श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ अष्टषष्टितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

कुम्भकर्णवधं श्रुत्वा रावणस्य विलापः -
कुंभकर्णाच्या वधाचा समाचार ऐकून रावणाचा विलाप -
कुंभकर्णं हतं दृष्ट्‍वा राघवेण महात्मना ।
राक्षसा राक्षसेन्द्राय रावणाय न्यवेदयन् ॥ १ ॥
महात्मा राघवद्वारा कुंभकर्ण मारला गेल्याचे पाहून राक्षसांनी आपला राजा रावण याच्या जवळ जाऊन त्यास म्हटले- ॥१॥
राजन् स कालसंकाशः संयुक्तः कालकर्मणा ।
विद्राव्य वानरीं सेनां भक्षयित्वा च वानरान् ॥ २ ॥
महाराज ! काळाप्रमाणे भयंकर पराक्रमी कुंभकर्ण वानरसेनेला पळवून तसेच बर्‍याचशा वानरांना आपला आहार बनवून स्वतः ही काळाच्या मुखात निघून गेले. ॥२॥
प्रतपित्वा मुहूर्तं च प्रशान्तो राम तेजसा ।
कायेनार्धप्रविष्टेन समुद्रं भीमदर्शनम् ॥ ३ ॥

निकृत्तनासाकर्णेन विक्षरद् रुधिरेण च ।
रुद्ध्वा द्वारं शरीरेण लङ्‌कायाः पर्वतोपमः ॥ ४ ॥

कुंभकर्णस्तव भ्राता काकुत्स्थशरपीडितः ।
अगण्डभूतो विवृतो दावदग्ध इव द्रुमः ॥ ५ ॥
ते एक मुहूर्तपर्यंत आपल्या प्रतापाने चमकून अंती श्रीरामांच्या तेजाने शांत झाले. त्यांचे धड, भयानक दिसून येणार्‍या समुद्रात घुसले आणि मस्तक, नाक -कान कापले गेल्याने रक्त वाहावत लंकेच्या द्वारावर पडले आहे. त्या शरीराद्वारा आपले भाऊ पर्वताकार कुंभकर्ण लंकेचे द्वार अडवून पडले आहेत. ते श्रीरामांच्या बाणांनी पीडित होऊन हात, पाय आणि मस्तकरहित नंग - धडंग धडाच्या रूपामध्ये परिणत होऊन दावानलाने दग्ध झालेल्या वृक्षाप्रमाणे नष्ट झाले आहेत. ॥३-५॥
श्रुत्वा विनिहतं संख्ये कुंभकर्णं महाबलम् ।
रावणः शोकसन्तप्तो मुमोह च पपात च ॥ ६ ॥
महाबली कुंभकर्ण युद्धस्थलात मारला गेला हे ऐकून रावण शोकाने संतप्त आणि मूर्च्छित झाला आणि तात्काळ पृथ्वीवर पडला. ॥६॥
पितृव्यं निहतं श्रुत्वा देवान्तकनरान्तकौ ।
त्रिशिराश्चातिकायश्च रुरुदुः शोकपीडिताः ॥ ७ ॥
आपल्या चुलत्याच्या निधनाचा समाचार ऐकून देवांतक, नरांतक, त्रिशिरा आणि अतिकाय दुःखाने पीडित होऊन स्फुंदून स्फुंदून रडू लागले. ॥७॥
भ्रातरं निहतं श्रुत्वा रामेणाक्लिष्टकर्मणा ।
महोदरमहापार्श्वौ शोकाक्रान्तौ बभूवतुः ॥ ८ ॥
अनायासेही महान कर्म करणार्‍या श्रीरामांच्या द्वारा भाऊ कुंभकर्ण मारले गेले, हे ऐकून त्याचे सावत्र भाऊ महोदर आणि महापार्श्व शोकाने व्याकुळ झाले. ॥८॥
ततः कृच्छ्रात् समासाद्य संज्ञां राक्षसपुङ्‌गवः ।
कुंभकर्णवधाद् दीनो विललापाकुलेंद्रियः ॥ ९ ॥
त्यानंतर मोठ्या कष्टाने शुद्धिवर आल्यावर राक्षसराज रावण कुंभकर्णाच्या वधाने दुःखी होऊन विलाप करू लागला. त्याची सर्व इंद्रिये शोकाने व्याकुळ झाली होती. ॥९॥
हा वीर रिपुदर्पघ्न कुंभकर्ण महाबल ।
त्वं मां विहाय वै दैवाद् यातोऽसि यमसादनम् ॥ १० ॥
(तो रडत रडत म्हणू लागला - ) हा वीरा ! हा महाबली कुंभकर्ण ! तू शत्रूंच्या दर्पाचे दलन करणारा होतास; परंतु दुर्भाग्यवश मला असाहय सोडून यमलोकास निघून गेलास. ॥१०॥
मम शल्यमनुद्धृत्य बान्धवानां महाबल ।
शत्रुसैन्यं प्रताप्यैकः क्व मां सन्त्यज्य गच्छसि ॥ ११ ॥
महाबली वीरा ! तू माझा तसेच या बंधु-बांधवांचा कण्टक दूर न करताच शत्रुसेनेला संतप्त करून मला सोडून, एकटा कोठे निघून जात आहेस ? ॥११॥
इदानीं खल्वहं नास्मि यस्य मे पतितो भुजः ।
दक्षिणोऽयं समाश्रित्य न बिभेमि सुरासुरात् ॥ १२ ॥
यासमयी मी निश्चितच असून नसल्यासारखाच आहे; कारण की माझा उजवा हात कुंभकर्ण धराशायी झाला आहे; ज्याच्या भरवशावर मी देवता आणि असुर कोणालाही घाबरत नव्हतो. ॥१२॥
कथमेवंविधो वीरो देवदानवदर्पहा ।
कालाग्निरुद्रप्रतिमो ह्यद्य राघवेण रणे हतः ॥ १३ ॥
देवता आणि दानवांचा दर्प चूर करणारा असा वीर, जो कालाग्निसमान प्रतीत होत होता; आज रामाच्या हाताने कसा मारला गेला ? ॥१३॥
यस्य ते वज्रनिष्पेषो न कुर्याद् व्यसनं सदा ।
स कथं रामबाणार्तः प्रसुप्तोऽसि महीतले ॥ १४ ॥
हे बंधो ! तुला तर वज्राचा प्रहारही कधी कष्ट पोहोचवू शकत नव्हता. तोच तू आज रामाच्या बाणांनी पीडित होऊन भूतलावर कसा झोपून राहिला आहेस ? ॥१४॥
एते देवगणाः सार्धं ऋष्टिभिर्गगने स्थिताः ।
निहतं त्वां रणे दृष्ट्‍वा निनदन्ति प्रहर्षिताः ॥ १५ ॥
आज समरांगणात तुला मारला गेलेला पाहून आकाशात उभे असलेल्या या ऋषिंसहित देवता हर्षनाद करत आहेत. ॥१५॥
ध्रुवमद्यैव संहृष्टा लब्धलक्षाः प्लवंगमाः ।
आरोक्ष्यन्तीह दुर्गाणि लङ्‌काद्वाराणि सर्वशः ॥ १६ ॥
निश्चितच आता अवसर मिळताच हर्षाने भरलेले वानर आजच लंकेच्या समस्त दुर्गम द्वारांवर चढतील. ॥१६॥
राज्येन नास्ति मे कार्यं किं करिष्यामि सीतया ।
कुंभकर्णविहीनस्य जीविते नास्ति मे मतिः ॥ १७ ॥
आता मला राज्याशी काही प्रयोजन नाही. सीतेला घेऊनही मी काय करणार आहे ? कुंभकर्णाशिवाय जगावे हे माझ्या मनास मान्य नाही. ॥१७॥
यद्यहं भ्रातृहन्तारं न हन्मि युधि राघवम् ।
ननु मे मरणं श्रेयो न चेदं व्यर्थजीवितम् ॥ १८ ॥
जर मी युद्धस्थळावर आपल्या भावाचा वध करणार्‍या राघवाला मारू शकत नसलो तर मी मरून जाणेच चांगले आहे. या निरर्थक जीवनाला सुरक्षित ठेवणे कदापि योग्य नाही. ॥१८॥
अद्यैव तं गमिष्यामि देशं यत्रानुजो मम ।
नहि भ्रातॄन् समुत्सृज्य क्षणं जीवितुमुत्सहे ॥ १९ ॥
मी आजच जेथे माझा लहान भाऊ कुंभकर्ण गेला आहे त्या देशास जाईन. मी आपल्या भावांना सोडून क्षणभरही जिवंत राहू शकत नाही. ॥१९॥
देवा हि मां हसिष्यन्ति दृष्ट्‍वा पूर्वापकारिणम् ।
कथमिन्द्रं जयिष्यामि कुंभकर्ण हते त्वयि ॥ २० ॥
मी पूर्वी देवतांवर अपकार केला होता. आता त्या मला पाहून हसतील. हा कुंभकर्णा ! तू मारला गेल्यावर आता मी इंद्राला कसा जिंकू शकेन ? ॥२०॥
तदिदं मामनुप्राप्तं विभीषणवचः शुभम् ।
यदज्ञानान्मया तस्य न गृहीतं महात्मनः ॥ २१ ॥
मी महात्मा विभीषणाने सांगितलेल्या ज्या उत्तम गोष्टींचा अज्ञानवश स्वीकार केला नव्हता, त्या माझ्यावर आज प्रत्यक्ष रूपाने घटित होत राहिल्या आहेत. ॥२१॥
विभीषणवचस्तावत् कुंभकर्णप्रहस्तयोः ।
विनाशोऽयं समुत्पन्नो मां व्रीडयति दारुणः ॥ २२ ॥
जेव्हापासून कुंभकर्ण आणि प्रहस्ताचा हा दारूण विनाश झाला आहे तेव्हापासून विभीषणाचे बोलणे आठवून मला लज्जित करत आहे. ॥२२॥
तस्यायं कर्मणः प्राप्तो विपाको मम शोकदः ।
यन्मया धार्मिकः श्रीमान् स निरस्तो विभीषणः ॥ २३ ॥
मी धर्मपरायण श्रीमान् विभीषणाला जे घरातून घालवून दिले होते, त्याच कर्माचा हा शोकदायक परिणाम आता मला भोगावा लागत आहे. ॥२३॥
इति बहुविधमाकुलान्तरात्मा
कृपणमतीव विलप्य कुंभकर्णम् ।
न्यपतदपि दशाननो भृशार्तः
तमनुजमिन्द्ररिपुं हतं विदित्वा ॥ २४ ॥
याप्रकारे विविध प्रकारे दीनतापूर्वक अत्यंत विलाप करून व्याकुळचित्त झालेला दशमुख रावण आपला लहान भाऊ इंद्रशत्रु कुंभकर्णाच्या वधाचे स्मरण करून फारच व्यथित होऊन परत पृथ्वीवर कोसळला. ॥२४॥
त्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे अष्टषष्टितमः सर्गः ॥ ६८ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा अडुसष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP