श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ पञ्चविंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सलक्ष्मणेन श्रीरामेण सुग्रीवस्य ताराया अङ्‌गदस्य च प्रबोधनं, वालिनो दाहसंस्कारार्थं प्रेरणं च तदनु ताराप्रभृतिभिः सह सर्वैर्वानरैर्वालिनः शवस्य श्मशानभूमौ नयनमङ्‌गदेन तस्य दाहसंस्कारस्य संपादनं तदर्थं जलाञ्जलीनां दानं च - लक्ष्मणसहित श्रीरामांचे सुग्रीव, तारा आणि अंगदास समजाविणे आणि वालीच्या दाह-संस्कारासाठी आज्ञा प्रदान करणे, नंतर तारा आदिसहित सर्व वानरांचे वालीच्या शवास स्मशान भूमिमध्ये घेऊन जाऊन अंगदाच्या द्वारा त्याचा दाह-संस्कार करणे आणि त्यास जलाञ्जलि देणे -
सुग्रीवं चैव तारां च साङ्‌गथदं सहलक्ष्मणः ।
समानशोकः काकुत्स्थः सांत्वयन्निदमब्रवीत् ॥ १ ॥
लक्ष्मणासहित काकुत्स्थ राम सुग्रीव आदिंच्या शोकाने त्यांच्या सारखेच दुःखी झाले होते. त्यांनी सुग्रीव, अंगद आणि तारेला सांत्वना देत याप्रकारे म्हटले- ॥१॥
न शोकपरितापेन श्रेयसा युज्यते मृतः ।
यदत्रानंतरं कार्यं तत्समाधातुमर्हथ ॥ २ ॥
’शोक-संताप करण्याने मेलेल्या जीवाचे काही भले होत नाही. म्हणून आता पुढे जे काही कर्तव्य आहे, ते तुम्ही विधिपूर्वक संपन्न केले पाहिजे. ॥२॥
लोकवृत्तमनुष्ठेयं कृतं वो बाष्पमोक्षणम् ।
न कालादुत्तरं किञ्चित्कर्म शक्यमुपासितुम् ॥ ३ ॥
’तुम्ही सर्व लोक खूप अश्रु ढाळून चुकला आहात. आता त्याची आवश्यकता नाही. लोकाचाराचेही पालन झाले पाहिजे. वेळ घालविल्यावर कुठलेही विहित कर्म केले जाऊ शकत नाही (कारण की उचित समयावर ते केले गेले नाही तर त्या कर्माचे काही फळ मिळत नाही.) ॥३॥
नियतिः कारणं लोके नियतिः कर्मसाधनम् ।
नियतिः सर्वभातानां नियोगेष्विह कारणम् ॥ ४ ॥
’जगतात नियति (काळ) हे सर्वांचे कारण आहे. तोच समस्त कर्मांचे साधन आहे आणि काळच समस्त प्राण्यांना विभिन्न कर्मामध्ये नियुक्त करण्याचे कारण आहे (कारण की तोच सर्वांचा प्रवर्तक आहे.) ॥४॥
न कर्ता कस्यचित्कश्चिन्नियोगे चापि नेश्वरः ।
स्वाभावे वर्तते लोकस्तस्य कालः परायणम् ॥ ५ ॥
कोणीही पुरुष स्वतंत्रतापूर्वक कुठलेही काम करू शकत नाही आणि दुसर्‍यालाही त्या कामात लावण्याची शक्ति बाळगू शकत नाही. सारे जगत् स्वभावाच्या अधीन आहे आणि स्वभावाचा आधार काळ आहे. ॥५॥
न कालः कालमत्येति न कालः परिहीयते ।
स्वभावं च समासाद्य न कश्चिदतिवर्तते ॥ ६ ॥
’काळही काळाचे (आपण केलेल्या व्यवस्थेचे) उल्लंघन करू शकत नाही. तो काळ कधी क्षीण होत नाही. स्वभावा (प्रारब्धकर्मा)ची प्राप्ती झाली की कुणीही त्याचे उल्लंघन करीत नाही. ॥६॥
न कालस्यास्ति बंधुत्वं न हेतुर्न पराक्रमः ।
न मित्रज्ञातिसंबंधः कारणं नात्मनो वशः ॥ ७ ॥
’काळाचा कुणाशीही बंधुत्वाचा, मित्रतेचा अथवा जातिपातीचा संबंध नसतो. त्याला वश करण्याचा काही उपाय नाहीत तसेच त्याच्यावर कुणाचा पराक्रमही चालू शकत नाही. कारणस्वरूप भगवान् काल हा जीवाला कधी वश होत नाहीत. ॥७॥
किंतु कालपरीणामो द्रष्टव्यः साधु पश्यता ।
धर्मश्चार्थश्च कामश्च कालक्रमसमाहिताः ॥ ८ ॥
म्हणून साधुदर्शी विवेक पुरुषाने सर्व काही काळाचा परिणाम असेच समजले पाहिजे. धर्म, अर्थ आणि कामही कालक्रमानेच प्राप्त होतात. ॥८॥
इतः स्वां प्रकृतिं वाली गतः प्राप्तः क्रियाफलम् ।
धर्मार्थकामसंयोगैः पवित्रं प्लवगेश्वरः ॥ ९ ॥
(माझ्या द्वारे मारला गेल्यामुळे) वानरराज वाली शरीरापासून मुक्त होऊन आपल्या शुद्ध स्वरूपास प्राप्त झाले आहेत. नीतिशास्त्राच्या अनुकूल साम, दान आणि अर्थाच्या समुचित प्रयोगाने मिळणारी जी पवित्र कर्मे आहेत, ती सर्व त्यांना प्राप्त झाली आहेत. ॥९॥
स्वधर्मस्य च संयोगाज्जितस्तेन महात्मना ।
स्वर्गः परिगृहीतश्च प्राणानपरिरक्षता ॥ १० ॥
’महात्मा वालीने प्रथम आपल्या धर्माच्या संयोगाने ज्यांच्यावर विजय प्राप्त केला होता, त्या स्वर्गास, या समयी युद्धात प्राणांचे रक्षण न करून त्यांनी आपल्या हातात प्राप्त केले आहे. ॥१०॥
एषा वै नियतिः श्रेष्ठा यां गतो हरियूथपः ।
तदलं परितापेन प्राप्तकालमुपास्यताम् ॥ ११ ॥
हीच सर्वश्रेष्ठ गति आहे; जिला वानरांचे सरदार वालींनी प्राप्त केली आहे. म्हणून आता त्यांच्यासाठी शोक करणे व्यर्थ आहे. यासमयी तुमच्या समोर जे कर्तव्य उपस्थित आहे ते पुरे करा.’ ॥११॥
वचनांते तु रामस्य लक्ष्मणः परवीरहा ।
अवदत् प्रश्रितं वाक्यं सुग्रीवं गतचेतसम् ॥ १२ ॥
श्रीरामांचे बोलणे समाप्त झाल्यावर शत्रुवीरांचा संहार करणार्‍या लक्ष्मणांनी, ज्यांची विवेकशक्ती नष्ट झाली होती त्या सुग्रीवास नम्रतापूर्वक याप्रकारे म्हटले- ॥१२॥
कुरु त्वमस्य सुग्रीव प्रेतकार्यमनंतरम् ।
ताराङ्‌गसदाभ्यां सहितो वालनो दहनं प्रति ॥ १३ ॥
’सुग्रीवा ! आता तुम्ही अंगद आणि तारेबरोबर राहून वालीच्या दाहसंस्कार संबंधी प्रेतकार्य करा.’ ॥१३॥
समाज्ञापय काष्ठानि शुष्काणि च बहूनि च ।
चंदनादीनि दिव्यानि वालिसंस्कारकारणात् ॥ १४ ॥
’सेवकांना आज्ञा द्या. ते वालीच्या दाह-संस्कारा निमित्त भरपूर प्रमाणांत वाळलेली लाकडे आणि चंदन घेऊन येऊ देत. ॥१४॥
समाश्वासय चैनं त्वमङ्‌गिदं दीनचेतसम् ।
मा भूर्बालिशबुद्धिस्त्वं त्वदधीनमिदं पुरम् ॥ १५ ॥
’अंगदाचे चित्त फार दुःखी होऊन गेले आहे. त्यांना धैर्य द्या. (धीर द्या) तुम्ही आपल्या मनांत मूढता आणू नका- किंकर्तव्यमूढ बनू नका; कारण हे सर्व नगर तुमच्याच अधीन आहे. ॥१५॥
अङ्‌ग्दस्त्वानयेन्माल्यं वस्त्राणि विविधानि च ।
घृतं तैलमथो गंधान्यच्चात्र समनंतरम् ॥ १६ ॥
’अंगद पुष्पमाला, नाना प्रकारची वस्त्रे, तूप, तेल, सुगंधित पदार्थ तसेच अन्य सामान, ज्याची आता आवश्यकता आहे, स्वतः घेऊन येईल. ॥१६॥
त्वं तार शिबिकां शीघ्रमादायागच्छ संभ्रमात् ।
त्वरा गुणवती युक्ता ह्यस्मिन्काले विशेषतः ॥ १७ ॥
’तार ! तू शीघ्र जाऊन वेगपूर्वक एक पालखी घेऊन ये; कारण की या समयी अधिक उत्साह दाखविला पाहिजे. अशा अवसरी तीच लाभदायक होते. ॥१७॥
सज्जीभवंतु प्लवगाः शिबिकावहनोचिताः ।
समर्था बलिनश्चैव निर्हरिष्यंति वालिनम् ॥ १८ ॥
’पालखी उचलून वाहून नेण्यासाठी योग्य जे बलवान् आणि समर्थ वानर असतील, त्यांनी तयार राहावे. तेच वालीला येथून स्मशानभूमीत घेऊन चलतील’. ॥१८॥
एवमुक्त्वा तु सुग्रीवं सुमित्रानंदवर्द्धनः ।
तस्थौ भ्रातृसमीपस्थो लक्ष्मणः परवीरहा ॥ १९ ॥
सुग्रीवाला असे म्हटल्यावर शत्रुवीरांचा संहार करणारे सुमित्रानंदन लक्ष्मण आपल्या भावाजवळ जाऊन उभे राहिले. ॥१९॥
लक्ष्मणस्य वचः श्रुत्वा तारः संभ्रांतमानसः ।
प्रविवेश गुहां शीघ्रं शिबिकासक्तमानसः ॥ २० ॥
लक्ष्मणाचे म्हणणे ऐकून तारच्या मनात गोंधळ माजला. तो शिबिका आणण्यासाठी शीघ्रतापूर्वक किष्किंधा नामक गुहेत गेला. ॥२०॥
आदाय शिबिकां तारः स तु पर्यापतत्पुनः ।
वानरैरुह्यमानां तां शूरैरुद्वहनोचितैः ॥ २१ ॥
तेथूनच शिबिका वाहून नेण्यास योग्य शूरवीर वानरांच्याद्वारा खाद्यांवर उचलून धरलेली ती शिबिका बरोबर घेऊन तार पुन्हा ताबडतोबच तेथे परत आला. ॥२१॥
दिव्यां भद्रासनयुतां शिबिकां स्यंदनोपमाम् ।
पक्षिकर्मभिराचित्रां द्रुमकर्मविभूषिताम् ॥ २२ ॥
ती दिव्य पालखी रथासारखी बनविलेली होती. तिच्या मध्यभागी राजाला बसण्यायोग्य उत्तम आसन होते. तिच्यात शिल्पिंच्या द्वारा कृत्रिम पक्षी आणि वृक्ष बनविले गेले होते, जे त्या पालखीला विचित्र शोभेने संपन्न बनवीत होते. ॥२२॥
आचितां चित्रपत्तीभिः सुनिविष्टां समंततः ।
विमानमिव सिद्धानां जालवातायनायुताम् ॥ २३ ॥
ती शिबिका चित्राच्या रूपाने बनविल्या गेलेल्या पायदळ सैनिकांनी (शिपायांनी) भरलेली प्रतीत होत होती. तिची निर्माणकला सर्व बाजूनी फारच सुंदर दिसून येत होती. दिसण्यात ती सिद्धांच्या विमानासारखी प्रतीत होत होती. तिच्यात कित्येक खिडक्या बनविल्या होत्या, ज्यांच्यात जाळ्या बसविलेल्या होत्या. ॥२३॥
सुनियुक्तां विशालां च सुकृतां विश्वकर्मणा ।
दारुपर्वतकोपेतां चारुकर्मपरिष्कृताम् ॥ २४ ॥
कारागिरांनी त्या पालखीला फारच सुंदर बनविण्याचा प्रयत्‍न केला होता. तिचा एकेक भाग अत्यंत सुघड बनविला गेला होता. आकारात ती फारच मोठी होती. तिच्यात लाकडाचे क्रीडा-पर्वत बनविलेले होते. ती मनोहर शिल्पकर्माने सुशोभित होती. ॥२४॥
वराभरणहारैश्च चित्रमाल्योपशोभिताम् ।
गुहागहनसञ्छन्नां रक्तचंदनभूषिताम् ॥ २५ ॥
सुंदर आभूषणे आणि हारांनी तिला सजविले गेले होते. विचित्र फुलांनी तिची शोभा वाढविली होती. शिल्पिंच्या द्वारा निर्मित गुफा आणि वनाने ती संयुक्त होती तसेच लाल चंदनद्वारा तिला विभूषित केले गेले होते. ॥२५॥
पुष्पौघैः समभिच्छन्नां पद्ममालाभिरेव च ।
तरुणादित्यवर्णाभिर्भ्राजमानाभिरावृताम् ॥ २६ ॥
नाना प्रकारच्या पुष्पसमूहांच्या द्वारा ती सर्व बाजूनी आच्छादलेली होती. तसेच प्रातःकाळच्या सूर्याप्रमाणे अरूण कांतिच्या दीप्तिमान् पद्ममालांनी ती अलंकृत होती. ॥२६॥
ईदृशीं शिबीकां दृष्ट्‍वा रामो लक्ष्मणमब्रवीत् ।
क्षिप्रं विनीयतां वाली प्रेतकार्यं विधीयताम् ॥ २७ ॥
अशा पालखीला अवलोकन करून श्रीरामांनी लक्ष्मणाकडे पहात म्हटले - ’आता वालीला लवकरच येथून स्मशानभूमीत नेले जावे आणि त्याचे प्रेतकार्य केले जावे.’ ॥२७॥
ततो वालिनमुद्यम्य सुग्रीवः शिबिकां तदा ।
आरोपयत विक्रोशन्नङ्‌गिदेन सहैव तु ॥ २८ ॥
तेव्हा अंगदासह करूण क्रंदन करीत असलेल्या सुग्रीवाने वालीच्या शवास उचलून त्या शिबिकेमध्ये ठेवले. ॥२८॥
आरोप्य शिबिकां चैव वालिनं गतजीवितम् ।
अलङ्‌काररैश्च विविधैर्माल्यैर्वस्त्रैश्च भूषितम् ॥ २९ ॥
मृत वालीला शिबिकेत उचलून त्यांना नाना प्रकारच्या अलंकारांनी फुलांच्या गजर्‍यांनी आणि नाना प्रकारच्या वस्त्रांनी विभूषित केले. ॥२९॥
आज्ञापयत्तदा राजा सुग्रीवः प्लवगेश्वरः ।
और्ध्वदैहिकमार्यस्य क्रियतामनुकूलतः ॥ ३० ॥
त्यानंतर वानरांचे स्वामी राजा सुग्रीवांनी आज्ञा दिली की माझ्या मोठ्या भावाचे और्ध्वदैहिक संस्कार शास्त्रानुकूल विधिने संपन्न केले जावेत. ॥३०॥
विश्राणयंतो रत्‍नाननि विविधानि बहून्यापि ।
अग्रतः प्लवगाः यांतु शिबिका तदनंतरम् ॥ ३१ ॥
’पुढे पुढे बरेचसे वानर नाना प्रकारची बहुसंख्य रत्‍ने लुटत चालत जावोत आणि त्यांच्या मागे शिबिका जाईल. ॥३१॥
राज्ञामृद्धिविशेषा हि दृश्यंते भुवि यादृशाः ।
तादृशैरिह कुर्वंतु वानरा भर्तृसत्क्रियाम् ॥ ३२ ॥
’या भूतलावर राजांचे और्ध्वदेहिक संस्कार त्यांच्या वाढलेल्या समृद्धिस अनुसरून जसे थाटात होतांना दिसून येतात त्याप्रकारे अधिक धन खर्च करून सर्व वानर आपले स्वामी महाराज वालींचा अंत्येष्टि संस्कार करोत.’ ॥३२॥
तादृशं वालिनः क्षिप्रं प्राकुर्वन् और्ध्वदेहिकम् ।
अङ्‌गशदं परिरभ्याशु तारप्रभृतयस्तथा ॥ ३३ ॥

क्रोशंतः प्रययुः सर्वे वानरा हतबांधवाः ।
तेव्हा तार आदि वानरांनी वालीच्या और्ध्वदेहिक संस्कांचे शीघ्र तसेच आयोजन केले ज्यांचे बांधव वाली मारले गेले होते ते सर्वच्या सर्व वानर अंगदाला हृदयाशी धरून शीघ्रतापूर्वक तेथून रडत शवाबरोबर निघाले. ॥३३ १/२॥
ततः प्रणिहिताः सर्वा वानर्यो ऽस्य वशानुगाः ॥ ३४ ॥

चुक्रुशुर्वीर वीरेति भूयः क्रोशंति ताः स्त्रियः ।
त्यांच्या मागे वालीच्या अधीन राहाणार्‍या सर्व वानर- पत्‍नी जवळ येऊन ’हा वीर, हा वीर’ म्हणत आपल्या प्रियतमाला हाका मारमारून वारंवार रडू ओरडू लागल्या. ॥३४ १/२॥
ताराप्रभृतयः सर्वा वानर्यो हतबांधवाः ॥ ३५ ॥

अनुजग्मुर्हि भर्तारं क्रशंत्यः करुणस्वनाः ।
’ज्यांच्या जीवनधनाचा वध केला गेला होता, त्या तारा आदि सर्व वानरी करूणस्वरात विलाप करीत आपल्या स्वामीच्या मागे मागे चालू लागल्या. ॥३५ १/२॥
तासां रुदितशब्देन वानरीणां वनांतरे ॥ ३६ ॥

वनानि गिरयः सर्वे विक्रोशंतीव सर्वतः ।
वनामध्ये रडणार्‍या त्या वानर वधुंच्या रोदन शब्दाने निनादून गेलेली वने आणि पर्वत ही सर्व बाजूनी रडत असल्याप्रमाणे प्रतीत होत होती. ॥३६ १/२॥
पुलिने गिरिनद्यास्तु विविक्ते जलसंवृते ॥ ३७ ॥

चितां चक्रुः सुबहवो वानराः शोककर्शिताः ।
’पहाडी(*) नदी तुंगभद्रेच्या एकान्त तटावर जे जलाने घेरलेले होते, पोहोंचल्यावर बर्‍याचशा वनचरी वानरांनी एक चिता तय्यार केली. ॥३७ १/२॥
अवरोप्य ततः स्कंधाच्छिबिकां वानरोत्तमाः ॥ ३८ ॥

तस्थुरेकांतमाश्रित्य सर्वे शोकसमन्विताः ।
त्यानंतर पालखी वहाणार्‍या श्रेष्ठ वानरांनी ती पालखी आपल्या खांद्यावरून उतरवली आणि ते सर्व शोकमग्न होऊन एकांत स्थानात जाऊन बसले. ॥३८ १/२॥
ततस्तारा पतिं दृष्टा शिबिकातलशायिनम् ॥ ३९ ॥

आरोप्याङ्‌के् शिरस्तस्य विललाप सुदुःखिता ।
तत्पश्चात् तारेने शिबिकेत झोपविलेल्या आपल्या पतिच्या शवाला पाहून त्यांचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले आणि अत्यंत दुःखी होऊन ती विलाप करू लागली. ॥३९ १/२॥
हा वानर महाराज हा नाथ मम वत्सल ॥ ४० ॥

हा महार्ह महाबाहो हा मम प्रिय पश्य माम् ।
जनं न पश्यसीमं त्वं कस्माच्छोकाभिपीडितम् ॥ ४१ ॥
’हा ! वानरांचे महाराज ! हा माझे दयाळू प्राणनाथ ! हा परम पूजनीय महाबाहु वीर ! हा माझ्या प्रियतमा ! एक वेळ माझ्याकडे पहा तर खरे ! या शोक पीडित दासीकडे तुम्ही दृष्टीपात का बरे करीत नाही’ ॥४०-४१॥
प्रहृष्टमिव ते वक्त्रं गतासोरपि मानद ।
अस्तार्कसमवर्णं च लक्ष्यते जीवतो यथा ॥ ४२ ॥
’दुसर्‍यांना मान देणार्‍या प्राणवल्लभा ! प्राण निघून गेल्यावरही तुमचे मुख जीवित अवस्थेप्रमाणे अस्ताचलवर्ती सूर्यासमान अरूण प्रभेने युक्त आणि प्रसन्न दिसून येत आहे. ॥४२॥
एष त्वां रामरूपेण कालः कर्षति वानर ।
येन स्म विधवाः सर्वाः कृता एकेषुणा वने ॥ ४३ ॥
’वानरराज ! रामांच्या रूपात हा काळच तुम्हांला खेचून घेऊन जात आहे. ज्यांनी युद्धाच्या मैदानात एकच बाण मारून आम्हा सर्वांना विधवा बनविले. ॥४३।
इमास्तास्तव राजेंद्र वानर्यो वल्लभाः सदा ।
पादैर्विकृष्टमध्वानमागताः किं न बुध्यसे ॥ ४४ ॥
’महाराज ! या तुमच्या प्रिय वानरिणी, ज्या वानरांप्रमाणे उड्या मारत चालणे जाणत नाहीत, तुमच्या मागे मागे बर्‍याच दूरच्या मार्गावर पायीच आल्या आहेत. ही गोष्ट काय तुम्ही जाणत नाही कां ? ॥४४॥
तवेष्टा ननु नामैता भार्याश्चंद्रनिभाननाः ।
इदानीं नेक्षसे कस्मात्सुग्रीवं प्लवगेश्वरम् ॥ ४५ ॥
’वानरराज ! ज्या तुम्हाला परम प्रिय होत्या त्या या तुमच्या सर्व चंद्रमुखी भार्या येथे उपस्थित आहेत. तुम्ही या सर्वांना तसेच आपला भाऊ सुग्रीव यांनाही या समयी का बरे पहात नाही ?’ ॥४५॥
एते हि सचिवा राजन् तारप्रभृतयस्तव ।
पुरवासी जनश्चायं परिवार्या ऽ ऽसते ऽनघ ॥ ४६ ॥
’राजन् ! हे तार आदि तुमचे सचिव तसेच हे पुरजनवासी तुम्हांला चारी बाजूंनी घेरून दुःखी होत आहेत. ॥४६॥
विसर्जयैतान् प्लवगान् यथोचितमरिंदम ।
ततः क्रीडामहे सर्वा वनेषु मदनोत्कटाः ॥ ४७ ॥
’शत्रुदमन ! आपण पूर्वीप्रमाणे या मंत्र्यांना निरोप द्यावा, नंतर आम्ही सर्व प्रेमोन्मत्त होऊन या वनात आपल्या बरोबर क्रीडा करू.’ ॥४७॥
एवं विलपतीं तारां पतिशोकपरिप्लुताम् ।
उत्थापयंति स्म तदा वानर्यः शोककर्शिताः ॥ ४८ ॥
पतीच्या शोकात बुडलेली तारा याप्रकारे विलाप करीत आहे हे पाहून तिला शोकाने दुर्बल झालेल्या अन्य वानरीणींनी उठविले. ॥४८॥
सुग्रीवेण ततः सार्धमङ्‌गथदः पितरं रुदन् ।
चितामारोपयामास शोकेनाभिहतेंद्रियः ॥ ४९ ॥
यानंतर संताप पीडित इंद्रियाच्या अंगदाने रडत रडत सुग्रीवाच्या मदतीने पित्याला चितेवर ठेवले. ॥४९॥
ततो ऽग्निं विधिवद्दत्त्वा सो ऽपसव्यं चकार ह ।
पितरं दीर्घमध्वानं प्रस्थितं व्याकुलेंद्रियः ॥ ५० ॥
नंतर शास्त्रीय विधिच्या अनुसार तिच्यात अग्नि लावून देऊन त्यांनी तिची प्रदक्षिणा केली. यानंतर ’माझे पिता दीर्घ यात्रेसाठी प्रस्थित झाले आहेत’ असा विचार मनात येऊन अंगदाची सर्व इंद्रिये शोकाने व्याकुळ होऊन गेली. ॥५०॥
संस्कृत्य वालिनं ते तु विधिपूर्वं प्लवंगमाः ।
आजग्मुरुदकं कर्तुं नदीं शीतजलां शिवाम् ॥ ५१ ॥
याप्रकारे वालीचा विधिवत् दाह-संस्कार करून सर्व वानर जलाञ्जली देण्यासाठी पवित्र जलाने भरलेल्या कल्याणमयी तुंगभद्रा नदीच्या तटावर आले. ॥५१॥
ततस्ते सहितास्तत्र ह्यङ्‌गिदं स्थाप्य चाग्रतः ।
सुग्रीवतारासहिताः सिषिचुर्वालिने जलम् ॥ ५२ ॥
तेथे अंगदाला पुढे ठेवून सुग्रीव आणि तारासहित सर्व वानरांनी वालीसाठी एकाच वेळी जलाञ्जली दिली. ॥५२॥
सुग्रीवेणैव दीनेन दीनो भूत्वा महाबलः ।
समानशोकः काकुत्स्थः प्रेतकार्याण्यकारयत् ॥ ५३ ॥
 दुःखी झालेल्या सुग्रीवाबरोबरच त्यांच्या सारखेच शोकग्रस्त तसेच दुःखी होऊन महाबली काकुत्स्थ रामांनी वालिचे समस्त प्रेतकार्य करविले. ॥५३॥
ततस्तु तं वालिनमग्र्यपौरुषं
प्रकाशमिक्ष्वाकुवरेषुणा हतम् ।
प्रदीप्य दीप्ताग्निसमौजसं तदा
सलक्ष्मणं राममुपेयिवान् हरिः ॥ ५४ ॥
याप्रकारे इक्ष्वाकुवंश शिरोमणी श्रीरामांच्या बाणाने मारल्या गेलेल्या श्रेष्ठ पराक्रमी आणि प्रज्वलित अग्निप्रमाणे तेजस्वी सुविख्यात वालीचा दाहसंस्कार करून सुग्रीव त्यासमयी लक्ष्मणासहित श्रीरामांच्या जवळ आले. ॥५४॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे पञ्चविंशः सर्गः ॥ २५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा पंचविसावा सर्ग पूरा झाला. ॥२५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP