॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

सुंदरकांड

॥ अध्याय तिसरा ॥
रावणसभेवर मारूतीचा पुच्छप्रयोग

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

बाजातपेठा, बिभीषणाचे मंदिर पाहूनही सीतेचा शोध लागला नाही :

शोधितां बिभीषणमंदिर । सुखी झाला तो कपीन्द्र ।
शुद्धि न लभेचि सीता सुंदर । तेणें वानर उद्वेगी ॥ १ ॥
शोधिलें समस्त नगर । शोधिलीं हटकें घरोघर ।
शुद्धि न लभेचि अणुमात्र । तेणें वानर उद्वेगी ॥ २ ॥
शोधिलें समस्त नगर जाण । जन आणि अवघें वन ।
स्वयें शोधिलें सावधान । तेणें उद्विग्न वानर ॥ ३ ॥
सीताशुद्धर्थी उद्विग्न । अति चिंता कंपायमान ।
आतां करी बुद्धि आपण । सीता चिद्रत्‍न तेणें लाभे ॥ ४ ॥

मारूतीची अभिनव योजना :

येथें शोधावया सीताशुद्धर्थ । कळी माजवूं नगराआंत ।
लागता निष्ठुर आघात । सीताशुद्धर्थ वदतील ॥ ५ ॥
रावण आज्ञा अति दारूण । त्याभेणें न सांगती जन ।
बुद्धि निर्धारी आपण । कलहो पूर्ण उत्पादी ॥ ६ ॥
आपण राहोनियां गुप्त । कळी लाविजे जेथिलें तेथ ।
वर्मे कर्मे आक्रंदत । सीताशुद्धर्थ वदतील ॥ ७ ॥
ऐसें विचारोनि जाण । प्रवेशला लंकाभुवन ।
राजद्वरीं संपूर्ण । करी विंदान कलहाचें ॥ ८ ॥

स्वतः गुप्त राहून शेपटीच्या साहाय्याने सर्वत्र कलह माजविला :

गुप्त राहोनि जनाआंत । वानर चेष्टा करी चेष्टित ।
कलहा माजवी जेथींचा तेथ । कथा अद्‌भुत अवधारा ॥ ९ ॥
हनुमान विनोदें पैं जाण । निजपुच्छासी करी नमन ।
सीताशुद्ध्यर्थ आपण । साह्य संपूर्ण मज व्हावें ॥ १० ॥

घरोघरी पाणी साठलेल्या घागरींची आपटा-आपट व स्फोट :

पुच्छें गोवोनि फोडी घागरी । तीवरी पाडी दुसरी ।
सवेंचि ढकली तिसरी । चौथी तीवरी घटस्फोट ॥ ११ ॥
पांचवी जाण पैं चांचरी । सहावीचा आधार धरी ।
शातानुशतें असंख्य नारी । फोडी घागरी निजपुच्छें ॥ १२ ॥
कोण मेला गेला आम्हांआंत । रिघोनि घागरी फोडित ।
हनुमान पुच्छ भोवंडी नाकांत । नारी नाचत चमकोनी ॥ १३ ॥
पुढिल्या चमकोनि नाचती । मागील दचकोनि झाडिती ।
नाकीं पुच्छ भोवंडी मारूती । नारी शिंकती खसखसा ॥ १४ ॥
नारी शिंकती थटथटां । घागरी फुटतीं फटफटां ।
नगरीं उदकाचा तोटा । लावी वेढा निजपुच्छें ॥ १५ ॥
भरली घागरी नगराआंत । रिघों नेदिच हनुमंत ।
द्वंद मांडिले परी गुप्त । तोटा नगरांत उदकाचा ॥ १६ ॥
राजा निमाला ये नगरीं । घटस्फोट राजद्वारीं ।
शंख करिती नरनारी । सीता सुंदरी क्षोभली ॥ १७ ॥

सीतेला लंकेत आणल्यामुळे हा प्रसंग आला अशी नागरिकांची ओरड :

श्रीरामाची निजकांता । चोरोनि आणिलीसे सीता ।
तिणें उठविलें आकांता । लंकानाथा वधावया ॥ १८ ॥
सीता क्षोभली दारूण । शोषिलें राक्षसांचे जीवन ।
आतां कैसेनि वांचती प्राण । जीवनेंवीण जिणें कैंची ॥ १९ ॥
आंगोळ्या मोडिती नरनारी । क्षोभे क्षोभली सीता सुंदरी ।
आतां राक्षसां नुरे उरी । करील बोहरी लंकेची ॥ २० ॥
राजद्वारीं घटस्फोट । खापरें पडलीं घनदाट ।
बुजाली राजद्वाराची वाट । विघ्न दुर्घट लंकेसी ॥ २१ ॥
ऐसा हा घटस्फोटवृत्तांत । वेगळा बैसोनि हनुमंत ।
कलहो माजवी नगराआंत । सीताशुद्ध्यर्थ शोधावया ॥ २२ ॥

राजभवनाकडे जाणार्या मानकर्यांवर शेपटीचा प्रयोग,
अश्वारूढ, गजारूढ, रथारूढ व शिबिकेतील स्वारांची दैना, दुर्दशा :

राजसन्मानी महावीरीं । अश्वीं चढोनि राजद्वारीं ।
होहो मामा जीजीकारीं । नानापरीं नाचविती ॥ २३ ॥
पुच्छ गोवोनि अश्वपायांत । वीरा तोंडघसीं पाडित ।
दांत घालोनि घशांत । करी आरक्त मुख त्याचें ॥ २४ ॥
पुच्छ आश्वाचें पाय उखळित । वीरांमुखीं अशुद्ध वाहत ।
ऐसे योद्धे असंख्यात । पडले कुंथत अति दुःखी ॥ २५ ॥
ऐशिया वीरांच्या कोडी । उचऊचकूं त्यांची घोडीं ।
राजद्वारीं घाली उपडीं । दांत पाडी वीरांचे ॥ २६ ॥
तोंडे ठेंचली अश्वपती । तैसीच गजारूढांची गती ।
पुच्छें दंडिले मारूती । तीही ख्याती अवधारा ॥ २७ ॥
राजयोद्धे महाशूर । चरणीं ब्रिदांचा तोडर ।
माथां धरूनि आतपत्र । राजद्वारीं ठाकले ॥ २८ ॥
गजद्वारीं प्रवेशती । पुच्छें खुंटोनि गजगती ।
मागील ओढोनियां हस्ती । हाणी दांतीं पुढिल्यातें ॥ २९ ॥
माझ्या हस्तीवरी हस्ती । कां रे आणिला उद्धतीं ।
वीर वीरांते हाणिती । गज भिडती गजांसी ॥ ३० ॥
गजदंतांची खणखण । शस्त्रें सुटती सणसण ।
राजद्वारीं महारण । अति दारूण मांडिलें ॥ ३१ ॥
पुढील पडलिया माहुता । पार्श्वदूतीं पुढें बैसतां ।
गज गजासी जुंझतां । अत्यद्‌भुत गजयुद्धें ॥ ३२ ॥
वीर विजयो पावूं पहात । गुप्त पुच्छाचा वाजे घात ।
गज गडबडीं जैसें प्रेत । वीर कुंथत रगडोनि ॥ ३३ ॥
ऐसे नेणों किती हस्ती । गुप्त पुच्छाचे आघातीं ।
लोळविले ते कुंथती । गजपंक्तीं गांजोनी ॥ ३४ ॥
रथीं बैसोनि राजकुमर । कनकदंड ढळती चवर ।
पुढें वाजंत्र्यांचे भार । राजद्वारा ठाकिले ॥ ३५ ॥
गुप्तगतीं थोकिलीं घोडीं । पुच्छें सारथियांतें ओढी ।
लागवेगें ध्वज आसुडी । कुमर पाडी क्षितीसीं ॥ ३६ ॥
महावीर पडतां क्षितीं । त्याचा रथ त्यावरी उलथी ।
चारी घोडीं होता पालथीं । कुमर कुंथती दडपोन ॥ ३७ ॥
वारू सारथी महारथी । एक वेळीं ते पडती ।
वाजंत्री शंख करिती । क्षितीं लोळती चवरधर ॥ ३८ ॥
ऐसिया रथांच्या कोडी । हनुमान गुप्तघातें मोडी ।
पुच्छ नाचविल्या बुडीं । रथाचीं घोडीं फडफडतीं ॥ ३९ ॥
ऐसे वीर नेणों किती । पडिले राजद्वारीं हुंबती ।
खाट दांडिया उचलोनि नेती । तेही भीती गुप्तघाता ॥ ४० ॥
मागिला मागें ये पांपरी । पुढिला पुढें रणभरी ।
एवढा वळसा कोण करी । निजनिर्धारीं लक्षेना ॥ ४१ ॥
क्षोभली श्रीरामांची कांता । तिणें सोडिलें अति उत्पाता ।
करील राक्षसांचे घाता । लंकानाथासमवेत ॥ ४२ ॥
प्रधानवर्ग राजसन्मानी । बैसोनि येतां सुखासनीं ।
पुच्छ भोवंडितां भोयांचे कानीं । दोघे चमकोनि पाहती ॥ ४३ ॥
भोई नाचतीं तडतडां । कान झाडिती फडफडा ।
पुच्छें लावितांचि वेढा । पालखीं पुढां आदळली ॥ ४४ ॥
धरणीं आदळतां पालखी । दांडी मोडोनि वाजे मस्तकीं ।
प्रधानवर्ग झाले दुःखी । अधोमुखीं आदळत ॥ ४५ ॥

इतर मानकर्यांवरही त्याप्रमाणेच प्रयोग :

बोभाट केला सेवकीं । एक शिंपती उदकीं ।
सावधान होतां एकाकीं । हांसिजे लोकीं लंकेच्या ॥ ४६ ॥
रावणापासीं अति सन्मान । त्यासी राजद्वारीं अपमान ।
हांसता देखोनियां जन । क्षोभायमान त्यावरी ॥ ४७ ॥
सघृत त्यातें नित्य चौशेरीं । यावेगळें भोजन घरीं ।
रचित वेतन देतां करीं । राजद्वारीं पडियेले ॥ ४८ ॥
भोयांसी देतां बुक्या लाता । ते म्हणतीं कां मारिता वृथा ।
भूत चेतवी श्रीरामकांता । अपमानता तेणें तुम्हां ॥ ४९ ॥
ऐशिया पालखियांच्या हारी । हनुमान उलथी पुच्छेंकरी ।
अवकळा करोनि भारी । धुळीमाझारीं मेळविलें ॥ ५० ॥
पालखी मोडली नये कामासी । खाटदांडी प्रधानांसी ।
कुंथत धाडिलें घरासीं । अपमानासीं राजवर्गीं ॥ ५१ ॥
लंकेमाजी आहे सीता । ऐकोनि आल्हाद हनुमंता ।
तिचे साधावया इत्यर्था । कळी कलहार्था उपपादी ॥ ५२ ॥

मल्लांचा संघर्ष; वारेवाले, वाजंत्री, वेदपाठक व इतर :

पुढें ब्रिदाचे माल जात । मागेंही माल येती उन्मत्त ।
हनुमान उचलोनि त्यांची लात । वेगीं हाणित पुढलियां ॥ ५३ ॥
कां रे हाणितों लाता । तो म्हणे चांचरलों अवचिता ।
तूं तरी मातलासी सर्वथा । तुझिया घाता मी करीन ॥ ५४ ॥
दांत खावोनि सवोष्ठीं । भिंवया चढवोनि नाकाटीं ।
येरयेरा हाणिती मुष्टी । क्रोधदृष्टीं खवळोनि ॥ ५५ ॥
उरीं शिरीं मुंडपीं देखा । बाहु आंसडोनि लाविती धडका ।
परस्परें हाणिती झडका । गुडघा ढका हाणोनि ॥ ५६ ॥
तळवे हाणिती रागेंकरीं । उफराटिया निजकरीं ।
वर्मी हाणितां कोंपरी । शिरीं उरीं चंडघातें ॥ ५७ ॥
वेगें आणावया तळासीं । दोघें उडती आकाशीं ।
शिर हाणोनि शिरासीं । निजबाहूसीं आफळी ॥ ५८ ॥
एक रिघे एकातळीं । तंव तो त्यासी चेंपी भूतळीं ।
वरील उलथोनि तत्काळीं । धरी नळी निमटावया ॥ ५९ ॥
नळी चेपिता प्रबळ । पायांमाजी लावी कळ ।
तेणें होवोनि विव्हळ । नळी तत्काळ सोडिली ॥ ६० ॥
सवेंचि धरोनि दोहों पायीं । उपटावया दोन्हीं बाहीं ।
बळें आदळितां भुयीं । तळपोनि ह्रदयीं हाणी लाता ॥ ६१ ॥
ऐसी मल्लविद्या गाढी । दोघांची समान घडमोडी ।
झोंबी घेतां कडोविकडीं । समपरवडी दों वीरां ॥ ६२ ॥
घेतां मल्लविद्धेचा झाडा । मृदंग्या लाविला वादु गाढा ।
त्यापुढें राऊतांचा झगडा । काधोनि जमदाढा हांकिती ॥ ६३ ॥
त्यापुढें ब्राह्मण वेदांती । घटपट बोलती युक्ती ।
कोठें आहे सीता सती । तेही नेणती निश्चयें ॥ ६४ ॥
वेदपाठकांचा वेवाद । अक्षरें चुकलीं स्वर अबद्ध ।
सीताशुद्धिचा अनुवाद । तेही विशद न बोलती ॥ ६५ ॥

रावणाच्या सभेत हेरांचा वृत्तांत, सर्व ठिकाणी अंधार :

ऐसी लावितां नगरीं कळी । ठायीं न पडे जनकबाळी ।
आतां रावणाचे जवळी । सभा समूळीं शोधूं पां ॥ ६६ ॥
तंव झाली निशी तेथ । रावाणाचे सभेआंत ।
रिघता झाला पैं हनुमंत । तोही प्रताप अवधारा ॥ ६७ ॥
सिंहासनी दशानन । सभेंसी राक्षस प्रधान ।
निजयुद्धी सावधान । पार्श्वदगण असंख्य ॥ ६८ ॥
सभेंसीं येवोनि घरटीकार । करूनि रावणासी जोहार ।
सांगती नगरींचा विचार । विघ्न दुर्धर दिसताहे ॥ ६९ ॥
जितुकी दृष्टि संचारी । तितुकी आजिच्या प्रथम प्रहरीं ।
अवघी उठली राजद्वारीं । क्षयकारीं नृपनाथा ॥ ७० ॥

पूर्वीच्यांनीं दुर्लक्ष केल्याचा परिणाम :

अमरवदें खटाटोप । ऐसीं अरिष्टें मानिती अल्प ।
स्वयें निमाला हिरण्यकशिप । सप्रताप अहर्निशीं ॥ ७१ ॥
ज्याचें आमंत्रण घेऊन । त्याचे घरीं अन्न खावोन ।
अधर्में हरी द्विजधन । सहस्त्रार्जुन निमाला ॥ ७२ ॥
त्याचे दुश्चिन्हांचें संधीं । सहस्त्रभुजांचे खांदी ।
पुत्रांसहित सैन्यमांदी । त्यातें वधी द्विजपुत्र ॥ ७३ ॥
मग सांगती ज्योतिषी । जावोनि सांगा रायापासीं ।
अधर्में आणिलें सीतेसी । तें विघ्न नगरासीं पैं आलें ॥ ७४ ॥
अश्वपति गजपति । अतिरथी महारथी ।
राजद्वारीं स्वयें उलथती । घायें हुंबती दडपोनी ॥ ७५ ॥
कोणी न दिसतां आघाती । वीर मरणांत कुंथती ।
अश्व गज तळमळती । मूर्च्छा येती प्राणांत ॥ ७६ ॥
आणिक अरिष्टांची थोरी । घटस्फोट राजद्वारीं ।
असंख्यांत शतसहस्त्रीं । करिती नारी महाशब्द ॥ ७७ ॥
पालखीपदस्थ आर्तुबळी । शिबिकाभंग मेळविले धुळी ।
म्हणती क्षोभली जनकबाळी । करील होळी नगराची ॥ ७८ ॥

अशा वार्ता आणेल त्याला कडक शासन :

रावणें ऐकोनि ही कथा । दुष्ट वदला हे वार्ता ।
म्हणे करा रे याचे घाता । द्वंद सर्वथा हा होय ॥ ७९ ॥
आणा संमुख बांधा हात । जिव्हा छेदा रे सदंत ।
कान कापोनि येथ । न्या नगरांत खरारोहें ॥ ८० ॥
ऐकोनि रावणाचें वचन । हनुमान क्षोभला दारूण ।
असत्य मानितो विघ्नचिन्ह । सत्य त्यासी करूनि दाखवूं ॥ ८१ ॥
विघ्न समस्त सत्य मानिती । रावण चळीं कोपें चित्तीं ।
ऐसीं सभेसी लावी ख्याती । कोपें मारुती खवळला ॥ ८२ ॥
माझीं सर्व दुश्चिन्हें सांगता जरी । दंड पाविजे घरटीकारीं ।
तरीं भूमिभार संसारीं । आतांचि बाहेर भोवंडीन ॥ ८३ ॥
आयुष्य व्हावें माझिया पुच्छासी । रावणसभा हे कायसी ।
ख्याती लावीन सकळांसी । रावणासी गांजोनी ॥ ८४ ॥

मारूतीचा सभास्थानांवर प्रयोग, दिवे विझवणे :

सभासमवेंत प्रधानीं । रावण बैसला सिंहासनीं ।
हनुमान तें काळीं कोपोनी । केली करणी ते ऐका ॥ ८५ ॥
सुंगधतलैदीपिका अनेक । कर्पूरदीप अठरा लाख ।
दोही बाहीं लखलख । सभा सम्यक शोभत ॥ ८६ ॥
तंव हनुमंता आला तंवक । पुच्छ हाणोनियां देख ।
विझविल्या दीपिका सकळिक । चमकले लोक सभेचे ॥ ८७ ॥
सभेसी पडतां अंधारी । हनुमंतें मांडिली चोरी ।
मुकुट कुंडलें छत्रें हारी । शस्त्रास्त्रीं नागविले ॥ ८८ ॥
एक म्हणती माझी नेली वस्त्रें । दुजा म्हणे माझीं नेलीं शस्त्रें ।
भट म्हणे माझी नेलीं धोत्रें । सभा वानरें नागविली ॥ ८९ ॥
कुंडलें घेतां कान तोडी । वस्त्रें घेतां डोळे फोडी ।
बाहुवटें घेता बाहु मोडी । केली धांदडी राक्षसां ॥ ९० ॥
मुकुट घेतां मस्तक फोडी । कटिसूत्रासी माज मोडी ।
मुद्रिका घेतां आंगोळ्या उपडी । केली धांदडी राक्षसां ॥ ९१ ॥
कंठमाळा घेता कंठ मुरडी । पदका काढितां ह्रदय फोडी ।
नेसणें घेतां लिंग तोडी । केलीं बापुडीं राक्षसें ॥ ९२ ॥
नेसणीं सांडा रे लौकरीं । नातरी लिंगा करील बाहेरी ।
नपुंसकता ये संसारी । कैशापरी सोसेल ॥ ९३ ॥
पायीं बिद्रें वीरांसी पूर्ण । तयांसाठी मोडी चरण ।
बोंबलूं जातां छेदी घ्राण । फें फें वचन राक्षसां ॥ ९४ ॥
येरयेरां सांगती बुद्धी । बोंबलूं नका रे त्रिशुद्धी ।
बोंबलूं जातां नाक छेदी । निःशब्दवादी उगे राहा ॥ ९५ ॥
रावणाचे उरी शिरीं । हनुमान सुबद्ध टोले मारी ।
तेणें त्यासी आली अंधारी । भयेंकरी न बोलवे ॥ ९६ ॥
अंधारीनें न दिसे व्यक्त । आंगी वाजती आघात ।
तेणें भये लंकानाथ । चळीं कापत थरथरां ॥ ९७ ॥
वस्त्रें अलंकार जोडती पुढें । तैंसे नाक तंव न जोडे ।
ख्याति लाविली माकडें । येरू दडे येरामागें ॥ ९८ ॥
जो बोंबलिला घरटीकार । तें विघ्न आलें दुस्तर ।
सीता क्षोभली साचार । दश शिरवधार्थीं ॥ ९९ ॥
जानकी कोपोनि अद्‌भुत । तिणें सोडिला पुच्छकेत ।
रावण मेला कीं जीत । कोणी मात न सांगें ॥ १०० ॥
रावण निमाला अंधारीं विघ्न आलें त्यावरीं ।
बोंब पडली सभेमाझारी । ये पांपरी राक्षसां ॥ १०१ ॥
मारिला इंद्रजित कुंभकर्ण । तयांमागें येथें रावण ।
आतां धांवण्या धांवे कोण । राक्षसगण कांपती ॥ १०२ ॥
पिता क्षोभिला पवन । दीपिका गेल्या विझोन ।
राक्षसां ओढवलें कंदन । दशवदन निमाला ॥ १०३ ॥
भंगले राजाज्ञेचें सूत्र । सभेमाजि रिघाले चोर ।
नागविले थोर थोर । निशाचर पळों पहाती ॥ १०४ ॥
जो कोणी निघे सभेबाहेरी । त्यासी पुच्छ सुबद्ध मारी ।
अवघे दडाले अंधारीं । ये पापरी राक्षसां ॥ १०५ ॥
सीता क्षोभिली अति उद्धट । आम्हांसी आलें अति संकट ।
बाहेर जातां न फुटे वाट । विघ्न दुर्घट ओढवलें ॥ १०६ ॥
पुढें रावणाचा मुकुट । अति बळें ओढी मर्कट ।
तेणें धाकें दशकंठ । म्हणे शेवट मज आला ॥ १०७ ॥
सत्य बोलती घरटीकार । विघ्न आलें मज साचार ।
गुप्तघात अति दुर्धर । लागती निष्ठुर प्राणांत ॥ १०८ ॥
हनुमान सांगें कानीं बीजाक्षर । तुवां चोरिली सीता सुंदर ।
तुझें छेदावया शिर । आलों साचार रामदूत ॥ १०९ ॥
रावणाचीं दाही शिरें । हनुमान छेदिता नखाग्रें ।
निवारलें हो श्रीरामचंद्रे । म्हणोनि वानरें राखिला ॥ ११० ॥
तूं जरी मारशील लंकानाथ । तरी माझा पुरूषार्थ जाईल व्यर्थ ।
ऐसें बोलिला श्रीरघुनाथ । तेणें हनुमंत न मारी ॥ १११ ॥
वानरें लावितांचि हात । रावण झाला अति भ्रांत ।
कानीं जो पडला गुप्तार्थ । लंकानाथ तो नेणें ॥ ११२ ॥
दीपिका आणितांचि तेथ । अवघे नागवे हळहळित ।
येरयेरां जैं पहात । मग लाजत अधोमुखें ॥ ११३ ॥
एकाची वळली बोबडी । एक धाकधाकें उबडीं ।
एक केवळ जाहलीं वेडीं । आला धाडी पुच्छकेत ॥ ११४ ॥
एका झाली दांतपाडी । एक केवळ झालीं मढी ।
एक धाकती बापुडीं । आला धाडी पुच्छकेत ॥ ११५ ॥
एका झाल अधोवार्थ । एका सुटला कंपवात ।
सभेचा निमाला पुरूषार्थ । पुच्छकेत लागला ॥ ११६ ॥
रावणाचे सभेआंत । करोनि राक्षसां आकांत ।
नागवोनि गेला हनुमंत । लंकानाथ कालमुख ॥ ११७ ॥
राक्षस गांजिले उदंड । सभेचें निमालें बळबंड ।
रावणाचें काळें तोंड । तो ही वितंड गांजिला ॥ ११८ ॥
संमुख देखिला दशानन । सभेमाजी पडिलें खान ।
अवघे हळहळती नग्न । दंतभग्न राक्षस ॥ ११९ ॥
सभेंसी बैसोनि हनुमंत । रावणराक्षसां अति आकांत ।
हनुमान महात्मा याचा अर्थ । व्यर्थ ग्रंथ न म्हणावा ॥ १२० ॥
एक श्लोकाचा श्लोकार्थ । इतुका आहे गुप्तार्थ ।
श्रोतीं पहावें सावचित्त । मी अपत्य संतांचें ॥ १२१ ॥

जगाम चिन्तामपरां सीतांप्रति महाकपि : ॥

अपत्यभाग्य कैंचें मज । तंव त्यांचे चरणरज ।
ग्रंथार्थी निजओज । श्रीरघुराज स्वयें वदवी ॥ १२२ ॥
माझें भावार्थरामायण । त्याचें मूळ मायां दावावें कवण ।
श्रीराम मूळीं मूळकारण । कथार्थ गहन श्रीराम ॥ १२३ ॥
श्रीराम माझें वदतें वचन । अक्षरीं अक्षरीं श्रीराम पूर्ण ।
माझें बुद्धीचें गुह्य ज्ञान । चैतन्यघन श्रीराम ॥ १२४ ॥
ह्रदयीं श्रीराम रिघोनि जाण । बळेचि करवी रामायण ।
ग्रंथाचें मूळीं श्रीरघुनंदन । ग्रंथार्थ गहन श्रीराम ॥ १२५ ॥
नेणें वेद नेणें शास्त्रार्था । माझे अंगी अति मूर्खता ।
ग्रंथ आवडला श्रीरघुनाथा । वदनीं वदविता श्रीराम ॥ १२६ ॥
एकाजनार्दना शरण । रामें रम्य रामायण ।
रामें रम्य कथा गहन । कथा पावन श्रीरामें ॥ १२७ ॥
॥ इति श्रीभावार्थरामयणें सुंदरकांडे एकाकारटीकायां
रावणसभालुंठनं नाम तृतियोऽध्यायः ॥
॥ ओव्यां १२७ ॥ श्लोक - ॥ एवं संख्या १२७ ॥



GO TOP