श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ अष्टादशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
रावणेन मरुत्तस्य पराजय, इन्द्रादिभिर्मयूरादिभ्यो वरदानं च -
रावण द्वारा मरुत्ताचा पराजय तसेच इंद्र आदि देवतांनी मयूर आदि पक्ष्यांना वरदान देणे -
प्रविष्टायां हुताशं तु वेदवत्यां स रावणः ।
पुष्पकं तु समारुह्य परिचक्राम मेदिनीम् ॥ १ ॥
(अगस्त्य म्हणतात - रघुनंदन !) वेदवतीने अग्निमध्ये प्रवेश केल्यावर रावण पुष्पक विमानावर आरूढ होऊन पृथ्वीवर सर्वत्र भ्रमण करू लागला. ॥१॥
ततो मरुत्तं नृपतिं यजन्तं सह दैवतैः ।
उशीरबीजमासाद्य ददर्श स तु रावणः ॥ २ ॥
त्याच यात्रेत उशीरबीज नामक देशात पोहोचल्यावर रावणाने पाहिले, राजा मरुत्त देवतांसह बसून यज्ञ करत आहे. ॥२॥
संवर्तो नाम ब्रह्मर्षिः साक्षाद्‌भ्राता बृहस्पतेः ।
याजयामास धर्मज्ञः सर्वैर्देवगणैर्वृतः ॥ ३ ॥
त्या समयी साक्षात्‌ बृहस्पतिंचे भाऊ तसेच धर्माचे मर्म जाणणारे ब्रह्मर्षि संवर्त देवतांनी घेरलेले राहून तो यज्ञ करवून घेत होते. ॥३॥
दृष्ट्‍वा देवास्तु तद् रक्षो वरदानेन दुर्जयम् ।
तिर्यग्योनिं समाविष्टाः तस्य धर्षणभीरवः ॥ ४ ॥
ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे ज्याला जिंकणे कठीण झाले होते त्या राक्षस रावणाला तेथे पाहून त्याच्या आक्रमणाने भयभीत होऊन देवतांनी तिर्यग्‌-योनिमध्ये प्रवेश केला. ॥४॥
इन्द्रो मयूरः संवृत्तो धर्मराजस्तु वायसः ।
कृकलासो धनाध्यक्षो हंसश्च वरुणोऽभवत् ॥ ५ ॥
इंद्र मोर, धर्मराज कावळा, कुबेर सरडा आणि वरुण हंस झाले. ॥५॥
अन्येष्वपि गतेष्वेवं देवेष्वरिनिषूदन ।
रावणः प्राविशद् यज्ञं सारमेय इवाशुचिः ॥ ६ ॥
शत्रुसूदन श्रीरामा ! या प्रकारे इतर देवताही जेव्हा विभिन्न रूपात स्थित झाल्या तेव्हा रावणाने त्या यज्ञमंडपात प्रवेश केला. जणु कुणी अपवित्र कुत्राच तेथे आला असावा. ॥६॥
तं च राजानमासाद्य रावणो राक्षसाधिपः ।
प्राह युद्धं प्रयच्छेति निर्जितोऽस्मीति वा वद ॥ ७ ॥
राजा मरुत्ताच्या जवळ पोहोचून राक्षसराज रावणाने म्हटले - माझ्याशी युद्ध कर अथवा आपल्या तोंडाने असे सांग की मी पराजित झालो आहे. ॥७॥
ततो मरुत्तो नृपतिः को भवानित्युवाच तम् ।
अपहासं ततो मुक्त्वा रावणो वाक्यमब्रवीत् ॥ ८ ॥
तेव्हा राजा मरूत्ताने विचारले - आपण कोण आहात ? त्यांचा प्रश्न ऐकून रावण हसू लागला आणि बोलला - ॥८॥
अकुतूहलभावेन प्रीतोऽस्मि तव पार्थिव ।
धनदस्यानुजं यो मां नावगच्छसि रावणम् ॥ ९ ॥
भूपाल ! मी कुबेराचा लहान भाऊ रावण आहे, आणि तरीही तू मला जाणत नाहीस आणि मला पाहूनही तुझ्या मनात कौतूहल झाले नाही अथवा भयही वाटले नाही, यामुळे मी तुझ्यावर फार प्रसन्न आहे. ॥९॥
त्रिषु लोकेषु कोऽन्योऽस्ति यो न जानाति मे बलम् ।
भ्रातरं येन निर्जित्य विमानमिदमाहृतम् ॥ १० ॥
तीन्ही लोकात तुझ्या शिवाय असा दुसरा कोणी राजा नसेल, जो माझे बळ जाणत नसेल. मी तो रावण आहे ज्याने आपला भाऊ कुबेर यास जिंकून हे विमान हिरावून घेतले आहे. ॥१०॥
ततो मरुत्तः स नृपः तं रावणमथाब्रवीत् ।
धन्यः खलु भवान्येन ज्येष्ठो भ्राता रणे जितः ॥ ११ ॥
तेव्हा राजा मरूत्ताने रावणाला म्हटले - तू धन्य आहेस की ज्याने आपल्या मोठ्‍या भावाला रणभूमीमध्ये पराजित केले आहे. ॥११॥
न त्वया सदृशः श्लाघ्यः त्रिषु लोकेषु विद्यते ।
क त्वं प्राक्केवलं धर्मं चरित्वा लब्धवान् वरम् ॥ १२ ॥
तुझ्या सारखा स्पृहणीय पुरुष तीन्ही लोकात दुसरा कोणी नाही आहे. तू पूर्वकाळी कुठल्या शुद्ध धर्माचे आचरण करून वर प्राप्त केला आहेस. ॥१२॥
श्रूतपूर्वं हि न मया भाषसे यादृशं स्वयम् ।
तिष्ठेदानीं न मे जीवन् प्रतियास्यसि दुर्मते ॥ १३ ॥

अद्य त्वां निशितैर्बाणैः प्रेषयामि यमक्षयम् ।
तू स्वतः जी गोष्ट सांगत आहेस अशी गोष्ट मी पूर्वी कधी ऐकलेली नाही आहे. दुर्बुद्धे ! यावेळी उभा तर रहा. माझ्या हातून जिवंत वाचून तू जाऊ शकणार नाहीस. आज आपल्या तीक्ष्ण बाणांनी मारून मी तुला यमलोकी पोहोचवून देतो. ॥१३ १/२॥
ततः शरासनं गृह्य सायकांश्च नराधिपः ॥ १४ ॥

रणाय निर्ययौ क्रुद्धः संवर्तो मार्गमावृणोत् ।
त्यानंतर राजा मरूत्त धनुष्य-बाण घेऊन अत्यंत रोषाने युद्धासाठी निघाले, परंतु महर्षि संवर्तानी त्यांना अडविले. ॥१४ १/२॥
सोऽब्रवीत् स्नेहसंयुक्तं मरुत्तं तं महानृषिः ॥ १५ ॥

श्रोतव्यं यदि मद्वाक्यं सम्प्रहारो न ते क्षमः ।
त्या महर्षिनी महाराज मरूत्ताला स्नेहपूर्वक म्हटले - राजन्‌ ! जर आपण माझ्या वाक्यास ऐकून त्यावर ध्यान देणे उचित समजत असाल तर ऐका, तुमच्यासाठी युद्ध करणे उचित नाही. ॥१५ १/२॥
माहेश्वरमिदं सत्रं असमाप्तं कुलं दहेत् ॥ १६ ॥

दीक्षितस्य कुतो युद्धं क्रोधित्वं दीक्षिते कुतः ।
हा माहेश्वर यज्ञ आरंभला गेला आहे, जर पूरा झाला नाही तर तुझ्या समस्त कुळाला दग्ध करून टाकील. ज्याने यज्ञाची दीक्षा घेतलेली आहे त्याच्यासाठी युद्धासाठी अवसरच कोठे आहे ? यज्ञदीक्षित पुरुषाच्या ठिकाणी क्रोधासाठी स्थानच कोठे आहे ? ॥१६ १/२॥
संशयश्च जये नित्यं राक्षसश्च सुदुर्जयः ॥ १७ ॥

स निवृत्तो गुरोर्वाक्यान् मरुत्तः पृथिवीपतिः ।
विसृज्य सशरं चापं स्वस्थो मखमुखोऽभवत् ॥ १८ ॥
युद्धामध्ये कोणाचा विजय होईल हा प्रश्न सदा संशयास्पदच असतो. तिकडे तो राक्षस अत्यंत दुर्जय आहे. आपल्या आचार्यांच्या या कथनामुळे पृथ्वीपति मरूत्त युद्धापासून निवृत्त झाले त्यांनी धनुष्यबाणाचा त्याग केला आणि स्वस्थभावाने ते यज्ञासाठी उन्मुख झाले. ॥१७-१८॥
ततस्तं निर्जितं मत्वा घोषयामास वै शुकः ।
रावणो जयतीत्युच्चैः हर्षान् नादं विमुक्तवान् ॥ १९ ॥
तेव्हा त्यांना पराजित झालेले मानून शुकाने घोषणा केली की महाराज रावणांचा विजय झाला आहे आणि तो अत्यंत हर्षाने उच्चस्वराने सिंहनाद करू लागला. ॥१९॥
तान्भक्षयित्वा तत्रस्थान् महर्षीन् यज्ञमागतान् ।
वितृप्तो रुधिरैस्तेषां पुनः सम्प्रययौ महीम् ॥ २० ॥
त्या यज्ञात येऊन बसलेल्या महर्षिंना खाऊन त्यांच्या रक्तांनी पूर्णतः तृप्त होऊन रावण परत पृथ्वीवर विचरण करू लागला. ॥२०॥
रावणे तु गते देवाः सेन्द्राश्चैव दिवौकसः ।
ततः स्वां योनिमासाद्य तानि सत्त्वानि चाब्रुवन् ॥ २१ ॥
रावण निघून गेल्यावर इंद्रासहित सर्व देवता पुन्हा आपल्या स्वरूपात प्रकट होऊन त्या त्या प्राण्यांना (ज्यांच्या रूपात ते स्वतः प्रकट झाले होते) वरदान देत म्हणाल्या - ॥२१॥
हर्षात्तदाब्रवीद् इन्द्रो मयूरं नीलबर्हिणम् ।
प्रीतोऽस्मि तव धर्मज्ञ भुजङ्‌गाद्धि न ते भयम् ॥ २२ ॥
सर्वात प्रथम इंद्रांनी हर्षपूर्वक निळ्या पंखाच्या मोरास म्हटले -धर्मज्ञा ! मी तुझ्यावर फार प्रसन्न आहे. तुला सर्पापासून भय राहणार नाही. ॥२२॥
इदं नेत्रसहस्रं तु यत् तद् बर्हे भविष्यति ।
वर्षमाणे मयि मुदं प्राप्स्यसे प्रीतिलक्षणाम् ॥ २३ ॥

एवमिन्द्रो वरं प्रादान् मयूरस्य सुरेश्वरः ॥ २४ ॥
माझे सहस्त्र नेत्र आहेत, त्यांच्याप्रमाणे चिह्ने तुझ्या पंखामध्ये प्रकट होतील. जेव्हा मी मेघरूपाने वर्षा करीन त्यावेळी तुला फार प्रसन्नता प्राप्त होईल. ती प्रसन्नता माझ्या प्राप्तिला लक्षित करणारी होईल. या प्रकारे देवराज इंद्रांनी मोराला वरदान दिले. ॥२३-२४॥
नीलाः किल पुरा बर्हा मयूराणां नराधिप ।
सुराधिपाद् वरं प्राप्य गताः सर्वेऽपि बर्हिणः ॥ २५ ॥
नरेश्वर श्रीरामा ! या वरदानापूर्वी मोरांचे पंख केवळ निळ्या रंगाचे होते. देवराजाकडून वर मिळून सर्व मयूर तेथून निघून गेले. ॥२५॥
धर्मराजोऽब्रवीद् राम प्राग्वंशे वायसं प्रति ।
पक्षिंस्तवास्मि सुप्रीतः प्रीतस्य वचनं शृणु ॥ २६ ॥
श्रीरामा ! त्यानंतर धर्मराजाने प्राग्वंशाच्या छतावर बसलेल्या कावळ्याला म्हटले -पक्षी ! मी तुझ्यावर फार प्रसन्न आहे. प्रसन्न होऊन जे वचन बोलतो आहे ते ऐक. ॥२६॥
यथान्ये विविधै रोगै; पीड्यन्ते प्राणिनो मया ।
ते न ते प्रभविष्यन्ति मयि प्रीते न संशयः ॥ २७ ॥
ज्याप्रमाणे दुसर्‍या प्राण्यांना मी नाना रोगांच्या द्वारे पीडित करतो, ते रोग माझ्या प्रसन्नतेमुळे तुझ्यावर आपला प्रभाव पाडू शकणार नाहीत, यात संशय नाही. ॥२७॥
मृत्युतस्ते भयं नास्ति वरान्मम विहंगम ।
यावत् त्वां न वधिष्यन्ति नरास्तावद्‌ भविष्यसि ॥ २८ ॥
विहंगम ! माझ्या वरदानाने तुला मृत्युचेही भय असणार नाही, जो पर्यंत मनुष्य आदि प्राणी तुझा वध करणार नाहीत, तोपर्यंत तू जिवंत राहाशील. ॥२८॥
ये च मद् विषयस्था वै मानवाः क्षुधयार्दिताः ।
त्वयि भुक्ते सुतृप्तास्ते भविष्यन्ति सबान्धवाः ॥ २९ ॥
माझ्या राज्यात - यमलोकात स्थित राहून जे मानव भुकेने पीडित आहेत त्यांचे पुत्र आदि या भूतलावर जेव्हां तुम्हांला भोजन करवतील तेव्हा ते बंधु-बांधवांसह परम तृप्त होतील. ॥२९॥
वरुणस्त्वब्रवीद् हंसं गङ्‌गातोयविचारिणम् ।
श्रूयतां प्रीतिसंयुक्तं वचः पत्ररथेश्वर ॥ ३० ॥
त्यानंतर वरुणाने गंगेच्या जलात विचरणार्‍या हंसाला संबोधित करून म्हटले - पक्षिराज ! माझे प्रेमपूर्ण वचन ऐका - ॥३०॥
वर्णो मनोहरः सौम्यः चन्द्रमण्डलसंनिभः ।
भविष्यति तवोदग्रः शुद्धफेनसमप्रभः ॥ ३१ ॥
तुमच्या शरीराचा रंग चंद्रमंडल तसेच शुद्ध फेनासमान परम उज्ज्वल, सौम्य तथा मनोरम होईल. ॥३१॥
मच्छरीरं समासाद्य कान्तो नित्यं भविष्यसि ।
प्राप्स्यसे चातुलां प्रीतिं एतन्मे प्रीतिलक्षणम् ॥ ३२ ॥
माझ्या अङ्‌गभूत जलाचा आश्रय घेऊन तू सदा कांतिमान्‌ बनून राहाशील आणि तुला अनुपम प्रसन्नता प्राप्त होईल. हेच माझ्या प्रेमाचे परिचायक चिह्न होईल. ॥३२॥
हंसानां हि पुरा राम नीलवर्णः सर्वपाण्डुरः ।
पक्षा नीलाग्रसंवीताः क्रोडाः शष्पाग्रनिर्मलाः ॥ ३३ ॥
श्रीरामा ! पूर्वकाळी हंसांचा रंग पूर्णतः श्वेत नव्हता. त्यांच्या पंखांचा अग्रभाग निळा आणि दोन्ही भुजांच्या मधला भाग नूतन-दूर्वादलाच्या अग्रभागा सारखा कोमल आणि श्याम वर्णाने युक्त होता. ॥३३॥
अथाब्रवीद् वैश्रवणः कृकलासं गिरौ स्थितम् ।
हैरण्यं सम्प्रयच्छामि वर्णं प्रीतस्तवाप्यहम् ॥ ३४ ॥
त्यानंतर विश्रवाचे पुत्र कुबेर यांनी पर्वतशिखरावर बसलेल्या कृकलाला (सरड्‍याला) म्हटले - मी प्रसन्न होऊन तुला सुवर्णासमान सुंदर रंग प्रदान करत आहे. ॥३४॥
सद्रव्यं च शिरो नित्यं भविष्यति तवाक्षयम् ।
एष काञ्चनको वर्णो मत्प्रीत्या ते भविष्यति ॥ ३५ ॥
तुझे शरीर सदाच सुवर्णसमान रंगाचे आणि अक्षय होईल. माझ्या प्रसन्नतेने तुझा हा (काळा) रंग सोनेरी रंगात परिवर्तीत होऊन जाईल. ॥३५॥
एवं दत्त्वा वरांस्तेभ्यः तस्मिन् यज्ञोत्सवे सुराः ।
निवृत्ताः सह राज्ञा ते पुनः स्वभवनं गताः ॥ ३६ ॥
याप्रकारे त्यांना उत्तम वर देऊन त्या सर्व देवता तो यज्ञोत्सव समाप्त झाल्यावर राजा मरूत्तासह पुन्हा आपल्या भवनास -स्वर्गलोकास निघून गेल्या. ॥३६॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डेऽष्टादशः सर्गः ॥ १८ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा अठरावा सर्ग पूरा झाला. ॥१८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP