[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। त्रिनवतितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
ससैन्यस्य भरतस्य चित्रकूट यात्राया वर्णनम् -
सेनेसहित भरतांच्या चित्रकूट यात्रेचे वर्णन -
तया महत्या यायिन्या ध्वजिन्या वनवासिनः ।
अर्दिता यूथपा मत्ताः सयूथाः सम्प्रदुद्रुवुः ॥ १ ॥
यात्रा करणार्‍या त्या विशाल वाहिनीने पीडित होऊन वनवासी यूथपति मत्त हत्ती आदि आपापल्या यूथांसह (कळपांसह) पळूं लागले. ॥ १ ॥
ऋक्षाः पृषतमुख्याश्च रुरवश्च समतंतः ।
दृश्यंते वनवाटेषु गिरिष्वपि नदीषु च ॥ २॥
अस्वले चितकबरे, मृग तसेच रुरु नामक मृग वनप्रदेशात, पर्वतांमध्ये आणि नद्यांच्या तटावर चारी बाजूस सेनेमुळे पीडित झालेले दिसून येऊ लागले. ॥ २ ॥
स सम्प्रतस्थे धर्मात्मा प्रीतो दशरथात्मजः ।
वृतो महत्या नादिन्या सेनया चतुरङ्‌गया ॥ ३ ॥
महान कोलाहल करणार्‍या त्या विशाल चतुरंगिणी सेनेने घेरलेले धर्मात्मा दशरथनंदन भरत अत्यंत प्रसन्नतेने यात्रा करीत होते. ॥ ३ ॥
सागरौघनिभा सेना भरतस्य महात्मनः ।
महीं सञ्छादयामास प्रावृषि द्यामिवाम्बुदः ॥ ४ ॥
ज्याप्रमाणे वर्षा ऋतुमध्ये मेघांचा समुदाय आकाशाला झाकून टाकतो त्याचप्रमाणे महात्मा भरताच्या त्या समुद्रासारख्या विशाल सेनेने दूर पर्यंतचा भूभाग आच्छादित करून टाकला होता. ॥ ४ ॥
तुरंगौघैरवतता वारणैश्च महाबलैः ।
अनालक्ष्या चिरं कालं तस्मिन् काले बभूव सा ॥ ५ ॥
घोड्यांचे समूह आणि महाबलाढ्य हत्ती यांनी भरलेली आणि दूरपर्यंत पसरलेली ती सेना त्या समयी बराच वेळपर्यंत दृष्टीपथात येत नव्हती. ॥ ५ ॥
स गत्वा दूरमध्वानं सम्परिश्रान्तवाहनः ।
उवाच वचनं श्रीमान् वसिष्ठं मन्त्रिणां वरम् ॥ ६ ॥
दूर अंतरपर्यंत रस्ता पार करून जेव्हा भरताची वाहने खूप थकून गेली तेव्हा श्रीमान् भरतांनी मंत्र्यांच्यामध्ये श्रेष्ठ वसिष्ठांना म्हटले - ॥ ६ ॥
यादृशं लक्ष्यते रूपं यथा चैव मया श्रुतम् ।
व्यक्तं प्राप्ताः स्म तं देशं भरद्वाजो यमब्रवीत् ॥ ७ ॥
’ब्रह्मन् ! मी जसे ऐकून ठेवले होते आणि जसे या देशाचे स्वरूप दिसून येत आहे त्यावरून भरद्वाजांनी जेथे पोहोंचण्याचा आदेश दिला होता त्या देशात आपण येऊन पोहोचलो आहोत हे स्पष्ट कळून येत आहे. ॥ ७ ॥
अयं गिरिश्चित्रकूटस्तथा मन्दाकिनी नदी ।
एतत् प्रकाशते दूरान्नीलमेघनिभं वनम् ॥ ८ ॥
’असे कळून येत आहे की हाच चित्रकूट पर्वत आहे आणि ती मंदाकिनी नदीच वहात आहे. हे पर्वताच्या आसपासचे वन दुरून नील मेघाप्रमाणे प्रकाशित होत आहे. ॥ ८ ॥
गिरेः सानूनि रम्याणि चित्रकूटस्य सम्प्रति ।
वारणैरवमृद्यन्ते मामकैः पर्वतोपमैः ॥ ९ ॥
’या समयी माझे पर्वताकार हत्ती चित्रकूटाच्या रमणीय शिखरांचे अवमर्दन (तुडविणे, आक्रमण करणे) करीत आहेत. ॥ ९ ॥
मुञ्चन्ति कुसुमान्येते नगाः पर्वतसानुषु ।
नीला इवातपापाये तोयं तोयधरा घनाः ॥ १० ॥
’वर्षाकालात नील जलधर मेघ पर्वत शिखरावर ज्याप्रमाणे जलाची वृष्टि करतात त्याप्रमाणे हे वृक्ष सध्या पर्वत शिखरांवर फुलांची वृष्टि करीत आहेत’. ॥ १० ॥
किन्नराचरितं देशं पश्य शत्रुघ्न पर्वते ।
हयैः समन्तादाकीर्णं मकरैरिव सागरम् ॥ ११ ॥
(या नंतर भरत शत्रुघ्नास म्हणू लागले) ’ शत्रुघ्ना ! पहा, या पर्वताच्या पायथ्याशी जो देश आहे, जेथे किन्नर विचरण करीत असतात, तो प्रदेश आपल्या सेनेच्या घोड्यांनी व्याप्त होऊन मगरींनी भरलेल्या समुद्रासमान प्रतीत होत आहे. ॥ ११ ॥
एते मृगगणा भान्ति शीघ्रवेगाः प्रचोदिताः ।
वायुप्रविद्धाः शरदि मेघजाला इवाम्बरे ॥ १२ ॥
’सैनिकांनी पिटाळून लावलेल्या मृगांच्या झुंडी तीव्र वेगाने पळून जाताना ज्याप्रमाणे शरत् कालांतील आकाशात हवेने उडविले गेलेल्या मेघांचे समूह सुशोभित होतात त्याप्रमाणे शोभत आहेत. ॥ १२ ॥
कुर्वन्ति कुसुमापीडाञ्शिरःसु सुरभीनमी ।
मेघप्रकाशैः फलकैर्दाक्षिणात्या नरा यथा ॥ १३ ॥
’हे सैनिक अथवा वृक्ष मेघासमान कांति असणारे, ढालींनी उपलक्षित होणार्‍या दक्षिण भारतीय मनुष्यांप्रमाणे आपल्या मस्तकांवर अथवा शाखांच्यावर सुगंधित पुष्प गुच्छमय आभूषणांना धारण करीत आहेत. ॥ १३ ॥
निष्कूजमिव भूत्वेदं वनं घोरप्रदर्शनम् ।
अयोध्येव जनाकीर्णा सम्प्रति प्रतिभाति मा ॥ १४ ॥
’हे वन, जे प्रथम जनरव शून्य असल्यामुळे अत्यंत भयंकर दिसत होते तेच या समयी आमच्या बरोबर आलेल्या लोकांनी व्याप्त झाल्यामुळे मला अयोध्यापुरी प्रमाणे प्रतीत होत आहे. ॥ १४ ॥
खुरैरुदीरितो रेणुः दिवं प्रच्छाद्य तिष्ठति ।
तं वहत्यनिलः शीघ्रं कुर्वन्निव मम प्रियम् ॥ १५ ॥
’घोड्यांच्या टापांनी उडालेली धूळ आकाशाला आच्छादित करून स्थित होत आहे, परंतु तिला हवा जणु प्रिय करण्यासाठीच तात्काळच अन्यत्र उडवून घेऊन जात आहे. ॥ १५ ॥
स्यंदनांस्तुरगोपेतान् सूतमुख्यैरधिष्ठितान् ।
एतान् सम्पततः शीघ्रं पश्य शत्रुघ्न कानने ॥ १६ ॥
’शत्रुघ्ना ! पहा, या वनात घोडे जुंपलेले आणि श्रेष्ठ सारथ्यांच्या द्वारे संचलित झालेले हे रथ किती त्वरेने पुढे जात आहेत. ॥ १६ ॥
एतान् वित्रासितान् पश्य बर्हिणः प्रियदर्शनान् ।
एतमापततः शैलमधिवासं पतत्रिणः ॥ १७ ॥
’जे दिसण्यात प्रिय वाटणारे मोर तर पहा. हे आमच्या सैनिकांच्या भयाने किती घाबरलेले आहेत. याच प्रकारे आपल्या आवास-स्थान पर्वताकडे उडून जाणार्‍या या अन्य पक्ष्यांवरही दृष्टिपात कर. ॥ १७ ॥
अतिमात्रमयं देशो मनोज्ञः प्रतिभाति मे ।
तापसानां निवासोऽयं व्यक्तं स्वर्गपथोऽनघ ॥ १८ ॥
’निष्पाप शत्रुघ्ना ! हा देश मला फारच मनोहर प्रतीत होत आहे. तपस्वी जनांचे हे निवास स्थान वास्तविक स्वर्गीय पथच आहे. ॥ १८॥
मृगा मृगीभिः सहिता बहवः पृषता वने ।
मनोज्ञरूपा लक्ष्यन्ते कुसुमैरिव चित्रिताः ॥ १९ ॥
’या वनात मृगींच्या सह विचरण करणारे बरेचसे चितकबरे मृग असे मनोहर दिसत आहेत की जणु यांना फुलांनी चित्रित केले गेले आहे. ॥ १९ ॥
साधु सैन्याः प्रतिष्ठन्तां विचिन्वन्तु च काननम् ।
यथा तौ पुरुषव्याघ्रौ दृश्येते रामलक्ष्मणौ ॥ २० ॥
’माझे सैनिक यथोचित रूपाने पुढे जाऊ देत आणि वनात सर्व बाजूस शोध घेऊ देत की ज्यामुळे त्या दोन्ही पुरुषसिंह श्रीराम आणि लक्ष्मणाचा पत्ता लागेल". ॥ २० ॥
भरतस्य वचः श्रुत्वा पुरुषाः शस्त्रपाणयः ।
विविशुस्तद्वनं शूरा धूमाग्रं ददृशुस्ततः ॥ २१ ॥
भरताचे हे वचन ऐकून बर्‍याचश्या शूरवीर पुरुषांनी हातामध्ये हत्यारे घेऊन त्या वनात प्रवेश केला. त्यानंतर पुढे गेल्यावर, त्यांना काही अंतर गेल्यावर, थोड्या दूर अंतरावर वरील बाजूस धूर जाताना दिसून आला. ॥ २१ ॥
ते समालोक्य धूमाग्रमूचुर्भरतमागताः ।
नामनुष्ये भवत्याग्निर्व्यक्तमत्रैव राघवौ ॥ २२ ॥
ती धूमशिखा (धुराची रेषा) पाहून ते परत आले आणि भरतांना म्हणाले, "प्रभो ! जेथे कुणी मनुष्य नसतो तेथे आग असत नाही. म्हणून श्रीराम आणि लक्ष्मण अवश्यच येथे असतील. ॥ २२ ॥
अथ नात्र नरव्याघ्रौ राजपुत्रौ परन्तपौ ।
मन्ये रामोपमाः सन्ति व्यक्तमत्र तपस्विनः ॥ २३ ॥
"जरी शत्रूना संताप देणारे पुरुषसिंह राजकुमार राम आणि लक्ष्मण येथे नसतील तरीही श्रीरामाप्रमाणे तेजस्वी दुसरे कोणीतपस्वी तर अवश्यच येथे असतील". ॥ २३ ॥
तच्छ्रुत्वा भरतस्तेषां वचनं साधुसम्मतम् ।
सैन्यानुवाच सर्वांस्तानमित्रबलमर्दनः ॥ २४ ॥
त्यांचे म्हणणे श्रेष्ठ पुरुषांद्वारा मान्य होण्या योग्यच होते; ते ऐकून शत्रुसेनेचे मर्दन करणार्‍या भरतांनी त्या समस्त सैनिकांना सांगितले - ॥ २४ ॥
यत्ता भवन्तस्तिष्ठन्तु नेतो गन्तव्यमग्रतः ।
अहमेव गमिष्यामि सुमत्रो धृतिरेव च ॥ २५ ॥
तुम्ही सर्व लोक सावधान होऊन येथेच थांबा. येथून पुढे जाऊ नका. आता मीच तेथे जाईन. माझ्याबरोबर सुमंत्र आणि धृतिही राहतील. ॥ २५ ॥
एवमुक्तास्ततः सैन्यास्तत्र तस्थुः समन्ततः ।
भरतो यत्र धूमाग्रं तत्र दृष्टिं समादधत् ॥ २६ ॥
त्यांची अशी आज्ञा मिळताच समस्त सैनिक तेथेच सर्व बाजूस पसरून उभे राहिले आणि भरतांनी जेथून धूर येत होता त्या बाजूस आपली दृष्टी स्थिर केली. ॥ २६ ॥
व्यवस्थिता या भरतेन सा चमू-
    र्निरीक्षमाणापि च भूमिमग्रतः ।
बभूव हृष्टा नचिरेण जानती
    प्रियस्य रामस्य समागमं तदा ॥ २७ ॥
भरतांच्या द्वारा तेथेच थांबविली गेलेली ती सेना पुढील भूमीचे निरीक्षण करीत तेथेच आनंदाने उभी राहिली, कारण त्यावेळी त्यांना आता लवकरच श्रीरामांचा समागम होण्याचा अवसर येणार आहे हे माहित झाले होते. ॥ २७ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे त्रिनवतितमः सर्गः ॥ ९३ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्या काण्डाचा त्र्याण्णवा सर्ग पूरा झाला ॥ ९३ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP