॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय एकूणतिसावा ॥
मधुदैत्य व रावणाची भेट

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥


राक्षसाधीश रावण । खरदूषणांसह जनस्थान ।
जें घोर अति दारुण । शूर्पणखेलागून दिधलें ॥१॥
मग पाहतांचि निजमंदिर । प्रवेशला दशशिर ।
कनकप्रभा तेज अपार । रत्नवैदुर्य खांबोखांबीं ॥२॥
सुवर्णभित्ती अति कुसरी । चित्रें लिहिलीं नानापरी ।
माजि देवांगने सारिखी मंदोदरी । देखोन सुख पावला ॥३॥
देवकन्या गंधर्वकन्या जिच्या दासी । अष्टनायिका लाजती देखोनि रुपासी ।
ऐसी मंदोदरी देखोनि मानसीं । रावण सुखासी पावला ॥४॥
कनकाचिया मंचकावरी । शेज रचली सुमनेंकरीं ।
विंजणा वीजती एकी नारी । एकी विडिया पैं देती ॥५॥
एकी चरण प्रक्षाळिती । एकी संवाहन करिती ।
एकी अंगी चंदन चर्चिती । एकी दाविती दर्पण ॥६॥
ऐसें मयासुराचें दुहितारत्न । रावणाचें गृहमंडन ।
देखोनि सुखावला दशानन । नावेक तेथें क्रमियेलें ॥७॥

निकुंभिळेत इंद्रजित यज्ञ करीत होता तेथे रावण आला :

तदनंतर राक्षसराजू । निघाला निकुंभिळें उजू ।
पहावया ज्येष्ठ आत्मजू । मेघनाद नाम ज्याचें ॥८॥
तंव येरीकडे इंद्रजितेंं । मांडिलें अभिचारहोमातें ।
शुक्राचार्य दुरू तेथें । यज्ञक्रियेतें संपादीं ॥९॥
समस्त यज्ञ संपूर्ण झाला । पूर्णाहुतीचा समय आला ।
तंव अकस्मात रावण प्रवेशला । तया भवनामाझारीं ॥१०॥
पाहत पाहत दशानन । पुढें देखिला महायज्ञ ।
तेथें बैसला इंद्रजित आपण । देदीप्यमान तेजस्वी ॥११॥
चीरकृष्णाजिनांबर । कमंडलु माथां जटाभार ।
भस्मचर्चित सर्व शरीर । नेत्र आरक्त जाज्वल्य ॥१२॥

यज्ञ करण्याचे निमित्त रावण विचारतो :

ऐसें देखोनि स्वसुतातें । रावण बोलता झाला त्यातें ।
अगा ये वत्सा कोणे कर्मातें । काय कारणें आरंभिलें ॥१३॥
कवण उत्कंठा मनीं । वर्ततसे तुजलागोनी ।
सांगावी गा येच क्षणीं । कायावाचामानसें ॥१४॥
ऐसें वचन लंकेश वदला । मग शुक्राचार्य सांगता झाला ।
ऐके राया यज्ञ आरंभिला । महत्कार्य साधावया ॥१५॥

शुक्राचार्यांनी सात यज्ञ व त्यांची फलश्रुती रावणाला सांगितली :

सहा यज्ञ पूर्ण झाले । सातव्या माहेश्वर यज्ञातें सिद्धी पावविलें ।
संपतेसमयीं आगमन केलें । तुवां राक्षसचूडामणे ॥१६॥
सात यज्ञ कोणते म्हणसी । तुझे पुत्रें केलें त्यांसी ।
मी सांगतसें जी परियेसीं । अनुक्रमें नामें त्याचीं ॥१७॥


अग्निष्टोश्च मेधश्च यज्ञो बहुसुवर्णकः ।
राजसूतयस्तथा यज्ञो गोमेधो वैष्णवस्तथा ॥१॥
माहेश्वरे प्रवृत्ते तु यज्ञे पुंभिः सुदुर्लभे ॥२॥


अग्निष्टोम अश्वमेध । बहुसुवर्ण प्रसिद्ध ।
याचकांसी नाहीं अवरोध । भूरिदक्षिणा ते समयीं ॥१८॥
राजसूय चवथा जाण । पांचवा गोमेध यज्ञ ।
सहावा वैष्णव यज्ञ । माहेश्वर ॥१९॥
माहेश्वराची समाप्ती । प्राकृत नव्हे गा नृपती ।
तुझी वाट पाहतां भूपती । तंव तूं आलासि ये समयीं ॥२०॥

इंद्रजिताला वरप्राप्ती :

वरद पावला तुझा पुत्र । यासि प्रसन्न उमाकांत ।
दिधला महा दिव्य रथ । अंतरिक्षीं विचरेसा ॥२१॥
माया लाधला तामसी । जिचेनि अंधार अरिदृष्टीसीं ।
राया बळिया याचे समतेसीं । नाहीं ब्रह्मांडगोलकांत ॥२२॥
याचें विंदान सुरांसुरां । न कळे गा राक्षसेश्वरा ।
अक्षयी भाता बाण दुर्धरा । क्षय नाहीं रणांगणीं ॥२३॥
अरिमर्दनीं वज्रचाप । शस्त्रें वज्रप्राय अमूप ।
अरि विध्वंसोनी महाप्रताप । तुझा पुत्र लाधला ॥२४॥
इतुकिया समस्त वरांतें । यज्ञीं साधिलें इंद्रजितें ।
तुझी वाट पहात होते । तेथें यज्ञमंडपामाझारीं ॥२५॥
ऐकोनि उशनाचें वचन । कोय बोलिला दशानन ।
म्हणे पुत्रें केलें प्रमाण । परि अनुचित घडलें तुज ॥२६॥
यज्ञीं वैरी तृप्त केले । इंद्रदिकां तुवां पूजिलें ।
हेंचि एक अनुचित घडलें । आतां चाल उठीं मंदिरा ॥२७॥
तदनंतर तो पौलस्तिसुत । पुत्रबंधूंसहित मंदिराप्रत ।
प्रवेशला सुखानंदस्थित । यावरी काय वर्तलें ॥२८॥
देवगंधर्वसुरकन्यका । विमानीं घातल्या होत्या देखा ।
त्या उतरोनि महादुःखा । करिता झाल्या ते समयीं ॥२९॥

गंधर्वकन्यांना पळवून आणल्याबद्दल बिभीषणाकडून
रावणाला दोष, बहीण कुंभीनसी राक्षसांनी पळवल्याचे वृत्तनिवेदन :

तयांतें देखोनि आक्रंदन । धर्मात्मा तो बिभीषण ।
रावणाप्रती काय वचन । बोलता झाला ते काळीं ॥३०॥
अग्रजा हें कर्माचरण । येणें कुळासी निःसंतान ।
येणें पूर्वजा होय पतन । वंशा दूषण हेंचि पैं ॥३१॥
तूं वरदबळें झालासी उन्मत्त । शुभाशुभ नेणेसी कृत्य ।
योषिता धरोनि आणिल्या येथ । अधर्म राज्यांत प्रवेशला ॥३२॥
तूं नसतां लंकाभवनीं । कुंभीनसी आमुची बहिणी ।
ते नेली ते मज नाहीं हिरोनी । अपकीर्ति जनीं पैं झाली ॥३३॥
बिभीषणासी बोले रावण । कोणि नेली ते मज नाहीं ज्ञान ।
तूं सांग गा विस्तारुन । समूळ विवंचन मजप्रती ॥३४॥
बिभीषण होवोनि कोपायमान । रावणाप्रती बोले वचन ।
म्हणे राया पापांचें फळ ठाकून । आम्हांप्रति पैं आलें ॥३५॥
आमचा मातामह माल्यवंत । त्याचा ज्येष्ठ बंधु सुमाळी विख्यात ।
ऋषींमध्यें बुद्धिवंत । तपोधन ज्ञानराशि ॥३६॥
त्याची कुंभनसी नाती । मावसबहीण आम्हांप्रती ।
तिची अग्नीपासून संभूती । सत्य नृपती पैं झाली ॥३७॥

मधुदैत्यानें बहिणीला पळविले :

ऐकें अग्रजा मावसभगिनीतें । हिरोनि नेलें मधूनें आपुले नगरातें ।
मारोनि आमच्या सैन्यातें । बळवंतें पैं नेली ॥३८॥
यज्ञ करित होता इंद्रजित । कुंभकर्ण निद्राभिभूत ।
मी उदकीं होतो ध्यानस्थ । मजही श्रुत नाहीं झालें ॥३९॥
कुंभीनसी होती अंतःपुरीं । तेथें प्रवेशला तो दुराचारी ।
धरोनि नेली करोनि मारी । प्रळय नगरीं पैं झाला ॥४०॥
राया लौकिकीं ऐसें झालें । अपकार्तीचें भरतें आलें ।
ऐकोनि क्रोधें उचंबळलें । दशग्रीवाचें मानस ॥४१॥

मधुदैत्यावर रावणाची ससैन्य स्वारी :

क्रोधें आरक्त झाले नयन । आतां सिद्ध करा सैन्य ।
रथ आणा शीघ्र गमन । करावया अरिवध ॥४२॥
वेगीं सैन्या हाकार केला । कुंभकर्ण इंद्रजित सवें घेतला ।
नाना शस्त्रांचा समूह एकवटला । युद्धा निघाला रावण ॥४३॥
मंदोदरीकांत मनीं विचारी । आधीं मधूची करीन बोहरी ।
मग सुरलोका जाईन निर्धारीं । त्रैलोक्यींचे भोग भोगिती जेथें ॥४४॥
सवें सैन्य चारी सहस्त्र । आणिक चार अधिक वीर ।
जे पालथें करिती ब्रह्मांडोदर । सप्त सागर शोषिते जे ॥४५॥
अष्टलोकांची बांधिती मोळी । स्वर्गाच्या उलथिती डिखळी ।
सुरासुर देखोनि कांपती चळीं । ऐसें आतुर्बळी राक्षस ॥४६॥
जयांचे शस्त्रांचें सामर्थ्य । रणीं देवदानव चळचळां काम्पत ।
पाताळादिलोक भयभीत । रणरंगी भिडतां हो ॥४७॥
ऐसे राक्षस निघाले भारी । त्यांपुढें शक्रजित रणकेसरी ।
पृष्ठभागीं कुंभकर्ण दीर्घशरीरी । मध्ये रावण शोभत ॥४८॥
लंके ठेविला बिभीषण । जो कां धर्मपरायण ।
करावया त्रिकूटाचें रक्षण । प्रजापाळणनिमित्तें हो ॥४९॥
उरले सैन्येसीं दशानन । मधुपुराप्रति करी गमन ।
एक महाखरीं वळंघोन । एक चढला उंटावरी ॥५०॥
एकीं अश्व पालाणिले । एक कुंजरी आरुढले ।
एक तुरगीं चढिन्नले । एकांचें वहन शिशुमर ॥५१॥
ऐसा दशानन सहपरिवारीं । चालिलासे राक्षसभारीं ।
वीर दाटले अंबरीं । दिशा चारी कोंदल्या ॥५२॥
जळीं स्थळीं रजनीचर । कोंदले राक्षसांचे भार ।
मनोवेगाहूनि सत्वर । मधुपुरातें पावले ॥५३॥

मधुपुरास आल्यावर वैधव्य आणू नये म्हणून बहिणीची रावणाला प्रार्थना :

नगरीं पाहतां वैरियातें । परी तो न दिसेचि तेथें ।
तंव देखिलें भगिनीतें । राक्षसराजें ते काळीं ॥५४॥
मग ते कुंभीनसी हात जोडून । दोनी चरणां लोटांगण ।
रावणासी विज्ञापन । दीनवाणी करोनि करी ॥५५॥
राक्षसराज चूडामणी । तुमच्या भुजा यशस्वी रणीं ।
मी अनाथ तुमची भगिनी । आणिलें धरोनी मधूनें ॥५६॥
कुंभकर्ण तिजसीं बोलत । अवो भगिनी तुज भय नाहीं निश्चित ।
आमचा वैरी त्याचे वधार्थ । आम्ही येथें आलों असों ॥५७॥
म्हणे राया अभय दिधलें । तें वचन पाहिजे सांभाळिलें ।
प्रसन्न झालसि तरी भ्रतारा राखिलें । पाहिजें माझ्या ये काळीं ॥५८॥
वाचा सत्य आपुली कीजे । माझें वैधव्य चुकवीजे ।
वैधव्यापरीस भय दुजें । मज नाहीं राक्षसेंद्रा ॥५९॥
माझा प्राणापति राखोन । आपुलें सत्य करा वचन ।
ऐसें ऐकोनि रावण । बोलता झाला तियेसी ॥६०॥

मधूला न मारण्याचे रावणाचे आश्वासन :

अवो वत्से ऐक वचन । तुझा भ्रतार आहे कोण ।
तो मज सांगें न लागतां क्षण । नामाभिमान तयाचें ॥६१॥
सांगातें मी घेवोनि त्यासी । जाईन सुरलोक जिंकावयासी ।
तुझी करुणा देखोनि मानसीं । मी त्यासी न वधीं हो ॥६२॥
इतुकें ऐकोनि रावणवचन । कुंभीनसी तत्काळ उठोन ।
भय सांडोनि निर्भयमन । भ्रतार निजला तेथें आली ॥६३॥

कुंभीनसी मधू व रावणाची भेट घडविते :

मग म्हणे भ्रतारासी । निद्रा सांडूनि उठा वेगेंसीं ।
ऐका माझिया वचनासी । सावधतेसीं होऊनी ॥६४॥
माझा बंधु दशानन । आलासे तुमच्या भेटीलागून ।
समागमें कुंभकर्ण इंद्रजित जाण । आणि प्रधानसैन्येंसीं ॥६५॥
सुरलोकांच्या जयार्थ । आलासे तुमच्या भेटीची धरूनि आर्त ।
भेटी घेवोनि तुम्ही त्वरित । युद्धा साह्य त्यासी व्हावें ॥६६॥
पृथ्वीजयो तेणें केला । आपुला पुरुषार्थ मिरविला ।
अरिवीरां धाक सुटला । नाम त्याचें ऐकोनि ॥६७॥
ऐसा बळी राक्षसराज । तयासि तुमचे भेटीचें काज ।
तो येथें आला असे सहज । तुम्हीं त्यासी भेटावें ॥६८॥
ऐकोनि प्रियेचें वचन । मधु उठिला तत्काळ जाण ।
रायासि भेटोनि आलिंगन । अर्घ्यपूजन पैं केलें ॥६९॥

रावणाचा मधूकडून सत्कार :

पूजा करोनि राजोपचार । देखोनि संतोषला दशशिर ।
तदनंतर अस्ता भास्कर । गेला नोधा प्रवर्तली ॥७०॥
सैन्यासहित दशानन । पुत्रबंधूंसहवर्तमान ।
संतोषें निशा तेथें क्रमोन । पूर्वे भान उगवला ॥७१॥
उदय होतांचि सहस्त्रकिरण । स्नानसंध्या तेथें सारून ।
सवेंचि निघाला मधूसहवर्तमान । कैलासासी लक्षून चालिला ॥७२॥
एका जनार्दना शरण । रम्य रामें रामयण ।
श्रवणें भवदोषां खंडण । करी निर्दाळण कामक्रोधां ॥७३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामयणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
मधुरावणदर्शनं नाम एकोनत्रिंशत्तमोऽध्यायः ॥२९॥
ओंव्या ॥७३॥ श्लोक ॥२॥ एवं ॥७५॥

GO TOP