैथिली ॥ २ ॥
या प्रमाणे रघुनन्दन श्रीरामांची प्रियतमा सीता जेव्हा त्यांस कोठे दिसली नाही तेव्हा ते महाकपि हनुमान या प्रकारे चिन्ता करू लागले. निश्चित आता मिथिलेश कुमारी सीता जीवित नाही आणि म्हणूनच इतका शोध घेऊनही ती माझ्या दृष्टीपथास येत नाही. ॥२॥
सा राक्षसानां प्रवरेण जानकी
स्वशीलसंरक्षणतत्परा सती ।
अनेन नूनं प्रति दुष्टकर्मणा
हता भवेदार्यपथे परे स्थिता ॥ ३ ॥
सती साध्वी उत्तम पतिव्रत्यमार्गाचे अवलंबन करणारी आणि आपल्या शील आणि सदाचाराचे रक्षण करण्याविषयी तत्पर असल्याने, नक्कीच या दुष्ट दुराचारी राक्षसराजाने तिला मारून टाकली असावी. ॥३॥
विरूपरूपा विकृता विवर्चसो
महानना दीर्घविरूपदर्शनाः ।
समीक्ष्य सा राक्षसराजयोषितो
भयाद् विनष्टा जनकेश्वरात्मजा ॥ ४ ॥
राक्षसराज रावणाच्या येथे ज्या दास्यकर्म करणार्‍या राक्षसी आहेत त्यांचे रूप अत्यन्त बेडौल आहे. त्या अत्यन्त विकट आणि विकराळ आहेत. त्यांची कान्ति भयंकर असून, मुख विशाल असून, डोळे मोठे मोठे आणि भयानक आहेत. त्या सर्वांना पाहून जनकनन्दिनीने भयाने प्राण त्याग केला असावा. ॥४॥
सीतामदृष्ट्‍वा ह्यनवाप्य पौरुषं
विहृत्य कालं सह वानरैश्चिरम् ।
न मेऽस्ति सुग्रीवसमीपगा गति:
सुतीक्ष्णदण्डो बलवांश्च वानरः ॥ ५ ॥
सीतेचे दर्शन न झाल्याने मला माझ्या पुरूषार्थाचे फळही प्राप्त होत नाही आहे. इकडे वानरांच्या बरोबर सुदीर्घ काळपर्यत इकडे-तिकडे भ्रमण करून मी परत जाण्याच्या अवधीचे कधीच उल्लंघन केले आहे. त्यामुळे आता माझा सुग्रीवाजवळ परत जाण्याचा मार्गही बन्द झाला आहे कारण की तो वानर अत्यन्त बलवान आणि अत्यन्त कठोर दण्ड देणारा आहे. ॥५॥
दृष्टमन्तःपुरं सर्वं दृष्टा रावणयोषितः ।
न सीता दृश्यते साध्वी वृथा जातो मम श्रमः ॥ ६ ॥
मी रावणाचे सर्व अन्त:पुर शोधून पाहिले, एकेक करून रावणाच्या सर्व स्त्रियांनाही मी पाहिले परन्तु आत्तापर्यन्त साध्वी सीतेचे दर्शन मात्र मला झाले नाही. त्यामुळे समुद्र उल्लंघनाचे माझे सर्व परिश्रम व्यर्थ झाले आहेत. ॥६॥
किं नु मां वानराः सर्वे गतं वक्ष्यन्ति सङ्‌गताः ।
गत्वा तत्र त्वया वीर किं कृतं तद् वदस्व न: ॥ ७ ॥
जेव्हां मी परत जाईन तेव्हा सर्व वानर मिळून मला काय बरे म्हणतील ? ते जेव्हां विचारतील कि हे वीरा ! तेथे जाऊन तूं काय काय केलेस ते आम्हांला सांग. ॥७॥
अदृष्ट्‍वा किं प्रवक्ष्यामि तामहं जनकात्मजाम् ।
ध्रुवं प्रायमुपासिष्ये कालस्य व्यतिवर्तने ॥ ८ ॥
परन्तु जनकनन्दिनी सीतेला न पहाता मी त्यांना काय उत्तर देऊ ? सुग्रीवाने निश्चित केलेल्या समयाचे उल्लंघन केल्याने आता तर मी निश्चित आमरण उपोषणच करीन. ॥८॥
किं वा वक्ष्यति वृद्धश्च जाम्बवानङ्‌गदश्च सः ।
गतं पारं समुद्रस्य वानराश्च समागताः ॥ ९ ॥
वृद्ध आणि थोर जाम्बवान आणि युवराज अंगद मला काय बरे म्हणतील ? समुद्र पार करून गेल्यावर अन्य वानरही जेव्हा मला भेटतील तेव्हा तेही काय म्हणतील ? ॥९॥
अनिर्वेदः श्रियो मूलं अनिर्वेदः परं सुखम् ।
भूयस्तत्र विचेष्यामि न यत्र विचयः कृतः ॥ १० ॥
उत्साहच परम सुखाचा हेतु आहे. म्हणून मी पुन्हा त्या स्थानी सीतेचा शोध करीन, जेथे आतापर्यन्त लक्ष (अनुसन्धान) दिले गेले नव्हते. ॥१०॥
अनिर्वेदो हि सततं सर्वार्थेषु प्रवर्तकः ।
करोति सफलं जन्तोः कर्म यच्च करोति सः ॥ ११ ॥
(या प्रकारे थोडा वेळ हताश होऊन बसल्यावर हनुमन्तांनी परत विचार केला की) हताश न होता उत्साह टिकवून धरणे हेच संपत्तीचे मूळ कारण असते. उत्साहच प्राण्यांना सदा सर्वदा सर्व प्रकारच्या कर्मात प्रवृत्त करीत असतो, आणि उत्साहच त्यांना जे काही कार्य करीत असतील त्यात सफलता प्रदान करतो. ॥११॥
तस्मादनिर्वेदकरं यत्‍नं चेष्टेऽहमुत्तमम् ।
अदृष्टांश्च विचेष्यामि देशान् रावणपालितान् ॥ १२ ॥
म्हणून आता मी अधिकच उत्तम आणि उत्साहपूर्ण प्रयत्‍नासाठी प्रवृत्त होईन. रावणद्वारा सुरक्षित अशी अनेक स्थाने मी पाहीन आणि तेथेही शोध घेईन. ॥१२॥
आपानशाला विचितास्तथा पुष्पगृहाणि च ।
चित्रशालाश्च विचिता भूयः क्रीडागृहाणि च ॥ १३ ॥

निष्कुटान्तररथ्याश्च विमानानि च सर्वशः ।
इति संचिन्त्य भूयोऽपि विचेतुमुपचक्रमे ॥ १४ ॥
अपानशाळा, पुष्पगृह, चित्रशाळा, क्रीडागृह, गृहोद्यानाच्या गल्ल्या, पुष्पक आदि विमाने यान्तील तर मी कानाकोपर्‍यान्तून शोध घेतला आहे. 'आता अन्यत्र शोध घेईन' असा विचार करून जेथे आतापर्यत शोध घेतला नव्हता तेथे त्यांनी पुन्हा शोध घेण्यास आरंभ केला. ॥१३-१४॥
भूमीगृहांश्चैत्यगृहान् गृहातिगृहकानपि ।
उत्पतन् निष्पतंश्चापि तिष्ठन् गच्छन् पुनः क्वचित् ॥ १५ ॥
ते तळघरे, भुयारे, चव्हाट्यावर बनविलेले मंडप आणि घरांना ओलांडून त्यांच्या थोड्या अन्तरावर बनविलेल्या विलास-भवनात सीतेचा शोध करू लागले. ते एखाद्या घरावर चढून जात तर दुसर्‍या एखाद्या घरावरून खाली उडी मारीत, काही ठिकाणी ते तर काही स्थानांचे जाता जातांच निरीक्षण करीत. ॥१५॥
अपवृण्वंश्च द्वाराणि कवाटान्यवघट्टयन् ।
प्रविशन् निष्पतंश्चापि प्रपतन्नुत्पतन्निव ॥ १६ ॥
काही घरांचे दरवाजे ते उघडून टाकीत तर काही दरवाजे ते बन्द करून टाकीत, काही घरान्त घुसून ते आत नजर टाकीत आणि परत तेथून बाहेर येत. ते पडत-उठत-उड्या मारत, सर्वत्र शोधू लागले. ॥१६॥
सर्वमप्यवकाशं स विचचार महाकपिः ।
चतुरङ्‌गुलमात्रोऽपि नावकाशः स विद्यते ।
रावणान्तःपुरे तस्मिन् यं कपिर्न जगाम सः ॥ १७ ॥
त्या महाकपींनी तेथील सर्व स्थानात विचरण केले. रावणाच्या अन्त:पुरात अशी चार अंगुले जागाही शिल्लक राहिली नाही कि जेथे कपिश्रेष्ठ हनुमान पोहोचले नाहीत. ॥१७॥
प्राकारान्तरवीथ्यश्च वेदिकाश्चैत्यसंश्रयाः ।
श्वभ्राश्च पुष्करिण्यश्च सर्वं तेनावलोकितम् ॥ १८ ॥
त्यांनी प्राकारातील (तटबन्दीच्या आतील) सर्व गल्ल्या, छोटे मोठे रस्ते, चौकातील वृक्षांच्या खाली बनविलेल्या वेदी अथवा चबुतरे आणि पुष्करिणी आदि सर्व ठिकाणी शोध घेतला. ॥१८॥
राक्षस्यो विविधाकारा विरूपा विकृतास्तथा ।
दृष्टा हनुमता तत्र न तु सा जनकात्मजा ॥ १९ ॥
हनुमन्तांनी ठिकठिकाणी नाना प्रकारची ठेवण असलेल्या कुरूप आणि विकट राक्षसींना पाहिले, परन्तु तेथे त्यांना जानकीचे दर्शन झाले नाही. ॥१९॥
रूपेणाप्रतिमा लोके वरा विद्याधरस्त्रियः ।
दृष्टा हनुमता तत्र न तु राघवनन्दिनी ॥ २० ॥
जगान्त ज्यांच्या रूप-सौन्दर्याची तुलना होऊ शकत नाही अशा अनेक विद्याधर स्त्रिया हनुमन्तांच्या दृष्टीस पडल्या पण राघवाला आनन्द देणारी राघवनन्दिनी सीता त्यांना तेथे दिसली नाही. ॥२०॥
नागकन्या वरारोहाः पूर्णचन्द्रनिभाननाः ।
दृष्टा हनुमता तत्र न तु सा जनकात्मजा ॥ २१॥
तेथे हनुमन्तानी सुन्दर नितम्ब आणि पूर्णचन्द्रा सारखे मनोहर मुख असलेल्या अनेक नागकन्याही पाहिल्या परन्तु जनककिशोरी सीतेचे दर्शन त्यांना झाले नाही. ॥२१॥
प्रमथ्य राक्षसेन्द्रेण नागकन्या बलाद्धृताः ।
दृष्टा हनुमता तत्र न सा जनकनन्दिनी ॥ २२ ॥
राक्षसराजाने नागसेनेचे मन्थन करून बळेच अपहरण करून आणलेल्या नागकन्यांना तर हनुमन्तानी पाहिले परन्तु जनकनन्दिनी सीता त्यांच्या दृष्टीस पडली नाही. ॥२२॥
सोऽपश्यंस्तां महाबाहुः पश्यंश्चान्या वरस्त्रियः ।
विषसाद महाबाहुर्हनुमान् मारुतात्मजः ॥ २३ ॥
महाबाहु मारूती हनुमन्तास तेथे दुसर्‍या अनेक स्त्रिया दृष्टीस पडल्या पण सीता दृष्टीस पडली नाही, त्यामुळे ते बुद्धिमान कपि क्षणभर काही काळ अत्यन्त दु:खी झाले. ॥२३॥
उद्योगं वानरेन्द्राणां प्लवनं सागरस्य च ।
व्यर्थं वीक्ष्यानिलसुतश्चिन्तां पुनरुपागमत् ॥ २४ ॥
त्या वानर शिरोमणी वीरांचे प्रयत्‍न (उद्योग) आणि आपल्या द्वारा केले गेलेले समुद्रोल्लंघन व्यर्थ झालेले पाहून पवनपुत्र हनुमान पुन्हा अत्यन्त चिन्ताग्रस्त झाले. ॥२४॥
अवतीर्य विमानाच्च हनुमान् मारुतात्मजः ।
चिन्तामुपजगामाथ शोकोपहतचेतनः ॥ २५ ॥
त्यावेळी मारूतात्मज हनुमान विमानातून खाली उतरून आले आणि अत्यन्त चिन्तित झाले. शोकामुळे त्यांची चेतनाशक्ती शिथिल पडली. ॥२५॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये सुन्दरकाण्डे द्वादशः सर्गः ।
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा बारावा सर्ग पूरा झाला. ॥१२॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP