श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ चतुषष्टितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
समुद्रस्य विशालतां आलोक्य विषीदतो वानरान् सांत्वयित्वा अङ्‌गदस्य तान् प्रति पृथक् पृथक् समुद्र लङ्‌घनशक्तिविषयकः प्रश्नः - समुद्राची विशालता पाहून विषादात पडलेल्या वानरांना आश्वासन देऊन अंगदांचे त्यांना पृथक-पृथक समुद्र-लंघनासाठी त्यांच्या शक्तिसंबंधी विचारणे -
आख्याता गृध्रराजेन समुत्पत्य प्लवंगमाः ।
संगम्य प्रीतिसंयुक्ताः विनेदुः सिंहविक्रमाः ॥ १ ॥
गृध्रराज संपातिने याप्रकारे सांगितल्यावर सिंहासमान पराक्रमी सर्व वानर अत्यंत प्रसन्न झाले आणि परस्परांना भेटून उड्या मारीत गर्जना करू लागले. ॥१॥
संपातेर्वचनं श्रुत्वा हरयो रावणक्षयम् ।
हृष्टाः सागरमाजग्मुः सीतादर्शनकाङ्‌क्षिणः ॥ २ ॥
संपातिच्या बोलण्यावरून रावणाचे निवासस्थान तसेच त्याच्या भावी विनाशाची सूचना मिळाली होती. ते ऐकून हर्षयुक्त झालेले ते सर्व वानर सीतेच्या दर्शनाची इच्छा मनात घेऊन समुद्राच्या तटावर आले. ॥२॥
अभिक्रम्य तु तं देशं ददृशुर्भीमाविक्रमाः ।
कृत्स्नं लोकस्य महतः प्रतिबिंबं अवस्थितम् ॥ ३ ॥
त्या भयंकर पराक्रमी वानरांनी त्या देशात पोहोचून समुद्राकडे पाहिले, जो विराट विश्वाच्या संपूर्ण प्रतिबिंबाप्रमाणे स्थित होता. ॥३॥
दक्षिणस्य समुद्रस्य समासाद्योत्तरां दिशम् ।
संनिवेशं ततश्चक्रुः हरिवीरा महाबलाः ॥ ४ ॥
दक्षिण समुद्राच्या उत्तर तटावर जाऊन त्या महाबली वानर वीरांनी मुक्काम ठोकला. ॥४॥
प्रसुप्तमिव चान्यत्र क्रीडंतमिव चान्यतः ।
क्वचित्पर्वतमात्रैश्च जलराशिभिरावृतम् ॥ ५ ॥
तो समुद्र काही ठिकाणी तर तरंगहीन आणि शांत असल्यामुळे झोपी गेल्यासारखा भासत होता. अन्यत्र जेथे थोड्या थोड्या लाटा उठत होत्या तेथे तो क्रीडा करीत असल्यासारखा प्रतीत होत होता आणि अन्य स्थळी जेथे उत्ताल तरंग उठत होते, तेथे पर्वतासमान जलराशिंनी आवृत्त दिसून येत होता. ॥५॥
सङ्‌कुतलं दानवेंद्रैश्च पातालतलवासिभिः ।
रोमहर्षकरं दृष्ट्‍वा विषेदुः कपिकुञ्जराः ॥ ६ ॥
तो सारा समुद्र पाताळनिवासी दानवराजांनी व्याप्त होता. त्या रोमांचकारी महासागरास पाहून ते समस्त श्रेष्ठ वानर अत्यंत विषादात पडले. ॥६॥
आकाशमिव दुष्पारं सागरं प्रेक्ष्य वानराः ।
विषेदुः सहिताः सर्वे कथं कार्यमिति ब्रुवन् ॥ ७ ॥
आकाशासमान दुर्लंघ्य समुद्रावर दृष्टिपात करून ते सर्व वानर ’आता काय करायला हवे’ असे म्हणत एकत्र बसून चिंता करू लागले. ॥७॥
विषण्णां वाहिनीं दृष्ट्‍वा सागरस्य निरीक्षणात् ।
आश्वासयामास हरीन् भयार्तान् हरिसत्तमः ॥ ८ ॥
त्या महासागराचे दर्शन करून सर्व वानर सेनाविषादात बुडालेली पाहून कपिश्रेष्ठ अंगद त्या भयातुर वानरांना आश्वासन देऊन म्हणाले- ॥८॥
तान् विषादेन मनः कार्यं विषादो दोषवत्तरः ।
विषादो हंति पुरुषं बालं क्रुद्ध इवोरगः ॥ ९ ॥
’वीरांनो ! तुम्ही आपल्या मनाला विषादात पाडू नये. कारण विषादात फार मोठा दोष आहे. जसे क्रोधाविष्ट झालेला साप आपल्याजवळ आलेल्या बालकाला ही दंश करतो त्याप्रमाणेच हा विषाद पुरुषाचा नाश करून टाकतो. ॥९॥
यो विषादं प्रसहते विक्रमे पर्युपस्थिते ।
तेजसा तस्य हीनस्य पुरुषार्थे न सिध्यति ॥ १० ॥
’जो पराक्रमाचा अवसर आला असता विषादग्रस्त होतो त्याच्या तेजाचा नाश होतो. त्या तेजोहीन पुरुषाचा पुरुषार्थ सिद्ध होत नाही.’ ॥१०॥
तस्यां रात्र्यां व्यतीतायां अङ्‌ग दो वानरैः सह ।
हरिवृद्धैः समागम्य पुनर्मंत्रममंत्रयत् ॥ ११ ॥
ती रात्र निघून गेल्यावर मोठ मोठ्या वानरांसह बसून अंगदाने पुन्हा विचार करण्यास आरंभ केला. ॥११॥
सा वानराणां ध्वजिनी परिवार्याङ्‌ग दं बभौ ।
वासवं परिवार्येव मरुतां वाहिनी स्थिता ॥ १२ ॥
त्या समयी अंगदाला घेरून बसलेली ती वानरसेना इंद्राला घेरून स्थित झालेल्या देवतांच्या विशाल वाहिनीप्रमाणे शोभत होती. ॥१२॥
कोऽन्यस्तां वानरीं सेनां शक्तः स्तंभयितुं भवेत् ।
अन्यत्र वालितनयाद् अन्यत्र च हनूमतः ॥ १३ ॥
वालिपुत्र अंगद तसेच पवनपुत्र हनुमानास सोडून दुसरा कोणता वीर त्या वानरसेनेला सुस्थिर राखू शकला असता ? ॥१३॥
ततस्तान् हरिवृद्धांश्च तञ्च सैन्यमरिंदमः ।
अनुमान्याङ्‌ग दः श्रीमान् वाक्यमर्थवदवब्रवीत् ॥ १४ ॥
शत्रूवीरांचे दमन करणार्‍या श्रीमान् अंगदांनी त्या मोठ्या आणि वृद्ध वानरांचा सन्मान करून त्यांना याप्रकारे अर्थयुक्त गोष्ट सांगितली- ॥१४॥
क इदानीं महातेजा लङ्‌घ यिष्यति सागरम् ।
कः करिष्यति सुग्रीवं स्तयसंधमरिंदमम् ॥ १५ ॥
’सज्जनांनो ! तुम्हा लोकांमध्ये कोण असा महातेजस्वी वीर आहे जो या समयी समुद्र ओलांडून जाईल आणि शत्रुदमन सुग्रीवांना सत्यप्रतिज्ञ बनवेल. ॥१५॥
को वीरो योजनशतं लङ्‌घसयेत प्लवंगमः ।
इमांश्च यूथपान् सर्वान् मोचयेत् को महाभयात् ॥ १६ ॥
’कोण वीर वानर शंभर योजने समुद्रास ओलांडू शकेल ? आणि कोण या समस्त यूथपतिंना महान् भयापासून मुक्त करेल ? ॥१६॥
कस्य प्रसादाद दारांश्च पुत्रांश्चैव गृहाणि च ।
इतो निवृत्ताः पश्येम सिद्धार्थाः सुखिनो वयम् ॥ १७ ॥
’कोणाच्या प्रसादाने आपण सर्व सफल मनोरथ आणि सुखी होऊन येथून परत जाऊ आणि घरदार तसेच स्त्री पुत्रांचे मुख पाहू शकू ? ॥१७॥
कस्य प्रसादाद् रामं च लक्ष्मणं च महाबलम् ।
अभिगच्छेम संहृष्टाः सुग्रीवं च वनौकसम् ॥ १८ ॥
’कुणाच्या प्रसादाने आम्ही हर्षोत्फुल होऊन रामांचे, महाबली लक्ष्मणांचे तसेच वानरवीर सुग्रीवांचे जवळ जाऊ शकू ? ॥१८॥
यदि कश्चित् समर्थो वः सागरप्लवने हरिः ।
स ददात्विह नः शीघ्रं पुण्यामभयदक्षिणाम् ॥ १९ ॥
’जर तुम्हा लोकांपैकी कोणी वानरवीर समुद्र ओलांडून जाण्यास समर्थ असेल तर त्याने शीघ्रच आम्हांला येथे परम पवित्र अभय-दान द्यावे.’ ॥१९॥
अङ्‌ग दस्य वचः श्रुत्वा न कश्चित् किञ्चिदब्रवीत् ।
स्तिमितेवाभवत् सर्वा तत्र सा हरिवाहिनी ॥ २० ॥
अंगदाचे हे बोलणे ऐकून कोणी काही बोलले नाही. ती सर्व वानर-सेना तेथे जडवत् स्थिर राहिली. ॥२०॥
पुनरेवाङ्‌गभदः प्राह तान् हरीन् हरिसत्तमः ।
सर्वे बलवतां श्रेष्ठा भवंतो दृढविक्रमाः ।
व्यपदेशकुले जाताः पूजिताश्चाप्यभीक्ष्णशः ॥ २१ ॥
तेव्हा वानरश्रेष्ठ अंगदाने पुन्हा त्या सर्वांना म्हटले - ’बलवानांत श्रेष्ठ वानरांनो ! तुम्ही सर्व लोक दृढतापूर्वक पराक्रम प्रकट करणारे आहात. तुमचा जन्म कलंकरहित उत्तम कुळात झालेला आहे. यासाठी तुमची वारंवार प्रशंसा होऊन चुकली आहे. ॥२१॥
नहि वो गमने संगः कदाचित् कस्यचिद् भवेत् ।
ब्रुवध्वं यस्य या शक्तिः प्लवने प्लवगर्षभाः ॥ २२ ॥
’श्रेष्ठ वानरांनो ! तुम्हा लोकांपैकी कुणाचीही गति कधी थांबू शकत नाही. म्हणून समुद्रास ओलांडण्याची ज्याची जितकी शक्ति असेल त्याने ती सांगावी.’ ॥२२॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे चतुःषष्टितमः सर्गः ॥ ६४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा चौसष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP