[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ एकोनषष्टितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामलक्ष्मणयोर्वार्तालापः -
श्रीराम आणि लक्ष्मण यांचे संभाषण -
अथाश्रमादुपावृत्तमन्तरा रघुनन्दनः ।
परिपप्रच्छ सौमित्रिं रामो दुःखादिदं वचः ॥ १ ॥
सीतेच्या सांगण्यावरून आश्रमातून आपल्याकडे आलेल्या सौमित्राला मार्गामध्येच रघुनंदन रामांनी मोठ्‍या दुःखाने असे विचारले - ॥१॥
तमुवाच किमर्थं त्वं आगतोऽपास्य मैथिलीम् ।
यदा सा तव विश्वासाद् वने विरहिता मया ॥ २ ॥
लक्ष्मणा ! जर मी तुझ्या विश्वासावरच वनात सीतेला सोडले होते तर तू तिला एकटीला सोडून का निघून आलास ? ॥२॥
दृष्ट्‍वैवाभ्यागतं त्वां मे मैथिलीं त्यज्य लक्ष्मण ।
शङ्‌कमानं महत्पापं यत्सत्यं व्यथितं मनः ॥ ३ ॥
लक्ष्मणा ! मैथिलीला सोडून तू जो माझ्याजवळ आला आहे, त्यामुळे तुला पहाताच मला ज्या महान्‌ अनिष्टाची आशंका येऊन माझे मन व्यथित होत होते, ते सत्यच असावे असे वाटू लागले आहे. ॥३॥
स्फुरते नयनं सव्यं बाहुश्च हृदयं च मे ।
दृष्ट्‍वा लक्ष्मण दूरे त्वां सीताविरहितं पथि ॥ ४ ॥
लक्ष्मणा ! माझा डावा डोळा आणि डावी भुजा फडफडत आहेत. तुला आश्रमापासून दूर सीते शिवायच मार्गात येतांना पाहून माझे हृदयही धडधडू लागले आहे. ॥४॥
एवमुक्तस्तु सौमित्रिर्लक्ष्मणः शुभलक्ष्मणः ।
भूयो दुःखसमाविष्टो दुःखितं राममब्रवीत् ॥ ५ ॥
श्रीरामांनी असे म्हटल्यावर उत्तम लक्षणांनी संपन्न सौमित्र लक्ष्मण अत्यंत दुःखी होऊन आपल्या शोकग्रस्त भावास म्हणाले- ॥५॥
न स्वयं कामकारेण तां त्यक्वाहमिहागतः ।
प्रचोदितस्तयैवोग्रैस्त्वत्सकाशमिहागतः ॥ ६ ॥
बंधो ! मी स्वयं आपल्या इच्छेने त्यांना सोडून आलेलो नाही. त्यांच्या कठोर वचनानी प्रेरित होऊन मला आपल्या जवळ यावे लागले. ॥६॥
आर्येणेव पराक्रुष्टं लक्ष्मणेति सुविस्वरम् ।
परित्राहीति यद्वाक्यं मैथिल्यास्तच्छ्रुतिं गतम् ॥ ७ ॥
आपल्याच सारख्या स्वरात कुणी जोराने लक्ष्मणा ! मला वाचव ! अशा हाका मारलेल्या मैथिलीच्या ही कानावर पडल्या. ॥७॥
सा तमार्तस्वरं श्रुत्वा तव स्नेहेन मैथिली ।
गच्छ गच्छेति मामाशु रुदती भयविक्लवा ॥ ८ ॥
तो आर्तनाद ऐकून मैथिली आपल्या बद्दलच्या स्नेहाकारणाने भयाने व्याकुळ होऊन गेली आणि रडत रडत मला तात्काळ म्हणाली- "जा ! जा !. ॥८॥
प्रचोद्यमानेन मया गच्छेति बहुशस्तया ।
प्रत्युक्ता मैथिली वाक्यमिदं तत् प्रत्ययान्वितम् ॥ ९ ॥
जेव्हा वारंवार तिने जा जा म्हणून मला प्रेरित केले तेव्हा तिला विश्वास देत मी मैथिलीस असे म्हटले- ॥९॥
न तत् पश्याम्यहं रक्षो यदस्य भयमावहेत् ।
निर्वृता भव नास्त्येतत् केनाप्येतदुदाहृतम् ॥ १० ॥
देवी ! मी अशा कुणा ही राक्षसाला पहात नाही की जो भगवान्‌ श्रीरामांनाही भयभीत करू शकेल. आपण शांत राहावे. हा रामांचा आवाज नाही. कुणा दुसर्‍याने या प्रकारे हाका मारल्या आहेत. ॥१०॥
विगर्हितं च नीचं च कथमार्योऽभिधास्यति ।
त्राहीति वचनं सीते यस्त्रायेत् त्रिदशानपि ॥ ११ ॥
सीते ! जे देवतांचे ही रक्षण करू शकतात, ते माझे मोठे बंधु मला वाचव असे कायरतापूर्ण (निंद्य) वचन कसे बोलतील ? ॥११॥
किन्निमित्तं तु केनापि भ्रातुरालम्ब्य मे स्वरम् ।
विस्वरं व्याहृतं वाक्यं लक्ष्मण त्राहि मामिति ॥ १२ ॥
कुण्या दुसर्‍याने कुठल्या तरी वाईट उद्देशाने माझ्या भावाच्या आवाजाची नक्कल करून लक्ष्मणा ! मला वाचव ! असे मोठ्‍याने ओरडून म्हटले आहे. ॥१२॥
राक्षसेनेरितं वाक्यं त्रासात् त्राहीति शोभने ।
न भवत्या व्यथा कार्या कुनारीजनसेविता ॥ १३ ॥
शोभने ! त्या राक्षसानेच भयामुळे मला वाचव असे शब्द तोंडातून काढले आहेत. आपण व्यथित होता कामा नये. नीच श्रेणीच्या स्त्रियाच अशा व्यथेला आपल्या मनात स्थान देतात. ॥१३॥
अलं विक्लवतां गन्तुं स्वस्था भव निरुत्सुका ।
न चास्ति त्रिषु लोकेषु पुमान् यो राघवं रणे ॥ १४ ॥

जातो वा जायमानो वा संयुगे यः पराजयेत् ।
अजेयो राघवो युद्धे देवैः शक्रपुरोगमैः ॥ १५ ॥
तू व्याकुळ होऊ नको. स्वस्थ हो, चिन्ता सोड. तीन्ही लोकात असा कोणी पुरुष उत्पन्न झालेला नाही, उत्पन्न होत नाही आणि होणारही नाही, जो युद्धात राघवांना परास्त करू शकेल. संग्रामात इंद्र आदि देवताही श्रीरामांना जिंकू शकत नाहीत. ॥१४-१५॥
एवमुक्ता तु वैदेही परिमोहितचेतना ।
उवाचाश्रूणि मुञ्चन्ती दारुणं मामिदं वचः ॥ १६ ॥
मी असे म्हटल्यावर वैदेहीची चेतना मोहाने आच्छन्न होऊन गेली. ती अश्रु ढाळीत मला अत्यंत कठोर वचने बोलली- ॥१६॥
भावो मयि तावात्यर्थपाप एव निवेशितः ।
विनष्टे भ्रातरि प्राप्तुं न च त्वं मामवाप्स्यसे ॥ १७ ॥
लक्ष्मणा ! तुझ्या मनात माझ्या बद्दल अत्यंत पापपूर्ण भाव भरलेला आहे. तू आपला भाऊ मेल्यावर मला प्राप्त करू इच्छित आहेस, परंतु मला प्राप्त करू शकणार नाहीस. ॥१७॥
संकेताद् भरतेन त्वं रामं समनुगच्छसि ।
क्रोशन्तं हि यथात्यर्थं नैवमभ्यवपद्यसे ॥ १८ ॥
तू भरताच्या इशार्‍यावरून आपल्या स्वार्थासाठी श्रीरामांच्या पाठोपाठ आला आहेस. म्हणून तर ते जोरजोराने ओरडत आहेत आणि तू त्यांच्या जवळ जातही नाहीस. ॥१८॥
रिपुः प्रच्छन्नचारी त्वं मदर्थमनुगच्छसि ।
राघवस्यान्तरं प्रेप्सुः तथैनं नाभिपद्यसे ॥ १९ ॥
तू आपल्या भावाचा गुप्त शत्रु आहेस. माझ्यासाठीच श्रीरामांचे अनुसरण करीत आहेस आणि श्रीरामांचे छिद्र धुंडत राहिला आहेस, म्हणून तर संकट समयी त्यांच्या जवळ जाण्याचे नाव ही काढत नाहीस. ॥१९॥
एवमुक्तस्तु वैदेह्या संरब्धो रक्तलोचनः ।
क्रोधात् प्रस्फुरमाणोष्ठ आश्रमादभिनिर्गतः ॥ २० ॥
वैदेहीने असे म्हटल्यावर मला फारच रोष आला. माझे डोळे लाल झाले आणि क्रोधाने माझे ओठ थरथरू लागले. याच अवस्थेत मी आश्रमातून बाहेर निघून आलो. ॥२०॥
एवं ब्रुवाणं सौमित्रिं रामः सन्तापमोहितः ।
अब्रवीद् दुष्कृतं सौम्य तां विना त्वमिहागतः ॥ २१ ॥
लक्ष्मणांचे हे बोलणे ऐकून श्रीराम संतापाने मोहित होऊन गेले आणि त्यांना म्हणाले - सौम्य ! तू फारच वाईट केलेस, की जो तू सीतेला सोडून इकडे निघून आलास. ॥२१॥
जानन्नपि समर्थं मां रक्षसामपवारणे ।
अनेन क्रोधवाक्येन मैथिल्या निर्गतो भवान् ॥ २२ ॥
मी राक्षसांचे निवारण करण्यास समर्थ आहे, हे जाणूनही तू मैथिलीच्या क्रोधयुक्त वचनांनी उत्तेजित होऊन निघून आलास. ॥२२॥
नहि ते परितुष्यामि त्यक्त्वा यदसि मैथिलीम् ।
क्रुद्धायाः परुषं श्रुत्वा स्त्रिया यत् त्वमिहागतः ॥ २३ ॥
क्रोधाने भरलेल्या स्त्रीचे कठोर वचन ऐकून तू जो मैथिलीस सोडून येथे निघून आलास, यामुळे मी तुझ्यावर संतुष्ट नाही. ॥२३॥
सर्वथा त्वपनीतं ते सीतया यत्प्रचोदितः ।
क्रोधस्य वशमागम्य नाकरोः शासनं मम ॥ २४ ॥
सीतेकडून प्रेरित होऊन, क्रोधाला वश होऊन तू माझ्या आदेशाचे पालन केले नाहीस, हा सर्वथा तुझा अन्याय आहे. ॥२४॥
असौ हि राक्षसः शेते शरेणाभिहतो मया ।
मृगरूपेण येनाहमाश्रमादपवाहितः ॥ २५ ॥
ज्याने मृगरूप धारण करून मला आश्रमापासून दूर नेले तो राक्षस माझ्या बाणांनी घायाळ होऊन कायमचा झोपी गेला आहे. ॥२५॥
विकृष्य चापं परिधाय सायकं
     सलीलबाणेन च ताडितो मया ।
मार्गीं तनुं त्यज्य सविक्लवस्वरो
     बभूव केयूरधरः स राक्षसः ॥ २६ ॥
धनुष्य खेचून त्या बाणाचे संधान करून मी लीलापूर्वक सोडलेल्या बाणांनी जसे त्या मृगास मारले तसे लगेच तो मृगाच्या शरीराचा परित्याग करून बाहूंवर बाजुबंद धारण करणारा राक्षस बनला. त्याच्या स्वरात फार व्याकुळता आलेली होती. ॥२६॥
शराहतेनैव तदार्तया गिरा
     स्वरं ममालम्ब्य सुदूरसुश्रवम् ।
उदाहृतं तद् वचनं सुदारुणं
     त्वमागतो येन विहाय मैथिलीम् ॥ २७ ॥
बाणाने आहत झाल्यावरच त्याने आर्तवाणीने माझ्या स्वराची नक्कल करून खूप दूरपर्यंत ऐकू जाणारे ते अत्यंत दारूण वचन उच्चारले होते, ज्यामुळे तू मैथिली सीतेला सोडून येथे निघून आला आहेस. ॥२७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे एकोनषष्टितमः सर्गः ॥ ५९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदि काव्यांतील अरण्यकाण्डाचा एकोणसाठावा सर्ग पूरा झाला. ॥५९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP