॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय छत्तिसावा ॥
मायावी सीतेचा इंद्रजिताकडून वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥


करोनि मकराक्षाचा घात । विजयी बैसला श्रीरघुनाथ ।
येरीकडे इंद्रजित । क्रोधन्वित तळमळी ॥ १ ॥


निहतं मकराक्षं तं दृष्ट्वा रामेण संयुगे ।
शक्रजित्सुमहाक्रुद्धो विवेश रणसंकटम् ॥१॥

इंद्रजिताला चिंता :

मकराक्ष मारिला महाकपटी । तें देखोनियां दृष्टीं ।
इंद्रजित पडिला रणसंकटीं । त्याची गोष्टी अनुवादे ॥ २ ॥
मारिले भरंवशाचे वीर । जे कां निधडे महाशूर ।
त्यांसी मारिती वानर । पालेखाइर पशुदेही ॥ ३ ॥
मारिला कुंभकर्ण महावीर । देवांतक निरांतक त्रिशिर ।
वधिला अतिकाय दुर्धर । महोदर महापार्श्व ॥ ४ ॥
प्रहस्त पावला रणीं मरण । कुंभ निकुंभ दोघे जण ।
मकराक्षाचा घेतला प्राण । विंधोन बाण श्रीरामें ॥ ५ ॥
भरंवशाचे वीर दारुण । ते ते पावले रणीं मरण ।
आलें राक्षसांचें निधन । काय आपण करावें ॥ ६ ॥
राखावया मकराक्षाची पाठी । मज धाडी दशकंठी ।
ते गोष्टी जाली उफराटी । तोही शेवटीं मारिला ॥ ७ ॥
शिणोन मारावे वानर । श्रीरामतीर्थें ते वनचर ।
अवघे उठती पालेखाइर । अति दुर्धर रणयोद्धे ॥ ८ ॥
मारिल्या राक्षसांच्या कोडी । न दिसती वानरांच्या करवडी ।
हे श्रीरामाची कृपा गाढी । प्राणांतपाडीं । संरक्षी ॥ ९ ॥
रामलक्ष्मण महाशूर । तैसेच निधडे वानर ।
आतुर्बळी हनुमान वीर् । अति दुर्धर सर्वार्थी ॥ १० ॥
त्यासीं न चले आंगवण । काय करावें आपण ।
बळें करूं जातां रण । माझाही प्राण घेतील ॥ ११ ॥
यांसीं न चलें पैं वरदार्थ । रावणपापें वरद व्यर्थ ।
आला राक्षसांसी अंत । रणी रघुनाथ क्षोभला ॥ १२ ॥
परतोनि जातां लंकेआंत । मज कोपले लंकानाथ ।
इंद्रजित चिंताक्रांत । असे चिंतित उपावो ॥ १३ ॥
राम लक्ष्मण हनुमंत । अंगद सुग्रीव जांबवंत ।
अवघियांचा होईल घात । तो कार्यार्थ साधीन ॥ १४ ॥


मेघनादस्तदा दृष्ट्वा भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।
रणायाभ्युद्यंतौ वीरौ जुहुवे पावकं तदा ॥२॥
ततो रथमवस्थाप्य रावणी राक्षसैर्वतः ।
सीतां मायामयीं कृत्वा तस्या वघमरोचयत् ॥३॥
सर्वेंषां मोहनार्थाय बुद्धिं कृत्वा सुदुर्मतिः ।
हंतु सीतां व्यवसितो वानराभिमुखो ययौ ॥४॥

इंद्रजिताची मायिक सीतेच्या वधाची कल्पना :

श्रीराम आणि लक्ष्मण । दोघे उद्यत करावया रण ।
देखोनि इंद्रजित आपण । अभिचारयज्ञ आरंभी ॥ १५ ॥
इंद्रजित सदा कपटानुवृत्ती । स्वप्नीही नाहीं सुमती ।
मावेची करोनि सीता सती । रणानुवृत्तीं मारीन ॥ १६ ॥
देखतांचि सीतेचे मरण । तत्काळ अवघे त्यजिती प्राण ।
श्रीराम आणि लक्ष्मण । वानरगण समस्त ॥ १७ ॥
मायिक सीतेचे दर्शन । तेंचि अवघ्यां परम मरण ।
ऐसें मानोनि दुर्जन । सीतार्थीं हवन आरंभी ॥ १८ ॥
ऐसिया हर्षाचिया स्थितीं । अभिचारहोम मंत्रोक्तीं ।
करितां न करवे सीता सती । न ये अभिव्यक्ति आकार ॥ १९ ॥
सीता नाकळे होमद्वारा । सीता नाकडे होममंत्रतंतां ।
सीता नाकळे अभिचारा । निशाचरा अति चिंता ॥ २० ॥
जारण मारण उच्चाटण । मोहन अथवा स्तंभन ।
यांसी सीता नाकळे जाण । निर्बंधन श्रीरामें ॥ २१ ॥
करितां श्रीरामनामस्मरण । पळे जारण मारण उच्चाटन ।
सीता चिच्छक्ति आपण । मायाबंधन बाधेना ॥ २२ ॥
सबळबळें अंधकार । नव्हे सूर्यासी गोचर ।
तैसा मायिक वेव्हार । सीतेसमोर होऊं न शके ॥ २३ ॥
मायिक न करवे सीता । इंद्रजितासीं परम चिंता ।
मारावया रघुनाथा । काय म्यां आतां करावें ॥ २४ ॥
शिववरद मज त्रिशुद्धी । आभिचारिका करितां सिद्धी ।
आजिंचा सुनाट गेला विधी । पुसों बुद्धी सदाशिवा ॥ २५ ॥
इंद्रजित शिवसभेसीं । स्वयें रडे उकसाबुकसीं ।
मिथ्यात्व आलें तुझ्या वरदासीं । कोणापासीं मी सांगूं ॥ २६ ॥
मायिक सीता यावया हाता । तुझ्या वरदोक्तें होम करितां ।
प्राप्त नव्हेचि सती सीता । आली मिथ्यता वरदासी ॥ २७ ॥
मायातीत श्रीराम सीता । तिशीं न चले अभिचारता ।
मायिक सीता न ये हाता । शिव स्वयें वदला ॥ २८ ॥
ऐकोनि शिवाचें वचन । इंद्रजित करी रुदन ।
सीता न पावतां जाण । समाधान मज नव्हे ॥ २९ ॥
दृढ धरितां शिवाचे चरण । शिव बोलिला आपण ।
मायिक सीतेलागीं जाण । पार्वतीलागोन प्रार्थावें ॥ ३० ॥
छळावया रघुनाथा । पार्वती झाली मायिक सीता ।
तिचेनि वरदानें तत्वतां । मायिक सीता पावसी ॥ ३१ ॥

इंद्रजिताला पार्वतीचे उत्तर व मायिक सीता – मूर्तीसह इंद्रजिताचे आगमन :

इंद्रजित पार्वती प्रार्थितां । ते म्हणे म्यां छळावया रघुनाथा ।
मायिक जालें होतें सीता । तिच्याही घाता शिव चिंती ॥ ३२ ॥
पुढिलांचें करितां छळण । जो छळी तो पावे मरण ।
इंद्रजित मरावया जाण । मागे आपण मायिक सीता ॥ ३३ ॥
पार्वती म्हणे इंद्रजिता । विनवोनियां विश्वनाथा ।
मायिक मागतोसी सीता । मरणावस्था तुज आली ॥ ३४ ॥
मायिक न करवे श्रीरामकांता । मायिक न करवे गा सीता ।
माया न चले श्रीरघुनाथा । मायामर्दिता श्रीराम ॥ ३५ ॥
मायिक सीतेच्या स्वरुपता । मी छाया छाडीन तत्वतां ।
तिच्या करितांचि घाता । इंद्रजिता मरशील ॥ ३६ ॥
कां मागसी मायिक सीता । अशोकवनीं आहे सीता ।
जाऊनि करीं तिच्या घाता । मग पुरुषार्थ कळेल ॥ ३७ ॥
मारितां अशोकवनाआंत । सीता करील भस्मांत ।
ऐकोनि उमा हांसत । धिक् पुरुषार्थ कपटत्वें ॥ ३८ ॥
मायिक सीतेचें मागणें । तूं बैसलासी मरणा धरणें ।
उमा क्षोभेंकरुन म्हणे । जीवें प्राणें मरशील ॥ ३९ ॥
इंद्रजित म्हणे आपण । मज सर्वथा न ये मरण ।
निजमरणाचें लक्षण । स्वयें आपण अनुवादे ॥ ४० ॥
बारा वर्षे निराहारी । जो कां बाळब्रह्मचारी ।
ऐसा पुरुष नाहीं संसारीं । मी कैसेपरी मरेन ॥ ४१ ॥
ऐसें मानूनि निश्चयेंसीं । इंद्रजित येवोनी सैन्येंसी ।
मायिक सीतेच्या मूर्तीसी । गडगर्जेसीं काढिली ॥ ४२ ॥
दडदडां निशाणघोषीं । शंख भेरी गडगर्जेंसी ।
सीता आणितां युद्धापासीं । वानरीं तिसीं देखिलें ॥ ४३ ॥
जे कां पार्वतीवरदत्त । मायिक सीता रथीं रथस्थ ।
राक्षससेनापरिवारयुक्त । आणिली वधार्थ संग्रामा ॥ ४४ ॥

शंकर वायूला मायिक सीतेचे रहस्य मारुतीला कळविण्यास सांगतात :

शिव सांगे वायूपासीं । गुह्य सांगावें हनुमंतासी ।
मारितां मायिक सीतेसी । कैवारासी न करावें ॥ ४५ ॥
देखतां सीतेचिया घाता । हनुमान करील अति अनर्था ।
मारोनि राक्षसां समस्तां । स्वयें सीता सोडवील ॥ ४६ ॥
वाल्मीकभाष्य अनागत । सिद्धी पावावें समस्त ।
पार्वतीचा वरदार्थ । तोही गुह्यार्थ पाळावा ॥ ४७ ॥
ऐकोनि वायूचा वचनार्थ । शिववाक्य वंदी हनुमंत ।
पार्वतीचा वरदार्थ । प्रतिपाळित मारुति ॥ ४८ ॥
करावया सीतेच्या घाता । रथी वाहूनि मायिक सीता ।
इंद्रजित होय आणिता । कपी देखती संग्रामीं ॥ ४९ ॥


एकवेणीधरां सीतां रक्षोहरणकर्शिताम् ।
परिक्लिष्टैकवसनां मलिनां हतमंडनाम् ॥५॥
रथरेणुसमादिग्धां भीषरुपां वराननाम् ।
रजोमलाभ्यामालिप्तैः सर्वगात्रैरवेक्षिताम् ॥६॥
ददर्श हनुमांस्तत्र सपंकामिव पद्मिनीम् ।
स मुहूर्तमिव ध्यात्वा सीतेयमिति वानरः ॥७॥
बभूव चिरदृष्टा हि तेन सा जनकात्मजा ॥८॥


इंद्रजिताच्या रथावरी । मायिकसीतासौभाग्यथोरी ।
भासतसे कवण्यापरी । जेंवी कां खरी जानकी ॥ ५० ॥
माथांचिया केशश्रेणी । जटाबंधन वळी वेणी ।
एकवस्त्र शय्या धरणी । दीनवदन जानकी ॥ ५१ ॥
न घे आस्तरण प्रावरण । न घे अभ्यंगमर्दन ।
तेणें सर्वांग पैं जाण । दिसे संपूर्ण मलदिग्ध ॥ ५२ ॥
न घे मंडण भूषण । न घे सुमन चंदन ।
न घे तृषार्थ जीवन । श्रीरामध्याननिष्ठ ॥ ५३ ॥
राक्षसीं आणितां रणांआंत । स्त्रीस्वभावें भयभीत ।
रथरजरेणूंनी सर्वांग व्याप्त । दिसे भयभीत जानकी ॥ ५४ ॥
सीता देखोनि हनुमंत । सांडोनियां निजपुरुषार्थ ।
शिववाक्यें पैं ध्यानस्त । दिसे तटस्थ पैं राहिला ॥ ५५ ॥


तां दीनां मलदिग्धांगीं रथस्थां प्रेक्ष्य जानकीम् ।
बाष्पपर्याकुलमुखो हनुमान्व्यथितोsभवत् ॥९॥
कृत्वा विकोशं निस्त्रिंशं प्रजहास महास्वनः ।
तां प्रगृह्य स केशेषु रावणिर्जनकात्मजाम् ॥१०॥
क्रोशंती राम रामेति कृत्वा मायामयीं तदा ।
खड्गरत्‍नमसिं गृह्य केशपक्षे परामृशत् ॥११॥

इंद्रजिताची गर्जना व सीतेचा आक्रोश :

इंद्रजितहस्तगत । रथीं जानकी आक्रंदत ।
तीतें देखोनि हनुमंत । अश्रु स्रवत अति दुःखें ॥ ५६ ॥
सीतासतीचें हनन । हनुमंत स्वयें देखोन ।
अश्रुधारा स्रवती नयन । करी रुदन अति दुःखे ॥ ५७ ॥
देखोनि सीतेचा पैं घात । हनुमान करील अति अनर्थ ।
होता इंद्रजित धाकत । तेणें तो रडत देखिला ॥ ५८ ॥
रडतां देखोनि हनुमंता । केशीं धरोनियां सीता ।
इंद्रजित साटोपें गर्जता । इसी मी आतां मारीन ॥ ५९ ॥
हें तंव मुख्य अवलक्षण । इचे अंगी अशुभ चिन्ह ।
इचें करितां पाणिग्रहण । रघुनंदन अति दुःखी ॥ ६० ॥
इच्या लग्नाचे माझारीं । परशुरामेंसी जुंझारी ।
पडली श्रीरामाचिये शिरीं । भाग्यकरीं वाचला ॥ ६१ ॥
हे तंव समूळ करंटी । बैसोनि श्रीरामाचे पाटीं।
अयोध्ये येतां उठाउठीं । घातला दिग्पटीं श्रीराम ॥ ६२ ॥
वना काढितां श्रीरघुनाथा । जीवें मारिलें दशरथा ।
मुख्य मूळ हे अनर्था । दुःखावस्था इचेनि ॥ ६३ ॥
करितां सीतेचें हरण । गेलें राज्याचें मंडण ।
सेवेलागोनि आपण । वनोवन हिंडवी ॥ ६४ ॥
हिंडवितां वनोवन । नाहीं अन्न रसपान ।
तृणशय्येचें शयन । अवलक्षण जानकी ही ॥ ६५ ॥
सीता निखळ दुःखराशी । दुःख करावया श्रीरामासी ।
स्वयें आली वनवासासी । दुःख बहुतांसी दीधलें ॥ ६६ ॥
रिधें धरिलें वाटें येतां । दुःखी केला निजभर्ता ।
विराधें मारावें रघुनाथा । तोचि अवचिता निमाला ॥ ६७ ॥
सीता स्वरुपें निखळ पाप । सखा लक्ष्मण नित्य निष्पाप ।
त्यावरी घातला अभिशाप । दुःखरुप जानकी ॥ ६८ ॥
सांगे अतिअनर्थीं सीता । सुखें पंचवटीं असतां ।
मृगामागें धाडोनि भर्ता । दुःखावस्था तिघांसी ॥ ६९ ॥
इचें देखतांचि मुख । लंकेशासी लागली भीक ।
इचे अभिलाषें दशमुख । परम दुःख पावला ॥ ७० ॥
इसी आणितां लंकेआंत । लंका जळाली समस्त ।
कुमरवीरकुंभकर्णांत । महोदर प्रहस्त निमाले ॥ ७१ ॥

मायावी सीतेचा इंद्रजिताकडून शिरच्छेद :

हे दुःखदायक महाआगी । हे सुहृदबंधुसंगभंगी ।
हे मी मारीन रणरंगी । खड्ग सवेगीं उचलिलें ॥ ७२ ॥
काढोनि कोशाबाहेरां । पुसोनियां खड्गधारा ।
मारावया सीता सुंदरा । निशाचरा आवेश ॥ ७३ ॥
पुरुषाचे समुष्टी हस्त । ते षड्रत्‍नी खड्ग खचित ।
तेणें खड्गेंसीं इंद्रजित । सीतेचा घात करुं आला ॥ ७४ ॥
रामनामें आक्रंदती । केशकलाप धरोनि हाती ।
मारावया सीता सती । क्रोधानुवृत्ती इंद्रजित ॥ ७५ ॥


गृहीतां तां तदा दृष्ट्वा हनूमान्दैन्यमागतः ।
दुःखजं वारि नेत्राभ्यामसृजत्पवनात्मजः ॥१२॥


शिवाज्ञा सांगे वायुपिता । मिथ्या मायामय सीता ।
इंद्रजित करितां घाता । तूं सर्वथा भिऊं नको ॥ ७६ ॥
जन्ममरणातीत सीता । तिच्या कोण करील घाता ।
सीता मायिक मारितां । तूं अनर्था करुं नको ॥ ७७ ॥
मानून शिवाचें वचन । देखोनि सीतेचें हनन ।
हनुमान मिथ्या करी रुदन । मायिक लक्षण जाणूनी ॥ ७८ ॥
देखतां सीतेचिया घाता । हनुमान करिता अति आकांता ।
मारिता इंद्रजिता लंकानाथा । आणि समस्तां राक्षसां ॥ ७९ ॥
जाणोनि मायिक सीताज्ञान । पाळून शिवाचें वचन ।
हनुमान मिथ्या करी रुदन । स्रवती नयन अश्रुधारा ॥ ८० ॥
मुख्य शिवाचें वचन । सांगोनि गेला पिता पवन ।
तें तें हनुमंतें पाळून । मिथ्या रुदन करितसे ॥ ८१ ॥


षरिवार्य हनूमंतं प्रत्युवाचेंद्रजित्तदा ।
सुग्रीवस्त्वं च रामश्च यन्निमित्तमिहागताः ॥१३॥
तां हनिष्यामि वैदेहीमद्यैव तव पश्यतः ।
इमां हत्वा ततो रामं लक्ष्मणं त्वां च वानर ॥१४॥
सुग्रीवं च हनिष्यामि तं चानार्यं बिभीषणम् ।
तमेवमुक्त्वा रुदतीं सीतां मायामयीं ततः ॥१५॥
शितधारेण खङ्गेन निजघानेंद्रजित्स्वयम् ।
यज्ञोपवीतमार्गेण छिन्ना तेन तपस्विनी ॥१६॥


मारितां देखोनियां सीता । हनुमान करील अति आकांता ।
ऐसा इंद्रजित धाकत होता । तों कपि रडतां देखिला ॥ ८२ ॥
रडतां देखोनि हनुमंत । इंद्रजित जाला उल्लसित ।
रणरंगी स्वयें गर्जत । निजपुरुषार्थ अनुवादे ॥ ८३ ॥
सीता सोडवणें हेत । शिळीं बांधोनियां सेतू ।
लंके आला श्रीरघुनाथ । सुग्रीवयुक्त ससैन्य ॥ ८४ ॥
ते हे जनकदुहिता । सीता ओळख तूं हनुमंता ।
इच्या करितों मी घाता । तुज देखतां संग्रामीं ॥ ८५ ॥
इसी मारितां जाण । आधीं तुझा घेईन प्राण ।
वृथा करुं नको रुदन । आलें निधान हनुमंता ॥ ८६ ॥
आधीं तुझा घेवोनि प्राण । मग मारीन रामलक्ष्मण ।
अंगग सुग्रीव राजे जाण ॥ ८७ ॥
बीभीषण आमचा चुलता । परी पेटला आमच्या घाता ।
कैंचें साधुत्व त्यांचें माथां । तोही मी आतां मारीन ॥ ८८ ॥
हनुमंतासी निर्भर्त्सून । इंद्रजित करितां गर्जन ।
शिववाक्य प्रतिपाळून । धरिलें मौन हनुमंतें ॥ ८९ ॥
इंद्रजित मारितां मायिक सीता । तुवां न करावें पुरुषार्था ।
सांगोनि गेला पवन पिता । तेंही तत्वतां प्रतिपाळी ॥ ९० ॥
निवांत देखोनि हनुमंत । तंव तंव इंद्रजित गर्जत ।
मायिक सीतेचा करावया घात । खड्गा हात घातला ॥ ९१ ॥
सीता रडत पडत । रामनामें आक्रंदत ।
तिचे झोंटीस घालोनि हात । खड्ग तुळित इंद्रजित ॥ ९२ ॥
मायिक सीतावधद्वारा । अति उल्लास निशाचरा ।
अश्मनिशितखड्गधारा । सीतेच्या शिरा छेदिलें ॥ ९३ ॥
द्विज घालिती यज्ञोपवीत । तैसा करितां शस्त्रघात ।
मायिक सीतेचे पैं प्रेत । न दिसे व्यक्त रणरंगी ॥ ९४ ॥
नाहीं रथावरी शिर । नाहीं धरेवरी शरीर ।
अवघे झालें निराकार । आश्चर्य थोर सुरसिद्धां ॥ ९५ ॥
मारितां दोराच्या सर्पासी । तळीं प्रेतत्व नाहीं त्यासी ।
तेंवी मायिक सीतेसी । नाहीं देहासीं देहत्व ॥ ९६ ॥
मायिक सीता प्रेतमूर्ती । नाहीं रथीं ना क्षितीं ।
देखोनि इंद्रजित निजचित्तीं । भयभ्रांती पावला ॥ ९७ ॥

आकाशवाणी :

तंव तेथें आकाशांत । शब्द उठिला भयभीत ।
रिघों न शकसी लंकेआंत । होईल प्राणांत संग्रामीं ॥ ९८ ॥
जितकें तुवां केलें कपट । आतां त्याचा आला शेवट ।
सौ‍मित्र छेदील तुझा कंठ । रणीं यथेष्ट भिडोनी ॥ ९९ ॥

हनुमंताने क्रोधाने इंद्रजितावर शिळा फेकली :

मारितां मायिक सीता । कोंप आला हनुमंता ।
करावया इंद्रजिताच्या घाता । होय उचलिता महाशिळा ॥ १०० ॥


स तू शोकेन चाविष्टः कोपेन च महाकपिः ।
हनूमान्‍राक्षसरथे पातयामास वै शिलाम् ॥१७॥
भीमांपतंती दृष्ट्वा तु रथाःसारथिना सह ।
विवेश धरणीं भित्वा सा शिला व्यर्थतां गता ॥१८॥
पतितायां शिलायां तु रक्षसां व्यथिता चमूः ।
तामध्यगच्छन्शतशो नंदतः काननौकसः ॥१९॥
वृक्षशैलशिलावर्षं विसृजंतःप्लंवगमाः ।
शत्रूणशं कदनं चक्रुर्नेदुश्च विविधैः स्वनैः ॥२०॥

इंद्रजित हतबल होऊन बिळात लपतो :

घालावया इंद्रजिताच्या कपाळा । कोपें हनुमंतें सोडिली शिळा ।
इंद्रजिताने देखोनि डोळां । बाणजाळा वर्षत ॥ १०१ ॥
विंधितां कोटि कोटि बाण । शिळा न फुटे अति दारुण ।
विंधितांही वज्रबाण । अणुप्रमाण भंगेना ॥ २ ॥
ऐसें देखोनियां डोळां । उघडोनियां तेथींचिया बिळा ।
इंद्रजित रथेंसीं सगळा । स्वयें पळाला त्यामाजी ॥ ३ ॥
चुकला इंद्रजिताचा घात । शिळा पडतां सैन्याआंत ।
अवघ्यां एकचि जाला घात । जाला प्राणांत शिळातळीं ॥ ४ ॥
शिळातळीं राक्षससंभार । मारितां देखोनि वानर ।
आले गर्जत अपार । शिळशिखर तरुहस्ती ॥ ५ ॥
एक मारिती शिळाशिखरी । एक मारिती तरुवरीं ।
राक्षससैन्यासी बोहरी । करुं वानरीं आदरिली ॥ ६ ॥
इंद्रजित अडकला बिळाआंत । राखण बैसला हनुमंत ।
बाहेर निघतां करील घाअ । तेणे धाकत इंद्रजित ॥ ७ ॥
येरीकडे वानरभारीं । बोंब सुतली एकसरीं ।
इंद्रजिताने खड्गधारीं । सीतासुंदरी मारिली ॥ ८ ॥
ऐसी ऐकतांचि मात । धाकिन्नला हनुमंत ।
सीताविरहें श्रीरघुनाथ । झणीं प्राणांत करील ॥ ९ ॥
बिळीं सोडोनि इंद्रजितासी । हनुमान आला वानरसेनेसीं ।
निवारी त्यांच्या युद्धासी । श्रीरामापासीं यावया ॥ ११० ॥


यन्निमित्तं च युध्यामः सा हता जनकात्मजा ।
इममर्थं च विज्ञाप्य रामं सुग्रीवमेव च ॥२१॥
तौ यत्प्रतिविधास्येते तत्करिष्यामहे वयम ।
शनैः शनैरसंभ्रांतः सबलः संन्यवर्तत ॥२२॥
ततः प्रेक्ष्य हनूमंतं व्रजंतं यत्र राघवौ ॥२३॥

हनुमंताकडून श्रीरामांना इंद्रजितकृत्य कथन :

जिनिमित्त युद्ध करणें । ती सीता मारिली इंद्रजितानें ।
हा वृत्तांत सांगावयाकारणें । शीघ्र जाणें श्रीरामापासीं ॥ ११ ॥
आम्हां मुख्य श्रीरामचंद्र । सुग्रीव आमचा राजेंद्र ।
सीतावधाचा विचार । सांगो समग्र त्यांपासीं ॥ १२ ॥
ते तंव विचारचक्रवर्ती । कैसा काय विचार करिती ।
विचार करोनि जें सांगती । तेंचि निश्चिती करूं आम्ही ॥ १३ ॥
इंद्रजितानें मारिली सीता । सत्य न माने श्रीरघुनाथा ।
जन्ममरणाची कथा । सीतेंसीं सर्वथा असेना ॥ १४ ॥
युद्धापासूनि वानरः । शनैः शनैः काढोनि समग्र ।
पुढें होवोनि हनुमान वीर । आले सत्वर रामापासीं ॥ १५ ॥
पाळोनियां शिववरदान । हनुमान आला करीत रुदन ।
तें देखोनि रघुनंदन । पावली खूण वरदाची ॥ १६ ॥
इंद्रजितानें मारिली सीता । ऐसें हनुमंतें सांगतां ।
मिथ्या कळोनि तत्वतां । आली रघुनाथा महामूर्च्छा ॥ १७ ॥


तस्य तद्वचनं श्रुत्वा रामो दुःखेन मूर्च्छितः ।
निपपात तदा भूमौ कृत्तमूल इव दुमः ॥२४॥
लक्ष्मणस्तं तु बाहुभ्यां परिष्वज्य सुदुःखितः ।
उवाच राममस्वस्थं वाक्यं हेत्वर्थसंयुतम् ॥२५॥
राममाश्वासयामास लक्ष्मणो भ्रातृवत्सलः ।
अवेक्ष्य गुल्मान्सकलांस्ततः प्राप्तो बिभीषणः ॥२६॥

श्रीरामाचा शोक व मूर्च्छा :

मायिक सीता मायिक वार्ता । मिथ्या जाणोनि तिच्या घाता ।
मूर्च्छा आली श्रीरघुनाथा । शिववरदार्था पाळावया ॥ १८ ॥
गंगातीरींचा तरुवर । उन्मळोनि पडे थोर ।
तैसा पडिला रघुवीर । दुःख दुर्धर सीतेचें ॥ १९ ॥
श्रीराम मूर्च्छित पडतां । लक्ष्मणासी दुःखावस्था ।
आलिंगोनि बंधुवत्सलता । अंकी भ्राता निजवी ॥ १२० ॥
अंगी वाहोनि श्रीरघुनाथा । स्वयें लक्ष्मण होय बोलता ।
इंद्रजितानें मारिली सीता । उपाय आतां दिसेना ॥ २१ ॥
महापाप मारणें सीता । तेणें सुखरुपता इंद्रजिता ।
आम्ही वर्ततों स्वधर्मता । दुःखावस्था आम्हांसी ॥ २२ ॥
धर्माधर्मविवंचना । न कळे सहसा अज्ञाना ।
येतां श्रीरामा मूर्च्छना । अति वेदना वानरां ॥ २३ ॥
वानर मिळोनियां सकळ । निलोत्पलीं सुगंध जळ ।
शिंपितां श्रीराममुखकमळ । झाला अळुमाळ सावध ॥ २४ ॥
हनुमंताचिया समता । पाळावया शिववरदार्था ।
अत्यंत मूर्च्छा श्रीरघुनाथा । आली विकळता सर्वांगीं ॥ २५ ॥
ऐसें देखोनि श्रीरघुनाथा । लक्ष्मणासीं दुःखावस्था ।
इंद्रजितानें मारिल्या सीता । राम सर्वथा वांचेना ॥ २६ ॥
श्रीरामें सोडितांचि प्राण । आम्हां अवघ्यातेंचि मरण ।
दुःखे मरतील भरत शत्रुघ्न । सांडितील प्राण तिघी माता ॥ २७ ॥
निमालिया रघुनंदन । निमतील अयोध्येचे जन ।
किष्किंधे निमताल वानरगण । प्रळय पूर्ण पैं आला ॥ २८ ॥
जातांच शरीराचा प्राण । खुंटे इंद्रियांचें चळण ।
तेंवी निमाल्या रघुनंदन । आम्हीही जाण निमालों ॥ २९ ॥
देहींहून जातां आत्मा । प्रेतरुप राहे प्रतिमा ।
तैसेंच होय गा आम्हां । स्वयें श्रीराम मरतांचि ॥ १३० ॥
श्रीराम जीव आम्ही देहवंते । श्रीराम आत्मा आम्ही भूतें ।
श्रीराम चैतन्य आम्ही चित्तें । अन्यथा येथें असेना ॥ ३१ ॥
करोनि सीतेचा निजघात । साधिला इंद्रजितानें पुरुषार्थ ।
आमुचा विध्वंसोनि स्वार्थ । अति आकांत ओढवला ॥ ३२ ॥
इंद्रजितानें मारिली सीता । कांही उपाय न चले सर्वथा ।
केंवी वांचवे रघुनाथा । परम चिंता अवघ्यांही ॥ ३३ ॥
श्रीरामाचें हृग्दत । स्वयें जाणे हनुमंत ।
हनुमंताचें मनोगत । श्रीरघुनाथ स्वयें जाणे ॥ ३४ ॥
लक्ष्मणासी करितां रुदन । वानर अवघे चिंतामग्न ।
मिथ्या सीतेचें हनन । आला शोधून बिभीषण ॥ ३५ ॥
दूत धाडोनि लंकेआंत् । अशोकवनीं सीता स्वस्थ ।
इतुका घेवोनि वृत्तांत । आला त्वरित बिभीषण ॥ ३६ ॥
तंव वानरकटकांत । वर्तताहे अति आकांत ।
ऐकोनि सीतेचा मरणार्थ । श्रीरघुनाथ मूर्च्छित ॥ ३७ ॥


ददर्श मोहमापन्नं लक्ष्मणस्यांकमाश्रितम् ।
व्रीडितं शोकसंतप्तं प्रेक्ष्य रामं बिभीषणः ॥२७॥
अंतर्दुःखेन दीनात्मा किमेतदिति सोsब्रीवत् ।
उवाच लक्ष्मणो वाक्यमिदमश्रुपरिप्लुतः ॥२८॥
हतामिंद्रजिता सीतां सम्यक् श्रुत्वैव राघवः ।
हनूमद्वचनाद्दीनस्ततो मोहमुपागतः ॥२९॥
कथयंतं तु सौ‍मित्रिं संनिवार्य बिभीषणः ।
पुष्कलार्थमिदं वाक्यं विसंज्ञ राममब्रवीत् ॥३०॥


महामोहें अति मोहित । मूर्च्छापन्न श्रीरघुनाथ ।
तेणें दुःखें दुःखाभिभूत । शोकान्वित बिभीषण ॥ ३८ ॥
लक्ष्मणाचे मांडीवरी । श्रीरामीं विकळता भारी ।
स्वामी मूर्च्छित कैशापरी । पुसे आदरीं बिभीषण ॥ ३९ ॥
कोण लागला आघात । कैसेनि श्रीराम मूर्च्छित ।
ऐसें बिभीषण पूसत । त्यासी सांगत सौमित्र ॥ १४० ॥
इंद्रजितानें मारिली सीता । ऐसें हनुमंते सांगतां ।
मूर्च्छा आली श्री रघुनाथा । उपाय आतां दिसेना ॥ ४१ ॥
हनुमंताचा वचनार्थ । मिथ्या न मानी श्रीरघुनाथ ।
तेणें सांगितला सीतेचा घात । मूर्च्छाभिभूत श्रीराम ॥ ४२ ॥
ऐकोनि सौमित्राचें वचन । बिभीषण हास्यवदन ।
सीतेसी नाहीं जन्ममरण । वृथा कां रुदन तुम्ही करां ॥ ४३ ॥
महाकपटीं इंद्रजित । मायिक सीतेचा केला घात ।
तिचें तळीं नुरेचि प्रेत । कैसेनि सत्य हनुमंत मानी ॥ ४४ ॥
अशोकवनाआंत । सीता स्वस्थ आहे तेथ ।
जाऊन आले माजे दूत । तुम्ही कां रडत अति दुःखें ॥ ४५ ॥
सावध नव्हे श्रीरघुनाथ । बिभीषण दुःखाभिभूत ।
अंगद सुग्रीव जांबवंत । वानर समस्त अति दुःखी ॥ ४६ ॥

हनुमंताचे सीतेचे मिथ्यात्व कथन :

हे देखोनि हनुमंत । स्वयें आला पैं गर्जत ।
मारीन इंद्रजित लंकानाथ । मारीन समस्त राक्षस ॥ ४७ ॥
मिथ्या मायिक सीताघात । तळीं तिचें नुरेचि प्रेत ।
हें म्यां जाणोनि इत्थंभूत । सांगावया येथ मी आलों ॥ ४८ ॥
मिथ्या सीतेचें हनन । मिथ्या मूर्च्छित रघुनंदन ।
ऐकतां हनुमंतगर्जन । झाला सावधान श्रीराम ॥ ४९ ॥
श्रीराम आणि हनुमान बळी । खूण पावोनि वरदानमेळीं ।
पिटिली टाळिया टाळी । झाली तत्काळीं सावध ॥ १५० ॥
जवळी येतांचि हनुमंत । सावध जाला श्रीरघुनाथ ।
स्वामिसेवकांचा वृत्तांत । न कळे गुह्यार्थ वेदांसी ॥ ५१ ॥
सावध होतां श्रीरामचंद्र । वानरीं केला जयजयकार ।
रामनामाचा गजर । देती भुभुःकार स्वानंदें ॥ ५२ ॥
अशोकवनाप्रती । स्वस्थ आहे सीता सती ।
हे बिभीषणाची वचनोक्ती । मानी रघुपति त्रिसत्य सत्य ॥ ५३ ॥
बिभीषणाचें वचन । मिथ्या न मानी रघुनंदन ।
हर्षें देवोनि आलिंगन । सावधान बैसले ॥ ५४ ॥
सांडून मोह शोक दुर्धर । सुखी बैसला सौमित्र ।
सुखी सुग्रीवादि वानर । गर्जती समग्र रामनामें ॥ ५५ ॥
एका जनार्दना शरण । मिथ्या मायिक सीतामरण ।
जाणोनियां रघुनंदन । सावान बैसला ॥ ५६ ॥
श्रीराम नित्य सावधान । श्रीराम जगाचें जीवन ।
नाहीं मोहममताबंधन । स्वानंदघन श्रीराम ॥ ५७ ॥

श्रीरामांना हर्ष :

रामानामाच्या आवर्ती । मोह ममता समूळ जाती ।
तो मोह ममता श्रीरामाप्रती । कदा कल्पांतीं घडेना ॥ १५८ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
मायिकसीतावधो नाम षट्त्रिंशत्तमोsध्यायः ॥ ३६ ॥
ओव्या ॥ १५८ ॥ श्लोक ॥ ३० ॥ एवं ॥ १८८ ॥


GO TOP