॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय चौतिसावा ॥
कुंभाचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीरामसैन्य शरबंधनातून मुक्त झाले :

स्वयें बिभीषण बोलत । हनुमान वीर अति विख्यात ।
शरबंधी श्रीरघुनाथ । सैन्यासमवेत ऊठिला ॥ १ ॥
अंगद सुग्रीव राज्यधर । जुत्पतींसमवेत वानर ।
येणें उठविले समग्र । वीर शूर स्वामिभक्त ॥ २ ॥
मारुतीस मानी श्रीराघव । मारुतीस मानी सत्य सुग्रीव ।
मारुतीस मानिती वीर सर्व । कीर्ति अभिनव येणें केली ॥ ३ ॥
निमिषे आणोनि पर्वत । वानर उठवोनि समस्त ।
ठेवोनि आला जेथींचा तेथ । श्रीरामभक्त हनुमंत ॥ ४ ॥


ततो ऽ ब्रवीन्महातेजा सुग्रीवो वानराधिपः ।
अर्थ्यं विज्ञापयन्नेवं हनूमन्तमिदं वचः ॥१॥
येतो हतः कुंभकर्णः कुमाराश्च निषूदिता ।
नेदानीमुपनिर्हारं रावणः कर्तुमर्हति ॥२॥
लंकामभिपतंत्वाशु प्रगृह्योत्काः प्लवंगमाः ।
ततोस्तंगत आदित्ये रौद्रे तस्मिन्निशामुखे ॥३॥
लंकामभिमुखा जग्मुः सोल्कास्ते हरियूथपाः॥४॥

सुग्रीवाचे हनुमंताला धन्यवाद :

देखोनि हनुमंताची ख्याती । सुग्रीव सुखाचोनि चित्तीं ।
काय बोले वीरांप्रती । धन्य मारुति प्रतापी ॥ ५ ॥
ऐकें बापा पवनपुत्रा । ज्याचा भरंवसा दशशिरा ।
त्या मारिलें रावणकुमरा । परिवारासंगम ॥ ६ ॥
देवांतक नरांतक वीरा । मारिला अतिकाय त्रिशिरा ।
यापरी त्या रावणकुमरां । रणीं समग्रां निर्दळिले ॥ ७ ॥

रावण कपट करील म्हणून लंका जाळून टाकण्याचा सुग्रीवाचा सल्ला :

येणें दुःखें दशकंठ । करील नानाविध कपट ।
तंवचि वानरीं उद्‌भट । लंकात्रिकूट जाळावें ॥ ८ ॥
ऐकतांचि सुग्रीववचन । रातोरातीं वानरगण ।
अग्निचूडी घेवोनि जाण । लंकादहन मांडिलें ॥ ९ ॥
हातीं घेवोनि अग्निचूडी । वानरवीरांचिया कोडी ।
लंकेमाजी घालोनि उडी । आगी धडाडी लाविती ॥ १० ॥


उल्काहस्तैर्हरिगणैः सर्वतः समभिद्रुताः ।
आरक्षस्था विरुपाक्षा राक्षसाः संप्रदुद्रुवुः ॥५॥
गोपुराट्टप्रतोलीषु चर्यासु विविधासु च ।
प्रासादेषु च संहृष्टाः ससृजुस्ते हुताशनम् ॥६॥
तेषां गृहसहस्त्राणि ददाह हुतभुक्तदा ।
तेषां शतसहस्त्राणि रक्षसां पुरवासिनाम् ॥७॥
अदहत्पावकस्तत्र जज्वाल च पुनः पुनः ॥८॥

वानरसैन्याची लंकादहनाची कामगिरी :

उल्काहस्ती वानरवीर । जाळूं आले लंकापुर ।
देखोनि राखले निशाचर । अति सत्वर पळाले ॥ ११ ॥
ठेवोनि राक्षससैन्यासी । नगर रक्षितां विरुपाक्षासीं ।
येतां देखोनि वानरांसी । तोही धाकेंसीं पळाला ॥ १२ ॥
पळतां देखोनि निशाचर । पाठी लागती वानर ।
येतां मारिले घरटीकार । जाळिले अपार जागेकरी ॥ १३ ॥
जेथें जेथें जागेकरांची घरें । तेथे तेथें आग लविती वानरें ।
बाहेर निघावया निर्गम न पुरे । जाळितां वानरें समग्रें ॥ १४ ॥
घरें मंदिरें धवळारें । रम्य वाडिया गोपुरें ।
प्रसाद पौळी शिखरें । जाळित वानरें अति क्षोभें ॥ १५ ॥
शरबंधी बांधले राघवेंद्र । अति नष्ट हे निशाचर ।
इंद्रजित जाळूं दशशिर । लंकापुरा पुरदाहो ॥ १६ ॥
ऐसें बोलोनि वानर । जाळूं आदरिलें नगर ।
सहस्रसंख्या लक्षांतर । असंख्या कारगृहदाहो ॥ १७ ॥
माणिकनिबद्ध अवनी । रत्‍नजडित स्तंभश्रेणी ।
मुक्ताफळें मंडपाभरणीं । उत्तमां भवनी महादाहो ॥ १८ ॥
लहानसहान घरें । आगी न लाविती वानरें ।
सुंदर भवनें सुप्रकारें । तीचि आदरें जाळिती ॥ १९ ॥
सुंद्र मनोहर गृहांसीं । शोधून जाळिती साक्षेपेंसी ।
वानर पडले द्वंद्वासीं । आगी चौपासी लाविली ॥ २० ॥
हनुमंतें जाळिलेनगर । तेव्हा दिवसा होता दिनकर ।
हा रात्रिंदाहो निर्धार । स्त्रिया कुमर कळकळती ॥ २१ ॥
आगी लाविली चौफेरीं । पळती राक्षसांच्या हारी ।
आकांत होत नरनारीं । आपांपरी नगरस्थां ॥ २२ ॥
दंपत्यें निजसेजेसीं । निद्रिस्थ असतां दोहींसी ।
जळोनियां जैसीं तैसीं । गृहदाहेंसीं भस्मात ॥ २३ ॥
नाना सामग्री उपकरण । शस्त्रास्त्र अंगत्राण ।
धनुष्यबाणेंसीं वोढण । वस्त्राभरण जाळित ॥ २४ ॥
पुरुष उठवितां स्त्रियेसीं । ते म्हणे सुखें भोगा कामासीं ।
आगी लागली गृहासी । नीघ वेगेंसीं निस्संगे ॥ २५ ॥
जेथींच्या तेथें घरोघरीं । राक्षस जळती निद्राभरीं ।
बहुतां रिघु न पुरे बाहेरी । अग्नीमाझारी कोंडलीं ॥ २६ ॥
हाका देती शंखस्फुरणें । आक्रंदती अति सत्राणें ।
दुर्धर अग्नीचें जाळणें । कोणांसी कोणें राखावें ॥ २७ ॥
आगी कोंडोनी चौफर । महायोद्धे दहा सहस्र ।
जळोनि मेले निशाचर । घोरांदर आकांत ॥ २८ ॥
अग्नि खवळला अनिष्ट । चहूंकडे धडधडाट ।
लंकेमाजी न चले वाट । कलकलाट राक्षसां ॥ २९ ॥
शरबंधी करोनि कपट । श्रीराम बांधिला वरिष्ठ ।
त्याचें फळ हें अनिष्ट । होत तळपट राक्षसां ॥ ३० ॥


शयनेषु महार्हेषु प्रसुप्तानां प्रियैः सह
लंकादहनामुळे जनतेची दुर्दशा : ।
त्रस्तानां गच्छतां चैव पुत्रानादाय सत्वरम् ॥९॥
धूमजालपरीतांगा बहवो परमार्दिताः ।
राक्षसा विनदंति स्म वन्हिज्वालाभयाकुलाः ॥१०॥


घरोगरीचीं समस्त । महामंचकी सुनिश्चित ।
स्त्रीपुरुषें निद्रान्वित । अग्नि तेथ पोळित पावे ॥ ३१ ॥
स्त्रिया पुत्र घेवोनि पळती । पुरुष गजबजिले आक्रंदती ।
घरोघरीं हाका देती । धूमाकुलित आरडत ॥ ३२ ॥
धूमाकुलित न दिसे वाट । अग्नि पोशित चटचट ।
राक्षसांसी भवंत आट । अति कष्ट स्त्रीबाळां ॥ ३३ ॥
राक्षस पडले ज्वलनावर्ती । ज्वालाकुलित झाली क्षिती ।
सहसा निर्गम न पावती । हाका देती आक्रोशें ॥ ३४ ॥
जे जे राक्षस बाहेर येती । ते ते उचलोनि जुत्पती ।
अग्नीमाजी निक्षेपिती । द्वंद्वावृत्तीं वानर ॥ ३५ ॥
शरबंधी धरिला रामचंद्र । तेणें रागें पैं वानर ।
जाळूं आदरिले निशाचर । लहान थोर कवळोनी ॥ ३६ ॥
श्रीराम परब्रह्म स्पष्ट । त्यासीं राक्षसीं केलें कपट ।
त्यांचें करावें तळपत । द्वंद्वा कर्कंट पेटले ॥ ३७ ॥
जे राक्षस वाहेर येत । त्यांस कपि घालिती अग्नीत ।
राहूं जातां लंकेआत । ज्वलनावर्त जाळित ॥ ३८ ॥
ऐसा राक्षसां आकांत । आरंभिला लंकेआंत ।
हाकबोंबेचा आवर्त । प्रळयांत नगरस्थां ॥ ३९ ॥


उष्ट्रैर्मुक्तैर्गजैर्मुक्तैर्मुक्तैश्च तुरगैरपि ।
बभूव लोको लंकायां भ्रांतग्राह इवार्णवः ॥११॥
अपरे हेमकाक्षाश्च संनद्धा वरवारणाः ।
त्रस्ता बंधात्समाक्षिप्य येन केन प्रदुदुवुः ॥१२॥
पानीयं पातुमिच्छंतः परिभ्रमणतर्षिताः ।
प्रतिबिंबं जले दृष्ट्वा तमग्निमिति मेनिरे ॥१३॥


देखोनियां दहनावर्त । हस्ती घोडे कर्‍अहे मुक्त ।
अग्निभयें अति भ्रांत । परिभ्रमत अव्हासव्हा ॥ ४० ॥
अवघीं जळतृषातृषित । उदकप्राशर्थ येत ।
अग्निप्रतिबिंब जळांत । देखोनि पळत माघारीं ॥ ४१ ॥
जळ नव्हे तो मानूनि अग्नी । पळती उदक न घेऊनी ।
ऐसी परी लंकाभुवनीं । अग्निदहनीं आकांत ॥ ४२ ॥
धनुष्य सज्जोनि लक्ष्मण । विधोनियां अग्निबाण ।
करितां राक्षसां कंदन । लंकाभुवन कळकळित ॥ ४३ ॥
भेदितां सौ‍मित्राच्या शरीं । आक्रंदती नरनारी ।
बोंब सुटली निशाचरीं । आपांपरी राक्षसां ॥ ४४ ॥

लंकानगरीतील दुर्दशा पाहून श्रीराम लंकादहन थांबवितात :

ऐसें देखोनियां कंदन । कृपेनें द्रवला रघुनंदन ।
निवोरोनि लक्ष्मण । बोले आपण सुग्रीवासी ॥ ४५ ॥
विंधोनियां अग्निबाण । निद्रितांचें करितां दहन ।
आम्हांसी पुरुषार्थ कोण । निद्य लक्ष्मण क्षात्रधर्मा ॥ ४६ ॥
दहनीं घालोनि लंकाभुवन । जाळितां निद्रितादि जन ।
तरी काय मारिला दशानन । निंद्य लक्षण क्षात्रधर्मा ॥ ४७ ॥
रात्रीमाजी द्वंद्व जें करणें । चोरोनियां अग्नि लावणें ।
हीं तंव अधर्माचीं चिन्हें । लाजिरवाणें क्षात्रधर्मा ॥ ४८ ॥
बाहेर आल्या रणांगणीं । मारीन विरांचिया श्रेणी ।
धडमुंडाकित धरणी । अर्धक्षणीं मी करीन ॥ ४९ ॥
मज असतां श्रीरामचंद्रा । कासया राक्षसांचा दरारा ।
विंधोनियां बाणधारा । दशशिरा निवटीन ॥ ५० ॥
निवारोनियां लक्ष्मण । वर्जोनियां वानरगण ।
न जाळावे निद्रित जन । लंकाभुवन न जाळांवे ॥ ५१ ॥
निद्रित जाळितांचि देख । अंगीं लागे महापातक ।
तें वर्जोनि रघुकुळटिळक । युद्ध संमुख करुं इच्छी ॥ ५२ ॥
संमुखा संमुखी अति निर्वाण । करावया रावणासीं रण ।
सैन्य सज्जावें संपूर्ण । रघुनंदन आज्ञापी ॥ ५३ ॥
ऐकोनि श्रीरामवचन । सुग्रीव घाली लोटांगण ।
हरिखें गर्जोनि आपण वानरगण निमित ॥ ५४ ॥


आदिष्टा वानरेंद्रास्ते सुग्रीवेण महात्मना ।
आसन्नं द्वारमाविश्य प्लवंगा युद्धकांक्षिणः ॥१४॥
यश्च वो वितथं कुर्यात्तत्र शत्रावुपस्थिते ।
स हन्तव्योऽभिसंहत्य बलवान्यः पलायते ॥१५॥

अंगदाची घोषणा :

रावणासीं करावया रण । श्रीरामें नेमिलें आपण ।
सुग्रीवाआज्ञा अति दारुण । वानरगणनियमार्थी ॥ ५५ ॥
आजिंचे करितां रणांगण । वेंचावा श्रीरामाकाजीं प्राण ।
मागें पळता तो जाण । अंगदें आपण मारावा ॥ ५६ ॥
मातुळ मावसा मेहुणा नातू । चुलता पुतण्या बंधु सुतु ।
स्त्रियेचा बंधु अत्यंत आप्तु । करावया घात रणीम् सरतां ॥ ५७ ॥
श्रीरामकाजीं वंचकपण । त्यासी मारावें आपण ।
त्याचा घेतल्याही प्राण । दोष दारुण बाधेना ॥ ५८ ॥
अंगद बोलिला हांसोन । पळल्या देवोनि अभयदान ।
मी मारीन दशानन । रणविंदान पहा माझें ॥ ५९ ॥
ऐकोनि अंगदाची मात । संतोषला श्रीरघुनाथ ।
टाळी पितली वानरांत । रणीं लंकानाथ वधावया ॥ ६० ॥
दिवस उगवतांचि जाण । देखोनि लंकादहन ।
कोपा चढला दशानन । खात दशन अति रागें ॥ ६१॥
कुंभकर्णाचे कुमर । कुंभानिकुंब महाशुर ।
युद्धा धाडिले सत्वर । नरवानर मारावया ॥ ६२ ॥
कुंभ निकुंभ दोघे जण । वाढिवे गर्जत आपण ।
वानर बापुडे ते कोण । रामलक्ष्मण निर्दुळूं ॥ ६३ ॥


लंकेयं निर्ययुर्द्धारान्नदंतो भीमाविक्रमाः ।
कुंभकर्णात्मजौ वीरौ परिगृह्य समंततः ॥१६॥
बहुसैन्यैः परिवृतौ शीघ्रं रावणनोदितौ ।
भीमं च रथमातंगहयवाहनसंकुलम् ॥१७॥
तद्‍दृष्टवा बलमायातं राक्षसानां महत्तदा ।
संचचाल कपीनां तु बलमुच्चैर्ननाद च ॥१८॥

कुंभ व निकुंभ ससैन्य लंकेमधून बाहेर पडले :

कुंभ निकुंभ दोघां वीरीं । सैन्य सज्जोनि समग्रीं ।
निघालें लंकेबाहेरी । वीर गजरीं गर्जती ॥ ६४ ॥
रथाश्वेंसीं मत्त मातंग । सन्नद्ध बद्ध चतुरंग ।
कुंभकर्ण पुत्र चांग । वीर निर्व्यंग युद्धार्थीं ॥ ६५ ॥
रावणाचे आज्ञेवरी । नाना वाद्यांचे गजरीं ।
दोघे निघतांचि बाहेरी । येतां वानरीं देखिले ॥ ६६ ॥
देखोनि राक्षसांचें दळ । रणीं खवळले गोळांगुळ ।
युद्धा मिसळले तत्काळ । रणकल्लोळ माजविला ॥ ६७ ॥
रामनामाचा गजर । वानरीं केला भुभःकार ।
सिंहनादें निशाचर । घोरांदर गर्जती ॥ ६८ ॥
कात्या तोमर त्रिशूळ भालें । राक्षस युद्धा मिसळले ।
वृक्षपर्वत शालतालें । वानर बळें भिडताती ॥ ६९ ॥
वानर आणि निशाचर । युद्धा पेटले दुर्धर ।
नोकोनियां येरां येर । घाय निष्ठुर हाणिताती ॥ ७० ॥
राक्षस आणि वानरगण । ज्याची जैसी आंगवण ।
युद्ध करिती भिन्न भिन्न । रणप्रवीण रणयोद्धे ॥ ७१ ॥
युद्ध करितां निशाचर । पाठीराखे येरां येर ।
तैसेचि योद्धे कपिकुंजर । येरां येर रक्षिती ॥ ७२ ॥


प्रवरानभितो जघ्नू रक्षसामंतरे स्थितान् ।
घ्नंतमन्यं जघानान्यः पतितोन्यमपातयत् ॥१९॥
गर्हमाणं जगर्हान्यो दशंतमपरोऽदशत् ।
देहीत्यन्यो ददात्यन्यो ददामीत्यपरः पुनः ॥२०॥
राक्षसां दशसप्तेति वानरा जघ्नराहवे ।
वानरानपि सप्ताष्टौ दश राक्षसपुंगवाः ॥२१॥

राक्षस व वानरसैन्यांचे युद्ध :

मथून राक्षसव्यूहसंबंध । वाढिवा लाठिवा वीर प्रबद्ध ।
त्यांसीं वानरीं द्वंद्वयुद्ध । अति सुबद्ध आदरिलें ॥ ७३ ॥
महावीर रणप्रवीण । अंगी प्रबळाची आंगवण ।
येरयेरांतें पाचारुन । नामें घेऊन भिडती ॥ ७४ ॥
आम्ही श्रीरामाचे दूत । रामनामें घाया हाणित ।
तैसेच राक्षस विख्यात । रणीं भिडत रणमारें ॥ ७५ ॥
एक एकातें घाय हाणित । तोही घाया घाय देत ।
एक एकातें तळीं पाडित । तोही पडत उलथोनी ॥ ७६ ॥
वानर अशक्त पालेखाइर । तुम्हांसीं युद्धीं कैंचा धीर ।
तुम्ही महापापी निशाचर । चोरटी धूर परद्वारी ॥ ७७ ॥
चोरीमारी परद्वारी । इतुकीं पापें दशशिरीं ।
त्याचे तुम्ही सहाकारी । पापाचारी अशक्त ॥ ७८ ॥
पापें मारिलें तुम्हांसी । मारणें न लगे आम्हांसीं ।
ऐसें निंदून राक्षसांसी । कपि आवेशीं भिडती ॥ ७९ ॥
श्रीराम स्वयें सोज्वळ । नित्य निष्पाप निर्मळ ।
तुमची धूर कष्मळ । पापी केवळ परदारी ॥ ८० ॥
त्या पाप्याचे होवोनि दूत । संग्रामासीं आलेति येथ ।
जयो न पावां निश्चित । रणीं समस्त मराल ॥ ८१ ॥
राक्षसां डसती वानर । वानरां डस्ती निशाचर ।
पुच्छें ठोकोनि सत्वर । फोडिती वक्त्र राक्षसांचें ॥ ८२ ॥
घायें करोनि दंत भग्न । भूमीं पाडोनि दशन ।
राक्षसांसी करोनि कंदन । कपिगण गर्जती ॥ ८३ ॥
एक म्हणे राहें साहें । दुजा म्हणे पुढें पाहें ।
माथां हाणिती दुर्धर घाये । रुधिर वाहे भडभडां ॥ ८४ ॥
दे दे म्हणती निशाचर । घाय देती वानर ।
अशुद्धाचा वाहे पूर । घोरांदर रणमार ॥ ८५ ॥
राहें साहें धरीं धीर । घाय साहे तो महाशूर ।
नोकोनियां येर येर । करिती मार रणमारें ॥ ८६ ॥
एवं राक्षस गोळांगूळ । युद्धी भिडती अति तुंबळ ।
रणीं खवळला रणवेताळ । हलकलोळ रणांगणीं ॥ ८७ ॥
वानरवीर रणाआंत । राक्षस दहा पांच सात ।
एक वेळे करिती घात । रणोन्मत्त महामारें ॥ ८८ ॥
याचि परी राक्षसवीर । सप्ताष्टदश वानर ।
घायें मारिती निशाचर । रणीं दुर्धर गर्जोनी ॥ ८९ ॥
ऐशापरी रणांगणीं । वीरां वानरां झोंटधरणी ।
होतां देखूनियां नयनीं । आला गर्जोनि अंगद ॥ ९० ॥


प्रवृत्ते संकुलेऽत्यर्थ तस्मिन्वीरवरक्षये ।
अंगदोऽकंपनं वीरमाससाद रणोत्कटः ॥२२॥
आहूय सोंऽगदं कोपात्ताडयामास वेगतः ।
गदयाकंपनः श्रीरामान्स पपाताचलोपमः॥२३॥

अंगदाच्या शिळाप्रहाराने अकंपनाचा वध :

कुंभनिकुंभाचा प्रधान । मुख्य सेनानी अकंपन ।
त्यासी उत्कट करावया रण । अंगद आपण पाचारी ॥ ९१ ॥
अंगद येतांचि गर्जत । अंकपनें गदाघात ।
हाणोनि पाडिला मूर्च्छित । जेंवी पर्वत वज्रघातें ॥ ९२ ॥
मूर्च्छा सांवरोनि सत्वर । उठोनियां अंगद वीर ।
रागें हाणोनि शिळाशिखर । केला शतचूर अकंपन ॥ ९३ ॥
न मांगता प्यावया पाणी । अकंपन पाडिला रणीं ।
राक्षससैन्या जाली भंगाणी । गेले पळोनी कुंभाप्रती ॥ ९४ ॥
राक्षसांचे सैन्यसंभार । धाकें पळोनि सत्वर ।
कुंभ निकुंभ महावीर । आले समग्र त्यांपासीं ॥ ९५ ॥
अकंपनाचा केला घात । हांक वाजली सैन्याआंत ।
तेणें कुंभ क्रोधान्वित । शरचापयुक्त चालिला ॥ ९६ ॥


आपतंतीं च वेगेन कुंभस्तां सांत्वयन् चमूम् ।
तेन हाटकवर्णेन पत्रिणा चित्रवाससा ॥२४॥
आकर्णकृष्टमुक्तेन विव्याध द्विविदं बली ।
स तयाभिहतस्तेन विप्रमुक्तपदः स्फुटम् ॥२५॥
निपपाताद्रिकूटाभा विव्हलो गाढवेदनः ।
कुंभमम्यपतत्क्षिपं ग्रगृय महतीं शिलात् ॥२६॥
तां शिलां सलताजालां तस्मै चिक्षेप रक्षसे॥२७॥

कुंभराक्षसाचा क्रोधाने अंगदावर हल्ला :

मारिलिया अकंपन । पळत आलें राक्षससैन्य ।
त्यासी कुंभे आश्वासून । निघे आपण संग्रामा ॥ ९७ ॥
कुंभ योद्धा महाशूर । श्रेष्ठ श्रेष्ठ वानरवीर ।
शोधोनियां विंधी वीर । लहानथोर मारीना ॥ ९८ ॥
वानरसैन्यीं नाना व्यक्ती । त्यांते कुंभ न धरी हातीं ।
श्रेष्ठ श्रेष्ठ जे जुत्पती । बाण त्यांप्रती विंधित ॥ ९९ ॥

द्विविद व मैंद कुंभाकडून मूर्च्छित पडले :

धनुष्यबाण स्वयें सज्जूनी । आकर्णांत वोढी काढूनी ।
द्विविद विंधोनियां बाणीं । पाडिला रणीं मूर्च्छित ॥ १०० ॥
बाणीं विंधितां सुदृढ । द्विविद पाडिला गाढ मूढ ।
वीरशूरयुद्धकैवाड । रणसुरवाड संग्रामीं ॥ १ ॥
मूर्च्छित पडतांचि द्विविद । बंधु क्षोभला महामैंद ।
कुंभासीं करावया युद्ध । सन्नद्ध बद्ध चालिला ॥ २ ॥
वृक्षवल्ली द्रुम सकळा । सपर्वत उपडोनि शिळा ।
घालिता कुंभाच्या कपाळां । तेणें तत्काळ छेदिली ॥ ३ ॥
विंधोनियां पांच बाण । शिळा छेदून केली शतचूर्ण ।
मैंदासी शर दारुण । विंधी आपण साटोपें ॥ ४ ॥

वक्षस्यापि च तेनासौ मैदं विव्याध राक्षसः ।
रुधिरानुगतो भूमौ निपपात हि मूर्च्छितः ॥२८॥
ततोंऽगदस्तौ पतितौ मातुलावभिजग्मिवान् ।
अभिदुद्राव वेगेन कुंभमुद्यतकार्मुकम् ॥२९॥
तमापतंतं विव्याध कुंभः पंचभिरायसैः ।
त्रिभिश्चान्यैस्त्रिभिर्बाणैर्मातंगमिव तोमरैः ॥३०॥

अंगद – कुंभ युद्ध :

मैंदे सोडिला शिळा पर्वत । कुंभें छेदोनि समस्त ।
सुवर्णपत्री बाण युक्त । हृदयाआंत विंधिला ॥ ५ ॥
हृदयीं भेदतां तो शर । वमून रुधिरांचे पूर ।
मूर्च्छित मैंद वानर । रणीं सत्वर पाडिला ॥ ६ ॥
मैंद द्विविद वीर प्रबळ । दोन्ही अंगदाचे मातुळ ।
रणीं पडतां अति विव्हळ । अंगद तत्काळ क्षोभला ॥ ७ ॥
करावया कुंभाचा घात । अंगदें उपडोनि पर्वत ।
धांविन्नला त्वरान्वित । रणीं गर्जत साटोपें ॥ ८ ॥
कुंभें विंधोनि पांच बाण । येतां पर्वत केला चूर्ण ।
अंगदासी तीन बाण । अति सत्राण विंधिले ॥ ९ ॥
अंगद वीर अति विख्यात । जरी बाणीं जाला जर्जरित ।
तरी कुंभाचा करावया घात । सवृक्षहस्त स्वयें आला ॥ ११० ॥
पर्वतामागें पर्वत । वृक्षामागें वृक्ष वर्षत ।
कुंभ करितां अस्ताव्यस्त । तोही सावचित्त रणमारीं ॥ ११ ॥
कुंभवीर रणाभिनिवेशीं । तोडोनि वृक्षपर्वतांसी ।
अगद विंधिला भ्रूपदेशीं । रुधिर त्यासी सुटलें ॥ १२ ॥
गज आवरिजे अंकुशेंसीं । तेंवी अंगद बाणेंसीं ।
नावरेचि युद्धाभिनिवेशीं । शालहस्तेंसीं लोटिला ॥ १३ ॥


अंगदः पाणिना नेत्रे विमृज्य रुधिरोक्षितः ।
शालमासन्नमेकांते परिजग्राह पाणिना ॥३१॥
तमिंद्रकेतुप्रतिमं शालं शालभुजो बली ।
उत्ससर्जांगदो वेगात्तं दूरादन्ववैक्षत ॥३२॥

अंगदाला मूर्च्छा :

अंगदकपाळीं विंधिला शर । प्रवाहें अशुद्धाचा पूर ।
नेत्रींचें पुसोनियां रुधिर । अंगद सत्वर धांविन्नला ॥ १४ ॥
जैसा इंद्राचा इंद्रकेत । तैसा शोभे शालहस्त ।
लाता हाणोनि सारथि रथ । केला निःपात रणभूमीं ॥ १५ ॥
आम्ही म्हणों हे वानर । हीन दीन पालेखाइर ।
तंव हे निधडे महाशूर । पूर्ण जुंझार रणरंगी ॥ १६ ॥
शाल हाणितां सत्वर । कुंभ निधडा धनुर्धर ।
सतेज विंधोनियां शर । शाल समग्र छेदिला ॥ १७ ॥
हेमपुंखी सरले शर । धगधगीत तेजाकार ।
अंगद विंधिला वानर । वज्रधार दृढ बाणीं ॥ १८ ॥
सबळ अंगदाचें उड्डाण । हृदयीं भेदतां वज्रबाण ।
क्षितीं पडला मूर्च्छापन्न । आपणा आपण विसरला ॥ १९ ॥
युवराजा पडतां क्षितीं । कोपें खवळले जुत्पती ।
युद्ध करावया कुंभाप्रती । कोट्यनुवृत्ती चालिले ॥ १२० ॥


अंगदं व्यथितं दृष्ट्वा सीदंतमिव कुंजरम् ।
दुराधर्षं राजपुत्रं धूम्रो हभ्यवपद्यत ॥३२॥
अथ धूम्रः शिलाहस्तः कोपसंरक्तलोचनः ।
रिरक्षिषंतोऽभ्यपतन्नंगदं वानरर्षभाः ॥३४॥

धूम्र व जांबवंताकडून अंगदाचे रक्षण :

अंगद युवराजा विख्यात । रणीं पडतांचि मूर्च्छित ।
कुंभ होवोनि हर्षयुक्त । त्यासी नगरांत नेऊं पाहे ॥ २१ ॥
भंगिला रथ सारथी । अंगद न्यावा कैशा रीतीं ।
कुंभ विचारी जंव चित्तीं । तंव धूम्राची अवचितीं उडी आली ॥ २२ ॥
धूम्र वीर तयेकाळीं । आरक्त नयन क्रोधानळीं ।
पर्वत झेलीत करतळीं । कुंभाजवळी पातला ॥ २३ ॥
बाणापिसारियाचा वारा । धूम्र उडविला अंबरा ।
तेणें हाहाकार वानरां । निशाचरां आल्हाद ॥ २४ ॥
धूम्र ज्येष्ठ बंधु जांबवंतां । त्यासी रणीं कुंभे गांजितां ।
नाही अंगदासी रक्षिता । तेणें जांबवंता कोप आला ॥ २५ ॥
जांबवंत निघे आपण । सवें निघाला सुषेण ।
वेगदर्शीं वानर जाण । करावया रण चालिला ॥ २६ ॥
येतां देखोनि वानरांसी । कुंभ वीर रणभिनिवेशीं ।
बाणीं खुंटलें कपिमार्गासी । अंगदापासीं येवो नेदी ॥ २७ ॥
वर्षोनियां शरौघ । कपिप्रताप केला मोघ ।
बाणीं खिळिलें सर्वांग । रणोद्योग चालेना ॥ २८ ॥
जेंवी कां वायु आकाशासी । तोडोनि ने मेघजालासी ।
तेंवी कुंभे वानरांसी । बाणभिनिवेशी वारिलें ॥ २९ ॥
अंगद धरिला राजकुमर । रणीं उठला हाहाकार ।
तें देखोनि सुग्रीव वीर । कोपें दुर्धर चालिला ॥ १३० ॥
सांडोनि कुंभबाणमार्गासी । अलक्ष उडोनि आकाशीं ।
सुग्रीव आदळला अंगेंसीं । अंगद पाठीसीं घालोनी ॥ ३१ ॥


कुंभस्य धनुराच्छिद्य बभंजेंद्रायुधोपमम् ।
अवप्लत्य ततः शीघ्रं कृत्वा कर्म च दुष्करम् ॥३५॥
अब्रवीत्कुपितः कुंभं भग्नशृंगमिवर्षभम् ।
कृतं कर्म परिश्रांतो विश्रांतः पश्य मे बलम् ॥३६॥
तेन सुग्रीववाक्येन सावमानेन मानितः ।
ततः कुंभः समुत्पत्य सुग्रीवमभिपत्य च ॥३७॥

सुग्रीव – कुंभ मुष्टियुद्ध :

सुग्रीवें घालोनि उडी । कुंभाचें धनुष्य आसुंडी ।
रागें मोडोनि कडाडीं । आदळला प्रौढी अंगसीं ॥ ३२ ॥
जैसें इंद्रचाप आकाशीं । तैसे धनुष्य कुंभापाशीं ।
सुग्रीवें मोडून आवेशीं । काय त्यासी बोलत ॥ ३३ ॥
तुवां घेऊन धनुष्यबाण । रणीं त्रासिले वानरगण ।
तें म्यां चाप भंगिल्या जाण । आतां आंगवण तुज कैंची ॥ ३४ ॥
भग्नशृंग वृषभासी । जेंवी न करवे संग्रामासी ।
तेंवी भंगिल्या चापासी । प्रौढी युद्धासी तुज कैंची ॥ ३५ ॥
आजवरी म्यां रणीं । वीर मारिला नाहीं कोणी ।
प्रथम करीन तुझी बोहणी । पुढें वीरश्रेणी मारावया ॥ ३६ ॥
ऐसे सुग्रीवाचे उत्तरी । कुंभासीं कोप आला भारी ।
कोपें मुष्टि उरावरी । वज्रप्रहारीं हाणितली ॥ ३७ ॥
फोडोनि देहींच्या चर्मासीं । मुष्टि पावली अस्थीपासीं ।
भेदून अंगीच्या वर्मासी । अति आवेशीं हाणिता ॥ ३८ ॥
येवढी कुंबाची मुष्टी । सुग्रीवें नेली तृणासाठीं ।
अशुद्धे डवरला जगजेठी । रणसंतुष्टी डुल्लत ॥ ३९ ॥
जैसा गेरुका मिरवे मेरु । कां वडवाग्नी सागरु ।
अशुद्धे डवरला वानरु । राणीं परम शोभत ॥ १४० ॥


स तथाभिहतस्तेन सुग्रीवो वानरेश्वरः ।
मुष्टिं संवर्तयामास वज्रवेगां महाबलः ॥३८॥
मुष्टिं संपातयामास कुंभस्योपरि वानरः ।
मुष्टिनाभिहतस्तेन निपपात स राक्षसः ॥३९॥

कुंभराक्षसाचा वध :

कुंभ महाबळी वीर । मुष्टी हाणितां निष्ठुर ।
डंडळेना सुग्रीव वीर । वानरेश्वर प्रतापी ॥ ४१ ॥
सुग्रीवें वळोनि वज्रमुष्टी । कुंभास हाणितां उठाउठीं ।
फोडोनि मस्तकाची कवटी । पाडिला सृष्टीं निष्प्राण ॥ ४२ ॥
कुंभ पडिला महावीर । विजयी झाला वानरेश्वर ।
वानर करिती जयजयकार । नामें अंबर गर्जत ॥ ४३ ॥
स्वयें उठोनि श्रीरघुनाथ । आलिंगिला वानरनाथ ।
सुग्रीव होवोनि लज्जान्वित । काय बोलत तें ऐका ॥ ४४ ॥
कुंभ कायसें बापुडें । रणीं मारिलें म्यां किडें ।
तें यश मिरवूं तुजपुढें । हें तंव कुडें मजलागीं ॥ ४५ ॥
रावणाच्या दहाही शिरांसी । मुरडोनि आणीन पायांपासीं ।
तेचि मी करीन सेवेसी । पुरुषार्थेंसीं सुग्रीव ॥ ४६ ॥
ऐसें सुग्रीवाचें वचन । उल्लासें मानी रघुनंदन ।
एका जनार्दना शरण । कुंभनिर्दळण रणीं झालें ॥ ४७ ॥
कुंभाचा रणीं केला घात । क्षोभला निकुंभ विख्यात ।
त्यासी मारील हनुमंत । कथावृत्तांत अवधारा ॥ १४८ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
कुंभवधो नाम चतुस्त्रिंशत्तमोऽध्यायः ॥ ३४ ॥
ओंव्या ॥ १४८ ॥ श्लोक ॥ ३९ ॥ एवं ॥ १८७ ॥


GO TOP