[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। एकोनषष्टितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामस्य शोकेन समेषां जडचेतनानामयोध्यायापुर्याश्च दुरवस्थाया वर्णनं राज्ञो दशरथस्य विलापश्च -
सुमन्त्रद्वारा श्रीरामांच्या शोकाने जड-चेतन एवमयोध्यापुरीच्या दुरवस्थेचे वर्णन तथा राजा दशरथांचा विलाप -
मम त्वश्वा निवृत्तस्य न प्रावर्तन्त वर्त्मनि ।
उष्णमश्रु प्रमुञ्चन्तो रामे सम्प्रस्थिते वनम् ॥ १ ॥

उभाभ्यां राजपुत्राभ्यामथ कृत्वाहमञ्जलिम् ।
प्रस्थितो रथमास्थाय तद्दुःखमपि धारयन् ॥ २ ॥
सुमंत्रांनी म्हटले - ’ज्यावेळी श्रीरामांनी वनाकडे प्रस्थान केले, तेव्हा मी त्या दोन्ही राजकुमारांना हात जोडून प्रणाम केला आणि त्यांच्या वियोगाचे दुःख हृदयात धारण करून रथावर आरूढ होऊन तेथून परत फिरलो. परत येतेवेळी माझे घोडे नेत्रातून गरम- गरम अश्रु ढाळू लागले. रस्त्याने चालण्यात त्यांचे जराही मन लागत नव्हते. ॥१-२॥
गुहेन सार्धं तत्रैव स्थितोऽस्मि दिवसान् बहून् ।
आशया यदि मां रामः पुनः शब्दापयेदिति ॥ ३ ॥
’मी गुहाबरोबर काही दिवस तेथेच या आशेने थांबून रहिलो की संभव आहे की श्रीराम परत मला बोलावून घेतील. ॥३॥
विषये ते महाराज रामव्यसनकर्शिताः ।
अपि वृक्षाः परिम्लानाः सपुष्पाङ्‌कुरकोरकाः ॥ ४ ॥
’महाराज ! आपल्या राज्यांतील वृक्ष सुद्धा या महान संकटाने कृशकाय होऊन गेले आहेत. फुले, अंकुर आणि कळ्यांसहित कोमजून गेले आहेत. ॥४॥
उपतप्तोदका नद्यः पल्वलानि सरांसि च ।
परिशुष्कपलाशानि वनान्युपवनानि च ॥ ५ ॥
’नद्या, लहान जलाशय तसेच मोठ्या सरोवरांचे जल गरम झाले आहे. वने आणि उपवने यांतील पाने सुकून- वाळून गेली आहेत. ॥५॥
न च सर्पन्ति सत्त्वानि व्याला न प्रचरन्ति च ।
रामशोकाभिभूतं तन्निष्कूजमभवद् वनम् ॥ ६ ॥
’वनातील जीव-जंतु आहारासाठी देखील कोठे जात नाही आहेत. अजगर आदि सर्पही जेथल्या तेथे पडून राहिले आहेत, पुढे सरकत नाहीत. रामांच्या शोकाने पीडित झालेले ते सारे वन नीरव झाल्या सारखे भासत आहे. ॥६॥
लीनपुष्करपत्राश्च नरेन्द्र कलुषोदकाः ।
संतप्तपद्माः पद्मिन्यो लीनमीनविहङ्‌गमाः ॥ ७ ॥
’नद्यांचे जल मलिन झाले आहे. त्यात पसरलेल्या कमळांची पाने गळून पडली आहेत. सरोवरातील कमळे सुकून गेली आहेत. त्यात रहाणारे मत्स्य आणि पक्षीहि नष्टप्राय होऊन गेले आहेत. ॥७॥
जलजानि च पुष्पाणि माल्यानि स्थलजानि च ।
नातिभान्त्यल्पगन्धीनि फलानि च यथापुरम् ॥ ८ ॥
’जलांत उत्पन्न होणारी पुष्पे तथा भूमिवर उत्पन्न होणारी फुलेही फारच थोड्या सुगंधाने युक्त असल्याने अधिक शोभून दिसत नाहीत तसेच फळेही पूर्ववत दृष्टिगोचर होत नाहीत. ॥८॥
अत्रोद्यानानि शून्यानि प्रलीनविहगानि च ।
न चाभिरामानारामान् पश्यामि मनुजर्षभ ॥ ९ ॥
’नरश्रेष्ठ ! अयोध्येतील उद्यानेही ओसाड होऊन गेली आहेत. त्यांच्यात रहाणारे पक्षीही कोठे दडून बसले आहेत. तेथील बगिचेही मला पूर्वीप्रमाणे मनोहर दिसून येत नाहीत. ॥९॥
प्रविशन्तमयोध्यां मां न कश्चिदभिनन्दति ।
नरा राममपश्यन्तो निश्वसन्ति मुहुर्मुहुः ॥ १० ॥
’अयोध्येत प्रवेश करीत असता कुणीही माझ्याशी प्रसन्न होऊन बोलले नाही. श्रीराम न दिसल्याने लोक वारंवार दीर्घ श्वास घेऊ लागले. ॥१०॥
देव राजरथं दृष्ट्‍वा विना राममिहागतम् ।
दुःरादश्रुमुखः सर्वो राजमार्गे गतो जनः ॥ ११ ॥
’देव ! रस्त्यावर आलेले सर्व लोक राजाचा रथ रामांशिवायच येथे परतून आला आहे हे पाहून दुरूनच अश्रु ढाळू लागले. ॥११॥
हर्म्यैर्विमानैः प्रासादैरवेक्ष्य रथमागतम् ।
हाहाकारकृता नार्यो रामादर्शनकर्शिताः ॥ १२ ॥
’अट्टालिका, विमाने आणि प्रासादांवर बसलेल्या स्त्रिया तेथूनच रथ मोकळाच परत आलेला पाहून श्रीरामांचे दर्शन न झाल्याने व्यथित होऊन हाहाकार करू लागल्या. ॥१२॥
आयतैर्विमलैर्नेत्रैरश्रुवेगपरिप्लुतैः ।
अन्योन्यमभिवीक्षन्तेऽव्यक्तमार्ततराः स्त्रियः ॥ १३ ॥
’त्यांचे काजळ आदि रहित मोठे मोठे नेत्र अश्रुंच्या वेगात बुडून गेले होते. त्या स्त्रिया अत्यंत आर्त होऊन अव्यक्त भावाने एक दुसरीकडे (एकमेकीकडे) पहात होत्या. ॥१३॥
नामित्राणां न मित्राणामुदासीनजनस्य च ।
अहमार्ततया कंचिद् विशेषं नोपलक्षये ॥ १४ ॥
’शत्रू, मित्र तसेच उदासीन (मध्यस्थ) मनुष्यांनाही मी समान रूपाने दुःखी झालेले पाहिले आहे. कुणाच्याही शोकात मला काही अंतर दिसून आले नाही. ॥१४॥
अप्रहृष्टमनुष्या च दीननागतुरङ्‌गमा ।
आर्तस्वरपरिम्लाना विनिःश्वसितनिःस्वना ॥ १५ ॥

निरानन्दा महाराज रामप्रव्राजनातुरा ।
कौसल्या पुत्रहीनेव अयोध्या प्रतिभाति मे ॥ १६ ॥
’महाराज ! अयोध्येतील लोकांचा आनंद हिरावून घेतला गेला आहे. तेथील घोडे आणि हत्तीही फार दुःखी आहेत. सर्व पुरी आर्त नादाने मलीन दिसून येत आहे. लोकांचे सुस्कारेच या नगरीचे उच्छवास बनले आहेत. ही अयोध्यापुरी राम वनवासामुळे व्याकुळ झालेल्या पुत्रवियोगिनी कौसल्येप्रमाणेच मला आनंद रहित प्रतीत होत आहे.’ ॥१५-१६॥
सूतस्य वचनं श्रुत्वा वाचा परमदीनया ।
बाष्पोपहतया सूतमिदं वचनमब्रवीत् ॥ १७ ॥
सुमंत्राचे वचन ऐकून दशरथ राजांनी त्यांना अश्रु- गदगद परम दीनवाणीने म्हटले- ॥१७॥
कैकेय्या विनियुक्तेन पापाभिजनभावया ।
मया न मन्त्रकुशलैर्वृद्धैः सह समर्थितम् ॥ १२ ॥
’सूत ! जी पापपूर्ण कुळात आणि पापपूर्ण देशात उत्पन्न झालेली असून जिचे विचारही पापपूर्ण आहेत त्या कैकेयीच्या बोलण्यास फसून मी या विषयात सल्ला देण्यात कुशल अशा वृद्ध पुरुषांबरोबर काही विचार परामर्शही केला नाही. ॥१८॥
न सुहृद्‌भिर्न चामात्यैर्मन्त्रयित्वा सनैगमैः ।
मयायमर्थः सम्मोहात् स्त्रीहेतोः सहसा कृतः ॥ १९ ॥
’सुहृद, मंत्री आणि वेदवेत्ते पुरुष यांचा सल्ला न घेताच मी मोहवश केवळ एका स्त्रीची इच्छा पूर्ण करण्यासाठी एकाएकी हे अनर्थकारक कार्य करून टाकले आहे. ॥१९॥
भवितव्यतया नूनमिदं वा व्यसनं महत् ।
कुलस्यास्य विनाशाय प्राप्तं सूत यदृच्छया ॥ २० ॥
’सुमंत्रा ! भवितव्यतेस अनुसरून ही भारी विपत्ति निश्चितच या कुळाचा विनाश करण्यासाठीच अकस्मात येऊन ठेपली आहे. ॥२०॥
सूत यद्यस्ति ते किञ्चिन्मयापि सुकृतं कृतम् ।
त्वं प्रापयाशु मां रामं प्राणाः संत्वरयन्ति माम् ॥ २१ ॥
’सारथी ! जर मी तुमच्यावर कधी थोडासाही जरी उपकार केलेला असेल तर तुम्ही मला तात्काळ श्रीरामांजवळ पोहोंचवा. माझे प्राण मला त्वरित श्रीरामाचे दर्शनाची घाई करण्याची प्रेरणा देत आहेत. ॥२१॥
यद्यद्यापि ममैवाज्ञा निवर्तयतु राघवम् ।
न शक्ष्यामि विना रामं मुहूर्तमपि जीवितुम् ॥ २२ ॥
’जर आज ही या राज्यात माझी आज्ञा चालत असेल तर तुम्ही माझ्याच आदेशावरून जाऊन राघवाला परत घेऊन या, कारण आता मी त्यांच्या शिवाय एक मुहूर्तपर्यंतही जिवंत राहू शकणार नाही. ॥२२॥
अथवापि महाबाहुर्गतो दूरं भविष्यति ।
मामेव रथमारोप्य शीघ्रं रामाय दर्शय ॥ २३ ॥
’अथवा महाबाहु राम तर आतां दूर निघून गेलेले असतील म्हणून मलाच रथावर बसवून घेऊन चला आणि त्वरितच श्रीरामांचे दर्शन करवा. ॥२३॥
वृत्तदंष्ट्रो महेष्वासः क्वासौ लक्ष्मणपूर्वजः ।
यदि जीवामि साध्वेनं पश्येयं सीतया सह ॥ २४ ॥
’कुन्दकळ्यांसारखे पांढरे शुभ्र दात असणारे, लक्ष्मणाचे मोठे बंधु महाधनुर्धर श्रीराम कोठे आहेत ? जर सीतेसह मी त्यांचे उत्तम प्रकारे दर्शन करू शकलो तरच मी जिवंत राहू शकेन. ॥२४॥
लोहिताक्षं महाबाहुमामुक्तमणिकुण्डलम् ।
रामं यदि न पश्येयं गमिष्यामि यमक्षयम् ॥ २५ ॥
ज्यांचे लाल (आरक्त) नेत्र आहेत, मोठमोठ्या भुजा आहेत आणि जे मण्यांची कुण्डले धारण करतात त्या रामांना जर मी पाहिले नाही तर अवश्यच यमलोकाला निघून जाईन. ॥२५॥
अतो नु किं दुःखतरं योऽहमिक्ष्वाकुनन्दनम् ।
इमामवस्थामापन्नो नेह पश्यामि राघवम् ॥ २६ ॥
’मी अशा मरणासन्न अवस्थेला पोहोचूनही इक्ष्वाकु कुलनंदन राघवाचे येथे दर्शन करू शकत नाही यापेक्षा अधिक दुःखाची गोष्ट कुठली असू शकेल ? ॥२६॥
हा राम रामानुज हा हा वैदेहि तपस्विनि ।
न मां जानीत दुःखेन म्रियमाणमनाथवत् ॥ २७ ॥
’हा राम ! हा लक्ष्मण ! हा तपस्विनी वैदेही ! सीते ! तुम्हांला माहीतही नसेल की मी कशा प्रकारे येथे दुःखाने अनाथाप्रमाणे मरतो आहे !’ ॥२७॥
स तेन राजा दुःखेन भृशमर्पितचेतनः ।
अवगाढः सुदुष्पारं शोकसागरमब्रवीत् ॥ २८ ॥
राजा त्या दुःखाने अत्यंत चेतनारहित होत होते म्हणून ते त्या परम दुर्लंघ्य शोक समुद्रात निमग्न होऊन म्हणाले- ॥२८॥
रामशोकमहावेगः सीताविरहपारगः ।
श्वसितोर्मिमहावर्तो बाष्पवेगजलाविलः ॥ २९ ॥

बाहुविक्षेपमीनोऽसौ विक्रन्दितमहास्वनः ।
प्रकीर्णकेशशैवालः कैकेयीवडवामुखः ॥ ३० ॥

ममाश्रुवेगप्रभवः कुब्जावाक्यमहाग्रहः ।
वरवेलो नृशंसाया रामप्रव्राजनायतः ॥ ३१ ॥

यस्मिन् बत निमग्नोऽहं कौसल्ये राघवं विना ।
दुस्तरो जीवता देवि मयायं शोकसागरः ॥ ३२ ॥
’देवी कौसल्ये ! श्रीरामाशिवाय मी ज्या शोक समुद्रात बुडत आहे, त्याला जीवात जीव असे पर्यंत पार करणे माझ्यासाठी अत्यंत कठीण आहे. श्रीरामाचा शोक हा त्या समुद्राचा महान वेग आहे. सीतेचा वियोग हा त्याचा दुसरा किनारा आहे. दीर्घ श्वास त्याच्या लहरी आणि भोवरे आहेत. अश्रुंचा वेगाने उचंबळून येणारा प्रवाह त्याचे मलिन जल आहे. माझे हात आपटणे हेच त्यांत उड्या मारणार्‍या माशांचा विलास आहे. करुण क्रंदन हीच त्याची महान गर्जना आहे. हे विस्कटलेले केस हेच त्यात उपलब्ध होणारे शेवाळ अहे. कैकेयी वडवानल आहे. मंथरेची कुटिलतापूर्ण वचने हे या समुद्रातील मोठमोठे ग्राह आहेत. क्रूर कैकेयीने मागितलेले दोन वर हे याचे दोन तट आहेत आणि रामाचा वनवास हाच या शोकसागराचा महान विस्तार आहे. ॥२९-३२॥
अशोभनं योऽहमिहाद्य राघवं
     दिदृक्षमाणो न लभे सलक्ष्मणम् ।
इतीव राजा विलपन् महायशाः
     पपात तूर्णं शयने स मूर्च्छितः ॥ ३३ ॥
’मी लक्ष्मणासहित राघवाला पाहू इच्छितो, पण यावेळी येथे ते मला दिसत नाहीत. हे माझ्या फार मोठ्या पापाचे फळ आहे. याप्रकारे विलाप करीत तात्काळच महायशस्वी महाराज दशरथ मूर्च्छित होऊन शय्येवर कोसळले. ॥३३॥
इति विलपति पार्थिवे प्रणष्टे
     करुणतरं द्विगुणं च रामहेतोः ।
वचनमनुनिशम्य तस्य देवी
     भयमगमत् पुनरेव राममाता ॥ ३४ ॥
श्रीरामांसाठी या प्रकारे विलाप करीत दशरथ राजे मूर्च्छित झाल्यावर त्यांचे अत्यंत करूणाजनक वचन ऐकून राममाता कौसल्येला पुन्हा दुप्पट भय उत्पन्न झाले. ॥३४॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे एकोनषष्टितमः सर्गः ॥ ५९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकोणसाठावा सर्ग पूरा झाला. ॥५९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP