श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ चतुर्विंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
रावणेन अपहृतानां देवादिकन्यानां स्त्रीणां च विलापः, तं प्रति शापश्च, रावणेन शूर्पणखाया आश्वासनं, खरेण सह तस्या दण्डकारण्ये प्रेषणं च -
रावणद्वारा अपह्रत केल्या गेलेल्या देवता आदिंच्या कन्या आणि स्त्रियांचा विलाप एवं शाप, रावणाचे रडणार्‍या शूर्पणखेला आश्वासन देणे आणि तिला खराबरोबर दण्डकारण्यांत धाडणे -
निवर्तमानः संहृष्टो रावणः स दुरात्मवान् ।
जह्रे पथि नरेन्द्रर्षि देवगन्धर्वकन्यकाः ॥ १ ॥
परत येत असता दुरात्मा रावण अत्यंत हर्षित झालेला होता. त्याने मार्गामध्ये अनेकानेक नरेश, ऋषि, देवता आणि दानवांच्या कन्यांचे अपहरण केले. ॥१॥
दर्शनीयां हि यां रक्षः कन्यां स्त्रीं वाथ पश्यति ।
हत्वा बन्धुजनं तस्या विमाने तां रुरोध सः ॥ २ ॥
याप्रकारे तो राक्षस ज्या कन्येला अथवा स्त्रीला दर्शनीय रूप-सौंदार्याने युक्त पहात होता, तिच्या रक्षक बंधुजनांचा वध करून तिला विमानावर बसवून अडकवून ठेवत होता. ॥२॥
एवं पन्नगकन्याश्च राक्षसासुरमानुषीः ।
यक्षदानवकन्याश्च विमाने सोऽध्यरोपयत् ॥ ३ ॥
याप्रकारे त्याने नाग, राक्षस, असुर, मनुष्य, यक्ष आणि दानवांच्या बर्‍याचशा कन्यांना पळवून विमानावर चढवून घेतले. ॥३॥
ताश्च सर्वाः समं दुःखान् मुमुचुर्बाष्पजं जलम् ।
तुल्यमग्न्यर्चिषां तत्र शोकाग्निभयसम्भवम् ॥ ४ ॥
त्या सर्व जणींनी दुःखाने नेत्रांतून अश्रू ढाळण्यास आरंभ केला. शोकाग्नि आणि भयाने प्रकट होणार्‍या त्यांच्या अश्रूंचा एकेक थेंब तेथे आगीच्या ठिणगीप्रमाणेच भासत होता. ॥४॥
ताभिः सर्वानवद्याभिः नदीभिरिव सागरः ।
आपूरितं विमानं तद् भयशोकाशिवाश्रुभिः ॥ ५ ॥
ज्याप्रमाणे नद्या सागराला भरतात त्याप्रकारे त्या समस्त सुंदरींनी भय आणि शोकाने उत्पन्न झालेल्या अमंगलजनक अश्रूंनी त्या विमानास भरून टाकले. ॥५॥
नागगन्धर्वकन्याश्च महर्षितनयाश्च याः ।
दैत्यदानवकन्याश्च विमाने शतशोऽरुदन् ॥ ६ ॥
नाग, गंधर्व, महर्षि, दैत्य आणि दानवांच्या शेकडो कन्या त्या विमानावर रडत होत्या. ॥६॥
दीर्घकेश्यः सुचार्वङ्‌ग्यः पूर्णचन्द्रनिभाननाः ।
पीनस्तनतटा मध्ये वज्रवेदिसमप्रभाः ॥ ७ ॥

रथकूबरसंकाशैः श्रोणिदेशैर्मनोहराः ।
स्त्रियः सुराङ्‌गनाप्रख्या निष्टप्तकनकप्रभाः ॥ ८ ॥
त्यांचे केस मोठे लांब होते, सर्व अंगे सुंदर आणि मनोहर होती. त्यांच्या मुखाची कान्ति पूर्ण चंद्रम्याच्या शोभेला लज्जित करत होती. उरोजांचे तटप्रांत उन्नत होते. शरीराचा मध्यभाग हिर्‍याच्या चबूतर्‍याप्रमाणे प्रकाशित होत होता. नितंबदेश रथाच्या कूबरासमान प्रतीत होत होता आणि त्यामुळे त्यांची मनोहरता वाढत होती. त्या सर्व स्त्रिया देवांगनांप्रमाणे कान्तिमती आणि तप्त सुवर्णाप्रमाणे सोनेरी आभेने उद्‌भासित होत होत्या. ॥७-८॥
शोकदुःखभयत्रस्ता विह्वलाश्च सुमध्यमाः ।
तासां निश्वासवातेन सर्वतः सम्प्रदीपितम् ॥ ९ ॥

अग्निहोत्रमिवाभाति सन्निरुद्धाग्नि पुष्पकम् ।
सुंदर मध्यभाग असणार्‍या त्या सर्व सुंदरी शोक, दुःख आणि भयाने त्रस्त तसेच विव्हळ होत्या. त्यांच्या गरम-गरम निःश्वास वायुने ते पुष्पक विमान सर्व बाजूनी जणु प्रज्वलित होत होते आणि ज्यामध्ये जणु अग्निची स्थापना केली गेली असलेल्या अग्निहोत्र गृहाप्रमाणे भासत होते. ॥९ १/२॥
दशग्रीववशं प्राप्ताः तास्तु शोकाकुलाः स्त्रियः ॥ १० ॥

दीनवक्रेक्षणाः श्यामा मृग्यः सिंहवशा इव ।
दशग्रीवाच्या अधीन झालेल्या त्या शोकाकुळ अबला सिंहाच्या पंज्यात सापडलेल्या हरिणींप्रमाणे दुःखी होत होत्या. त्यांचे मुख आणि नेत्र यात दीनता पसरली होती आणि त्या सर्वांची अवस्था सोळा वर्षाच्या जवळपास होती. ॥१० १/२॥
काचिच्चिन्तयती तत्र किं नु मां भक्षयिष्यति ॥ ११ ॥

काचिद् दध्यौ सुदुःखार्ता अपि मां मारयेदयम् ।
कुणी विचार करीत होती की काय हा निशाचर मला खाऊन टाकीन ? कुणी अत्यंत दुःखाने आर्त होऊन हा निशाचर मला मारून टाकील की काय या चिंतेत पडली होती. ॥११ १/२॥
इति मातॄः पितॄन् स्मृत्वा भर्तॄन् भ्रातॄंस्तथैव च ॥ १२ ॥

दुःखशोकसमाविष्टा विलेपुः सहिताः स्त्रियः ।
त्या स्त्रिया माता, पिता, भाऊ तसेच पतिची आठवण करीत दुःख-शोकात बुडून जात आणि एकदमच करूणाजनक विलाप करू लागत होत्या. ॥१२ १/२॥
कथं नु खलु मे पुत्रो भविष्यति मया विना ॥ १३ ॥

कथं माता कथं भ्राता निमग्नाः शोकसागरे ।
हाय ! माझ्याशिवाय माझे तान्हे बाळ कसे राहिल ? माझ्या आईची काय दशा होईल आणि माझा भाऊ किती चिंतित झाला असेल ? असे म्हणून त्या शोकाच्या सागरात बुडून जात होत्या. ॥१३ १/२॥
हा कथं नु करिष्यामि भर्तुस्तस्मादहं विना ॥ १४ ॥

मृत्यो प्रसादयामि त्वां नय मां दुःखभागिनीम् ।
किन्नु तद् दुष्कृतं कर्म पुरा देहान्तरे कृतम् ॥ १५ ॥

एवं स्म दुःखिताः सर्वाः पतिताः शोकसागरे ।
न खल्विदानीं पश्यामो दुःखस्यास्यान्तमात्मनः ॥ १६ ॥
हाय ! आपल्या त्या पतिदेवाचा विरह झाल्याने मी काय करू ? (कशी राहू ?). हे मृत्युदेवा ! माझी प्रार्थना आहे की तू प्रसन्न हो आणि मला दुःखी स्त्रीला या लोकांतून उचलून घेऊन चल. हाय ! पूर्वजन्मी दुसर्‍या शरीराने आम्ही असे कोणते पाप केले होते, ज्यामुळे आम्ही सर्वच्या सर्व दुःखाने पीडित होऊन शोकसमुद्रात येऊन पडलो आहो. निश्चितच यासमयी आम्हांला आमच्या या दुःखाचा अंत होईल असे दिसून येत नाही. ॥१४-१६॥
अहो धिङ्‌मानुषं लोकं नास्ति खल्वधमः परः ।
यद् दुर्बला बलवता भर्तारो रावणेन नः ॥ १७ ॥

सूर्येणोदयता काले नक्षत्राणीव नाशिताः ।
अहो ! या मनुष्यलोकाचा धिक्कार आहे. याहून अधिक अधम दुसरा कुठलाही लोक नसेल; कारण की येथे या बलवान्‌ रावणाने आमच्या दुर्बल पतींना जसे सूर्यदेव उदय होताच नक्षत्रांच्या समुदायाला अदृश्य करून टाकतात, त्या तर्‍हेने नष्ट करून टाकले आहे. ॥१७ १/२॥
अहो सुबलवद् रक्षो वधोपायेषु युज्यते ॥ १८ ॥

अहो दुर्वृत्तमास्थाय नात्मानं वै जुगुप्सते ।
अहो ! हा अत्यंत बलवान्‌ राक्षस वधाच्या उपायातच आसक्त राहात आहे. अहो ! हा पापी दुराचाराच्या मार्गावर चालूनही आपणा स्वतःचा धिक्कार करीत नाही आहे. ॥१८ १/२॥
सर्वथा सदृशस्तावद् विक्रमोऽस्य दुरात्मनः ॥ १९ ॥

इदं त्वसदृशं कर्म परदाराभिमर्शनम् ।
या दुरात्म्याचा पराक्रम त्याच्या तपस्येला सर्वथा अनुरूप आहे परंतु हा परक्याच्या स्त्रियांवर जो बलात्कार करीत आहे, हे दुष्कर्म कदापि याच्या योग्य नाही आहे. ॥१९ १/२॥
यस्मादेष परक्यासु रमते राक्षसाधमः ॥ २० ॥
हा नीच निशाचर परक्यांच्या स्त्रियांशी रममाण होत आहे म्हणून स्त्रीच्या कारणानेच या दुर्बुद्धि राक्षसाचा वध होईल. ॥२०॥
तस्माद् वै स्त्रीकृतेनैव वधं प्राप्स्यति दुर्मतिः ।
सतीभिर्वरनारीभिः एवं वाक्येऽभ्युदीरिते ॥ २१ ॥

नेदुर्दुन्दुभयः खस्थाः पुष्पवृष्टिः पपात च ।
त्या श्रेष्ठ सती-साध्वी नारींनी जेव्हा असे वाक्य उच्चारले तेव्हा आकाशात देवतांच्या दुंदुभि वाजू लागल्या आणि तेथे पुष्पवृष्टि होऊ लागली. ॥२१ १/२॥
शप्तः स्त्रीभिः स तु समं हतौजा इव निष्प्रभः ॥ २२ ॥

पतिव्रताभिः साध्वीभिः बभूव विमना इव ।
पतिव्रता साध्वी स्त्रियांनी असा शाप दिल्यावर रावणाची शक्ति घटली, तो निस्तेज झाल्यासारखा होऊन त्याच्या मनांत जणु उद्वेग होऊ लागला. ॥२२ १/२॥
एवं विलपितं तासां शृण्वन् राक्षसपुङ्‌गवः ॥ २३ ॥

प्रविवेश पुरीं लङ्‌कां पूज्यमानो निशाचरैः ।
याप्रकारे त्यांचा विलाप ऐकत असलेल्या राक्षसराज रावणाने निशाचरांच्या द्वारा सत्कृत होऊन लंकापुरीत प्रवेश केला. ॥२३ १/२॥
एतस्मिन्नन्तरे घोरा राक्षसी कामरूपिणी ॥ २४ ॥

सहसा पतिता भूमौ भगिनी रावणस्य सा ।
त्यासमयी इच्छेनुसार रूप धारण करणारी भयंकर राक्षसी शूर्पणखा, जी रावणाची बहीण होती, एकाएकी समोर येऊन पृथ्वीवर कोसळली. ॥२४ १/२॥
तां स्वसारं समुत्थाप्य रावणः परिसान्त्वयन् ॥ २५ ॥

अब्रवीत् किमिदं भद्रे वक्तुकामाऽसि मां द्रुतम् ।
रावणाने आपल्या त्या बहिणीला उठवून तिचे सान्त्वन केले आणि विचारले - भद्रे ! तू आता मला तात्काळ कोठली गोष्ट सांगू इच्छित आहेस ? ॥२५ १/२॥
सा बाष्पपरिरुद्धाक्षी रक्ताक्षी वाक्यमब्रवीत् ॥ २६ ॥

कृताऽस्मि विधवा राजन् त्वया बलवता बलात् ।
शूर्पणखेच्या नेत्रात अश्रू दाटून आले, रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते. ती म्हणाली - राजन्‌ ! तू बलवान्‌ आहेस, म्हणूनचन तू मला बलपूर्वक विधवा बनविले आहेस ? ॥२६ १/२॥
एते राजंस्त्वया वीरा दैत्या विनिहता रणे ॥ २७ ॥

कालकेया इति ख्याताः सहस्राणि चतुर्दश ।
राक्षसराज ! तू रणभूमीमध्ये आपल्या पराक्रमाने चौदा हजार कालकेय नामक दैत्यांचा वध केला आहेस. ॥२७ १/२॥
प्राणेभ्योऽपि गरीयान् मे तत्र भर्ता महाबलः ॥ २८ ॥

सोऽपि त्वया हतस्तात रिपुणा भ्रातृगन्धिना ।
तात ! त्यांतच माझ्यासाठी प्राणांहून अधिक आदरणीय माझे महाबली पतिही होते. तू त्यांनाही मारून टाकलेस. तू नाममात्रच भाऊ आहेस, वास्तविक माझा शत्रूच निघाला आहेस. ॥२८ १/२॥
त्वयाऽस्मि निहता राजन् स्वयमेव हि बन्धुना ॥ २९ ॥

राजन्वैधव्यशब्दं च भोक्ष्यामि त्वत्कृते ह्यहम् ।
राजन ! सख्खा भाऊ असूनही तू स्वतःच आपल्या हाताने माझा (माझ्या पतिदेवाचा) वध करून टाकलास. आता तुझ्यामुळेच मी वैधव्य शब्दाचा उपभोग करीन - विधवा म्हणून घेईन. ॥२९ १/२॥
ननु नाम त्वया रक्ष्यो जामाता समरेष्वपि ॥ ३० ॥

स त्वया निहतो युद्धे स्वयमेव न लज्जसे ।
हे बंधु ! तू माझ्या पित्याप्रमाणे आहेस. माझे पति तुझे जावई होते. काय तू युद्धात आपल्या जावयाचे अथवा मेहुण्याचे रक्षण करावयास नको होते ? तू स्वतःच आपल्या जावयाचा वध केला आहेस, काय तरी आजही तुला लाज वाटत नाही ? ॥३० १/२॥
एवमुक्तो दशग्रीवो भगिन्या क्रोशमानया ॥ ३१ ॥

अब्रवीत् सान्त्वयित्वा तां सामपूर्वमिदं वचः ।
रडणार्‍या आणि दोष देणार्‍या बहीणीने असे म्हटल्यावर दशग्रीवाने तिचे सान्त्वन करून समजावित मधुर वाणीने म्हटले - ॥३१ १/२॥
अलं वत्से रुदित्वा ते न भेतव्यं च सर्वशः ॥ ३२ ॥

दानमानप्रसादैस्त्वां तोषयिष्यामि यत्‍नतः ।
वत्से ! आता रडणे व्यर्थ आहे. तूं कुठल्याही प्रकारे भयभीत होता कामा नये. मी दान, मान आणि अनुग्रह द्वारा बलपूर्वक तुला संतुष्ट करीन. ॥३२ १/२॥
युद्धप्रमत्तो व्याक्षिप्तो जयाकाङ्‌क्षी क्षिपञ्छरान् ॥ ३३ ॥

नाहमज्ञासिषं युध्यन् स्वान् परान् वापि संयुगे ।
जामातरं न जाने स्म प्रहरन् युद्धदुर्मदः ॥ ३४ ॥
मी युद्धात उन्मत्त झालो होतो, माझे चित्त ठिकाणावर नव्हते, मला केवळ विजय मिळविण्याची इच्छा होती. म्हणून निरंतर बाण सोडत राहिलो. समरांगणात लढते समयी मला आपला-परका याचे ज्ञान राहात नाही. मी रणोन्मत्त होऊन प्रहार करीत राहिलो म्हणून जामात्यास ओळखू शकलो नाही. ॥३३-३४॥
तेनासौ निहतः सङ्‌ख्ये मया भर्ता तव स्वसः ।
अस्मिन् काले तु यत्प्राप्तं तत्करिष्यामि ते हितम् ॥ ३५ ॥
बहिणी ! युद्धात तुझा पति माझ्या हातून मारला गेला त्याचे हेच कारण आहे. आता या समयी जे कर्तव्य प्राप्त आहे, त्यास अनुसरून सदा मी तुझ्या हिताचेच साधन करीन. ॥३५॥
भ्रातुरैश्वर्ययुक्तस्य खरस्य वस पार्श्वतः ।
चतुर्दशानां भ्राता ते सहस्राणां भविष्यति ॥ ३६ ॥

प्रभुः प्रयाणे दाने च राक्षसानां महाबलः ।
तू ऐश्वर्यशाली भाऊ खराच्या जवळ जाऊन रहा. तुझा भाऊ महाबली खर चौदा हजार राक्षसांचा अधिपति होईल. तो त्या सर्वांना जेथे इच्छा असेल तेथे धाडेल आणि त्यांना अन्न, पान एवं वस्त्रे देण्यास समर्थ असेल. ॥३६ १/२॥
तत्र मातृष्वसेयस्ते भ्राताऽयं वै खरः प्रभुः ॥ ३७ ॥

भविष्यति तवादेशं सदा कुर्वन् निशाचरः ।
हा तुझा मावस भाऊ निशाचर खर सर्व काही करण्यास समर्थ आहे. आणि आदेशाचे सदा पालन करत राहील. ॥३७ १/२॥
शीघ्रं गच्छत्वयं वीरो दण्डकान् परिरक्षितुम् ॥ ३८ ॥

दूषणोऽस्य बलाध्यक्षो भविष्यति महाबलः ।
हा वीर (माझ्या आज्ञेने) शीघ्रच दण्डकारण्याच्या रक्षणासाठी जाणार आहे. महाबली दूषण त्याचा सेनापति होईल. ॥३८ १/२॥
तत्र ते वचनं शूरः करिष्यति सदा खरः ॥ ३९ ॥

रक्षसां कामरूपाणां प्रभुरेष भविष्यति ।
तेथे शूरवीर खर सदा तुझ्या आज्ञेचे पालन करील आणि इच्छेनुसार रूप धारण करणार्‍या राक्षसांचा स्वामी होईल. ॥३९ १/२॥
एवमुक्त्वा दशग्रीवः सैन्यमस्यादिदेश ह ॥ ४० ॥

चतुर्दश सहस्राणि रक्षसां वीर्यशालिनाम् ।
स तैः परिवृतः सर्वै राक्षसैर्घोरदर्शनैः ॥ ४१ ॥

आगच्छत खरः शीघ्रं दण्डकानकुतोभयः ।
स तत्र कारयामास राज्यं निहतकण्टकम् ।
सा च शूर्पणखा तत्र न्यवसद् दण्डकावने ॥ ४२ ॥
असे म्हणून दशग्रीवाने चौदा हजार पराक्रमशाली राक्षसांच्या सेनेला खराबरोबर जाण्याची आज्ञा दिली. त्या भयंकर राक्षसांनी घेरलेला खर शीघ्रच दण्डकारण्यात आला आणि निर्भय होऊन तेथील अकण्टक राज्य भोगू लागला. त्याच्या बरोबर शूर्पणखाही तेथे दण्डकारण्यात राहू लागली. ॥४०-४२॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे चतुर्विंशः सर्गः ॥ २४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा चोविसावा सर्ग पूरा झाला. ॥२४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP