॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ 
   
॥ श्रीभावार्थरामायण ॥ 
  
उत्तरकांड 
  
॥  अध्याय विसावा ॥   
रावणाचे नर्मदातीरावर आगमन 
  
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥  
तदनंतरें श्रावणारिनंदन । अगस्तीप्रति कर जोडून ।  
म्हणता झाला स्वामीनें निरुपण । रावणाचें सांगितलें ॥१॥  
दशानन विचरत क्षितीं । पृथ्वीचे भूप शरण येती ।  
तयांतें जिंकोनि लंकापती । पुढारां चाले जिंतित ॥२॥  
ऐसें जिंतिलें भूमंडळ । राजे जिंतिले ज्यांचा पराक्रम प्रबळ ।  
ऐसा दशानन अति सबळ । कोठे नाहीं पराभविला ॥३॥  
निर्वीर होती तैं सृष्टी । ऐसें गमतें माझे पोटीं ।  
यदर्थी आशंका थोर मोठी । माझे जीवीं वाटतसे ॥४॥  
बलाढ्य राजे अवनीं नव्हते । ऐसें वाटतें माझेनि मतें ।  
तैं पाशुपतादिक होतीं शस्त्रें । त्याचें काहीं न चलेचि  ॥५॥  
ऐसें श्रीरामाचे वचन । ऐकोनियां हास्यवदन ।  
बोलता झाला तूं ब्रह्म पूर्ण । जाणोनि प्रश्न आम्हां करिसी ॥६॥  
तूं ये सृष्टीचा कर्ता । तुझा कुमर विधाता ।  
मायेस तुझेनि प्रबळता । त्रैलोक्यातें मोहावया ॥७॥  
तूं ईश्वराचा ईश्वर । तुझा योगियां न फळे पार ।  
तूं स्वलीलेनें हा अवतार । घेतला कार्याकारणें ॥८॥  
तो तूं श्रीरामा आम्हांप्रती । कथा पुससी अति निगुती ।  
हें आश्चर्य वाटे आमुचें चित्तीं । कृपामूर्तिं कृपाळुवा ॥९॥  
आमुचा वाढवोनियां मान । आम्हांसि देतोसि भूषण ।  
तरी तुझिये कृपेनें जाण । पुढील निरुपण सांगतसें ॥१०॥  
रावणें अनरण्य भूपती । जिंतोनि चालिला विचरत क्षितीं ।  
तदनंतरें श्रीरामा नगरी माहिष्मती । अपूर्व पुढें देखिली ॥११॥  
सहस्त्रार्जुनाच्या माहिष्पतीनगरीला रावणाचें ससैन्य आगमन :  
महिष्मतीनामें नगरी । तिची सरी न पवे स्वर्गपुरी ।  
तोरणें पताका घरोघरीं । अति साजिरीं अनुपम्य ॥१२॥  
तिये नगरीसमीप । येवोनि पौलस्तिकुळदीप ।  
सवें प्रधान ज्यांचा अगणित प्रताप । ऐसें तेथें येते झाले ॥१३॥  
रावणें पृथ्वीपति जिंतिले । थोर थोर भूपां दुःख दिधलें ।  
ऐसे करितां पुढे देखिलें । नगर राया अर्जुनाचें ॥१४॥  
तया नगरीचा भूपती । प्रजापतेजें अद्भुतकीर्ती ।  
अग्नीसारिखी दिसे दीप्ती । नामें अर्जुन विख्यात ॥१५॥  
सहस्त्रार्जुन त्या वेळी स्त्रियांसह नर्मदेवर क्रीडेसाठी गेलेला होता :  
तो सहस्त्रार्जुन ते दिवशीं । स्त्रियांसहित नर्मदेसीं ।  
गेला असतां जळक्रीडेसीं । मागें रावण पैं आला ॥१६॥  
सवें प्रधान थोर थोर । ऐसा आला दशशिर ।  
अर्जुनाच्या प्रधानांसी उत्तर । बोलता झाला रावण ॥१७॥  
अगा ये मंत्री हो तुमचा नृपती । कोठें आहे तो सांगा निश्चितीं ।  
मी आलों असे त्यासीं युद्धार्थी । वेगीं भूपती पाचारा ॥१८॥  
मी लंकेश दशानन । आलों रायासीं युद्धालागून ।  
सांग तयाप्रति त्वरेंकरुन । युद्धा रावण पाचारी ॥१९॥  
रावणाचे आव्हान ऐकून राजाचे प्रधान भयभीत :  
ऐकोन राक्षसाचें वचन । प्रधान झाले कंपायमान ।  
म्हणती राक्षसाधिपा जाण । राजा नाहीं नगरीमध्यें ॥२०॥  
 ऐकोनि नगरवासियांची मात । पुढें चालिला लंकानाथ ।  
तंव देखिला विंध्य पर्वत । अति उन्नत गगनामपम ॥२१॥  
सहस्त्र शिखरें पर्वतासीं । सिंह शार्दूळ तया वनप्रदेशीं ।  
सरितातोय गर्जें खळाळेंसी । तेणें नादें अंबर गर्जे ॥२२॥  
देव दानव गंधर्व । किन्नर अप्सरा मानव ।  
आणि ऋषींचे समुदाव । आनंदें स्वयमेव क्रीडा करिती ॥२३॥  
जैसे देव अमरावरीं । संतोषें क्रीडा करिती ।  
तैसे त्या विंध्यपर्वतीं । आनंदें वसती सुर सिद्ध ॥२४॥  
रावण नर्मदातीरावर आला :  
उल्कावंत दरीवंत । हिमवंतासमान तो पर्वत ।  
देखोनिया लंकानाथ । नर्मदातीराप्रति आला ॥२५॥  
तया पर्वताचे शिरीं । नर्मदा नांवे नदी निर्धारीं ।  
जिचेनि दर्शनें पातका उरी । नुरे ऐसा जिचा महिमा ॥२६॥  
तिये नर्मदेच्या दक्षिणभागीं सागर । जजो सकळ नदींचा ईश्वर ।  
तयाप्रति ते चतुर । हर्षे निर्भर मीनली पैं ॥२७॥  
नर्मदा नदीचे वर्णन :  
तिये रेवेचिया तीरीं । श्वानदें पक्षी नानापरी ।  
वसती तेणें साजिरी । वनस्थळीं शोभत ॥२८॥  
रानगाई सिंह शार्दूळ । उन्मत्त गज विशाळ ।  
म्हैसे उष्ट्र व्याघ्र सायाळ । प्राशावया जळ वास तीरीं ॥२९॥  
मृगामृगींचें थवे । चितळे इत्यादिक सेवोनि रेवे ।  
आणिक श्वापदें तीर बरवें । वनफळें सेवोनि वसताती ॥३०॥  
चक्रवाकें हंस अनेक । तळकुक्कुट सारसमयुरादिक ।  
कोकिळा कूजती तेणें तटाक । अति रमणीय शोभलें ॥३१॥  
नानापरींच्या वृक्षयाती । अनेक प्रकारच्या कुसुमजाती ।  
भ्रमरसंघ रुणझुण करिती । पांथिकां विश्रांती व्हावया ॥३२॥  
शनैः शनैः मलयानिळ । तेणें मार्गस्थां सुखकल्लोळ ।  
घालिती आनंदाचा गोंधळ । सुखी सकळ म्हणोनी ॥३३॥  
तदनंतरें तिये तीरीं । नर्मदा अक्षोभ अमूप वारी ।  
शोभती झाली ते अवधारीं । श्रीरामचंद्रा दयाळुवा ॥३४॥  
कुमुदें विकासलीं सुमनीं । तेचि माथां शोभे वेणी ।  
चक्रवाकें कुच दोनी । वनिता म्हणोनी वर्णिजे ॥३५॥  
विस्तीर्ण वाळुवंट सुंदर । तोचि माज सुकुमार ।  
हंसावळी मेखळा साचार । लहरी तें मुक्ताफळ शोभे नाकीं ॥३६॥  
पुष्पें तीरींची ते चंदन उटी । कुमुदें तेचि शोभे धटी ।  
जळप्रवाह त्वचा गोमटी । उत्पल जें तेंचि नयन ॥३७॥  
तीर अत्यंत विशाळ । माजि मीन मगरांचा उल्लाळ ।  
तेचि गळां मुक्तामाळ । सुंदर वेल्हाळ शोभली ॥३८॥  
ऐसें देखोनि नर्मदारत्न । पुष्पकींहून उतरला दशानन ।  
करावया अवगाहन । तिये ठायीं ते काळीं ॥३९॥  
त्या नर्मदेच्या रम्यतीरीं । रम्य पुष्पवाटिका साजिरी ।  
मंत्रियांसहित वैश्रवणारी । सुखं तेथें बैसला ॥४०॥  
उदक भरोनि हेमपात्रीं । करचरण प्रक्षाळी भूपती ।  
आचमन करोनि मस्तकीं गात्रीं । शिंपी पुण्य तोय म्हणोनी ॥४१॥  
रावणाचे स्वमहिमान व नर्मदेचे महत्त्व  :  
लाहोनि नर्मदादर्शन । संतोषला दशानन ।  
शुकसारणांप्रति मधुर वचन । बोलता झाला ते काळीं ॥४२॥  
रावण म्हणे सुरारि हो । ज्याचा अरि केतिराहो ।  
तो मध्यान्हीं आला पहा हो । मद्भयें शीतळ किरणें केलीं ॥४३॥  
ज्याचे सहस्त्र रश्मींकरुन । जग धवळिलें दिसे कांचन ।  
तीक्ष्ण उष्णें तपतसे भान । मध्यान्हकाळीं विश्व पीडी ॥४४॥  
तो सूर्य माझेनि भयेसीं । शशीसारिखे शीतळतेसीं ।  
तपता झाला आजींच्या दिवसीं । त्यावरी नर्मदासुंगधोदकें ॥४५॥  
श्रमहरिता अनिळु । तोही वाहतो हळुहळु ।  
विशेष हें नर्मदाजळु । मद्भयें शीतळे पैं झालें ॥४६॥  
जैसी योषिता लावण्यकरीं । अवयव आच्छादी सलज्ज भारी ।  
तैसी ही नर्मदा नारी । मीन लहरीनें झांकितसे ॥४७॥  
रावण म्हणे मंत्रिया-प्रती । वैरियांचे शस्त्रास्त्रीं ।  
रुधिरोक्षित सर्व गात्रीं । रायांसी युद्ध करितां हो ॥४८॥  
जैसें अहिप्रियलेपन । सर्वांगी लाविती सभाग्य जन ।  
तैसी तुमची वपु शोणितेंकरुन । अत्यंत आरक्त पैं झाली ॥४९॥  
रावणाचा प्रधानादिकांना नर्मदास्नानाचा आदेश :  
ते तुम्ही सर्व प्रधान । करा नर्मदेचे स्नान ।  
तेणें व्हाल पुण्यपावन । दोष दारुण नासती ॥५०॥  
जैसी दंडकारण्यीं गोदावरी । प्राणिमात्रातें पुनीत करी ।  
तैसी ही नर्मदा स्नानानें उद्धरी । तापत्रयापासूनी ॥५१॥  
पाहतां गंगा भरत-खंडीं । प्राणियांच्या दोषां दंडी ।  
तैसे तुम्ही मुंडीमुंडी । मज्जनें पापावेगळें होईजे ॥५२॥  
आणीक तुम्ही सकळ जन । पुष्पें आणा रे संपूर्ण ।  
येथें पूजूं उमारमण । सुख संपन्न भोगावया ॥५३॥  
प्रेमसिंधु गिरिजापती । पूजिलिया होय भुक्ती मुक्ती ।  
तयाचे पूजेलागीं पुष्पयाती । आणावी तुम्ही सकळिकीं ॥५४॥  
ऐकोनि रावणाचें वचन । समस्त प्रधान मिळोन ।  
ते कोण कोण म्हणाल नामाभिधान । सावधान अवधारीं ॥५५॥  
शुक सारण महोदर । धूम्राक्ष  प्रहस्त अंकपन वीर ।  
आणीकही थोर थोर । अनेक नामें तयांची ॥५६॥  
सर्वांनी स्नान करुन शिवपूजेसाठी रावणाला फुले आणून दिली :  
उतरोनि नदीभीतरीं । स्नान करितां महावीरीं ।  
उदक चढे दोहीं तीरी । पूर आल्यासारखें ॥५७॥  
उन्मत्त गज रिघोनि जळीं । बुडे फिरे दे आरोळी ।  
तैसे राक्षस मिळोनि सकळीं । जळक्रीडा पैं केली ॥५८॥  
समस्त राक्षस मिळोन । करिते झाले नर्मदास्नान ।  
सवेंचि नाना जातींची पुष्पें तोडून । अचळ केला तयांचा ॥५९॥  
पुष्पें देखोनियां दृष्टीं । रावणा हर्ष न माये पोटीं ।  
स्नान करोनि उठाउठीं । विध्यक्त संध्या सारिली ॥६०॥  
पितृतर्पण ब्रह्मयज्ञ । जप होम अनुष्ठान ।  
तदनंतर हात जोडून । प्रधानां म्हणे गायन करा ॥६१॥  
रावणाची ऐकोनि विनंती । प्रधान सुस्वरें गायन करिती ।  
एक टाळ मृदंग वाहती । एक धरिती सुरातें ॥६२॥  
एक नृत्य पैं करित । एक थैथैकार दावित ।  
एक वीणा वाजवित । एक आळवित उपराग ॥६३॥  
जेथें नामाचा उच्चार । तेथें सदाशिव निरंतर ।  
ऐसें जणोनि राक्षसेश्वर । पूजा करावया बैसला ॥६४॥  
रावणाची शिवपूजा :  
सुवर्णमय रत्नजडित । शिवलिंगातें वागवित ।  
पृथ्वी विचरतां लंकानाथ । असे सतत लिंग सवें ॥६५॥  
तया नर्मदेचिया तीरीं । शिवपूजेचा आरंभ करी ।  
बिल्वदळांचिया राशि थोरी । पूजेलागीं आणिल्या ॥६६॥  
कुसुमांचा झाला पर्वत । सुवर्णपात्रीं पंचमृत ।  
मधाच्या कावडी भरोनि तेथ । संख्येरहित जळकुंभ ॥६७॥  
क्षीरकुंभां नाहीं मिती । धूप दीप पंचारती ।  
नानापरींच्या आरत्या नेणें किती । वाद्यें वाजती विचित्र ॥६८॥  
श्वेत पीत आरक्त । नानापरींचीं वस्त्रें पूजार्थ ।  
नामें शिवाचीं अष्टोत्तरशत । घेता झाला रावण ॥६९॥  
अभिषेकपात्र धरोनि करीं । स्तवन करिता झाला सुरारी ।  
पंचमृत घालोनि वरी । पूर्णाभिषेक पैं केला ॥७०॥  
तदनंतर लंकापती । वस्त्रें अर्पोन शीघ्रगती ।  
वाळुवंटींच्या वेदिकेप्रती । लिंगस्थापना पैं केली ॥७१॥  
भोळा पार्वतीरमण । झालासे भक्ताधीन ।  
जो मनोभावें करील पूजन । त्यासि सर्वस्व देतसे ॥७२॥  
जे अर्चिती महेशातें । ते पावती सकळ कल्याणातें ।  
जे अवगणितील शिवाचें । मृत्यु त्यातें सोडिना ॥७३॥  
ज्ञानी पंडित बुध जन । विधियुक्त करिती कर्माचरण ।  
रावण महामूढधी जाण । विधिविधान पैं नेणे ॥७४॥  
वाळुवंटींच्या ओट्यावरी । तेथें स्थापिला त्रिपुरारी ।  
करी घेवोनि सर्व सामग्री । सदाशिवासी वाहिली ॥७५॥  
तदनंतर दशशिर । पूजोनियां चंद्रशेखर ।  
मग साष्टांगीं नमस्कार । भुजा पसरोनि घातला ॥७६॥  
पुढिले प्रसंगीं श्रीरघुपती । रावणा अर्जुना युद्धप्राप्ती ।  
होईल ते कथा सावध श्रोतीं । श्रवणद्वारें ऐकिजे ॥७७॥  
एका जनर्दना शरण । रावणा सहस्त्रार्जुना युद्ध दारुण ।  
बोलिला वाल्मीक ऋषि सुजाण । सावधान अवधारिजे ॥७८॥  
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां  रावणरेवातीरगमनं नाम विंशतितमोऽध्यायः ॥२०॥ ओंव्या ॥७८॥  
GO TOP 
  
 |