[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ पञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
जटायुषा सीताहरणरूपाद् दुष्कर्मणो रावणं निवर्तयितुं तस्य प्रबोधनं तदन्ते युद्धार्थमाह्वानं च -
जटायुचे रावणास सीताहरणाच्या दुष्कर्मापासून निवृत्त होण्यासाठी समजाविणे आणि शेवटी युद्धासाठी ललकारणे -
तं शब्दमवसुप्तस्तु जटायुरथ शुश्रुवे ।
निरैक्षद् रावणं क्षिप्रं वैदेहीं च ददर्श सः ॥ १ ॥
जटायु त्यावेळी झोपलेले होते. त्याच अवस्थेत त्यांनी सीतेची ती करूण हाक ऐकली. ऐकतांच ताबडतोब डोळे उघडून त्यांनी वैदेही सीतेस तसेच रावणास पाहिले. ॥१॥
ततः पर्वतशृङ्‌गाभस्तीक्ष्णतुण्डः खगोत्तमः ।
वनस्पतिगतः श्रीमान् व्याजहार शुभां गिरम् ॥ २ ॥
पक्ष्यामध्ये श्रेष्ठ श्रीमान्‌ जटायुचे शरीर पर्वत शिखरासमान उंच होते आणि त्यांची चोंच फार तीक्ष्ण होती. ते झाडावर बसूनच रावणास उद्देशून हे शुभ वचन बोलले - ॥२॥
दशग्रीव स्थितो धर्मे पुराणे सत्यसंश्रयः ।
भ्रातस्त्वं निन्दितं कर्म कर्तुं नार्हसि साम्प्रतम् ॥ ३ ॥

जटायुर्नाम नाम्नाहं गृध्रराजो महाबलः ।
दशमुख रावणा ! मी प्राचीन (सनातन) धर्मामध्ये स्थित, सत्यप्रतिज्ञ, आणि महाबलवान्‌ गृध्रराज आहे. माझे नाव जटायु आहे. हे बंधो ! या समयी माझ्या समोर तू असे निंद्य कर्म करता कामा नयेस. ॥३ १/२॥
राजा सर्वस्य लोकस्य महेन्द्रवरुणोपमः ॥ ४ ॥

लोकानां च हिते युक्तो रामो दशरथात्मजः ।
दशरथनंदन राम संपूर्ण जगताचे स्वामी, इंद्र आणि वरूण यांच्या समान पराक्रमी तसेच सर्व लोकांच्या हितात संलग्न राहाणारे आहेत ॥४ १/२॥
तस्यैषा लोकनाथस्य धर्मपत्‍नी यशस्विनी ॥ ५ ॥

सीता नाम वरारोहा यां त्वं हर्तुमिहेच्छसि ।
ही त्याच जगदीश्वर श्रीरामांची यशस्विनी धर्मपत्‍नी आहे. या सुंदर शरीर असणार्‍या देवीचे नाव सीता आहे, जिचे हरण करून तू जिला नेऊ इच्छित आहेस. ॥५ १/२॥
कथं राजा स्थितो धर्मे परदारान् परामृशेत् ॥ ६ ॥

रक्षणीया विशेषेण राजदारा महाबल ।
निवर्तय गतिं नीचां परदाराभिमर्शनात् ॥ ७ ॥
आपल्या धर्मात स्थित असणारा कुणीही राजा भले परस्त्रीला स्पर्श कसा करू शकेल ? महाबली रावणा ! राजेलोकांच्या स्त्रियांचे तर सर्वांनी विशेष रूपाने रक्षण केले पाहिजे. परस्त्रीच्या स्पर्शामुळे जी नीच गति प्राप्त होणार आहे तिच्यापासून तू स्वतःला दूर ठेव. ॥ ६-७॥
न तत् समाचरेद् धीरो यत् परोऽस्य विगर्हयेत् ।
यथाऽऽत्मनस्तथान्येषां दारा रक्ष्या विमर्शनात् ॥ ८ ॥
हे धीरा ! ज्याची दुसरे लोक निंदा करतात ते कर्म तू करू नको. ज्या प्रमाणे परपुरुषांच्या स्पर्शापासून आपल्या स्त्रीचे रक्षण केले जाते त्याच प्रकारे दुसर्‍यांच्या स्त्रियांचेही रक्षण केले पाहिजे. ॥८॥
अर्थं वा यदि वा कामं शिष्टाः शास्त्रेष्वनागतम् ।
व्यवस्यन्त्यनु राजानं धर्मं पौलस्त्यनन्दन ॥ ९ ॥
पुलस्त्यकुलनंदन ! ज्यांची शास्त्रामध्ये चर्चा केलेली नाही अशा धर्म, अर्थ अथवा कामाचेही श्रेष्ठ पुरुष केवळ राजाचे आचरण पाहून आचरण करू लागतात- (म्हणून राजाने अनुचित अथवा अशास्त्रीय कर्मात प्रवृत्त होता कामा नये.)॥९॥
राजा धर्मश्च कामश्च द्रव्याणां चोत्तमो निधिः ।
धर्मः शुभं वा पापं वा राजमूलं प्रवर्तते ॥ १० ॥
राजा ! धर्म आणि कामाचा प्रवर्त्तक तसेच द्रव्याचा उत्तम निधि आहे, म्हणून धर्म सदाचार अथवा पाप- यांच्या प्रवृत्तीचे मूळ कारण राजाच आहे. ॥१०॥
पापस्वभावश्चपलः कथं त्वं रक्षसां वर ।
ऐश्वर्यमभिसम्प्राप्तो विमानमिव दुष्कृती ॥ ११ ॥
राक्षसराज ! जर तुझा स्वभाव असा पापपूर्ण आहे आणि तू इतका चपल आहेस तर पापीला देवतांच्या विमानाप्रमाणे तुला हे ऐश्वर्य कसे प्राप्त झाले ? ॥११॥
कामस्वभावो यः सोऽसौ न शक्यस्तं प्रमार्जितुम् ।
नहि दुष्टात्मनामार्यमावसत्यालये चिरम् ॥ १२ ॥
ज्याच्या स्वभावात कामाची प्रधानता आहे, त्याच्या त्या स्वभावाचे परिमार्जन केले जाऊ शकत नाही, कारण की दुष्टात्म्यांच्या घरात दीर्घकाळानंतरही पुण्याचा आवास होत नाही. ॥१२॥
विषये वा पुरे वा ते यदा रामो महाबलः ।
नापराध्यति धर्मात्मा कथं तस्यापराध्यसि ॥ १३ ॥
जर महाबली धर्मात्मा श्रीराम तुझ्या राज्यात अथवा नगरात काही अपराध करीत नाहीत तर तू त्यांचा अपराध कसा करीत आहेस ? ॥१३॥
यदि शूर्पणखाहेतोर्जनस्थानगतः खरः ।
अतिवृत्तो हतः पूर्वं रामेणाक्लिष्टकर्मणा ॥ १४ ॥

अत्र ब्रूहि यथातत्त्वं को रामस्य व्यतिक्रमः ।
यस्य त्वं लोकनाथस्य भार्यां हृत्वा गमिष्यसि ॥ १५ ॥
जर प्रथम शूर्पणखेचा बदला घेण्यासाठी आक्रमण (चढाई) करून आलेल्या अत्याचारी खराचा अनायासे महान्‌ कर्म करणार्‍या श्रीरामांनी वध केला तर तूच ठीक ठीक सांग की यात श्रीरामांचा काय अपराध आहे की ज्यामुळे तू त्या जगदीश्वराच्या पत्‍नीचे हरण करून तिला घेऊन जाऊ इच्छित आहेस ? ॥१४-१५॥
क्षिप्रं विसृज वैदहीं मा त्वा घोरेण चक्षुषा ।
दहेद् दहनभूतेन वृत्रमिन्द्राशनिर्यथा ॥ १६ ॥
रावणा ! आता तू तात्काळच वैदेही सीतेला सोडून दे की ज्यामुळे श्रीराम आपल्या अग्निसमान भयंकर दृष्टीने तुला जाळून भस्म करून टाकणार नाहीत. जसे इंद्राच्या वज्राने वृत्रासुराचा विनाश करून टाकला होता, त्याप्रकारे श्रीरामांची रोषपूर्ण दृष्टी तुला दग्ध करून टाकील. ॥१६॥
सर्पमाशीविषं बध्वा वस्त्रान्ते नावबुध्यसे ।
ग्रीवायां प्रतिमुक्तं च कालपाशं न पश्यसि ॥ १७ ॥
तू आपल्या वस्त्रात विषधर सर्पाला बांधून घेतले आहेस, आणि तरीही ही गोष्ट तू समजून घेत नाहीस. तू आपल्या गळ्यात मृत्युचा पाश अडकवून घेतला आहेस आणि तरी तुला हे कळत नाही आहे. ॥१७॥
स भारः सौम्य भर्तव्यो यो नरं नावसादयेत् ।
तदन्नमपि भोक्तव्यं जीर्यते यदनामयम् ॥ १८ ॥
सौम्या ! पुरुषाने एवढेच ओझे उचलले पाहिजे की जे त्याला शिथिल करून टाकणार नाही आणि तेवढेच अन्न खाल्ले पाहिजे जे पोटात जाऊन रोग उत्पन्न न करता पचून जाईल. ॥१८॥
यत्कृत्वा न भवेद् धर्मो न कीर्तिर्न यशो ध्रुवम् ।
शरीरस्य भवेत् खेदः कस्तत् कर्म समाचरेत् ॥ १९ ॥
जे कार्य केल्याने धर्मही होत नाही, कीर्तीही वाढत नाही, अक्षय यशही प्राप्त होत नाही, उलट शरीराला दुःखच होत राहाते त्या कर्माचे अनुष्ठान कोण करेल ? ॥१९॥
षष्टिवर्षसहस्त्राणि मम जातस्य रावण ।
पितृपैतामहं राज्यं यथावदनुतिष्ठतः ॥ २० ॥
रावणा ! पितरांपासून प्राप्त या पक्ष्यांच्या राज्याचे विधिवत्‌ पालन करीत असतां मला जन्मल्यापासून आतापर्यत साठ हजार वर्षे निघून गेली आहेत. ॥२०॥
वृद्धोहं त्वं युवा धन्वी सरथः कवची शरी ।
न चाप्यादाय कुशली वैदेहीं न गमिष्यसि ॥ २१ ॥
आता मी म्हातारा झालो आहे आणि तू नवयुवक आहेस. (माझ्या जवळ युद्धाचे काही साधन नाही परंतु) तुझ्यापाशी धनुष्य, कवच, बाण तसेच रथ वैगरे सर्व काही आहे, पण तरीही तू सीतेला घेऊन कुशलपूर्वक जाऊ शकणार नाहीस. ॥२१॥
न शक्तस्त्वं बलाद्धर्तुं वैदेहीं मम पश्यतः ।
हेतुभिर्न्यायसंयुक्तैर्ध्रुवां वेदश्रुतीमिव ॥ २२ ॥
माझ्या डोळ्या देखत तू वैदेही सीतेचे बलपूर्वक अपहरण करू शकत नाहीस. ज्या प्रमाणे कुणी ही न्याय संगत हेतुनी सत्य सिद्ध झालेल्या वैदिक श्रुतिला आपल्या युक्तींच्या बळावर बदलू शकत नाही त्या प्रमाणेच (हे समज) ॥२२॥
युध्यस्व यदि शूरोऽसि मुहूर्तं तिष्ठ रावण ।
शयिष्यसे हतो भूमौ यथा पूर्वं खरस्तथा ॥ २३ ॥
रावणा ! जर शूरवीर असशील तर युद्ध कर. माझ्या समोर मुहूर्तपर्यंत उभा रहा; नंतर प्रथम ज्याप्रमाणे खर मारला गेला होता त्याप्रमाणे माझ्या द्वारा तूही मारला जाऊन कायमचा झोपी जाशील. ॥२३॥
असकृत्संयुगे येन निहता दैत्यदानवाः ।
न चिराच्चीरवासास्त्वां रामो युधि वधिष्यति ॥ २४ ॥
ज्यांनी युद्धात अनेक वेळां दैत्य आणि दानवांचा वध केला आहे ते चीरवस्त्रधारी भगवान्‌ राम तुझाही शीघ्रच युद्धभूमीमध्ये विनाश करून टाकतील. ॥२४॥
किं नु शक्यं मया कर्तुं गतौ दूरं नृपात्मजौ ।
क्षिप्रं त्वं नश्यसे नीच तयोर्भीतो न संशयः ॥ २५ ॥
या समयी मी काय करू शकतो ! ते दोन्ही राजकुमार फार दूर निघून गेले आहेत. नीचा ! (जर मी त्यांना बोलावण्यास जाईन तर) तू त्या दोघांमुळे भयभीत होऊन शीघ्रच पळून जाशील. (दृष्टीआड होऊन जाशील) यात संशय नाही. ॥२५॥
न हि मे जीवमानस्य नयिष्यसि शुभामिमाम् ।
सीतां कमलपत्राक्षीं रामस्य महिषीं प्रियाम् ॥ २६ ॥
कमलासमान नेत्र असणारी ही शुभलक्षणा सीता रामांची प्रिय पट्टराणी आहे. माझ्या जीवात जीव असे पर्यंत तू तिला घेऊन जाऊ शकणार नाहींस. ॥२६॥
अवश्यं तु मया कार्यं प्रियं तस्य महात्मनः ।
जीवितेनापि रामस्य तथा दशरथस्य च ॥ २७ ॥
मला आपले प्राण देऊनही महात्मा श्रीराम तसेच राजा दशरथ यांचे प्रिय कार्य अवश्य करावेच लागेल. ॥२७॥
तिष्ठ तिष्ठ दशग्रीव मुहूर्तं पश्य रावण ।
वृन्तादिव फलं त्वां तु पातयेयं रथोत्तमात् ।
युद्धातिथ्यं प्रदास्यामि यथाप्राणं निशाचर ॥ २८ ॥
दशमुख रावणा ! थांब, थांब ! केवळ एक मुहूर्तपर्यत थांबून राहा. नंतर पहा, ज्याप्रमाणे देठापासून फळ गळून पडते त्याप्रमाणे तुला या उत्तम रथातून खाली पाडून टाकतो. निशाचरा ! आपल्या शक्तीस अनुसरून मी युद्धात तुझा पूरा अतिथि- सत्कार करीन- तुझी उत्तम प्रकारे पूजा करीन - तुला भेंट देईन. ॥२८॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे पञ्चाशः सर्गः ॥ ५० ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा पन्नासावा सर्ग पूरा झाला. ॥५०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP