श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ चतुर्नवतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
कुशलवकर्तृकं रामायण काव्यगानं, श्रीरामेण तस्या सभायां श्रवणम् -
लव-कुश द्वारा रामायण काव्याचे गायन तसेच श्रीरामांनी ते भर सभेत ऐकणे -
तौ रजन्यां प्रभातायां स्नातौ हुतहुताशनौ ।
यथोक्तं ऋषिणा पूर्वं सर्वं तत्रोपगायताम् ॥ १ ॥
रात्र संपून जेव्हा प्रभात झाली तेव्हा स्नान-संध्ये नंतर समिधा-होमाचे कार्य पूर्ण करून ते दोघे भाऊ ऋषिंनी सांगितल्याप्रमाणे तेथे संपूर्ण रामायणाचे गायन करू लागले. ॥१॥
तां स शुश्राव काकुत्स्थः पूर्वाचार्य विजिर्मिताम् ।
अपूर्वां पाठ्यजातिं च गेयेन समलङ्‌कृताम् ॥ २ ॥
काकुत्स्थ रामांनीही ते गायन ऐकले, जे पूर्ववर्ती आचार्यांनी सांगितलेल्या नियमांच्या अनुकूल होते. संगीताच्या विशेषतांनी युक्त स्वरांच्या आलापाची अपूर्व शैली होती. ॥२॥
प्रमाणैर्बहुभिर्बद्धां तन्त्रीलय समन्विताम् ।
बालाभ्यां राघवः श्रुत्वा कौतूहलपरोऽभवत् ॥ ३ ॥
बहुसंख्य प्रमाणे - ध्वनिपरिच्छेदाचे साधनभूत द्रुत, मध्य, विलंबित - या तीन्ही आवृत्ति अथवा सप्तविध स्वरांच्या भेदाच्या सिद्धिसाठी बनलेल्या स्थानांनी बद्ध आणि वीणेच्या लयीशी मिळते जुळते त्या दोन्ही बालकांचे ते मधुर गायन ऐकून राघवांना फार कुतुहल वाटले. ॥३॥
अथ कर्मान्तरे राजा समाहूय महामुनीन् ।
पार्थिवांश्च नरव्याघ्रः पण्डितान् नैगमांस्तथा ॥ ४ ॥


पौराणिकान् शब्दविदो ये वृद्धाश्च द्विजातयः ।
स्वराणां लक्षणज्ञांश्च उत्सुकान् द्विजसत्तमान् ॥ ५ ॥

लक्षणज्ञांश्च गान्धर्वान् नैगमांश्च विशेषतः ।
पादाक्षरसमासज्ञान् छन्दःसु परिनिष्ठितान् ॥ ६ ॥

कलामात्राविशेषज्ञान् ज्यौतिषे च परं गतान् ।
क्रियाकल्पविदश्चैव तथा कार्यविविशारदान् ॥ ७ ॥

भाषाज्ञानिङ्‌गितज्ञांश्च नैगमांश्चाप्यशेषतः ।
त्यानंतर पुरुषसिंह राजा रामांनी कर्मानुष्ठानांतून अवकाश मिळाल्यावर मोठ मोठे मुनि, राजे, वेदवेत्ते पण्डित, पौराणिक, वैश्याकरणी श्रेष्ठ वृद्ध ब्राह्मण, स्वरांचे आणि लक्षणांचे ज्ञाते, गीत ऐकण्यास उत्सुक असलेले द्विज, सामुद्रिक लक्षणे आणि संगीत विद्येचे जाणकार लोक विशेषतः नियमागमांचे विद्वान्‌ अथवा पुरवासी, भिन्न - भिन्न छंदांचे, चरण, त्यांची लघु-गुरु अक्षरे तसेच त्यांच्या संबंधाचे ज्ञान असणारे पण्डित, वैदिक छंदांचे परिनिष्ठित विद्वान, स्वरांच्या ह्रस्व, दीर्घ आदि मात्रांचे विशेषज्ञ, ज्योतिष विद्येत पारंगत पण्डित, कर्मकाण्डी, कार्यकुशल पुरुष, विभिन्न भावांना आणि चेष्टांना (हालचालीना) आणि संकेताना समजणारे पुरुष तसेच सर्व महाजनांना बोलावले. ॥४-७ १/२॥
हेतूपचारकुशलान् हैतुकांश्च बहुश्रुतान् ॥ ८ ॥

छन्दोविदः पुराणज्ञान् वैदिकान् द्विजसत्तमान् ।
चित्रज्ञान् वृत्तसूत्रज्ञान् गीतनृत्यविशारदान् ॥ ९ ॥

शास्त्रज्ञान् नीतिनिपुणान् वेदान्तार्थप्रबोधकान् ।
एतान् सर्वान् समानीय गातारौ समवेशयत् ॥ १० ॥
इतकेच नव्हे तर तर्काच्या प्रयोगात निपुण नैयायिकांना, युक्तिवादी तसेच बहुज्ञ विद्वान, छंद, पुराणे आणि वेदांचे ज्ञाते द्विजवर, चित्रकलेचे जाणकार, धर्मशास्त्रास अनुकूल सदाचाराचे ज्ञाते, दर्शन आणि कल्पसूत्राचे विद्वान, नृत्य आणि गीतात प्रवीण पुरुष, विभिन्न शास्त्रांचे ज्ञाते, नीति-निपुण पुरुष तसेच वेदान्ताचा अर्थ प्रकाशित करणार्‍या ब्रह्मवेत्त्यांनाही तेथे बोलावून घेतले. यांना सर्वांना एकत्र करून भगवान्‌ श्रीरामांनी रामायण गायन करणार्‍या त्या दोन्ही बालकांना सभेमध्ये बोलावून घेऊन बसविले. ॥८-१०॥
तेषां संवदतामेवं श्रोतॄणां हर्षवर्धनम् ।
गेयं प्रचक्रतुस्तत्र तावुभौ मुनिदारकौ ॥ ११ ॥
सभासदांमध्ये श्रोत्यांचा हर्ष वाढविणार्‍या गोष्टी होऊ लागल्या. त्याच समयी दोघा मुनिकुमारांनी गाण्यास आरंभ केला. ॥११॥
ततः प्रवृत्तं मधुरं गान्धर्वमतिमानुषम् ।
न च तृप्तिं ययुः सर्वे श्रोतारो गानसम्पदा ॥ १२ ॥
नंतर तर मधुर संगीताची तार बांधली गेली. फारच अलौकिक गायन होते. गेय वस्तुच्या विशेषतांमुळे सर्व श्रोते मुग्ध होऊन ऐकू लागले. कुणाचीही तृप्ति होत नव्हती. ॥१२॥
हृष्टा मुनिगणाः सर्वे पार्थिवाश्च महौजसः ।
पिबन्त इव चक्षुर्भिः पश्यन्ति स्म मुहुर्मुहुः ॥ १३ ॥
मुनिंचे समुदाय आणि महापराक्रमी भूपाल सर्व आनंदमग्न होऊन त्या दोघांकडे वारंवार अशा प्रकारे बघत होते जणु त्यांच्या रूपमाधुरीला नेत्रांनी पीत आहेत. ॥१३॥
ऊचुः परस्परं चेदं सर्व एव समाहिताः ।
उभौ रामस्य सदृशौ बिम्बाद् बिम्बमिवोत्थितौ ॥ १४ ॥
ते सर्व एकाग्रचित्त होऊन परस्परात या प्रकारे म्हणू लागले - या दोन्ही कुमारांची आकृति श्रीरामांशी बिलकुल मिळती जुळती आहे. हे बिम्बापासून प्रकट झालेल्या प्रतिबिम्बासमान वाटत आहेत. ॥१४॥
जटिलौ यदि न स्यातां न वल्कलधरौ यदि ।
विशेषं नाधिगच्छामो गायतो राघवस्य च ॥ १५ ॥
जर यांच्या मस्तकावर जटा नसत्या आणि यांनी वत्कले नेसलेली नसती तर आम्हांला राघवांच्यात आणि गायन करणार्‍या या दोघां कुमारांत काही अंतर दिसून आले नसते. ॥१५॥
एवं प्रभाषमाणेषु पौरजानपदेषु च ।
प्रवृत्तमादितः पूर्व सर्गं नारददर्शितम् ॥ १६ ॥
नगर आणि जनपदात निवास करणारी माणसे जेव्हा या प्रकारे बोलत होती त्याच समयी नारदांच्या द्वारा प्रदर्शित प्रथम सर्ग- मूळ रामायणाचे आरंभापासूनच गायन आरंभ झाले. ॥१६॥
ततः प्रभृति सर्गांश्च यावद् विंशत्यगायताम् ।
ततोऽपराह्णसमये राघवः समभाषत ॥ १७ ॥

श्रुत्वा विंशतिसर्गांस्तान् भ्रातरं भ्रातृवत्सलः ।
अष्टादश सहस्राणि सुवर्णस्य महात्मनोः ॥ १८ ॥

प्रयच्छ शीघ्रं काकुत्स्थ यदन्यद् अभिकाङ्‌क्षितम् ।
तेथपासून वीस सर्गापर्यंतचे गायन त्यांनी केले. तत्पश्चात्‌ अपराह्नाचा समय झाला. इतक्या उशीरापर्यंत वीस सर्गांचे गायन ऐकून भ्रातृवत्सल राघव भाऊ भरतास म्हणाले - काकुत्स्था ! तू या दोन्ही महात्मा बालकांना अठरा हजार स्वर्णमुद्रा पुरस्कार रूपाने शीघ्र प्रदान कर. या शिवाय जर आणखी काही वस्तुसाठी यांची इच्छा असेल, तर त्याही शीघ्र दिल्या जाव्यात. ॥१७-१८ १/२॥
ददौ स शीघ्रं काकुत्स्थो बालयोर्वै पृथक् पृथक् ॥ १९ ॥

दीयमानं सुवर्णं तु नागृह्णीतां कुशीलवौ ।
आज्ञा मिळताच भरत शीघ्र त्या दोन्ही बालकांना अलग अलग स्वर्ण मुद्रा देऊ लागले; परंतु त्या दिल्या जाणार्‍या सुवर्णास कुश आणि लवांनी ग्रहण केले नाही. ॥१९ १/२॥
ऊचतुश्च महात्मानौ किमनेनेति विस्मितौ ॥ २० ॥

वन्येन फलमूलेन निरतौ वनवासिनौ ।
सुवर्णेन हिरण्येन किं करिष्यावहे वने ॥ २१ ॥
ते दोघे महामनस्वी बंधु विस्मित होऊन म्हणाले - या धनाची काय आवश्यकता आहे ? आम्ही वनवासी आहोत. जंगली फळ मुळांनी जीवन-निर्वाह करीत असतो. सोने चांदी वनात घेऊन जाऊन काय करूं ? ॥२०-२१॥
तथा तयोः प्रब्रुवतोः कौतूहलसमन्विताः ।
श्रोतारश्चैव रामश्च सर्व एव सुविस्मिताः ॥ २२ ॥
त्यांनी असे म्हटल्यावर सर्व श्रोत्यांच्या मनात फार कौतुहल उत्पन्न झाले. श्रोते आणि श्रीराम सर्वच आश्चर्यचकित झाले. ॥२२॥
तस्य चैवागमं रामः काव्यस्य श्रोतुमुत्सुकः ।
पप्रच्छ तौ महातेजाः तावुभौ मुनिदारकौ ॥ २३ ॥
तेव्हा श्रीराम हे ऐकण्यास उत्सुक झाले की या काव्याची उपलब्धि कोठून झाली ? नंतर त्या महातेजस्वी रघुनाथांनी दोन्ही मुनिकुमारांना विचारले - ॥२३॥
किम्प्रमाणमिदं काव्यं का प्रतिष्ठा महात्मनः ।
कर्ता काव्यस्य महतः क्व चासौ मुनिपुङ्‌गवः ॥ २४ ॥
या महाकाव्याची श्लोक संख्या किती आहे ? याचे रचयिता महात्मा कविंचे आवासस्थान कोणते आहे ? या महान्‌ काव्याचे कर्ता कोण मुनिश्वर आहेत आणि ते कोठे आहेत ? ॥२४॥
पृच्छन्तं राघवं वाक्यं ऊचतुर्मुनिदारकौ ।
वाल्मीकिर्भगवान्कर्ता सम्प्राप्तो यज्ञसंविधम् ।
येनेदं चरितं तुभ्यमशेषं सम्प्रदर्शितम् ॥ २५ ॥
याप्रकारे विचारणार्‍या राघवांना, ते दोघे मुनिकुमार म्हणाले -महाराज ! ज्या काव्याच्या द्वारा आपल्या या संपूर्ण चरित्राचे प्रदर्शन केले गेले आहे त्याचे रचयिता भगवान्‌ वाल्मीकि आहेत आणि ते या यज्ञस्थळी आलेले आहेत. ॥२५॥
सन्निबद्धं हि श्लोकानां चतुर्विंशत् सहस्रकम् ।
उपाख्यानशतं चैव भार्गवेण तपस्विना ॥ २६ ॥
त्या तपस्वी कविंच्या द्वारा बनलेल्या या महाकाव्यात चोविस हजार श्लोक आणि एकशे उपाख्याने आहेत. ॥२६॥
आदिप्रभृति वै राजन् पञ्चसर्गशतानि च ।
काण्डानि षट् कृतानीह सोत्तराणि महात्मना ॥ २७ ॥
राजन्‌ ! त्या महात्म्यांनी आदिपासून अंतापर्यंत पाचशे सर्ग तसेच सहा काण्डांची निर्मित्ति केली आहे. याशिवाय त्यांनी उत्तरकाण्डाचीही रचना केलेली आहे. ॥२७॥
कृतानि गुरुणास्माकं ऋषिणा चरितं तव ।
प्रतिष्ठा जीवितं यावत् तावत् सर्वस्य वर्तते ॥ २८ ॥
आमचे गुरू महर्षि वाल्मीकिनीच त्या सर्वांची निर्मिति केली आहे. त्यांनी आपल्या चरित्राला महाकाव्याचे रूप दिले आहे. यात आपल्या जीवनातील सर्व गोष्टी आलेल्या आहेत. ॥२८॥
यदि बुद्धिः कृता राजन् श्रवणाय महारथ ।
कर्मान्तरे क्षणीभूतः तच्छृणुष्व सहानुजः ॥ २९ ॥
महारथी नरेश ! जर आपण हे ऐकण्याचा विचार केला असेल तर यज्ञ-कर्मांतून अवकाश मिळाल्यावर यासाठी निश्चित समय काढावा आणि आपल्या भावांसह बसून हे नियमितरूपाने श्रवण करावे. ॥२९॥
बाढमित्यब्रवीद् रामः तौ चानुज्ञाप्य राघवम् ।
प्रहृष्टौ जग्मतुः स्थानं यत्रास्ते मुनिपुङ्‌गवः ॥ ३० ॥
तेव्हा श्रीरामांनी म्हटले - फार चांगले ! आम्ही हे काव्य ऐकू. त्यानंतर राघवांची आज्ञा घेऊन दोघे भाऊ कुश आणि लव प्रसन्नतापूर्वक जेथे मुनिवर वाल्मीकि राहिलेले त्या स्थानावर गेले. ॥३०॥
रामोऽपि मुनिभिः सार्धं पार्थिवैश्च महात्मभिः ।
श्रुत्वा तद् गीतिमाधुर्यं कर्मशालामुपागमत् ॥ ३१ ॥
श्रीरामही महात्मा मुनि आणि राजांसह ते मधुर संगीत ऐकून कर्मशाळेत (यज्ञमण्डपात) निघून गेले. ॥३१॥
शुश्राव तत्ताललयोपपन्नं
सर्गान्वितं सुस्वरशब्दयुक्तम् ।
तन्त्रीलयव्यञ्जनयोगयुक्तं
कुशीलवाभ्यां परिगीयमानम् ॥ ३२ ॥
याप्रकारे पहिल्या दिवशी कतिपय सर्गांनी युक्त सुंदर स्वर तसेच मधुर शब्दांनी पूर्ण, ताल आणि लयेने संपन्न तसेच वीणेच्या लयीच्या व्यञ्जनेने युक्त ते काव्यगायन, जे कुश आणि लवाने गायले होते ते श्रीरामांनी ऐकले. ॥३२॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे चतुर्नवतितमः सर्गः ॥ ९४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा चौर्‍याण्णवावा सर्ग पूरा झाला. ॥९४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP