॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ अरण्यकाण्ड ॥

॥ चतुर्थः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]पंचवटीत निवास आणि लक्ष्मणाला उपदेश -


श्री महादेव उवाच
मार्गे व्रजन्ददर्शाथ शैलशृङ्‌गमिव स्थितम् ।
वृद्ध जटायुषं रामः किमेतदिति विस्मितः ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, नंतर मार्गाने जाताना, पर्वत शिखराप्रमाणे प्रचंड असणारा वृद्ध जटायू रामांना दिसला. आणि 'हे काय आहे ?' असा विस्मय त्यांना वाटला. (१)

धनुरानय सौमित्रे राक्षसोऽयं पुरः स्थितः ।
इत्याह लक्ष्मणं रामो हनिष्याम्यृषिभक्षकम् ॥ २ ॥
तेव्हा श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, "अरे लक्ष्मणा, माझे धनुष्य आण. हा कोणीतरी राक्षस पुढे ठाकला आहे. ऋषींना भक्षण करणार्‍या या दुष्टाला मी ठार करतो." (२)

तत्छ्रुत्वा रामवचनं गृध्रराड्भयपीडितः ।
वधार्होऽहं न ते राम पितुस्तेऽहं प्रियः सखा ॥ ३ ॥
जटायुर्नाम भद्रं ते गृध्रोऽहं प्रियकृत्तव ॥ ४ ॥
श्रीरामांचे ते वचन ऐकून तो गिधाडांचा राजा जटायू भयाने व्यथित होऊन म्हणाला, "अरे रामा, तू मला मारू नकोस. मी तुझ्या पित्याचा प्रिय मित्र जटायू नावाचा गृध्र आहे. मी तुझे हित करणारा आहे. तुझे कल्याण असो. (३-४)

पञ्चवट्यामहं वत्स्ये तवैव प्रियकाम्यया ।
मृगयायां कदाचित्तु प्रयाते लक्ष्मणेऽपि च ॥ ५ ॥
सीता जनककन्या मे रक्षितव्या प्रयत्‍नतः ।
श्रुत्वा तद्‍गृध्रवचनं रामः सस्नेहमब्रवीत् ॥ ६ ॥
तुझे प्रिय करण्याच्या इच्छेने मी या पंचवटीजवळ राहात आहे. क धी तू आणि लक्ष्मणसुद्धा मृगया करण्यास गेला असता मी काळजीपूर्वक जनककन्येचे रक्षण करीन. गृध्राचे ते वचन ऐकून श्रीरामचंद्रांनी स्नेहपूर्वक म्हटले. (५-६)

साधु गृध्र महाराज तथैव कुरु मे प्रियम् ।
अत्रैव मे समीपस्थो नातिदूरे वने वसन् ॥ ७ ॥
"हे गृध्र महाराज, तुमचे म्हणणे योग्य आहे. येथे या वनातच म्हणण्यापमाझ्या सन्निध राहून, तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हांला आवडेल ते करा." (७)

इत्यामंत्रितमालिङ्‌ग्य ययौ पञ्चवटीं प्रभुः ।
लक्ष्मणेन सह भ्रात्रा सीतया रघुनन्दनः ॥ ८ ॥
अशा प्रकारे आपली संमती देऊन व त्याला आलिंगन देऊन, प्रभू रघुनंदन लक्ष्मण व सीता यांच्यासह पंचवटीकडे निघाले. (८)

गत्वा ते गौतमीतीरं पञ्चवट्यां सुविस्तरम् ।
मन्दिरं कारयामास लक्ष्मणेन सुबुद्धिना ॥ ९ ॥
ते सर्वजण गौतमी नदीच्या तटावर गेले. तेथे बुद्धिमान लेक्ष्मणाने पंचवटीमध्ये एक फार विस्तृत आश्रम बनविला. (९)

तत्र ते न्यवसन्सर्वे गङ्‌गाया उत्तरे तटे ।
कदम्बपनसाम्रादिफलवृक्षसमाकुले ॥ १० ॥
विविक्ते जनसंबाधवर्जिते नीरुजस्थले ।
विनोदयन् जनकजां लक्ष्मणेन विपश्चिता ॥ ११ ॥
अध्युवास सुखं रामो देवलोक इवापरः ।
कन्दमूलफलादीनि लक्ष्मणोऽनुदिनं तयोः ॥ १२ ॥
आनीय प्रददौ राम सेवातत्परमानसः ।
धनुर्बाणधरो नित्यं रात्रौ जागर्ति सर्वतः ॥ १३ ॥
तेथे गंगेच्या उत्तर तीरावर कदंब, फणस, आम्र इत्यादी फळांच्या वृक्षांनी भरलेल्या, लोकांच्या संपर्काने रहित असणार्‍या, रोगरहित व एकांत स्थानी ते सर्व जण राहू लागले. बुद्धिमान लक्ष्मणासह, जनकात्मजा सीतेचे मनोरंजन करीत श्रीराम हे देवलोकाप्रमाणे असणार्‍या त्या रथानात दुसर्‍या इंद्राप्रमाणे सुखाने राहू लागले. रामांची सेवा करण्यास ज्याचे मन तत्पर होते असा लक्ष्मण दररोज कंद, मुळे, फळे इत्यादी आणून ती त्या दोघांना देत असे. आणि रात्री धनुष्य व बाण धारण करून तो सर्व प्रकारे नित्य पहारा करीत असे. (१०-१३)

स्नानं कुर्वन्त्यनुदिनं त्रयस्ते गौतमीजले ।
उभयोर्मध्यगा सीता कुरुते च गमागमौ ॥ १४ ॥
ते तिघेही प्रत्येक दिवशी गौतमी नदीच्या पाण्यात स्नान करीत. त्या वेळी त्या दोघांच्या मध्ये राहून सीता ये-जा करी. (१४)

आनीय सलिलं नित्यं लक्ष्मणः प्रीतमानसः ।
सेवितेऽहरहः प्रीत्या एवमासन् सुखं त्रयः ॥ १५ ॥
लक्ष्मण नेहमी पाणी आणावयाचे काम करी व आनंदित मनाने दररोज भक्तीनेच त्यांची सेवा करीत असे. अशा प्रकारे ती तिघे सुखाने राहू लागली. (१५)

एकदा लक्ष्मणो राममेकान्ते समुपस्थितम् ।
विनयावनतो भूत्वा पप्रच्छ परमेश्वरम् ॥ १६ ॥
एकदा एकांतात असणार्‍या श्रीरामांजवळ जाऊन आणि विनयाने नम्र होऊन लक्ष्मणाने परमेश्वर अशा श्रीरामांना विचारले. (१६)

भगवन् श्रोतुमिच्छामि मोक्षस्यैकान्तिकीं गतिम् ।
त्वत्तः कमलपत्राक्ष संक्षेपाद्वक्तुमर्हसि ॥ १७ ॥
"हे भगवन राम, तुमच्याकडून मोक्षाचे ऐकांतिक साधन मी ऐकू इच्छित आहे. कमलनयन असणार्‍या हे रामा, ते तुम्ही मला संक्षेपाने सांगा. (१७)

ज्ञानं विज्ञानसहितं भक्तिवैराग्यबृंहितम् ।
आचक्ष्व मे रघुश्रेष्ठ वक्ता नान्योऽस्ति भूतले ॥ १८ ॥
हे रघुश्रेष्ठा, भक्ती आणि वैराग्य यांनी युक्त असणारे विज्ञानासहित ज्ञान तुम्ही मला सांगा. या भूतलावर तुमच्याखेरीज अन्य कोणीही या विषयाचा उपदेश करणारा नाही." (१८)

श्रीराम उवाच
शृणु वक्ष्यामि ते वत्स गुह्याद्‌गुह्यतरं परम् ।
यद्विज्ञाय नरो जह्यात्सद्यो वैकल्पकं भ्रमम् ॥ १९ ॥
श्रीराम म्हणाले- "वत्सा, ऐक. गुह्यापेक्षा श्रेष्ठ गुह्य मी तुला सांगेन. ते जाणल्यावर माणूस विकल्प- जनित संसाररूपी भ्रम ताबडतोब टाकून देतो. (१९)

आदौ मायास्वरूपं ते वक्ष्यामि तदनन्तरम् ।
ज्ञानस्य साधनं पश्चाज्ज्ञानं विज्ञानसंयुतम् ॥ २० ॥
ज्ञेयं च परमात्मानं यज्ज्ञात्वा मुच्यते भयात् ।
अनात्मनि शरीरादावात्मबुद्धिस्तु या भवेत् ॥ २१ ॥
सैव माया तयैवासौ संसारः परिकल्प्यते ।
रूपे द्वे निश्चिते पूर्वे मायायाः कुलनन्दन ॥ २२ ॥
प्रथम मी तुला मायेचे स्वरूप सांगतो. त्यानंतर ज्ञानाचे साधन सांगतो आणि त्यानंतर विज्ञानाने युक्त असे ज्ञान सांगतो. त्याखेरीज ज्ञेय अशा परमात्म्याचे स्वरूप मी सांगतो. ते सर्व जाणल्यावर मनुष्य हा संसाराच्या भीतीपासून मुक्त होऊन जातो. आत्मा नसणार्‍या अशा शरीर इत्यादी पदार्थाच्या ठिकाणी ते आत्मा आहेत अशी जी बुद्धी होते तीच माया होय. तिच्यामुळेच हा विश्वप्रपंच कल्पिला जातो. हे कुलनंदना, प्रथमतः मायेची दोन रूपे आहेत, असे मानले आहे. (२०-२२)

विक्षेपावरणे तत्र प्रथमं कल्पयेज्जगत् ।
लिङ्‌गाद्याब्रह्मपर्यन्तं स्थूलसूक्ष्मविभेदतः ॥ २३ ॥
विक्षेप आणि आवरण अशी मायेची दोन रूपे आहेत. त्यांतील पहिले रूप म्हणजे विक्षेप हे लिंगापासून-महत्तत्त्वापासून-ते थेट ब्रह्मदेवापर्यंत स्थल आणि सूक्ष्म या भेदांसह जगाची कल्पना करते. (२३)

अपरं त्वखिलं ज्ञानरूपमावृत्य तिष्ठति ।
मायया कल्पितं विश्वं परमात्मनि केवले ॥ २४ ॥
रज्जौ भुजङ्‌गवद् भ्रान्त्या विचारे नास्ति किञ्चन ।
श्रूयते दृश्यते यद्यत्स्मर्यते वा नरैः सदा ॥२५ ॥
असदेव हि तत्सर्वं यथा स्वप्नमनोरथौ ।
देह एव हि संसारवृक्षमूलं दृढं स्मृतम् ॥ २६ ॥
मायेचे दुसरे (आवरण हे) रूप, संपूर्ण ज्ञानावर आवरण टाकते. ज्या प्रमाणे भ्रांतीमुळे रज्जूचे ठिकाणी भुजंग कल्पिला जातो, त्या प्रमाणे केवळ शुद्ध अशा परमात्म्यावर हे विश्व मायेने कल्पिलेले आहे. विचार केला असता हे काहीही नाही, असे कळून येते. या जगात माणसे जे जे नेहमी ऐकतात, पाहातात अथवा स्मरण करतात, ते ते सर्व स्वप्न किंवा मनोरथ यांसारखे संपूर्णपणे असत् व अविद्यमान आहे. देह हाच या संसाररूपी वृक्षाचे बळकट मूळ आहे, असे म्हटले जाते. (२४-२६)

तन्मूलः पुत्रदारादिबन्धः किं तेऽन्यथात्मनः ॥ २७ ॥
या देहामुळेच पुत्र, पत्‍नी इत्यादी बंधन येते. तसे नसते तर त्यांचा आत्म्याशी काय संबंध आहे ? (२७)

देहस्तु स्थूलभूतानां पञ्च तन्मात्रपञ्चकम् ।
अहंकारश्च बुद्धिश्च इन्द्रियाणि तथा दश ॥ २८ ॥
चिदाभासो मनश्चैव मूलप्रकृतिरेव च ।
एतत्क्षेत्रमिति ज्ञेयं देह इत्यभिधीयते ॥ २९ ॥
पाच स्थूल भूते, पाच तन्मात्रा, अहंकार, बुद्धी, दहा इंद्रिये, चिदाभास आणि मन तसेच मूल प्रकृती हे सर्व मिळून क्षेत्र बनते, असे जाणावे. हे क्षेत्र म्हणजेच देह असे म्हटले जाते. (२८-२९)

एतैर्विलक्षणो जीवः परमात्मा निरामयः ।
तस्य जीवस्य विज्ञाने साधनान्यपि मे शृणु ॥ ३० ॥
निर्दोष असा परमात्मरूप जीव या सर्वांपेक्षा भिन्न आहे. त्या जीवाचे ज्ञान होण्यासाठी जी काही साधने आहेत तीसुद्धा मी तुला सांगतो. ती तू ऐक. (३०)

जीवश्च परमात्मा च पर्यायो नात्र भेदधीः ।
मानाभावस्तथा दम्भहिंसादिपरिवर्जनम् ॥ ३१ ॥
पराक्षेपादिसहनं सर्वत्रावक्रता तथा ।
मनोवाक्कायसद्‌भक्त्या सद्‍गुरोः परिसेवनम् ॥ ३२ ॥
बाह्याभ्यन्तरसंशुद्धिः स्थिरता सत्क्रियादिषु ।
मनोवाक्कायदण्डश्च विषयेषु निरीहता ॥ ३३ ॥
निरहङ्‌कारता जन्म जराद्यालोचनं तथा ।
असक्तिः स्नेहशून्यत्वं पुत्रदारधनादिषु ॥ ३४ ॥
इष्टानिष्टगमे नित्यं चित्तस्य समता तथा ।
मयि सर्वात्मके रामे ह्यनन्यविषया मतिः ॥ ३५ ॥
जनसम्बाधरहितशुद्धदेशनिषेवणम् ।
प्राकृतैर्जनसङ्‌घैश्च ह्यरतिः सर्वदा भवेत् ॥ ३६ ॥
आत्मज्ञाने सदोद्योगो वेदान्तार्थावलोकनम् ।
उक्तैरेतैर्भवेज्ज्ञानं विपरीतैर्विपर्ययः ॥ ३७ ॥
जीव आणि परमात्मा हे शब्द पर्यायवाचक आहेत. म्हणून त्यांचे बाबतीत ते भिन्न आहेत असे मानू नये. (आता ज्ञानाची साधने ऐकः) अभिमानाचा अभाव, दंभ, हिंसा इत्यादींचा त्याग; दुसर्‍याने केलेली निंदा सहन करणे; सर्व बाबतीत सरळपणा, मन, वाणी आणि शरीर यांचे द्वारा उत्तम भक्तीने सद्‌गुरुसेवा; बाह्य व आंतरशुद्धी; सत्कर्म करण्यात स्थिरता राखणे; मन, वाणी व शरीर यांचा संयम; विषयांच्या ठिकाणी इच्छा नसणे; अहंकाररहित असणे; जन्म, जरा इत्यादीमुळे होणार्‍या दुःखांचा विचार; पुत्र, पत्‍नी, धन इत्यादींचे ठिकाणी आसक्तीचा आणि प्रेमाचा अभाव; इष्ट किंवा अनिष्ट गोष्टी प्राप्त झाल्या असता नेहमी चित्त सम ठेवणे; सर्वात्मक अशा माझ्या-रामाच्या ठिकाणी अनन्य भक्ती; जनसंपर्काने रहित अशा पवित्र स्थानी वास्तव्य; सामान्य संसारी लोकसमाजाविषयी सर्वदा नावड बाळगणे; आत्मज्ञानाचे प्राप्तीसाठी नेहमी प्रयत्‍न करणे; वेदान्ताच्या अर्थाचा विचार - या आता सांगितलेल्या साधनांनी ज्ञान प्राप्त होईल. यांच्याविरुद्ध असणार्‍या गोष्टींनी ज्ञानाच्या उलट फळ म्हणजे अज्ञान प्राप्त होते. (३१-३७)

बुद्धिप्राणमनोदेहाहंकृतिभ्यो विलक्षणः ।
चिदात्माहं नित्यशुद्धो बुद्ध एवेति निश्चयम् ॥ ३८ ॥
येन ज्ञानेन संवित्ते तज्ज्ञानं निश्चितं च मे ।
विज्ञानं च तदैवैतत्साक्षादनुभवेद्यदा ॥ ३९ ॥
बुद्धी, प्राण, मन, देह आणि अहंकार यांच्यापेक्षा वेगळा असणारा, नित्य शुद्ध-बुद्ध असा चैतन्यरूप आत्मा मीच आहे, असा निश्चय ज्या ज्ञानाच्या योगाने माणसाला अनुभवास येतो, ते ज्ञान होय, असे माझे निश्चित मत आहे. आणि जेव्हा या ज्ञानाचा साक्षात अनुभव माणसाला येईल तेव्हा ते ज्ञानच विज्ञान होते. (३८-३९)

आत्मा सर्वत्र पूर्णः स्याच्चिदानन्दात्मकोऽव्ययः ।
बुद्ध्याद्युपाधिरहितः परिणामादिवर्जितः ॥ ४० ॥
आत्मा हा सर्वत्र पूर्ण चिदानंद स्वरूपी, अविनाशी, बुद्धी इत्यादी उपाधींनी तसेच विकार इत्यादींनी रहित आहे. (४०)

स्वप्रकाशेन देहादीन् भासयन्ननपावृतः ।
एक एवाद्वितीयश्च सत्यज्ञानादिलक्षणः ॥ ४१ ॥
असङ्‌गः स्वप्रभो द्रष्टा विज्ञानेनावगम्यते ।
आचार्यशास्त्रोपदेशादैक्यज्ञानं यदा भवेत् ॥ ४२ ॥
आत्मनोर्जीवपरयोर्मूलाविद्या तदैव हि ।
लीयते कार्यकरणैः सहैव परमात्मनि ॥ ४३ ॥
तो आत्मा स्वतःच्या प्रकाशाने देह इत्यादींना प्रकाशित करतो; तो स्वतः आवरणरहित आहे. तो एकच, अद्वितीय, आणि सत्य ज्ञान इत्यादी स्वरूप असणारा आहे. तो आत्मा संगरहित, स्वयंप्रकाशी, साक्षी आहे, हे विज्ञानाने कळून येते. आचार्य व शास्त्र यांच्या उपदेशाने जेव्हा जीवात्मा आणि परमात्मा यांच्या एकत्त्वाचे ज्ञान होते, तेव्हाच मूलाविद्या ही स्वतःचे शरीर इत्यादी कार्य आणि इंद्रिये ही करणे यांच्यासह परमात्म्यामध्ये लीन होऊन जाते. (४१-४३)

सावस्था मुक्तिरित्युक्ता ह्युपचारोऽयमात्मनि ।
इदं मोक्षस्वरूपं ते कथितं रघुनन्दन ॥ ४४ ॥
ज्ञानविज्ञानवैराग्य सहितं मे परात्मनः ।
किन्त्वेतद्दुर्लभं मन्ये मद्‌भक्तिविमुखात्मनाम् ॥ ४५ ॥
परमात्म्यामध्ये मूल अविद्येचा लय ही अवस्था म्हणजे मुक्ती असे म्हटले जाते. हा मोक्ष म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी केवळ उपचार होय. (कारण आत्मा हा सदा मुक्तच आहे. त्याची मुक्त अवस्था ही नवीन कोठून येणारी नाही). हे रघुनंदन लक्ष्मणा, ज्ञान, विज्ञान आणि वैराग्य यांच्या सह हे परमात्म्याचे मोक्षस्वरूप मी तुला सांगितले आहे. परंतु माझ्या भक्तीला ज्याचे मन विमुख आहे, त्याला ते सर्व दुर्लभ आहे, असे माझे मत आहे. (४४-४५)

चक्षुष्मतामपि यथा रात्रौ सम्यङ् न दृश्यते ।
पदं दीपसमेतानां दृश्यते सम्यगेव हि ॥ ४६ ॥
एवं मद्‌भक्तियुक्तानामात्मा सम्यक् प्रकाशते ।
मद्‌भक्तेः कारणं किञ्चिद्वक्ष्यामि शृणु तत्त्वतः ॥ ४७ ॥
डोळे शाबूत असणार्‍या लोकांनासुद्धा ज्या प्रमाणे रात्री अंधारामुळे चोर, इत्यादींच्या पाऊलखुणा नीटशा दिसू शकत नाहीत, याउलट जवळ दिवा असणार्‍या माणसांना ते नीट दिसून येते, त्याप्रमाणे माझ्या भक्तीने युक्त असणार्‍या पुरुषांच्या पुढे आत्मा हा योग्य प्रकारे प्रगट होतो. आता माझी भक्ती निर्माण होण्याची काही कारणे मी तुला तत्त्वतःसांगतो, ती तू ऐक. (४६-४७)

मद्‌भक्तसङ्‌गो मत्सेवा मद्‌भक्तानां निरन्तरम् ।
एकादश्युपवासादि मम पर्वानुमोदनम् ॥ ४८ ॥
मत्कथाश्रवणे पाठे व्याख्याने सर्वदा रतिः ।
मत्पूजापरिनिष्ठा च मम नामानुकीर्तनम् ॥ ४९ ॥
माझ्या भक्तांची संगती, निरंतर माझी आणि माझ्या भक्तांची सेवा, एकादशीच्या दिवशी उपवास इत्यादी करणे, माझे पर्व-दिवस पाळणे, माझी कथा ऐकण्यात, पठन करण्यात आणि तिचे स्पष्टीकरण करण्यात नेहमी आवड बाळगणे, माझ्या पूजेच्या बाबतीत आत्यंतिक निष्ठा आणि माझ्या नामाचे संकर्तिन हे सर्व माझी भक्ती उत्पन्न होण्याचे उपाय आहेत. (४८-४९)

एवं सततयुक्तानां भक्तिरव्यभिचारिणी ।
मयि सञ्जायते नित्यं ततः किमवशिष्यते ॥ ५० ॥
अशा प्रकारे जे सतत माझ्या ठिकाणी तत्पर असतात, त्यांच्या ठिकाणी माझ्या विषयीची अव्यभिचारी भक्ती उत्पन्न होते. त्यानंतर मग काय बरे शिल्लक राहते ? (५०)

अतो मद्‌भक्तियुक्तस्य ज्ञानं विज्ञानमेव च ।
वैराग्यं च भवेच्छीघ्रं ततो मुक्तिमवाप्नुयात् ॥ ५१ ॥
म्हणून हे नक्की आहे की वर सांगितलेल्या माझ्या भक्तीने युक्त असणार्‍या पुरुषाच्या बाबतीत ज्ञान, विज्ञान आणि वैराग्य हे शीघ्र निर्माण होतात आणि त्या नंतर तो पुरुष मुक्ती प्राप्त करून घेतो. (५१)

कथितं सर्वमेतत्ते तव प्रश्नानुसारतः ।
अस्मिन्मनः समाधाय यस्तिष्ठेत्स तु मुक्तिभाक् ॥ ५२ ॥
तुझ्या प्रश्नाला अनुसरून हे सर्व मी तुला सांगितलं आहे. या कथनाचे ठिकाणी मन मग्न करून जो राहील तो मुक्ती प्राप्त करून घेईल. (५२)

न वक्तव्यमिदं यत्‍नान्मद्‌भक्तिविमुखाय हि ।
मद्‌भक्ताय प्रदातव्यमाहूयापि प्रयत्‍नतः ॥ ५३ ॥
माझ्या भक्तिला जे विमुख आहेत, त्यांना हे सांगू नये. या उलट माझ्या भक्ताला बोलावून आणूनसुद्धा प्रयत्‍नपूर्वक त्याला हे सांगावे. (५३)

य इदं तु पठेन्नित्यं श्रद्धाभक्तिसमन्वितः ।
अज्ञानपटलध्वान्तं विधूय परिमुच्यते ॥ ५४ ॥
जो कुणी पुरुष श्रद्धा आणि भक्ती यांनी युक्त होऊन हे सर्व विवेचन नेहमी पठण करील तो अज्ञान-समूहरूपी अंधकार टाकून देऊन मुक्त होईल. (५४)

भक्तानां मम योगिनां सुविमल-
     स्वान्तातिशान्तात्मनां
मत्सेवाभिरतात्मनां च विमल-
     ज्ञानात्मनां सर्वदा ।
सङ्‌गं यः कुरुते सदोद्यतमति-
     स्तत्सेवनानन्यधी-
र्मोक्षस्तस्य करे स्थितोऽहमनिशं
     दृश्यो भवे नान्यथा ॥ ५५ ॥
ज्याचे अंतःकरण अतिशय शुद्ध आहे, ज्याचे मन अतिशय शांत आहे, ज्याचे मन माझी सेवा करण्यात रत आहे, ज्याच्या मनात शुद्ध ज्ञान आहे, अशा माझ्या भक्त-योग्याची संगती, जो कुणी सदा तत्पर बुद्धी ठेवून करतो आणि त्याची सेवा करण्यात अनन्य असतो, त्याच्या हाती मोक्ष असतो आणि मी त्याला रात्रंदिवस दृश्यमान होतो, अन्यथा नाही." (५५)

इति श्रीमद् अध्यात्मरामयणे उमामहेश्वरसंवादे
अरण्यकाण्डे चतुर्थः सर्गः ॥ ४ ॥
अरण्यकाण्डातील चवथा सर्गः समाप्त ॥ ४ ॥


GO TOP