श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ द्वितीयः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
अगस्त्येन पुलस्त्यस्य गुणतपसोर्वर्णनं, ततो विश्रवस उत्पत्तेः कथनं च -
महर्षि अगस्त्य द्वारा पुलस्त्यांचे गुण आणि तपस्येचे वर्णन तसेच त्यांच्यापासून विश्रवा मुनिंच्या उत्पत्तिचे कथन -
तस्य तद् वचनं श्रुत्वा राघवस्य महात्मनः ।
कुम्भयोनिर्मिहातेजा राममेतदुवाच ह ॥ १ ॥
महात्मा राघवांचे ते वचन ऐकून महातेजस्वी कुम्भयोनी अगस्त्यांनी त्यांना याप्रकारे म्हटले - ॥१॥
श्रुणु राम तथा वृत्तं तस्य तेजोबलं महत् ।
जघान शत्रून् येनासौ न च वध्यः स शत्रुभिः ॥ २ ॥
श्रीरामा ! इंद्रजिताच्या महान्‌ बळ आणि तेजाच्या उद्देश्याने जो वृत्तांत घडला आहे, तो सांगतो, ऐक ! ज्या बळामुळे तो शत्रूंना मारून टाकत होता परंतु स्वतः कुणाही शत्रूच्या हाताने मारला जात नव्हता त्याचा परिचय करून देतो. ॥२॥
तावत् ते रावणस्येदं कुलं जन्म च राघव ।
वरप्रदानं च तथा तस्मै दत्तं ब्रवीमि ते ॥ ३ ॥
राघवा ! या प्रस्तुत विषयाचे वर्णन करण्यासाठी मी प्रथम आपल्याला रावणाचे कुळ, जन्म तसेच वरदान प्राप्ति आदि प्रसंग ऐकवित आहे. ॥३॥
पुरा कृतयुगे राम प्रजापतिसुतः प्रभुः ।
पुलस्त्यो नाम ब्रह्मर्षिः साक्षादिव पितामहः ॥ ४ ॥
श्रीरामा ! प्राचीनकाळातील - सत्ययुगांतील गोष्ट आहे. प्रजापति ब्रह्मदेवांना एक प्रभावशाली पुत्र झाले, जे ब्रह्मर्षि पुलस्त्य नावाने प्रसिद्ध आहेत. ते साक्षात्‌ ब्रह्मदेवांप्रमाणेच तेजस्वी आहेत. ॥४॥
नानुकीर्त्या गुणास्तस्य धर्मतः शीलतस्तथा ।
प्रजापतेः पुत्र इति वक्तुं शक्यं हि नामतः ॥ ५ ॥
त्यांचे गुण, धर्म आणि शील यांचे पुरेपूर वर्णन करता येणे शक्य नाही. त्यांचा इतकाच परिचय देणे पर्याप्त होईल की ते प्रजापतिंचे पुत्र आहेत. ॥५॥
प्रजापतिसुतत्वेन देवानां वल्लभो हि सः ।
हृष्टः सर्वस्य लोकस्य गुणैः शुभ्रैर्महामतिः ॥ ६ ॥
प्रजापति ब्रह्मदेवांचे पुत्र असल्यानेच देवता लोक त्यांच्यावर फार प्रेम करतात. ते फार बुद्धिमान्‌ आहेत आणि आपल्या उज्ज्वल गुणांमुळेच सर्व लोकांना प्रिय आहेत. ॥६॥
स तु धर्मप्रसङ्‌गेन मेरोः पार्श्वे महागिरेः ।
तृणविन्द्वाश्रमं गत्वापि अवसन्मुनिपुङ्‌गवः ॥ ७ ॥
एक वेळ मुनि पुलस्त्य धर्माचरणाच्या प्रसंगाने महागिरी मेरूच्या निकटवर्ती राजर्षि तृणबिंदुंच्या आश्रमात गेले आणि तेथेच राहू लागले. ॥७॥
तपस्तेपे स धर्मात्मा स्वाध्यायनियतेन्द्रियः ।
गत्वाश्रमपदं तस्य विघ्नं कुर्वन्ति कन्यकाः ॥ ८ ॥

देवपन्नगकन्याश्च राजर्षितनयाश्च याः ।
क्रीडन्त्योऽप्सरसश्चैव तं देशमुपपेदिरे ॥ ९ ॥
त्यांचे मन सदा धर्माकडेच लागलेले असे. ते इंद्रियांचा संयम करून प्रतिदिन वेदांचा स्वाध्याय करीत असत आणि तपस्येमध्ये दंग असत. परंतु काही कन्या त्यांच्या आश्रमात जाऊन त्यांच्या तपस्येत विघ्न आणू लागल्या. ऋषि, नाग तसेच राजर्षि यांच्या कन्या आणि ज्या अप्सरा आहेत त्याही प्रायः क्रीडा करीत त्यांच्या आश्रमाकडे येत असत. ॥८-९॥
सर्वर्तुषूपभोग्यत्वाद् रम्यत्वात् काननस्य च ।
नित्यशस्तास्तु तं देशं गत्वा क्रीडन्ति कन्यकाः ॥ १० ॥
तेथील वन सर्व ऋतुमध्ये उपभोगात आणण्यायोग्य आणि रमणीय होते म्हणून त्या कन्या प्रतिदिन त्या प्रदेशात जाऊन विविध प्रकारच्या क्रीडा करीत होत्या. ॥१०॥
देशस्य रमणीयत्वात् पुलस्त्यो यत्र स द्विजः ।
गायन्त्यो वादयन्त्यश्च लासयन्त्यस्तथैव च ॥ ११ ॥

मुनेस्तपस्विनस्तस्य विघ्नं चक्रुरनिन्दिताः ।
जेथे ब्रह्मर्षि पुलस्त्य राहात होते, ते स्थान तर अधिकच रमणीय होते म्हणून त्या सती-साध्वी कन्या प्रतिदिन तेथे जाऊन गाणे गात, वाद्ये वाजवीत तथा नृत्य करीत असत. याप्रकारे त्या तपस्वी मुनिंच्या तपात विघ्न आणीत होत्या. ॥११ १/२॥
अथ क्रुद्धो महातेजा व्याजहार महामुनिः ॥ १२ ॥

या मे दर्शनमागच्छेत् सा गर्भं धारयिष्यति ।
यामुळे ते महातेजस्वी महामुनि पुलस्त्य काहीसे रुष्ट झाले आणि म्हणाले - उद्यापासून जी मुलगी येथे माझ्या दृष्टिपथात येईल ती निश्चितच गर्भ धारण करील. ॥१२ १/२॥
तास्तु सर्वाः प्रतिश्रुत्य तस्य वाक्यं महात्मनः ॥ १३ ॥

ब्रह्मशापभयाद् भीताः तं देशं नोपचक्रमुः ।
त्या महात्म्यांचे हे वाक्य ऐकून त्या सर्व कन्या ब्रह्मशापाच्या भयाने घाबरून गेल्या आणि त्यांनी त्या स्थानावर येणे सोडून दिले. ॥१३ १/२॥
तृणबिन्दोस्तु राजर्षेः तनया न शृणोति तत् ॥ १४ ॥

गत्वाऽऽश्रमपदं तत्र विचचार सुनिर्भया ।
परंतु राजर्षि तृणबिंदुच्या कन्येने तो शाप ऐकला नव्हता म्हणून ती दुसर्‍या दिवशी जराही न कचरतां त्या आश्रमात विचरू लागली. ॥१४ १/२॥
न चापश्यच्च सा तत्र काञ्चिदभ्यागतां सखीम् ॥ १५ ॥

तस्मिन्काले महातेजाः प्राजापत्यो महान् ऋषिः ।
स्वाध्यायमकरोत् तत्र तपसा भावितः स्वयम् ॥ १६ ॥
तेथे तिने आपल्या कुणाही सखीला आलेली पाहिले नाही. त्या समयी प्रजापतिचे पुत्र महातेजस्वी महर्षि पुलस्त्य आपल्या तपस्येने प्रकाशित होऊन तेथे वेदांच्या स्वाध्याय करीत होते. ॥१५-१६॥
सा तु वेदश्रुतिं श्रुत्वा दृष्ट्‍वा वै तपसो निधिम् ।
अभवत् पाण्डुदेहा सा सुव्यञ्जितशरीरजा ॥ १७ ॥
तो वेदध्वनि ऐकून ती कन्या त्या बाजूस गेली आणि तिने तपोनिधि पुलस्त्यांचे दर्शन केले. महर्षिंची दृष्टि पडताच तिच्या शरीरावर पिवळेपणा पसरला आणि गर्भाची लक्षणे प्रकट झाली. ॥१७॥
वभूव च समुद्विग्ना दृष्ट्‍वा तद्दोषमात्मनः ।
इदं मे किन्त्विति ज्ञात्वा पितुर्गत्वाऽऽश्रमे स्थिता ॥ १८ ॥
आपल्या शरीरामध्ये हा दोष पाहून ती घाबरून गेली आणि मला हे काय झाले ? या प्रकारची चिंता करीत पित्याच्या आश्रमात जाऊन उभी राहिली. ॥१८॥
तां तु दृष्ट्‍वा तथाभूतां तृणबिन्दुरथाब्रवीत् ।
किं त्वमेतत्त्वसदृशं धारयस्यात्मनो वपुः ॥ १९ ॥
आपल्या कन्येला त्या अवस्थेत पाहून तृणबिंदुनी विचारले - तुझ्या शरीराची अशी अवस्था कशी झाली ? तू आपल्या शरीरास ज्या रूपामध्ये धारण करीत आहेस ती तुझ्यासाठी सर्वथा अयोग्य आणि अनुचित आहे. ॥१९॥
सा तु कृत्वाञ्जलिं दीना कन्योवाच तपोधनम् ।
न जाने कारणं तात येन मे रूपमीदृशम् ॥ २० ॥
ती बिचारी कन्या हात जोडून त्या तपोधन मुनिना म्हणाली - बाबा ! ज्यामुळे माझे रूप असे झाले आहे ते कारण मी जाणत नाही. ॥२०॥
किं तु पूर्वं गतास्म्येका महर्षेर्भावितात्मनः ।
पुलस्त्यस्याश्रमं दिव्यं अन्वेष्टुं स्वसखीजनम् ॥ २१ ॥
आत्ता थोड्‍या वेळापूर्वी मी पवित्र अंतःकरण असलेल्या महर्षि पुलस्त्य यांच्या दिव्य आश्रमावर आपल्या सख्यांना शोधण्यासाठी एकटीच गेले होते. ॥२१॥
न च पश्याम्यहं तत्र काञ्चिदभ्यागतां सखीम् ।
रूपस्य तु विपर्यासं दृष्ट्‍वा त्रासादिहागता ॥ २२ ॥
तेथे जाऊन पाहिले तर कोणीही सखी उपस्थित नाही आहे. त्याच बरोबर माझे रूप पहिल्यापेक्षा विपरीत अवस्थेत पोहोचले आहे, हे सर्व पाहून मी भयभीत होऊन येथे आले आहे. ॥२२॥
तृणबिन्दुस्तु राजर्षिः तपसा द्योतितप्रभः ।
ध्यानं विवेश तच्चापि ह्यपश्यद् ऋषिकर्मजम् ॥ २३ ॥
राजर्षि तृणबिंदु आपल्या तपस्येने प्रकाशमान होते. त्यांनी ध्यान लावून पाहिले तेव्हा त्यांना ज्ञात झाले की हे सर्व काही महर्षि पुलस्त्यांच्या करण्यामुळेच झाले आहे. ॥२३॥
स तु विज्ञाय तं शापं महर्षेर्भावितात्मनः ।
गृहीत्वा तनयां गत्वा पुलस्त्यमिदमब्रवीत् ॥ २४ ॥
त्या पवित्रात्मा महर्षिंचा तो शाप जाणून ते आपल्या मुलीला घेऊन पुलस्त्यांजवळ गेले आणि याप्रकारे बोलले - ॥२४॥
भगवंस्तनयां मे त्वं गुणैः स्वैरेव भूषिताम् ।
भिक्षां प्रतिगृहाणेमां महर्षे स्वयमुद्यताम् ॥ २५ ॥
भगवन्‌ ! माझी ही कन्या आपल्या गुणांनीच विभूषित आहे. महर्षे ! आपण हिला स्वयं प्राप्त झालेल्या भिक्षेच्या रूपात ग्रहण करावे. ॥२५॥
तपश्चरणयुक्तस्य श्राम्यमाणेन्द्रियस्य ते ।
शुश्रूषणपरा नित्यं भविष्यति न संशयः ॥ २६ ॥
आपण तपस्येमध्ये लागलेले असता त्यामुळे थकून जात असाल. म्हणून ही सदा बरोबर राहून आपली सेवा-शुश्रूषा करीत राहील, यात संशय नाही आहे. ॥२६॥
तं ब्रुवाणं तु तद् वाक्यं राजर्षिं धार्मिकं तदा ।
जिघृक्षुरब्रवीत् कन्यां बाढमित्येव स द्विजः ॥ २७ ॥
असे वाक्य बोलणार्‍या त्या धर्मात्मा राजर्षिला पाहून त्यांच्या कन्येचे ग्रहण करण्याच्या इच्छेने त्या ब्रह्मर्षिनी म्हटले - फार चांगले. ॥२७॥
दत्त्वा तु तनयां राजा स्वमाश्रमपदं गतः ।
सापि तत्रावसत् कन्या तोषयन्ती पतिं गुणैः ॥ २८ ॥
तेव्हा त्या महर्षिंना आपली कन्या देऊन राजर्षि तृणबिंदु आपल्या आश्रमावर परत आले आणि ती कन्या आपल्या गुणांनी पतिला संतुष्ट करीत तेथेच राहू लागली. ॥२८॥
तस्यास्तु शीलवृत्ताभ्यां तुतोष मुनिपुङ्‌गवः ।
प्रीतः स तु महातेजा वाक्यमेतदुवाच ह ॥ २९ ॥
तिचे शील आणि सदाचार याने ते महातेजस्वी मुनिवर पुलस्त्य फार संतुष्ट झाले आणि प्रसन्नतापूर्वक असे म्हणाले - ॥२९॥
परितुष्टोऽस्मि सुश्रोणि गुणानां सम्पदा भृशम् ।
तस्माद्देवि ददाम्यद्य पुत्रमात्मसमं तव ॥ ३० ॥

उभयोर्वंशकर्तारं पौलस्त्य इति विश्रुतम् ।
सुंदरी ! मी तुझ्या वैभवाने अत्यंत प्रसन्न आहे. देवि ! म्हणून आज मी तुला आपल्या समान पुत्र प्रदान करीत आहे, जो माता आणि पिता दोघांच्याही कुळांची प्रतिष्ठा वाढवील आणि पौलस्त्य नामाने विख्यात होईल. ॥३० १/२॥
यस्मात्तु विश्रुतो वेदः त्वयेहाध्ययतो मम ॥ ३१ ॥

तस्मात्स विश्रवा नाम भविष्यति न संशयः ।
देवि ! मी येथे वेदांचा स्वाध्याय करत होतो त्या समयी तू येऊन त्याचे विशेषरूपाने श्रवण केलेस, म्हणून तुझा हा पुत्र विश्रवा अथवा विश्रवण म्हटला जाईल यात संशय नाही. ॥३१ १/२॥
एवमुक्ता तु सा देवी प्रहृष्टेनान्तरात्मना ॥ ३२ ॥

अचिरेणैव कालेन् आसूत विश्रवसं सुतम् ।
त्रिषु लोकेषु विख्यातं यशोधर्मसमन्वितम् ॥ ३३ ॥
पतिने प्रसन्नचित्त होऊन असे म्हटल्यावर त्या देविने मोठ्‍या आनंदाने थोड्‍याच समयानंतर विश्रवा नामक पुत्राला जन्म दिला, जो यश आणि धर्माने संपन्न होऊन तीन्ही लोकात विख्यात झाला. ॥३२-३३॥
श्रुतिमान् समदर्शी च व्रताचार रतस्तथा ।
पितेव तपसा युक्तो हि अभवद् विश्रवा मुनिः ॥ ३४ ॥
विश्रवा मुनि वेदाचे विद्वान्‌, समदर्शी, व्रत आणि आचाराचे पालन करणारे आणि पित्यासमानच तपस्वी झाले. ॥३४॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे द्वितीयः सर्गः ॥ २ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा दुसरा सर्ग पूरा झाला. ॥२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP