श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ सप्तसप्ततितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
महर्षिणागस्त्येन श्रीरामं प्रति स्वर्गिपुरुष कर्तृक शवभक्षणप्रसंगस्य श्रावणम् -
महर्षि अगस्त्यांनी एका स्वर्गीय पुरुषाच्या शवभक्षणाचा प्रसंग ऐकविणे -
पुरा त्रेतायुगे राम बभूव बहुविस्तरम् ।
समन्ताद् योजनशतं विमृगं पक्षिवर्जितम् ॥ १ ॥
(अगस्त्य सांगतात - ) श्रीरामा ! प्राचीनकाळच्या त्रेतायुगातील गोष्ट आहे. एक फारच विस्तृत वन होते. जे चारीबाजूने शंभर योजनपर्यंत पसरलेले होते, परंतु त्या वनात कोणी पशु अथवा पक्षी नव्हता. ॥१॥
तस्मिन् निर्मानुषेऽरण्ये कुर्वाणस्तप उत्तमम् ।
अहमाक्रमितुं सौम्य तदरण्यमुपागमम् ॥ २ ॥
सौम्य ! त्या निर्जन वनात उत्तम तपस्या करण्यासाठी फिरून फिरून उपयुक्त स्थानाचा पत्ता लावण्याच्या निमित्ताने मी तेथे गेलो होतो. ॥२॥
तस्य रूपमरण्यस्य निर्देष्टुं न शशाक ह ।
फलमूलैः सुखास्वादैः बहुरूपैश्च पादपैः ॥ ३ ॥
त्या वनाचे स्वरूप किती सुखदायी होते हे सांगण्यास मी असमर्थ आहे. सुखद स्वादिष्ट फळ-मूळ तसेच अनेक रूप रंगाचे वृक्ष त्याची शोभा वाढवीत होते. ॥३॥
तस्यारण्यस्य मध्ये तु सरो योजनमायतम् ।
हंसकारण्डवाकीर्णं चक्रवाकोपशोभितम् ॥ ४ ॥
त्या वनाच्या मध्यभागी एक सरोवर होते. ज्याची लांबी रूंदी एकेक योजन होती. त्यात हंस आणि कारण्डव आदि जलपक्षी पसरलेले होते आणि चक्रवाकांच्या जोड्‍या त्याची शोभा वाढवीत होत्या. ॥४॥
पद्मोत्पलसमाकीर्णं समतिक्रान्तशैवलम् ।
तद् आश्चर्यमिवात्यर्थं सुखास्वादमनुत्तमम् ॥ ५ ॥
त्यात कमळे आणि उत्पले पसरलेली होती. शेवाळाचे कोठे नावही नव्हते. ते परम उत्तम सरोवर अत्यंत आश्चर्यमय असे भासत होते. त्याचे पाणी पिण्यास अत्यंत सुखद आणि स्वादिष्ट होते. ॥५॥
अरजस्कं तदक्षोभ्यं श्रीमत् पक्षिगणायुतम् ।
तस्मिन् सुरःसमीपे तु महदद्‌भुतमाश्रमम् ॥ ६ ॥

पुराणं पुण्यमत्यर्थं तपस्विजनवर्जितम् ।
त्यात चिखल नव्हता, ते सर्वथा निर्मळ होते. त्याला कुणी पार करू शकत नव्हते. त्याच्या मध्य्भागी सुंदर पक्षी कलरव करीत होते. त्या सरोवराच्या जवळच एक विशाल अद्‍भुत आणि अत्यंत पवित्र जुना आश्रम होता, ज्यात एकही तपस्वी नव्हता. ॥६ १/२॥
तत्राहमवसं रात्रिं नैदाघीं पुरुषर्षभ ॥ ७ ॥

प्रभाते काल्यमुत्थाय सरस्तदुपचक्रमे ।
पुरुषप्रवर ! एका रात्री त्या आश्रमात मी राहिलो आणि प्रातःकाळी सकाळी उठून स्नान आदिसाठी सरोवराच्या तटावर जाऊ लागलो. ॥७ १/२॥
अथापश्यं शवं तत्र सुपुष्टमरजः क्वचित् ॥ ८ ॥

तिष्ठन्तं परया लक्ष्म्या तस्मिंस्तोयाशये नृप ।
त्याच समयी मला तेथे एक शव दिसून आले जे हृष्ट-पुष्ट असूनही अत्यंत निर्मल होते. त्यात कोठेही काहीही मलिनता नव्हती. नरेश्वरा ! ते शव त्या जलाशयाच्या तटावर अत्यंत शोभेने संपन्न होऊन पडलेले होते. ॥८ १/२॥
तमर्थं चिन्तयानोऽहं मुहूर्तं तत्र राघव ॥ ९ ॥

उषितोऽस्मि सरस्तीरे किं न्विदं स्यादिति प्रभो ।
प्रभो ! राघवा ! मी त्या शवाविषयी हा विचार करीत असता की हे काय आहे ? तेथे मुहूर्तपर्यंत त्या तलावाच्या किनार्‍यावर बसून राहिलो. ॥९ १/२॥
अथापश्यं मुहूर्तात् तुन दिव्यमद्‌भुतदर्शनम् ॥ १० ॥

विमानं परमोदारं हंसयुक्तं मनोजवम् ।
अत्यर्थं स्वर्गिणं त विमाने रघुनन्दन ॥ ११ ॥

उपास्तेऽप्सरसां वीर सहस्रं दिव्यभूषणम् ।
मुहूर्तानंतर लगेच मी तेथे एक दिव्य, अद्‍भुत, अत्यंत उत्तम, हंसयुक्त आणि मनासमान वेगवान्‌ विमान उतरतांना पाहिले. रघुनंदना ! त्या विमानावर एक स्वर्गवासी देवता बसलेले होते, जे अत्यंत रूपवान होते. वीरा ! तेथे त्यांच्या सेवेमध्ये हजारो अप्सरा बसलेल्या होत्या, ज्या दिव्य आभूषणांनी विभूषित होत्या. ॥१०-११ १/२॥
गायन्ति काश्चिद् रम्याणि वादयन्ति तथाऽपराः ॥ १२ ॥

मृदंगवीणापणवान् नृत्यन्ति च तथाऽपराः ।
अपराश्चन्द्ररश्म्याभैः हेमदण्डैर्महाधनैः ॥ १३ ॥

दोधूयुर्वदनं तस्य पुण्डरीकनिभेक्षणम् ।
त्यातील काही मनोहर गीत गात होत्या. दुसर्‍या मृदुंग, वीणा आणि पणव आदि वाद्ये वाजवीत होत्या. अन्य बर्‍याचशा अप्सरा नृत्य करीत होत्या तसेच प्रफुल्ल कमलाप्रमाणे नेत्र असणार्‍या अन्य कित्येक अप्सरा सुवर्णमय दण्डाने विभूषित तसेच चंद्रम्याच्या किरणांसमान उज्ज्वल बहुमूल्य चवर्‍या घेऊन त्या स्वर्गवासी देवतेच्या मुखावर वारा घालत होत्या. ॥१२-१३ १/२॥
ततः सिंहासनं त्यक्त्वा मेरुकूटमिवांशुमान् ॥ १४ ॥

पश्यतो मे तदा राम विमानादवरुह्य च ।
तं शवं भक्षयामास स स्वर्गी रघुनन्दन ॥ १५ ॥
रघुनंदना ! श्रीरामा ! त्यानंतर जसे अंशुमाली सूर्य मेरू पर्वताचे शिखर सोडून खाली उतरतात त्याप्रकारे त्या स्वर्गवासी पुरुषाने विमानांतून उतरून मी पहात असताच ते शव भक्षण केले. ॥१४-१५॥
ततो भुक्त्वा यथाकामं मांसं बहु सुपीवरम् ।
अवतीर्य सरः स्वर्गी संस्प्रष्टुमुपचक्रमे ॥ १६ ॥
इच्छानुसार ते सुपुष्ट आणि प्रचुर मांस खाऊन ती स्वर्गीय देवता सरोवरात उतरून हात तोंड धुऊ लागली. ॥१६॥
उपस्पृश्य यथान्यायं स स्वर्गी रघुनन्दन ।
आरोढुमुपचक्राम विमानवरमुत्तमम् ॥ १७ ॥
रघुनंदना ! यथोचित रीतिने चुळा भरून आचमन करून ते स्वर्गवासी पुरुष त्या उत्तम आणि श्रेष्ठ विमानावर चढण्यास उद्यत झाले. ॥१७॥
तमहं देवसंकाशं आरोहन्तमुदीक्ष्य वै ।
अथाहमब्रुवं वाक्यं स्वर्गिणं पुरुषर्षभ ॥ १८ ॥
पुरुषोत्तमा ! त्या देवतुल्य पुरुषास विमानावर चढतांना पाहून मी त्यांना हे वाक्य बोललो - ॥१८॥
को भवान्देवसंकाश आहारश्च विगर्हितः ।
त्वयेदं भुज्यते सौम्य किमर्थं वक्तुमर्हसि ॥ १९ ॥
सौम्य ! देवोपम पुरुषा ! आपण कोण आहात आणि कशासाठी असा घृणित आहार ग्रहण करीत आहात ? हे सांगण्याचे कष्ट घ्या. ॥१९॥
कस्य स्यादीदृशो भाव आहारो देवसम्मतः ।
आश्चर्यं वर्तते सौम्य श्रोतुमिच्छामि तत्त्वतः ।
नाहमौपयिकं मन्ये तव भक्ष्यमिदं शवम् ॥ २० ॥
देवतुल्य तेजस्वी पुरुषा ! असे दिव्य स्वरूप आणि असा घृणित आहार कुणाचा असू शकेल ? सौम्या ! आपल्या ठिकाणी या दोन्ही आश्चर्यजनक गोष्टी आहेत. म्हणून मी याचे यथार्थ रहस्य ऐकू इच्छितो; कारण की मी या शवाला आपल्या योग्य आहार मानत नाही. ॥२०॥
इत्येवमुक्तः स नरेन्द्र नाकी
कौतूहलात् सूनृतया गिरा च ।
श्रुत्वा च वाक्यं मम सर्वमेतत्
सर्वं तथा चाकथयन्ममेति ॥ २१ ॥
नरेश्वर ! जेव्हा मी कौतुहलवश मधुर वाणीमध्ये त्या स्वर्गीय पुरुषाला याप्रकारे विचारले, तेव्हा माझे वाक्य ऐकून त्याने सर्व काही माझ्या समोर सांगितले. ॥२१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे सप्तसप्ततितमः सर्गः ॥ ७७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा सत्त्याहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP