श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ सप्तदशाधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीरामस्य पार्श्वे देवानां आगमनं ब्रह्मणा तस्य भगवत्तायाः प्रतिपादनं स्तवनं च -
भगवान्‌ श्रीरामांजवळ देवतांचे आगमन तसेच ब्रह्मदेवांच्या द्वारा त्यांच्या भगवत्तेचे प्रतिपादन तसेच स्तवन -
ततो हि दुर्मना रामः श्रुत्वैवं वदतां गिरः ।
दध्यौ मुहूर्तं धर्मात्मा बाष्पव्याकुललोचनः ।। १ ।।
त्यानंतर धर्मात्मा श्रीराम हाहाकार करणार्‍या वानर आणि राक्षसांचे बोलणे ऐकून मनातल्या मनात फार दुःखी झाले आणि डोळ्यात अश्रू आणून एक मुहूर्तपर्यंत काही विचार करत राहिले. ॥१॥
ततो वैश्रवणो राजा यमश्च पितृभिः सह ।
सहस्राक्षश्च देवेशो वरुणश्च जलेश्वरः ।। २ ।।

षडर्धनयनः श्रीमान् महादेवो वृषध्वजः ।
कर्ता सर्वस्य लोकस्य ब्रह्मा ब्रह्मविदां वरः ।। ३ ।।

एते सर्वे समागम्य विमानैः सूर्यसन्निभैः ।
आगम्य नगरीं लङ्‌कां अभिजग्मुश्च राघवम् ।। ४ ।।
याच समयी विश्रव्याचे पुत्र यक्षराज कुबेर, पितरांसहित यमराज, देवतांचे स्वामी सहस्त्र नेत्रधारी इंद्र, जलाचे अधिपति वरूण, त्रिनेत्रधारी श्रीमान्‌ वृषभध्वज महादेव तथा संपूर्ण जगताचे स्त्रष्टा ब्रह्मवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ ब्रह्मदेव - या सर्व देवता सूर्यतुल्य विमानांच्या द्वारा लंकापुरीत येऊन राघवांजवळ गेल्या. ॥२-४॥
ततः सहस्ताभरणान् प्रगृह्य विपुलान् भुजान् ।
अब्रुवंस्त्रिदशश्रेष्ठाः राघवं प्राञ्जलिं स्थितम् ।। ५ ।।
भगवान्‌ राघव त्यांच्या समोर हात जोडून उभे होते. त्या श्रेष्ठ देवता आभूषणांनी अलंकृत आपल्या विशाल भुजा उचलून त्यांना म्हणाल्या - ॥५॥
कर्ता सर्वस्य लोकस्य श्रेष्ठो ज्ञानविदां विभुः ।
उपेक्षसे कथं सीतां पतन्तीं हव्यवाहने ।
कथं देवगणश्रेष्ठं आत्मानं नावबुध्यसे ।। ६ ।।
श्रीराम ! आपण संपूर्ण विश्वाचे उत्पादक, ज्ञान्यांच्या मध्ये श्रेष्ठ आणि सर्वव्यापक आहात. मग या समयी आगीत पडलेल्या सीतेची उपेक्षा कशी काय करत आहात ? आपण सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ विष्णुच आहात. ही गोष्ट आपण समजून कसे घेत नाही. ॥६॥
ऋतधामा वसुः पूर्वं वसूनां त्वं प्रजापतिः ।
त्रयाणामपि लोकानां आदिकर्ता स्वयंप्रभुः ।। ७ ।।
पूर्वकाळी वास्तुंचे प्रजापति जे ऋतुधामा नामक वास्तु होते, ते आपणच होतात. तीन्ही लोकांचे आदिकर्ता आपण स्वयं प्रभुच आहात. ॥७॥
रुद्राणामष्टमो रुद्रः साध्यानामपि पञ्चमः ।
अश्विनौ चापि कर्णौ ते सूर्याचन्द्रमसौ दृशौ ।। ८ ।।
रूद्रामध्ये आठवे रुद्र आणि साध्यांमध्ये पाचवे साध्य ही आपणच आहात. दोन अश्विनीकुमार आपले कान आहेत आणि सूर्य तथा चंद्रमा नेत्र आहेत. ॥८॥
अन्ते चादौ च मध्ये च दृश्यसे च परन्तप ।
उपेक्षसे च वैदेहीं मानुषः पाकृतो यथा ।। ९ ।।
हे परंतपा देवा ! सृष्टिच्या आदि, अंत आणि मध्यांतही आपणच दिसून येत असता. मग एका साधारण मनुष्याप्रमाणे आपण सीतेची उपेक्षा का बरे करत आहात ? ॥९॥
इत्युक्तो लोकपालैस्तैः स्वामी लोकस्य राघवः ।
अब्रवीत् त्रिदशश्रेष्ठान् रामो धर्मभृतां वरः ।। १० ।।
त्या लोकपालांनी असे म्हटल्यावर धर्मात्म्यांमध्ये श्रेष्ठ लोकनाथ राघव श्रीरामांनी त्या श्रेष्ठ देवतांना म्हटले - ॥१०॥
आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम् ।
सोऽहं यस्य यतश्चाहं भगवांस्तद् ब्रवीतु मे ।। ११ ।।
देवगणांनो ! मी तर स्वतःला मनुष्य दशरथपुत्र रामच समजतो. भगवन्‌ ! मी जो कोण आहे आणि जेथून आलो आहे हे सर्व आपणच मला सांगावे. ॥११॥
इति ब्रुवाणं काकुत्स्थं ब्रह्मा ब्रह्मविदां वरः ।
अब्रवीच्छृणु मे वाक्यं सत्यं सत्यपराक्रम ।। १२ ।।
काकुत्स्थ रामांनी असे म्हटल्यावर ब्रह्मवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ ब्रह्मदेवांनी त्यांना याप्रकारे म्हटले - सत्यपराक्रमी श्रीरघुवीरा ! आपण माझे सत्यवचन ऐकावे. ॥१२॥
भवान् नारायणो देवः श्रीमांश्चक्रायुधः विभुः ।
एकशृङ्‌गो वराहस्त्वं भूतभव्यसपत्‍नजित् ।। १३ ।।
आपण चक्रधारी सर्व समर्थ श्रीमान्‌ भगवान्‌ नारायण देव आहात, एक दाढ असणारे पृथ्वीधारी वराह आहात तसेच देवतांच्या भूत आणि भावी शत्रूंना जिंकणारे आहात. ॥१३॥
अक्षरं ब्रह्म सत्यं च मध्ये चान्ते च राघव ।
लोकानां त्वं परो धर्मो विष्वक्सेनश्चतुर्भुजः ।। १४ ।।
रघुनंदना ! आपण अविनाशी परब्रह्म आहात. सृष्टिच्या आदि, मध्य आणि अंती सत्यरूपाने विद्यमान आहात. आपणच लोकांचे परमधर्म आहात. आपणच चतुर्भुज श्रीहरी आहात. ॥१४॥
शार्ङ्‌गधन्वा हृषीकेशः पुरुषः पुरुषोत्तमः ।
अजितः खड्गधृग् विष्णुः कृष्णश्चैव बृहद्बलः ।। १५ ।।
आपणच शार्ङ्‌गधन्वा, हृषीकेश, आंतर्यामी पुरुष आणि पुरुषोत्तम आहात. आपण कुणाकडूनही पराजित होत नाही. आपण नंदक नामक खङ्‌ग धारण करणारे विष्णु एवं महाबली कृष्ण आहात. ॥१५॥
सेनानीर्ग्रामणीश्च त्वं बुद्धिः सत्त्वं क्षमा दमः ।
प्रभवश्चाप्ययश्च त्वं उपेन्द्रो मधुसूदनः ।। १६ ।।
आपणच देव -सेनापति तसेच गावांचे मुख्य अथवा नेता आहात. आपणच बुद्धि, सत्त्व, क्षमा, इंद्रियनिग्रह तसेच सृष्टि एवं प्रलयाचे कारण आहात. आपणच उपेंद्र (वामन) आणि मधुसूदन आहात. ॥१६॥
इन्द्रकर्मा महेन्द्रस्त्वं पद्मनाभो रणान्तकृत् ।
शरण्यं शरणं च त्वामाहुर्दिव्या महर्षयः ।। १७ ।।
इंद्रालाही उत्पन्न करणारे महेंद्र आणि युद्धाचा अंत करणारे शान्तस्वरूप पद्मनाभही आपणच आहात. दिव्य महर्षिगण आपल्याला शरणदाता आणि शरणागतवत्सल म्हणतात. ॥१७॥
सहस्रशृंगो वेदात्मा शतशीर्षो महर्षभः ।
त्वं त्रयाणां हि लोकानां आदिकर्ता स्वयंप्रभुः ॥ १८ ॥
आपणच हजारो शाखारूप शिंग तसेच शेकडो विधिवाक्यरूप मस्तकांनी युक्त वेदरूप महावृषभ आहात. आपणच तीन्ही लोकांचे आदिकर्ता आणि स्वयंप्रभु (परम स्वतंत्र) आहात. ॥१८॥
सिद्धानामपि साध्यानां आश्रयश्चासि पूर्वजः ।
त्वं यज्ञस्त्वं वषट्कारः त्वण् ओङ्‌कारः परात्परः ।। १९ ।।
आपण सिद्धांचे आणि साध्यांचे आश्रय तसेच पूर्वज आहात. यज्ञ, वषट्‍कार आणि ओंकारही आपणच आहात. आपण श्रेष्ठांहूनही श्रेष्ठ परमात्मा आहात. ॥१९॥
प्रभवं निधनं चापि नो विदुः को भवानिति ।
दृश्यसे सर्वभूतेषु गोषु च ब्राह्मणेषु च ।। २० ।।
आपल्या आविर्भाव आणि तिरोभावाला कोणी जाणत नाही. आपण कोण आहात याचाही कुणाला पत्ता नाही आहे. समस्त प्राण्यांमध्ये श्रेष्ठ, गाईंमध्ये आणि ब्राह्मणांमध्येही आपणच दिसून येता. ॥२०॥
दिक्षु सर्वासु गगने पर्वतेषु नदीषु च ।
सहस्रचरणः श्रीमान् शतशीर्षः सहस्रदृक् ।। २१ ।।
समस्त दिशांमध्ये, आकाशात, पर्वतात आणि नद्यांमध्येही आपलीच सत्ता आहे. आपल्याला हजारो चरण, शेकडो मस्तके आणि हजारो नेत्र आहेत. ॥२१॥
त्वं धारयसि भूतानि वसुधां च सपर्वताम् ।
अन्ते पृथिव्याः सलिले दृश्यसे त्वं महोरगः ।। २२ ।।
आपणच संपूर्ण प्राण्यांना, पृथ्वीला आणि समस्त पर्वतांना धारण करता. पृथ्वीचा अंत झाल्यावरही आपणच जलावर महान्‌ सर्प-शेषनागाच्या रूपात दिसून येता. ॥२२॥
त्रील्लोकान् धारयन् राम देवगन्धर्वदानवान् ।
अहं ते हृदयं राम जिह्वा देवी सरस्वती ।। २३ ।।
श्रीरामा ! आपणच तीन्ही लोक तसेच देवता, गंधर्व आणि दानवांना धारण करणारे विराट्‌ पुरुष नारायण आहात. सर्वांच्या हृदयात रमण करणार्‍या परमात्मन ! मी ब्रह्मा आपले हृदय आहे आणि देवी सरस्वती आपली जिव्हा आहे. ॥२३॥
देवा रोमाणि गात्रेषु ब्रह्मणा निर्मिता प्रभो ।
निमेषस्ते स्मृता रात्रिः उन्मेषो दिवसस्तथा ।। २४ ।।
प्रभो ! मी ब्रह्म्याने ज्यांची सृष्टि केली आहे त्या सर्व देवता आपल्या विराट शरीरात रोम आहेत. आपले नेत्र बंद होणे रात्र आहे आणि उघडणे दिवस आहे. ॥२४॥
संस्कारास्तेऽभवन् वेदा नैतदस्ति त्वया विना ।
जगत् सर्वं शरीरं ते स्थैर्यं ते वसुधातलम् ।। २५ ।।
वेद आपले संस्कार आहेत. आपल्या शिवाय या जगाला अस्तित्वच नाही आहे. संपूर्ण विश्व आपले शरीर आहे. पृथ्वी आपली स्थिरता आहे. ॥२५॥
अग्निः कोपः प्रसादस्ते सोमः श्रीवत्सलक्षणः ।
त्वया लोकास्त्रयः क्रान्ताः पुरा स्वैविक्रमैस्त्रिभिः ।। २६ ।।
अग्नि आपला क्रोध आहे आणि चंद्रमा प्रसन्नता आहे. वक्षःस्थळावर श्रीवत्साचे चिह्न धारण करणारे भगवान्‌ विष्णु आपणच आहात. पूर्वकाळी (वामनावताराचे वेळी) आपणच आपल्या तीन पावलांनी तीन्ही लोक व्यापून टाकले होते. ॥२६॥
महेन्द्रश्च कृतो राजा बलिं बद्ध्वा सुदारुणम् ।
सीता लक्ष्मीर्भवान् विष्णुः देवः कृष्णः प्रजापतिः ।। २७ ।।
आपण अत्यंत दारूण दैत्यराज बळिला बांधून इंद्राला तीन्ही लोकांचा राजा बनविले होते. सीता साक्षात्‌ लक्ष्मी आहे आणि आपण भगवान्‌ विष्णु आहात. आपणच सच्चिदानंद स्वरूप भगवान्‌ श्रीकृष्ण आणि प्रजापति आहात. ॥२७॥
वधार्थं रावणस्येह प्रविष्टो मानुषीं तनुम् ।
तदिदं नस्त्वया कार्यं कृतं धर्मभृतां वर ।। २८ ।।
धर्मात्म्यांमध्ये श्रेष्ठ रघुवीरा ! आपण रावणाचा वध करण्यासाठीच या लोकात मनुष्य शरीरात प्रवेश केला आहे. आम्हां लोकांचे कार्य आपण संपन्न केले आहे. ॥२८॥
निहतो रावणो राम प्रहृष्टो दिवमाक्रम ।
अमोघं देव वीर्यं ते न तेऽमोघाः पराक्रमाः ।। २९ ।।
श्रीरामा ! आपल्या द्वारा रावण मारला गेला. आता आपण प्रसन्नतापूर्वक आपल्या दिव्य धामाला यावे. देवा ! आपले बळ अमोघ आहे. आपले पराक्रमही व्यर्थ होणारे नाहीत. ॥२९॥
अमोघं दर्शनं राम अमोघस्तव संस्तव ।
अमोघास्ते भविष्यन्ति भक्तिमन्तो नरा भुवि ।। ३० ।।
श्रीरामा ! आपले दर्शन अमोघ आहे. आपले स्तवनही अमोघ आहे. तसेच आपली भक्ति करणारी माणसेही या भूमण्डलात अमोघच असतील. ॥३०॥
ये त्वां देवं ध्रुवं भक्ताः पुराणं पुरुषोत्तमम् ।
प्राप्नुवन्ति सदा कामान् इह लोके परत्र च ।। ३१ ।।
आपण पुराण पुरुषोत्तम आहात. दिव्यरूपधारी परमात्मा आहात. जे लोक आपली भक्ती करतील ते लोक या लोकी आणि परलोकात आपले सर्व मनोरथ प्राप्त करून घेतील. ॥३१॥
इममार्षं स्तवं नित्यं इतिहासं पुरातनम् ।
ये नराः कीर्तयिष्यन्ति नास्ति तेषां पराभवः ।। ३२ ।।
हे परम ऋषि ब्रह्मदेवांनी केलेले दिव्य स्तोत्र तसेच पुरातन इतिहास आहे. जे लोक याचे कीर्तन करतील त्यांचा कधी पराभव होणार नाही. ॥३२॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे सप्तदशाधिकशततमः सर्गः ।। ११७ ।।
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशेसतरावा सर्ग पूरा झाला. ॥११७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP