श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुंदरकाण्डे
॥ दशमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
अंतःपुरे सुप्त रावणं प्रगाढनिद्रानिमग्नास्तस्य स्त्रियश्च दृष्ट्वा मंदोदरीं सीतां मत्वा हनुमतो हर्षः -
हनुमंताने अंतःपुरात झोपलेल्या रावणास तसेच गाढ निद्रेत पडलेल्या त्याच्या स्त्रियांना अवलोकन करणे तथा मंदोदरीला सीता समजून प्रसन्न होणे -
तत्र दिव्योपमं मुख्यं स्फाटिकं रत्‍नभूषितम् ।
अवेक्षमाणो हनुमान् ददर्श शयनासनम् ॥ १ ॥
त्या महलात इकडे तिकडे पहात असता हनुमानानी एक दिव्य आणि श्रेष्ठ वेदी पाहिली, जिच्यावर पलंग ठेवले होते. ती वेदी स्फटिक मण्यांची बनविलेली होती आणि तिच्यामध्ये अनेक प्रकारची रत्‍ने जडविलेली होती. ॥१॥
दान्तकाञ्चनचित्राङ्गैः वैदूर्यैश्च वरासनैः ।
महार्हास्तरणोपेतैः उपपन्नं महाधनैः ॥ २ ॥
त्या वेदीवर वैडूर्यमण्यांचे बनविलेले पलंग ठेवलेले होते. ते पलंग अत्यंत मूल्यवान होते आणि त्यांचे सर्व भाग हस्तीदंताचे आणि सुवर्णाचे बनविले असल्याने चित्र विचित्र दिसत होते. त्या अत्यंत मूल्यवान पलंगावर बहुमूल्य बिछाने पसरलेले होते, त्यामुळे त्या वेदीची शोभा अत्यंत वाढलेली होती. ॥२॥
तस्य चैकतमे देशे दिव्यमालोपशोभितम् ।
ददर्श पाण्डुरं छत्रं ताराधिपतिसन्निभम् ॥ ३ ॥
त्या पलंगाच्या एका भागात त्यांनी दिव्य माळांनी शोभायुक्त आणि चंद्राप्रमाणे आल्हादायक असे श्वेतवर्ण छत्र पाहिले. ॥३॥
जातरूपपरिक्षिप्तं चित्रभानुसमप्रभम् ।
अशोकमालाविततं ददर्श परमासनम् ॥ ४ ॥
तो उत्तम पलंग सुवर्णजडित असल्याने अग्निप्रमाणे देदीप्यमान दिसत होता. तो अशोक पुष्पांच्या मालांनी अलंकृत केला आहे असे हनुमानांनी पाहिले. ॥४॥
वालव्यजनहस्ताभिः वीज्यमानं समंततः ।
गंधैश्च विविधैर्जुष्टं वरधूपेन धूपितम् ॥ ५ ॥
त्याच्या चारी बाजूस उभ्या असलेल्या अनेक स्त्रिया हातात चवर्‍या घेऊन त्या पलंगाभोवती वारीत उभ्या होत्या. नाना प्रकारच्या सुगंधानी आणि उत्कृष्ट प्रकारच्या धूपांनी तो सुगंधित केलेला होता. ॥५॥
परमास्तरणास्तीर्णं आविकाजिनसंवृतम् ।
दामभिर्वरमाल्यानां समंतादुपशोभितम् ॥ ६ ॥
उत्कृष्ट आस्तरणे त्यावर पसरलेली होती. लोकरीची वस्त्रे आणि अजिनेही त्यावर होती आणि उत्कृष्ट पुष्पांच्या माळांनी तो सर्व बाजूनी सुशोभित केलेला होता. ॥६॥
तस्मिन् जीमूतसंकाशं प्रदीप्तोज्जलकुण्डलम् ।
लोहिताक्षं महाबाहुं महारजतवाससम् ॥ ७ ॥

लोहितेनानुलिप्ताङ्गं चंदनेन सुगंधिना ।
संध्यारक्तमिवाकाशे तोयदं सतडिद्‌गुणम् ॥ ८ ॥

वृतमाभरणैर्दिव्यैः सुरूपं कामरूपिणम् ।
सवृक्षवनगुल्माढ्यं प्रसुप्तमिव मंदरम् ॥ ९ ॥

क्रीडित्वोपरतं रात्रौ वराभरणभूषितम् ।
प्रियं राक्षसकन्यानां राक्षसानां सुखावहम् ॥ १० ॥

पीत्वाप्युपरतं चापि ददर्श स महाकपिः ।
भास्वरे शयने वीरं प्रसुप्तं राक्षसाधिपम् ॥ ११॥
अशा त्या प्रकाशमान पलंगावर महाकपि हनुमानानी वीर राक्षसराज रावणास झोपलेला पाहिला. तो सुंदर आभूषणांनी विभूषित, इच्छेप्रमाणे रूप धारण करणारा, दिव्य आभरणाने अलंकृत आणि सुरूपवान होता. तो राक्षसकन्यांचा प्रियतम आणि राक्षसांना सुख देणारा होता. त्याच्या अंगाला सुगंधित लाल चंदनाचा अनुलेप (उटी) लावलेला होता, त्यामुळे तो आकाशांतील संध्याकाळची लाली आणि विद्युल्लखेने युक्त मेघाप्रमाणे शोभत होता. त्याची अंग कांति मेघाप्रमाणे श्याम होती. त्याच्या कानात उज्ज्वल कुण्डले झगमगत होती. डोळे लाल होते आणि मोठ मोठ्‍या भुजा होत्या. त्याची वस्त्रे जरीची होती. तो रात्री स्त्रियांबरोबर क्रीडा करून मदिरा पिऊन विश्रांती घेत होता. त्याला पाहून असे वाटत होते की जणु वृक्ष आणि लतागुल्म आदिंनी संपन्न मंदराचळच झोपी गेला आहे की काय ? ॥७-११॥
निःश्वसंतं यथा नागं रावणं वानरोत्तमः ।
आसाद्य परमोद्विग्नः सोपासर्पत् सुभीतवत् ॥ १२ ॥

अथारोहणमासाद्य वेदिकान्तरमाश्रितः ।
क्षीबं राक्षसशार्दूलं प्रेक्षते स्म महाकपिः ॥ १३ ॥
त्यावेळी निःश्वास टाकीत असलेला रावण फुस्कारणार्‍या सर्पाप्रमाणे भासत होता. त्याच्या समीप गेल्यावर ते वानरश्रेष्ठ हनुमान अत्यंत उद्विग्न झाले आणि अतिशय भयभीत झाल्याप्रमाणे एकदम दूर सरले. नंतर ते एका जिन्यावर चढले आणि तेथे मधल्या एक पायरीवर बसून तेथून त्या महाकपिनी त्या मस्त होऊन पडलेल्या राक्षससिंहाकडे पाहण्यास सुरूवात केली. ॥१२-१३॥
शुशुभे राक्षसेंद्रस्य स्वपतः शयनं शुभम् ।
गंधहस्तिनि संविष्टे यथा प्रस्रवणं महत् ॥ १४ ॥
शयन केल्यावर विशाल प्रस्त्रवणगिरी सुशोभित व्हावा तसा तो शोभत होता. ॥१४॥
काञ्चनाङ्गदसन्नद्धौ ददर्श स महात्मनः ।
विक्षिप्तौ राक्षसेन्द्रस्य भुजाविंद्रध्वजोपमौ ॥ १५ ॥
त्या राक्षसधिपती रावणाचे पसरलेले हात इंद्रध्वजतुल्य असून त्यावर सुवर्णाची बाहुभूषणे होती असे हनुमानाने पाहिले. ॥१५॥
ऐरावतविषाणाग्रैः आपीडनकृतव्रणौ ।
वज्रोल्लिखितपीनांसौ विष्णुचक्रपरिक्षतौ ॥ १६ ॥
युद्धाच्या वेळी त्या भुजांवर ऐरावत हत्तीच्या दातांच्या अग्रभागाने जे प्रहार केले गेले होते, त्या आघातांच्या (व्रण) खुणा राहिलेल्या होत्या. त्या भुजांचे मूळभाग म्हणजे खांदे अत्यंत रूंद होते आणि त्यांच्यावर वज्रद्वारा केल्या गेलेल्या आघातांची चिन्हे (खुणा) दिसून येत होती. भगवान विष्णूच्या चक्रांनीही केव्हा तरी त्या भुजा क्षत-विक्षत झाल्या होत्या. ॥१६॥
पीनौ समसुजातांसौ संगतौ बलसंयुतौ ।
सुलक्षणनखाङ्गुष्ठौ स्वङ्गुलीयकलक्षितौ ॥ १७ ॥
त्याचे बाहू मूळचेच परिपुष्ट असून त्यावरील स्कंध एकसारखे आणि उत्कृष्ट होते. त्या बाहूमध्ये बळ होते आणि त्याचे स्नायूही तसेच बळकट होते. त्याची नखे आणि अंगठे यावर सुलक्षणे होती, उत्कृष्ट अंगठ्‍या त्याने हातात घातलेल्या होत्या.॥१७॥
संहतौ परिघाकारौ वृत्तौ करिकरोपमौ ।
विक्षिप्तौ शयने शुभ्रे पञ्चशीर्षाविवोरगौ ॥ १८ ॥
आच्छादित असलेले ते बाहू सुगठित आणि पुष्ट होते. ते परिघाप्रमाणे गोलाकार आणि हत्तीच्या सोंडे प्रमाणे चढ-उतर असणारे आणि लांब होते. त्या उज्ज्वळ पलंगावर पसरलेले ते बाहू पंचमुखी (पाच फण्यांच्या) दोन नागांप्रमाणे दिसत होते. ॥१८॥
शशक्षतजकल्पेन सुशीतेन सुगंधिना ।
चंदनेन परार्ध्येन स्वनुलिप्तौ स्वलङ्कृतौ ॥ १९ ॥
सश्याच्या रक्ताप्रमाणे अत्यंत लाल, सुशीतल आणि फारच सुगंधी अशा महामूल्यवान्‌ चंदनाची उटी लावलेल्या त्या भुजा उत्तम अलंकाराने अलंकृत होत्या. ॥१९॥
उत्तमस्त्रीविमृदितौ गंधोत्तमनिषेवितौ ।
यक्षपन्नगगंधर्व देवदानवराविणौ ॥ २० ॥
सुंदर युवती त्या बाहूंना हळूहळू चेपत होत्या. उत्तमोत्तम सुगंधी द्रव्यांचा लेप त्यांना केलेला होता आणि यक्ष, नाग, गंधर्व, देवता आणि दानव सर्वांना युद्धांत रडविणारे ते बाहू होते. ॥२०॥
ददर्श स कपिस्तत्र बाहू शयनसंस्थितौ ।
मंदरस्यांतरे सुप्तौ महाही रुषिताविव ॥ २१॥
कपिश्रेष्ठ हनुमानांने पलंगावर पसरलेल्या त्या दोन्ही भुजा पाहिल्या. मंदराचळाच्या गुफेमध्ये निद्रित असलेल्या दोन क्रोधित अजगरांप्रमाणे त्या दिसत होत्या. ॥२१॥
ताभ्यां स परिपूर्णाभ्यां उभाभ्यां राक्षसेश्वरः ।
शुशुभेऽचलसंकाशः श्रृंगाभ्यामिव मंदरः ॥ २२ ॥
त्या सर्व गुणांनी परिपूर्ण असलेल्या विशाल आणि गोलाकार भुजांमुळे तो पर्वताकार राक्षसराज दोन शिखरांनी संयुक्त मंदराचळ प्रमाणे शोभत होता (*+). ॥२२॥
(*+ येथे शयनागारात झोपलेल्या रावणाच्या एकच मुखाचे आणि दोनच बाहूंचे वर्णन आले आहे. यावरून असे दिसून येत आहे की साधारण स्थितीमध्ये तो या प्रकारेच राहात असे. युद्ध आदि विशेष प्रसंगीच तो स्वेच्छापूर्वक दहा मुखे आणि वीस भुजा यांनी संयुक्त होत असे.)
चूतपुन्नागसुरभिः बकुलोत्तमसंयुतः ।
मृष्टान्नरससंयुक्तः पानगंधपुरस्कृतः ॥ २३ ॥

तस्य राक्षसराजस्य निश्चक्राम महामुखात् ।
शयानस्य विनिःश्वासः पूरयन्निव तद् गृहम् ॥ २४ ॥
झोपलेल्या त्या राक्षसराजाच्या मुखातून आम्र, नागकेसर आणि उत्कृष्ट बकुळपुष्पांप्रमाणे सुवासित आणि उत्तम अन्नरसाने संयुक्त तसेच मधुपानाने मिश्रित जो सौरभयुक्त श्वास निघत होता तो त्या सर्व गृहाला सुगंधाने जणु परिपूर्ण करीत होता. ॥२३-२४॥
मुक्तामणिविचित्रेण काञ्चनेन विराजिता ।
मकुटेनापवृत्तेन कुण्डलोज्वलिताननम् ॥ २५ ॥
त्याचे कुंडळाने प्रकाशमय मुखारविंद, आपल्या स्थानावरून ढळलेल्या तथा मोती रत्‍ने जडवलेली असल्याने, चित्रविचित्र आभा असलेला सुवर्णमय मुकुटाच्या योगे अधिकच उद्‍भासित झाले होते. ॥२५॥
रक्तचंदनदिग्धेन तथा हारेण शोभिना ।
पीनायतविशालेन वक्षसाभिविराजिता ॥ २६ ॥
त्याचे पुष्ट, रूंद आणि विशाल वक्षःस्थळ लाल चंदनाने चर्चित आणि हाराने सुशोभित होते. त्यामुळे त्या राक्षसराजाच्या संपूर्ण शरीराची शोभाही वाढली होती. ॥२६॥
पाण्डरेणापविद्धेन क्षौमेण क्षतजेक्षणम् ।
महार्हेण सुसंवीतं पीतेनोत्तमवाससा ॥ २७ ॥
त्याचे नेत्र लाल होते आणि कमरेखालचा भाग काहीसा सैल श्वेत रेशमी वस्त्रानी झाकलेला होता. तसेच त्याने पिवळ्या रंगाची बहुमूल्य रेशमी चादर पांघरलेली होती. ॥२७॥
माषराशिप्रतीकाशं निश्वसंतं भुजङ्ग वत् ।
गाङ्गे महति तोयान्ते प्रसुप्तमिव कुञ्जरम् ॥ २८ ॥
तो स्वच्छ स्थानी ठेवलेल्या उडदाच्या राशीसारखा दिसत होता आणि सर्पाप्रमाणे श्वास घेत होता. त्या उज्ज्वल पलंगावर झोपलेला रावण गंगेच्या अगाध जळराशीत झोपलेल्या गजराजाप्रमाणे दिसत होता. ॥२८॥
चतुर्भिः काञ्चनैर्दीपैः दीप्यमानं चतुर्दिशम् ।
प्रकाशीकृतसर्वाङ्गं मेघं विद्युद्‌गणैरिव ॥ २९ ॥
त्याच्या चारी बाजूस चार सुवर्णमय दीप जळत होते. त्यांच्या प्रभेने तो देदीप्यमान होत होता आणि त्याचे सर्व अंग प्रकाशित होऊन स्पष्ट दिसून येत होते, जणु काय विद्युत गणांनी मेघच प्रकाशित आणि परिलक्षित झाला आहे. ॥२९॥
पादमूलगताश्चापि ददर्श सुमहात्मनः ।
पत्‍नीः स प्रियभार्यस्य तस्य रक्षःपतेर्गृहे ॥ ३० ॥
पत्‍नींचा प्रेमी अशा या महाकाय राक्षसराजाच्या घरात हनुमानानी त्यांच्या पत्‍नींनाही पाहिले. त्या त्याच्या चरणाच्या आस-पासच झोपी गेल्या होत्या. ॥३०॥
शशिप्रकाशवदना वरकुण्डलभूषणाः ।
अम्लानमाल्याभरणा ददर्श हरियूथपः ॥ ३१॥
वानरयूथपति हनुमंतानी पाहिले की राक्षस पत्‍न्यांची मुखे चंद्राप्रमाणे प्रकाशमान दिसत होती आणि त्या सुंदर कुण्डलांनी विभूषित असून, जी कधी कोमजत नाहीत अशा फुलांचे हार त्यांनी घातलेले होते. ॥३१॥
नृत्तवादित्रकुशला राक्षसेन्द्रभुजाङ्कगाः ।
वराभरणधारिण्यो निषण्णा ददृशे कपिः ॥ ३२ ॥
त्या नृत्य करण्यांत आणि वाद्ये वाजविण्यात निपुण होत्या आणि राक्षसराज रावणाच्या हातांवर आणि माड्‍यांवर स्थान मिळविणार्‍या आणि सुंदर आभूषणांनी अलंकृत झालेल्या होत्या. कपिवर हनुमानानी त्या सर्वांना तेथे झोपलेल्या पाहिल्या. ॥३२॥
वज्रवैडूर्यगर्भाणि श्रवणान्तेषु योषिताम् ।
ददर्श तापनीयानि कुण्डलान्यङ्गदानि च ॥ ३३ ॥
हिरे आणि वैडूर्यमणी ज्यात बसविलेले आहेत अशी स्त्रियांची सुवर्णकुण्डले आणि रावणाच्या हातातील बाहुभूषणे ही दोन्ही स्त्रियांच्या कानापाशीच आहेत असे हनुमानानी पाहिले. ॥३३॥
तासां चंद्रोपमैर्वक्त्रैः शुभैर्ललितकुण्डलैः ।
विरराज विमानं तन् नभस्तारागणैरिव ॥ ३४ ॥
ललित कुण्डलांनी अलंकृत तसेच चंद्रासारख्या मनोहर सुंदर अशा त्या स्त्रियांच्या मुखांनी तो विमानाच्या आकाराच्या पलंग तारकांनी सुशोभित अशा आकाशाप्रमाणे शोभत होता. ॥३४॥
मदव्यायामखिन्नास्ता राक्षसेन्द्रस्य योषितः ।
तेषु तेष्ववकाशेषु प्रसुप्तास्तनुमध्यमाः ॥ ३५ ॥
कृश कटिप्रदेश असलेल्या राक्षसराजाच्या त्या स्त्रिया मद आणि रतिक्रीडा इत्यादिच्या परिश्रमाने थकून जाऊन ठिकठिकाणी निद्रिस्त झाल्या होत्या. ॥३५॥
अङ्गहारैस्तथैवान्या कोमलैर्नृत्यशालिनी ।
विन्यस्तशुभसर्वाङ्गी प्रसुप्ता वरवर्णिनी ॥ ३६ ॥
विधात्याने जिचे सर्व अवयव सुंदर आणि विशेष शोभा संपन्न बनविले होते अशी एक नृत्य करण्यात कुशल असलेली उत्कृष्ट स्त्री मनोहर नृत्याचे हावभाव करता करताच झोपी गेलेली होती. ॥३६॥
काचिद् वीणां परिष्वज्य प्रसुप्ता संप्रकाशते ।
महानदीप्रकीर्णेव नलिनी पोतमाश्रिता ॥ ३७ ॥
तर दुसरी कुणी वीणा छातीशी धरून झोपी गेलेली सुंदर स्त्री जणु काय महानदीत पडलेली, जिची पुष्पे आणि पाने अस्ताव्यस्त पडली आहेत आणि जी नावेचा आधार घेऊन राहिली आहे अशा कमलिनी प्रमाणे दिसत होती. ॥३७॥
अन्या कक्षगतेनैव मड्डुकेनासितेक्षणा ।
प्रसुप्ता भामिनी भाति बालपुत्रेव वत्सला ॥ ३८ ॥
काखेमध्ये मंडुक (एक लघुवाद्य विशेष) वाद्य जसेच्या तसे धरून झोपी गेलेली दुसरी कुणी कृष्णनयना स्त्री आपले लहान मूल कुशीत घेऊन झोपी गेलेल्या पुत्रवत्सल माते प्रमाणे भासत होती. ॥३८॥
पटहं चारुसर्वाङ्गी न्यस्त शेते शुभस्तनी ।
चिरस्य रमणं लब्ध्वा परिष्वज्येव कामिनी ॥ ३९ ॥
जिचे सर्व अवयव मनोहर असून स्तन उत्कृष्ट आहेत अशी एक सुंदर स्त्री पुष्कळ दिवसांनी गाठ पडल्यामुळे प्रियकराला गाढ आलिंगन देऊन शयन करणार्‍या भामिनी प्रमाणे डग्ग्यालाच (वाद्य पट्‍हम) हृदयाशी धरून झोपी गेली होती. ॥३९॥
काचिद् वीणां परिष्वज्य सुप्ता कमललोचना ।
रहः प्रियतमं गृह्य सकामेव हि कामिनी ॥ ४० ॥
कुणी कमळनयना युवती वीणेलाच आलिंगन देऊन झोपल्याने कामभावनेने युक्त कामिनी आपल्या श्रेष्ठ प्रियतमाला आपल्या बाहूंनी आलिंगन देऊन झोपी गेल्याप्रमाणे भासत होती. ॥४०॥
विपञ्चीं परिगृह्यान्या नियता नृत्यशालिनी ।
निद्रावशमनुप्राप्ता सह कान्तेव भामिनी ॥ ४१॥
नियमपूर्वक नृत्य कलेने सुशोभित होणारी एक अन्य युवती विपंचीला (विशेष प्रकारची वीणा) मांडीवर घेऊन प्रियतमाबरोबर झोपी जाणार्‍या प्रेयसीप्रमाणे निद्राधीन झाली होती. ॥४१॥
अन्या कनकसङ्काशैः मृदुपीनैर्मनोरमैः ।
मृदङ्गं परिविद्‌ध्याङ्गैः प्रसुप्ता मत्तलोचना ॥ ४२ ॥
सुवर्णाप्रमाणे उज्ज्वळ, मृदु आणि पुष्ट अवयवांची आणि मदामुळे डोळे धुंद झालेले आहेत अशी दुसरी सुंदर युवती मृदुंगालाच कवटाळून गाढ झोपी गेली होती. ॥४२॥
भुजपाशान्तरस्थेन कक्षगेन कृशोदरी ।
पणवेन सहानिंद्या सुप्ता मदकृतश्रमा ॥ ४३ ॥
जिच्या स्वरूपाला नावे ठेवण्यास कोठेही जागा नाही आणि जी कृशोदरी आहे अशी एक नशेमुळे थकून गेलेली सुंदर रमणी काखेमध्ये असलेले पणव वाद्य दोन्ही हातांनी कवटाळून धरून झोपी गेली होती. ॥४३॥
डिण्डिमं परिगृह्यान्या तथैवासक्तडिण्डिमा ।
प्रसुप्ता तरुणं वत्सं उपगुह्येव भामिनी ॥ ४४ ॥
पाठीशी डिंडिम वाद्य बांधून व दुसरे एक डिंडिम वाद्य पुढे कवटाळून धरून जी एक स्त्री शयन करीत होती, ती पाठीशी तरूण पतीला घेऊन आणि पुढे लहान मूल घेऊन निद्रा घेत असलेल्या स्त्रीप्रमाणे भासत होती. ॥४४॥
काचिदाडंबरं नारी भुजसंभोगपीडितम् ।
कृत्वा कमलपत्राक्षी प्रसुप्ता मदमोहिता ॥ ४५ ॥
मदिरेच्या मदाने मोहीत झालेली कुणी कमळनयना स्त्री आडंबर नामक वाद्याला आपल्या भुजांनी आलिंगनद्वारा दाबून धरूनच प्रगाढ निद्रेमध्ये निमग्न झाली होती. ॥४५॥
कलशीमपविध्यान्या प्रसुप्ता भाति भामिनी ।
वसंते पुष्पशबला मालेव परिमार्जिता ॥ ४६ ॥
दुसरी कुणी एक युवती झोपेमध्ये जलपात्र (सुरई) अंगावर पडून भिजलेल्या अवस्थेतच बेशुद्ध होऊन झोपी गेली होती. त्या अवस्थेमध्ये ती वसंत ऋतुमध्ये टवटवी येण्याकरितां पाणी शिंपडून ठेवलेल्या चित्रविचित्र पुष्पांच्या माळे प्रमाणे दिसत होती. ॥४६॥
पाणिभ्यां च कुचौ काचित् सुवर्णकलशोपमौ ।
उपगूह्याबला सुप्ता निद्राबलपराजिता ॥ ४७ ॥
निद्रेच्या अधीन झालेली दुसरी एक अबला सुवर्णकळशाप्रमाणे असणारे आपले स्तन आपल्याच हातांनी घट्‍ट धरून झोपी गेली होती. ॥४७॥
अन्या कमलपत्राक्षी पूर्णेन्दुसदृशानना ।
अन्यामालिङ्ग्य सुश्रोणीं प्रसुप्ता मदविह्वला ॥ ४८ ॥
पूर्ण चंद्राप्रमाणे मनोहर मुख आणि कमळपत्राप्रमाणे विशाल नेत्र असणारी कामिनी, सुंदर नितंब असणार्‍या दुसर्‍या कुणा सुंदर स्त्रीला आलिंगन देऊन, मदाने विह्वळ होऊन झोपी गेली होती. ॥४८॥
आतोद्यानि विचित्राणि परिष्वज्य वरस्त्रियः ।
निपीड्य च कुचैः सुप्ताः कामिन्यः कामुकानिव ॥ ४९ ॥
आपल्या स्तनांनी आपल्या कामुक पतीना दृढ आलिंगन देऊन कामुक स्त्रिया ज्याप्रमाणे निद्रा घेत असतात, त्याप्रमाणे नाना प्रकारची वाद्यें हृदयाशी धरून उत्कृष्ट स्त्रिया तेथे निद्रा घेत होत्या. ॥४९॥
तासामेकान्तविन्यस्ते शयानां शयने शुभे ।
ददर्श रूपसंपन्नां अथ तां स कपिः स्त्रियम् ॥ ५० ॥
नंतर त्या सर्व शय्यांपासून पृथक दूर एकांतात पसरलेल्या एका सुंदर शय्येवर शयन करीत असलेली एक रूपसंपन्न युवती हनुमंतानी पाहिली. ॥५०॥
मुक्तामणिसमायुक्तैः भूषणैः सुविभूषिताम् ।
विभूषयंतीमिव च स्वश्रिया भवनोत्तमम् ॥ ५१॥
ती मोती आणि रत्‍ने यांच्या आभूषणांनी उत्कृष्ट रीतीने अलंकृत झालेली होती आणि आपल्या अंगकांतीने त्या उत्कृष्ट गृहाला शोभा आणीत होती. ॥५१॥
गौरीं कनकवर्णाभां इष्टामंतः पुरेश्वरीम् ।
कपिर्मंदोदरीं तत्र शयानां चारुरूपिणीम् ॥ ५२ ॥

स तां दृष्ट्वा महाबाहुः भूषितां मारुतात्मजः ।
तर्कयामास सीतेति रूपयौवनसंपदा ।
हर्षेण महता युक्तो ननंद हरियूथपः ॥ ५३ ॥
ती गौर वर्णाची होती. तिची अंगकांती सोन्या प्रमाणे चमकत होती. ती रावणाची प्रियतमा आणि त्याच्या अंतःपुराची स्वामिनी होती. तिचे नाव मंदोदरी होते. ती आपल्या मनोहर रूपाने अत्यंत शोभून दिसत होती. ती तेथेच झोपलेली होती. हनुमंतानी तिला पाहिले. रूप आणि यौवन संपत्तियुक्त आणि वस्त्रालंकारांनी विभूषित मंदोदरीला पाहून महाबाहु पवनकुमार हनुमंतानी अनुमान केले की ही सीताच आहे, मग तर ते वानरयूथपति हनुमान महान हर्षाने युक्त होऊन आनंदमग्न झाले. ॥५२-५३॥
आस्फोटयामास चुचुम्ब पुच्छं
ननंद चिक्रीड जगौ जगाम ।
स्तंभानरोहन्निपपात भूमौ
निदर्शयन् स्वां प्रकृतिं कपीनाम् ॥ ५४ ॥
ते आपले पुच्छ आपटू लागले, त्याचे चुबंन घेऊ लागले, आपल्या वानर स्वभावाचे प्रदर्शन करीत आनंदित झाले. खेळू लागले, गाऊ लागले. इकडे तिकडे येरझारा घालू लागले. ते कधी खांबावर चढून जात तर कधी पृथ्वीवर उडी मारत असत. ॥५४॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये सुंदरकाण्डे दशमः सर्गः ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील सुंदरकाण्डाचा दहावा सर्ग पूरा झाला. ॥१०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP