श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ सप्तदशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
रावणेन तिरस्कृताया ब्रह्मर्षिकन्याया वेदवत्याः तस्मै शापं दत्त्वाग्नौ प्रवेशो, जन्मान्तरे सीतारूपेण तस्याः प्रादुर्भावश्च -
रावणाकडून तिरस्कृत ब्रह्मर्षि कन्या वेदवतीने त्याला शाप देऊन अग्नित प्रवेश करणे आणि दुसर्‍या जन्मामध्ये सीतेच्या रूपात प्रादुर्भूत होणे -
अथ राजन्महाबाहुः विचरन् पृथिवीतले ।
हिमवद्वनमासाद्य परिचक्राम रावणः ॥ १ ॥
(अगस्त्य म्हणतात -) राजन्‌ ! तत्पश्चात्‌ महाबाहु रावण भूतलावर विचरत हिमालयाच्या वनात येऊन तेथे सर्वत्र भ्रमण करू लागला. ॥१॥
तत्रापश्यत् स वै कन्यां कृष्णाजिनजटाधराम् ।
आर्षेण विधिना युक्तां दीप्यन्तीं देवतामिव ॥ २ ॥
तेथे त्याने एका तपस्विनी कन्येला पाहिले, जी आपल्या अंगावर काळ्या रंगाचे मृगचर्म आणि मस्तकावर जटा धारण केलेली होती. ती ऋषिप्रोक्त विधिने तपस्येमध्ये संलग्न होऊन देवांगनांप्रमाणे उद्दीप्त होत होती. ॥२॥
स दृष्ट्‍वा रूपसम्पन्नां कन्यां तां सुमहाव्रताम् ।
काममोहपरीतात्मा पप्रच्छ प्रहसन् इव ॥ ३ ॥
उत्तम तसेच महान्‌ व्रताचे पालन करणारी तसेच रूप-सौंदर्याने सुशोभित त्या कन्येला पाहून रावणाचे चित्त कामजनित मोहाच्या वशीभूत झाले. त्याने अट्‍टहास करीत विचारले - ॥३॥
किमिदं वर्तसे भद्रे विरुद्धं यौवनस्य ते ।
नहि युक्ता तवैतस्य रूपस्यैवं प्रतिक्रिया ॥ ४ ॥
भद्रे ! तू आपल्या युवावस्थेच्या विपरीत हे कसे आचरण करीत आहेस ? तुझ्या या दिव्य रूपाला असे आचरण कदापि उचित नाही. ॥४॥
रूपं तेऽनुपमं भीरु कामोन्मादकरं नृणाम् ।
न युक्तं तपसि स्थातुं निर्गतो ह्येष निर्णयः ॥ ५ ॥
भीरू ! तुझे हे रूप अनुपम आहे. हे पुरुषांच्या हृदयात कामजनित उन्माद उत्पन्न करणारे आहे. म्हणून तुझे तपात संलग्न होणे उचित नाही. तुझ्यासाठी आमच्या हृदयात हाच निर्णय प्रकट झाला आहे. ॥५॥
कस्यासि किमिदं भद्रे कश्च भर्ता वरानने ।
येन सम्भुज्यसे भीरु स नरः पुण्यभाग् भुवि ॥ ६ ॥

पृच्छतः शंस मे सर्वं कस्य हेतोः परिश्रमः ।
भद्रे ! तू कुणाची कन्या आहेस ? हे कोणते व्रत तू करीत आहेस ? सुमुखी ! तुझा पति कोण आहे ? भीरू ! ज्याच्याशी तुझा संबंध आहे तो मनुष्य या भूलोकात महान्‌ पुण्यात्मा आहे. मी जे काही विचारत आहे ते सर्व मला सांग. कुठल्या फळासाठी हे परिश्रम केले जात आहेत ? ॥६ १/२॥
एवमुक्ता तु सा कन्या रावणेन यशस्विनी ॥ ७ ॥

अब्रवीद् विद्विधिवत् कृत्वा तस्यातिथ्यं तपोधना ।
रावणाने याप्रकारे विचारल्यावर ती यशस्विनी तपोधना कन्या त्याचा विधिवत्‌ - अतिथि सत्कार करून बोलली - ॥७ १/२॥
कुशध्वजो नाम पिता ब्रह्मर्षिरमितप्रभः ॥ ८ ॥

बृहस्पतिसुतः श्रीमान् बुद्ध्या तुल्यो बृहस्पतेः ।
अमित तेजस्वी ब्रह्मर्षि श्रीमान्‌ कुशध्वज माझे वडील होते, जे बृहस्पतिंचे पुत्र होते आणि बुद्धिमध्ये त्यांच्या समान मानले जात होते. ॥८ १/२॥
तस्याहं कुर्वतो नित्यं वेदाभ्यासं महात्मनः ॥ ९ ॥

सम्भूय वाङ्‌म्यी कन्या नाम्ना वेदवती स्मृता ।
प्रतिदिन वेदाभ्यास करणार्‍या त्या महात्मा पित्यापासून वाङ्‌ग्‌मयी कन्येच्या रूपात माझा प्रादुर्भाव झाला होता. माझे नाव वेदवती आहे. ॥९ १/२॥
ततो देवाः सगन्धर्वा यक्षराक्षसपन्नगाः ॥ १० ॥

ते चापि गत्वा पितरं वरणं रोचयन्ति मे ।
जेव्हा मी मोठी झाले तेव्हा देवता, गंधर्व, यक्ष, राक्षस आणि नागही पित्याजवळ वारंवार जाऊन त्यांच्याकडे माझी मागणी करू लागले. ॥१० १/२॥
न च मां स पिता तेभ्यो दत्तवान् राक्षसेश्वरः ॥ ११ ॥

कारणं तद् वदिष्यामि निशामय महाभुज ।
महाबाहु राक्षसेश्वर ! पित्यांनी मला त्यांची हाती दिले नाही. याचे काय कारण होते ते मी सांगते, ऐकावे. ॥११ १/२॥
पितुस्तु मम जामाता विष्णुः किल सुरेश्वरः ॥ १२ ॥

अभिप्रेतस्त्रिलोकेशः तस्तस्मान्नान्यस्य मे पिता ।
दातुमिच्छति तस्मै तु तच्छ्रुत्वा बलदर्पितः ॥ १३ ॥

शम्भुर्नाम ततो राजा दैत्यानां कुपितोऽभवत् ।
तेन रात्रौ शयानो मे पिता पापेन हिंसितः ॥ १४ ॥
पित्याची इच्छा होती की तीन्ही लोकांचे स्वामी देवेश्वर भगवान्‌ विष्णु त्यांचे जावई जामात व्हावेत. म्हणून ते दुसर्‍या कुणाच्या हाती मला देऊ इच्छित नव्हते. त्यांचा हा अभिप्राय ऐकून बलाभिमानी दैत्यराज शंभु त्यांच्यावर कुपित झाला आणि त्या पाप्याने रात्री झोपले असता माझ्या पित्याची हत्या केली. ॥१२-१४॥
ततो मे जननी दीना तच्छरीरं पितुर्मम ।
परिष्वज्य महाभागा प्रविष्टा हव्यवाहनम् ॥ १५ ॥
यामुळे माझ्या महाभागा मातेला फार दुःख झाले आणि ती पित्याच्या शवाला हृदयाशी धरून चितेच्या आगीत प्रविष्ट झाली. ॥१५॥
ततो मनोरथं सत्यं पितुर्नारायणं प्रति ।
करोमीति तमेवाहं हृदयेन समुद्वहे ॥ १६ ॥
तेव्हापासून मी प्रतिज्ञा केली आहे की नारायणांच्या प्रति पित्याचा जो मनोरथ होता तो मी सफल करीन म्हणून मी त्यांनाच आपल्या हृदयमंदिरात धारण करत आहे. ॥१६॥
इति प्रतिज्ञामारुह्य चरामि विपुलं तपः ।
एतत् ते सर्वमाख्यातं मया राक्षसपुङ्‌गव ॥ १७ ॥
हीच प्रतिज्ञा करून मी हे महान्‌ तप करत आहे. राक्षसराज ! मी आपल्या प्रश्नास अनुसरून ही सर्व हकिगत आपल्याला सांगितली आहे. ॥१७॥
नारायणो मम पतिः व त्वन्यः पुरुषोत्तमात् ।
आश्रये नियमं घोरं नारायणपरीप्सया ॥ १८ ॥
नारायण हेच माझे पति आहेत. त्या पुरुषोत्तमाशिवाय दुसरे कोणी माझे पति होऊ शकत नाही. त्या नारायणदेवाला प्राप्त करण्यासाठीच मी या कठोर व्रताचा आश्रय घेतला आहे. ॥१८॥
विज्ञातस्त्वं हि मे राजन्गच्छ पौलस्त्यनन्दन ।
जानामि तपसा सर्वं त्रैलोक्ये यद्धि वर्तते ॥ १९ ॥
राजन्‌ ! पौलस्त्यनंदन ! मी आपल्याला ओळखले आहे. आपण जावे ! त्रैलोक्यात जी म्हणून वस्तु विद्यमान्‌ आहे त्या सर्वांना मी तपस्येद्वारे जाणत आहे. ॥१९॥
सोऽब्रवीद् रावणो भूयः तां कन्यां सुमहाव्रताम् ।
अवरुह्य विमानाग्रात् कन्दर्पशरपीडितः ॥ २० ॥
हे ऐकून रावण कामबाणांनी पीडित होऊन विमानातून उतरला आणि त्या उत्तम तसेच महान्‌ व्रताचे पालन करणार्‍या कन्येला परत म्हणाला - ॥२०॥
अवलिप्ताऽसि सुश्रोणि यस्यास्ते मतिरीदृशी ।
वृद्धानां मृगशावाक्षि भ्राजते पुण्यसञ्चयः ॥ २१ ॥
सुश्रोणि ! तू गर्विष्ठ आहेस असे वाटते, म्हणून तर तुझी बुद्धि अशी झाली आहे. मृगशावक लोचने ! याप्रकारे पुण्याचा संग्रह म्हातार्‍या स्त्रियांनाच शोभून दिसतो; तुझ्यासारख्या युवतिला नाही. ॥२१॥
त्वं सर्वगुणसम्पन्ना नार्हसे वक्तुमीदृशम् ।
त्रैलोक्यसुन्दरी भीरु यौवनं ते निवर्तते ॥ २२ ॥
तू तर सर्वगुणसंपन्न तसेच त्रौलोक्यातील अद्वितीय सुंदरी आहेस. तू अशी गोष्ट बोलता कामा नये. भीरू ! तुझे तारूण्य निघून जात आहे. ॥२२॥
अहं लङ्‌कापतिर्भद्रे दशग्रीव इति श्रुतः ।
तस्य मे भव भार्या त्वं भुङ्‌क्ष्व भोगान्यथासुखम् ॥ २३ ॥
भद्रे ! मी लंकेचा राजा आहे. माझे नाव दशग्रीव आहे. तू माझी भार्या हो आणि सुखपूर्वक उत्तम भोग भोग. ॥२३॥
कश्च तावदसौ यं त्वं विष्णुरित्यभिभाषसे ।
वीर्येण तपसा चैव भोगेन च बलेन च ॥ २४ ॥
प्रथम हे तर सांग, तू ज्याला विष्णु म्हणत आहेस तो कोण आहे ? अंगने ! भद्रे ! तू ज्याची इच्छा करत आहेस तो बल, पराक्रम, तप आणि भोग-वैभवाद्वारा माझी बरोबरी करू शकत नाही. ॥२४॥
न मया स समो भद्रे यं त्वं कामयसेऽङ्‌गने ।
इत्युक्तवति तस्मिंस्तु वेदवत्यथ साऽब्रवीत् ॥ २५ ॥

मा मैवमिति सा कन्या तमुवाच निशाचरम् ।
त्याने असे म्हटल्यावर कुमारी वेदवती त्या निशाचरास म्हणाली - नाही, नाही, असे म्हणू नका. ॥२५ १/२॥
त्रैलोक्याधिपतिं विष्णुं सर्वलोकनमस्कृतम् ॥ २६ ॥

त्वदृते राक्षसेन्द्रान्यः कोऽवमन्येत बुद्धिमान् ।
राक्षसराज ! भगवान्‌ विष्णु तीन्ही लोकांचे अधिपति आहेत. सर्व संसार त्यांच्या चरणी मस्तक नमवितो. तुझ्या शिवाय दुसरा कोण असा पुरुष आहे की जो बुद्धिमान्‌ असूनही त्यांची अवहेलना करील. ॥२६ १/२॥
एवमुक्तस्तया तत्र वेदवत्या निशाचरः ॥ २७ ॥

मूर्धजेषु तदा कन्यां कराग्रेण परामृशत् ।
वेदवतीने असे म्हटल्यावर त्या राक्षसाने आपल्या हाताने त्या कन्येचे केस पकडले. ॥२७ १/२॥
ततो वेदवती क्रुद्धा केशान्हस्तेन साऽच्छिनत् ॥ २८ ॥

असिर्भूत्वा करस्तस्याः केशांश्छिन्नांस्तदाऽकरोत् ।
यामुळे वेदवतीला फार क्रोध आला. तिने आपल्या हाताने त्या केसांना कापून टाकले. तिचा हातच तलवार बनून तात्काळ तिच्या केसांना तिच्या मस्तकापासून त्याने अलग करून टाकले. ॥२८ १/२॥
सा ज्वलन्तीव रोषेण दहन्तीव निशाचरम् ॥ २९ ॥

उवाचाग्निं समाधाय मरणाय कृतत्वरा ।
वेदवती रोषाने जणु प्रज्वलित झाली. ती जळून मरण्यासाठी उतावीळ झाली आणि अग्निची स्थापना करून त्या निशाचराला जणु दग्ध करीत म्हणाली - ॥२९ १/२॥
धर्षितायास्त्वयानार्य न मे जीवितमिष्यते ॥ ३० ॥

रक्षस्तस्मात् प्रत्प्रवेक्ष्यामि पश्यतस्ते हुताशनम् ।
नीच राक्षस ! तू माझा तिरस्कार केला आहेस म्हणून आता या जीवनास सुरक्षित ठेवणे मला अभीष्ट नाही, म्हणून तुझ्या डोळ्यांदेखत मी अग्नीत प्रवेश करीन. ॥३० १/२॥
यस्मात् तु धर्षिता चाहं त्वया पापात्मना वने ॥ ३१ ॥

तस्मात् तव वधार्थं हि समुत्पत्स्ये ह्यहं पुनः ।
तू पापात्म्याने या वनात माझा अपमान केला आहेस म्हणून मी तुझ्या वधासाठी परत उत्पन्न होईन. ॥३१ १/२॥
न हि शक्यं स्त्रिया हन्तुं पुरुषः पापनिश्चयः ॥ ३२ ॥

शापे त्वयि मयोत्सृष्टे तपसश्च व्ययो भवेत् ।
स्त्री आपल्या शारिरीक शक्तिने कुणा पापाचारी पुरुषाचा वध करू शकत नाही. जर मी तुला शाप देईन तर माझी तपस्या क्षीण होऊन जाईल. ॥३२ १/२॥
यदि त्वस्ति मया किञ्चित् कृतं दत्तं हुतं तथा ॥ ३३ ॥

तस्मात्त्वयोनिजा साध्वी भवेयं धर्मिणः सुता ।
जर मी काही सत्कर्म, दान आणि होम केले असेल तर पुढील जन्मात सती-साध्वी अयोनिजा कन्येच्या रूपात प्रकट होईन तसेच कुणा धर्मात्म्याची पुत्री बनेन. ॥३३ १/२॥
एवमुक्त्वा प्रविष्टा सा ज्वलितं जातवेदसम् ॥ ३४ ॥

पपात च दिवो दिव्या पुष्पवृष्टिः समन्ततः ।
असे म्हणून ती प्रज्वलित अग्नित सामावून गेली. त्यासमयी तिच्या चारी बाजूस आकाशांतून दिव्य पुष्पांची वृष्टि होऊ लागली. ॥३४ १/२॥
पुनरेव समुद्‌भूता पद्मे पद्मसमप्रभा ॥ ३५ ॥

तस्मादपि पुनः प्राप्ता पूर्ववत् तेन रक्षसा ।
त्यानंतर दुसर्‍या जन्मात ती कन्या पुन्हा एका कमलापासून प्रकट झाली. त्या समयी तिची कांति कमलासमान सुंदर होती. त्या राक्षसाने पहिल्याप्रमाणेच परत तेथूनही त्या कन्येला प्राप्त करून घेतले. ॥३५ १/२॥
कन्यां कमलगर्भाभां प्रगृह्य स्वगृहं ययौ ॥ ३६ ॥

प्रगृह्य रावणस्त्वेतां दर्शयामास मन्त्रिणे ।
कमलाच्या आंतील भागासमान सुंदर कांति असलेल्या त्या कन्येला घेऊन रावण आपल्या घरी गेला. तेथे त्याने मंत्र्याला ती कन्या दाखविली. ॥३६ १/२॥
लक्षणज्ञो निरीक्ष्यैव रावणं चैवमब्रवीत् ॥ ३७ ॥

गृहस्थैषां हि सुश्रोणी त्वद् वधायैव दृश्यते ।
मंत्री बालक-बालिकांच्या लक्षणांना जाणणारा होता. त्याने तिला उत्तम प्रकारे पाहून रावणाला म्हटले - राजन्‌ ! ही सुंदर कन्या जर घरात राहिली तर ही आपल्या वधाचेच कारण होईल, असे लक्षण दिसून येत आहे. ॥३७ १/२॥
एतत् श्रुत्वाऽर्णवे राम तां प्रचिक्षेप रावणः ॥ ३८ ॥

सा चैव क्षितिमासाद्य यज्ञायतनमध्यगा ।
राज्ञो हलमुखोत्कृष्टा पुनरप्युत्थिता सती ॥ ३९ ॥
श्रीरामा ! हे ऐकून रावणाने तिला समुद्रात फेकून दिले. तत्पश्चात्‌ ही भूमिला प्राप्त होऊन राजा जनकाच्या यज्ञमंडपाच्या मध्यवर्ती भूभागांत जाऊन पोहोचली. तेथे राजाच्या नांगरांच्या अग्रभागाने त्या भूभागाला नांगरले गेले असतां ती सती-साध्वी कन्या परत प्रकट झाली. ॥३८-३९॥
सैषा जनकराजस्य प्रसूता तनया प्रभो ।
तव भार्या महाबाहो विष्णुस्त्वं हि सनातनः ॥ ४० ॥
प्रभो ! तीच ही वेदवती महाराज जनकांच्या पुत्रीच्या रूपामध्ये प्रादुर्भूत होऊन आपली पत्‍नी झाली आहे. महाबाहो ! आपणच सनातन विष्णु आहात. ॥४०॥
पूर्वं क्रोधाहतः शत्रुः ययाऽसौ निहतस्तथा ।
उपाश्रयित्वा शैलाभः तव वीर्यममानुषम् ॥ ४१ ॥
त्या वेदवतीने प्रथमच आपल्या रोषजनित शापाच्या द्वारे आपल्या त्या पर्वताकार शत्रुला मारलेलेच होते, ज्याला आता आपण आक्रमण करून मृत्युच्या स्वाधीन केले आहे. प्रभो ! आपला पराक्रम अलौकिक आहे. ॥४१॥
एवमेषा महाभागा मर्त्येषूत्पत्स्यते पुनः ।
क्षेत्रे हलमुखोत्कृष्टे वेद्यामग्निशिखोपमा ॥ ४२ ॥
याप्रकारे ही महाभागा देवी विभिन्न कल्पात पुन्हा रावण वधाच्या उद्देश्याने मर्त्यलोकी अवतीर्ण होत राहील. यज्ञवेदीवरील अग्निशिखेप्रमाणे नांगराने जमीन नांगरतांना त्या क्षेत्रात तिचा आविर्भाव झाला आहे. ॥४२॥
एषा वेदवती नाम पूर्वमासीत् कृते युगे ।
त्रेतायुगं अनुप्राप्य वधार्थं तस्य रक्षसः ॥ ४३ ॥

उत्पन्ना मैथिलकुले जनकस्य महात्मनः ।
सीतोत्पन्ना तु सीतेति मानुषैः पुनरुच्यते ॥ ४४ ॥
ही वेदवती प्रथम सत्ययुगात प्रकट झाली होती. नंतर त्रेतायुग आल्यावर त्या राक्षस रावणाच्या वधासाठी मिथिलावर्ती राजा जनकाच्या कुळात सीतारूपाने अवतीर्ण झाली. सीता (नांगरण्याने भूमीवर बनलेल्या रेखा) पासून उत्पन्न झाल्यामुळे मनुष्य या देवीला सीता म्हणतात. ॥४३-४४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे सप्तदशः सर्गः ॥ १७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा सतरावा सर्ग पूरा झाला. ॥१७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP