|
| श्रीरामस्यागांसि वर्णयित्वा तत्पत्न्याः सीताया अपहरणे साहाय्यं कर्तुं मारीचं प्रति रावणस्यानुरोधः - | रावणाचे मारीचास श्रीरामांचा अपराध सांगून त्यांची पत्नी सीता हिच्या अपहरणात सहायता करण्यास सांगणे - | 
| मारीच श्रूयतां तात वचनं मम भाषतः । आर्तोऽस्मि मम चार्तस्य भावन् हि परमा गतिः ॥ १ ॥
 
 | तात मारीच ! मी तुला सर्व काही सांगतो. माझे म्हणणे ऐक. यावेळी मी फार दुःखी आहे आणि या दुःखी अवस्थेत तुम्हीच मला सर्वांहून अधिक आधार देणारे आहात. ॥१॥ | 
| जानीषे त्वं जनस्थानं भ्राता यत्र खरो मम । दूषणश्च महाबाहुः स्वसा शूर्पणखा च मे ॥ २ ॥
 
 त्रिशिराश्च महाबाहू राक्षसः पिशिताशनः ।
 अन्ये च बहवः शूरा लब्धलक्षा निशाचराः ॥ ३ ॥
 
 | तुम्ही जनस्थानाला जाणता जेथे माझा भाऊ खर, महाबाहु दूषण, माझी बहीण शूर्पणखा, मांसभोजी राक्षस महाबाहु त्रिशिरा तसेच आणखीही बरेचसे लक्ष्यवेधात कुशल शूरवीर निशाचर राहात होते. ॥२-३॥ | 
| वसन्ति मन्नियोगेन अधिवासं च राक्षसाः । बाधमाना महरण्ये मुनीन् वै धर्मचारिणः ॥ ४ ॥
 
 | ते सर्व राक्षस माझ्या आज्ञेने तेथे घरे बनवून राहात होते आणि त्या विशाल वनात जे धर्माचरण करणारे मुनि होते त्यांना सतावित होते. ॥४॥ | 
| चतुर्दश सहस्राणि रक्षसां भीमकर्मणाम् । शूराणां लब्धलक्षाणां खरचित्तानुवर्तिनाम् ॥ ५ ॥
 
 | तेथे खराच्या मनाप्रमाणे अनुसरण करणारे तसेच युद्धविषयक उत्साहाने संपन्न चौदा हजार शूरवीर राक्षस राहात होते, जे भयंकर कर्म करणारे होते. ॥५॥ | 
| ते त्विदानीं जनस्थाने वसमाना महाबलाः । सङ्गताः परमायत्ता रामेण सह संयुगे ॥ ६ ॥
 
 | जनस्थानात निवास करणारे सर्वच्या सर्व महाबली राक्षस त्या समयी उत्तम प्रकारे सन्नद्ध होऊन युद्धक्षेत्रात रामाशी जाऊन भिडले होते. ॥६॥ | 
| नानाशस्त्रप्रहरणाः खरप्रमुखराक्षसाः । तेन संजातरोषेण रामेण रणमूर्धनि ॥ ७ ॥
 
 अनुक्त्वा परुषं किञ्चिच्छरैर्व्यापारितं धनुः ।
 
 | ते खर आदि राक्षस नाना अस्त्र-शस्त्रांचे प्रहार करण्यात कुशल होते. परंतु युद्धाच्या आरंभीच रोषाने भरलेल्या श्रीरामानी आपल्या तोंडाने कुठलेही कटु वचन न बोलता बाणांसह धनुष्याचाच व्यापार सुरु केला. ॥७ १/२॥ | 
| चतुर्दश सहस्राणि रक्षसामुग्रतेजसाम् ॥ ८ ॥ 
 निहतानि शरैर्दीप्तैर्मानुषेण पदातिना ।
 खरश्च निहतः संख्ये दूषणश्च निपातितः ॥ ९ ॥
 
 हत्वा त्रिशिरसं चापि निर्भया दण्डकाः कृताः ।
 
 | पायी (वाहनरहित) आणि मनुष्य असूनही रामाने आपल्या चमकणार्या बाणांनी भयंकर तेज असणार्या चौदा हजार राक्षसांचा विनाश करून टाकला, आणि त्याच युद्धात खरास मारून दूषणालाही ठार केले. त्याच बरोबर त्रिशिराचा वध करून त्याने दण्डकारण्याला इतर सर्व निवासीयांसाठी निर्भय बनविले. ॥८-९ १/२॥ | 
| पित्रा निरस्तः क्रुद्धेन सभार्यः क्षीणजीवितः ॥ १० ॥ 
 स हन्ता तस्य सैन्यस्य रामः क्षत्रियपांसनः ।
 
 | त्याच्या पित्याने कुपित होऊन त्याला पत्नी सहित घराबाहेर काढले आहे. त्याचे जीवन क्षीण होत आहे. हा क्षत्रियकुलकलंक रामच त्या राक्षस - सेनेचा घातक आहे. ॥१० १/२॥ | 
| अशीलः कर्कशस्तीक्ष्णो मूर्खो लुब्धोऽजितेन्द्रियः ॥ ११ ॥ 
 त्यक्तधर्मा त्वधर्मात्मा भूतानामहिते रतः ।
 येन वैरं विनारण्ये सत्त्वमास्थाय केवलम् ॥ १२ ॥
 
 कर्णनासापहारेण भगिनी मे विरूरिता ।
 अस्य भार्यां जनस्थानात् सीतां सुरसुतोपमाम् ॥ १३ ॥
 
 आनयिष्यामि विक्रम्य सहायस्तत्र मे भव ।
 
 | तो शीलरहित, क्रूर, तिखट स्वभवाचा, मूर्ख, लोभी, अजितेन्द्रिय, धर्मत्यागी, अधर्मात्मा आणि समस्त प्राण्यांच्या अहितात तत्पर राहाणारा आहे. ज्याने काहीही वैर -विरोध नसता केवळ बळाचा आश्रय घेऊन माझ्या बहिणीचे नाक-कान कापून तिचे रूप बिघडवून टाकले. त्याचा बदला घेण्यासाठी मीही त्याच्या देवकन्ये समान सुंदर पत्नी सीतेला जनस्थानांतून बलपूर्वक हरण करून आणीन. तू या कार्यात माझी मदत कर. ॥११-१३ १/२॥ | 
| त्वया ह्यहं सहायेन पार्श्वस्थेन महाबल ॥ १४ ॥ 
 भ्रातृभिश्च सुरान् सर्वान् नाहमत्राभिचिन्तये ।
 तत्सहायो भव त्वं मे समर्थो ह्यसि राक्षस ॥ १५ ॥
 
 | महाबली राक्षसा ! तुझ्या सारख्या पार्श्ववर्ती (पाठीराख्या) सहायकांच्या आणि आपल्या भावांच्या बळावरच मी समस्त देवतांची येथे काही पर्वा करीत नाही, म्हणून तू माझा सहाय्यक होऊन जा, कारण की तू माझी मदत करण्यास समर्थ आहेस. ॥१४-१५॥ | 
| वीर्ये युद्धे च दर्पे च न ह्यस्ति सदृशस्तव । उपायतो महाञ्शूरो महामायाविशारदः ॥ १६ ॥
 
 | पराक्रमात, युद्धात आणि विरोचित अभिमानात तुझ्यासमान कोणी नाही आहे. तू फार बहाद्दूर आणि नाना प्रकारचे उपाय सांगण्यातही हुशार आहेस. मोठमोठे मायावी प्रयोग करण्यातही तू विशेष कुशल आहेस. ॥१६॥ | 
| एतदर्थमहं प्राप्तस्त्वत्समीपं निशाचर । शृणु तत् कर्म साहाय्ये यत्कार्यं वचनान्मम ॥ १७ ॥
 
 | निशाचरा ! म्हणून मी तुझ्याजवळ आलो आहे. मदत करण्यासाठी माझ्या कथनानुसार तुला कोणते काम करावयाचे आहे तेही ऐक. ॥१७॥ | 
| सौवर्णस्त्वं मृगो भूत्वा चित्रो रजतबिन्दुभिः । आश्रमे तस्य रामस्य सीतायाः प्रमुखे चर ॥ १८ ॥
 
 | तू सोन्याच्या बनलेल्या मृगासारखे रूप धारण करून रजतमय बिंदुनी युक्त चितकबरा होऊन जा आणि रामाच्या आश्रमात सीतेच्या समोर विचरत राहा. ॥१८॥ | 
| त्वां तु निःसंशयं सीता दृष्ट्वा तु मृगरूपिणम् । गृह्यतामिति भर्तारं लक्ष्मणं चाभिधास्यति ॥ १९ ॥
 
 | विचित्र मृगाच्या रूपात तुला पाहून सीता अवश्यच आपला पति राम तसेच लक्ष्मण यांस म्हणेल की आपण याला पकडून आणा. ॥१९॥ | 
| ततस्तयोरपाये तु शून्ये सीतां यथासुखम् । निराबाधो हरिष्यामि राहुश्चन्द्रप्रभामिव ॥ २० ॥
 
 | जेव्हा ते दोघे तुला पकडण्यासाठी दूर निघून जातील तेव्हां मी कुठल्याही विघ्न वा बाधेशिवाय आश्रमांतून राहु जसा चंद्रम्याच्या प्रभेचे अपहरण करतो त्या प्रमाणे सुखपूर्वक सीतेचे हरण करून तिला घेऊन येईन. ॥२०॥ | 
| ततः पश्चात् सुखं रामे भार्याहरणकर्शिते । विश्रब्धं प्रहरिष्यामि कृतार्थेनान्तरात्मना ॥ २१ ॥
 
 | त्यानंतर स्त्रीचे अपहरण झाल्याने जेव्हा राम अत्यंत दुःखी आणि दुर्बल होऊन जाईल, त्या समयी मी निर्भय होऊन सुखपूर्वक त्याच्यावर कृतार्थचित्ताने प्रहार करीन. ॥२१॥ | 
| तस्य रामकथां श्रुत्वा मारीचस्य महात्मनः । शुष्कं समभवद् वक्त्रं परित्रस्तो बभूव च ॥ २२ ॥
 
 | रावणाच्या मुखांतून श्रीरामचंद्रांची चर्चा ऐकून महात्मा मारीचाचे तोंड सुकून गेले. भयाने त्याचा थरकाप झाला. ॥२२॥ | 
| ओष्ठौ परिलिहञ्शुष्कौ नेत्रैरनिमिषैरिव । मृतभूत इवार्तस्तु रावणं समुदैक्षत ॥ २३ ॥
 
 | तो एकटक नजरेने पहात आपल्या कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवू लागला. त्याला इतके दुःख झाले की तो मुडद्यासारखा दिसू लागला. त्याच अवस्थेत त्याने रावणाकडे पाहिले. ॥२३॥ | 
| स रावणं त्रस्तविषण्णचेता महावने रामपराक्रमज्ञः ।
 कृताञ्जलिस्तत्त्वमुवाच वाक्यं
 हितं च तस्मै हितमात्मनश्च ॥ २४ ॥
 
 | त्या महान वनात त्याला श्रीरामचंद्रांच्या पराक्रमाचे ज्ञान होऊन चुकले होते, म्हणून तो मनातल्या मनात अत्यंत भयभीत आणि दुःखी झाला तसेच हात जोडून रावणाला यथार्थ वचन बोलला. त्याचे ते सांगणे रावणासाठी तसेच स्वतःसाठी ही हितकर होते. ॥२४॥ | 
| इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे षट्त्रिंषः सर्गः ॥ ३६ ॥ 
 | या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा छत्तीसावा सर्ग पूरा झाला. ॥३६॥ | 
|