श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ प्रथमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
पंपाया दर्शनेन श्रीरामस्य व्याकुलत्वं; श्रीरामेण लक्ष्मणं प्रति पंपाशोभायाः तत्रत्योद्दीपनसामग्र्याश्च वर्णनं; लक्ष्मणेन श्रीरामस्य प्रबोधनं ऋष्यमूकं गच्छंतौ तौ द्वौ भ्रातरौ वीक्ष्य सुग्रीवश्यान्येषां च वानराणां भयम् - पंपा सरोवराच्या दर्शानाने श्रीरामांची व्याकुळता, श्रीरामांनी लक्ष्मणाजवळ पंपेची शोभा आणि तेथील उद्दीपन सामग्रीचे वर्णन करणे, लक्ष्मणांनी श्रीरामांना समजाविणे तसेच दोघा भावांना ऋष्यमूक कडे येतांना पाहून सुग्रीव तसेच अन्य वानरांचे भयभीत होणे -
स तां पुष्करिणीं गत्वा पद्मोत्पलझषाकुलाम् ।
रामः सौमित्रिसहितो विललापाकुलेंद्रियः ॥ १ ॥
 कमळे, उत्पल आणि मत्स्य यांनी भरलेल्या त्या पंपा नामक पुष्करिणीच्या जवळ पोहोचून सीतेची आठवण आल्यामुळे श्रीरामांची इंद्रिये शोकाने व्याकुळ झाली. ते विलाप करू लागले. त्या समयी सैमित्र लक्ष्मण त्यांच्या बरोबर होते. ॥१॥
तस्य दृष्ट्‍वैव तां हर्षादिंद्रियाणि चकंपिरे ।
स कामवशमापन्नः सौमित्रिमिदमब्रवीत् ॥ २ ॥
 तेथे पंपावर दृष्टी पडताच (कमळ पुष्पामध्ये सीतेच्या नेत्रमुख आदिचे किञ्चित सादृश्य आढळल्याने) हर्षोल्लासाने श्रीरामांची सर्व इंद्रिये चंचल झाली. त्यांच्या मनात सीतेच्या दर्शनाची प्रबल इच्छा उत्पन्न झाली. त्या इच्छेच्या अधीन झाल्यासारखे होऊन ते सौमित्र लक्ष्मणास याप्रकारे म्हणाले- ॥२॥
सौमित्रे शोभते पंपा वैडूर्यविमलोदका ।
फुल्लपद्मोत्पलवती शोभिता विविधैर्द्रुमैः ॥ ३ ॥
 सौमित्रा ! ही पंपा कशी शोभून दिसत आहे ? हिचे जल वैडूर्य मण्याप्रमाणे स्वच्छ आणि शांत आहे. हिच्यात बरीचशी कमळदले आणि उत्पले फुललेली आहेत. तटावर उत्पन्न झालेल्या नाना प्रकारच्या वृक्षांनी हिची शोभा अधिकच वाढलेली आहे. ॥३॥
सौमित्रे पश्य पंपायाः काननं शुभदर्शनम् ।
यत्र राजंति शैलाभा द्रुमाः सशिखरा इव ॥ ४ ॥
 सौमित्रा ! पहा तर खरे, पंपाच्या तटावरील वन किती सुंदर दिसून येत आहे. येथील उंच उंच वृक्ष आपल्या पसरलेल्या शाखांमुळे अनेक शिखरांनी युक्त पर्वतांप्रमाणे सुशोभित होत आहेत. ॥४॥
मां तु शोकाभिसंतप्तं माधवः पीडयन्निव ।
भरतस्य च दुःखेन वैदेह्या हरणेन च ॥ ५ ॥
 परंतु मी या समयी भरताचे दुःख आणि सीताहरणाच्या चिंतेच्या शोकाने संतप्त होत आहे. मानसिक वेदनांमुळे मला फार कष्ट होत आहेत. ॥५॥
शोकार्तस्यापि मे पंपा शोभते चित्रकानना ।
व्यवकीर्णा बहुविधैः पुष्पैः शीतोदका शिवा ॥ ६ ॥
 जरी मी शोकाने पीडित आहे तरी सुद्धा मला ही पंपा फार रमणीय वाटत आहे. हिच्या निकटवर्तीचे वन फारच विचित्र दिसून येत आहे. हे नाना प्रकारच्या फुलांनी व्याप्त आहे. हिचे जल फारच शीतल आहे आणि ही फार सुखदायिनी प्रतीत होत आहे. ॥६॥
नलिनैरपि सञ्छन्ना ह्यत्यर्थं शुभदर्शना ।
सर्पव्यालानुचरिता मृगद्विजसमाकुला ॥ ७ ॥
 कमलांनी ही सारी पुष्करिणी झाकली गेली आहे. म्हणून फारच सुंदर दिसत आहे. हिच्या आसपास सर्प तसेच हिंस्त्र जंतु विचरत आहेत. मृग आदि पशु आणि पक्षी सर्व बाजूस विचरत आहेत. ॥७॥
अधिकं प्रतिभात्येतन्नीलपीतं तु शाद्वलम् ।
द्रुमाणां विविधैः पुष्पैः परिस्तोमैरिवार्पितम् ॥ ८ ॥
 कोवळ्या गवताने झाकले गेलेले हे स्थान आपल्या निळ्या- पिवळ्या आभेमुळे अधिकच शोभून दिसत आहे. येथे वृक्षांची नाना प्रकारची फुले सर्वत्र विखुरलेली आहेत. त्यामुळे जणु येथे बरेचसे गालिचे अंथरले गेले आहेत की काय असे वाटत आहे. ॥८॥
पुष्पभारसमृद्धानि शिखराणि समंततः ।
लताभिः पुष्पिताग्राभिरुपगूढानि सर्वतः ॥ ९ ॥
 चोहोबाजूस वृक्षांचे शेंडे (अग्रभाग) फुलांच्या भारांनी लगडलेले असल्याने समृद्धिशाली प्रतीत होत आहेत. वरून फुललेल्या लता त्यांना सर्व बाजूनी वेढून राहिलेल्या आहेत. ॥९॥
सुखानिलो ऽयं सौमित्रे कालः प्रचुरमन्मथः ।
गंधवान् सुरभिर्मासो जातपुष्पफलद्रुमः ॥ १० ॥
 सौमित्रा ! या समयी मंद मंद सुखद वारा वहात आहे, ज्यामुळे कामनांचे उद्दीपन होत आहे. (सीतेला पहाण्याची इच्छा प्रबल होत आहे.) हा चैत्राचा महीना आहे. वृक्षांवर फुले आणि फळे लागलेली आहेत आणि सर्वत्र मनोहर सुगंध भरुन राहिला आहे. ॥१०॥
पश्य रूपाणि सौमित्रे वनानां पुष्पशालिनाम् ।
सृजतां पुष्पवर्षाणि तोयं तोयमुचामिव ॥ ११ ॥
 लक्ष्मणा ! फुलांनी सुशोभित होणार्‍या या वनांचे रूप तर पहा. जसे मेघ जलाची वृष्टि करतात त्या प्रमाणे हे फुलांची वृष्टि करीत आहेत. ॥११॥
प्रस्तरेषु च रम्येषु विविधाः काननद्रुमाः ।
वायुवेगप्रचलिताः पुष्पैरवकिरंति गाम् ॥ १२ ॥
 वनातील हे विविध वृक्ष वायुच्या वेगामुळे हलत डुलत रमणीय शिलांच्या वर फुलांचा वर्षाव करीत आहेत आणि येथील भूमीला झाकून टाकीत आहेत. ॥१२॥
पतितैः पतमानैश्च पादपस्थैश्च मारुतः ।
कुसुमैः पश्य सौमित्रे क्रीडन्निव समंततः ॥ १३ ॥
 सैमित्रा ! तिकडे पहा तर खरे ! जी वृक्षांवरून गळून पडली आहेत, गळून पडत आहेत तसेच जी अद्याप फाद्यांना लगडलेली आहेत त्या सर्व फुलांशी सर्वत्र वायु जणु क्रीडा करीत आहे. ॥१३॥
विक्षिपन् विविधाः शाखा नगानां कुसुमोत्कचाः ।
मारुतश्चलितस्थानैः षट्पदैरनुगीयते ॥ १४ ॥
 फुलांनी लगडलेल्या वृक्षांच्या विभिन्न शाखांना झटके देऊन हलवीत वारा जेव्हा पुढे पुढे जातो तेव्हा आपापल्या स्थानापासून विचलित झालेले भ्रमर जणु त्याचे यशोगान करीत त्याच्या मागोमाग जात आहेत. ॥१४॥
मत्तकोकिलसन्नादैर्नर्तयन्निव पादपान् ।
शैलकंदरनिष्क्रांतः प्रगीत इव चानिलः ॥ १५ ॥
 पर्वताच्या कंदरातून विशेष ध्वनीसह निघालेला वायु जणु उच्च स्वरात गीत गात आहे. मत्त कोकिळांचा कलरव वाद्याचे काम करीत आहे आणि त्या वाद्यांच्या ध्वनी बरोबर तो वायु या डोलणार्‍या, हलणार्‍या वृक्षांना जणु नृत्याचें शिक्षणच देत आहे. ॥१५॥
तेन विक्षिपतात्यर्थं पवनेन समंततः ।
अमी संसक्तशाखाग्रा ग्रथिता इव पादपाः ॥ १६ ॥
 ’वायुच्या वेगपूर्वक वहाण्यामुळे ज्यांच्या शाखांचे अग्रभाग सर्व बाजूनी परस्परास भिडले आहेत ते वृक्ष एक दुसर्‍यात गुंफले गेल्याप्रमाणे भासत आहेत. ॥१६॥
स एष सुखसंस्पर्शो वाति चंदनशीतलः ।
गंधमभ्यावहन् पुण्यं श्रमापनयनो ऽनिलः ॥ १७ ॥
 मलय पर्वताला स्पर्श करून वहाणारा हा शीतल वारा शरीरास स्पर्श करून जात असता किती सुखद वाटत आहे. हा थकवा दूर करीत वहात आहे आणि सर्वत्र पवित्र सुगंध पसरवीत आहे. ॥१७॥
अमी पवननिक्षिप्ता विनदंतीव पादपाः ।
षट्पदैरनुकूजंतो वनेषु मधुगंधिषु ॥ १८ ॥
 मधुर मकरंद आणि सुगंधांनी भरलेल्या या वनांमध्ये गुणगुणणार्‍या भ्रमरांच्या माध्यमांतून हे वायुद्वारा हलविले गेलेले वृक्ष जणु नृत्या बरोबरच गान ही करीत आहेत. ॥१८॥
गिरिप्रस्थेषु रम्येषु पुष्पवद्‌भिर्मनोरमैः ।
संसक्तशिखराः शैला विराजंते महाद्रुमैः ॥ १९ ॥
 आपल्या रमणीय पृष्ठ भागांवर उत्पन्न झालेल्या फुलांनी संपन्न तसेच मनास लोभविणार्‍या विशाल वृक्षांना भिडलेल्या शिखरांनी युक्त हे पर्वत अद्‌भुत शोभा प्राप्त करीत आहेत. ॥१९॥
पुष्पसञ्छन्नशिखरा मारुतोत्क्षेपचञ्चलाः ।
अमी मधुकरोत्तंसाः प्रगीता इव पादपाः ॥ २० ॥
 ज्यांच्या शाखांचे अग्रभाग फुलांनी झाकलेले आहेत, जे वार्‍याच्या झुळकीने हलत आहेत तसेच ज्यांनी भ्रमरांना पगडीच्या रूपात मस्तकावर धारण केलेले आहे, ते वृक्ष जणु त्यांनी नाचणे- गाणे सुरू केल्याप्रमाणे भासत आहेत. ॥२०॥
पुष्पिताग्रांस्तु पश्येमान् कर्णिकारान् समंततः ।
हाटकप्रतिसञ्छन्नान्नरान्पीतांबरानिव ॥ २१ ॥
 पहा, सर्व बाजूनी सुंदर फुलांनी लगडलेले हे कण्हेर वृक्ष सोन्याच्या आभूषाणांनी विभूषित पीताम्बरधारी मनुष्यांप्रमाणे शोभा प्राप्त करीत आहेत. ॥२१॥
अयं वसंतः सौमित्रे नानाविहगनादितः ।
सीतया विप्रहीणस्य शोकसंदीपनो मम ॥ २२ ॥
 सौमित्रा ! नाना प्रकारच्या विहंगमांच्या कलरवांने निनादित झालेला हा वसंत-समय सीतेचा वियोग झालेल्या माझ्यासाठी शोक वाढविणारा होऊन गेला आहे. ॥२२॥
मां हि शोकसमाक्रांतं संतापयति मन्मथः ।
हृष्टः प्रवदमानश्च मामाह्वयति कोकिलः ॥ २३ ॥
 वियोगाच्या शोकाने तर मी पीडित आहेच (त्यात) हा कामदेव (सीतेविषयीचा अनुराग) मला आणखीणच संताप देत आहे. कोकिळ अत्यंत हर्षाने कलरव करीत जणु काही मला ललकारत आहे. ॥२३॥
एष नत्यूहको हृष्टो रम्ये मां वननिर्झरे ।
प्रणदन्मन्मथाविष्टं शोचयिष्यति लक्ष्मण ॥ २४ ॥
 लक्ष्मणा ! वनातील रमणीय निर्झराच्या निकट मोठ्या आनंदाने बोलणारा हा जलकुक्कुट सीतेला भेटण्याची इच्छा करणार्‍या मला रामाला शोकमग्न करून टाकीत आहे. ॥२४॥
श्रुत्वैतस्य पुरा शब्दमाश्रमस्था मम प्रिया ।
मामाहूय प्रमुदिता परमं प्रत्यनंदत ॥ २५ ॥
 पूर्वी जेव्हा माझी प्रिया आश्रमात राहात होती, त्या दिवसात याचा शब्द ऐकून आनंदमग्न होऊन जात असे आणि मलाही जवळ बोलावून अत्यंत आनंदित करीत असे. ॥२५॥
एवं विचित्राः पतगा नानारावविराविणः ।
वृक्षगुल्मलताः पश्य संपतंति समंततः ॥ २६ ॥
 पहा, या प्रकारे निरनिराळ्या बोली बोलणारे विचित्र पक्षी चोहो बाजूस वृक्ष, झाडी आणि लतांकडे उडत जात आहेत. ॥२६॥
विमिश्रा विहगाः पुंभिरात्मव्यूहाभिनंदिताः ।
भृङ्‌गगराजप्रमुदिताः सौमित्रे मधुरस्वराः ॥ २७ ॥
सुमित्रानंदन ! पहा या पक्ष्यांच्या माद्या नर पक्ष्यांशी संयुक्त होऊन आपल्या थव्यात आनंदाचा अनुभव करीत आहेत, भ्रमरांचा गुंजारव ऐकून प्रसन्न होत आहेत आणि स्वतः ही मधुर बोली बोलत आहेत. ॥२७॥
अस्याः कूले प्रमुदिताः सङ्‌घशः शकुनास्त्विह ।
दात्यूहरुतविक्रंदैः पुंस्कोकिलरुतैरपि ॥ २८ ॥
स्वनंति पादापाश्चेमे ममानङ्‌गप्रदीपनाः ।
या पंपाच्या तटावर या पक्ष्यांच्या झुंडीच्या झुंडी (थवेच्या थवे) आनंदमग्न होऊन किलबिल करीत आहेत. जलकुक्कुटांचे रतिसंबंधी कूजन तसेच नर कोकिळांच्या कलनादाच्या मिषाने जणु हे वृक्ष ही मधुर बोली बोलत आहेत आणि माझ्या अनंग वेदनेस उद्दीप्त करीत आहेत. ॥२८ १/२॥
अशोकस्तबकाङ्‌गारः षट्पदस्वननिःस्वनः ॥ २९ ॥
मां हि पल्लवताम्रार्चिर्वसंताग्निः प्रधक्ष्यति ।
असे कळून येत आहे की ही वसंतरूपी आग मला जाळून भस्म करून टाकील. अशोक पुष्पाचे लाल- लाल गुच्छ हेच या अग्निचे निखारे आहेत, नूतन पल्लव हीच याची लाल- लाल लपेट (ज्वाला) आहे तसेच भ्रमरांचा गुंजारव हाच याच्या जळत्या आगीचा ’चट- चट’ शब्द आहे. ॥२९ १/२॥
न हि तां सूक्ष्मपक्ष्माक्षीं सुकेशीं मृदुभाषिणीम् ॥ ३० ॥
अपश्यतो मे सौमित्रे जीविते ऽस्ति प्रयोजनम् ।
सौमित्रा ! जर मी सूक्ष्म पापण्यांचे केस आणि सुंदर केश (कलाप) असणार्‍या मधुरभाषिणी सीतेला पाहू शकलो नाही तर मला या जीवनाशी काही ही प्रयोजन नाही. ॥३० १/२॥
अयं हि दयितस्तस्याः कालो रुचिरकाननः ॥ ३१ ॥
कोकिलाकुलसीमांतो दयिताया ममानघ ।
 निष्पाप लक्ष्मणा ! वसंत ऋतुमध्ये वनाची शोभा फारच मनोहर होऊन जात असते. त्याच्या सीमेमध्ये सर्व बाजूनी कोकिळेचा मधुर आवाज (कुहु कुहु) ऐकू येत असतो. माझी प्रिया सीता हिला हा समय फारच प्रिय वाटत असे. ॥३१ १/२॥
मन्मथायास संभूतो वसंतगुणवर्धितः ॥ ३२ ॥
अयं मां धक्ष्यति क्षिप्रं शोकाग्निर्न चिरादिव ।
अनंग वेदनेमुळे उत्पन्न झालेला शोकाग्नि वसंतऋतुच्या गुणांचे इंधन मिळाल्याने वाढला आहे, असे वाटत आहे की हा मला शीघ्रच जाळून टाकील. ॥३२ १/२॥
अपश्यतस्तां दयितां पश्यतो रुचिरद्रुमान् ॥ ३३ ॥
ममायमात्मप्रभवो भूयस्त्वमुपयास्यति ।
आपल्या त्या प्रियतम पत्‍नीला मी पाहू शकत नाही आणि या मनोहर वृक्षांना पहात आहे म्हणून माझा हा अनंग ज्वर आता अधिकच वाढेल. ॥३३ १/२॥
अदृश्यमाना वैदेही शोकं वर्धयते मम ॥ ३४ ॥
दृश्यमानो वसंतश्च स्वेदसंसर्गदूषकः ।
वैदेही सीता येथे मला दिसत नाही म्हणून माझा शोक वाढवीत आहे तसेच मंद मलयानिलाच्या द्वारा स्वेदसंसार्गाचे निवारण करणारा हा वसंतही माझ्या शोकाची वृद्धि करीत आहे. ॥३४ १/२॥
मां ह्यद्य मृगशावाक्षी चिंताशोकबलात्कृतम् ॥ ३५ ॥
संतापयति सौमित्रे क्रूरश्चैत्रो वनानिलः ।
सौमित्र ! मृगनयनी सीता चिंता आणि शोकाने बलपूर्वक पीडित केल्या गेलेल्या मला रामाला अधिकच संताप देत आहे. त्याच बरोबर हा वनात वाहणारा चैत्रमासातील वायुही मला पीडा देत आहे. ॥३५ १/२॥
अमी मयूराः शोभंते प्रनृत्यंतस्ततस्ततः ॥ ३६ ॥
स्वैः पक्षैः पवनोद्धूतैर्गवाक्षैः स्फाटिकैरिव ।
हे मोर स्फटिक मण्यांनी बनविलेल्या गवाक्षां झरोक्यांप्रमाणे प्रतीत होत होणार्‍या आपल्या पसरलेल्या पिसार्‍यांनी, जो वायुमुळे कंपित होत आहे, इकडे तिकडे नाचत असता कशी शोभा प्राप्त करीत आहेत ? ॥३६ १/२॥
शिखिनीभिः परिवृतास्त एते मदमूर्च्छिताः ॥ ३७ ॥
मन्मथाभिपरीतस्य मम मन्मथवर्धनाः ।
लांडोरीनी घेरलेले हे मदमस्त मयूर अनंग वेदनेने संतप्त झालेल्या माझ्या या कामपीडेला अधिकच वाढवीत आहेत. ॥३७ १/२॥
पश्य लक्ष्मण नृत्यंतं मयूरमुपनृत्यति ॥ ३८ ॥
शिखिनी मन्मथार्तैषा भर्तारं गिरिसानुषु ।
लक्ष्मणा ! ते पहा, पर्वत शिखरावर नाचत असलेल्या, आपले स्वामी मयूर ह्यांच्या बरोबरच ती लांडोरही कामपीडित होऊन नाचत आहे. ॥३८ १/२॥
तामेव मनसा रामां मयूरोप्युपधावति ॥ ३९ ॥
वितत्य रुचिरौ पक्षौ रुतैरुपहसंनिव ।
मयूरही आपल्या दोन्ही पंखाना पसरवून मनातल्या मनात आपल्या त्या प्रियेचे अनुसरण करीत आहे तसेच आपल्या मधुर स्वरांनी जणु माझा उपहास करीत असल्यासारखा भासत आहे. ॥३९ १/२॥
मयूरस्य वने नूनं रक्षसा न हृता प्रिया ॥ ४० ॥
तस्मान्नृत्यति रम्येषु वनेषु सह कांतया ।
निश्चितच वनात कुणी राक्षसाने मोराच्या प्रियेचे अपहरण केलेले नाही म्हणून हा रमणीय वनांत आपल्या वल्लभेसह नृत्य करीत आहे. ॥४० १/२॥
मम त्वयं विना वासः पुष्पमासे सुदुस्सहः ॥ ४१ ॥
पश्य लक्ष्मण संरागं तिर्यग्योनिगतेष्वपि ।
यदेषा शिखिनी कामाद्‌भर्तारं रमते ऽंतिके ॥ ४२ ॥
फुलांनी बहरलेल्या या चैत्र महिन्यात सीतेविना येथे निवास करणे माझ्यासाठी अत्यंत दुःसह आहे. लक्ष्मणा ! पहा तर खरे, तिर्यग्योनिमध्ये पडलेल्या प्राण्यांमध्ये ही परस्परात किती अधिक अनुराग आहे. या समयी ही लांडोर काम भावनेने आपल्या स्वामीच्या समोर उपस्थित झाली आहे. ॥४१-४२॥
मामाप्येवं विशालाक्षी जानकी जातसंभ्रमा ।
मदनेनाभिवर्तेत यदि नापहृता भवेत् ॥ ४३ ॥
 जर विशालाक्षी सीतेचे अपहरण झालेले नसते तर तीही याच प्रकारे अत्यंत प्रेमाने वेगपूर्वक माझ्या जवळ आली असती. ॥४३॥
पश्य लक्ष्मण पुष्पाणि निष्फलानि भवंति मे ।
पुष्पभारसमृद्धानां वनानां शिशिरात्यये ॥ ४४ ॥
 लक्ष्मणा ! या वसंत ऋतुमध्ये फुलांच्या भाराने संपन्न झालेल्या या वनांतील ही सारी फुले माझ्यासाठी निष्फळ झाली आहेत. प्रिया सीता येथे नसल्याने माझ्यासाठी यांचे काही प्रयोजन राहिलेले नाही. ॥४४॥
रुचिराण्यपि पुष्पाणि पादपानामतिश्रिया ।
निष्फलानि महीं यांति समं मधुकरोत्करैः ॥ ४५ ॥
 अत्यंत शोभेमुळे मनोहर प्रतीत होणारी या वृक्षांची फुलेही निष्फळ होऊन भ्रमर समूहांच्या सहच पृथ्वीवर पडत आहेत. ॥४५॥
वदंति रावं मुदिताः शकुनाः सङ्‌घशः कलम् ।
आह्वयंत इवान्योन्यं कामोन्मादकरा मम ॥ ४६ ॥
 हर्षाने प्रफुल्लित झालेल्या या पक्ष्यांच्या झुंडीच्या झुंडी एक दुसर्‍यास बोलावीत असल्याप्रमाणे इच्छेप्रमाणे कलरव करीत आहेत आणि माझ्या मनात प्रेमोन्माद उत्पन्न करीत आहेत. ॥४६॥
वसंतो यदि तत्रापि यत्र मे वसति प्रिया ।
नूनं परवशा सीता सा ऽपि शोचत्यहं यथा ॥ ४७ ॥
 जेथे माझी प्रिया सीता निवास करीत आहे त्या ठिकाणी या प्रमाणे वसंत ऋतु व्याप्त असेल तर तिची काय दशा होईल ? निश्चितच पराधीन झालेली सीता तेथे माझ्या प्रमाणेच शोक करीत राहिली असेल. ॥४७॥
नूनं न तु वसंतो ऽयं देशं स्पृशति यत्र सा ।
कथं ह्यसितपद्माक्षी वर्तयेत्सा मया विना ॥ ४८ ॥
 जेथे सीता आहे तेथे जरी त्या एकान्त स्थानी वसंताचा प्रवेश झालेला नसेल तरी ही निश्चितच माझ्याशिवाय ती काळेभोर डोळे असलेली कमलनयनी सीता कशी बरे जिवंत राहू शकेल ? ॥४८॥
अथवा वर्तते तत्र वसंतो यत्र मे प्रिया ।
किं करिष्यति सुश्रोणी सा तु निर्भर्त्सिता परैः ॥ ४९ ॥
 अथवा संभव आहे की जेथे माझी प्रिया आहे तेथेही या प्रमाणेच वसंत अवतरला असेल, परंतु तिला तर शत्रुंचे दटावणे - धमकावणे ऐकावे लागत असेल, म्हणून ती बिचारी सुंदर सीता काय करू शकणार आहे ? ॥४९॥
श्यामा पद्मपलाशाक्षी मदुपूर्वाभिभाषिणी ।
नूनं वसंतमासाद्य परित्यक्ष्यति जीवितम् ॥ ५० ॥
 जिची अद्याप युवावस्थेत आहे आणि जिचे प्रफुल्ल कमलदलाप्रमाणे मनोहर नेत्र आहेत ती मृदुभाषिणी माझी प्राणवल्लभा जानकी निश्चितच हा वसंत ऋतु प्राप्त होताच आपल्या प्राणांचा त्याग करील. ॥५०॥
दृढं हि हृदये बुद्धिर्मम संप्रति वर्तते ।
नालं वर्तयितुं सीता साध्वी मद्विरहं गता ॥ ५१ ॥
 माझ्या हृदयांत हा विचार दृढ होत आहे की साध्वी सीता माझ्यापासून विरह झाल्यावर अधिक काळपर्यत जिवंत राहू शकणार नाही. ॥५१॥
मयि भावस्तु वैदेह्यास्तत्त्वतो विनिवेशितः ।
ममापि भावः सीतायां सर्वथा विनिवेशितः ॥ ५२ ॥
 वास्तविक वैदेही सीतेचा हार्दिक अनुराग माझ्या ठिकाणी आणि माझे संपूर्ण प्रेम सर्वथा वैदेही सीतेच्या ठिकाणीच प्रतिष्ठित आहे. ॥५२॥
एष पुष्पवहो वायुः सुखस्पर्शो हिमावहः ।
तां विचिंतयतः कांतां पावकप्रतिमो मम ॥ ५३ ॥
 फुलांचा सुगंध घेऊन वाहणारा हा शीतल वारा, ज्याचा स्पर्श फारच सुखद आहे, प्राणवल्लभा सीतेची आठवण आल्यावर मला आगीप्रमाणे भाजून काढीत आहे. ॥५३॥
सदा सुखमहं मन्ये यं पुरा सह सीतया ।
मारुतः स विना सीतां शोकं वर्धयते मम ॥ ५४ ॥
 पूर्वी सीतेसह राहात असता जो मला सदा सुखद वाटत असे तोच वारा आज सीतेच्या विरहत माझ्यासाठी शोकजनक बनला आहे. ॥५४॥
तां विना स विहङ्‌गो यः पक्षी प्रणदितस्तदा ।
वायसः पादपगतः प्रहृष्टभिनर्दति ॥ ५५ ॥
 जेव्हा सीता माझ्या बरोबर होती त्या दिवसात जो कावळा (विहंग) आकाशात जाऊन काँव काँव करीत होता, ते सीतेच्या भावी वियोगाची सूचना देणारे होते. आता सीतेच्या वियोगकालात तो कावळा वृक्षावर बसून अत्यंत हर्षाने आपल्या बोलीत बोलत आहे (यावरून सूचित होत आहे की सीतेचा संयोग लवकरच सुलभ होईल.) ॥५५॥
एष वै तत्र वैहेह्या विहगः प्रतिहारकः ।
पक्षी मां तु विशालाक्ष्याः समीपमुपनेष्यति ॥ ५६ ॥
 हा तोच पक्षी आहे जो आकाशात स्थित होऊन बोलत असता वैदेहीच्या अपहरणाचा सूचक झाला होता; परंतु आज हा ज्याप्रकारे बोली बोलत आहे त्या वरून असे वाटत आहे की हा मला विशालाक्षी सीतेच्या समीप घेऊन जाईल. ॥५६॥
पश्य लक्ष्मण सन्नादं वने मदविवर्धनम् ।
पुष्पिताग्रेषु वृक्षेषु द्विजानामुपकूजताम् ॥ ५७ ॥
 लक्ष्मणा ! पहा, ज्यांच्या वरील बाजूकडील फांद्या फुलांनी लगडलेल्या आहेत, त्या वृक्षांवर बसून कलरव करणार्‍या पक्ष्यांचा हा मधुर शब्द विरहीजनांच्या मदनोन्मादाला वाढविणारा आहे. ॥५७॥
विक्षिप्तां पवनेनैतामसौ तिलकमञ्जरीम् ।
षट्पदः सहसाभ्येति मदोद्धूतामिव प्रियाम् ॥ ५८ ॥
 वायुच्या द्वारा हलविल्या गेलेल्या त्या तिलकी वृक्षाच्या मंजरीवर भ्रमर एकाएकी जाऊन बसत आहे, जणु कुणी प्रेमी काममदाने कंपित झालेल्या प्रेयसीलाच भेटत आहे. ॥५८॥
कामिनामयमत्यंतमशोकः शोकवर्धनः ।
स्तबकैः पवनोत्क्षिप्तैस्तर्जयन्निव मां स्थितः ॥ ५९ ॥
 हा अशोक प्रियाविरही कामी पुरुषांसाठी अत्यंत शोक वाढविणारा आहे. हा वायुच्या झुळुकीने कंपित झालेल्या पुष्पगुच्छांच्या द्वारा मला जणु दाह करीत असल्यासारखा उभा आहे. ॥५९॥
अमी लक्ष्मण दृश्यंते चूताः कुसुमशालिनः ।
विभ्रमोत्सिक्तमनसः साङ्‌गरागा नरा इव ॥ ६० ॥
 लक्ष्मणा ! हे मंजिर्‍यांनी सुशोभित होणारे आम्रवृक्ष शृगांरविलासाने मदमत्त हृदय होऊन चंदन आदि अंगराग धारण करणार्‍या मनुष्यांप्रमाणे दिसून येत आहेत. ॥६०॥
सौमित्रे पश्य पंपायाश्चित्रासु वनराजिषु ।
किन्नरा नरशार्दूल विचरंति ततस्ततः ॥ ६१ ॥
 नरश्रेष्ठ सौमित्रा ! पहा पंपाच्या विचित्र वनश्रेणींच्या मधून किन्नर इकडे- तिकडे विचरण करीत आहेत. ॥६१॥
इमानि शुभगंधीनि पश्य लक्ष्मण सर्वशः ।
नलिनानि प्रकाशंते जले तरुणसूर्यवत् ॥ ६२ ॥
 लक्ष्मणा ! पहा ! पंपेच्या जलात सर्वत्र फुललेली ती सुगंधी कमळे प्रातःकाळच्या सूर्याप्रमाणे प्रकाशित होत आहेत. ॥६२॥
एषा प्रसन्नसलिला पद्मनीलोत्पलायुता ।
हंसकारण्डवाकीर्णा पंपा सौगंधिकायुता ॥ ६३ ॥
 पंपाचे जल फारच स्वच्छ आहे. यात लाल कमळे आणि नीलकमळे फुललेली आहेत. हंस आणि कारण्डव आदि पक्षी सर्वत्र पसरलेले आहेत तसेच सौगंधिक कमळे याची शोभा वाढवीत आहेत. ॥६३॥
जले तरुणसूर्याभैः षट्पदाहतकेसरैः ।
पङ्‌कजैः शोभते पंपा समंतादभिसंवृता ॥ ६४ ॥
 ’जलात प्रातःकाळच्या सूर्याप्रमाणे प्रकाशित होणार्‍या कमलांच्या द्वारा सर्व बाजूनी घेरली गेलेली पंपा फार शोभून दिसत आहे. त्या कमलांच्या केसरांना भ्रमरांनी चाखलेले आहे. ॥६४॥
चक्रवाकयुता नित्यं चित्रप्रस्थवनांतरा ।
मातङ्‌गमृगयूथैश्च शोभते सलिलार्थिभिः ॥ ६५ ॥
हिच्यामध्ये चक्रवाक सदा निवास करतात. येथील वनात विचित्र विचित्र स्थाने आहेत तसेच पाणी पिण्यासाठी आलेल्या हत्तींच्या आणि मृगांच्या समूहामुळे या पंपेची शोभा अधिकच वाढत आहे. ॥६५॥
पवनाहितवेगाभिरूर्मिभिर्विमले ऽंभसि ।
पङ्‌कजानि विराजंते ताड्यमानानि लक्ष्मण ॥ ६६ ॥
लक्ष्मणा ! वायुच्या थपडांनी ज्याच्यांत वेग उत्पन्न झालेला असतो त्या लाटांनी ताडित होणारी कमळे पंपाच्या निर्मल जलांत फार शोभा प्राप्त करीत आहेत. ॥६६॥
पद्मपत्रविशालाक्षीं सततं पङ्‌कजप्रियाम् ।
अपश्यतो मे वैदेहीं जीवितं नाभिरोचते ॥ ६७ ॥
प्रफुल्ल कमलदलाप्रमाणे विशाल नेत्रांच्या वैदेही सीतेला कमळे सदा प्रिय आहेत. ती सीता दिसत नसल्याने मला जीवित राहाणे चांगले वाटत नाही. ॥६७॥
अहो कामस्य वामत्वं यो गतामपि दुर्लभाम् ।
स्मारयिष्यति कल्याणीं कल्याणतरवादिनीम् ॥ ६८ ॥
अहो ! काम किती कुटील आहे, जो अन्यत्र गेलेल्या आणि परम दुर्लभ झालेली असूनही कल्याणमय वचने बोलणार्‍या त्या कल्याणस्वरूपा सीतेचे वारंवार स्मरण करून देत आहे. ॥६८॥
शक्यो धारयितुं कामो भवेदद्यागतो मया ।
यदि भूयो वसंतो मां न हन्यात् पुष्पितद्रुमः ॥ ६९ ॥
जर फुललेल्या वृक्षांनी युक्त हा वसंत माझ्यावर पुन्हा प्रहार करणार नाही तर प्राप्त झालेल्या कामवेदनेला मी कसातरी मनांतच रोखून धरून शकतो. ॥६९॥
यानि स्म रमणीयानि तया सह भवंति मे ।
तान्येवा ऽरमणीयानि जायंते मे तया विना ॥ ७० ॥
सीता बरोबर असतांना ज्या ज्या वस्तु मला रमणीय प्रतीत होत होत्या त्याच आज तिच्याविना सौंदर्यहीन वाटत आहेत. ॥७०॥
पद्मकोशपलाशानि दृष्ट्‍वा दृष्टिर्हि मन्यते ।
सीताया नेत्रकोशाभ्यां सदृशानीति लक्ष्मण ॥ ७१ ॥
लक्ष्मणा ! हे कमलकोशांचे दल सीतेच्या नेत्रकोशाप्रमाणे आहेत, म्हणून माझे डोळे त्यांनाच पाहू इच्छित आहेत. ॥७१॥
पद्मकेसरसंसृष्टो वृक्षांतरविनिस्सृतः ।
निःश्वास इव सीताया वाति वायुर्मनोहरः ॥ ७२ ॥
कमल केसरांना स्पर्श करून दुसर्‍या वृक्षांच्या मधून निघालेला हा सौरभयुक्त मनोहर वारा सीतेच्या निःश्वासाप्रमाणे वहात आहे. ॥७२॥
सौमित्रे पश्य पंपाया दक्षिणे गिरिसानुनि ।
पुष्पितां कर्णिकारस्य यष्टिं परमशोभनाम् ॥ ७३ ॥
सौमित्रा ! ती पहा, पंपाच्या दक्षिण भागात पर्वत शिखरांवर फुललेली कण्हेराची फांदी किती अधिक शोभून दिसत आहे. ॥७३॥
अधिकं शैलराजो ऽयं धातुभिः सुविभूषितः ।
विचित्रं सृजते रेणुं वायुवेगविघट्टितम् ॥ ७४ ॥
विभिन्न धातुंनी विभूषित झालेला हा पर्वतराज ऋष्यमूक वायुच्या वेगाने आणल्या गेलेल्या विचित्र धुळीची सृष्टि करीत आहे. ॥७४॥
गिरिप्रस्थास्तु सौमित्रे सर्वतः संप्रपुष्पितैः ।
निष्पत्रैः सर्वतो रम्यैः प्रदीप्ता इव किंशुकैः ॥ ७५ ॥
सौमित्रा ! चोहो बाजूस फुललेल्या आणि सर्व बाजूनी रमणीय प्रतीत होणार्‍या पत्रहीन पळस वृक्षांनी उपलक्षित या पर्वताचा पृष्ठभाग आगीत जळत असल्याप्रमाणे भासत आहे. ॥७५॥
पंपातीररुहाश्चेमे संसक्ता मधुगंदिनः ।
मालतीमल्लिकाषण्डाः करवीराश्च पुष्पिताः ॥ ७६ ॥
पंपाच्या तटावर उत्पन्न झालेले हे वृक्ष तिच्या जलानेच अभिषिक्त होऊन वाढलेले आहेत; आणि मधुर मकरंद आणि गंधाने संपन्न झाले आहेत. यांची नावे अशी आहेत - मालती, मल्लिका, पद्म आणि करवीर. हे सर्वच्या सर्व फुलांनी सुशोभित आहेत. ॥७६॥
केतक्यः सिंधुवाराश्च वासंत्यश्च सुपुष्पिताः ।
माधव्यो गंधपूर्णाश्च कुंदगुल्माश्च सर्वशः ॥ ७७ ॥
केतकी, (केवडा) सिंदुवार तसेच वासंती लताही सुंदर फुलांनी लगडलेल्या आहेत. सुगंधी मालती लता तसेच कुंद- कुसुमांची झाडी सर्वत्र शोभत आहे. ॥७७॥
चिरिबिल्वा मधूकाश्च ऽञ्जुला वकुलास्तथा ।
चंपकास्तिलकाश्चैव नागवृक्षाश्च पुष्पिताः ॥ ७८ ॥
चिरिबिल्व (चिलबिल), महुआ, वेत, मौलसिरी, चंपा, तिलक आणि नागकेसरही फुललेले दिसून येत आहेत. ॥७८॥
पद्मकाश्चोपशोभंते नीलाशोकाश्च पुष्पिताः ।
लोध्राश्च गिरिपृष्ठेषु सिंहकेसरपिञ्जराः ॥ ७९ ॥
पर्वताच्या पृष्ठभागावर पद्मक आणि फुललेले नील अशोकही शोभून दिसत आहेत. तेथे सिंहाच्या आयाळी प्रमाणे पिंगट वर्णाचे लोध्र सुशोभित झाले आहेत. ॥७९॥
अङ्‌कोलाश्च कुरण्टाश्च पूर्णकाः पारिभद्रकाः ।
चूताः पाटलयश्चैव कोविदाराश्च पुष्पिताः ॥ ८० ॥
मुचुलिंदार्जुनाश्चैव दृश्यंते गिरिसानुषु ।
अङ्‌कोळ, कुरंट, चूर्णक (सेमल), पारिभद्रक (कडुलिंब), आंबा, पाटली, कोविदार, मुचुकुंद (नारंग) आणि अर्जुन नामक वृक्षही पर्वत शिखरांवर फुलांनी लगडलेले दिसून येत आहेत. ॥८० १/२॥
केतकोद्दालकाश्चैव शिरीषाः शिंशुपा धवाः ॥ ८१ ॥
शाल्मल्यः किंशुकाश्चैव रक्ताः कुरवकास्तथा ।
तिनिशा नक्तमालाश्च चंदनाः स्यंदनास्तथा ॥ ८२ ॥
हिंतालास्तिलकास्चैव नागवृक्षास्च पुष्पिताः ।
केतकी, उद्दालक, शिरिष, शीशवी, धव, सेमल, पलाश, लाल कुरबक, तिनिश, नक्तमाल, चंदन, स्यंदन, हिन्ताल, तिलक तसेच नागकेसराची झाडे हीफुलांनी बहरलेली दिसून येत आहेत. ॥८१-८२ १/२॥
पुष्पितान् पुष्पिताग्राभिर्लताभिः परिवेष्टितान् ॥ ८३ ॥
द्रुमान् पश्येह सौमित्रे पंपाया रुचिरान् बहून् ।
सौमित्रा ! ज्यांचे अग्रभाग फुलांनी बहरलेले आहेत त्या लतावल्लरींनी वेढलेले हे पंपाचे मनोहर आणि बहुसंख्य वृक्ष तर पहा. ते सर्वच्या सर्व येथे फुलांच्या भारांनी लगडलेले आहेत. ॥८३ १/२॥
वातविक्षिप्तविटपान् यथासन्नान् द्रुमानिमान् ॥ ८४ ॥
लताः समनुवर्तंते मत्ता इव वरस्त्रियः ।
वार्‍याच्या झुळकांमुळे ज्यांच्या फांद्या हलत आहेत ते हे वृक्ष वाकून इतके जवळ येत आहेत की हातांनी त्यांच्या फांद्यांना स्पर्श केला जाऊ शकेल. सुंदर लता मदमत्त सुंदर स्त्रियांप्रमाणे यांचे अनुसरण करत आहेत. ॥८४ १/२॥
पादपात्पादपं गच्छन् शैलाच्छैलं वनाद् वनम् ॥ ८५ ॥
वाति नैकरसास्वादः सम्मोदित इवानिलः ।
एका वृक्षाकडून दुसर्‍या वृक्षाकडे. एका पर्वताकडून दुसर्‍या पर्वताकडे आणि एका वनांतून दुसर्‍या वनात जाणारा वायु अनेक रसांच्या आस्वादाने आनंदित झाल्यासारखा वहात आहे.॥८५ १/२॥
केचित्पर्याप्तकुसुमाः पादपा मधुगंधिनः ॥ ८६ ॥
केचिन्मुकुलसंवीताः श्यामवर्णा इवाबभुः ।
काही वृक्ष प्रचुर पुष्पांनी बहरलेले आहेत आणि मधु तसेच सुगंधाने संपन्न आहेत. काही मुकुलांनी आवेष्टित होऊन श्यामवर्णाचे असल्याप्रमाणे प्रतीत होत आहेत. ॥८६ १/२॥
इदं मृष्टमिदं स्वादु प्रफुल्लमिदमित्यपि ॥ ८७ ॥
रागमत्तो मधुकरः कुसुमेष्ववलीयते ।
हा भ्रमर (अनु)रागात रंगलेला आहे आणि ’हे मघुर आहे’, ’हे स्वादिष्ट आहे’ तसेच ’हे अधिक फुललेले आहे’ इत्यादि विचार करीत तो फुलांमध्येच लीन होऊन राहिला आहे. ॥८७ १/२॥
निलीय पुनरुत्पत्य सहसान्यत्र गच्छति ।
मधुलुब्धो मधुकरः पंपातीरद्रुमेष्वसौ ॥ ८८ ॥
तो पुष्पांमध्ये लपतो आहे आणि नंतर वर उडतो आहे आणि एकाएकी दुसरीकडे निघून जात आहे. या प्रकारे मधुचा लोभी भ्रमर पंपा तीरवर्ती वृक्षाच्यांवर विचरत आहे. ॥८८॥
इयं कुसुमसङ्‌घातैरुपस्तीर्णा सुखाकृता ।
स्वयं निपतितैर्भूमिः शयनप्रस्तरैरिव ॥ ८९ ॥
आपोआप गळून पडलेल्या पुष्पसमूहांनी आच्छादित झालेली ही भूमि अशी सुखद झाली आहे की जणु हिच्यावर शयन करण्यासाठी मुलायम बिछानेच अंथरले गेले आहेत. ॥८९॥
विविधा विविधैः पुष्पैस्तैरेव नगसानुषु ।
विकीर्णैः पीतरक्ता हि सौमित्रे प्रस्तराः कृताः ॥ ९० ॥
सौमित्रा ! पर्वताच्या शिखरांवर ज्या नाना प्रकारच्या विशाल शिला आहेत, त्यांच्यावर गळून पडलेल्या नाना प्रकारच्या फुलांनी त्यांना लाल पिवळ्या रंगाच्या शय्यांप्रमाणे बनवून टाकले आहे. ॥९०॥
हिमांते पश्य सौमित्रे वृक्षाणां पुष्पसंभवम् ।
पुष्पमासे हि तरवः संघर्षादिव पुष्पिताः ॥ ९१ ॥
सौमित्रा ! वसंत ऋतुमध्ये वृक्षांच्या फुलांचे हे वैभव तर पहा ! या चैत्र मासामध्ये हे वृक्ष जणु परस्परात चढाओढ लावून फुललेले आहेत. ॥९१॥
आह्वयंत इवान्योन्यं नगाः षट्पदनादिताः ।
कुसुमोत्तंसविटपाः शोभंते बहु लक्ष्मण ॥ ९२ ॥
लक्ष्मणा ! वृक्ष आपल्या वरील बाजूच्या फांद्यांवर फुलांचे मुकुट धारण करून अत्यंत शोभा प्राप्त करीत आहेत. तसेच ते भ्रमरांच्या गुंजारवाने अशा प्रकारे कोलाहलपूर्ण झाले आहेत की जणु एक- दुसर्‍याला आव्हान करीत आहेत. ॥९२॥
एष कारण्डवः पक्षी विगाह्य सलिलं शुभम् ।
रमते कांतया सार्धं काममुद्दीपयन्निव ॥ ९३ ॥
हा कारण्डव पक्षी पंपाच्या स्वच्छ जलात प्रवेश करून आपल्या प्रियतमे बरोबर रमण करीत जणु कामाचे उद्दीपन करीत आहे. ॥९३॥
मंदाकिन्यास्तु यदिदं रूपमेवं मनोहरम् ।
स्थाने जगति विख्याता गुणास्तस्या मनोरमाः ॥ ९४ ॥
मंदाकिनी समान प्रतीत होणार्‍या या पंपेचे जर असे मनोरम रूप आहे तर संसारात तिचे जे मनोरम गुण विख्यात आहेत ते उचितच आहे. ॥९४॥
यदि दृश्येत सा साध्वी यदि चेह वसेमहि ।
स्पृहयेयं न शक्राय नायोध्यायै रघूत्तम ॥ ९५ ॥
रघूत्तम लक्ष्मणा ! जर साध्वी सीता दिसेल तर आणि तिच्यासह आपण येथे निवास करू लागलो तर आपल्याला इंद्रलोकांत जाण्याचीही इच्छा होणार नाही अथवा अयोध्येस परत जाण्याचीही इच्छा होणार नाही.॥ ९५॥
न ह्येवं रमणीयेषु शाद्वलेषु तया सह ।
रमतो मे भवेच्चिंता न स्पृहा ऽन्येषु वा भवेत् ॥ ९६ ॥
हिरव्या - हिरव्या गवतानी सुशोभित अशा रमणीय प्रदेशांत सीतेसह सानंद विचरण करण्याचा अवसर मिळाला तर मला ( अयोध्येचे राज्य न मिळाल्याने) काहीही चिंता वाटणार नाही, आणि इतर दिव्य भोगांची अभिलाषा होऊ शकणार नाही. ॥९६॥
अमी हि विविधैः पुष्पैस्तरवो रुचिरच्छदाः ।
कानने ऽस्मिन् विना कांतां चित्तमुन्मादयंति मे ॥ ९७ ॥
या वनांतील नाना प्रकारच्या पल्लवांनी सुशोभित आणि नाना प्रकारच्या फुलांनी उपलक्षित हे वृक्ष सीतेविना माझ्या मनात चिंता उत्पन्न करीत आहेत. ॥९७॥
पश्य शीतजलां चेमां सौमित्रे पुष्करायुताम् ।
चक्रवाकानुचरितां कारण्डवनिषेविताम् ॥ ९८ ॥
प्लवैः क्रौञ्चैश्च संपूर्णां वराहमृगसेविताम् ।
सौमित्रा ! पहा, या पंपेचे जल किती शीतल आहे. यात असंख्य कमळे फुललेली आहेत. चक्रवाक विचरत आहेत आणि कारण्डव निवास करीत आहेत. एवढेच नव्हे तर जलकुक्कुट तसेच क्रौंच भरलेले आहेत आणि मोठ मोठे मृग हिचे सेवन करीत आहेत. ॥९८ १/२॥
अधिकं शोभते पंपा विकूजद्‌भिर्विहङ्‌गमैः ॥ ९९ ॥
दीपयंतीव मे कामं विविधा मुदिता द्विजाः ।
श्यामां चंद्रमुखीं स्मृत्वा प्रियां पद्मनिभेक्षणाम् ॥ १०० ॥
किलबिल करणार्‍या पक्ष्यांनी या पंपेची फारच शोभा होत आहे. आनंदात निमग्न झालेले हे नाना प्रकारचे पक्षी माझ्या सीतेविषयीच्या अनुरागास उद्दीप्त करीत आहेत कारण की यांची बोली ऐकून मला नूतन अवस्था असणार्‍या कमलनयनी चंद्रमुखी प्रियतमा सीतेचे स्मरण होत आहे. ॥९९ -१००॥
पश्य सानुषु चित्रेषु मृगीभिः सहितान् मृगान् ।
मां पुनर्मृगशावाक्ष्या वैदेह्या विरहीकृतम् ।
व्यथयंतीव मे चित्तं सञ्चरंतस्ततस्ततः ॥ १०१ ॥
लक्ष्मणा ! पहा पर्वतांच्या विचित्र शिखरांवर हे हरीण आपल्या हरिणींबरोबर विचरत आहेत आणि मी मृगनयनी सीतेपासून दुरावलो आहे. इकडे तिकडे विचरणारे हे मृग माझ्या चित्ताला व्यथित करीत आहेत. ॥१०१॥
अस्मिन् सानुनि रम्ये हि मत्तद्विजगणायुते ।
पश्येयं यदि तां कांतां ततः स्वस्ति भवेन्मम ॥ १०२ ॥
मत्त पक्ष्यांनी भरलेल्या या पर्वताच्या रमणीय शिखरावर जर प्राणवल्लभा सीतेचे दर्शन मला मिळू शकले तरच माझे कल्याण होईल. ॥१०२॥
जीवेयं खलु सौमित्रे मया सह सुमध्यमा ।
सेवते यदि वैदेही पंपायाः पवनं सुखम् ॥ १०३ ॥
सौमित्र ! जर सुमध्यमा सीता माझ्या बरोबर राहून या पंपा सरोवराच्या तटावर सुखद समीराचे सेवन करू शकली तर मी निश्चितच जिवंत राहू शकतो. ॥१०३॥
पद्मसौगंधिकवहं शिवं शोकविनाशनम् ।
धन्या लक्ष्मण सेवंते पंपोपवनमारुतम् ॥ १०४ ॥
लक्ष्मणा ! जे लोक आपल्या प्रियतमे बरोबर राहून पद्म आणि सौगंधिक कमळांचा सुगंध घेऊन वहाणार्‍या शीतल, मंद आणि शोकाच्या विनाश करणार्‍या वायुचे सेवन करतात, ते धन्य आहेत. ॥१०४॥
श्यामा पद्मपलाशाक्षी प्रिया विरहिता मया ।
कथं धारयति प्राणान् विवशा जनकात्मजा ॥ १०५ ॥
हाय ! ती नवतरुण अवस्था असणारी कमललोचना जनकनंदिनी प्रिया सीता माझा वियोग होऊन विवश दशेत आपल्या प्राणांना कसे धारण करीत असेल ? ॥१०५॥
किन्नु वक्ष्यामि राजानं धर्मज्ञं सत्यवादिनम् ।
सीताया जनकं पृष्टः कुशलं जनसंसदि ॥ १०६ ॥
लक्ष्मणा ! धर्म जाणणारे सत्यवादी राजा जनक ज्यावेळी जनसमुदायात बसून मला सीतेचा कुशल समाचार विचारतील तेव्हा मी त्यांना काय उत्तर देऊ ? ॥१०६॥
या मामनुगता मंदं पित्रा प्रव्राजितं वनम् ।
सीता सत्पथमास्थाय क्वनु सा वर्तते प्रिया ॥ १०७ ॥
हाय ! पित्याच्या द्वारा वनात धाडले गेल्यावर जी धर्माचा आश्रय घेऊन माझ्या मागोमाग येथे निघून आली होती ती माझी प्रिया या समयी कोठे आहे ? ॥१०७॥
तया विहीनः कृपणः कथं लक्ष्मण धारये ।
या मामनुगता राज्याद्‌भ्रष्टं विगतचेतसम् ॥ १०८ ॥
लक्ष्मणा ! जिने राज्यापासून वञ्चित आणि हताश झाल्यावरही माझी साथ सोडली नाही - माझेच अनुसरण केले, तिच्याशिवाय अत्यंत दीन होऊन मी कसे जीवन धारण करू शकेन ? ॥१०८॥
तच्चार्वञ्चितपक्ष्माक्षं सुगंधि शुभमव्रणम् ।
अपश्यतो मुखं तस्याः सीदतीव मनो मम ॥ १०९ ॥
जी कमलदलासमान सुंदर, मनोहर आणि प्रशंसनीय नेत्रांनी सुशोभित आहे, जिच्यामधून मधुर मधुर सुगंध निघत राहातो, जी निर्मल आणि व्रणरहित आहे, अशा जनककिशोरीचे ते दर्शनीय मुख नसल्याने माझी शुद्धि- बुद्धि नष्ट होत आहे. ॥१०९॥
स्मितहास्यांतरयुतं गुणवन्मधुरं हितम् ।
वैदेह्या वाक्यमतुलं कदा श्रोष्यामि लक्ष्मण ॥ ११० ॥
लक्ष्मणा ! वैदेहीच्या द्वारा कधी हसून कधी स्मित करून सांगितल्या जाणार्‍या त्या मधुर हितकारक आणि लाभदायक गोष्टी मला आता कधी ऐकायला मिळतील ? ॥११०॥
प्राप्य दुःखं वने श्यामा सा मां मन्मथकर्शितम् ।
नष्टदुःखेव हृष्टेव साध्वी साध्वभ्यभाषत ॥ १११ ॥
सोळा वर्षाचे वय असणारी साध्वी सीता जरी वनात येऊन कष्ट सहन करीत होती तथापि जेव्हा मला अनंग वेदनेने अथवा मानसिक कष्टाने पीडित पहात असे तेव्हा जणु तिचे स्वतःचे सर्व दुःख नष्ट झालेले आहे या प्रकारे प्रसन्न झाल्यासारखी होऊन माझी पीडा दूर करण्यासाठी चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत असे. ॥१११॥
किन्नु वक्ष्यामि कौसल्यामयोध्यायां नृपात्मज ।
क्व सा स्नुषेति पृच्छंतीं कथं चातिमनस्विनीम् ॥ ११२ ॥
राजकुमारा ! अयोध्येत गेल्यावर ज्यावेळी मनस्विनी माता कौसल्या विचारेल की ’ माझी सून कोठे आहे ?’ तेव्हा मी तिला काय उत्तर देऊ ? ॥११२॥
गच्छ लक्ष्मण पश्य त्वं भरतं भ्रातृवत्सलम् ।
नह्यहं जीवितुं शक्तस्तामृते जनकात्मजाम् ॥ ११३ ॥
इति रामं महात्मानं विलपंतमनाथवत् ।
उवाच लक्ष्मणो भ्राता वचनं युक्तमव्ययम् ॥ ११४ ॥
लक्ष्मणा ! तू जा आणि भ्रातृवत्सल भरताला भेट. मी तर जनकनंदिनी सीतेशिवाय जिवंत राहू शकत नाही. या प्रकारे महात्मा श्रीरामांना अनाथाप्रमाणे विलाप करतांना पाहून बंधु लक्ष्मणांनी युक्तियुक्त आणि निर्दोष वाणी मध्ये म्हटले- ॥११३-११४॥
संस्तंभ राम भद्रं ते मा शुचः पुरुषोत्तम ।
नेदृशानां मतिर्मंदा भवत्यकलुषात्मनाम् ॥ ११५ ॥
"पुरुषोत्तम श्रीरामा ! आपले कल्याण होवो ! आपण स्वतःला संभाळावे. शोक करू नये. आपल्या सारख्या पुण्यात्मा पुरुषांची बुद्धि उत्साहशून्य होत नाही. ॥११५॥
स्मृत्वा वियोगजं दुःखं त्यज स्नेहं प्रिये जने ।
अतिस्नेहपरिष्वंगाद्वर्तिरार्द्रापि दह्यते ॥ ११६ ॥
"स्वजनांच्या अवश्यंभावी वियोगाचे दुःख सर्वांनाच सहन करावे लागते या गोष्टीचे स्मरण करून आपल्या प्रिय जनांच्या प्रति अधिक स्नेहाचा (आसक्तिचा) त्याग करावा; कारण की जल आदिनी भिजलेली वातही अधिक स्नेहात (तेलात) बुडविली गेली कि जळू लागते. ॥११६॥
यदि गच्छति पातालं ततो ह्यधिकमेव वा ।
सर्वथा रावणस्तावन्न भविष्यति राघव ॥ ११७ ॥
"तात राघव ! जरी रावण पाताळात अथवा त्याहूनही अधिक दूर निघून गेला तरीही तो आता कशाही प्रकारे जिवंत राहू शकत नाही. ॥११७॥
प्रवृत्तिर्लभ्यतां तावत्तस्य पापस्य रक्षसः ।
ततो हास्यति वा सीतां निधनं वा गमिष्यति ॥ ११८ ॥
"प्रथम त्या पापी राक्षसाचा पत्ता लावावा. नंतर एक तर तो सीतेस परत करेल नाहीतर आपले प्राण गमावून बसेल. ॥११८॥
यदि यात्यदितेर्गर्भं रावणः सह सीतया ।
तत्राप्येनं हनिष्यामि न चेद्धास्यति मैथिलीम् ॥ ११९ ॥
"रावण जर सीतेला बरोबर घेऊन दितिच्या गर्भात जाऊन लपला तरीही जर मैथिलीला परत देणार नाही तर मी तेथेही त्यास मारून टाकीन. ॥११९॥
स्वास्थ्यं भद्रं भजस्वार्य त्यज्यतां कृपणा मतिः ।
अर्थो हि नष्टकार्यार्थैर्नायत्‍नेनाधिगम्यते ॥ १२० ॥
"म्हणून आर्य ! आपण कल्याणकारी धैर्‍यास आपलेसे करावे. तो दीनतापूर्ण विचार सोडून द्यावा. ज्यांचे प्रयत्‍न आणि धन नष्ट झालेले असेल ते पुरुष जर उत्साहपूर्वक उद्योग करणार नाहीत तर त्यांना त्या अभिष्ट अर्थाची प्राप्ती होऊ शकत नाही. ॥१२०॥
उत्साहो बलवानार्य नास्त्युत्साहात्परं बलम् ।
सोत्साहस्यास्ति लोकेऽस्मिन् न किञ्चिदपि दुर्लभम् ॥ १२१ ॥
"बंधु ! उत्साहच बलवान् असतो. उत्साहाहून अधिक श्रेष्ठ कुठलेही बळ नाही आहे. उत्साही पुरुषासाठी संसारात कुठलीही वस्तु दुर्लभ नाही. ॥१२१॥
उत्साहवंतः पुरुषा नावसीदंति कर्मसु ।
उत्साहमात्रमाश्रित्य सीतां प्रति लभेमहि ॥ १२२ ॥
"ज्यांच्या हृदयात उत्साह असतो असे पुरुष कठीणात कठीण कार्य उपस्थित झाल्यावरही हिम्मत हरत नाहीत. (धैर्य सोडत नाहीत.) आपण केवळ उत्साहाचा आश्रय घेऊनच जानकीला प्राप्त करू शकतो. ॥१२२॥
त्यज्यतां कामवृत्तत्वं शोकं सन्न्यस्य पृष्ठतः ।
महात्मानं कृतात्मानमात्मानं नावबुद्ध्यसे ॥ १२३ ॥
"शोकास मागे सारून कामी पुरुषासारख्या व्यवहाराचा त्याग करावा. आपण महात्मा आणि कृतात्मा (पवित्र अंतःकरणाचे) आहात; परंतु या समयी आपण स्वतःच विसरून गेला आहात- आपल्या स्वरूपाचे स्मरण करीत नाही आहात." ॥१२३॥
एवं संबोधितस्तत्र शोकोपहतचेतनः ।
न्यस्य शोकं च मोहं च ततो धैर्यमुपागमत् ॥ १२४ ॥
लक्ष्मणांनी या प्रकारे समजाविल्यावर शोकाने संतप्तचित्त झालेल्या श्रीरामांनी शोक आणि मोहाचा परित्याग करून धैर्य धारण केले. ॥१२४॥
सो ऽभ्यतिक्रामदव्यग्रस्तामचिंत्यपराक्रमः ।
रामः पंपां सुरुचिरां रम्यां पारिप्लवद्रुमाम् ॥ १२५ ॥
त्यानंतर व्यग्रतारहित (शान्तस्वरूप) अचिंत्य पराक्रमी श्रीराम ज्याच्या तटवर्ती असणारे वृक्ष वायुच्या झुळुकीने झोके घेऊन डोलत होते त्या परम सुंदर रमणीय पंपा सरोवरास ओलांडून पुढे निघाले. ॥१२५॥
निरीक्षमाणः सहसा महात्मा
सर्वं वनं निर्झरकंदरांश्च ।
उद्विग्नचेताः सह लक्ष्मणेन
विचार्य दुःखोपहतः प्रतस्थे ॥ १२६ ॥
सीतेच्या स्मरणाने ज्यांचे चित्त उद्विग्न झाले होते आणि दुःखात बुडून गेले होते, ते महात्मा श्रीराम लक्ष्मणांनी सांगितलेल्या गोष्टींचा विचार करून एकाएकी सावध झाले आणि निर्झर तसेच कंदरांसहित त्या संपूर्ण वनाचे निरीक्षण करीत तेथून पुढे प्रस्थित झाले. ॥१२६॥
तं मत्तमातङ्‌गविलासगामी
गच्छंतमव्यग्रमना महात्मा ।
स लक्ष्मणो राघवमप्रमत्तो
ररक्ष धर्मेण बलेन चैव ॥ १२७ ॥
मदमस्त हत्तीप्रमाणे विलासपूर्ण गतीने चालणारे शान्तचित्त महात्मा लक्ष्मण पुढे पुढे जात असणार्‍या राघवांचे त्यांच्या अनुकूल कार्य करीत धर्म आणि बलाच्या द्वारे रक्षण करू लागले. ॥१२७॥
तावृश्यमूकस्य समीपचारी
चरन् ददर्शाद्‌भुतदर्शनीयौ ।
शाखामृगाणामधिपस्तरस्वी
वितत्रसे नैव चिचेष्ट किञ्चित् ॥ १२८ ॥
ऋष्यमूक पर्वताच्या समीप विचरणारे बलवान् वानरराज सुग्रीव पंपाच्या निकट हिंडत होते. त्या समयीच त्यांनी त्या अद्‌भुत दर्शनीय वीर श्रीराम आणि लक्ष्मणांना पाहिले. पहाताच त्यांच्या मनात हे भय उत्पन्न झाले की यांना माझा शत्रू वाली याने तर धाडले नाही ना ? मग तर ते इतके घाबरले की खाणे- पिणे इत्यादि गोष्टीही ते करू शकले नाहीत. ॥१२८॥
स तौ महात्मा गजमंदगामी
शाखामृगस्तत्र चिरं चरंतौ ।
दृष्ट्‍वा विषादं परमं जगाम
चिंतापरीतो भयभारमग्नः ॥ १२९ ॥
हत्तीप्रमाणे मंदगतीने चालणार्‍या महामना वानरराज सुग्रीवांनी तेथे विचरत असतांना एकत्र पुढे येत असलेल्या त्या दोघा भावांना पाहिले आणि ते चिंतित झाले. भयाच्या महान् भाराने त्यांचा उत्साह नष्टप्राय झाला. ते फार मोठ्या दुःखात पडले. ॥१२९॥
तमाश्रमं पुण्यसुखं शरण्यं
सदैव शाखामृगसेवितांतम् ।
त्रस्ताश्च दृष्ट्‍वा हरयोभिजग्मुः
महौजसौ राघवलक्ष्मणौ तौ ॥ १३० ॥
मतङ्‌ग मुनिंचा तो आश्रम परमपवित्र आणि सुखदायक होता. मुनिंच्या शापामुळे त्यात वालीचा प्रवेश होणे कठीण होते म्हणून तो दुसर्‍या वानरांचा आश्रय बनला होता. त्या आश्रमात अथवा वनात सदाच अनेकानेक शाखामृग निवास करीत होते. त्या दिवशी त्या महातेजस्वी श्रीराम आणि लक्ष्मणास पाहून इतर वानरही भयभीत होऊन आश्रमाच्या आत निघून गेले. ॥१३०॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे प्रथमः सर्गः ॥ १ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा पहिला सर्ग पूरा झाला. ॥१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP