श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ पञ्चत्रिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
हनुमत उत्पत्तिः, शैशवावस्थायां अस्य सूर्यराह्वैरावतोपर्याक्रमणं, इन्द्रस्य वज्रतो मारुतेः मूर्च्छनं, मरुतो रोषात् प्राणिनां दुःखं, तत् प्रसादनाय देवैः सह ब्रह्मणो वायोः पार्श्व आगमनम् -
हनुमानांची उत्पत्ति, शैशवावस्थेत त्यांचे सूर्य, राहू आणि ऐरावतावर आक्रमण, इंद्रांच्या वज्राने त्यांची मूर्च्छा, वायुच्या कोपाने संसारातील प्राण्यांना कष्ट आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी देवतांसहित ब्रह्मदेवांचे त्यांच्याजवळ जाणे -
अपृच्छत तदा रामो दक्षिणाशाश्रमं मुनिम् ।
प्राञ्जलिर्विनयोपेत इदमाह वचोऽर्थवत् ॥ १ ॥
तेव्हा भगवान्‌ रामांनी हात जोडून दक्षिण दिशेमध्ये निवास करणार्‍या अगस्त्य मुनिंना विनयपूर्वक ही अर्थयुक्त गोष्ट सांगितली - ॥१॥
अतुलं बलमेतद् वै वालिनो रावणस्य च ।
न त्वेताभ्यां हनुमता समं त्विति मतिर्मम ॥ २ ॥
महर्षे ! यात संदेह नाही कि वाली आणि रावणाच्या या बळाची कोठे तुलना होऊ शकत नाही. परंतु माझा असा विचार आहे की या दोघांचेही बल सुद्धा हनुमंताच्या बळाची बरोबरी करू शकत नाही. ॥२॥
शौर्यं दाक्ष्यं बलं धैर्यं प्राज्ञता नयसाधनम् ।
विक्रमश्च प्रभावश्च हनूमति कृतालयाः ॥ ३ ॥
शूरता, दक्षता, बल, धैर्य, बुद्धिमत्ता, नीति, पराक्रम आणि प्रभाव या सर्व सद्‍गुणांनी हनुमंताच्या अंतरात घर केलेले आहे. ॥३॥
दृष्ट्‍वैव सागरं वीक्ष्य सीदन्तीं कपिवाहिनीम् ।
समाश्वास्य महाबाहुः योजनानां शतं प्लुतः ॥ ४ ॥
समुद्राला पाहूनच वानरसेना घाबरून गेली आहे हे पाहून ह्या महाबाहु वीरांनी तिला धीर देऊन एकाच झेपेमध्ये शंभर योजनांचा समुद्र ओलांडला. ॥४॥
धर्षयित्वा पुरीं लङ्‌कां रावणान्तःपुरं तदा ।
दृष्ट्‍वा सम्भाषिता चापि सीता ह्याश्वासिता तथा ॥ ५ ॥
नंतर लंकापुरीच्या आधिदैविक रूपाला परास्त करून ते रावणाच्या अंतःपुरात गेले, सीतेला भेटले, तिच्याशी बोलले आणि तिला आश्वासन देऊन धीर दिला. ॥५॥
सेनाग्रगा मन्त्रिसुताः किङ्‌करा रावणात्मजः ।
एते हनुमता तत्र एकेन विनिपातिताः ॥ ६ ॥
तेथे अशोकवनात त्यांनी एकट्‍यानेच रावणाचे सेनापति, मंत्रीसुत, किंकर तसेच रावणपुत्र अक्षाला ठार मारले. ॥६॥
भूयो बन्धाद् विमुक्तेन भाषयित्वा दशाननम् ।
लङ्‌का भस्मीकृता येन पावकेनेव मेदिनी ॥ ७ ॥
नंतर हे मेघनादाच्या नागपाशाने बांधले गेले आणि स्वतःच मुक्तही झाले. त्यानंतर त्यांनी रावणाशी वार्तालाप केला. ज्याप्रमाणे प्रलयकालच्या अग्निने ही सारी पृथ्वी जाळली होती त्याप्रकारे यांनी लंकापुरीला जाळून भस्म करून टाकले. ॥७॥
न कालस्य न शक्रस्य न विष्णोर्वित्तपस्य च ।
कर्माणि तानि श्रूयन्ते यानि युद्धे हनूमतः ॥ ८ ॥
युद्धात हनुमतांचे जे पराक्रम दिसून आले आहेत तशी वीरतापूर्ण कर्मे, काळाची, इंद्रांची, भगवान्‌ विष्णुंची आणि वरूणांचीही ऐकण्यात येत नाहीत. ॥८॥
एतस्य बाहुवीर्येण लङ्‌का सीता च लक्ष्मणः ।
प्राप्ता मया जयश्चैव राज्यं मित्राणि बान्धवाः ॥ ९ ॥
मुनीश्वर ! मी तर यांच्याच बाहुबळाने विभीषणासाठी लंका, शत्रूंवर विजय, अयोध्येचे राज्य तसेच सीता, लक्ष्मण, मित्र आणि बंधुजनांना प्राप्त केले आहे. ॥९॥
हनूमान्यदि मे नः स्याद् वानराधिपतेः सखा ।
प्रवृत्तिमपि को वेत्तुं जानक्याः शक्तिमान् भवेत् ॥ १० ॥
जर मला वानरराज सुग्रीवांचे सखा हनुमान भेटले नसते तर जानकीचा शोध घेण्यामध्ये कोण समर्थ होऊ शकला असता ? ॥१०॥
किमर्थं वाली चैतेन सुग्रीवप्रियकाम्यया ।
तदा वैरे समुत्पन्ने न दग्धो वीरुधो यथा ॥ ११ ॥
ज्यावेळी वाली आणि सुग्रीवात विरोध उत्पन्न झाला, त्यासमयी सुग्रीवांचे प्रिय करण्यासाठी यांनी जसे दावानल वृक्षास जाळून टाकतो, त्याप्रकारे वालीला का भस्म केले नाही ? हे समजून येत नाही. ॥११॥
नहि वेदितवान् मन्ये हनूमानात्मनो बलम् ।
यद्दृष्टवाञ्जीवितेष्टं क्लिश्यन्तं वानराधिपम् ॥ १२ ॥
मी तर असे मानतो की त्यासमयी हनुमंतास आपल्या बळाचा पत्ताच नव्हता. म्हणूनच हे आपल्या प्राणाहूनही प्रिय वानरराज सुग्रीवांना कष्ट सोसतांना पाहात राहिले होते. ॥१२॥
एतन्मे भगवन् सर्वं हनूमति महामुने ।
विस्तरेण यथातत्त्वं कथयामरपूजित ॥ १३ ॥
देववंद्य महामुने ! भगवन्‌ ! आपण हनुमंतांच्या विषयी या सर्व गोष्टी यथार्थरूपाने विस्तारपूर्वक सांगाव्या. ॥१३॥
राघवस्य वचः श्रुत्वा हेतुयुक्तमृषिस्ततः ।
हनूमतः समक्षं तं इदं वचनमब्रवीत् ॥ १४ ॥
राघवांचे हे युक्तियुक्त वचन ऐकून महर्षि अगस्त्य हनुमंतांच्या समोरच त्यांना याप्रकारे बोलले - ॥१४॥
सत्यमेतद् रघुश्रेष्ठ यद् ब्रवीषि हनूमतः ।
न बले विद्यते तुल्यो न गतौ न मतौ परः ॥ १५ ॥
रघुकुलतिलक श्रीरामा ! हनुमंताविषयी आपण जे काही सांगता आहात, हे सर्व सत्यच आहे. बल, बुद्धि आणि गतिमध्ये यांची बरोबरी करणारा दुसरा कोणी नाही आहे. ॥१५॥
अमोघशापैः शप्तस्तु दत्तोऽस्य मुनिभिः पुरा ।
न वेत्ता हि बलं येन बली संनरिमर्दनः ॥ १६ ॥
शत्रुसूदन रघुनंदना ! ज्यांचा शाप कधी व्यर्थ ठरत नाही अशा मुनिंनी पूर्वकाळी यांना असा शाप दिला होता की बळ असूनही यांना आपल्या पूर्‍या बळाचा पत्ताच लागणार नाही. ॥१६॥
बाल्येऽप्येतेन यत्कर्म कृतं राम महाबल ।
तन्न वर्णयितुं शक्यं इति बालतयास्यते ॥ १७ ॥
महाबली श्रीरामा ! यांनी बालपणीच जे महान्‌ कर्म केले होते, त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही. त्या काळात ते बालभावात अज्ञानी बालकाप्रमाणे राहात होते. ॥१७॥
यदि वाऽस्ति त्वभिप्रायः संश्रोतुं तव राघव ।
समाधाय मतिं राम निशामय वदाम्यहम् ॥ १८ ॥
राघवा ! जर हनुमंतांचे चरित्र ऐकण्याची आपली हार्दिक इच्छा असेल तर मग चित्त एकाग्र करून ऐकावे. मी सर्व गोष्टी सांगत आहे. ॥१८॥
सूर्यदत्तवरस्वर्णः सुमेरुर्नाम पर्वतः ।
यत्र राज्यं प्रशास्त्यस्य केसरी नाम वै पिता ॥ १९ ॥
भगवान्‌ सूर्याच्या वरदानाने ज्याचे स्वरूप सुवर्णमय झालेले आहे असा एक सुमेरू नावाने प्रसिद्ध पर्वत आहे, जेथे हनुमंताचे पिता केसरी राज्य करीत होते. ॥१९॥
तस्य भार्या बभूवेष्टा अञ्जनेति परिश्रुता ।
जनयामास तस्यां वै वायुरात्मजमुत्तमम् ॥ २० ॥
त्यांची अञ्जना नावाने विख्यात प्रियतमा पत्‍नी होती. तिच्या गर्भापासून वायुदेवांनी एका उत्तम पुत्राला जन्म दिला. ॥२०॥
शालिशूकनिभाभासं प्रासूतामुं तदाऽञ्जना ।
फलान्याहर्तुकामा वै निष्क्रान्ता गहने वरा ॥ २१ ॥
अञ्जनाने जेव्हा यांना जन्म दिला त्या समयी यांची अंगकांती थंडीत उत्पन्न होणार्‍या धान्याच्या अग्रभागाप्रमाणे पिंगट वर्णाची होती. एक दिवस माता अञ्जना फळे आणण्यासाठी आश्रमांतून निघाली आणि गहन वनांत निघून गेली. ॥२१॥
एष मातुर्वियोगाच्च क्षुधया च भृशार्दितः ।
रुरोद शिशुरत्यर्थं शिशुः शरवणे यथा ॥ २२ ॥
त्यामुळे मातेचा वियोग झाल्याने आणि भुकेने अत्यंत पीडित झाल्यामुळे शिशु हनुमान्‌, पूर्वकाळी कुमार कार्तिकेय जसे बोरूच्या वनात रडत होते त्याप्रमाणे जोरजोराने रडू लागले. ॥२२॥
तदोद्यन्तं विवस्वन्तं जपापुष्पोत्करोपमम् ।
ददर्श फललोभाच्च ह्युत्पपात रविं प्रति ॥ २३ ॥
इतक्यातच यांनी जपाकुसूमाप्रमाणे लाल रंगाच्या सूर्यदेवांना उदित होत असतांना पाहिले. हनुमंताना ते एखादे फळ वाटले आणि हे त्या फळाच्या लोभाने सूर्याकडे झेपावले. ॥२३॥
बालार्काभिमुखो बालो बालार्क इव मूर्तिमान् ।
ग्रहीतुकामो बालार्कं प्लवतेऽम्बरमध्यगः ॥ २४ ॥
बालसूर्याकडे तोंड करून मूर्तिमंत बालसूर्याप्रमाणेच बालक हनुमान्‌ बालसूर्याला पकडण्याच्या इच्छेने आकाशांतून उडत उडत जात होते. ॥२४॥
एतस्मिन् प्लवमाने तु शिशुभावे हनूमति ।
देवदानवयक्षाणां विस्मयः सुमहानभूत् ॥ २५ ॥
शैशवावस्थेमध्ये हनुमान्‌ जेव्हा याप्रकारे उडत राहिले होते, त्यासमयी त्यांना पाहून देवता, दानव तसेच यक्षांना फार विस्मय वाटला. ॥२५॥
नाप्येवं वेगवान् वायुः गरुडो वा मनस्तथा ।
यथाऽयं वायुपुत्रस्तु क्रमतेऽम्बरमुत्तमम् ॥ २६ ॥
ते विचार करू लागले - हा वायु-पुत्र ज्याप्रकारे उंच आकाशात वेगपूर्वक उडत जात आहे, असा वेग तर वायुमध्ये नाही, गरूडामध्ये नाही आणि मनांतही नाही. ॥२६॥
यदि तावच्छिशोरस्य ईदृशो गतिविक्रमः ।
यौवनं बलमासाद्य कथं वेगो भविष्यति ॥ २७ ॥
जर बाल्यावस्थेमध्येच या शिशुचा असा वेग आणि पराक्रम आहे तर तारूण्याचे बळ मिळाल्यावर याचा वेग कसा होईल. ॥२७॥
तमनुप्लवते वायुः प्लवन्तं पुत्रमात्मनः ।
सूर्यदाहभयाद् रक्षन् तुषारचयशीतलः ॥ २८ ॥
आपल्या पुत्राला सूर्याकडे जातांना पाहून त्याला दाहाच्या भयापासून वाचविण्यासाठी त्या समयी वायुदेवही बर्फाच्या राशिप्रमाणे शीतल होऊन त्याच्या मागोमाग जाऊ लागले. ॥२८॥
बहुयोजनसाहस्रं क्रामन्नेव गतोम्बरम् ।
पितुर्बलाच्च बाल्याच्च भास्कराभ्याशमागतः ॥ २९ ॥
याप्रकारे बालक हनुमान्‌ आपल्या आणि पित्याच्या बळाने कित्येक सहस्त्र योजने आकाशास ओलांडून निघून गेले आणि सूर्यदेवाच्या समीप जाऊन पोहोचले. ॥२९॥
शिशुरेष त्वदोषज्ञ इति मत्वा दिवाकरः ।
कार्यं चात्र समायत्तमिं इवं न ददाह सः ॥ ३० ॥
सूर्यदेवांनी असा विचार करून की अद्याप हा बालक आहे, याला गुणदोषाचे ज्ञान नाही याच्या अधीन देवतांचे बरेचसे भावी कार्य आहे - यांना जाळले नाही. ॥३०॥
यमेव दिवसं ह्येष ग्रहीतुं भास्करं प्लुतः ।
तमेव दिवसं राहुः जिघृक्षति दिवाकरम् ॥ ३१ ॥
ज्या दिवशी हनुमान्‌ सूर्यदेवाला पकडण्यासाठी झेपावले होते त्याच दिवशी राहु सूर्यदेवावर ग्रहण लावण्याची इच्छा करत होता. ॥३१॥
अनेन स परामृष्टो राम सूर्यरथोपरि ।
अपक्रान्तस्तः तत्त्रस्तो राहुश्चन्द्रार्कमर्दनः ॥ ३२ ॥
हनुमंतांनी सूर्याच्या रथाच्या वरील भागामध्ये जेव्हा राहुला स्पर्श केला तेव्हा चंद्रमा आणि सूर्याचे मर्दन करणारा राहू भयभीत होऊन तेथून पळून गेला. ॥३२॥
स इन्द्रभवनं गत्वा सरोषः सिंहिकासुतः ।
अब्रवीद्‌भ्रुकुटिं कृत्वा देवं देवगणैर्वृतम् ॥ ३३ ॥
सिंहिकेचा तो पुत्र रोषाने भरून इंद्रांच्या भवनात गेला आणि देवतांनी घेरलेल्या इंद्रांसमोर भुवया चढवून असे म्हणाला - ॥३३॥
बुभुक्षापनयं दत्त्वा चन्द्रार्कौ मम वासव ।
किमिदं तत् त्वया दत्तं अन्यस्य बलवृत्रहन् ॥ ३४ ॥
बल आणि वृत्रासुराचा वध करणार्‍या वासवा ! आपण चंद्रमा आणि सूर्याला मला आपली भूक दूर करण्याच्या साधनाच्या रूपाने दिले होते, परंतु आता आपण त्यांना दुसर्‍याच्या हवाली केले आहे. असे कां झाले ? ॥३४॥
अद्याहं पर्वकाले तु जिघृक्षुः सूर्यमागतः ।
अथान्यो राहुरासाद्य जग्राह सहसा रविम् ॥ ३५ ॥
आज पर्वाच्या (अमावस्येच्या) समयी मी सूर्यदेवास ग्रस्त करण्याचा इच्छेने गेलो होतो, इतक्यात दुसर्‍या राहूने येऊन एकाएकी सूर्याला पकडले आहे. ॥३५॥
स राहोर्वचनं श्रुत्वा वासवः सम्भ्रमान्वितः ।
उत्पपातासनं हित्वा उस्‌वहन् काञ्चनीं स्रजम् ॥ ३६ ॥
राहूचे हे वचन ऐकून देवराज इंद्र घाबरले आणि सोन्याची माळा धारण करून आपले सिंहासन सोडून एकाएकी उठून उभे राहिले. ॥३६॥
ततः कैलासकूटाभं चतुर्दन्तं मदस्रवम् ।
शृङ्‌गारधारिणं प्रांशुं स्वर्णघण्टाट्टहासिनम् ॥ ३७ ॥

इन्द्रः करीन्द्रमारुह्य राहुं कृत्वा पुरःसरम् ।
प्रायाद् यत्राभवत्सूर्यः सहानेन हनूमता ॥ ३८ ॥
नंतर कैलास शिखरासमान उज्ज्वळ, चार दातांनी विभूषित, मदाची धारा वहाविणार्‍या, नाना प्रकारच्या शृंगाराने युक्त, खूपच उंच आणि सुवर्णमयी घण्टांचा नादरूप अट्‍टहास करणार्‍या गजराज ऐरावतावर आरूढ होऊन देवराज इंद्र राहूला पुढे घालून, जेथे हनुमंतासह सूर्यदेव विराजमान होते त्या स्थानावर गेले. ॥३७-३८॥
अथातिरभसेनागाद् राहुरुत्सृज्य वासवम् ।
अनेन च स वै दृष्टः प्रधावञ्छैलकूटवत् ॥ ३९ ॥
इकडे राहु इंद्राला सोडून अत्यंत वेगाने पुढे निघाला. याचवेळी पर्वत-शिखरासमान आकाराच्या धावत येणार्‍या राहुला हनुमंताने पाहिले. ॥३९॥
ततः सूर्यं समुत्सृज्य राहुं फलमवेक्ष्य च ।
उत्पपात पुनर्व्योम ग्रहीतुं सिंहिकासुतम् ॥ ४० ॥
तेव्हा राहूलाच फलाच्या रूपात पाहून बालक हनुमान्‌ सूर्यदेवाला सोडून त्या सिंहिकापुत्रालाच पकडण्यासाठी पुन्हा आकाशात झेपावले. ॥४०॥
उत्सृज्यार्कमिमं राम प्रधावन्तं प्लवङ्‌गमम् ।
अवेक्ष्यैवं परावृत्तो मुखशेषः पराङ्‌मुखः ॥ ४१ ॥
रामा ! सूर्याला सोडून आपल्यावर हल्ला करणार्‍या त्या वानर हनुमानाला पहाताच राहु ज्याचे मुखमात्रच शेष होते, पाठीमागे वळून पळू लागला. ॥४१॥
इन्द्रमाशंसमानस्तु त्रातारं सिंहिकासुतः ।
इन्द्र इन्द्रेति संत्रासान् मुहुर्महुरभाषत ॥ ४२ ॥
त्यासमयी सिंहिकापुत्र राहु आपल्या रक्षक इंद्रांनाच आपले रक्षण करण्यास सांगून भयामुळे वारंवार इंद्र ! इंद्र ! अशा हाका मारू लागला. ॥४२॥
राहोर्विक्रोशमानस्य प्रागेवालक्षितं स्वरम् ।
श्रुत्वेन्द्रोवाच मा भैषीः अहमेनं निषूदये ॥ ४३ ॥
ओरडणार्‍या राहूचा स्वर प्रथमपासूनच ओळखीचा होता तो ऐकून इंद्र म्हणाले -घाबरू नको. मी या आक्रमण करणार्‍याला मारून टाकीन. ॥४३॥
ऐरावतं ततो दृष्ट्‍वा महत्तदिदमित्यपि ।
फलं मत्वा हस्तिराजं अभिदुद्राव मारुतिः ॥ ४४ ॥
त्यानंतर ऐरावताला पाहून त्यांनी (हनुमंतानी) त्यालाही एक विशाल फळ समजून त्या गजराजाला पकडण्‍यासाठी ते त्याच्याकडे धावले. ॥४४॥
तथास्य धावतो रूपं ऐरावतजिघृक्षया ।
मुहूर्तमभवद् घोरं इन्द्राग्न्योरिव भास्वरम् ॥ ४५ ॥
ऐरावताला पकडण्याच्या इच्छेने धावणार्‍या हनुमंतांचे रूप मुहूर्तभर इंद्र आणि अग्निसमान प्रकाशमान आणि भयंकर झाले. ॥४५॥
एवमाधावमानं तु नातिक्रुद्धः शचीपतिः ।
हस्तान्तादतिमुक्तेन कुलिशेनाभ्यताडयत् ॥ ४६ ॥
बालक हनुमंतास पाहून शचीपति इंद्रांना जास्त राग आला नाही. तरीही याप्रकारे हल्ला करणार्‍या बालक वानरावर इंद्रांनी आपल्या हातून सुटलेल्या वज्राद्वारा प्रहार केला. ॥४६॥
ततो गिरौ पपातैष इन्द्रवज्राभिताडितः ।
पतमानस्य चैतस्य वामा हनुरभज्यत ॥ ४७ ॥
इंद्रांच्या वज्राचा आघात लागताच ते एका पर्वतावर कोसळले. तेथे पडत असता त्यांची डावी हनुवटी तुटून गेली. ॥४७॥
तस्मिंस्तु पतिते चापि वज्रताडनविह्वले ।
चुक्रोधेन्द्राय पवनः प्रजानामहिताय सः ॥ ४८ ॥
वज्राच्या आघाताने व्याकुळ होऊन ते पडताच वायुदेव इंद्रांवर कुपित झाले. त्यांचा तो क्रोध प्रजाजनांसाठी अहितकारक झाला. ॥४८॥
प्रचारं स तु संगृह्य प्रजास्वन्तर्गतः प्रभुः ।
गुहां प्रविष्टः स्वसुतं शिशुमादाय मारुतः ॥ ४९ ॥
सामर्थ्यशाली मरुतांनी समस्त प्रजांमध्ये राहूनही तेथे आपली गति रोखून धरली आणि आपला शिशुपुत्र हनुमानास घेऊन ते पर्वताच्या गुफेत घुसले. ॥४९॥
विण्मूत्राशयमावृत्य प्रजानां परमार्तिकृत् ।
रुरोध सर्वभूतानि यथा वर्षाणि वासवः ॥ ५० ॥
जसे इंद्र वृष्टि रोखून धरतात त्याचप्रकारे त्या वायुदेवांनी प्रजाजनांचे मलाशय आणि मूत्राशय रोखून धरून त्यांना खूप पीडा देण्यास सुरूवात केली. त्यांनी संपूर्ण भूतांच्या प्राण-संचाराचा अवरोध केला. ॥५०॥
वायुप्रकोपाद् भूतानि निरुच्छ्वासानि सर्वतः ।
सन्धिभिर्भिद्यमानैश्च काष्ठभूतानि जज्ञिरे ॥ ५१ ॥
वायुच्या प्रकोपाने समस्त प्राण्यांचा श्वास बंद होऊ लागला. त्यांच्या सर्व अंगातील जोड तुटू लागले आणि ते सर्वच्या सर्व लाकडासमान निश्चेष्ट झाले. ॥५१॥
निःस्वाध्यायवषट्कारं निष्क्रियं धर्मवर्जितम् ।
वायुप्रकोपात् त्रैलोक्यं निरयस्थमिवाभवत् ॥ ५२ ॥
तीन्ही लोकात कुठेही वेदांचा स्वाध्याय होत नव्हता अथवा यज्ञ होत नव्हता. सर्व धर्म-कर्मे बंद झाली. त्रिभुवनातील प्राण्यांना असे कष्ट होऊ लागले की जणु नरकांतच पडले असावेत. ॥५२॥
ततः प्रजाः सगन्धर्वाः सदेवासुरमानुषाः ।
प्रजापतिं समाधावन् दुखिताश्च सुखेच्छया ॥ ५३ ॥
तेव्हा गंधर्व, देवता, असुर आणि मनुष्य आदि सर्व प्रजा व्यथित होऊन सुख मिळविण्याच्या इच्छेने प्रजापति ब्रह्मदेवांजवळ धावत गेली. ॥५३॥
ऊचुः प्राञ्जलयो देवा महोदरनिभोदराः ।
त्वया नु भगवन् सृष्टाः प्रजानाथ चतुर्विधाः ॥ ५४ ॥

त्वया दत्तोऽयमस्माकं आयुषः पवनः पतिः ।
सोऽस्मान् प्राणेश्वरो भूत्वा कस्मादेषोऽद्य सत्तम ॥ ५५ ॥

रुरोध दुःखं जनयन् अन्तःपुर इव स्त्रियः ।
त्या समयी देवतांची पोटे अशी फुगली होती की जणु त्यांना महोदराचा रोग झाला होता. त्यांनी हात जोडून म्हटले - भगवन्‌ ! स्वामिन्‌ ! आपण चार प्रकारच्या प्रजांची सृष्टि केली आहे. आपण आम्हा सर्वांना आमच्या आयुष्याच्या अधिपतिच्या रूपामध्ये वायुदेवांना अर्पित केले आहे. साधुशिरोमणे ! हे पवनदेव आमच्या प्राणांचे ईश्वर आहेत तरीही काय कारण आहे की आज त्यांनी अंतःपुरामध्ये स्त्रियांप्रमाणे आमच्या शरीरामधील आपला संचार रोखून धरला आहे. आणि याप्रकारे हे आमच्यासाठी दुःखदायक झाले आहेत. ॥५४-५५ १/२॥
तस्मात्त्वां शरणं प्राप्ता वायुनोहता वयम् ॥ ५६ ॥

वायुसंरोधजं दुःखं इदं नो नुद दुःखहन् ।
वायुने पीडित होऊन आज आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. दुःखहारी प्रजापते ! आपण आमचे हे वायुरोधजनित दुःख दूर करावे. ॥५६ १/२॥
एतत्प्रजानां श्रुत्वा तु प्रजानाथः प्रजापतिः ॥ ५७ ॥

कारणादिति चोक्त्वासौ प्रजाः पुनरभाषत ।
प्रजाजनांचे हे म्हणणे ऐकून त्यांचे पालक आणि रक्षक ब्रह्मदेवांनी म्हटले -यात काही कारण आहे; असे म्हणून ते परत प्रजाजनांना म्हणाले - ॥५७ १/२॥
यस्मिंश्च कारणे वायुं चुक्रोध च रुरोध च ॥ ५८ ॥

प्रजाः शृणुध्वं तत्सर्वं श्रोतव्यं चात्मनः क्षमम् ।
प्रजांनो ! ज्या कारणांनी वायुदेवतेने क्रोध आणि आपल्या गतिचा अवरोध केला आहे, ते मी सांगतो, ऐका ! ते कारण तुम्ही ऐकण्यायोग्य आणि उचित आहे. ॥५८ १/२॥
पुत्रस्तस्यामरेशेन इन्द्रेणाद्य निपातितः ॥ ५९ ॥

राहोर्वचनमास्थाय ततः स कुपितोऽनिलः ।
आज देवराज इंद्रांनी राहूचे वचन ऐकून वायुच्या पुत्राला मारून टाकले आहे, म्हणून ते कुपित झाले आहेत. ॥५९ १/२॥
अशरीरः शरीरेषु वायुश्चरति पालयन् ॥ ६० ॥

शरीरं हि विना वायुं समतां याति दारुभिः ।
वायुदेव स्वतः शरीर धारण न करता समस्त शरीरांमध्ये त्यांचे रक्षण करीत विचरण करतात. वायुशिवाय हे शरीर वाळलेल्या लाकडाप्रमाणे होऊन जाते. ॥६० १/२॥
वायुः प्राणः सुखं वायुः वायुः सर्वमिदं जगत् ॥ ६१ ॥

वायुना सम्परित्यक्तं न सुखं विन्दते जगत् ।
वायु हाच सर्वांचा प्राण आहे. वायुच सुख आहे आणि वायुच हे संपूर्ण जगत आहे. वायुकडून परित्यक्त होऊन जगत्‌ कधी सुख प्राप्त करू शकत नाही. ॥६१ १/२॥
अद्यैव च परित्यक्तं वायुना जगदायुषा ॥ ६२ ॥

अद्यैव ते निरुच्छ्वासाः काष्ठकुड्योपमाः स्थिताः ।
वायुच जगताचे आयु आहे. या समयी वायुने संसारातील प्राण्यांचा त्याग केला आहे. म्हणून ते सर्वच्या सर्व निष्प्राण होऊन लाकडाप्रमाणे आणि भिंतीप्रमाणे झाले आहेत. ॥६२ १/२॥
तद्यामस्तत्र यत्रास्ते मारुतो रुक्प्रदो हि नः ।
मा विनाशं गमिष्याम अप्रसाद्यादितेः सुताः ॥ ६३ ॥
अदिति पुत्रांनो ! म्हणून आत्ता आपण जेथे आपणा सर्वांना पीडा देणारे वायुदेव लपून बसले आहेत त्या स्थानावर गेले पाहिजे. असे कधी न होवो की त्यांना प्रसन्न न केल्याने आपला सर्वांचा विनाश व्हावा. ॥६३॥
ततः प्रजाभिः सहितः प्रजापतिः
सदेवगन्धर्वभुजङ्‌गगुह्यकैः ।
जगाम तत्रास्यति यत्र मारुतः
सुतं सुरेन्द्राभिहतं प्रगृह्य सः ॥ ६४ ॥
त्यानंतर देवता, गंधर्व, नाग आणि गुह्यक आदि प्रजांना बरोबर घेऊन प्रजापति ब्रह्मदेव जेथे वायुदेव इंद्रद्वारा मारल्या गेलेल्या आपल्या पुत्राला घेऊन बसले होते त्या स्थानावर गेले. ॥६४॥
ततोऽर्कवैश्वानरकाञ्चनप्रभं
सुतं तदोत्सङ्‌गगतं सदागतेः ।
चतुर्मुखो वीक्ष्य कृपामथाकरोत्
सदेवगन्धर्वर्षियक्षराक्षसैः ॥ ६५ ॥
त्यानंतर चतुर्मुख ब्रह्मदेवांनी देवता, गंधर्व, ऋषि, यक्ष तसेच राक्षसांसह तेथे पोहोचून वायुदेवांच्या मांडीवर झोपलेल्या त्यांच्या पुत्राला पाहिले, ज्यांची अंगकान्ति सूर्य, अग्नि आणि सुवर्णसमान प्रकाशित होत होती. त्याची तशी दशा पाहून ब्रह्मदेवांना त्याची फार दया आली. ॥६५॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे पंचत्रिंशः सर्गः ॥ ३५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा पस्तीसावा सर्ग पूरा झाला. ॥३५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP