[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ द्विचत्वारिंशः सर्गः॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
राक्षसीभ्यो वनविध्वंसवार्तामाकर्ण्य रावणेन किंकराणां प्रेषणं; हनुमता तेषां संहारश्च -
राक्षसींच्या मुखाने एका वानराकडून प्रमदावनाच्या विध्वसांचा समाचार ऐकून रावणाने किंकर नावाच्या राक्षसांना धाडणे आणि हनुमन्ताकडून त्या सर्वांचा संहार -
ततः पक्षिनिनादेन वृक्षभङ्‌गस्वनेन च ।
बभूवुस्त्राससम्भ्रान्ताः सर्वे लङ्‌कानिवासिनः ॥ १ ॥
तिकडे पक्ष्यांच्या कोलाहलाने आणि वृक्ष मोडून पडतांना झालेल्या आवाजाने समस्त लंकेमधील लोक अत्यन्त भयभीत झाले. ॥१॥
विद्रुताश्च भयत्रस्ता विनेदुर्मृगपक्षिणः ।
रक्षसां च निमित्तानि क्रूराणि प्रतिपेदिरे ॥ २ ॥
पशु आणि पक्षी घाबरून सैरा वैरा धावू लागले आणि आर्तनाद करू लागले. राक्षसांनाही भयंकर अपशकुन होऊ लागले. ॥२॥
ततो गतायां निद्रायां राक्षस्यो विकृताननाः ।
तद्वनं ददृशुर्भग्नं तं च वीरं महाकपिम् ॥ ३ ॥
प्रमदावनात झोपलेल्या आक्राळ विक्राळ तोंडे असणार्‍या राक्षसीणींची झोपमोड झाली. उठून त्यांनी पाहिले तो उध्वस्त झालेले अशोकवन त्यांच्या दृष्टीस पडले. त्याच वेळी त्यांची दृष्टी वीर महाकपि हनुमन्तावर ही पडली. ॥३॥
स ता दृष्ट्‍वा महाबाहूर्महासत्त्वो महाबलः ।
चकार सुमहद्‌रूपं राक्षसीनां भयावहम् ॥ ४ ॥
महाबलाढ्‍य, महान साहसी आणि महाबाहु हनुमन्तानी जेव्हा त्या राक्षसीणींना पाहिले तेव्हां त्यांनी त्या राक्षसीणींना भिती वाटेल असे अत्यन्त भयंकर आणि विशाल रूप धारण केले. ॥४॥
ततस्तं गिरिसङ्‌काशंमतिकायं महाबलम् ।
राक्षस्यो वानरं दृष्ट्‍वा पप्रच्छुर्जनकात्मजाम् ॥ ५ ॥
पर्वताप्रमाणे विशाल देह धारण केलेल्या त्या महाबलाढ्‍य वानरास पाहून त्या राक्षसीणी जनकनन्दिनी सीतेला विचारू लागल्या- ॥५॥
कोऽयं कस्य कुतो वायं किंनिमित्तमिहागतः ।
कथं त्वया सहानेन संवादः कृत इत्युत ॥ ६ ॥

आचक्ष्व नो विशालाक्षि मा भूत्ते सुभगे भयम् ।
संवादमसितापाङ्‌‍गि त्वया किं कृतवानयम् ॥ ७ ॥
हे विशाललोचने ! हा कोण आहे ? कुणाचा आहे ? आणि कोठून आणि कशासाठी येथे आला आहे ? याने तुझ्याशी का म्हणून संभाषण केले आहे ? हे काळेभोर नेत्र असणार्‍या सुन्दर स्त्रिये ! या सर्व गोष्टी तू आम्हांला सांग, घाबरू नको. याने तुझ्या बरोबर काय संभाषण केले होते ? ॥६-७॥
अथाब्रवीत् तदा साध्वी सीता सर्वाङ्‌गशोभना ।
रक्षसां कामरूपाणां विज्ञाने का गतिर्मम ॥ ८ ॥
तेव्हा सर्वांग सुन्दरी साध्वी सीता म्हणाली - इच्छानुसार रूप धारण करणार्‍या राक्षसांना जाणून घेण्याचा अथवा ओळखण्याचा माझ्याजवळ काय उपाय आहे ? ॥८॥
यूयमेवास्य जानीत योऽयं यद् वा करिष्यति ।
अहिरेव ह्यहेः पादान् विजानाति न संशयः ॥ ९ ॥
तुम्हांलाच माहीत असेल की हा कोण आहे आणि काय करील ? सापाची पावले सापालाच ओळखू येतात यात संशय नाही. ॥९॥
अहमप्यतिभीतास्मि नैनं जानामि को ह्ययम् ।
वेद्मि राक्षसमेवैनं कामरूपिणमागतम् ॥ १० ॥
मीही याला पाहून खूप घाबरलेली आहे. हा कोण आहे हे मला माहीत नाही. मी तर त्याला इच्छानुसार रूप धारण करून आलेला कुणी राक्षसच समजते आहे. ॥१०॥
वैदेह्या वचनं श्रुत्वा राक्षस्यो विद्रुता द्रुतम् ।
स्थिताः काश्चिद् गताः काश्चिद् रावणाय निवेदितुम् ॥ ११ ॥
वैदेहीचे वचन ऐकून राक्षसीणी अत्यन्त वेगाने तेथून पळाल्या. त्यातील काही तर तेथेच उभ्या राहिल्या आणि काही रावणाला सर्व वृत्तान्त सांगण्याकरिता त्याच्याकडे गेल्या. ॥११॥
रावणस्य समीपे तु राक्षस्यो विकृताननाः ।
विरूपं वानरं भीमं रावणाय न्यवेदिषुः ॥ १२ ॥
रावणाच्या जवळ जाऊन त्या विक्राळ मुखाच्या राक्षसीणींनी रावणास निवेदन केले की कोणी विकटरूपीधारी भयंकर वानर प्रमदवनात येऊन पोहोंचला आहे. ॥१२॥
अशोकवनिकामध्ये राजन् भीमवपुः कपिः ।
सीतया कृतसंवादस्तिष्ठत्यमितविक्रमः ॥ १३ ॥
त्या म्हणाल्या - राजन ! अशोकवाटिके मध्ये एक अत्यन्त भयंकर देह असलेला कपि आला आहे. त्याने सीतेशी संवाद केला आहे. तो महापराक्रमी वानर अद्यापही तेथेच उपस्थित आहे. ॥१३॥
न च तं जानकी सीता हरिं हरिणलोचना ।
अस्माभिर्बहुधा पृष्टा निवेदयितुमिच्छिति ॥ १४ ॥
आम्ही खूप विचारले पण ती मृगनयनी जानकी सीता त्या वानराच्या विषयी आम्हांला काहीही सांगू इच्छित नाही. ॥१४॥
वासवस्य भवेद् दूतो दूतो वैश्रवणस्य वा ।
प्रेषितो वापि रामेण सीतान्वेषणकाङ्‌क्षया ॥ १५ ॥
संभव आहे की तो इन्द्राचा अगर कुबेराचा दूत असेल अथवा श्रीरामानेच त्याला सीतेचा शोध घेण्यासाठी धाडले असेल. ॥१५॥
तेनैवाद्‌भुतरूपेण यत्तत्तव मनोहरम् ।
नानामृगगणाकीर्णं प्रमृष्टं प्रमदावनम् ॥ १६ ॥
अद्‍भुत रूप धारण करणार्‍या त्या वानराने, ज्यात नाना प्रकारचे पशु पक्षी राहात होते असे आपले मनोहर प्रमदावन उध्वस्त करून टाकले आहे. ॥१६॥
न तत्र कश्चिदुद्देशो यस्तेन न विनाशितः ।
यत्र सा जानकी सीता स तेन न विनाशितः ॥ १७ ॥
प्रमदावनाचा कुठलाही भाग असा राहिलेला नाही की ज्याचा त्याने नाश केलेला नाही. केवळ जेथे जानकी देवी राहात आहे ते स्थान मात्र त्याने नष्ट केलेले नाही. ॥१७॥
जानकीरक्षणार्थं वा श्रमाद् वा नोपलक्ष्यते ।
अथवा कः श्रमस्तस्य सैव तेनाभिरक्षिता ॥ १८ ॥
जानकीचे रक्षण व्हावे म्हणून त्याने त्या स्थानाचा विध्वंस केला नाही किंवा इतर सर्व प्रदेशाची धुळधाण करता करतां थकून गेल्यामुळे त्याच्या तावडीतून तो भाग टिकून राहिला आहे, हे काहीच निश्चित जाणता येत नाही. परन्तु एवढ्‍या वनाचा धुव्वा उडवून देणार्‍या त्या वानराला थकवा तरी कोठून येणार ? त्याने तो प्रदेश सुरक्षित ठेवून सीतेचच रक्षण केले आहे. ॥१८॥
चारुपल्लवपत्राढ्यं यं सीता स्वयमास्थिता ।
प्रवृद्धः शिंशुपावृक्षः स च तेनाभिरक्षितः ॥ १९ ॥
मनोहर पालवी आणि पानांनी भरलेला तो विशाल शिंशपावृक्ष, ज्याच्या खाली सीतेचा निवास आहे त्याला मात्र त्याने सुरक्षित ठेवले आहे, जरा ही धक्का लावला नाही. ॥१९॥
तस्योग्ररूपस्योग्रं त्वं दण्डमाज्ञातुमर्हसि ।
सीता संभाषिता येन वनं तेन विनाशितम् ॥ २० ॥
ज्याने सीतेशी संभाषण केले असून त्या वनाचा विध्वंस केला आहे त्या उग्ररूपधारी वानराला चांगली कडक शिक्षा करण्याविषयी आपण आज्ञा करावी. ॥२०॥
मनःपरिगृहीतां तां तव रक्षोगणेश्वर ।
कः सीतामभिभाषेत यो न स्यात् त्यक्तजीवितः ॥ २१ ॥
राक्षसराज ! ज्या सीतादेवीला आपण आपल्या हृदयात स्थान दिले आहे तिच्याशी कोण वार्तालाप करू शकणार आहे ? ज्याने आपल्या प्राणांचा मोह सोडला नसेल तो तिच्याशी संभाषण कसे करू शकेल ? ॥२१॥
राक्षसीनां वचः श्रुत्वा रावणो राक्षसेश्वरः ।
चिताग्निरिव जज्वाल कोपसंवर्तितेक्षणः ॥ २२ ॥
राक्षसींचे हे भाषण ऐकून राक्षसराज रावणाची दृष्टी क्रोधाने चढून गेली. प्रज्ज्वलित अग्निप्रमाणे तो क्रोधाने पेटून उठला आणि क्रोधाने त्याचे डोळे गरगरा फिरू लागले. ॥२२॥
तस्य क्रुद्धस्य नेत्राभ्यां प्रापतन्नश्रुबिन्दवः ।
दीप्ताभ्यामिव दीपाभ्यां सार्चिषः स्नेहबिन्दवः ॥ २३ ॥
प्रज्वलित झालेल्या दोन दिव्यातून ज्योतिबरोबरच तैलबिन्दू ठिबकू लागावे त्याप्रमाणे क्रुद्ध झालेल्या रावणाच्या नेत्रान्तून क्रोधाचे अश्रुबिन्दु ठिबकू लागले, गळू लागले. ॥२३॥
आत्मनः सदृशान् वीरान् किङ्‌करान्नाम राक्षसान् ।
व्यादिदेश महातेजा निग्रहार्थं हनूमतः ॥ २४ ॥
त्या महातेजस्वी निशाचराने हनुमन्ताचा निग्रह-प्रतिबन्ध करण्यासाठी आपल्या सारखेच वीर असलेल्या किंकर नामक राक्षसांना जाण्याची आज्ञा केली. ॥२४॥
तेषामशीतिसाहस्रं किङ्‌कराणां तरस्विनाम् ।
निर्ययुर्भवनात् तस्मात् कूटमुद्‌गरपाणयः ॥ २५ ॥
राजाची आज्ञा मिळताच ऐंशी हजार वेगवान किंकर हातामध्ये कूट आणि मुद्‍गर घेऊन त्या महालातून बाहेर पडले. ॥२५॥
महोदरा महादंष्ट्रा घोररूपा महाबलाः ।
युद्धाभिमनसः सर्वे हनुमद्‌ग्रहणोन्मुखाः ॥ २६ ॥
त्यांच्या दाढा विशाल, पोटे मोठी आणि रूप फार भयानक होते. सर्वच्या सर्व महाबलाढ्‍य, युद्धाची इच्छा करणारे हनुमन्तास पकडण्यासाठी उत्सुक होते. ॥२६॥
ते कपिं तं समासाद्य तोरणस्थमवस्थितम् ।
अभिपेतुर्महावेगाः पतङ्‌गा इव पावकम् ॥ २७ ॥
प्रमदावनाच्या दरवाज्यावर उभे असलेल्या त्या वानरवीराजवळ पोहोंचल्यावर पतंग जसे दीपावर तुटून पडतात, आगीवर तुटून पडतात त्याप्रमाणे ते महान वेगशाली निशाचर चारी बाजूने हनुमन्तावर तुटून पडले. ॥२७॥
ते गदाभिर्विचित्राभिः परिघैः काञ्चनाङ्‌गदैः ।
आजग्मुर्वानरश्रेष्ठं शरैरादित्यसन्निभैः ॥ २८ ॥
त्यांनी विचित्र गदा, सोन्याने मढविलेले परिघ आणि सूर्यासारख्या प्रज्वलित बाणासंह वानरश्रेष्ठ हनुमन्तावर चढाई केली, आक्रमण केले. ॥२८॥
मुद्‌गरैः पट्टिशैः शूलैः प्रासतोमरपाणयः ।
परिवार्य हनूमन्तं सहसा तस्थुरग्रतः ॥ २९ ॥
हातात प्रास, तोमर, शक्ती आदि घेऊन मुद्‍गर, पट्टिश आणि शूलांनी सुसज्जित होऊन ते एकाकी हनुमन्तास चारी बाजूने घेरून त्याच्या समोर उभे राहिले. ॥२९॥
हनुमानपि तेजस्वी श्रीमान् पर्वतसन्निभः ।
क्षितावाविध्य लांगूलं ननाद च महाध्वनिम् ॥ ३० ॥
तेव्हा पर्वतासमान विशाल शरीराच्या तेजस्वी श्रीमान हनुमन्तानेही आपली शेपटी जोरात पृथ्वीवर आपटून अत्यन्त जोराने गर्जना करण्यास सुरूवात केली. ॥३०॥
स भूत्वा तु महाकायो हनुमान् मारुतात्मजः ।
धृष्टमास्फोटयामास लङ्‌कां शब्देन पूरयन् ॥ ३१ ॥
पवनपुत्र हनुमान अत्यन्त विशाल देह धारण करून आपली शेपटी आपटून तिच्या आवाजाने लंकेला प्रतिध्वनित करू लागले. ॥३१॥
तस्यास्फोटितशब्देन महता चानुनादिना ।
पेतुर्विहङ्‌गा गगनादुच्चैश्चेदमघोषयत् ॥ ३२ ॥
त्यांचा शेपूट आपणण्याचा गंभीर घोष दूर अन्तरापर्यन्त प्रतिध्वनित होत असल्याने त्या आवाजाने पक्षी आकाशान्तून खाली पडू लागले. त्यावेळी हनुमन्ताने उच्चस्वराने याप्रकारे घोषणा केली - ॥३२॥
जयत्यतिबलो रामो लक्ष्मणश्च महाबलः ।
राजा जयति सुग्रीवो राघवेणाभिपालितः ॥ ३३ ॥

दासोऽहं कोसलेन्द्रस्य रामस्याक्लिष्टकर्मणः ।
हनुमान् शत्रुसैन्यानां निहन्ता मारुतात्मजः ॥ ३४ ॥

न रावणसहस्रं मे युद्धे प्रतिबलं भवेत् ।
शिलाभिस्तु प्रहरतः पादपैश्च सहस्रशः ॥ ३५ ॥

अर्दयित्वा पुरीं लङ्‌कामभिवाद्य च मैथिलीम् ।
समृद्धार्थो गमिष्यामि मिषतां सर्वरक्षसाम् ॥ ३६ ॥
अत्यन्त बलाढ्‍य श्रीराम, महाबलाढ्‍य लक्ष्मण आणि श्रीरामांनी संरक्षण केलेला राजा सुग्रीव यांचा विजय असो ! महापराक्रमी कोसलदेशाधिपती श्रीरामचन्द्राचा मी दास आहे. माझे नाव हनुमान आहे. मी वायुपुत्र असून शत्रूच्या सैन्याचा संहार करणारा आहे. ज्यावेळी मी हजारो वृक्ष आणि शिला यांनी प्रहार करू लागेन त्यावेळी हजारो रावण मिळून जरी युद्ध करू लागले तरी ते माझ्या बळाची बरोबरी करू शकणार नाहीत अथवा माझा सामनाही करू शकणार नाहीत. मी लङ्‌कापुरीला उध्वस्त करून टाकीन आणि मैथिली सीतेला प्रणाम करून नन्तर सर्व राक्षसांच्या समक्ष आपले कार्य सिद्ध करून मी येथून परत जाईन. ॥३३-३६॥
तस्य संनादशब्देन तेऽभवन् भयशङ्‌किताः ।
ददृशुश्च हनूमन्तं सन्ध्यामेघमिवोन्नतम् ॥ ३७ ॥
हनुमन्ताच्या या गर्जनेमुळे सर्व राक्षस भयभीत झाले आणि सर्वांनी हनुमन्ताकडे पाहिले. त्यावेळी सायंकालीन उंच मेघाप्रमाणे लाल आणि विशालदेही असे ते त्यांना दिसले. ॥३७॥
स्वामिसन्देशनिश्शङ्‌कास्ततस्ते राक्षसाः कपिम् ।
चित्रैः प्रहरणैर्भीमैरभिपेतुस्ततस्ततः ॥ ३८ ॥
हनुमन्तानी आपल्या स्वामीचे नाम घेऊन स्वयं आपलाही परिचय करून दिला होता. त्यामुळे राक्षसांना त्यांना ओळखण्याबद्दल कुठल्याही सन्देह राहिला नव्हता. ते नाना प्रकारची भयंकर शस्त्रास्त्रे घेऊन त्यांचा प्रहार करीत चारी बाजूनी हनुमन्तावर तुटून पडले. ॥३८॥
स तैः परिवृतः शूरैः सर्वतः स महाबलः ।
आससादायसं भीमं परिघं तोरणाश्रितम् ॥ ३९ ॥
त्या शूरवीर राक्षसांचा द्वारा सर्व बाजूनी घेरले गेल्यावर महाबली हनुमन्तानी त्या दरवाजावर ठेवलेला एक लोखंडाचा भयंकर परिध उचलून घेतला. ॥३९॥
स तं परिघमादाय जघान रजनीचरान् ।
स पन्नगमिवादाय स्फुरन्तं विनतासुतः ॥ ४० ॥
आणि त्या परिघाने त्या निशाचरांचा संहार करण्यास प्रारंभ केला. ज्याप्रमाणे विनतासुत गरूडाने तडफडणार्‍या सर्पांना आपल्या पञ्ज्याने दाबून ठेवावे, त्याप्रमाणे. ॥४०॥
विचचाराम्बरे वीरः परिगृह्य च मारुतिः ।
सूदयामास वज्रेण दैत्यानिव सहस्रदृक् ॥ ४१ ॥
त्या परिघाला घेऊन वीर पवनपुत्र आकाशात संचार करू लागले. सहस्त्रनेत्र असलेला इन्द्र ज्याप्रमाणे आपल्या वज्राने दैत्यांचा वध करतो त्याप्रमाणे त्याने त्या परिघाने समोर आलेल्या समस्त राक्षसांना ठार मारले. ॥४१॥
स हत्वा राक्षसान् वीरः किंकरान् मारुतात्मजः ।
युद्धाकाङ्‌क्षी महावीरः तोरणं समवस्थितः ॥ ४२ ॥
त्या किंकर नावांच्या राक्षसांचा वध करून महावीर पवनपुत्र हनुमान युद्ध करण्याच्या इच्छेने पुन्हा त्या दरवाजावर जाऊन उभे राहिले. ॥४२॥
ततस्तस्माद् भयान्मुक्ताः कतिचित्तत्र राक्षसाः ।
निहतान् किंकरान् सर्वान् रावणाय न्यवेदयन् ॥ ४३ ॥
त्यानन्तर तेथे त्या भयातून मुक्त झालेल्या काही राक्षसांनी जाऊन रावणाला हा समाचार निवेदन केला की समस्त किंकर नामक राक्षस मारले गेले आहेत. ॥४३॥
स राक्षसानां निहतं महद्बलं
निशम्य राजा परिवृत्तलोचनः ।
समादिदेशाप्रतिमं पराक्रमे
प्रहस्त पुत्रं समरे सुदुर्जयम् ॥ ४४ ॥
राक्षसांची ती विशाल सेना मारली गेली हे ऐकून राक्षसराज रावणाच्या भुंवया चढल्या अर्थात त्याला भयंकर क्रोध आला आणि त्याने प्रहस्ताचा पुत्र (ज्याच्या पराक्रमाची तुलना होऊ शकत नव्हती) अतुल पराक्रमी असलेला आणि ज्याला युद्धात परास्त करणे अत्यन्त कठीण होते त्याला हनुमन्ताचा सामना करण्यासाठी पाठविले. ॥४४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे द्विचत्वारिंशः सर्गः ॥ ४२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा बेचाळीसावा सर्ग पूर्ण झाला ॥४२॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP