[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। पञ्चपञ्चाशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भरद्वाजेन स्वस्तिवाचनपूर्वकं श्रीरामादीनां विसर्जनं तदर्थं चित्रकूटमार्गस्य बोधनं च तेषां समेषां स्वनिर्मितेन प्लवेन यमुनामुत्तीर्य परतटे गमनं, यमुनां श्यामवटं प्रति च सीतायां प्रार्थना, यमुनातटवर्तिपथा क्रोशमात्रं गत्वा त्रयाणामपि वने परिभ्रमणं यमुनायां समतले तटे तेषां रात्रौ निवासश्च -
भरद्वाजांनी श्रीराम आदिंच्या साठी स्वास्तिवाचन करून त्यांना चित्रकूटचा मार्ग सांगणे, त्या सर्वांचे स्वतःच बनविलेल्या तरीने यमुनेला पार करणे, सीतेने यमुना आणि शामवटाची प्रार्थना करणे, तीघांचे यमुनेच्या किनार्‍याच्या मार्गाने एक कोस पर्यत जाऊन वनात हिंडणे फिरणे, यमुनेच्या समतल तटावर रात्री निवास करणे -
उषित्वा रजनीं तत्र राजपुत्रावरिंदमौ ।
महर्षिमभिवाद्याथ जग्मतुस्तं गिरिं प्रति ॥ १ ॥
त्या आश्रमात रात्रभर राहून शत्रूंचे दमन करणारे ते दोघे राजकुमार महर्षिंना प्रणाम करून चित्रकूट पर्वतावर जाण्यास उद्यत झाले. ॥१॥
तेषां स्वस्त्ययनं चैव महर्षिः स चकार ह ।
प्रस्थितान् प्रेक्ष्य तांश्चैव पिता पुत्रानिवौरसान् ॥ २ ॥
त्या तिघांना प्रस्थान करतांना पाहून महर्षिंनी त्यांच्यासाठी अशाप्रकारे स्वास्तिवाचन केले की जसे पिता आपल्या औरस पुत्रांना यात्रा करतांना पाहून त्यांच्यासाठी मंगलसूचक आशीर्वाद देत असतो. ॥२॥
ततः प्रचक्रमे वक्तुं वचनं स महामुनिः ।
भरद्वाजो महातेजा रामं सत्यपराक्रमम् ॥ ३ ॥
तदनंतर महातेजस्वी महामुनि भरद्वाजांनी सत्यपराक्रमी श्रीरामाला या प्रकारे सांगण्यास आरंभ केला- ॥३॥
गङ्‌गायमुनयोः संधिमासाद्य मनुजर्षभौ ।
कालिन्दीमनुगच्छेतां नदीं पश्चान्मुखाश्रिताम् ॥ ४ ॥
’नरश्रेष्ठ ! तुम्ही दोघे भाऊ गंगा आणि यमुनेच्या संगमावर पोहोंचल्यावर जिच्यात पश्चिममुखी होऊन गंगा मिळाली आहे त्या महानदी यमुनेच्या निकट जावे. ॥४॥
अथासाद्य तु कालिन्दीं प्रतिस्रोतःसमागताम् ।
तस्यास्तीर्थं प्रचरितं पुकामं प्रेक्ष्य राघव ।
तत्र यूयं प्लवं कृत्वा तरतांशुमतीं नदीम् ॥ ५ ॥
’हे राघवा ! त्यानंतर गंगेच्या जलाच्या वेगामुळे आपल्या प्रवाहाच्या प्रतिकूल दिशेकडे वळलेल्या यमुनेच्या जवळ पोहोंचून लोकांच्या येण्याजाण्यामुळे त्यांच्या पदचिन्हांनी चिन्हित झालेल्या अवतरण प्रदेशाला (पार उतरण्यासाठी उपयोगी घाटाला) उत्तम प्रकारे नीट पाहून घेऊन तेथे जावे आणि एक (बेडा) तरी बनवून तिच्या द्वारे सूर्यकन्या यमुनेच्या दुसर्‍या तीरास जाऊन उतरावे. ॥५॥
ततो न्यग्रोधमासाद्य महान्तं हरितच्छदम् ।
परीतं बहुभिर्वृक्षैः श्यामं सिद्धोपसेवितम् ॥ ६ ॥

तस्मै सीताञ्जलिं कृत्वा प्रयुञ्जीताशिषां क्रियाम् ।
समासाद्य च तं वृक्षं वसेद् वातिक्रमेत वा ॥ ७ ॥
’तत्पश्चात पुढे गेल्यावर एक खूप मोठा वटवृक्ष दिसेल; ज्याची पाने हिरव्या रंगाची आहेत. तो चारी बाजूनी बहुसंख्य इतर वृक्षांनी घेरलेला आहे. त्या वृक्षाचे नाम श्यामवट आहे. त्यांच्या छायेत बरेचसे सिद्ध पुरुष निवास करतात. तेथे पोहोंचल्यावर सीतेने दोन्ही हात जोडून त्या वृक्षाकडे आशीर्वादाची याचना करावी. यात्रेकरूंची इच्छा असेल तर त्या वृक्षाजवळ जाऊन काही काळपर्यंत तेथे निवास करावा अथवा तेथून पुढे जावे. ॥६-७॥
क्रोशमात्रं ततो गत्वा नीलं प्रेक्ष्य च काननम् ।
सल्लकीबदरीमिश्रं रम्यं वंशैश्च यामुनैः ॥ ८ ॥
’श्यामवटापासून एक कोस गेल्यावर तुम्हांला नीलवनाचे दर्शन होईल. तेथे सल्लकी आणि बदरीचे वृक्षही मिळालेले आहेत. यमुनेच्या तटावर उत्पन्न झालेल्या कळंकामुळे ते अधिकच रमणीय दिसून येते. ॥८॥
स पन्थाश्चित्रकूटस्य गतस्य बहुशो मया ।
रम्यो मार्दवयुक्तश्च दावैश्चैव विवर्जितः ॥ ९ ॥
हे तेच स्थान आहे की जेथून चित्रकूटला रस्ता जातो. मी त्या मार्गाने कित्येक वेळा गेलो आहे. तेथील भूमी कोमल आणि दृश्य रमणीय आहे. तेथे कधी दावानलाचे भय होत नाही.’ ॥९॥
इति पन्थानमादिश्य महर्षिः सन्न्यवर्तत ।
अभिवाद्य तथेत्युक्त्वा रामेण विनिवर्तितः ॥ १० ॥
या प्रकारे मार्ग सांगून ज्यावेळी भरद्वाज परत निघाले तेव्हा रामांनी ’तथास्तु’ म्हणून त्यांच्या चरणी प्रणाम केला आणि म्हटले- ’आता आपण आश्रमात परत जावे.’ ॥१०॥
उपावृत्ते मुनौ तस्मिन् रामो लक्ष्मणमब्रवीत् ।
कृतपुण्याः स्म भद्रं ते मुनिर्यन्नोऽनुकम्पते ॥ ११ ॥
ते महर्षि परत गेल्यावर श्रीरामांनी लक्ष्मणास म्हटले - ’सुमित्रानंदन ! तुझे कल्याण होवो. हे मुनि आपल्यावर जी इतकी कृपा करीत आहेत त्यावरून असे कळून येत आहे की आपण पूर्वी कधी महान पुण्य केलेले आहे.’ ॥११॥
इति तौ पुरुषव्याघ्रौ मन्त्रयित्वा मनस्विनौ ।
सीतामेवाग्रतः कृत्वा कालिन्दीं जग्मतुर्नदीम् ॥ १२ ॥
याप्रकारे गप्पागोष्टी करीत करीत दोघे मनस्वी पुरुषसिंह सीतेलाच पुढे ठेवून यमुना नदीच्या तटावर गेले. ॥१२॥
अथासाद्य तु कालिन्दीं शीघ्रस्रोतस्विनीं नदीम् ।
चिन्तामापेदिरे सद्यो नदीजलतितीर्षवः ॥ १३ ॥
तेथे कालिंदीचा स्त्रोत अत्यंत तीव्रगतीने प्रवाहित होत होता, तेथे पोहोंचून ते या चिंतेत पडले की नदीला पार कसे करावे कारण ते त्वरित यमुनेच्या जलाला पार करू इच्छित होते. ॥१३॥
तौ काष्ठसङ्‌घाटमथो चक्रतुः सुमहाप्लवम् ।
शुष्कैर्वंशैः समाकीर्णमुशीरैश्च समावृतम् ॥ १४ ॥

ततो वैतसशाखाश्च जम्बूशाखाश्च वीर्यवान् ।
चकार लक्ष्मणश्छित्त्वा सीतायाः सुखमासनम् ॥ १५ ॥
नंतर त्या दोघा भावांनी जंगलांतील वाळलेली लाकडे गोळा करून त्यांच्या द्वारे एक खूप मोठा बेडा (तरी, तराफा) तयार केला. तो तराफा सुकलेल्या कळकांनी व्याप्त होता. त्यावर खस (वाळा) अंथरले गेले होते. त्यानंतर पराक्रमी लक्ष्मणांनी वेत आणि जांभुळाच्या फांद्या कापून सीतेला बसण्यासाठी एक सुखद आसन तयार केले. ॥१४-१५॥
तत्र श्रियमिवाचिन्त्यां रामो दाशरथिः प्रियाम् ।
ईषत्स लज्जमानां तामध्यारोपयत प्लवम् ॥ १६ ॥

पार्श्वे च तत्र वैदेह्या वसने भूषणानि च ।
प्लवे कठिनकाजं च रामश्चक्रे समाहितः ॥ १७ ॥
दशरथनंदन श्रीरामांनी लक्ष्मी समान अचिंत्य ऐश्वर्य असणारी आपली प्रिया सीता, जी काहीशी लज्जित होत होती, तिला त्या तराफ्यावर चढविले आणि तिच्या शेजारीच वस्त्रे आणि आभूषणे ठेवून दिली. नंतर रामांनी अत्यंत सावधपणाने कुदळ आणि बकर्‍याच्या चामड्यांनी मढविलेला मोठा पेटारा ही तराफ्यावरच ठेवून दिला. ॥१६-१७॥
आरोप्य सीतां प्रथमं सङ्‌घाटं परिगृह्य तौ ।
ततः प्रतेरतुर्यत्तौ प्रीतौ दशरथात्मजौ ॥ १८ ॥
या प्रकारे प्रथम सीतेला चढवून ते दोघे भाऊ दशरथकुमार राम आणि लक्ष्मण त्या तराफ्याला धरून वल्हवू लागले. त्यांनी अत्यंत प्रयत्‍नपूर्वक आणि प्रसन्नतेने नदी पार करण्यास आरंभ केला. ॥१८॥
कालिन्दीमध्यमायाता सीता त्वेनामवन्दत ।
स्वस्ति देवि तरामि त्वां पारयेन्मे पतिर्व्रतम् ॥ १९ ॥
(यमुनेच्या मध्यधारेत आल्यावर सीतेने तिला प्रणाम केला आणि म्हटले-) ’देवि ! या तराफ्याच्या द्वारे मी आपल्याला पार करून जात आहे. आपण अशी कृपा करावी की ज्यायोगे आम्ही सकुशल पार होऊन जाऊ आणि माझे पतिदेव आपली वनवास विषयक प्रतिज्ञा निर्विघ्नपणे पूर्ण करतील.’ ॥१९॥
यक्ष्ये त्वां गोसहस्रेण सुराघटशतेन च ।
स्वस्ति प्रत्यागते रामे पुरीमिक्ष्वाकुपालिताम् ॥ २० ॥
’इक्ष्वाकुवंशीय वीरांच्या द्वारे पालित अयोध्यापुरीत श्रीराम सकुशल परतल्यावर मी आपल्या किनार्‍यावर एक हजार गाईंचे दान करीन आणि शेकडो देवदुर्लभ पदार्थ अर्पित करून आपली पूजा करीन.’ ॥२०॥
कालिन्दीमथ सीता तु याचमाना कृताञ्जलिः ।
तीरमेवाभिसम्प्राप्ता दक्षिणं वरवर्णिनी ॥ २१ ॥
याप्रकारे (वरवर्णिनी) सुंदर सीता हात जोडून कालिंदीची (यमुनेची) प्रार्थना करीत होती इतक्यांतच ती दक्षिण तटावर जाऊन पोहोंचली. ॥२१॥
ततः प्लवेनांशुमतीं शीघ्रगामूर्मिमालिनीम् ।
तीरजैर्बहुभिर्वृक्षैः संतेरुर्यमुनां नदीम् ॥ २२ ॥
याप्रमाणे त्या तिघांनी त्या तराफ्याच्या द्वारे अनेक तटवर्ती वृक्षांनी सुशोभित आणि तरंगमालांनी अलंकृत शीघ्रगामिनी सूर्य-कन्या यमुना नदीला पार केले. ॥२२॥
ते तीर्णाः प्लवमुत्सृज्य प्रस्थाय यमुनावनात् ।
श्यामं न्यग्रोधमासेदुः शीतलं हरितच्छदम् ॥ २३ ॥
पार उतरल्यावर त्यांनी तराफा तेथेच तटावर सोडून दिला आणि यमुना तटवर्ती वनातून प्रस्थान करून ते हिरव्यागार पानांनी सुशोभित शीतल छाया असणार्‍या श्यामवटाजवळ जाऊन पोहोंचले. ॥२३॥
न्यग्रोधं समुपागम्य वैदेही चाभ्यवन्दत ।
नमस्तेऽस्तु महावृक्ष पारयेन्मे पतिर्व्रतम् ॥ २४ ॥
वटाच्या समीप पोहोंचल्यावर वैदेहीने त्याला मस्तक नमविले आणि याप्रकारे म्हणाली - ’महावृक्ष ! आपल्याला नमस्कार आहे. आपण अशी कृपा करावी की जिच्यायोगे माझे पतिदेव आपल्या वनवास विषयक व्रताला पूर्ण करतील. ॥२४॥
कौसल्यां चैव पश्येम सुमित्रां च यशस्विनीम् ।
इति सीताऽञ्जलिं कृत्वा पर्यगच्छन्मनस्विनी ॥ २५ ॥
’तसेच आम्ही सर्व वनातून सकुशल परत जाऊन माता कौसल्या आणि यशस्विनी सुमित्रादेवींचे दर्शन करू शकू.’ याप्रकारे म्हणून मनस्विनी सीतेने हात जोडूनच त्या वृक्षाची परिक्रमा केली. ॥२५॥
अवलोक्य ततः सीतामायाचन्तीमनिन्दिताम् ।
दयितां च विधेयां च रामो लक्ष्मणमब्रवीत् ॥ २६ ॥
सदा आपल्या आज्ञेच्या अधीन राहणार्‍या प्राणप्रिय सती-साध्वी सीतेला श्यामवटाकडे आशीर्वादाची याचना करतांना पाहून राम लक्ष्मणास म्हणाले- ॥२६॥
सीतामादाय गच्छ त्वमग्रतो भरतानुज ।
पृष्ठतोऽनुगमिष्यामि सायुधो द्विपदां वर ॥ २७ ॥
’भरताचा धाकटा भाऊ असलेल्या नरश्रेष्ठ लक्ष्मणा ! तू सीतेला बरोबर घेऊन पुढे पुढे चल आणि मी धनुष्यधारण करून पाठीमागून तुमचे रक्षण करीत चालतो. ॥२७॥
यद् यत् फलं प्रार्थयते पुष्पं वा जनकात्मजा ।
तत् तत्त् प्रयच्छ वैदेह्या यत्रास्या रमते मनः ॥ २८ ॥
’वैदेही जनकात्मजा सीता जे जे फळ अथवा फुल मागेल अथवा जी वस्तु मिळाल्याने हिचे मन प्रसन्न राहिल, ते सर्व हिला देत रहा.’ ॥२८॥
एकैकं पादपं गुल्मं लतां वा पुष्पशालिनीम् ।
अदृष्टरूपां पश्यन्ती रामं पप्रच्छ साबला ॥ २९ ॥
अबला सीता एक एक वृक्ष, झाडी अथवा पूर्वी न पाहिलेली पुष्पशोभित लता यांना पाहून त्यांच्या विषयी रामांना विचारत होती. ॥२९॥
रमणीयान् बहुविधान् पादपान् कुसुमोत्करान् ।
सीतावचनसंरब्ध आनयामास लक्ष्मणः ॥ ३० ॥
तसेच लक्ष्मणही सीतेच्या कथनानुसार ताबडतोब विविध प्रकारच्या वृक्षांच्या मनोहर शाखा आणि फुलांचे गुच्छ आणून तिला देत होते. ॥३०॥
विचित्रवालुकजलां हंससारसनादिताम् ।
रेमे जनकराजस्य सुता प्रेक्ष्य तदा नदीम् ॥ ३१ ॥
त्यावेळी जनकराजकिशोरी सीता विचित्र वालुका आणि जलराशिंनी सुशोभित तथा हंस आणि सारसांच्या कलनादाने मुखरित यमुना नदीला पाहून फार प्रसन्न होत होती. ॥३१॥
क्रोशमात्रं ततो गत्वा भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।
बहून् मेध्यान् मृगान् हत्वा चेरतुर्यमुनावने ॥ ३२ ॥
या प्रकारे एक कोसाची यात्रा केल्यावर दोघे भाऊ राम आणि लक्ष्मण (प्राण्यांच्या हितासाठी) मार्गात आढळलेल्या हिंस्त्र पशुंचा वध करीत यमुना तटवर्ती वनात विचरू लागले. ॥३२॥
विहृत्य ते बर्हिणपूगनादिते
     शुभे वने वारणवानरायुते ।
समं नदीवप्रमुपेत्य सत्वरं
     निवासमाजग्मुरदीनदर्शनाः ॥ ३३ ॥
उदार दृष्टी असणारी ती तिघे सीता, लक्ष्मण आणि राम मोरांच्या झुडींच्या मधुर बोलीने (केकेने) गुंजणार्‍या आणि हत्ती आणि वानरांनी भरलेल्या त्या सुंदर वनात हिंडत-फिरत लवकरच यमुना नदीच्या समतल तटावर आली आणि रात्री त्यांनी तेथेच निवास केला. ॥३३॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे पञ्चपञ्चाशः सर्गः ॥ ५५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा पंचावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP