श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ द्वयशीतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
अगस्त्याश्रमात् श्रीरामस्य अयोध्यायां प्रति प्रस्थानम् -
श्रीरामांचे अगस्त्य आश्रमांतून अयोध्यापुरीस परत जाणे -
ऋषेर्वचनमाज्ञाय रामः सन्ध्यामुपासितुम् ।
उपाक्रमत्सरः पुण्यं अप्सरोगणसेवितम् ॥ १ ॥
ऋषिंचा हा आदेश मिळतांच श्रीराम संध्योपासना करण्यासाठी अप्सरांनी सेवित त्या पवित्र सरोवराच्या तटावर गेले. ॥१॥
तत्रोदकमुपस्पृश्य सन्ध्यामन्वास्य पश्चिमाम् ।
आश्रमं प्राविशद् रामः कुम्भयोनेर्महात्मनः ॥ २ ॥
तेथे आचमन आणि सायंकाळची संध्योपासना करून श्रीरामांनी पुन्हा महात्मा कुम्भजांच्या आश्रमात प्रवेश केला. ॥२॥
तस्यागस्त्यो बहुगुणं कन्दमूलं तथौषधिम् ।
शाल्यादीनि पवित्राणि भोजनार्थमकल्पयत् ॥ ३ ॥
अगस्त्यांनी त्यांच्या भोजनासाठी अनेक गुणांनी युक्त कंद, मूळे जरावस्थेचे निवारण करणारी दिव्य औषधी, पवित्र भात आदि वस्तु अर्पित केल्या. ॥३॥
स भुक्तवान् नरश्रेष्ठः तदन्नं अमृतोपमम् ।
प्रीतश्च परितुष्टश्च तां रात्रिं समुपाविशत् ॥ ४ ॥
नरश्रेष्ठ श्रीराम ते अमृततुल्य स्वादिष्ट भोजन करून परम तृप्त आणि प्रसन्न झाले तसेच ती रात्र त्यांनी फार संतोषात घालविली. ॥४॥
प्रभाते काल्यमुत्थाय कृत्वाऽऽह्निकं अरिन्दमः ।
ऋषिं समुपचक्राम गमनाय रघूत्तमः ॥ ५ ॥
सकाळी उठून शत्रूचे दमन करणार्‍या रघूत्तमांनी नित्यकर्म करून तेथून जाण्याच्या इच्छेने महर्षिंच्या जवळ गेले. ॥५॥
अभिवाद्याब्रवीद् रामो महर्षिं कुम्भसम्भवम् ।
आपृच्छे स्वां पुरीं गन्तुं मामनुज्ञातुमर्हसि ॥ ६ ॥
तेथे महर्षि कुम्भजांना प्रणाम करून श्रीरामांनी म्हटले - महर्षे ! आता मी आपल्या पुरीला जाण्यासाठी आपली आज्ञा इच्छितो. कृपया मला आज्ञा प्रदान करावी. ॥६॥
धन्योऽस्मि अनुगृहीतोऽस्मि दर्शनेन महात्मनः ।
द्रष्टुं चैवागमिष्यामि पावनार्थमिहात्मनः ॥ ७ ॥
आपणा सारख्या महात्म्याच्या दर्शनाने मी धन्य आणि अनुग्रहीत झालो. आता आपणा स्वतःस पवित्र करण्यासाठी परत कधी आपल्या दर्शनाच्या इच्छेने येथे येईन. ॥७॥
तथा वदति काकुत्स्थे वाक्यं अद्‌भुतदर्शनम् ।
उवाच परमप्रीतो धर्मनेत्रस्तपोधनः ॥ ८ ॥
श्रीरामचंद्रांनी या प्रकारचे अद्‍भुत वचन म्हटल्यावर धर्मचक्षु तपोधन अगस्त्य फार प्रसन्न झाले आणि त्यांना म्हणाले - ॥८॥
अत्यद्‌भुतमिदं वाक्यं तव राम शुभाक्षरम् ।
पावनः सर्वभूतानां त्वमेव रघुनन्दन ॥ ९ ॥
श्रीरामा ! आपले हे सुंदर वचन फार अद्‍भुत आहे. रघुनंदना ! समस्त प्राण्यांना पवित्र करणारे तर आपणच आहात. ॥९॥
मुहूर्तमपि राम त्वां ये च पश्यन्ति केचन ।
पाविताः स्वर्गभूताश्च पूज्यास्ते त्रिदिवेश्वरैः ॥ १० ॥
श्रीरामा ! जो कोणी एक मुहूर्तासाठी ही आपले दर्शन प्राप्त करतात, ते पवित्र, स्वर्गाचे अधिकारी तसेच देवतांसाठी ही पूजनीय होऊन जातात. ॥१०॥
ये च त्वां घोरचक्षुर्भिः पश्यन्ति प्राणिनो भुवि ।
हतास्ते यमदण्डेन सद्यो निरयगामिनः ॥ ११ ॥
या भूतलावर जे प्राणी आपल्याला क्रूर दृष्टिने पहातात, ते यमराजांच्या दण्डांनी पिटले जाऊन तात्काळ नरकात पडतात. ॥११॥
ईदृशस्त्वं रघुश्रेष्ठ पावनः सर्वदेहिनाम् ।
भुवि त्वां कथयन्तोऽपि सिद्धिमेष्यन्ति राघव ॥ १२ ॥
रघुश्रेष्ठ ! असे माहात्म्यशाली आपण समस्त देहधारींना पवित्र करणारे आहात. रघुनंदना ! (राघवा !) पृथ्वीवर जे लोक आपल्या कथा सांगतात, ते सिद्धि प्राप्त करून घेतात. ॥१२॥
त्वं गच्छारिष्टमव्याग्रः पन्थानमकुतोभयम् ।
प्रशाधि राज्यं धर्मेण गतिर्हि जगतो भवान् ॥ १३ ॥
आपण निश्चिंत होऊन कुशलतापूर्वक जावे. आपल्या मार्गात कोठूनही कसलेही भय न राहावे. आपण धर्मपूर्वक राज्याचे शासन करावे कारण की आपणच संसाराचा परम आश्रय आहात. ॥१३॥
एवमुक्तस्तु मुनिना प्राञ्जलिः प्रग्रहो नृपः ।
अभ्यवादयत प्राज्ञः तं ऋषिं सत्यशालिनम् ॥ १४ ॥
मुनिनी असे सांगितल्यावर बुद्धिमान्‌ राजा श्रीरामांनी भुजा वर उचलून हात जोडून त्या सत्यशील महर्षिंना प्रणाम केला. ॥१४॥
अभिवाद्य ऋषिश्रेष्ठं तांश्च सर्वांस्तपोधनान् ।
अध्यारोहत् तदव्यग्रः पुष्पकं हेमभूषितम् ॥ १५ ॥
याप्रकारे मुनिवर अगस्त्य तसेच अन्य सर्व तपोधन ऋषिंना ही यथोचित अभिवादन करून ते कुठल्याही व्यग्रतेशिवाय त्या सुवर्णभूषित विमानावर चढून गेले. ॥१५॥
तं प्रयान्तं मुनिगणा ह्याशीर्वादैः समन्ततः ।
अपूजयन् महेन्द्राभं सहस्राक्षमिवामराः ॥ १६ ॥
जशा देवता सहस्त्र नेत्रधारी इंद्राची पूजा करतात, त्याच प्रकारे जाते समयी त्या महेंद्रतुल्य तेजस्वी श्रीरामांना ऋषि समूहांनी सर्व बाजुनी आशीर्वाद दिले. ॥१६॥
स्वस्थः स ददृशे रामः पुष्पके हेमभूषिते ।
शशी मेघसमीपस्थो यथा जलधरागमे ॥ १७ ॥
त्या सुवर्णभूषित पुष्पक विमानात आकाशात स्थित झालेले राम वर्षाकाळात मेघांच्या समीपवर्ती चंद्रम्यासमान दिसून येत होते. ॥१७॥
ततोऽर्धदिवसे प्राप्ते पूज्यमानः ततस्ततः ।
अयोध्यां प्राप्य काकुत्स्थो मध्यकक्ष्यामवातरत् ॥ १८ ॥
त्यानंतर जागोजागी सन्मान प्राप्त करीत ते काकुत्स्थ मध्याह्न समयी अयोध्येत पोहोचून मध्यम कक्षात (मधल्या देवडीवर) उतरले. ॥१८॥
ततो विसृज्य रुचिरं पुष्पकं कामगामिनम् ।
विसर्जयित्वा गच्छेति स्वस्ति तेऽस्त्विति च प्रभुः ॥ १९ ॥
तत्पश्चात्‌ इच्छेनुसार चालणार्‍या त्या सुंदर पुष्पक विमानाला तेथेच सोडून भगवंतानी त्यास म्हटले - आता तू जा, तुझे कल्याण होवो ! ॥१९॥
कक्षान्तरस्थितं क्षिप्रं द्वाःस्थं रामोऽब्रवीद् वचः ।
लक्ष्मणं भरतं चैव गत्वा तौ लघुविक्रमौ ॥
ममागमनमाख्याय शब्दापयत मा चिरम् ॥ २० ॥
नंतर श्रीरामांनी देवडीच्या आत उभे असलेल्या द्वारपालाला शीघ्रतापूर्वक सांगितले - तू आत्ता जाऊन शीघ्रपराक्रमी भरत आणि लक्ष्मणालाही माझ्या येण्याची सूचना दे आणि त्यांना लवकरच बोलावून आण. ॥२०॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे व्द्यशीतितमः सर्गः ॥ ८२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा ब्याऐंशीवा सर्ग पूरा झाला. ॥८२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP