[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
॥ द्विचत्वारिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
राज्ञो भुवि विपतनं श्रीरामस्य कृते विलपनं च, कैकेयीकर्तृकनिजाङ्‌गस्पर्शस्य राज्ञा निषेधः कैकेय्याः परित्यागश्च, कौसल्यायाः सेवकानां च सहकारेण तस्य कौसल्याभवने गमनं तत्रापि श्रीरामस्य कृते तेन दुःखस्यैवानुभवकरणम् - दशरथांचे पृथ्वीवर पडणे, श्रीरामासाठी विलाप करणे, कैकेयीला आपल्या जवळ येण्यास मनाई करणे आणि तिचा त्याग करणे, कौसल्या आणि सेवकांच्या सहाय्याने त्यांचे कौसल्येच्या भवनात जाणे आणि तेथे ही श्रीरामासाठी दुःखाचा अनुभव करणे -
यावत् तु निर्यतस्तस्य रजोरूपमदृश्यत ।
नैवेक्ष्वाकुवरस्तावत् संजहारात्मचक्षुषी ॥ १ ॥
वनाकडे जाणार्‍या श्रीरामांच्या रथाची धूळ जो पर्यंत दृष्टीस पडत होती तो पर्यंत इक्ष्वाकुवंशाचे स्वामी राजा दशरथ यांनी आपली दृष्टी तेथून हटविली नाही. ॥१॥
यावद् राजा प्रियं पुत्रं पश्यत्यत्यन्तधार्मिकम् ।
तावद् व्यवर्धतेवास्य धरण्यां पुत्रदर्शने ॥ २ ॥
ते महाराज आपल्या अत्यंत धार्मिक प्रिय पुत्रास जो पर्यंत बघत राहिले होते तो पर्यंत पुत्राला पहाण्यासाठी त्यांचे शरीर जणु पृथ्वीवर स्थिर राहिले होते- ते पाय उंचावून उंचावून त्यांच्याकडे पहात राहिले होते. ॥२॥
न पश्यति रजोऽप्यस्य यदा रामस्य भूमिप: ।
तदार्तश्च निषण्णश्च पपात धरणीतले ॥ ३ ॥
ज्यावेळी राजांना रामाच्या रथाची धूळही जेव्हा दिसेनाशी झाली तेव्हा ते अत्यंत आर्त आणि विषादग्रस्त होऊन पृथ्वीवर कोसळले. ॥३॥
तस्य दक्षिणमन्वागात् कौसल्या बाहुमङ्‌गना ।
परं चास्यान्वगात् पार्श्वं कैकेयी सा सुमध्यमा ॥ ४ ॥
त्या समयी त्यांना आधार देण्यासाठी त्यांची धर्मपत्‍नी कौसल्यादेवी त्यांच्या उजव्या बाजूस आली आणि सुंदरी कैकेयी त्यांच्या वाम भागी जाऊन पोहोंचली. ॥४॥
तां नयेन च सम्पन्नो धर्मेण विनयेन च ।
उवाच राजा कैकेयीं समीक्ष्य व्यथितेन्द्रिय: ॥ ५ ॥
कैकेयीला पहाताच नय, विनय आणि धर्म यांनी संपन्न राजा दशरथांची समस्त इंद्रिये व्यथित झाली. ते म्हणाले - ॥५॥
कैकेयि मामकाङ्‌गानि मा स्प्राक्षीः पापनिश्चये ।
न हि त्वां द्रष्टुमिच्छामि न भार्या न च बान्धवी ॥ ६ ॥
'पापपूर्ण विचार करणार्‍या कैकेयी ! तू माझ्या अंगाला स्पर्श करू नको. मी तुला पाहू इच्छित नाही. तू माझी भार्या नाहीस आणि कुणी नातेवाईकही नाहीस. ॥६॥
ये च त्वामनुजीवन्ति नाहं तेषां न ते मम ।
केवलार्थपरां हि त्वां त्यक्तधर्मां त्यजाम्यहम् ॥ ७ ॥
'जे तुझा आश्रय घेऊन जीवननिर्वाह करतात त्यांचा मी स्वामी नाही, आणि ते माझे परिजनही नाहीत. तू केवळ धनात आसक्त होऊन धर्माचा त्याग केला आहेस, म्हणून मी तुझा परित्याग करीत आहे. ॥७॥
अगृह्णां यच्च ते पाणिमग्निं पर्यणयं च यत् ।
अनुजानामि तत् सर्वमस्मिँल्लोके परत्र च ॥ ८ ॥
'मी जे तुझे पाणिग्रहण केले आहे आणि तुला बरोबर घेऊन अग्निची परिक्रमा केली आहे, तुझ्या बरोबरच्या त्या संबंधाचा लोक आणि परलोकासाठीही मी त्याग करीत आहे. ॥८॥
भरतश्चेत् प्रतीत: स्याद् राज्यं प्राप्यैदमव्ययम् ।
यन्मे स दद्याद् पित्रर्थं मा मां तद्दत्तमागमत् ॥ ९ ॥
'तुझा पुत्र भरत ही जर या विघ्न-बाधा रहित राज्याची प्राप्ती झाल्याने प्रसन्न होईल तर तो माझ्यासाठी श्राद्धात जो काही पिण्ड अथवा जल आदिचे दान करेल ते मला प्राप्त होऊ नये.' ॥९॥
अथ रेणुसमुद्‌ध्वस्तं तमुत्थाप्य नराधिपम् ।
न्यवर्तत तदा देवी कौसल्या शोककर्शिता ॥ १० ॥
त्यानंतर शोकाने कातर झालेली कौसल्यादेवी त्यासमयी जमिनीवर कोसळल्यामुळे धूळीने व्याप्त झालेल्या महाराजांना उठवून त्यांच्यासह राजभवनाकडे परत आली. ॥१०॥
हत्वेव ब्राह्मणं कामात् स्पृष्ट्‍वाग्निमिव पाणिना ।
अन्वतप्यत धर्मात्मा पुत्रं सञ्चिन्त्य राघवम् ॥ ११ ॥
जसे एखाद्याने जाणून-बुजून स्वेच्छापूर्वक ब्राह्मणाची ह्त्या करावी, अथवा हाताने प्रज्वलित अग्निला स्पर्श करावा आणि असे करून संतप्त व्हावे, त्या प्रकारेच धर्मात्मा राजा दशरथ स्वतःच दिलेल्या वरदानाच्या योगे वनात गेलेल्या राघवाचे चिंतन करून अनुतप्त होत होते. ॥११॥
निवृत्यैव निवृत्यैव सीदतो रथवर्त्मसु ।
राज्ञो नातिबभौ रूपं ग्रस्तस्यांशुमतो यथा ॥ १२ ॥
राजा दशरथ कष्टी होऊन वारंवार मागे वळून रथाच्या मार्गाकडे दृष्टी टाकत होते. त्या समयी त्यांचे रूप राहुग्रस्त सूर्याप्रमाणे मलीन दिसन होते. ॥१२॥
विललाप च दु:खार्तः प्रियं पुत्रमनुस्मरन् ।
नगरान्तमनुप्राप्तं बुद्ध्वा पुत्रमथाब्रवीत् ॥ १३ ॥
ते आपल्या प्रिय पुत्राचे वारंवार स्मरण करून दुःखाने आतुर होऊन विलाप करू लागले. ते पुत्राला नगराच्या सीमेबाहेर पोहोंचलेला समजून याप्रकारे बोलू लागले- ॥१३॥
वाहनानां च मुख्यानां वहतां तं ममात्मजम् ।
पदानि पथि दृश्यन्ते स महात्मा न दृश्यते ॥ १४ ॥
'हाय ! माझ्या पुत्राला वनाकडे घेऊन जाणार्‍या श्रेष्ठ वाहनांची (घोड्यांची) पदचिन्हे तर मार्गावर दिसून येत आहेत, परंतु त्या श्रेष्ठ महात्मा श्रीरामाचे दर्शन (मात्र) होत नाही आहे. ॥१४॥
य: सुखेनोपधानेषु शेते चन्दनरूषित: ।
वीज्यमानो महार्हाभि: स्त्रीभिर्मम सुतोत्तम: ॥ १५ ॥

स नूनं क्वचिदेवाद्य वृक्षमूलमुपाश्रित: ।
काष्ठं वा यदि वाश्मानमुपधाय शयिष्यते ॥ १६ ॥
जे माझे श्रेष्ठ पुत्र श्रीराम चंदनाने चर्चित होऊन तक्क्यांचा आधार घेऊन उत्तम शय्यांवर सुखाने झोपत होते आणि उत्तम अलंकारांनी विभूषित सुंदर स्त्रिया ज्यांना पंख्याने वारा घालीत असत ते निश्चितच एखाद्या वृक्षाच्या मूळाचा आधार घेऊन अथवा एखाद्या लाकडास अथवा दगडास मस्तकाखाली ठेवून भूमीवरच शयन करतील. ॥१५-१६॥
उत्थास्यति च मेदिन्या: कृपण: पांसुकुण्ठित: ।
विनिःश्वसन् प्रस्रवणात् करेणूनामिवर्षभ: ॥ १७ ॥
'नंतर अंगांना धूळ माखलेल्या दीनाप्रमाणे दीर्घश्वास घेऊन जेव्हा ते शयन- भूमीवरून उठतील त्यावेळी एखाद्या निर्झराजवळून गजराज उठावा तसे भासतील. ॥१७॥
द्रक्ष्यन्ति नूनं पुरुषा दीर्घबाहुं वनेचरा: ।
राममुत्थाय गच्छन्तं लोकनाथमनाथवत् ॥ १८ ॥
'निश्चितच वनात राहणारी माणसे लोकनाथ महाबाहु श्रीरामांना तेथून अनाथाप्रमाणे उठून जातांना पहातील. ॥१८॥
सा नूनं जनकस्येष्टा सुता सुखसदोचिता ।
कण्टकाक्रमणाक्लान्ता वनमद्य गमिष्यति ॥ १९ ॥
'जी सदा सुख भोगण्यासच योग्य आहे ती जनकांची प्रिय कन्या सीता आज अवश्यच कांट्यांवर पाय पडल्यामुळे व्यथीत होत होत वनात जाईल. ॥१९॥
अनभिज्ञा वनानां सा नूनं भयमुपैष्यति ।
श्वपदानर्दितं श्रुत्वा गम्भीरं रोमहर्षणम् ॥ २० ॥
'ती वनांतील कष्टांपासून अनभिज्ञ आहे. तेथे व्याघ्र आदिं हिंसक जंतुंच्या गंभीर आणि रोमांचकारी गर्जना ऐकून निश्चितच ती भयभीत होऊन जाईल. ॥२०॥
सकामा भव कैकेयि विधवा राज्यमावस ।
न हि तं पुरुषव्याघ्रं विना जीवितुमुत्सहे ॥ २१ ॥
'अगे कैकेयी ! तू आपली कामना सफल करून घे आणि विधवा होऊन राज्य भोग. मी पुरुषसिंह रामांशिवाय जीवित राहू शकत नाही.' ॥२१॥
इत्येवं विलपन् राजा जनौघेनाभिसंवृत: ।
अपस्नात इवारिष्टं प्रविवेश गृहोत्तमम् ॥ २२ ॥
याप्रकारे विलाप करीत राजा दशरथांनी स्मशानांतून न्हाऊन आलेल्या पुरूषाप्रमाणे, मनुष्यांच्या फार मोठ्या गर्दीने घेरलेले असतांही शोकपूर्ण अवस्थेत आपल्या उत्तम भवनात प्रवेश केला. ॥२२॥
शून्यचत्वरवेश्मान्तां संवृतापणवेदिकाम् ।
क्लान्तदुर्बलदु:खार्तां नात्याकीर्णमहापथाम् ॥ २३ ॥

तामवेक्ष्य पुरीं सर्वां राममेवानुचिन्तयन् ।
विलपन् प्राविशद् राजा गृहं सूर्य इवाम्बुदम् ॥ २४ ॥
त्यांनी पाहिले की अयोध्यापुरीतील प्रत्येक घराच्या बाहेरील चबुतरा आणि आतील भागही शून्यवत दिसत आहे. (कारण त्या घरांतील सर्व लोक श्रीरामांच्या पाठोपाठ निघून गेले होते.) बाजार वगैरे बंद आहेत. जे लोक नगरात आहेत तेही अत्यंत क्लांत, दुर्बल आणि दुःखाने आतुर होत आहेत तसेच मोठमोठ्या रस्त्यांत जास्त माणसेही येता-जातांना दिसत नव्हती. सार्‍या नगराची ही अवस्था पाहून श्रीरामांचीच चिंता करीत आणि त्यांच्यासाठी विलाप करत, सूर्य मेघांच्या समुदायात लपून जातो त्याप्रमाणे महाराज दशरथ आपल्या महालात शिरले. ॥२३-२४॥
महाह्रदमिवाक्षोभ्यं सुपर्णेन हृतोरगम् ।
रामेण रहितं वेश्म वैदेह्या लक्ष्मणेन च ॥ २५ ॥
श्रीराम, लक्ष्मण आणि वैदेही यांच्या शिवाय ते राजभवन एखाद्या महान अक्षोभ्य जलाशयांतून त्यांतील नागाला गरूड उचलून घेऊन गेल्यावर तो जलाशय जसा दिसावा तसे वाटत होते. ॥२५॥
अथ गद्‌गदशब्दस्तु विलपन् मनुजाधिप: ।
उवाच मृदु मन्दार्थं वचनं दीनमस्वरम् ॥ २६ ॥
त्या समयी विलाप करीत असता दशरथ राजांनी गदगद वाणीमध्ये द्वारपालांना मधुर, अस्पष्ट, दीनतायुक्त आणि अस्वाभाविक स्वरात असे सांगितले- ॥२६॥
कौसल्याया गृहं शीघ्रं राममातुर्नयन्तु माम् ।
नह्यन्यत्र ममाश्वासो हृदयस्य भविष्यति ॥ २७ ॥
'मला लवकरच श्रीराम-माता कौसल्येच्या घरात पोहोंचवा; कारण की माझ्या हृदयाला दुसर्‍या कुठल्याही ठिकाणी शांति मिळू शकणार नाही.' ॥२७॥
इति ब्रुवन्तं राजानमनयन् द्वारदर्शिन: ।
कौसल्याया गृहं तत्र न्यवेस्यत विनीतवत् ॥ २८ ॥
असे सांगणार्‍या दशरथ राजांना द्वारपालांनी अत्यंत विनयाने राणी कौसल्येच्या भवनात पोहोंचविले आणि पलंगावर झोपविले. ॥२८॥
ततस्तस्य प्रविष्टस्य कौसल्याया निवेशनम् ।
अधिरुह्यापि शयनं बभूव लुलितं मन: ॥ २९ ॥
तेथे कौसल्येच्या भवनात प्रवेश करून पलंगावर आरूढ झाल्यावरही राजा दशरथांचे मन चञ्चल आणि मलीनच राहिले. ॥२९॥
पुत्रद्वयविहीनं च स्नुषया च विवर्जितम् ।
अपश्यद् भवनं राजा नष्टचन्द्रमिवाम्बरम् ॥ ३० ॥
दोन्ही पुत्र आणि सून सीता यांच्या शिवाय ते भवन राजांना चंद्ररहित आकाशाप्रमाणे श्रीहीन दिसू लागले. ॥३०॥
तच्च दृष्ट्‍वा महाराजो भुजमुद्यम्य वीर्यवान् ।
उच्चै:स्वरेण प्राक्रोशद्धा राम विजहासि नौ ॥ ३१ ॥

सुखिता बत तं कालं जीविष्यन्ति नरोत्तमा: ।
परिष्वजन्तो ये रामं द्रक्ष्यन्ति पुनरागतम् ॥ ३२ ॥
ते पाहून पराक्रमी महाराजांनी आपला एक हात उंच करून उच्चस्वराने विलाप करीत म्हटले- 'हे रामा ! तू आम्हा दोघांचा माता-पित्यांचा त्याग करीत आहेस. जे नरश्रेष्ठ चौदा वर्षांच्या अवधिपर्यंत जिंवत राहतील आणि अयोध्येत पुन्हा परत आलेल्या रामांना हृदयाशी धरून पाहतील तेच वास्तविक सुखी होतील.' ॥३१- ३२॥
अथ रात्र्यां प्रपन्नायां कालरात्र्यामिवात्मन: ।
अर्धरात्रे दशरथ: कौसल्यामिदमब्रवीत् ॥ ३३ ॥
त्यानंतर आपल्या कालरात्रीप्रमाणे ती रात्र आल्यावर दशरथ राजांनी अर्धी रात्र झाल्यावर कौसल्येला याप्रमाणे म्हटले- ॥३३॥
न त्वां पश्यामि कौसल्ये साधु मां पाणिना स्पृश ।
रामं मेऽनुगता दृष्टिरद्यापि न निवर्त्तते ॥ ३४ ॥
'कौसल्ये ! माझी दृष्टी तर रामाबरोबरच निघून गेली आहे आणि ती अद्याप परत अलेली नाही, म्हणून मी तुला पाहू शकत नाही आहे. एक वेळ आपल्या हाताने माझ्या शरीराला स्पर्श तर कर.' ॥३४॥
तं राममेवानुविचिन्तयन्तं
     समीक्ष्य देवी शयने नरेन्द्रम् ।
उपोपविश्याधिकमार्तरूपा
     विनिश्वसन्तं विललाप कृच्छ्रम् ॥ ३५ ॥
शय्येवर पडलेल्या दशरथ महाराजांना श्रीरामांचेच चिंतन करीत आणि दीर्घ श्वास घेत असलेले पाहून कौसल्यादेवी अत्यंत व्यथित होऊन त्यांच्या जवळ येऊन बसली आणि मोठ्या कष्टाने विलाप करू लागली. ॥३५॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे द्विचत्वारिंशः सर्ग: ॥ ४२ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा बेचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP