[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ एकविंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
सीताकर्तृकं रावणस्य प्रबोधनं श्रीरामेण सह तुलनायां तस्य तुच्छतायाः प्रतिपादनम् -
सीतेचे रावणास समजाविणे आणि त्यास श्रीरामासमोर नगण्य दाखविणे -
तस्या तद् वचनं श्रुत्वा सीता रौद्रस्य रक्षसः ।
आर्ता दीनस्वरा दीनं प्रत्युवाच ततः शनैः ॥ १ ॥
त्या भयंकर राक्षसाचे ते वचन ऐकून सीतेला अत्यन्त कष्ट झाले. तिने दीन वाणीने अत्यन्त दुःखाने हळू हळू त्यास उत्तर देण्यास आरंभ केला. ॥१॥
दुःखार्ता रुदती सीता वेपमाना तपस्विनी ।
चिन्तयन्ती वरारोहा पतिमेव पतिव्रता ॥ २ ॥
त्या समयी ती सुन्दर शरीर असलेली पतिव्रता देवी तपस्विनी सीता, दुःखाने आर्त होऊन रडत असता थरथर कापत होती आणि आपल्या पतीचेच चिन्तन करीत होती. ॥२॥
तृणमन्तरतः कृत्वा प्रत्युवाच शुचिस्मिता ।
निवर्तय मनो मत्तः स्वजने प्रीयतां मनः ॥ ३ ॥
पवित्र हास्य करणारी ती विदेहनन्दिनी मध्ये गवताची काडी धरून रावणास या प्रकारे उत्तर देऊ लागली- तू माझ्यावरून आपले मन काढून घे आणि आत्मीय जणांवर (आपल्याच पत्‍नींच्यावर) प्रेम कर. ॥३॥
न मां प्रार्थयितुं युक्तस्त्वं सिद्धिमिव पापकृत् ।
अकार्यं न मया कार्यं एकपत्‍न्या विगर्हितम् ॥ ४ ॥
ज्याप्रमाणे पापाचारी पुरुषाने सिद्धिची इच्छा करणे योग्य नाही त्या प्रमाणे तू माझी इच्छा करण्यास योग्य नाहीस. जे पतिव्रतेने करण्यास निन्दित आहे, अयोग्य आहे, असे कार्य मी कदापिही करू शकत नाही. ॥४॥
कुलं संप्राप्तया पुण्यं कुले महति जातया ।
एवमुक्त्वा तु वैदेही रावणं तं यशस्विनी ॥ ५ ॥

रावणं पृष्ठतः कृत्वा भूयो वचनमब्रवीत् ।
नाहमौपयिकी भार्या परभार्या सती तव ॥ ६ ॥
कारण मी एका महान कुळात उत्पन्न झालेली असून विवाह करून एका पवित्र कुळात आलेली आहे. रावणास या प्रमाणे सांगून यशस्विनी वैदेहीने त्याच्याकडे पाठ फिरविली आणि ती म्हणाली - रावणा ! मी सती असून परस्त्री आहे, मी तुझी भार्या होण्यास योग्य नाही. ॥५-६॥
साधु धर्ममवेक्षस्व साधु साधुव्रतं चर ।
यथा तव तथान्येषां रक्ष्या दारा निशाचर ॥ ७ ॥
निशाचरा ! तू श्रेष्ठ धर्माकडे लक्ष दे आणि सन्त पुरुषांच्या व्रताचे यथायोग्य पालन कर. ज्या प्रमाणे तुझ्या स्त्रियांना तुझ्याकडून संरक्षण प्राप्त होते त्या प्रमाणेच दुसर्‍यांच्या स्त्रियांचेही तू संरक्षण केले पाहिजेस. ॥७॥
आत्मानमुपमां कृत्वा स्वेषु दारेषु रम्यताम् ।
अतुष्टं स्वेषु दारेषु चपलं चपलेन्द्रियम् ।
नयन्ति निकृतिप्रज्ञं परदाराः पराभवम् ॥ ८ ॥
तू स्वतःला आदर्श बनवून आपल्या स्त्रियांच्या ठिकाणीच अनुरक्त व्हावेस. जो आपल्या स्त्रियांच्यामुळे सन्तुष्ट रहात नाही आणि ज्याची बुद्धि धिक्कार करण्यायोग्य आहे अशा चपळ इन्द्रिये असलेल्या चंचल पुरुषास परस्त्रिया पराजित करतात - त्याच्या फजितीस कारणीभूत होतात. ॥८॥
इह सन्तो न वा सन्ति सतो वा नानुवर्तसे ।
यथा हि विपरीता ते बुद्धिराचारवर्जिता ॥ ९ ॥
काय येथे कोणीच सत्पुरुष राहात नाहीत की काय ? अथवा सत्पुरुष राहात असूनही तू त्यांचे अनुसरण करीत नाहीस की काय ? आणि त्यामुळेच तुझी बुद्धि अशी विपरित आणि सदाचार शून्य झाली आहे कि काय ? ॥९॥
वचो मिथ्याप्रणीतात्मा पथ्यमुक्तं विचक्षणैः ।
राक्षसानामभावाय त्वं वान प्रतिपद्यसे ॥ १० ॥
अथवा बुद्धिमान पुरुष तुझ्या हिताची जी गोष्ट सांगतात, तिला निरर्थक मानून राक्षसांच्या विनाशास उद्यत झाल्यामुळे तू त्यांचा उपदेश ग्रहणच करीत नाहीस. ॥१०॥
अकृतात्मानमासाद्य राजानमनये रतम् ।
समृद्धानि विनश्यन्ति राष्ट्राणि नगराणि च ॥ ११ ॥
ज्याचे मन अपवित्र असते आणि जो सदुपदेशही ग्रहण करीत नाही अशा अन्यायी राजाच्या हाती पडल्याने अत्यन्त मोठी समृद्धशाली राज्ये आणि नगरेही नष्ट होत असतात. ॥११॥
तथैव त्वां समासाद्य लंका रत्‍नौघसंकुला ।
अपराधात् तवैकस्य नचिराद् विनशिष्यति ॥ १२ ॥
याप्रमाणेच ही रत्‍नराशीने परिपूर्ण लङ्‌कानगरी तुझ्या हाती पडल्याने आता तुझ्या एकट्याच्या अपराधामुळे अत्यन्त शीघ्र नष्ट होऊन जाईल. ॥१२॥
स्वकृतैर्हन्यमानस्य रावणादीर्घदर्शिनः ।
अभिनन्दन्ति भूतानि विनाशे पापकर्मणः ॥ १३ ॥
रावणा ! ज्यावेळी कोणी अदूरदर्शी पापाचारी आपल्या कुकर्माने मारला जातो त्यावेळी त्याचा विनाश झाल्यावर समस्त प्राणी प्रसन्न होतात. ॥१३॥
एवं त्वां पापकर्माणं वक्ष्यन्ति निकृता जनाः ।
दिष्ट्यैतद् व्यसनं प्राप्तो रौद्र इत्येव हर्षिताः ॥ १४ ॥
याप्रकारे तू ज्यांना कष्ट दिले आहेस, ते सर्व लोक तुला पापी म्हणतील आणि या आततायीला हे कष्ट प्राप्त झाले आहेत हे फार उत्तम झाले असे म्हणून हर्षित होतील. ॥१४॥
शक्या लोभयितुं नाहमैश्वर्येण धनेन वा ।
अनन्या राघवेणाहं भास्करेण यथा प्रभा ॥ १५ ॥
ज्याप्रमाणे सूर्यापासून त्याची प्रभा वेगळी होऊ शकत नाही त्याप्रमाणे मी श्रीरघुनाथापासून अभिन्न आहे. ऐश्वर्य अथवा धनाच्या द्वारे तू मला भुलवू शकणार नाहीस. ॥१५॥
उपधाय भुजं तस्य लोकनाथस्य सत्कृतम् ।
कथं नामोपधास्यामि भुजमन्यस्य कस्यचित् ॥ १६ ॥
लोकनाथ (जगदीश्वर) अशा श्रीरामचन्द्रांच्या सन्मानित भुजांवर मस्तक ठेवल्यानन्तर दुसर्‍या कुणाच्या बाहूची उशी मी कशी करेन ? ॥१६॥
अहमौपयिकी भार्या तस्यैव च धरापतेः ।
व्रतस्नातस्य विद्येव विप्रस्य विदितात्मनः ॥ १७ ॥
ज्याप्रकारे वेदविद्या आत्मज्ञानी स्नातक ब्राह्मणाचीच संपत्ति होत असते त्याप्रमाणे मी केवळ त्या पृथ्वीपती रघुनाथाचीच भार्या होण्यास योग्य आहे. ॥१७॥
साधु रावण रामेण मां समानय दुःखिताम् ।
वने वासितया सार्धं करेण्वेव गजाधिपम् ॥ १८ ॥
रावणा ! तुझ्यासाठी हेच योग्य आहे की ज्याप्रमाणे वनात समागमाची इच्छा करणार्‍या हत्तीणीची कुणी गजराजाशी गांठ घालून द्यावी, त्याप्रमाणे तू माझ्या सारख्या दुःखितेची श्रीरामाशीच गांठ घालून द्यावीस. ॥१८॥
मित्रमौपयिकं कर्तुं रामः स्थानं परीप्सता ।
बन्धं चानिच्छता घोरं त्वयासौ पुरुषर्षभः ॥ १९ ॥
जर तुला आपल्या नगरीची सुरक्षितता आणि स्वतःचा दारूण वधापासून बचाव व्हावा अशी इच्छा असेल तर तू पुरुषोत्तम रामास आपला मित्र बनव, कारण तेच मित्र बनविण्यास लायक आहेत. ॥१९॥
विदितः सर्वधर्मज्ञः शरणागतवत्सलः ।
तेन मैत्री भवतु ते यदि जीवितुमिच्छसि ॥ २० ॥
भगवान श्रीरामच धर्माचे ज्ञाते आणि सुप्रसिद्ध शरणागत वत्सल आहेत. जर तुला जिवन्त राहाण्याची इच्छा असेल तर त्यांच्याशी तुझी मैत्रीच व्हावयास पाहिजे. ॥२०॥
प्रसादयस्व त्वं चैनं शरणागतवत्सलम् ।
मां चास्मै प्रयतो भूत्वा निर्यातयितुमर्हसि ॥ २१ ॥
तू शरणागतवत्सल श्रीरामांना शरण जाऊन त्यांना प्रसन्न करून घे. आणि शुद्ध हृदय होऊन मला त्यांच्याकडे परत पाठव. ॥२१॥
एवं हि ते भवेत् स्वस्ति सम्प्रदाय रघूत्तमे ।
अन्यथा त्वं हि कुर्वाणः परां प्राप्स्यसि चापदम् ॥ २२ ॥
या प्रकारे मला श्रीरामांच्या हाती सोपविलेस तरच तुझे भले होईल. याच्या विरूद्ध आचरण केलेस तर तू फार मोठ्या संकटास पडशील. ॥२२॥
वर्जयेद् वज्रमुत्सृष्टं वर्जयेतन्तकश्चिरम् ।
त्वद्विधं न तु संक्रुद्धो लोकनाथः स राघवः ॥ २३ ॥
तुझ्या सारख्या निशाचराची इन्द्राच्या हातून सुटलेल्या वज्रापासून अथवा काळापासूनही दीर्घ काळ सुटका होऊ शकेल (उपेक्षा होऊ शकेल) परन्तु क्रोधाविष्ट झालेले लोकनाथ श्रीराम तुला कदापि सोडणार नाहीत. ॥२३॥
रामस्य धनुषः शब्दं श्रोष्यसि त्वं महास्वनम् ।
शतक्रतुविसृष्टस्य निर्घोषमशनेरिव ॥ २४ ॥
इन्द्राने सोडलेल्या वज्राच्या गडगडाटाप्रमाणे तूं श्रीरामचन्द्रांच्या धनुष्याचा घोर टणत्कार ऐकशील. ॥२४॥
इह शीघ्रं सुपर्वाणो ज्वलितास्या इवोरगाः ।
इषवो निपतिष्यन्ति रामलक्ष्मणलक्षिताः ॥ २५ ॥
येथे श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या नावांनी चिन्हित झालेले, उत्कृष्ट आणि प्रदिप्त मुखे असलेल्या भुजंगाप्रमाणे दिसत असलेले बाण लवकरच तुझ्यावर येऊन पडतील. ॥२५॥
रक्षांसि निहनिष्यन्तः पुर्यामस्यां न संशयः ।
असम्पातं करिष्यन्ति पतन्तः कङ्‌कवाससः ॥ २६ ॥
कंक पक्ष्यांच्या पिसांनी युक्त असलेले त्यांचे बाण या पुरीत राक्षसांचा घात करतील यात संशय नाही. ते अशा प्रकारे वर्षाव करतील की येथे तिळभर जागा मोकळी राहाणार नाही. ॥२६॥
राक्षसेन्द्रमहासर्पान् स रामगरुडो महान् ।
उद्धरिष्यति वेगेन वैनतेय इवोरगान् ॥ २७ ॥
विनतापुत्र गरूड ज्याप्रमाणे मोठ मोठ्या सर्पांना वेगाने आणि त्वरेने नेऊन त्यांचा संहार करतो त्याप्रमाणे श्रीरामरूपी महान गरूड राक्षसराजरूपी मोठ मोठ्या सर्पांना वेगाने आणि त्वरेने या नगरीतून उचलून नेईल. ॥२७॥
अपनेष्यति मां भर्ता त्वत्तः शीघ्रमरिन्दमः ।
असुरेभ्यः श्रियं दीप्तां विष्णुस्त्रिभिरिव क्रमैः ॥ २८ ॥
ज्याप्रमाणे भगवान विष्णूने आपल्या तीन पावलांच्या द्वारे असुरांपासून त्यांची उज्ज्वल लक्ष्मी हरण केली, त्याप्रमाणे माझे स्वामी शत्रुसूदन श्रीराम मला शीघ्रच तुझ्यापासून घेऊन जातील. ॥२८॥
जनस्थाने हतस्थाने निहते रक्षसां बले ।
अशक्तेन त्वया रक्षः कृतमेतदसाधु वै ॥ २९ ॥
राक्षसा ! ज्यावेळी राक्षसांच्या सेनेचा संहार होण्यामुळे जनस्थानातील तुझा आश्रय नष्ट झाला, तेव्हा तू युद्ध करव्यास असमर्थ झालास आणि म्हणून तेव्हा तू छलकपटाने, चोरीने हे नीच कर्म केलेस. ॥२९॥
आश्रमं तत्तयोः शून्यं प्रविश्य नरसिंहयोः ।
गोचरं गतयोर्भ्रात्रोरपनीता त्वयाधम ॥ ३० ॥
नीच निशाचरा ! ते पुरुषसिंह दोघे बन्धु श्रीराम आणि लक्ष्मण वनामध्ये गेले असता, आश्रमात कोणी नाही असे पाहून तू प्रवेश केलास आणि तेथून माझे हरण केलेस. त्यावेळी ते मायामृगाला मारण्याकरिता गेलेले होते. नाही तर तेव्हाच तुला या नीच कृत्याचे फळ मिळाले असते. ॥३०॥
नहि गन्धमुपाघ्राय रामलक्ष्मणयोस्त्वया ।
शक्यं सन्दर्शने स्थातुं शुना शार्दूलयोरिव ॥ ३१ ॥
श्रीराम आणि लक्ष्मण यांचा केवळ गन्ध आला तरी तू त्यांच्या समोर टिकू शकणार नाहीस. दोन दोन वाघांच्या समोर कुत्रा कधी टिकू तरी शकेल का ? ॥३१॥
तस्य ते विग्रहे ताभ्यां युगग्रहणमस्थिरम् ।
वृत्रस्येवेन्द्रबाहुभ्यां बाहोरेकस्य विग्रहे ॥ ३२ ॥
ज्या प्रमाणे इन्द्रांच्या दोन्ही बाहू बरोबर युद्ध करण्याचा भास सहन होईनासा होतो त्याप्रमाणे समरांगणात त्या दोन्ही भावांबरोबर युद्ध सुरू झाले तर तू अथवा तुला सहाय्य करणारे तुझे सैन्य यापैकी कोणी ही टिकू शकणार नाही. ॥३२॥
क्षिप्रं तव स नाथो मे रामः सौमित्रिणा सह ।
तोयमल्पमिवादित्यः प्राणानादास्यते शरैः ॥ ३३ ॥
ते माझे प्राणनाथ श्रीराम, सुमित्रापुत्र लक्ष्मणासह, सूर्य ज्याप्रमाणे थोड्याशा जलास आपल्या किरणांच्या द्वारा शीघ्र शोषून टाकतो, त्याप्रमाणे आपल्या बाणांच्या द्वारे शीघ्र तुझे प्राण हरण करतील. ॥३३॥
गिरिं कुबेरस्य गतोऽथवाऽऽलयं
सभां गतो वा वरुणस्य राज्ञः
असंशयं दाशरथेर्विमोक्ष्यसे
महाद्रुमः कालहतोऽशनेरिव ॥ ३४ ॥
तू कुबेराच्या कैलासपर्वतावर गेलास अथवा वरूणाच्या सभेत जाऊन लपून बसलास तरी काळाने मारलेला विशालवृक्ष जसा वज्राचा आघात होताच नष्ट होतो त्याप्रमाणे तूही दशरथनन्दन श्रीरामाच्या बाणांनी मारला जाऊन तात्काळ आपल्या प्राणास मुकशील यात जराही संशय नाही, कारण काळाने प्रथमच तुला मारलेला आहे. ॥३४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे एकविंशः सर्गः ॥ २१ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा एकविसावा सर्ग पूरा झाला. ॥२१॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP