॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ 
   
॥ श्रीभावार्थरामायण ॥ 
  
सुंदरकांड 
  
॥  अध्याय विसावा ॥   
हनुमंताचे सीतेला आश्वासन
  
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ 
  
रावणाचा अपमान करून व लंका जाळून मारुती परतला
  
 
कोट्यानुकोटी वीर मर्दून । लंकाभुवना करोनि दहन ।  
रावणातें अपमानून । कपि परतोन निघाला ॥ १ ॥
  
त्यावेळी त्याच्या मनात चाललेले विचार : 
  
वीर मर्दितां समस्त । सांपडला लंकानाथ ।  
हनुमान न करी त्याचा घात । श्रीरघुनाथ क्षोभेल ॥ २ ॥ 
रामें वाहिली असे आण । विंधोनियां निजबाण ।  
रणीं मारीन रावण । असत्य कोण करूं शके ॥ ३ ॥ 
हांती सांपडला लंकानाथ । मारितां क्षोभेल रघुनाथ ।  
यालागीं न मारीच हनुमंत । जीवें जीत सोडिला ॥ ४ ॥ 
असत्य ठेवोनि स्वामीचे माथां । म्यां मिरवावी वाढिवता ।  
जळो ते श्लांघ्यता हनुमंता । म्हणोनी लंकानाथा न मारीच ॥ ५ ॥ 
अशोकवनीं वनउपाडा । निधडियां वीरां करोनि रगडा । 
हनुमान लोटोनियां पुढां । इंद्रजित गाढा पळविला ॥ ६ ॥ 
रावणासी जीवें मारितां । क्षणही न लगे मज आतां । 
मर्यादा नुल्लंघवे मज रघुनाथा । तेणें लंकानाथा न मारीच ॥ ७ ॥ 
बळें मारोनि जंबुमाळी । अखया उपडोनियां पौळीं ।  
राक्षसभवनां करोनि होळी । कपि महाबळी परतला ॥ ८ ॥
  
त्याची उल्लसित वृत्ती : 
  
वनें उपवनें शोधितां । भाग्यें सांपडली सीता ।  
शुद्धि सांगावया श्रीरघुनाथा । हनुमंता उल्लास ॥ ९ ॥ 
एकेच उड्डाणे श्रीरघुनाथा । चरणीं ठेवावया माथां । 
शुद्धि सांगावया सीता । हनुमंता उल्लास ॥ १० ॥
  
सागराला त्रास होउ नये म्हणून पुच्छ लहान करून दाह शमन : 
  
केव्हां देखेन रघुनाथा । केव्हां शुद्धि सांगेन सीता ।  
ऐसी आवडी हनुमंता । उल्लासता परतला ॥ ११ ॥ 
जळत पुच्छ धरोनि वरी । विझवूं जातां पैं सागरीं ।  
समुद्रें निवारिला लहरीं । ऐसें न करीं हनुमंता ॥ १२ ॥ 
पुच्छ बुचकाळितां सागरा । कढू सुटेल समुद्रनीरा ।  
उकाडा होईल जळचरां । ऐसें कपींद्रा न करावें ॥ १३ ॥ 
पित्या पवनातें प्रार्थूनीं । पुच्छाग्रीं पेटविला वज्राग्नी ।  
तेणें कढेल समुद्रपाणी । मरतील श्रेणी जळजंतूंच्या ॥ १४ ॥ 
पुच्छ पसरिल्या समुद्रतीरीं । सिंधु म्हणे मी घालीन लहरी ।  
विझवोनियां क्षणामाझारीं । युक्ती कपींद्रें मानिली ॥ १५ ॥ 
धरिलें होतें रूप दारूण । पुच्छ वाढविलें गगन व्यापून ।  
तें उग्रपण सांडोन । धरी सामान्य कपिरूप ॥ १६ ॥ 
सामान्य रूप समुद्रतीरीं । पुच्छ पसरितां लीळेंकरीं ।  
क्षणार्धे विझविलें लहरीं । जाहली वानरीं विश्रांति ॥ १७ ॥
  
त्यावेळी आलेला घामाचा थेंब समुद्रात पडून तो मगरीच्या पोटात गेला : 
  
स्वेद निपटोनि शरीरीं । स्वयें सांडितां सागरीं ।  
पडिला तो ग्रासिला मगरीं । तेणेंचि उदरीं गर्भ तिसीं ॥ १८ ॥ 
मगरोदरीं गर्भसमाज । हनुमंताचा पुत्र स्वेदज ।  
जन्म पावला मकरध्वज । बळसमाज कपीसम ॥ १९ ॥  
हनुमंते ऐसियापरी । पुच्छ विझवोनि सागरीं ।  
कथा चालिली पुढारीं । निजनिर्धारीं अवधारा ॥ २० ॥
  
मारूतीचे पुच्छ पेटवून त्याला जाळला असे राक्षसी सीतेला सांगतात : 
  
आगी लावोनि पुच्छासीं । रावणें मारिले हनुमंतासी ।  
राक्षसी सांगती सीतेपासीं । तेणें तिसीं अति चिंता ॥ २१ ॥ 
करोनियां वनउपाडा । राक्षसांसी केला झगडा ।  
मारोनि धुरा बुजोनि आगडा । आपणही पुढां निमाला ॥ २२ ॥ 
धुरा मारोनि करोनि रण । आपणही रणीं दिधला प्राण ।  
हें वानराचें उन्मत्तपण । स्वामिकार्य न साधेचि ॥ २३ ॥ 
वानर पालेखाइरा किती । मारूं गेला लंकापती ।  
तेणें जाळिला पुच्छीं प्रदीप्तीं । शुद्धि सीतापति न पवेचि ॥ २४ ॥ 
आणिक एक मूर्खपण । कां सांगितलें आत्ममरण ।  
आपणा मारविलें आपण । हें अभाग्यपण मज माझें ॥ २५ ॥ 
रावणें मारिलें हनुमंता । शुद्धि न पवेचि श्रीरघुनाथा ।  
यासीं म्यां काय करावें आतां । शोकें सीता संतप्त ॥ २६ ॥ 
दुस्तर सागर शतयोजन । कोणा न येववे उड्डाण करून ।  
शुद्धि न पवेचि रघुनंदन । अभाग्य पूर्ण हे माझें ॥ २७ ॥
  
सीतेचे दुःख : 
  
ऐकोनि हनुमंताचे मरण । अश्रुधारा स्त्रवती नयन ।  
अति दुःखें आक्रंदोन । मूर्च्छापन्न जानकी ॥ २८ ॥ 
हनुमंताचे मरणापुढां । पुत्रशोक तो बापुडा ।  
आघात वाजला एवढा । आंत चरफडा तळमळी ॥ २९ ॥ 
माझे आकांताचा सांगाती । तोही निमाला मारूती ।  
आतां कैसेनि भेटेल श्रीरघुपती । चिंतावर्ती जानकी ॥ ३० ॥
  
लंका जाळून मारूती परत गेला अशी शुभ वार्ता सरमा सीतेला सांगते : 
  
त्रिजटेची सखी परमा । हरिखें सांगों आली सरमा ।  
मरण नाहीं वो प्लवंगमा । पराक्रमा ऐक त्याचे ॥ ३१ ॥ 
तोडितां कमलमृणालांस । सायास न पवेचि गजास ।  
तेंवी कपीनें छेदोनि पाश । घेवोनि मीस राहिला ॥ ३२ ॥ 
पुच्छीं पेटविता हुताशन । रावणाचीं दशवदनें ।  
खांड मिशांतें जाळून । पाडिला अपमान लंकेशा ॥ ३३ ॥ 
तुझे वस्तीचें अशोकवन । तें न जाळीच हुताशन ।  
येर लंकेचें केलें दहन । भवनें भवनें शोधोनि ॥ ३४ ॥ 
पुच्छ पेटविल्यापाठीं । सुभट वीर जगजेठी ।  
राक्षस मारिले कोट्यनुकोटी । पुच्छासाठीं वानरें ॥ ३५ ॥ 
लंकेमाजी भवन भवन । पुच्छें केलें पुरदहन ।  
वानरा गाढी अंगवण । गेला गांजोन लंकेशा ॥ ३६ ॥ 
इतुकें करोनियां कंदन । समुद्रीं पुच्छ विझवोन ।  
तुझी निजशुद्धि घेवोन । गेला ठाकोन श्रीरामा ॥ ३७ ॥ 
हनुमंत जावोनियां तेथें । घेवोनि येईल श्रीरामातें ।  
शीघ्र पावेल वो येथें । जाण निश्चयें जानकीये ॥ ३८ ॥
  
सीतेला आनंद : 
  
ऐकोनि सरमेचें वचन । सीता जाहली सुखसंपन्न ।  
तीस देवोनि आलिंगन । दिधलें भूषण निजमुद्रा ॥ ३९ ॥ 
सरमा म्हणे अहो माते । आम्हीं तुझीं आज्ञांकितें ।  
कायसा सन्मान आमुतें । राक्षसी मातें नको म्हणो ॥ ४० ॥ 
सीता म्हणे तूं आकांतसांगातिणी । आम्ही तुम्ही निर्वाणबहिणी ।  
विकल्प न धरीं वो साजणी । सरमा चरणीं लागली ॥ ४१ ॥ 
ऐकोनि सरमेचें वचन । सीता पावली समाधान ।  
येरीकडे हनुमंत आपण । अति उद्विग्न स्वयें जाहला ॥ ४२ ॥
  
लंकेच्या भडकलेल्या आगीत सीताही भस्म झाली असा मारूतीचा समज : 
  
पुच्छ समुद्रीं विझवून । घ्यावया श्रीरामदर्शन ।  
आलें हनुमंतासी स्फुरण । करावया उड्डाण सज्ज जाहला ॥ ४३ ॥ 
मागील पाहतां आवांका । ज्वलनाकुळ देखिली लंका ।  
कपीसीं पडली आशंका । सीता निःशेखा भस्म जाहली ॥ ४४ ॥ 
अति चिंता हनुमंता । जाळोन स्वामींची कांता ।  
काय शुद्धी सांगों रघुनाथा । केलें अनर्था मर्कटत्वें ॥ ४५ ॥ 
लंका साटोपें जाळितां । न पाहेंचि स्वामिकार्यार्था ।  
न पाहेंचि निजस्वार्था । केलें अनर्था मर्कटत्वें ॥ ४६ ॥ 
मारिले वीर कोट्यनुकोटी । लंका जाळितां उठाउठी ।  
जाळिली सीता गोरटी । ही बुद्धि खोटी पैं माझी ॥ ४७ ॥ 
जो जो म्यां केला पुरूषार्थ । तो तो जाहला मज निंद्यार्थ ।  
जाळिली श्रीरामाची कांता । काय रघुनाथा मुख दावूं ॥ ४८ ॥ 
दहनीं जाळिली सीता सती । जळो जळो माझी ख्याती ।  
कीर्ति हे जाहली अपकीर्ति । केंवी रघुपतीस मुख दावूं ॥ ४९ ॥ 
तिची शुद्धि सांगों जातां । दहनीं जाळिली ती सीता ।  
अपयश आलें मज हनुमंता । केंवी रघुनाथा मुख दावूं ॥ ५० ॥ 
पुच्छाग्नीच्या आवर्ती । लंका जाळिली सहितक्षिती ।  
अदग्ध चार बोटें नुरती । सीता केउती वांचेल ॥ ५१ ॥ 
विचार न करिता मर्कटा । करोनियां मर्कटचेष्टा ।  
बारा जणा श्रेष्ठश्रेष्ठां । केल्या बारा वाटा तें ऐका ॥ ५२ ॥ 
एकतां सीतेचें मरण । श्रीराम सांडील निजप्राण ।  
प्राण सांडील लक्ष्मण । भरत शत्रुघ्न निमतील ॥ ५३ ॥ 
निमतील तिघी माता । मरण नल नीळ जांबवंता ।  
मरण सुग्रीवा कपिनाथा । अंगद तत्वतां निमेल ॥ ५४ ॥ 
ऐसिऐशिया श्रेष्ठश्रेष्ठां । माझेनि ऐशा बारा वाटा ।  
त्याहून श्रेष्ठा आणि कनिष्ठा । मरण बळकट माझेनि ॥ ५५ ॥ 
अयोध्येचे नारी नर । मरतील समग्र वानर ।  
एवढ्या अपेशासी पात्र । सीता सुंदर जाळोनी ॥ ५६ ॥
  
क्रोधाचा प्रभाव व त्याची निंदा : 
  
क्रोध केवळ पैं मांग । क्रोधें अपवित्र पैं सर्वांग ।  
साधिल्या काया केला भंग । क्रोधें सांग नागविलें ॥ ५७ ॥ 
शुद्धि साधिलियापाठीं । क्रोध संचरला पोटीं ।  
लंका जाळिली क्रोधदृष्टीं । सीता गोरटी जाळिली म्या ॥ ५८ ॥ 
क्रोध मांगडा अति चांडाळ । जळें निरसे मांगविटाळ ।  
क्रोध त्याहून प्रबळ । नव्हे निर्मळ स्नानदानें ॥ ५९ ॥ 
क्रोधाऐसा महावैरी । जडला असतां निजजिव्हारीं ।  
जो ज्ञानाची मानी थोरी । तो संसारीं अति मूर्ख ॥ ६० ॥ 
क्रोध येऊं न देती दृष्टी । धन्य धन्य ते नरश्रेष्ठी ।  
क्रोध आलियाही पोटीं । ते विवेकदृष्टीं निर्दळिती ॥ ६१ ॥ 
ऐसिये दृष्टीचे नर । ते चैतन्याचें निजमंदिर ।  
परब्रह्माचें भांडार । ब्रह्म साकार ते पुरूष ॥ ६२ ॥ 
भूतीं पाहतां भगवद्भाव । कामक्रोधांसीं कैंचा ठाव ।  
ऐसा ज्याचा निजसद्भाव । तोचि स्वयमेव परब्रह्म ॥ ६३ ॥ 
ऐसा समूळ विचार । न करींच मी पामर ।  
क्रोधें नागविलें साचार । सीता सुंदर जाळिली ॥ ६४ ॥ 
क्रोध आलिया तत्वतां । अणुमात्र न करींच स्वार्था । 
करविलें कोटिकोटि अनर्था । जघन्यता जगनिंद्य ॥ ६५ ॥ 
आली मज अति निंद्यता । ऐसेनि श्रीरामासी भेटतां ।  
प्रळयो होईल समस्तां । निमाली सीता ऐकोनी ॥ ६६ ॥
  
पुढे काय करावे त्याचा निश्चित विचार : 
  
न वचोनियां श्रीरामापासीं । येथेंचि घ्यावे संन्यासग्रहणासी ।  
तंव हाडवैर पडलें राक्षसांसीं । इहप्रदेशीं राहों न ये ॥ ६७ ॥ 
आतां देवों आपुला प्राण । तरी मज सर्वथा न ये मरण ।  
तेंही निजात्म लक्षण । आपणा आपण अनुवादे ॥ ६८ ॥ 
जाळूं न शके वैश्वानर । बुडवूं न शके मज सागर ।  
भक्षूं न शकती मत्स्यमगर । वज्रशरीर पैं माझें ॥ ६९ ॥ 
जाळूनि वज्रदेह मारूती । सिंह व्याघ्र वडवाजती ।  
सर्वथा मजला न भक्षिती । मृत्यु हनुमंतीं असेना ॥ ७० ॥ 
भेटवेना श्रीरघुनाथा । मरण नये मरों जातां ।  
संन्यास न घेववें पैं घेतां । काय म्यां आतां करावें ॥ ७१ ॥ 
ऐसा हनुमंत आपण । सीता निमाली मानून ।  
तेणें जाहला अति उद्विग्न । समाधान पावेना ॥ ७२ ॥ 
मग म्हणे श्रीरघुनाथा । पाव माझिया आकांता ।  
काय करावे म्यां आतां । बुद्धिदाता होय मज ॥ ७३ ॥ 
ऐसी करितां विनंती । श्रीराम नांदे सर्वां भूतीं ।  
तेचि काळीं पैं मारूती । अगाध युक्ती आठवली ॥ ७४ ॥
  
सीता भस्म होणारच नाही असा आत्मविश्वास : 
  
श्रीराम एकपत्नीधारी । श्रीरामसेवा तपसामग्री ।  
सत्य श्रीरामनाम जिव्हारी । वन्हि कैशापरी जाळील ॥ ७५ ॥ 
श्रीरामव्रतें सीता सती । श्रीरामाची अनन्य भक्ती ।  
श्रीरामनामी अनन्य प्रीतीं । अग्नि कैसा जाळील ॥ ७६ ॥ 
रावणें आगी लावितां पुच्छीं । पुच्छा न जाळवे अग्नीसी ।  
तो केंवी जाळील सीतेंसी । विशेषेंसी श्रीरामप्रिया ॥ ७७ ॥ 
श्रीरामाची प्रियकांता । अग्नीसीं न जाळवे सर्वथा ।  
अग्नि जाळों न शके सीता । श्रीरामसत्ताप्रतापें ॥ ७८ ॥ 
श्रीरामाचे निजकिंकर । पालेखाइरें मी वानर ।  
मम पुच्छ न जाळी वैश्वानर । सीता चिन्मात्र केंवी जाळी ॥ ७९ ॥
  
सीता दग्ध झाल्यास अग्नीला दंड करीन : 
  
जरी जाळिली वन्हीनें सीता । तरी मी त्यासी दंडीन आतां । 
कोप आला हनुमंता । शेंडी माथां थरारिली ॥ ८० ॥ 
करकरलिया दांतदाढा । वळला पुच्छाचा आंकोडा ।  
वन्हि दंडावया पुढां । हनुमान गाढा खवळला ॥ ८१ ॥
  
वायूच्या आश्वासनाने मारूतीला स्वास्थ्य : 
  
पिता पवन सांगे कानीं । ज्येष्ठ बंधु तुझा वन्ही ।  
त्यासी करूं नयें दंडनी । सीता जननी ते स्वस्थ असे ॥ ८२ ॥ 
अग्नीनें सीता अभिवंदूनी । स्वस्थ ठेविली अशोकवनीं ।  
ऐसें ऐकतांचि कानीं । उल्लास मनीं वानरा ॥ ८३ ॥ 
अभिवंदोनि हुताशन । घालोनि पित्यासी लोटांगण ।  
घ्यावया सीतेचें दर्शन । केलें उड्डाण वानरें ॥ ८४ ॥
  
पुनः लंकेत जाऊन सीतेचे दर्शन : 
  
उड्डाण करोनि हनुमंता । स्वयें लंकेमाजी येतां । 
दग्धगजभग्नदंता । होय देखता पुरध्वंस ॥ ८५ ॥ 
विमानाकार पुरमंदिरे । जळोन पडलीं समग्रें । 
पक्ष्यदग्ध पैं मयूरें । वैश्वानरें पुरदाहो ॥ ८६ ॥ 
पुच्छाग्निदग्ध लंकाभुवन । त्यामाजी अदग्ध अशोकवन । 
सीता देखानि सुखसंपन्न । केलें लोटांगण वानरें ॥ ८७ ॥ 
घालोनियां लोटांगण । आवडीं वंदिले चरण ।  
सीताचरणक्षालण । केलें कपीनें नयनाश्रूंनीं ॥ ८८ ॥ 
वेगें येवोनि मारूती । मागें पुढें पाहे सीता सती ।  
पाहे मागुती मागुती । पुनरावृत्तीं साक्षेपें ॥ ८९ ॥ 
नाहीं जळली पोळली । नाहीं लोम हुरपळली ।  
सीता सुखरूप देखिली । पिटिली टाळी हनुमंते ॥ ९० ॥ 
सीता देखोनि अक्षत । हनुमान आनंदें नाचत ।  
माझा फळला पुरूषार्थ । रामकार्यार्थ साधला ॥ ९१ ॥ 
सीताशुद्धि लाभली येथ । जालें सीतामनोगत ।  
साधिला श्रीरामकार्यार्थ । माझा पुरूषार्थ मज फळला ॥ ९२ ॥ 
सीतेचें चरणीं ठेवोनि माथा । कपि म्हणे माते न करीं चिंता ।  
घेवोन येईन वो रघुनाथा । ही घे तत्वतां भाक माझी ॥ ९३ ॥ 
वानर श्रीरामाचा आप्त । माझाही सखा हनुमंत ।  
संकटीं भेटोनि वनाआंत । भवभयार्थ निरसिला ॥ ९४ ॥ 
राक्षस मारोनि समर्थ । लंका करोनि हताहत ।  
गांजोनियां लंकानाथ । राम पुरूषार्थ प्रकटिला ॥ ९५ ॥
  
त्यामुळे सीतेला आनंद व तिची विश्रांती घेऊन जाण्याची सूचना : 
  
ऐकतां हनुमंताची गोष्टी । फलोत्कट जनकाची भेटी ।  
ऐसी जाहली सुखसंतुष्टी । हनुमान दृष्टीं देखोनि ॥ ९६ ॥ 
जो आकांतीं रक्षिता । तो हनुमंत माता पिता ।  
हनुमान प्रिय श्रीरघुनाथा । वेदशास्त्रार्था मज पूज्य ॥ ९७ ॥ 
लंका जाळितां चौपासीं । युद्ध करितां भागलासी ।  
तुज द्यावया विश्रांतीसी । नाहीं मजपासीं शेजबाज ॥ ९८ ॥ 
सेवा न घडे हनुमंता । ऐसी माझी अभाग्यता ।  
निर्वातस्थळीं एकांता । विश्रांति त्वां आजि घ्यावी ॥ ९९ ॥ 
आजी घेवोनि विश्रांती । प्रात:काळीं त्वा मारूती ।  
भेटी जावें गा रघुपती । माझी विनंती अवधारीं ॥ १०० ॥
  
मारूतीचे एकमेव विश्रांतिस्थान श्रीरामचंद्र :  
  
एकोन सीतेचें वचन । हनुमान जाहला हास्यवदन ।  
ऐक माते सावधान । विश्रांतिस्थान पैं माझें ॥ १०१ ॥ 
जन्ममरणाची निवृत्ती । सकळ श्रमांची विश्रांती । 
त्या रामनामाच्या आवृत्ती । जाण निश्चितीं जानकिये ॥ १०२ ॥ 
युद्ध करितां रणावर्तीं । सबाह्य कवच श्रीराममूर्ती ।  
एकाकी जातां दुर्गम पंथीं । नाम सांगाती निर्भय ॥ १०३ ॥ 
आसनीं भोजनी शयनीं । नित्यावर्ती गमनागमनीं ।  
राम सांगातीं जागृतीं स्वप्नीं । सत्य वाणी हे सीते ॥ १०४ ॥ 
एकोनि हनुमंताची स्थिती । जीवें ओंवाळी सीता सती ।  
सबाह्य विकलें श्रीराम भक्ती । धन्य मारूती जन्म तुझा ॥ १०५ ॥
  
ते ऐकून सीतेला आनंद : 
  
ऐकोनि हनुमंताची युक्ती । अकृत्रिम श्रीरामभक्ती ।  
तेणें सुखावें सीता सती । धन्य मारूती जन्म तुझा ॥ १०६ ॥ 
सुखावोनी सीता सती । सवेंचि दचकली पैं चित्तीं ।  
आतां जाईल मारूती । केंवी मागुती देखेन ॥ १०७ ॥ 
तुझें प्रयाण ऐकतां । प्राण निघों पाहे आतां । 
काय करूं गा हनुमंता । आवरितां चित्त आवरेना ॥ १०८ ॥
  
वानर समुद्र उल्लंघन कसे करतील अशी सीतेची शंका : 
  
 
आणिक एक हनुमंता । संदेह वर्तताहे चित्ता । 
तोही सांगेन मी आतां । सावधानता अवधारीं ॥ १०९ ॥ 
कोटि कोटि वानरभार । कैसेनि लंघिती सागर ।  
केंवी पावती पैल पार । दशशिरा दंडावया ॥ ११० ॥ 
समुद्रलंघनाप्रती । तिघां जणां आहे शक्ती ।  
वैनतेय वायु मारूती । चौथियाची गति चालेना ॥ १११ ॥ 
मिळोनियां नरवानर । केंवी लंघितील महासागर ।  
हेचि मज चिंता थोर । सत्य साचार हनुमंता ॥ ११२ ॥ 
समुद्र लंघणें कार्यार्था । आलें हनुमंता तुझे माथां । 
राक्षसदमनीं तुज दक्षता । लंकानाथा तुझा धाक ॥ ११३ ॥ 
नांव ऐकोनि हनुमंत । रावण उभ्या चळकापत ।  
तुज इंद्रजित सदा धाकत । तुझा पुरूषार्थ अनुपम्य ॥ ११४ ॥
  
हनुमंताचे आश्वासन, रामांच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास : 
  
ऐकोनि सीतेंचे उत्तर । हनुमान म्हणे मी किंकर ।  
श्रीरामप्रताप दुर्धर । ऐक साचार सांगेन ॥ ११५ ॥ 
श्रीरामभातीं दुर्धर शर । बाणीं वाहोनि नरवानर ।  
राम पाववील समुद्रपार । श्रीरामचंद्र प्रतापी ॥ ११६ ॥ 
वानरसेनेचिया हारी । श्रीराम बैसवोनि शराग्रीं ।  
उतरोनियां समुद्रीं । लंकापरपारीं आणील ॥ ११७ ॥ 
राम लक्ष्मण वीर वरिष्ठ । धनुर्विद्या अति श्रेष्ठ ।  
बाण वर्षोनि अति उद्भट । दशकंठ छेदील ॥ ११८ ॥ 
रणीं पाडितां दशकंठ । इंद्रजिता कुंभकर्ण वरिष्ठ ।  
प्रधान मारोनि समसगट । करील सपाट राक्षसां ॥ ११९ ॥ 
इतुकें मारावया येथ । शीघ्र आणितों रघुनाथ ।  
विलंबू न लगे वो निश्चित । वचन त्रिसत्य हें माझें ॥ १२० ॥ 
वाहतों श्रीरामाची आण । शिवतों तुझे श्रीचरण ।  
शीघ्र आणीन रघुनंदन । निजप्रमाण हें माझें ॥ १२१ ॥
  
सीतेला नमस्कार करून हनुमंताचे उड्डाण, सीतेला गद्गदून आले : 
  
हनुमंतें ऐसिये परी । आश्वासोनि सीता सुंदरी । 
सिंधु उडावया परपारीं । नमस्कारीं सीतेतें ॥ १२२ ॥ 
कपीनें करितां नमस्कार । सीतेसी आला गहिंवर ।  
तिसी विनंती करी वानर । शुद्धि निर्धार लक्षोनी ॥ १२३ ॥
  
मारूतीचा आदेश श्रीरामचरणीं लीनता ठेवावी : 
  
श्रीराम ध्यानीं धरोनि आतां । सांडावी सकळ चित्तचिंता ।  
तेणें सत्य प्राप्ति श्रीरघुनाथा । स्वानंदता उल्लासें ॥ १२४ ॥ 
ध्यानीं धरोनि राघवा । चिंता सांडावी देहभावा ।  
तेणें ब्रह्मत्व जीवीं जीवा । तोचि विसांवा जीवशिवांचा ॥ १२५ ॥ 
चित्तचित्ता चिंतनवृत्ती । सांडोनि स्मरावा श्रीरघुपती ।  
हाचि विसांवा विश्रांती । जीवशीव होती परब्रह्म ॥ १२६ ॥ 
जीवत्व नाठवे जीवा । शिवत्व नाठवे शिवा ।  
नित्य श्रीराम स्मरावा । ते जीवशिवा विश्रांती ॥ १२७ ॥ 
परब्रह्माचें ब्रह्मपण । राम स्मरतां आठवण ।  
ऐसें श्रीरामस्मरण । विसांवा जाण जानकिये ॥ १२८ ॥ 
ऐकोनि हनुमंताचें वचन । सीता जाहली सुखसंपन्न ।  
एकाजनार्दना शरण । गोड निरूपण पुढें आहे ॥ १२९ ॥ 
कपिकाकुत्स्थ आनंदभेटी । सीताशुद्धीची गोड गोष्टी ।  
ऐकतां परमानंद सृष्टीं । कथाकसवटी अनुपम्य ॥ १३० ॥ 
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां  हनूमत्सीताश्वासनं नाम विंशतितमोऽध्यायः ॥ २० ॥ 
॥ ओव्यां १३० ॥ श्लोक २९ ॥ एवं संख्या १५९ ॥
  
  
GO TOP 
  
 |