श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ पञ्चाधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
दुर्वाससः शापभयात् लक्ष्मणस्य नियमभङ्‌गपूर्वकं श्रीरामपार्श्वे तदागमनं सूचयितुं गमनं, श्रीरामेण दुर्वाससे भोजनदानं, तस्मिन् गते तस्य मनसि लक्ष्मणविषयिणी चिन्ता -
दुर्वासांच्या शापाच्या भयाने लक्ष्मणांनी नियमभंग करून श्रीरामांच्या जवळ त्यांच्या आगमनाचा समाचार देण्यासाठी जाणे, श्रीरामांनी दुर्वास मुनिंना भोजन करविणे आणि ते निघून गेल्यावर लक्ष्मणांसाठी चिंतित होणे -
तथा तयोः संवदतोः दुर्वासा भगवान् ऋषिः ।
रामस्य दर्शनाकाङ्‌क्षी राजद्वारमुपागमत् ॥ १ ॥
त्या दोघांमध्ये याप्रकारे संवाद चालूच होता की महर्षि दुर्वास राजद्वारावर येऊन पोहोचले. ते श्रीरामांना भेटू इच्छित होते. ॥१॥
सोऽभिगम्य तु सौमित्रिं उवाच ऋषिसत्तमः ।
रामं दर्शय मे शीघ्रं पुरा मेऽर्थोऽतिवर्तते ॥ २ ॥
त्या मुनिश्रेष्ठांनी सौमित्र लक्ष्मणांजवळ जाऊन म्हटले - तू शीघ्रच मला श्रीरामांना भेटव. त्यांना भेटलो नाही तर माझे एक काम बिघडून जात आहे. ॥२॥
मुनेस्तु भाषितं श्रुत्वा लक्ष्मणः परवीरहा ।
अभिवाद्य महात्मानं वाक्यमेतदुवाच ह ॥ ३ ॥
मुनिंचे हे बोलणे ऐकून शत्रुवीरांचा संहार करणार्‍या लक्ष्मणांनी त्या महात्म्यांना प्रणाम करून ही गोष्ट सांगितली - ॥३॥
किं कार्यं ब्रूहि भगवन् को ह्यर्थः किं करोम्यहम् ।
व्यग्रो हि राघवो ब्रह्मन् मुहूर्तं प्रतिपाल्यताम् ॥ ४ ॥
भगवन्‌ ! सांगा बरे, आपले कोठले काम आहे ? काय प्रयोजन आहे ? आणि मी आपली कोठली सेवा करूं ? ब्रह्मन्‌ ! यासमयी राघव दुसर्‍या कार्यात संलग्न आहेत, म्हणून दोन घटकापर्यंत त्यांची प्रतिक्षा करावी. ॥४॥
तच्छ्रुत्वा ऋषिशार्दूलः क्रोधेन कलुषीकृतः ।
उवाच लक्ष्मणं वाक्यं निर्दहन्निव चक्षुषा ॥ ५ ॥
हे ऐकून मुनिश्रेष्ठ दुर्वासा रोषाने भडकून गेले आणि लक्ष्मणांकडे याप्रकारे बघू लागले जणु आपल्या नेत्राग्निने त्यांना भस्म करून टाकतील की काय ? त्याच बरोबर त्यांना याप्रकारे बोलले - ॥५॥
अस्मिन् क्षणे मां सौमित्रे रामाय प्रतिवेदय ।
अस्मिन् क्षन्क्षणे मां सौमित्रे न निवेदयसे यदि ॥ ६ ॥

विषयं त्वां पुरं चैव शपिष्ये राघवं तथा ।
भरतं चैव सौमित्रे युष्माकं या च सन्ततिः ॥ ७ ॥
सौमित्र ! याच क्षणी माझ्या आगमनाची सूचना श्रीरामांना द्या. जर आत्ताच्या आत्ता माझ्या आगमनाचा समाचार निवेदन केला नाहीस तर मी राज्याला, नगराला, तुला, श्रीरामांना, भरताला आणि तुम्हा लोकांची जी संतति आहे तिला ही शाप देईन. मी पुन्हा या क्रोधाला आपल्या हृदयात धारण करूं शकणार नाही. ॥६-७॥
न हि शक्ष्याम्यहं भूयो मन्युं धारयितुं हृदि ।
तच्छ्रुत्वा घोरसङ्‌काशं वाक्यं तस्य महात्मनः ।
चिन्तयामास मनसा तस्य वाक्यस्य निश्चयम् ॥ ८ ॥
त्या महात्म्यांचे हे घोर वचन ऐकून लक्ष्मणांनी त्यांच्या वाणीपासून जो निश्चय प्रकट होत होता, त्यावर मनातल्या मनात विचार केला. ॥८॥
एकस्य मरणं मेऽस्तु मा भूत् सर्वविनाशनम् ।
इति बुद्ध्या विनिश्चित्य राघवाय न्यवेदयत् ॥ ९ ॥
माझा एकट्‍याचाच मृत्यु व्हावा हेच ठीक आहे; परंतु सर्वांचा विनाश होता कामा नये. आपल्या बुद्धिद्वारा असा विचार करून लक्ष्मणांनी राघवांना दुर्वासांच्या आगमनाचा समाचार निवेदन केला. ॥९॥
लक्ष्मणस्य वचः श्रुत्वा रामः कालं विसृज्य च ।
निस्सृत्य त्वरितो राजा अत्रेः पुत्रं ददर्श ह ॥ १० ॥
लक्ष्मणांचे वचन ऐकून राजा श्रीरामांनी काळाला निरोप दिला आणि ते तात्काळ बाहेर येऊन अत्रिपुत्र दुर्वासांना भेटले. ॥१०॥
सोऽभिवाद्य महात्मानं ज्वलन्तमिव तेजसा ।
किं कार्यमिति काकुत्स्थः कृताञ्जलिरभाषत ॥ ११ ॥
आपल्या तेजाने प्रज्वलित होत असल्यासारखे दिसणार्‍या महात्मा दुर्वासांना प्रणाम करून काकुत्स्थ रामांनी हात जोडून विचारले - महर्षे ! माझ्यासाठी काय आज्ञा आहे ? ॥११॥
तद्वाक्यं राघवेणोक्तं श्रुत्वा मुनिवरः प्रभुम् ।
प्रत्याह रामं दुर्वासाः श्रूयतां धर्मवत्सल ॥ १२ ॥
राघवांनी बोललेले वाक्य ऐकून प्रभावशाली मुनिवर दुर्वासा त्यांना म्हणाले - धर्मवत्सला ! ऐकावे. ॥१२॥
अद्य वर्षसहस्रस्य समाप्तिर्मम राघव ।
सोऽहं भोजनमिच्छामि यथासिद्धं तवानघ ॥ १३ ॥
निष्पाप राघवा ! एक हजार वर्षेपर्यंत मी उपवास केला आहे. आज माझ्या त्या व्रताच्या समाप्तिचा दिवस आहे, म्हणून यावेळी आपल्या येथे जे काही भोजन तयार असेल ते मी ग्रहण करू इच्छितो आहे. ॥१३॥
तच्छ्रुत्वा वचनं राजा राघवः प्रीतमानसः ।
भोजनं मुनिमुख्याय यथासिद्धमुपाहरत् ॥ १४ ॥
हे ऐकून राजा राघव मनातल्या मनात फार प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या मुनिश्रेष्ठांना तयार भोजन वाढले. ॥१४॥
स तु भुक्त्वा मुनिश्रेष्ठः तदन्नममृतोपमम् ।
साधु रामेति सम्भाष्य स्वमाश्रमं उपागमत् ॥ १५ ॥
ते अमृतासमान अन्न ग्रहण करून दुर्वास मुनि तृप्त झाले आणि रामांना साधुवाद देऊन आपल्या आश्रमावर निघून गेले. ॥१५॥
तस्मिन् गते मुनिवरे स्वाश्रमं लक्ष्मणाग्रजः ।
संस्मृत्य कालवाक्यानि ततो दुःखमुपागमत् ॥ १६ ॥
मुनिवर दुर्वास आपल्या आश्रमास निघून गेल्यावर लक्ष्मणांचे मोठे भाऊ श्रीराम काळाच्या वचनाचे स्मरण करून दुःखी झाले. ॥१६॥
दुःखेन च सुसन्तप्तः स्मृत्वा तद् घोरदर्शनम् ।
अवाङ्‌मुखो दीनमना व्याहर्तुं न शशाक ह ॥ १७ ॥
भयंकर भावी भ्रातृवियोगाच्या दृश्याला दृष्टिपथात आणणार्‍या काळाच्या त्या वचनावर विचार करून श्रीरामांच्या मनात अत्यंत दुःख झाले. त्यांचे मुख खाली वळले आणि ते काही बोलू शकले नाहीत. ॥१७॥
ततो बुद्ध्या विनिश्चित्य कालवाक्यानि राघवः ।
नैतदस्तीति निश्चित्य तूष्णीमासीन्महायशाः ॥ १८ ॥
त्यानंतर काळाच्या वचनावर बुद्धिपूर्वक नीट विचार करून महायशस्वी राघवांनी हा निर्णय घेतला की आता हे सर्व काहीही राहाणार नाही. असा विचार करून ते गप्प झाले. ॥१८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे पञ्चोत्तरशततमः सर्गः ॥ १०५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा एकशेपाचवा सर्ग पूरा झाला. ॥१०५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP