श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ एकपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
हनुमता पृष्टया तापस्या स्वात्मनस्तस्य दिव्यस्थानस्य च परिचयं दत्त्वा वानराणां भोजनाय निमंत्रणम् - हनुमानांनी विचारल्यावर वृद्ध तापसीने आपला तसेच त्या दिव्य स्थानाचा परिचय देऊन सर्व वानरांना भोजन करण्यासाठी सांगणे -
इत्युक्त्वा हनुमांस्तत्र पुनः कृष्णाजिनांबराम् ।
अब्रवीत्तां महाभागां तापसीं धर्मचारिणीम् ॥ १ ॥
याप्रकारे विचारून हनुमान् चीर आणि कृष्ण मृगचर्म धारण करणार्‍या त्या धर्मपरायण महाभागी तपस्विनीला परत म्हटले- ॥१॥
इदं प्रविष्टाः सहसा बिलं तिमिरसंवृतम् ।
क्षुत्पिपासापरिश्रांताः परिखिन्नाश्च सर्वशः ॥ २ ॥

महद् धरण्या विवरं प्रविष्टाः स्म पिपासिताः ।
इमास्त्वेवंविधान् भावान् विविधान् अद्‌भूतोपमान् ॥ ३ ॥

दृष्ट्‍वा वयं प्रव्यथिताः सन्भ्रांता नष्टचेतसः ।
कस्यैते काञ्चना वृक्षाः तरुणादित्यसंनिभाः ॥ ४ ॥
’देवी ! आम्ही सर्व लोक भूक-तहान आणि थकव्याने कष्टी झालो आहोत. म्हणून एकाएकी या अंधकारपूर्ण गुहेमध्ये घुसलो आहोत. भूतलावरील हे विवर फारच मोठे आहे. आम्ही तहानेने पीडित झाल्यामुळे येथे आलो आहोत परंतु येथील या अशा अद्‌भुत विविध पदार्थांना पाहून भयामुळे आमच्या मनांत फार व्यथा झाली आहे - आम्ही अशा विचाराने चिंतित झालो आहोत की ही असुरांची माया तार नाही ना ? म्हणून आमच्या मनात फार भिती उत्पन्न होत आहे. आमची विवेकशक्ती लुप्तशी होत आहे. आम्ही जाणू इच्छितो की हे बालसूर्याप्रमाणे कांतिमान् सुवर्णमय वृक्ष कोणाचे आहेत ? ’॥२-४॥
शुचीन्यभ्यवहाराणि मूलानि च फलानि च ।
काञ्चनानि विमानानि राजतानि गृहाणि च ॥ ५ ॥

तपनीयगवाक्षाणि मणिजालावृतानि च ।
पुष्पिताः फलवंतश्च पुण्याः सुरभिगंधयः ॥ ६ ॥

इमे जांबूनदमयाः पादपाः कस्य तेजसा ।
’या भोजनाच्या पवित्र वस्तू, फळे-मूले, सोन्याचे विमान, चांदीची घरे, मण्यांच्या जाळ्यांनी झांकलेल्या सोन्याच्या खिडक्या, तसेच पवित्र सुगंधाने युक्त आणि फळा-फुलांनी लगडलेले सुवर्णमय पावन वृक्ष कोणाच्या तेजाने प्रकट झाले आहेत ? ॥५-६ १/२॥
काञ्चनानि च पद्मानि जातानि विमले जले ॥ ७ ॥

कथं मत्स्याश्च सौवर्णा दृश्यंते सह कच्छपैः ।
आत्मानस्त्वनुभावाद् वा कस्य वैतत्तपोबलम् ॥ ८ ॥

अजानतां नः सर्वेषां सर्वमाख्यातुमर्हसि ।
’येथील निर्मल जलात सोन्याची कमळे कशी उत्पन्न झाली ? या सरोवरांतील मत्स्य आणि कासवे सुवर्णमय कशी दिसत आहेत ? हे सर्व तुमच्या स्वतःच्या प्रभावाने झाले आहे की आणखी कुणाच्या ? हा कुणाच्या तपोबलाचा प्रभाव आहे ? आम्ही सर्व अजाण आहोत म्हणून विचारत आहोत. तुम्ही आम्हांला सर्व गोष्टी सांगण्याची कृपा करावी.’ ॥७-८ १/२॥
एवमुक्ता हनुमता तापसी धर्मचारिणी ॥ ९ ॥

प्रत्युवाच हनूमंतं सर्वभूतहिते रता ।
हनुमानांनी या प्रकारे विचारल्यावर समस्त प्राण्यांच्या हितामध्ये तत्पर राहाणार्‍या त्या धर्मपरायण तापसीने उत्तर दिले- ॥९ १/२॥
मयो नाम महातेजा मायावी वानवर्षभः ॥ १० ॥
तेनेदं निर्मितं सर्वं मायया काञ्चनं वनम् ।
’वानरश्रेष्ठ ! माया विशारद महातेजस्वी मयाचे नाव तुम्ही ऐकले असेल. त्यांनी आपल्या मायेच्या प्रभावाने या संपूर्ण स्वर्णमय वनांची निर्मिती केली होती. ॥१० १/२॥
पुरा दानवमुख्यानां विश्वकर्मा बभूव ह ॥ ११ ॥

येनेदं काञ्चनं दिव्यं निर्मितं भवनोत्तमम् ।
’मयासुर पूर्वी दानवश्रेष्ठांचा विश्वकर्मा होता; ज्याने या दिव्य सुवर्णमय उत्तम भवनाला बनविले आहे. ॥११ १/२॥
स तु वर्षसहस्राणि तपस्तप्त्वा महद्‌वने ॥ १२ ॥

पितामहाद् वरं लेभे सर्वमौशनसं धनम् ।
’त्याने एक हजार वर्षेपर्यंत वनात घोर तपस्या करून ब्रह्मदेवांकडून वरदानाच्या रूपात शुक्राचार्याचे सारे शिल्प-वैभव प्राप्त केले होते. ॥१२ १/२॥
विधाय सर्वं बलवान् सर्वकामेश्वरस्तदा ॥ १३ ॥

उवास सुखितः कालं कञ्चिदस्मिन् महावने ।
’संपूर्ण कामनांचे स्वामी बलवान् मयासुरांनी येथील सार्‍या वस्तूंची निर्मिती करून या महान् वनात काही काळापर्यंत सुखपूर्वक निवास केला होता. ॥१३ १/२॥
तमप्सरसि हेमायां सक्तं दानवपुंगवम् ॥ १४ ॥

विक्रम्यैवाशनिं गृह्य जघानेशः पुरंदरः ।
’पुढे काही काळाने त्या दानवराजाचा हेमा नावाच्या अप्सरेशी संपर्क झाला. हे जाणतांच देवेश्वर इंद्रांनी वज्र हातात घेऊन त्याच्याशी युद्ध करून त्याला पळवून लावले. ॥१४ १/२॥
इदं च ब्रह्मणा दत्तं हेमायै वनमुत्तमम् ॥ १५ ॥

शाश्वताः कामभोगश्च गृहं चेदं हिरण्मयम् ।
’तत्पश्चात ब्रह्मदेवांनी हे उत्तम वन आणि येथील अक्षय काम-भोग तसेच हे सोन्याचे भवन हेमाला दिले. ॥१५ १/२॥
दुहिता मेरुसावर्णेः अहं तस्याः स्वयंप्रभा ॥ १६ ॥

इदं रक्षामि भवनं हेमाया वानरोत्तम ।
’मी मेरूसावर्णिची कन्या आहे. माझे नाव स्वयंप्रभा आहे. वानरश्रेष्ठ ! मी त्या हेमाच्या या भवनाचे रक्षण करीत असते. ॥१६ १/२॥
मम प्रियसखी हेमा नृत्तगीतविशारदा ॥ १७ ॥

तया दत्तवरा चास्मि रक्षामि भवनं महत् ।
’नृत्य आणि कलेमध्ये चतुर हेमा माझी प्रिय सखी आहे. तिने माझी या भवनाच्या रक्षणासाठी प्रार्थना केली होती; म्हणून मी या विशाल भवनाचे संरक्षण करते. ॥१७ १/२॥
किं कार्यं कस्य वा हेतोः कांताराणि प्रपद्यथ ॥ १८ ॥

कथं चेदं वनं दुर्गं युष्माभिरुपलक्षितम् ।
’तुम्हां लोकांचे येथे काय काम आहे ? कुठल्या उद्देश्याने तुम्ही या दुर्गम स्थानामध्ये विचरत आहात ? या वनात येणे तर फारच कठीण आहे. तुम्ही हे कसे पाहिलेत ? ॥१८ १/२॥
इमान्यभ्यवहाराणि मूलानि च फलानि च ।
भुक्त्वा पीत्वा च पानीयं सर्वं मे वक्तुमर्हसि ॥ १९ ॥
’ठीक आहे. हे शुद्ध भोजन आणि फळे-मूळे प्रस्तुत आहेत. यांना खाऊन पाणी प्या आणि नंतर मला आपला सारा वृत्तांत सांगा.’ ॥१९॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे एकपञ्चाशः सर्गः ॥ ५१ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा एक्यावणावा सर्ग पूरा झाला. ॥५१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP