[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ षट्पञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
पुनः सीता समालोक्य हनुमतो लङ्‌कातो निवर्तनं तेन समुद्रस्य लंघनं च -
हनुमानांचे पुन्हा सीतेला भेटून परत फिरणे आणि समुद्र ओलांडणे -
ततस्तु शिंशुपामूले जानकीं पर्यवस्थिताम् ।
अभिवाद्याब्रवीद् दिष्ट्या पश्यामि त्वामिहाक्षताम् ॥ १ ॥
त्यानन्तर शिंशपा वृक्षाखाली बसलेल्या जानकीला अभिवन्दन करून हनुमान तिला म्हणाले- परम भाग्याने मी आज तुला कोठे ही दुखापत वगैरे न झालेली अशी सकुशल पहात आहे. ॥१॥
ततस्तं प्रस्थितं सीता वीक्षमाणा पुनः पुनः ।
भर्तुः स्नेहान्विता वाक्यं हनुमन्तमभाषत ॥ २ ॥
इतके बोलून परत निघालेल्या हनुमंताकडे, आपल्या पतिच्या ठिकाणी अनुपम प्रेम असलेली सीता वारंवार पाहू लागली आणि त्याला म्हणाली - ॥२॥
यदि त्वं मन्यसे तात वसैकाहमिहानघ ।
क्वचित् सुसंवृते देशे विश्रान्तः श्वो गमिष्यसि ॥ ३ ॥
हे तात ! निष्पाप वानरवीरा ! जर तुला उचित वाटत असेल तर तू आणखी एक दिवस एखाद्या गुप्त स्थानी थांबून राहा, आज विश्राम करून तू उद्या येथून निघून जा. ॥३॥
मम चैवाल्पभाग्यायाः सांनिध्यात् तव वानर ।
शोक्स्यास्याप्रमेयस्य मुहूर्तं स्यादपि क्षयः ॥ ४ ॥
वानर प्रवर ! तुझ्या सान्निध्यामुळे माझा मन्दभागीणीचा अपार शोक थोड्‍या वेळपुरता तरी कमी होईल. ॥४॥
गते हि हरिशार्दूल पुनः संप्राप्तये त्वयि ।
प्राणेष्वपि न विश्वासो मम वानरपुंगवः ॥ ५ ॥
हे कपिश्रेष्ठ ! हे वानरशिरोमणी ! ज्यावेळी तू येथून निघून जाशील त्यावेळी तू परत येईपर्यन्त तरी माझे प्राण राहातील अथवा नाही याचा काही भरवसा नाही. ॥५॥
अदर्शनं च ते वीर भूयो मां दारयिष्यति ।
दुःखाद् दुःखतरं प्राप्तां दुर्मनःशोककर्शिताम् ॥ ६ ॥
हे वीरा ! माझ्यावर दुःखामागून दुःखे येत आहेत. मी मानसिक शोकाने दिवसेन्दिवस दुर्बळ होत आहे. आता तुझे दर्शन न होणे (तू दृष्टीआड होणे हे दुःख माझ्या हृदयाला अधिकच विदीर्ण करीत राहील.) ॥६॥
अयं च वीर सन्देहस्तिष्ठतीव ममाग्रतः ।
सुमहत्सु सहायेषु हर्यृक्षेषु महाबलः ॥ ७ ॥

कथं नु खलु दुष्पारं सन्तरिष्यति सागरम् ।
तानि हर्यृक्षसैन्यानि तौ वा नरवरात्मजौ ॥ ८ ॥
हे वीरा ! माझ्या मनात अजूनही हा संशय आहेच की मोठ मोठे वानर आणि अस्वले सहाय्यक असूनही महाबली सुग्रीव हा दुर्लंघ्य समुद्रास कसे पार करतील ? त्यांच्या सैन्यातील ते वानर आणि अस्वल आणि हे दोन्ही राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मणही या महासागरास कसे ओलांडू शकतील ? ॥७-८॥
त्रयाणामेव भूतानां सागरस्यापि लंघने ।
शक्तिः स्याद् वैनतेयस्य तव वा मारुतस्य वा ॥ ९ ॥
तीनच प्राण्यांच्या मध्ये या समुद्राचे उल्लंघन करण्याची शक्ति आहे- तुझ्यात, गरूडात आणि वायुदेवतेमध्ये. ॥९॥
तदत्र कार्यनिर्बन्धे समुत्पन्ने दुरासदे ।
किं पश्यसि समाधानं त्वं हि कार्यविशारदः ॥ १० ॥
या कार्यासंबन्धी दुष्कर प्रतिबन्ध उत्पन्न झाल्यावर तुला काय उपाय दिसून येत आहे ? सांग बरे, कारण की तू कार्यकुशल आहेस. ॥१०॥
काममस्य त्वमेवैकः कार्यस्य परिसाधने ।
पर्याप्तः परवीरघ्न यशस्यस्ते फलोदयः ॥ ११ ॥
हे शत्रुपक्षीय वीरांचा संहार करणार्‍या कपिश्रेष्ठा ! यात संशय नाही की हे कार्य सिद्धिस नेण्यास खरोखर तूच एकटा समर्थ आहेस, परन्तु तुझ्या द्वारे जी विजयरूपी फळाची प्राप्ती होईल त्यामुळे तुझेच यश वाढेल, भगवान श्रीरामाचे नाही. ॥११॥
बलैस्तु सङ्‌‍कुलां कृत्वा लङ्‌‍कां परबलार्दनः ।
मां नयेद् यदि काकुत्स्थस्तत् तस्य सदृशं भवेत् ॥ १२ ॥
परन्तु शत्रूंच्या सेनेला पीडा देणारे काकुत्स्थ कुलोत्पन्न श्रीराम जर आपल्या बाणांनी लंकेला पददलित करतील (लंकेमध्ये दाणादाण उडवून देतील) आणि मला येथून घेऊन जातील तर ते त्यांना साजेसे होईल. ॥१२॥
तद् यथा तस्य विक्रान्तमनुरूपं महात्मनः ।
भवत्याहवशूरस्य तथा त्वमुपपादय ॥ १३ ॥
म्हणून त्या महात्मा युद्धवीर श्रीरामाला शोभेल असा पराक्रम त्यांच्या हातून प्रकट होईल असा उपाय तू कर. ॥१३॥
तदर्थोपहितं वाक्यं प्रश्रितं हेतुसंहितम् ।
निशम्य हनुमान् वीरो वाक्यमुत्तरमब्रवीत् ॥ १४ ॥
सीतेचे हे वचन स्नेहपूर्ण आणि विशेष अभिप्राय युक्त होते. ते ऐकून हनुमानाने तिला याप्रमाणे उत्तर दिले- ॥१४॥
देवि हर्यृक्षसैन्यानां ईश्वरः प्लवतां वरः ।
सुग्रीवः सत्त्वसम्पन्नस्तवार्थे कृतनिश्चयः ॥ १५ ॥
देवि ! वानर आणि अस्वलांच्या सैन्याचे स्वामी कपिश्रेष्ठ सुग्रीव अत्यन्त शक्तिशाली पुरुष आहेत. ते तुमच्या उद्धारासाठी प्रतिज्ञा करून चुकले आहेत. ॥१५॥
स वानरसहस्राणां कोटीभिरभिसंवृतः ।
क्षिप्रमेष्यति वैदेहि सुग्रीवः प्लवगाधिपः ॥ १६ ॥
हे विदेहनन्दिनी ! म्हणून ते वानरराज सुग्रीव हजारो कोटी वानरांनी घेरलेले लवकरच येथे येतील. ॥१६॥
तौ च वीरौ नरवरौ सहितौ रामलक्ष्मणौ ।
आगम्य नगरीं लङ्‌कां सायकैर्विधमिष्यतः ॥ १७ ॥
त्यांच्या बरोबरच ते दोघे वीर नरश्रेष्ठ श्रीराम आणि लक्ष्मणही एकाच वेळी येथे येऊन आपल्या बाणांनी या लङ्‌कापुरीचा विध्वंस करून टाकतील. ॥१७॥
सगणं राक्षसं हत्वा नचिराद् रघुनन्दनः ।
त्वामादाय वरारोहे स्वां पुरीं प्रति यास्यति ॥ १८ ॥
वरारोहे ! राक्षसराज रावणाला सैनिकांसहित काळाच्या स्वाधीन करून श्रीरघुनाथ आपल्याला बरोबर घेऊन लवकरच आपल्या पुरीला (अयोध्येला) जातील. ॥१८॥
समाश्वसिहि भद्रं ते भव त्वं कालकांक्षिणी ।
क्षिप्रं द्रक्ष्यसि रामेण निहतं रावणं रणे ॥ १९ ॥
म्हणून आपण धैर्य धारण करा. आपले कल्याण असो ! आपण समयाची प्रतिक्षा करा. रावण लवकरच रणभूमीवर श्रीरामांच्या हाती मारला जाईल हे आपण आपल्या डोळ्यांनी पहाल. ॥१९॥
निहते राक्षसेन्द्रे च सपुत्रामात्यबान्धवे ।
त्वं समेष्यसि रामेण शशांकेनेव रोहिणी ॥ २० ॥
पुत्र, मन्त्री आणि बन्धु बान्धवांसह रावण मारला गेल्यावर आपण, रोहिणी ज्याप्रमाणे चन्द्रास भेटते त्याप्रमाणे श्रीरामचन्द्रास भेटाल. ॥२०॥
क्षिप्रमेष्यति काकुत्स्थो हर्यृक्षप्रवरैर्युतः ।
यस्ते युधि विजित्यारीञ्छोकं व्यपनयिष्यति ॥ २१ ॥
तो म्हणाला- हे देवी ! वानर आणि अस्वलांच्या प्रमुख वीरांसह काकुत्स्थ श्रीराम लवकरच येथे येतील आणि युद्धात शत्रूंना जिंकून तुमचा सारा शोक दूर करतील. ॥२१॥
एवमाश्वास्य वैदेहीं हनुमान् मारुतात्मजः ।
गमनाय मतिं कृत्वा वैदेहीमभ्यवादयत् ॥ २२ ॥
वैदेही सीतेला याप्रकारे आश्वासन देऊन तेथून जाण्याचा विचार करून पवनपुत्र हनुमन्तांनी तिला प्रणाम केला. ॥२२॥
राक्षसान् प्रवरान् हत्वा नाम विश्राव्य चात्मनः ।
समाश्वास्य च वैदेहीं दर्शयित्वा परं बलम् ॥ २३ ॥

नगरीमाकुलां कृत्वा वञ्चयित्वा च रावणम् ।
दर्शयित्वा बलं घोरं वैदेहीं अभिवाद्यच ॥ २४ ॥

प्रतिगन्तुं मनश्चक्रे पुनर्मध्येन सागरम् ।
ते मोठमोठ्‍या राक्षसांना मारून आपल्या बळाचा परिचय देऊन ख्याती प्राप्त करून चुकले होते. त्यांनी सीतेला आश्वासन दिले, लङ्‌कापुरीला व्याकुळ केले आणि रावणाला संभ्रमित करून, त्याला आपले भयानक बळ दाखवून आणि वैदेहीला परत प्रणाम करून, पुन्हा समुद्र उल्लंघून परत जाण्याचा विचार केला. ॥२३-२४ १/२॥
ततः स कपिशार्दूलः स्वामिसन्दर्शनोत्सुकः ॥ २५ ॥

आरुरोह गिरिश्रेष्ठमरिष्टमरिमर्दनः ।
आता येथे त्यांच्यासाठी काहीही कार्य शिल्लक राहिले नव्हते म्हणून आपल्या स्वामीच्या दर्शनासाठी उत्सुक होऊन शत्रुमर्दन कपिश्रेष्ठ हनुमान पर्वतात श्रेष्ठ अशा अरिष्ठ नामक गिरीवर चढले. ॥२५ १/२॥
तुङ्‌‍गपद्मकजुष्टाभिर्नीलाभिर्वनराजिभिः ॥ २६ ॥

सोत्तरीयमिवाम्भोदैः शृङ्‌‍गान्तरविलम्बिभिः ।
उंच उंच पहाडांनी पताकाप्रमाणे नील वर्ण असलेल्या वृक्षांनी सेवित नीलवर्ण वनपंक्ती त्या पर्वतावर असल्यामुळे त्याने जणु नीलवस्त्र धारण केले आहे की काय असे वाटत होते. शिखरावरून लोंबणार्‍या मेघांमुळे त्याने श्याम वर्णाचे उत्तरीयच पांघरले आहे, असे भासत होते. ॥२६ १/२॥
बोध्यमानमिव प्रीत्या दिवाकरकरैः शुभैः ॥ २७ ॥

उन्मिषन्तमिवोद्धूतैलोचनैरिव धातुभिः ।
तोयौघनिःस्वनैर्मन्द्रैः प्राधीतमिव पर्वतम् ॥ २८ ॥
सूर्याचे सुखदायी किरण जणु प्रेमाने त्याला जागेच करीत आहेत की काय असे दिसत होते. नाना प्रकारचे धातु जणु काही त्याचे उघडलेले नेत्रच होते, ज्यांनी तो सर्व काही पहात असल्याप्रमाणे स्थित होता. पर्वतातील जलप्रवाहाच्या गंभीर घोषाने जणु तो पर्वत सत्वर वेदपाठच करीत आहे की काय असे वाटत होते. ॥२७-२८॥
प्रगीतमिव विस्पष्टं नानाप्रस्रवणस्वनैः ।
देवदारुभिरुद्धूतैरूर्ध्वबाहुमिव स्थितम् ॥ २९ ॥
झुळूझुळू वाहणार्‍या अनेकानेक जलप्रवाहाच्या कलकल नादामुळे तो अरिष्टगिरी स्पष्टपणे गीतच गात आहे असे भासत होते. उंच उंच देवदार वृक्षांमुळे तो पर्वत हात वर करूनच उभा राहिला आहे, असे वाटत होते. ॥२९॥
प्रपातजलनिर्घोषैः प्राक्रृष्टमिव सर्वतः ।
वेपमानमिव श्यामैः कम्पमानैः शरद्‌वनैः ॥ ३० ॥
सर्व बाजूनी पडत असलेल्या धबधब्यांच्या गंभीर ध्वनीने व्याप्त झाल्याने तेथे चहूबाजूने कोलाहल माजल्यासारखा भास होत होता. शरद-ऋतूतील श्याम वर्णाचे वृक्ष हलत असल्यामुळे तो पर्वत जणु काही कंपित झाल्यासारखा दिसत होता. ॥३०॥
वेणुभिमारुतोद्‌धूतैः कूजन्तमिव कीचकैः ।
निःश्वसन्तमिवामर्षाद् घोरैराशीविषोत्तमैः ॥ ३१ ॥
आत वारा भरलेल्या कीचक नावाच्या कळकामुळे (बांबूच्यामुळे) तो जणु अलगुज अथवा मधुर बांसरीच वाजवीत असावा, असे वाटत होते. भयानक विषधर सर्पांच्या फुस्कारण्यामुळे तो जणु सुस्कारे टाकीत आहे, असा भासत होता. ॥३१॥
नीहारकृतगंभीरैः ध्यायन्तमिव गह्वरैः ।
मेघपादनिभैः पादैः प्रक्रान्तमिव सर्वतः ॥ ३२ ॥
धुक्यामुळे दव पडल्यामुळे गंभीर वाटणार्‍या निश्चळ गुहांच्यामुळे तो जणु ध्यानस्थ बसल्यासारखा वाटत होता. मेघांच्या फाट्‍याप्रमाणे असलेल्या भोवतालच्या लहान लहान टेकड्‍या या जशा काही त्याच्यावरून चालून जाण्यासच प्रवृत्त झाल्या आहेत असे दिसत होते (अथवा त्या टेकड्‍यांच्या द्वारा तो सर्वत्र विचरत आहे, असे भासत होते). ॥३२॥
जृम्भमाणमिवाकाशे शिखरैरभ्रमालिभिः ।
कूटैश्च बहुधा कीर्णं शोभितं बहुकन्दरैः ॥ ३३ ॥
मेघ मालांनी अलंकृत शिखरांच्या द्वारा जणु तो आकाशामध्ये जांभयाच देत आहे, असे वाटत होते. शिखरांमुळे तो नाना प्रकारांनी गजबजलेला होता आणि अनेक दर्‍यांनी त्याला शोभा आलेली होती. ॥३३॥
सालतालैश्च कर्णैश्च वंशैश्च बहुभिर्वृतम् ।
लतावितानैर्विततैः पुष्पवद्‌भिरलङ्‌‍कृतम् ॥ ३४ ॥
साल, ताल, कर्ण आणि वंश (बांबू) या असंख्य वृक्षांनी तो सर्वबाजूनी घेरलेला होता. फुलांच्या भाराने लगडलेले आणि पसरलेले लता-मंडप त्या पर्वताचे अलङ्‌कार होते. त्या लतांमुळे वर चान्दवे पसरून तो शृंगार केल्यासारखा दिसत होता. ॥३४॥
नानामृगगणै कीर्णं धातुनिष्यन्दभूषितम् ।
बहुप्रस्रवणोपेतं शिलासञ्चयसङ्‌‍कटम् ॥ ३५ ॥
नाना प्रकारच्या पशुंनी तो सर्व बाजूनी व्याप्त होता. आणि विविध धातु वितळल्यामुळे आणि बहुसंख्य निर्झरांनी आणि शिलांच्या अनेक राशींनी तो फार शोभून दिसत होता. ॥३५॥
महर्षियक्षगन्धर्वकिन्नरोरगसेवितम् ।
लतापादपसम्बाधं सिंहाधिष्ठितकन्दरम् ॥ ३६ ॥
महर्षि, यक्ष, गन्धर्व, किन्नर आणि नाग तेथे निवास करीत होते. लता आणि वृक्ष यांनी तो सर्व बाजूनी आच्छादित झाला होता. त्याच्या गुहांचा आश्रय घेऊन सिंह तेथे गर्जना करीत राहात होते. ॥३६॥
व्याघ्रादिभिः समाकीर्णं स्वादुमूलफलद्रुमम् ।
आरुरोहानिलसुतः पर्वतं प्लवगोत्तमः ॥ ३७ ॥

रामदर्शनशीघ्रेण प्रहर्षेणाभिचोदितः ।
व्याघ्रादि हिंस्त्रश्वापदांनी तो व्याप्त होता. स्वादिष्ट फळांनी लगडलेले वृक्ष आणि मधुर कन्द-मुळे इत्यादिंची त्यावर रेलचेल होती. अशा रमणीय पर्वतावर वानरश्रेष्ठ पवनपुत्र हनुमान रामदर्शन लवकर व्हावे या उत्सुकतेने अतिशय हर्षाने प्रेरित होऊन चढून गेले. ॥३७ १/२॥
तेन पादतलाक्रान्ता रम्येषु गिरिसानुषु ॥ ३८ ॥

सघोषाः समशीर्यन्त शिलाश्चूर्णीकृतास्ततः ।
त्या पर्वताच्या रमणीय शिखरांवर ज्या शिला होत्या त्या हनुमानांच्या पायाच्या आघाताने मोठा आवाज होऊन अगदी पीठ होईपर्यन्त फुटून इतःस्ततः पसरल्या. ॥३८ १/२॥
स तमारुह्य शैलेन्द्रं व्यवर्धत महाकपिः ॥ ३९ ॥

दक्षिणादुत्तरं पारं प्रार्थयंल्लवणाम्भसः ।
त्या शैलराज अरिष्टावर आरूढ होऊन महाकपि हनुमन्तांनी समुद्राच्या दक्षिण तटावरून उत्तरतटावर जाण्याच्या इच्छेने आपल्या शरीरास खूप वाढविले. ॥३९ १/२॥
अधिरूह्य ततो वीरः पर्वतं पवनात्मजः ॥ ४० ॥

ददर्श सागरं भीमं मीनोरगनिषेवितम् ।
त्या पर्वतावर आरूढ झाल्यावर वीरवर पवनकुमारांनी भयानक सर्पांनी भरलेल्या त्या भीषण महासागराकडे दृष्टिपात केला. ॥४० १/२॥
स मारुत इवाकाशं मारुतस्यात्मसम्भवः ॥ ४१ ॥

प्रपेदे हरिशार्दूलो दक्षिणादुत्तरां दिशम् ।
वायूचे औरसपुत्र कपिश्रेष्ठ हनुमान ज्याप्रमाणे वायु अत्यन्त वेगाने तीव्र गतीने आकाशातून वाहू लागतो त्याप्रमाणे दक्षिणेकडून उत्तर दिशेकडे अत्यन्त वेगाने उड्डाण करीत निघाले. ॥४१ १/२॥
स तदा पीडितस्तेन कपिना पर्वतोत्तमः ॥ ४२ ॥

ररास विविधैर्भूतैः प्रविशद् वसुधातलम् ।
कम्पमानैश्च शिखरैः पतद्‌भिरपि च द्रुमैः ॥ ४३ ॥
हनुमन्तांच्या पायाच्या दाबाने त्या श्रेष्ठ पर्वतान्तून अत्यन्त भयंकर आवाज निघाला आणि तो कंपित झालेली शिखरे, तुटून पडणारे वृक्ष आणि अनेक प्रकारचे प्राणी यांच्यासह तात्काळ जमिनीत खचूं लागला. ॥४२-४३॥
तस्योरुवेगोन्मथिताः पादपाः पुष्पशालिनः ।
निपेतुर्भूतले भग्नाः शक्रायुधहता इव ॥ ४४ ॥
त्यांच्या महान वेगाने कंपित होऊन फुलांनी लगडलेले बहुसंख्य वृक्ष जमिनीवर पडले. जणु इन्द्राच्या वज्राचा तडाखा बसून ते कडाकड मोडून भूमीवर पडले असावे, असे वाटले. ॥४४॥
कन्दरोदरसंस्थानां पीडितानां महौजसाम् ।
सिंहानां निनदो भीमो नभो भिन्दन् हि शुश्रुवे ॥ ४५ ॥
त्यावेळी त्या पर्वताच्या गुहांमध्ये असलेल्या महाबलाढ्‍य सिंहांना त्रास होऊ लागल्यामुळे त्यांनी आकाश दुमदुमून टाकणार्‍या भयंकर गर्जना केलेल्या कानी येऊ लागल्या. ॥४५॥
स्रस्तव्याविद्धवसना व्याकुलीकृतभूषणाः ।
विद्याधर्यः समुत्पेतुः सहसा धरणीधरात् ॥ ४६ ॥
भयाने मन त्रस्त झाल्यामुळे ज्यांची वस्त्रे अस्ताव्यस्त होऊन अंगावरील भूषणांचीही उलटापालट झाली आहे, अशा विद्याधर स्त्रिया एकाएकी त्या पर्वतावरून वर उडून गेल्या व एकाएकी खाली पडल्या. ॥४६॥
अतिप्रमाणा बलिनो दीप्तजिह्वा महाविषाः ।
निपीडितशिरोग्रीवा व्यवेष्टन्त महाहयः ॥ ४७ ॥
शरीराने प्रचंड आकाराचे, बलाढ्‍य आणि प्रदीप्त जिव्हा आणि जालीम विष असलेले सर्प, त्यांचे मस्तक आणि मान चेपली गेल्यामुळे वेटोळी घालून बसले. ॥४७॥
किन्नरोरगगन्धर्वयक्षविद्याधरास्तदा ।
पीडितं तं नगवरं त्यक्त्वा गगनमास्थिताः ॥ ४८ ॥
किन्नर, नाग, गन्धर्व, यक्ष, आणि विद्याधर त्या भूमीत खचत चाललेल्या पर्वतास सोडून आकाशात स्थित झाले. ॥४८॥
स च भूमिधरः श्रीमान् बलिना तेन पीडितः ।
सवृक्षशिखरोदग्रः प्रविवेश रसातलम् ॥ ४९ ॥
बलवान हनुमानांच्या वेगाने दबला गेलेला तो शोभाशाली श्रेष्ठ पर्वत वृक्ष आणि उंच शिखरांसहित खाली खोल रसातळाला गेला. ॥४९॥
दशयोजनविस्तारस्त्रिंशद्योजनमुच्छ्रितः ।
धरण्यां समतां यातः स बभूव धराधरः ॥ ५० ॥
तो अरिष्ठ पर्वत तीस योजने उंच (एकशेवीस कोस) आणि दहा योजने (चाळीस कोस) रून्द होता तरीही हनुमन्तांच्या पायांनी चेपला जाऊन जमीनदोस्त झाला. ॥५०॥
स लिलङ्‌‍घयिषुर्भीमं सलीलं लवणार्णवम् ।
कल्लोलास्फालवेलान्तमुत्पपात नभो हरिः ॥ ५१ ॥
नन्तर ज्याच्या उंच उंच लाटा उठून तीरावर धडकत होत्या (किंवा किनार्‍याचे चुंबन घेत होत्या) असा तो खार्‍या पाण्याचा भयानक सागर लीलापूर्वक उल्लंघून जाण्याच्या इच्छेने हनुमन्तांनी आकाशान्त उड्डाण केले. ॥५१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे षट्पञ्चाशः सर्गः ॥ ५६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायाण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा छपन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५६॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP