[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ अष्टमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
प्रातः सुतीक्ष्णेनानुज्ञातस्य लक्ष्मणसीतासहितस्य श्रीरामस्य ततः प्रस्थानम् -
प्रातःकाळी सुतीक्ष्णांचा निरोप घेऊन श्रीराम, लक्ष्मण, सीतेची तेथून प्रस्थान -
रामस्तु सहसौमित्रिः सुतीक्ष्णेनाभिपूजितः ।
परिणाम्य निशां तत्र प्रभाते प्रत्यबुध्यत ॥ १ ॥
सुतीक्ष्ण द्वारा उत्तम प्रकारे पूजित होऊन लक्ष्मणासहित श्रीरामांनी त्यांच्या आश्रमातच ती रात्र घालवून प्रातःकाल होतांच ते जागे झाले. ॥१॥
उत्थाय तु यथाकालं राघवः सह सीतया ।
उपस्पृश्य सुशीतेन तोयेनोत्पलगन्धिना ॥ २ ॥

अथ तेऽग्निं सुरांश्चैव वैदेही रामलक्ष्मणौ ।
काल्यं विधिवदभ्यर्च्य तपस्विशरणे वने ॥ ३ ॥

उदयन्तं दिनकरं दृष्ट्‍वा विगतकल्मषाः ।
सुतीक्ष्णमभिगम्येदं श्लक्ष्णं वचनमब्रुवन् ॥ ४ ॥
सीतेसहित श्रीराम आणि लक्ष्मणांनी योग्य समयी उठून कमलाच्या सुगंधाने सुवासिक झालेल्या परम शीतल जलाने स्नान केले. त्यानंतर त्या तिघांनी मिळून विधिपूर्वक अग्नि आणि देवतांची प्रातःकालीन पूजा केली. त्यानंतर तपस्वी जनांच्या आश्रयभूत वनात उदित झालेल्या सूर्वदेवांचे दर्शन घेऊन ते तिघेही निष्पाप पथिक, सुतीक्ष्ण मुनिंच्या जवळ गेले आणि मधुर वचनांनी म्हणाले - ॥२-४॥
सुखोषिताः स्म भगवंस्त्वया पूज्येन पूजिताः ।
आपृच्छामः प्रयास्यामो मुनयस्त्वरयन्ति नः ॥ ५ ॥
’भगवन् ! आपण पूजनीय असूनही आमची पूजा आपण केली आहे. आम्ही आपल्या आश्रमात अत्यंत सुखांत राहिलो आहोत. आता आम्ही येथून जात आहोत आणि त्यासाठी आपली आज्ञा इच्छित आहोत. हे मुनि आम्हांला येथून निघण्यासाठी घाई करीत आहेत. ॥५॥
त्वरामहे वयं द्रष्टुं कृत्स्नमाश्रममण्डलम् ।
ऋषीणां पुण्यशीलानां दण्डकारण्यवासिनाम् ॥ ६ ॥
आम्ही दण्डकारण्यात निवास करणार्‍या पुण्यात्मा ऋषिंच्या संपूर्ण आश्रममण्डलाचे दर्शन करण्यासाठी उतावीळ झालो आहोत. ॥६॥
अभ्यनुज्ञातुमिच्छामः सहैभिर्मुनिपुङ्‌गवैः ।
धर्मनित्यैस्तपौदान्तैर्विशिखैरिव पावकैः ॥ ७ ॥
म्हणून आमची इच्छा आहे की आपण धूमरहित अग्निसमान तेजस्वी तपस्येच्या द्वारे इंद्रियांना वश ठेवणार्‍या तसेच नित्यधर्मपरायण या श्रेष्ठ महर्षिंच्या बरोबर येथून जाण्यासाठी आम्हाला आज्ञा द्यावी. ॥७॥
अविषह्यातपो यावत् सूर्यो नातिविराजते ।
अमार्गेणागतां लक्ष्मीं प्राप्येवान्वयवर्जितः ॥ ८ ॥

तावदिच्छामहे गन्तुमित्युक्त्वा चरणौ मुनेः ।
ववन्दे सहसौमित्रिः सीतया सह राघवः ॥ ९ ॥
ज्याप्रमाणे अन्यायाने आलेली संपत्ती प्राप्त झाल्याने एखाद्या नीच कुळांतील मनुष्याच्या ठिकाणी असह्य उग्रता येत असते, त्याप्रमाणे हे सूर्यदेव जोपर्यंत असह्य ताप देणारे होऊन प्रचण्ड तेजाने प्रकाशित होऊ लागलेले नाहीत त्यापूर्वीच आम्ही येथून निघून जाऊ इच्छितो. असे म्हणून लक्ष्मण आणि सीतेसहित श्रीरामांनी मुनिंच्या चरणांना वंदन केले. ॥८-९॥
तौ संस्पृशन्तौ चरणावुत्थाप्य मुनिपुंगवः ।
गाढमाश्लिष्य सस्नेहमिदं वचनमब्रवीत् ॥ १० ॥
आपल्या चरणांना स्पर्श करीत असलेल्या श्रीराम आणि लक्ष्मणांना उठवून मुनिवर सुतीक्ष्णांनी हृदयाशी घट्ट आवळून धरले आणि अत्यंत स्नेहाने या प्रकारे म्हटले - ॥१०॥
अरिष्टं गच्छ पन्थानं राम सैमित्रिणा सह ।
सीतया चानया सार्धं छाययेवानुवृत्तया ॥ ११ ॥
’श्रीरामा ! आपण छायेप्रमाणे आपले अनुसरण करणार्‍या या धर्मपत्‍नी सीता तसेच सौमित्र लक्ष्मणासह आपण यात्रा करावी. आपला मार्ग विघ्नबाधांपासून रहित परम मङ्‌गलमय होवो. ॥११॥
पश्याश्रमपदं रम्यं दण्डकारण्यवासिनाम् ।
एषां तपस्विनां वीर तपसा भावितात्मनाम् ॥ १२ ॥
’वीरा ! तपस्येने शुद्ध अंतःकरण झालेल्या दण्डकारण्यवासी या तपस्वी मुनींच्या रमणीय आश्रमांचे आपण दर्शन करावे. ॥१२॥
सुप्राज्यफलमूलानि पुष्पितानि वनानि च ।
प्रशस्तमृगयूथानि शान्तपक्षिगणानि च ॥ १३ ॥
’या यात्रेत आपण मधुर फल-मूलांनी युक्त तसेच फुलांनी सुशोभित अनेक वने पहाल, तेथे उत्तम मृगांच्या झुंडी विचरीत असतील आणि पक्षी शांतभावाने राहात असतील. ॥१३॥
फुल्लपङ्‌कजखण्डानि प्रसन्नसलिलानि च ।
कारण्डवविकीर्णानि तटाकानि सरांसि च ॥ १४ ॥
’आपल्याला बरेचसे असे तलाव आणि सरोवरे दिसतील की ज्यांत प्रफुल्ल कमलांचे समूह शोभत असतील. त्यात स्वच्छ जल भरलेले असेल आणि कारण्डव आदि जलपक्षी सर्व बाजूस पसरलेले असतील. ॥१४॥
द्रक्ष्यसे दृष्टिरम्याणि गिरिप्रस्रवणानि च ।
रमणीयान्यरण्यानि मयूराभिरुतानि च ॥ १५ ॥
’नेत्रांना रमणीय प्रतीत होणार्‍या पहाडातील निर्झरांनी आणि मोरांच्या मधुर बोलीने गुंजत असलेल्या सुरम्य वनस्थलींना ही आपण पहाल. ॥१५॥
गम्यतां वत्स सौमित्रे भवानपि च गच्छतु ।
आगन्तव्यं च ते दृष्ट्‍वा पुनरेवाश्रमं मम ॥ १६ ॥
’श्रीरामा ! जावे. वत्स सौमित्र ! तुम्ही ही जावे ! दण्डकारण्यातील आश्रमांचे दर्शन करून आपल्याला परत याच आश्रमात यावयास पाहिजे.’ ॥१६॥
एवमुक्तस्तथेत्युक्त्वा काकुत्स्थः सहलक्ष्मणः ।
प्रदक्षिणं मुनिं कृत्वा प्रस्थातुमुपचक्रमे ॥ १७ ॥
त्यांनी असे म्हटल्यावर लक्ष्मणासहित श्रीरामांनी ’फारच चांगले’ असे म्हणून मुनिंची परिक्रमा केली आणि तेथून प्रस्थान करण्याची तयारी केली. ॥१७॥
ततः शुभतरे तूणी धनुषी चायतेक्षणा ।
ददौ सीता तयोर्भ्रात्रोः खड्गौ च विमलौ ततः ॥ १८ ॥
त्यानंतर विशाल नेत्र असलेल्या सीतेने त्या दोन्ही भावांच्या हातात दोन परम सुंदर तूणीर, धनुष्ये आणि तळपणारी खड्‍गे प्रदान केली. ॥१८॥
आबध्य च शुभे तूणी चापौ चादाय सस्वनौ ।
निष्क्रान्तावाश्रमाद् गंतुमुभौ तौ रामलक्ष्मणौ ॥ १९ ॥
त्या सुंदर तूणीरांना (भात्यांना) पाठीवर बांधून टंकारणार्‍या (टणत्कार करणार्‍या) धनुष्यांना हातात घेऊन ते दोघे भाऊ श्रीराम आणि लक्ष्मण आश्रमांतून बाहेर पडले. ॥१९॥
शीघ्रं तौ रूपसम्पन्नावनुज्ञातौ महर्षिणा ।
प्रस्थितौ धृतचापासी सीतया सह राघवौ ॥ २० ॥
ते दोन्ही रघुवंशी वीर फारच रूपवान होते. त्यांनी खड्‌ग आणि धनुष्ये धारण करून महर्षिंची आज्ञा घेऊन सीतेसह लवकरच तेथून प्रस्थान केले. ॥२०॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे अष्टम सर्गः ॥ ८ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्ष रामायाण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा आठवा सर्ग पूरा झाला. ॥८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP