[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ सप्तविंशः सर्गः॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
त्रिजटायाः स्वप्नस्तत्र रक्षसां विनाशस्य श्रीराघवविजयस्य च सूचनम् -
त्रिजटेचे स्वप्न - राक्षसांचा विनाश आणि श्रीरघुनाथाच्या विजयाची शुभ सूचना -
इत्युक्ताः सीतया घोरं राक्षस्यः क्रोधमूर्च्छिताः ।
काश्चिज्जग्मुस्तदाख्यातुं रावणस्य दुरात्मनः ॥ १ ॥
सीतेने जेव्हा अशी भयंकर वाणी उच्चारली तेव्हा त्या राक्षसीणी क्रोधाने बेभान झाल्या आणि त्यांच्यातील काही जणी दुरात्मा रावणाला हा संवाद सांगण्यासाठी त्याच्याकडे निघून गेल्या. ॥१॥
ततः सीतामुपागम्य राक्षस्यो भीमदर्शनाः ।
पुनः परुषमेकार्थमनर्थार्थमथाब्रुवन् ॥ २ ॥
त्यानन्तर भयंकर दिसणार्‍या त्या राक्षसस्त्रिया सीतेजवळ जाऊन पुन्हा एकाच प्रयोजनाशी संबन्ध असणार्‍या कठोर गोष्टी बोलू लागल्या. त्या गोष्टी खरे तर त्यांच्यासाठीच अनर्थकारक होत्या. त्या म्हणू लागल्या - ॥२॥
अद्येदानीं तवानार्ये सीते पापविनिश्चये ।
राक्षस्यो भक्षयिष्यन्ति मांसमेतद् यथासुखम् ॥ ३ ॥
पापपूर्ण विचार करणार्‍या अनार्ये सीते ! आज या वेळी या सर्व राक्षसस्त्रिया आनन्दाने, सुखाने तुझे हे मांस भक्षण करतील. ॥३॥
सीतां ताभिरनार्याभिर्दृष्ट्‍वा सन्तर्जितां तदा ।
राक्षसी त्रिजटा वृद्धा प्रबुद्धा वाक्यमब्रवीत् ॥ ४ ॥
त्या दुष्ट निशाचरींच्या कडून सीतेला याप्रकारे धमकावले जात आहे, हे पाहून जी नुकतीच झोपेतून उठली होती अशी वृद्ध राक्षसी त्रिजटा (विभिषणाची कन्या) त्या सर्व जणींना उद्देशून म्हणाली -॥४॥
आत्मानं खादतानार्या न सीतां भक्षयिष्यथ ।
जनकस्य सुतामिष्टां स्नुषां दशरथस्य च ॥ ५ ॥
नीच निशाचरीनों ! तुम्ही स्वतःलाच खाऊन टाका. राजा जनकाची प्रिय कन्या आणि दशरथ महाराजांची सून सीता हिला तुम्ही खाऊ शकणार नाही. ॥५॥
स्वप्नो ह्यद्य मया दृष्टो दारुणो रोमहर्षणः ।
राक्षसानामभावाय भर्तुरस्या भवाय च ॥ ६ ॥
आज मी एक अत्यन्त भयंकर आणि रोमांचकारी स्वप्न पाहिले आहे. ते राक्षसांच्या विनाशाची आणि सीतेच्या पतिच्या अभ्युदयाची सूचना देणारे आहे. ॥६॥
एवमुक्तास्त्रिजटया राक्षस्यः क्रोधमूर्च्छिताः ।
सर्वा एवाब्रुवन् भीताः त्रिजटां तामिदं वचः ॥ ७ ॥
त्रिजटेने असे सांगितल्यावर प्रथम ज्या क्रोधाने बेभान झाल्या होत्या त्या सर्व राक्षसीणी भयभीत झाल्या आणि त्रिजटेस याप्रमाणे म्हणाल्या - ॥७॥
कथयस्व त्वया दृष्टः स्वप्नोऽयं कीदृशो निशि ।
तासां श्रुत्वा तु वचनं राक्षसीनां मुखोद्‌गतम् ॥ ८ ॥

उवाच वचनं काले त्रिजटा स्वप्नसंश्रितम् ।
अग ! सांग तर खरे की तू आज रात्री कोणते स्वप्न पाहिले आहेस ? त्या राक्षसस्त्रियांच्या मुखातून निघालेले हे शब्द ऐकून, त्रिजटा त्यांना त्या समयी स्वप्नासंबन्धी असे म्हणाली - ॥८ १/२॥
गजदन्तमयीं दिव्यां शिबिकामन्तरिक्षगाम् ॥ ९ ॥

युक्तां वाजिसहस्रेण स्वयमास्थाय राघवः ।
शुक्लमाल्याम्बरधरो लक्ष्मणेन समागतः ॥ १० ॥
आज मी स्वप्नात हस्तीदन्ताची बनविलेली एक दिव्य शिबिका (पालखी) पाहिली, जी आकाशातून गमन करणारी होती. तिला एक हजार घोडे जोडलेले होते, आणि श्वेत पुष्पांची माळा आणि श्वेत वस्त्र धारण करून स्वतः श्रीरघुनाथ लक्ष्मणासह त्या शिबिकेत चढून येथे आले आहेत. ॥९-१०॥
स्वप्ने चाद्य मया दृष्टा सीता शुक्लाम्बरावृता ।
सागरेण परिक्षिप्तं श्वेत पर्वतमास्थिता ॥ ११ ॥

रामेण सङ्‌गता सीता भास्करेण प्रभा यथा ।
आज स्वप्नात मी असेही पाहिले की सीता श्वेत वस्त्र धारण करून श्वेत पर्वताच्या शिखरावर बसलेली असून तो पर्वत समुद्राने वेढलेला आहे आणि सूर्याला त्याची प्रभा भेटावी तशी त्या ठिकाणी, त्याप्रमाणेच, सीता श्रीरामचन्द्रास भेटत आहे. ॥११ १/२॥
राघवश्च पुनर्दृष्टश्चतुर्दन्तं महागजम् ॥ १२ ॥

आरूढः शैलसङ्‌काशं चकास सह लक्ष्मणः ।
नन्तर परत मी असे पाहिले की पर्वतासमान उंच अशा चार दात असलेल्या विशाल गजराजावर लक्ष्मणासह श्रीरघुनाथ बसलेले असून अत्यन्त शोभत आहेत. ॥१२ १/२॥
ततस्तौ सूर्यसंकाशौ दीप्यमानौ स्वतेजसा ॥ १३ ॥

शुक्लमाल्याम्बरधरौ जानकीं पर्युपस्थितौ ।
नन्तर आपल्या तेजाने सूर्याप्रमाणे प्रकाशित होणारे तथा श्वेत माळा आणि श्वेत वस्त्र धारण केलेले ते दोन्ही बन्धु श्रीराम आणि लक्ष्मण सीतेजवळ आले आहेत. ॥१३ १/२॥
ततस्तस्य नगस्याग्रे ह्याकाशस्थस्य दन्तिनः ॥ १४ ॥

भर्त्रा परिगृहीतस्य जानकी स्कन्धमाश्रिता ।
नन्तर त्या पर्वत शिखरावर आकाशातच स्थित असलेल्या आणि पतिद्वारा पकडले गेलेल्या त्या हत्तीच्या खाद्यांवर जानकीही येऊन पोहोंचली. ॥१४ १/२॥
भर्तुरङ्‌कात् समुत्पत्य ततः कमललोचना ॥ १५ ॥

चन्द्रसूर्यौ मया दृष्टा पाणिभ्यां परिमार्जती ।
त्यानन्तर कमलनयना सीता आपल्या पतिच्या अंकावरून वरच्या बाजूस झेप घेऊन चन्द्रमा आणि सूर्याच्या जवळ जाऊन पोहोचली. तेथे मी पाहिले की ती आपल्या दोन्ही हातांनी चन्द्रमा आणि सूर्यास पुसत आहे(**), त्यांच्यावरून हात फिरवित आहे. ॥१५ १/२॥ (** - जी स्त्री अथवा जो पुरुष स्वप्नात आपल्या दोन्ही हातांनी सूर्यमण्डळ अथवा चन्द्रमण्डळास स्पर्श करतो त्यास विशाल राज्याची प्राप्ती होते. स्वप्नाध्यायात वचन आहे की आदित्यमण्डलं वाणि चन्द्रमण्डलमेव वा । स्वप्ने गृह्णाति हस्ताभ्यां राज्यं संप्राप्नुयान्महत् ॥- गोविन्दराज विरचित रामायणभूषण)
ततस्ताभ्यां कुमाराभ्यामास्थितः स गजोत्तमः ।
सीतया च विशालाक्ष्या लङ्‌काया उपरि स्थितः ॥ १६ ॥
त्या नन्तर ज्या गजराजावर ते दोन्ही राजकुमार आणि विशाल लोचना सीता विराजमान झालेली होती, तो लंकेवर येऊन उभा राहिला. ॥१६॥
पाण्डुरर्षभयुक्तेन रथेनाष्टयुजा स्वयम् ।
इहोपयातः काकुत्स्थः सीतया सह भार्यया ॥ १७ ॥

शुक्लमाल्याम्बरधरो लक्ष्मणेन सहागतः ।
नन्तर मी पाहिले की आठ पांढरे बैल ज्याला जोडलेले आहेत अशा एका रथावर आरूढ होऊन काकुत्स्थ कुलभूषण श्रीरामचन्द्र आपली भार्या सीतेसह इकडेच येत आहेत. त्यांनी श्वेत पुष्पांची माळा आणि वस्त्र धारण केले आहे. त्या वीर्यवान रामांबरोबर बन्धु लक्ष्मण आणि सीताही आहेत. ॥१७ १/२॥
ततोऽन्यत्र मया दृष्टो रामः सत्यपराक्रमः ॥ १८ ॥

लक्ष्मणेन सह भ्रात्रा सीतया सह वीर्यवान् ।
आरुह्य पुष्पकं दिव्यं विमानं सूर्यसन्निभम् ॥ १९ ॥

उत्तरां दिशमालोच्य प्रस्थितः पुरुषोत्तमः ।
नन्तर मी पाहिले की सूर्यासारख्या तेजस्वी आणि दिव्य पुष्पक विमानात आरूढ होऊन त्यांनी शैल पुष्पांची माळा आणि वस्त्र धारण केले आहे. आपली पत्‍नी सीता आणि बन्धु लक्ष्मण यांच्यासह उत्तर दिशेस लक्ष्य करून सत्यपराक्रमी पुरुषोत्तम श्रीरामांनी प्रस्थान केले. ॥१८-१९ १/२॥
एवं स्वप्ने मया दृष्टो रामो विष्णुपराक्रमः ॥ २० ॥

लक्ष्मणेन सह भ्रात्रा सीतया सह भार्यया ।
याप्रमाणे मी भगवान विष्णूच्या प्रमाणे पराक्रमी श्रीरामास त्यांची पत्‍नी सीता आणि बन्धु लक्ष्मण यांच्यासह पाहिले, त्यांचे दर्शन मला घडले. ॥२० १/२॥
न हि रामो महातेजाः शक्यो जेतुं सुरासुरैः ॥ २१ ॥

राक्षसैर्वापि चान्यैर्वा स्वर्गः पापजनैरिव ।
श्रीरामचन्द्र महातेजस्वी आहेत. ज्या प्रमाणे पापी मनुष्य स्वर्गलोकावर विजय मिळवू शकत नाही त्याप्रमाणेच देवता, असुर, राक्षस तसेच दुसरे इतर लोकही रामचन्द्रास कदापि जिंकू शकत नाही. ॥२१ १/२॥
रावणश्च मया दृष्टो मुण्डस्तैलसमुक्षितः ॥ २२ ॥

रक्तवासाः पिबन्मत्तः करवीरकृतस्रजः ।
विमानात् पुष्पकादद्य रावणः पतितः क्षितौ ॥ २३ ॥
मी असे पाहिले की रावण तांबड्या कण्हेरीच्या माळा घालून आरक्त वर्ण वस्त्रे नेसून, अंगाला तेल चोपडलेला, मुंडन केलेला आणि मदिरा पिऊन मत्त झालेला होता आणि याच वेषभूषेत आज रावण पुष्पक विमानातून पृथ्वीवर पडलेला मी पाहिला. ॥२२-२३॥
कृष्यमाणः स्त्रिया मुण्डो दृष्टः कृष्णाम्बरः पुनः ।
रथेन खरयुक्तेन रक्तमाल्यानुलेपनः ॥ २४ ॥

पिबंस्तैलं हसन्नृत्यन् भ्रान्तचित्ताकुलेन्द्रियः ।
गर्दभेन ययौ शीघ्रं दक्षिणां दिशमास्थितः ॥ २५ ॥
एक स्त्री त्या मुण्डित मस्तक रावणास कुठेतरी ओढून नेत होती आणि त्यावेळी रावणाने काळ्या रंगाची वस्त्रे परिधान केली होती. तो रावण तांबड्या रंगाची पुष्पे धारण करून आणि आरक्त चन्दनाची उटी लावून गर्दभ जोडलेल्या रथात बसला आहे आणि त्याचे मन आणि इन्द्रिये पूर्ण भ्रान्तियुक्त झाली असून तो तेल पित आहे, हसत आहे आणि नृत्य करीत आहे, असे मी पाहिले. तसेच तो रावण गाढवावर बसून दक्षिण दिशेस जात आहे (असेही मी पाहिले). ॥२४-२५॥
पुनरेव मया दृष्टो रावणो राक्षसेश्वरः ।
पतितोऽवाक्‌शिरा भूमौ गर्दभाद् भयमोहितः ॥ २६ ॥
पुन्हा स्वप्नात मला असे दिसले की भयाने राक्षसेश्वर रावणास काही सुचत नसून त्याचा शिरच्छेद होऊन तो गाढवावरून खाली जमिनीवर पडला आहे (अथवा राक्षसराज रावण गाढवावरून खाली डोके आणि वर पाय अशा अवस्थेत जमिनीवर पडला असून तो भयाने मोहित झाला आहे.) ॥२६॥
सहसोत्थाय सम्भ्रान्तो भयार्तो मदविह्वलः ।
उन्मत्तरूपो दिग्वासा दुर्वाक्यं प्रलपन् बहु ॥ २७ ॥

दुर्गन्धं दुःसहं घोरं तिमिरं नरकोपमम् ।
मलपङ्‌कं प्रविश्याशु मग्नस्तत्र स रावणः ॥ २८ ॥
नन्तर तो परत भयातुर होऊन सहसा एकदम उठला आणि मदाने भ्रान्त होऊन वेड्यासारखा उघडा नागडा बनून अनेक दुर्वचने बोलत पुढे निघाला. पुढे समोरच दुर्गन्धी युक्त दुःसह घोर अन्धःकारपूर्ण नरकतुल्य मळाचा चिखल होता, त्यात रावण शीघ्र शिरला आणि त्यातच बुडून गेला. ॥२७-२८॥
प्रस्थितो दक्षिणामाशां प्रविष्टोऽकर्दमं ह्रदम् ।
कण्ठे बद्ध्वा दशग्रीवं प्रमदा रक्तवासिनी ॥ २९ ॥

काली कर्दमलिप्ताङ्‌गी दिशं याम्यां प्रकर्षति ।
एवं तत्र मया दृष्टः कुम्भकर्णौ महाबलः ॥ ३० ॥
नन्तर रक्त वस्त्रे धारण केलेली आणि जिचे अंग चिखलाने लडबडलेले आहे, अशी काळ्या रंगाची एक स्त्री रावणाच्या गळ्यात फास अडकवून त्याला दक्षिण दिशेकडे ओढून नेत आहे, असे मी पाहिले. तेथे महाबलवान कुंभकर्णालाही मी त्याच अवस्थेमध्ये पाहिले. ॥२९-३०॥
रावणस्य सुताः सर्वे मुण्डास्तैलसमुक्षिताः ।
वराहेण दशग्रीवः शिशुमारेण चेन्द्रजित् ॥ ३१ ॥

उष्ट्रेण कुम्भकर्णश्च प्रयातो दक्षिणां दिशम् ।
रावणाचे सर्व पुत्रही मुंडण केलेले आणि तेलात न्हालेले दिसले. मला असेही दिसले की रावण डुकरावर, इन्द्रजीत शिशुमारावर आणि कुंभकर्ण उंटावर स्वार होऊन दक्षिण दिशेस गेले आहेत. ॥३१ १/२॥
एकस्तत्र मया दृष्टः श्वेतच्छत्रो विभीषणः ॥ ३२ ॥

शुक्लमाल्याम्बरधरः शुक्लगन्धानुलेपनः ।
राक्षसामध्ये एकमात्र विभीषणास मात्र मी तेथे श्वेत छत्र धारण केले आहे अशा स्थितीत पाहिले, त्याने श्वेत वस्त्र धारण करून श्वेत माळा तसेच श्वेत चन्दन आणि श्वेत अंगराग (उटी) धारण केले होते. ॥३२ १/२॥
शङ्‌खदुन्दुभिनिर्घोषैर्नृत्तगीतैरलङ्‌कृतः ॥ ३३ ॥

आरुह्य शौलसङ्‌काशं मेघस्तनितनिःस्वनम् ।
चतुर्दन्तं गजं दिव्यमास्ते तत्र विभीषणः ॥ ३४ ॥

चतुर्भिः सचिवैः सार्धं वैहायसमुपस्थितः ॥ ३५ ॥
त्याच्या जवळ शंखध्वनी, नगारे आदि वाजविले जात होते, त्यांच्या गंभीर घोषाबरोबरच नृत्य, गीत आदिही चालू असल्याने विभीषणाची शोभा वाढली होती. विभीषण तेथे आपल्या चार मन्त्र्यांसह पर्वतासमान विशालकाय आणि मेघासमान गंभीर शब्द करणाच्या तसेच चार दात असलेल्या दिव्य गजराजावर आरूढ होऊन आकाशात उभे होते. ॥३३-३५॥
समाजश्च मया वृत्तो गीतवादित्रनिःस्वनः ।
पिबतां रक्तमाल्यानां रक्षसां रक्तवाससाम् ॥ ३६ ॥
हेही दिसून आले कि तेल पिणार्‍या आणि लाल माळा आणि लाल वस्त्रे धारण करणार्‍या राक्षसांचा फार मोठा समुदाय तेथे एकत्रित झाला असून गीत आणि वाद्यांचा मधुर ध्वनि होत आहे. ॥३६॥
लङ्‌कां चेयं पुरी रम्या सवाजिरथकुञ्जरा ।
सागरे पतिता दृष्टा भग्नगोपुरतोरणा ॥ ३७ ॥
ही रमणीय लङ्‌कापुरी घोडे, रथ आणि हत्ती यांसह समुद्रात पडलेली दिसली, तसेच तिच्यान्तील गोपुरे, तोरणे आदि सर्व तुटून फुटून गेलेली दिसली अथवा तिच्यान्तील आतील आणि बाहेरील दरवाजे तुटून गेलेले दिसले. ॥३७॥
लङ्‌का दृष्टा मया स्वप्ने रावणेनाभिरक्षिता ।
दग्धा रामस्य दूतेन वानरेण तरस्विना ॥ ३८ ॥
मी स्वप्नात असे पाहिले कि रावणद्वारा सुरक्षित लङ्‌कापुरीला श्रीरामचन्द्रांचा दूत बनून आलेल्या एका वेगवान वानराने जाळून भस्म केले आहे. ॥३८॥
पीत्वा तैलं प्रमत्ताश्च प्रहसन्त्यो महास्वनाः ।
लङ्‌कायां भस्मरूक्षायां सर्वा राक्षसयोषितः ॥ ३९ ॥
जळून भस्म झालेल्या लंकेत सर्व राक्षसस्त्रिया तेल पिऊन उन्मत्त होऊन मोठमोठ्याने हसत, खिदळत आहेत. ॥३९॥
कुम्भकर्णादयश्चेमे सर्वे राक्षसपुङ्‌गवाः ।
रक्तं निवसनं गृह्य प्रविष्टा गोमयह्रदम् ॥ ४० ॥
कुंभकर्ण आदि सर्व राक्षस शिरोमणी वीर, लाल वस्त्रे नेसून गोमयाच्या डोहात (शेणखळ्यात) शिरले आहेत. ॥४०॥
अपगच्छत पश्यध्वं सीतामाप्नोति राघवः ।
घातयेत् परमामर्षी युष्मान् सार्धं हि राक्षसैः ॥ ४१ ॥
म्हणून तुम्ही सर्वजणी बाजूस सरा आणि नष्ट व्हा. श्रीरघुनाथ सीतेची प्राप्ती करतील. ते अत्यन्त अमर्षशील आहेत, राक्षसांच्या बरोबर ते तुम्हा सर्वांनाही मारून टाकतील. ॥४१॥
प्रियां बहुमतां भार्यां वनवासमनुव्रताम् ।
भर्त्सितां तर्जितां वापि नानुमंस्यति राघवः ॥। ४२ ॥
जिने वनवासातही त्यांना साथ दिली त्या आपल्या पतिव्रता भार्येस आणि परम आदरणीय प्रियतमा सीतेस याप्रकारे धमकाविलेले आणि भयभीत केलेले श्रीरघुनाथ कदापि सहन करणार नाहीत. ॥४२॥
तदलं क्रूरवाक्यैश्च सान्त्वमेवाभिधीयताम् ।
अभियाचाम वैदैहीमेतद्धि मम रोचते ॥ ४३ ॥
म्हणून आता याप्रकारे कठोर वचने ऐकविणे सोडून द्या कारण त्यामुळे काहीही लाभ होणार नाही. आता तर मघुर वचनांचा प्रयोग करा. मला तर हेच बरे वाटते की आपण सर्वांनी विदेहनन्दिनी सीतेकडे कृपेची आणि क्षमेची याचना करावी. ॥४३॥
यस्या ह्येवंविधः स्वप्नो दुःखितायाः प्रदृश्यते ।
सा दुःखैर्बहुभिर्मुक्ता प्रियं प्राप्नोत्यनुत्तमम् ॥ ४४ ॥
ज्या दुःखी स्त्रीच्या संबन्धी अशी स्वप्ने पाहिली जातात ती अनेक प्रकारच्या दुःखातून मुक्त होऊन तिला परम उत्तम आणि प्रिय वस्तूची प्राप्ती होत असते. ॥४४॥
भर्त्सितामपि याचध्वं राक्षस्यः किं विवक्षया ।
राघवाद्धि भयं घोरं राक्षसानामुपस्थितम् ॥ ४५ ॥
राक्षसस्त्रियांनो ! तुम्हांला आणखी काही बोलण्याची अथवा सांगण्याची इच्छा आहे हे मी जाणते परन्तु त्यामुळे काय होणार आहे ? जरी तुम्ही सीतेला खूप धमकाविले असले तरीही तिला शरण जाऊन तिच्याकडे अभय देण्यासाठी याचना करा, कारण राक्षसांना श्रीरघुनाथामुळे घोर भय उत्पन्न झालेले आहे. ॥४५॥
प्रणिपातप्रसन्ना हि मैथिली जनकात्मजा ।
अलमेषा परित्रातुं राक्षस्यो महतो भयात् ॥ ४६ ॥
राक्षसींनो ! जनकनन्दिनी मिथिलेशकुमारी सीता केवळ प्रणाम करण्यानेही प्रसन्न होईल. केवळ हेच कृत्य त्या महान भयापासून तुमचे रक्षण करण्यास समर्थ आहे. ॥४६॥
अपि चास्या विशालाक्ष्या न किञ्चिदुपलक्षये ।
विरूपमपि चाङ्‌गेषु सुसूक्ष्ममपि लक्षणम् ॥ ४७ ॥
या विशाललोचना सीतेच्या अंगामध्ये मला एखादे सूक्ष्म-अतिसूक्ष्मही असे विपरीत लक्षण दिसून येत नाही, की ज्यामुळे हिला सदा कष्टातच राहावे लागेल, असे सूचित व्हावे. ॥४७॥
छायावैगुण्यमात्रं तु शङ्‌केः दुःखमुपस्थितम् ।
अदुःखार्हामिमां देवीं वैहायसमुपस्थिताम् ॥ ४८ ॥
मी तर असे समजते की हिला वर्तमानकाळी जे दुःख प्राप्त झाले आहे ते ग्रहणाच्या समयी चन्द्रम्यावर पडलेल्या छायेप्रमाणे अल्पकाळीनच आहे, कारण की ही सीतादेवी मला स्वप्नात विमानात बसलेली दिसली म्हणून ही दुःख भोगण्यास कदापि योग्य नाही. ॥४८॥
अर्थसिद्धिं तु वैदेह्याः पश्याम्यहमुपस्थिताम् ।
राक्षसेन्द्रविनाशं च विजयं राघवस्य च ॥ ४९ ॥
मला तर आता जानकीच्या अभीष्ट मनोरथांची सिद्धिच उपस्थित झालेली दिसून येत आहे. राक्षसराज रावणाच्या विनाशास आणि रघुनाथाच्या विजयास आता जास्त अवधि उरलेला नाही. ॥४९॥
निमित्तभूतमेतत् तु श्रोतुमस्या महत् प्रियम् ।
दृश्यते च स्फुरच्चक्षुः पद्मपत्रमिवायतम् ॥ ५० ॥
कमळदलाप्रमाणे विशाल असा हिचा डावा डोळा सारखा लवत आहे, असे दिसून येत आहे. ही गोष्ट असे सुचवित आहे की हिला अत्यन्त शीघ्र अत्यन्त प्रिय संवाद ऐकण्यास मिळेल. ॥५०॥
ईषद्धि हृषितो वास्या दक्षिणाया ह्यदक्षिणः ।
अकस्मादेव वैदेह्या बाहुरेकः प्रकम्पते ॥ ५१ ॥
या उदार हृदयी विदेहराजकुमारीचा डावा बाहू काहीसा रोमांचित होऊन सहसा थरथरू लागला आहे, हेही शुभ सूचकच आहे. ॥५१॥
करेणुहस्तप्रतिमः सव्यश्चोरुरनुत्तमः ।
वेपन् कथयतिवास्या राघवं पुरतः स्थितम् ॥ ५२ ॥
हत्तीच्या सोंडेप्रमाणे जी हिची परम उत्तम डावी मांडी आहे तीही कंपित होऊन जणु हेच सुचवित आहे की आता श्रीरघुनाथ अत्यन्त शीघ्र तुझ्यासमोर उपस्थित होतील. ॥५२॥
पक्षी च शाखानिलयं प्रविष्टः
पुनः पुनश्चोत्तमसान्त्ववादी ।
सुस्वागतं वाचमुदीरयाणः
पुनः पुनश्चोदयतीव हृष्टः ॥ ५३ ॥
पहा बरे ! हा पक्षी समोर शाखांच्या वर आपल्या घरट्यात बसून वारंवार उत्तम सान्त्वनापूर्ण मधुर वाणी बोलत आहे. याच्या वाणीत सुस्वागतम चा ध्वनी निघत असून त्याच्या द्वारा हर्षयुक्त होऊन तो जणुं पुनः पुन्हा मंगळप्राप्तीची सूचना देत आहे, अथवा येणार्‍या प्रियकराच्या स्वागताची तयारी करण्यास प्रेरणा देत आहे. ॥५३॥
ततः सा ह्रीमती बाला भर्तुर्विजयहर्षिता ।
अवोचद् यदि तत् तथ्यं भवेयं शरणं हि वः ॥ ५४ ॥
अशाप्रकारे त्रिजटेकडून आपल्या पतिदेवाच्या विजयाचे संवाद ऐकून सीदेवी लाजली आणि हर्षभराने त्या सर्व राक्षसीणींना उद्देशून म्हणाली, 'जर तुमचं म्हणणं करं ठरलं तर मी शरणागत असले तरी निश्चितच तुमचे रक्षण करीन.' ॥५४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे सप्तविंशः सर्गः ॥ २७ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा सत्तावीसावा सर्ग पूर्ण झाला. ॥२७॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP