श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ पञ्चमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सीतायाः कृते श्रीरामस्य शोको विलापश्च -
श्रीरामांचा सीतेसाठी शोक आणि विलाप -
सा तु नीलेन विधिवत् स्वारक्षा सुसमाहिता ।
सागरस्योत्तरे तीरे साधु सा विनिवेशिता ॥ १ ॥
जिच्या विधिवत्‌ रक्षणाची व्यवस्था केली गेली होती त्या परम सावधान वानरसेनेला नीलाने समुद्राच्या उत्तर तटावर व्यवस्थित रीतीने थोपवून धरले. ॥१॥
मैन्दश्च द्विविदश्चोभौ तत्र वानरपुङ्‌गवौ ।
विचेरतुश्च तां सेनां रक्षार्थं सर्वतोदिशम् ॥ २ ॥
मैंद आणि द्विविद हे दोन प्रमुख वानरवीर त्या सेनेच्या रक्षणासाठी सर्व बाजूस विचरण करीत राहिले होते. ॥२॥
निविष्टायां तु सेनायां तीरे नदनदीपतेः ।
पार्श्वस्थं लक्ष्मणं दृष्ट्‍वा रामो वचनमब्रवीत् ॥ ३ ॥
समुद्राच्या किनार्‍यावर सेनेचा तळ पडल्यावर श्रीरामचंद्रांनी आपल्या जवळ बसलेल्या लक्ष्मणाकडे पाहून म्हटले- ॥३॥
शोकश्च किल कालेन गच्छता ह्यपगच्छति ।
मम चापश्यतः कान्तां अहन्यहनि वर्धते ॥ ४ ॥
सुमित्रानंदन ! असे म्हटले जाते जसजसा काळ जातो तसतसे काळाबरोबर शोक ही स्वत:च दूर होतो, परंतु माझा शोक तर आपल्या प्राणवल्लभेला न पाहिल्याने दिवसे दिवस वाढतच चालला आहे. ॥४॥
न मे दुःखं प्रिया दूरे न मे दुःखं हृतेति वा ।
एतदेवानुशोचामि वयोऽस्या ह्यतिवर्तते ॥ ५ ॥
माझी प्रिया माझ्यापासून दूर आहे या गोष्टीचे मला दु:ख वाटत नाही किंवा तिचे अपहरण झाले याचेही दु:ख नाही. मी तर या विचारानेच वारंवार शोकात बुडून जात आहे की तिला जिवंत राहण्यासाठी जो अवधि नियत केला गेला आहे, तो शीघ्रतापूर्वक निघून जात आहे. ॥५॥
वाहि वात यतः कान्ता तां स्पृष्ट्‍वा मामपि स्पृश ।
त्वयि मे गात्रसंस्पर्शः चंद्रे दृष्टिसमागमः ॥ ६ ॥
हे वायु, जेथे माझी प्राणवल्लभा आहे तेथे तू वहात रहा. तिला स्पर्श करून मलाही स्पर्श कर. या स्थितिमध्ये तुझा मला जो स्पर्श होईल तो चंद्रम्याशी होणार्‍या दृष्टीसंयोगाप्रमाणे माझा सर्व संताप दूर करणारा आणि आल्हादजनक होईल. ॥६॥
तन्मे दहति गात्राणि विषं पीतमिवाशये ।
हा नाथेति प्रिया सा मां ह्रियमाणा यदब्रवीत् ॥ ७ ॥
अपहरण होते समयी माझ्या प्रिय सीतेने जे मला हा नाथ ! असे म्हणून आळवले असेल, ते प्यायल्या गेलेल्या उदरस्थ विषाप्रमाणे माझ्या सर्व अंगांना दग्ध करून टाकीत आहे. ॥७॥
तद् वियोगेन्धनवता तच्चिन्ताविमलार्चिषा ।
रात्रिं दिवं शरीरं मे दह्यते मदनाग्निना ॥ ८ ॥
प्रियतमेचा वियोग हेच ज्याचे इंधन आहे, तिची चिंता हीच ज्याची दीप्तिमती ज्वाला आहे, तो प्रेमाग्नि माझ्या शरीरास रात्रंदिवस जाळून टाकीत आहे. ॥८॥
अवगाह्यार्णवं स्वप्स्ये सौमित्रे भवता विना ।
कथञ्चित् प्रज्वलन् कामो न मा सुप्तं जले दहेत् ॥ ९ ॥
सौमित्र ! तू येथेच रहा. तुझ्या शिवाय एकटाच मी या समुद्रात घुसून झोपेन. याप्रकारे जलात शयन केल्यानंतर हा प्रज्वलित प्रेमाग्नि मला दग्ध करू शकणार नाही. ॥९॥
बह्वेतत् कामयानस्य शक्यमेतेन जीवितुम् ।
यदहं सा च वामोरुः एकां धरणिमाश्रितौ ॥ १० ॥
मी आणि ती वामोरू सीता एकाच भूतळावर झोपत आहोत- प्रियतमेच्या संयोगाची इच्छा ठेवणार्‍या मला विरहीला इतकेही पुरेसे आहे. एवढ्‍यानेही मी जीवित राहू शकतो. ॥१०॥
केदारस्येव केदारः सोदकस्य निरूदकः ।
उपस्नेहेन जीवामि जीवन्तीं यच्छृणोमि ताम् ॥ ११ ॥
ज्याप्रमाणे पाण्याने भरलेल्या वाफ्यांच्या संपर्काने पाणी नसलेल्या वाफ्यातील धान्यही जीवीत राहाते - सुकत नाही, त्याच प्रकारे मी जे हे ऐकत आहे की सीता अद्याप जीवित आहे, त्यामुळे मी जगत आहे. ॥११॥
कदा नु खलु सुश्रोणीं शतपत्रायतेक्षणाम् ।
विजित्य शत्रून् द्रक्ष्यामि सीतां स्फीतामिव श्रियम् ॥ १२ ॥
तो समय केव्हा बरे येईल ज्यावेळी शत्रूंना परास्त करून मी समृद्धशालिनी राजलक्ष्मी समान कमलनयनी सुमध्यमा सीतेला पाहीन ? ॥१२॥
कदा सुचारुदन्तोष्ठं तस्याः पद्ममिवाननम् ।
ईषदुन्नाम्य पास्यामि रसायनमिवातुरः ॥ १३ ॥
जसे रोगी रसायनाचे पान करतो, त्याप्रकारे मी केव्हा सुंदर दात असणार्‍या, बिम्ब सदृश्य मनोहर ओठांनी युक्त सीतेचे प्रफुल्ल कमलाप्रमाणे असणार्‍या मुखास किंचित वर उचलून त्याचे चुंबन घेईन. ॥१३॥
तौ तस्याः सहितौ पीनौ स्तनौ तालफलोपमौ ।
कदा नु खलु सोत्कम्पौ श्लिष्यन्त्या मां भजिष्यतः ॥ १४ ॥
माझे आलिंगन करणार्‍या प्रिय सीतेचे ते परस्परास भिडलेले, ताड फळासमान गोल आणि मोठे स्तन केव्हा बरे किंचित कंपनासह मला स्पर्श करतील ? ॥१४॥
सा नूनमसितापाङ्‌गी रक्षोमध्यगता सती ।
मन्नाथा नाथहीनेव त्रातारं नाधिगच्छति ॥ १५ ॥
काळा नेत्रप्रांत असणारी ती सती-साध्वी सीता, जिचा मी नाथ आहे, आज अनाथाप्रमाणे राक्षसांच्या तावडीत सापडून निश्चितच कोणी रक्षक प्राप्त करू शकत नसेल. ॥१५॥
कथं जनकराजस्य दुहिता मम च प्रिया ।
राक्षसीमध्यगा शेते स्नुषा दशरथस्य च ॥ १६ ॥
राजा जनकांची कन्या, दशरथ महाराजांची सून आणि माझी प्रियतमा सीता राक्षसींच्या मध्ये कशी बरे झोपत असेल ? ॥१६॥
आविक्षोभ्याणि रक्षांसि सा विधूयोत्पतिष्यति ।
विधूय जलदान् नीलान् शशिलेखा शरत्स्विव ॥ १७ ॥
तो समय कधी बरे येईल की ज्यावेळी माझ्या द्वारे त्या दुर्धर्ष राक्षसांचा विनाश करून, ज्याप्रमाणे शरत्काळात काळ्या मेघांचे निवारण करून त्यांच्या आवरणांतून चंद्रलेखा जशी मुक्त होते, तशी सीताही मुक्त होईल. ॥१७॥
स्वभावतनुका नूनं शोकेन अनशनेन च ।
भूयस्तनुतरा सीता देशकालविपर्ययात् ॥ १८ ॥
स्वभावत:च कृश शरीर (सडपातळ शरीर) असणारी सीता विपरीत देशकाळात पडल्याने निश्चितच शोक आणि उपवास करून अधिकच बारीक झाली असेल. ॥१८॥
कदा नु राक्षसेन्द्रस्य निधायोरसि सायकान् ।
सीतां प्रत्याहरिष्यामि शोकमुत्सृज्य मानसम् ॥ १९ ॥
मी राक्षसराज रावणाच्या छातीमध्ये आपले बाण घुसवून आपल्या मनासिक शोकाचे निराकरण करून केव्हा सीतेचा शोक दूर करीन. ॥१९॥
कदा नु खलु मे साध्वी सीतामरसुतोपमा ।
सोत्कण्ठा कण्ठमालम्ब्य मोक्ष्यत्यानन्दजं जलम् ॥ २० ॥
देवकन्ये प्रमाणे सुंदर माझी सती-साध्वी सीता केव्हा उत्कंठापूर्वक माझ्या गळास मिठी घालून आपल्या नेत्रातून आनंदाश्रु ढाळील. ॥२०॥
कदा शोकमिमं घोरं मैथिलीविप्रयोगजम् ।
सहसा विप्रमोक्ष्यामि वासः शुक्लेतरं यथा ॥ २१ ॥
असा समय केव्हा बरे येईल ज्यावेळी मी मैथिलीच्या वियोगामुळे होणार्‍या या भयंकर शोकाचा मलीन वस्त्रांप्रमाणे एकाएकी त्याग करीन ? ॥२१॥
एवं विलपतस्तस्य तत्र रामस्य धीमतः ।
दिनक्षयान् मंदवपुः भास्करोऽस्तमुपागमत् ॥ २२ ॥
बुद्धिमान्‌ श्रीराम तेथे याप्रकारे विलाप करतच होते की तेवढ्‍यात दिवसाचा अंत झाल्यामुळे मंद किरणे झालेले सूर्यदेव अस्ताचलास जाऊन पोहोंचले. ॥२२॥
आश्वासितो लक्ष्मणेन रामः सन्ध्यामुपासत ।
स्मरन् कमलपत्राक्षीं सीतां शोकाकुलीकृतः ॥ २३ ॥
त्यासमयी लक्ष्मणांनी धीर दिल्यामुळे शोकाने व्याकुळ झालेल्या श्रीरामांनी कमलनयनी सीतेचे चिंतन करत संध्योपासना केली. ॥२३॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे पञ्चमः सर्गः ॥ ५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा पाचवा सर्ग पूर्ण झाला. ॥५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP