[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। अशीतितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
अयोध्यातो गङ्‌गातटमभिव्याप्य सुरम्यशिविरकूपादियुतस्य सुखदराजमार्गस्य निर्माणम् -
अयोध्येपासून गङ्‌‍गातटापर्यत सुरम्य शिविर आणि कूप आदिनी युक्त सुखद राजमार्गाची निर्मिती -
अथ भूमिप्रदेशज्ञाः सूत्रकर्मविशारदाः ।
स्वकर्माभिरताः शूराः खनका यन्त्रकास्तथा ॥ १ ॥

कर्मान्तिकाः स्थपतयः पुरुषा यन्त्रकोविदाः ।
तथा वर्धकयश्चैव मार्गिणो वृक्षतक्षकाः ॥ २ ॥

सूपकाराः सुधाकारा वंशकर्मकृतस्तथा ।
समर्था ये च द्रष्टारः पुरतस्ते प्रतस्थिरे ॥ ३ ॥
त्यानंतर उंच-सखल तसेच सजल-निर्जल भूमिचे ज्ञान असणारे सूत्रकर्मा (छावणी आदि बनविण्यासाठी सूत्र धारण करण्यात कुशल ), मार्गाचे रक्षण आदि आपल्या कर्मात सदा सावधान राहाणारे शूर-वीर, भूमी खोदणारे किंवा सुरूंग आदि बनविणारे , नदी पार करण्यासाठी तात्काळ साधन उपस्थित करणारे अथवा जलाचा प्रवाह रोखणारे वेतनभोगी कारागीर, गवंडी, रथ आणि यंत्र आदि बनविणारे पुरूष, सुतार, मार्गरक्षक, झाडे तोडणारे, आचारी, चुन्यांनी लिंपणे आदि काम करणारे, रूळकापासून चटई, सूप वगैरे (बुरूड) बनविणारे, चामड्यापासून खोगीर वगैरे बनविणारे तसेच रस्त्याची विशेष माहिती ठेवणार्‍या सामर्थ्यशाली पुरूषांनी प्रथम प्रस्थान केले. ॥ १-३॥
स तु हर्षात् तमुद्देशं जनौघो विपुलः प्रयान् ।
अशोभत महावेगः सागरस्यैव पर्वणि ॥ ४ ॥
त्यासमयी मार्ग चांगला करण्यासाठी एक विशाल जनसमुदाय अत्यंत हर्षाने वनप्रदेशाकडे पुढे रवाना झाला. पौर्णिमेच्या वेळी समुद्राला भरती यावी त्यावेळी त्या महान वेगाने समुद्र शोभतो तसा तो शोभत होता. ॥ ४ ॥
ते स्ववारं समास्थाय वर्त्मकर्मणि कोविदाः ।
करणैर्विविधोपेतैः पुरस्तात् सम्प्रतस्थिरे ॥ ५ ॥
मार्ग व रस्ते निर्माण करण्यात कुशल कामगारांचे विविध संघ आपापली औजारे घेऊन कार्यस्थळी रवाना झाले. ॥ ५ ॥
लता वल्लीश्च गुल्मांश्च स्थाणूनश्मन एव च ।
जनास्ते चक्रिरे मार्गं छिन्दन्तो विविधान् द्रुमान् ॥ ६ ॥
ते मार्ग निर्माण करण्यात निपुण असणारे कारागीर आपापल्या दलासह अनेक प्रकारच्या वृक्षांना तोडून मार्ग तयार करू लागले. ॥ ६॥
अवृक्षेषु च देशेषु केचिद् वृक्षानरोपयन् ।
केचित् कुठारैष्टङ्‌कैश्च दात्रैश्छिन्दन् क्वचित् क्वचित् ॥ ७ ॥
ज्या स्थानी वृक्ष नव्हते तेथे काही लोकांनी वृक्षही लावले. काही कारागीरांनी कुर्‍हाडी, छिन्नी, दगड फोडण्याची अवजारे तसेच विळ्या कोयत्याने कोठे कोठे वृक्ष आणि गवत कापून रस्ता साफ केला. ॥ ७॥
अपरे वीरणस्तम्बान् बलिनो बलवत्तराः ।
विधमन्ति स्म दुर्गाणि स्थलानि च ततस्ततः ॥ ८ ॥

अपरेऽपूरयन् कूपान् पांसुभिः श्वभ्रमायतम् ।
निम्नभागांस्तथैवाशु समांश्चक्रुः समन्ततः ॥ ९ ॥
अन्य प्रबल मनुष्यांनी ज्यांची मुळे जमिनीत घट्ट रुजलेली होती अशा कुश, कास आदि झुडुपांना हातांनीच उपटून फेकून दिले. ते जेथे तेथे उंच सखल दुर्गम स्थानांना खोदून बरोबर करीत होते. दुसरे काही लोक विहीरीत लांबरूंद खड्ड्यांना मातीने भरून काढीत होते. जे स्थान खोलगट असेल तेथे सर्व बाजूनी मातीची भर घालून ते त्या स्थानाला समतल करून टाकत होते. ॥ ८-९॥
बबन्धुर्बन्धनीयांश्च क्षोद्यान् सञ्चुक्षुदुस्तथा ।
बिभिदुर्भेदनीयांश्च तांस्तान् देशान् नरास्तदा ॥ १० ॥
त्यांनी जेथे पूल बांधण्यायोग्य पाणी आहे असे पाहिले तेथे पूल बांधले, जेथे खडकाळ जमीन दिसली तेथे तिला ठोकून ठोकून मुलायम केले आणि जेथे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग बनविणे आवश्यक वाटले तेथील बांध फोडून टाकले. याप्रमाणे विभिन्न देशात तेथील आवश्यकतेनुसार कार्य केले. ॥ १०॥
अचिरेण तु कालेन परिवाहान् बहूदकान् ।
चक्रुर्बहुविधाकारान् सागरप्रतिमान् बहून् ॥ ११ ॥
लहान लहान झरे, ज्यांचे पाणी सर्व बाजूनी वाहून जात होते त्यांना चारी बाजूनी बांध घालून त्वरित अधिक पाणी साठेल असे बनविले. याप्रमाणे थोड्याच काळात त्यांनी भिन्न भिन्न आकार- प्रकारची बरीच सरोवरे तयार केली, जी अगाध जलाने भरून गेल्यामुळे समुद्रासारखी वाटू लागली. ॥ ११॥
निर्जलेषु च देशेषु खानयामासुरुत्तमान् ।
उदपानान् बहुविधान् वेदिकापरिमण्डितान् ॥ १२ ॥
निर्जल स्थानावर नाना प्रकारच्या चांगल्या विहीरी आणि कूप आदि बनविले गेले, जे आसपास बांधलेल्या वेदिकांमुळे (चबुतर्‍यांमुळे) अलंकृत झाले होते. ॥ १२॥
ससुधाकुट्टिमतलः प्रपुष्पितमहीरुहः ।
मत्तोद्‌घुष्टद्विजगणः पताकाभिरलङ्‌कृतः ॥ १३ ॥

चन्दनोदकसंसिक्तो नानाकुसुमभूषितः ।
बह्वशोभत सेनायाः पन्थाः सुरपथोपमः ॥ १४ ॥
याप्रकारे सेनेचा तो मार्ग देवतांच्या मार्गाप्रमाणे अधिक शोभून दिसू लागला. त्याच्या जमिनीवर चूना, वाळू, क्रांक्रिट पसरुन पसरून त्याला ठोकून ठोकून पक्का बनवला होता. त्याच्या किनार्‍यावर ( दोन्ही बाजूला) फुलांनी सुशोभित वृक्ष लावले गेले होते. तेथील वृक्षांवर मत्तपक्षी किलबिलाट करीत होते. सर्व मार्गास पताकांनी सुशोभित केले होते, त्यावर चंदन मिश्रित जलाचा शिडकाव केला गेला होता, तसेच अनेक प्रकारच्या फुलांनी तो मार्ग सजविला गेला होत ॥ १३-१४॥
आज्ञाप्याथ यथाज्ञप्ति युक्तास्तेऽधिकृता नराः ।
रमणीयेषु देशेषु बहुस्वादुफलेषु च ॥ १५ ॥

यो निवेशस्त्वभिप्रेतो भरतस्य महात्मनः ।
भूयस्तं शोभयामासुर्भूषाभिर्भूषणोपमम् ॥ १६ ॥
यात्रेच्या मार्गात ठराविक ठिकाणी विश्रांतीसाठी छावण्या उभारण्यात येणार्‍या दक्ष अधिकार्‍यांनी भरताच्या आज्ञेनुसार योग्य सेवकांना योग्य ते आदेश देऊन जेथे स्वादिष्ट फळझाडांची उपज अधिक प्रमाणात होती अशा ठिकाणी छावण्या/तंबू उभे केले. सर्व छावण्या भरताच्या रुचीनुसार अलंकृत करून उत्तम तर्‍हेने सजविल्या होत्या. ॥ १५-१६ ॥
नक्षत्रेषु प्रशस्तेषु मुहूर्तेषु च तद्विदः ।
निवेशान् स्थापयामासुर्भरतस्य महात्मनः ॥ १७ ॥
वास्तु कर्माच्या ज्ञाता विद्वानांनी उत्तम नक्षत्रांवर आणि मुहूर्तावर महात्मा भरतांच्या मुक्कामासाठी जी जी स्थाने बनविली गेली होती, त्यांची प्रतिष्ठा करविली. ॥ १७॥
बहुपांसुचयाश्चापि परिखा परिवारिताः ।
तत्रेन्द्रनीलप्रतिमाः प्रतोलीवरशोभिताः ॥ १८ ॥

प्रासादमालासंयुक्ताः सौधप्राकारसंवृताः ।
पताका शोभिताः सर्वे सुनिर्मितमहापथाः ॥ १९ ॥

विसर्पद्‌भिरिवाकाशे विटङ्‌काग्रविमानकैः ।
समुच्छ्रितैर्निवेशास्ते बभुः शक्रपुरोपमाः ॥ २० ॥
मार्गात बनविली गेलेली विश्राम स्थाने इंद्रपुरीप्रमाणे शोभून दिसत होती. त्यांच्या चारी बाजूस खंदक खोदले गेले होते, धूळ-मातीचे उंच ढिगारे बनविले गेले होते. राहुट्यांच्या मध्ये इंद्रनील मण्यांच्या बनविलेल्या प्रतिमा सजविल्या गेल्या होत्या. गल्ल्या आणि सडका यांच्यामुळे त्या विश्रामस्थानाला विशेष शोभा प्राप्त झाली होती. राजकीय गृहे आणि देवस्थानाला विशेष शोभा प्राप्त झाली होती. राजकीय गृहे आणि देवस्थानांनी युक्त ते शिबिर चुन्यानी लिंपलेल्या प्राकारांनी ( परकोटांनी, तटांनी) घेरलेले होते. सर्व विश्रामस्थाने पताकांनी सुशोभित केलेली होती. सर्वत्र मोठ्मोठ्या सडकांची सुंदर रीतीने निर्मिति केलेली होती. विटङ्‌‍क (कबूतरांची राहण्याची स्थाने) उंच उंच विमानांच्या मुळे त्या सर्व शिबिरांची फारच शोभा दिसत होती. ॥ १८-२०॥
जाह्नवीं तु समासाद्य विविधद्रुमकाननाम् ।
शीतलामलपानीयां महामीनसमाकुलाम् ॥ २१ ॥

सचन्द्रतारागणमण्डितं यथा
     नभः क्षपायाममलं विराजते ।
नरेन्द्रमार्गः स तदा व्यराजत
     क्रमेण रम्यः शुभशिल्पिनिर्मितः ॥ २२ ॥
नाना प्रकारच्या वृक्षांनी आणि वनांनी सुशोभित, शीतल निर्मल जलाने भरलेली आणि मोठमोठ्या मत्स्यांनी व्याप्त गङ्‌‍गेच्या किनार्‍यापर्यंत बनविला गेलेला तो रमणीय राजमार्ग त्या समयी अत्यंत शोभून दिसत होता. चांगल्या कारागीरांनी त्याची निर्मिती केलेली होती. रात्रीच्या वेळी तो चंद्रमा आणि तारागणांनी मण्डित निर्मल आकाशाप्रमाणे सुशोभित होत होता. ॥ २१-२२॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे अशीतितमः सर्गः ॥ ८० ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा विंशिवा सर्ग पूरा झाला. ॥ ८०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP