[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
।। एकपञ्चाशः सर्गः।।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
निषादराज गुहसमक्षे लक्ष्मणस्य विलापः -
निषादराज गुहाच्या समक्ष लक्ष्मणाचा विलाप -
तं जाग्रतमदम्भेन भ्रातुरर्थाय लक्ष्मणम् ।
गुहः संतापसंतप्तो राघवं वाक्यमब्रवीत् ॥ १ ॥
लक्ष्मणांना आपल्या भावाविषयीच्या स्वाभाविक अनुरागामुळे जागत असलेले पाहून गुह फार संतप्त झाले. त्यांनी राघव-लक्ष्मणास म्हटले- ॥१॥
इयं तात सुखा शय्या त्वदर्थमुपकल्पिता ।
प्रत्याश्वसिहि साध्वस्यां राजपुत्र यथासुखम् ॥ २ ॥
’तात ! राजकुमार ! तुमच्या साठी ही आरामदायक शय्या तयार आहे. तिच्या वर सुखपूर्वक झोपून उत्तम प्रकारे विश्राम करा. ॥२॥
उचितोऽयं जनः सर्वः क्लेशानां त्वं सुखोचितः ।
गुप्त्यर्थं जागरिष्यामः काकुत्स्थस्य वयं निशाम् ॥ ३ ॥
’मी, हा सेवक आणि आमच्या बरोबरचे सर्व लोक वनवासी असल्यामुळे सर्व प्रकारचे क्लेश सहन करण्यास सक्षम आहेत. (कारण आम्हा सर्वांना कष्ट सहन करण्याचा अभ्यास आहे.) परंतु तुम्ही सुखात वाढलेले आहात म्हणून त्यासाठीच योग्य आहात. (म्हणून झोपून जा.) आम्ही सर्व लोक काकुत्स्थाचे (रामांचे) रक्षण करण्यासाठी रात्रभर जागत राहू. ॥३॥
न हि रामात् प्रियतरो ममास्ते भुवि कश्चन ।
ब्रवीम्येव च ते सत्यं सत्येनैव च ते शपे ॥ ४ ॥
’मी सत्याची शपथ घेऊन तुम्हाला सत्य सांगत आहे की या भूतलावर मला श्रीरामाहून अधिक प्रिय दुसरे कोणीही नाही. ॥४॥
अस्य प्रसादादाशंसे लोकेऽस्मिन् सुमहद् यशः ।
धर्मावाप्तिं च विपुलामर्थकामौ च पुष्कलौ ॥ ५ ॥
’या रघुनाथांच्या प्रसादानेच मी या लोकात महान यश, विपुल धर्मलाभ तसेच प्रचुर अर्थ आणि योग्य वस्तू मिळण्याची आशा करीत आहे. ॥५॥
सोऽहं प्रियतमं रामं शयानं सह सीतया ।
रक्षिष्यामि धनुष्पाणिः सर्वथा ज्ञातिभिः सह ॥ ६ ॥
’म्हणून मी आपल्या बंधु-बांधवांसह हातात धनुष्य घेऊन सीतेसहित झोपलेल्या प्रिय सखा श्रीरामांचे सर्व प्रकार रक्षण करीन. ॥६॥
न मेऽस्त्यविदितं किंचिद् वनेस्मिंश्चरतः सदा ।
चतुरङ्‌गं ह्यतिबलं सुमहत् संतरेमहि ॥ ७ ॥
’या वनात सदा विचरत असल्याने माझ्यापासून येथील कुठलीही गोष्ट (लपलेली) अज्ञात नाही. आम्ही लोक येथे शत्रूंच्या अत्यंत शक्तीशाली विशाल चतुरंगिणी सेनेचाही अनायास पराभव करून त्यांना जिंकू शकू. ॥७॥
लक्ष्मणस्तु तदोवाच रक्ष्यमाणास्त्वयानघ ।
नात्र भीता वयं सर्वे धर्ममेवानुपश्यता ॥ ८ ॥

कथं दाशरथौ भूमौ शयाने सह सीतया ।
शक्या निद्रा मया लब्धुं जीवितं वा सुखानि वा ॥ ९ ॥
हे ऐकून लक्ष्मणांनी म्हटले- ’निष्पाप निषादराज ! तुम्ही धर्मावरच दृष्टी ठेवून आमचे रक्षण करीत आहा. म्हणून या स्थानी आम्हा सर्वांना कुठलेही भय नाही. तरीही महाराज दशरथांचे ज्येष्ठ पुत्र सीतेसह भूमीवर शयन करीत आहेत तर माझ्यासाठी उत्तम शय्येवर झोपून निद्रा घेणे, जीवन धारण करण्यासाठी स्वादिष्ट अन्न खाणे अथवा दुसरी इतर सुखे भोगणे कसे संभव होऊ शकेल ? ॥८-९॥
यो न देवासुरैः सर्वैः शक्यः प्रसहितुं युधि ।
तं पश्य सुखसंसुप्तं तृणेषु सह सीतया ॥ १० ॥
’पहा ! संपूर्ण देवता आणि असुर मिळूनही युद्धात ज्यांचा वेग सहन करू शकत नाहीत तेच श्रीराम या समयी सीतेसह गवतावर सुखाने झोप घेत आहेत. ॥१०॥
यो मन्त्रतपसा लब्धो विविधैश्च परिक्रमैः ।
एको दशरथस्यैष पुत्रः सदृशलक्षणः ॥ ११ ॥

अस्मिन् प्रव्रजिते राजा न चिरं वर्तयिष्यति ।
विधवा मेदिनी नूनं क्षिप्रमेव भविष्यति ॥ १२ ॥
गायत्री आदि मंत्रांचा जप, कृच्छचांद्रायण आदि तप तथा नाना प्रकारचे पराक्रम (यज्ञानुष्ठान आदि प्रयत्‍न) करून महाराज दशरथांना जे आपल्या प्रमाणेच उत्तम लक्षणांनी युक्त ज्येष्ठ पुत्राच्या रूपाने प्राप्त झालेले आहेत, त्याच या श्रीरामांच्या वनात येण्यामुळे आता महाराज दशरथ अधिक कालपर्यंत जीवन धारण करू शकणार नाहीत. असे कळून येत आहे की ही पृथ्वी आता लवकरच विधवा होऊन जाईल. ॥११-१२॥
विनद्य सुमहानादं श्रमेणोपरताः स्त्रियः ।
निर्घोषोपरतं तात मन्ये राजनिवेशनम् ॥ १३ ॥
’तात ! राणीवशातील स्त्रिया अत्यंत जोराने आर्तनाद करून अधिक श्रमामुळे आता गप्प झाल्या असतील. मी समजतो की राजभवनातील हाहाकार आणि चित्कार आता शांत झाला असेल. ॥१३॥
कौसल्या चैव राजा च तथैव जननी मम ।
नाशंसे यदि जीवन्ति सर्वे ते शर्वरीमिमाम् ॥ १४ ॥
’महाराणी कौसल्या, दशरथ राजे आणि माझी माता सुमित्रा - हे सर्व लोक आजच्या रात्रीपर्यत जिवंत राहतील अथवा नाही हे मी सांगू शकत नाही. ॥१४॥
जीवेदपि हि मे माता शत्रुघ्नस्यान्ववेक्षया ।
तद् दुःखं यदि कौसल्या वीरसूर्विनशिष्यति ॥ १५ ॥
’शत्रुघ्नाची वाट पहाण्यामुळे संभव आहे की माझी माता जिवंत राहीलही, परंतु जर वीर जननी कौसल्या श्रीरामाच्या विरहाने नष्ट झाली तर मग ती आम्हा लोकांसाठी अत्यंत दुःखाची गोष्ट ठरेल. ॥१५॥
अनुरक्तजनाकीर्णा सुखालोकप्रियावहा ।
राजव्यसनसंसृष्टा सा पुरी विनशिष्यति ॥ १६ ॥
’जिच्यामध्ये श्रीरामांची अनुरागी माणसे भरलेली आहेत आणि जी सदा सुखाचे दर्शनरूपी प्रिय वस्तु प्राप्त करविणारी राहिली आहे ती अयोध्यापुरी राजा दशरथांच्या निधनजनित दुःखाने युक्त होऊन नष्ट होऊन जाईल. ॥१६॥
कथं पुत्रं महात्मानं ज्येष्ठं प्रियमपश्यतः ।
शरीरं धारयिष्यन्ति प्राणा राज्ञो महात्मनः ॥ १७ ॥
’आपला ज्येष्ठ पुत्र महात्मा श्रीराम यास न पाहिल्यामुळे महामना राजा दशरथांचे प्राण त्यांच्या शरीरात कसे टिकू शकतील ? ॥१७॥
विनष्टे नृपतौ पश्चात् कौसल्या विनशिष्यति ।
अनन्तरं च मातापि मम नाशमुपैष्यति ॥ १८ ॥
’महाराज नष्ट झाले तर देवी कौसल्याही नष्ट होऊन जाईल. त्यानंतर माझी माता सुमित्राही नष्ट झाल्याशिवाय रहाणार नाही. ॥१८॥
अतिक्रान्तमतिक्रान्तमनवाप्य मनोरथम् ।
राज्ये राममनिक्षिप्य पिता मे विनशिष्यति ॥ १९ ॥
’महाराजांची इच्छा होती की श्रीरामाला राज्यावर अभिषिक्त करीन. आपल्या मनोरथाची प्राप्ति न झाल्याने, श्रीरामांना राज्यावर स्थापित न करताच ’हाय ! माझे सर्व काही नष्ट झाले, नष्ट झाले’ असे म्हणत म्हणत माझे पिता आपल्या प्राणांचा परित्याग करतील. ॥१९॥
सिद्धार्थाः पितरं वृत्तं तस्मिन् काले ह्युपस्थिते ।
प्रेतकार्येषु सर्वेषु संस्करिष्यन्ति राघवम् ॥ २० ॥
’त्यांच्या मृत्युचा समय उपस्थित झाला असता जे लोक तेथे उपस्थित राहातील आणि माझ्या मृत पिता दशरथांच्या सर्व प्रेत कार्यांत जे संस्कार करतील तेच सफल मनोरथ आणि भाग्यशाली आहेत. ॥२०॥
रम्यचत्वरसंस्थानां सुविभक्तमहापथाम् ।
हर्म्यप्रासादसम्पन्नां गणिकावरशोभिताम् ॥ २१ ॥

रथाश्वगजसम्बाधां तूर्यनादनिनादिताम् ।
सर्वकल्याणसम्पूर्णां हृष्टपुष्टजनाकुलाम् ॥ २२ ॥

आरामोद्यानसम्पन्नां समाजोत्सवशालिनीम् ।
सुखिता विचरिष्यन्ति राजधानीं पितुर्मम ॥ २३ ॥
’जर पिताजी जिवंत राहिले तर, रमणीय चबुतरे आणि चौकांच्या सुंदर स्थानांनी युक्त, पृथक पृथक बनलेल्या राजमार्गांनी अलंकृत, धनिकांच्या अट्टालिकांनी, देवमंदिरांनी आणि राजभवनांनी संपन्न, श्रेष्ठ वारांगनांनी सुशोभित, रथ, घोडे आणि हत्ती यांच्या येण्याजाण्याने भरलेली, विविध वाद्यांच्या ध्वनीनी निनादित, समस्त कल्याणकारी वस्तुंनी भरपूर समृद्ध, हृष्ट-पुष्ट मनुष्यांनी सेवित, पुष्पवाटिका आणि उद्यानांनी विभूषित तथा सामाजिक उत्सवांनी सुशोभित झालेली माझ्या पित्याची राजधानी अयोध्यापुरी, हिच्यामध्ये जे लोक विचरतील, वास्तविक तेच सुखी आहेत. ॥२१-२३॥
अपि जीवेद् दशरथो वनवासात् पुनर्वयम् ।
प्रत्यागम्य महात्मानमपि पश्याम सुव्रतम् ॥ २४ ॥
’काय माझे पिता महाराज दशरथ आम्ही लोक येईपर्यंत जिंवत रहातील ? काय वनवासातून परत येऊन आम्ही त्या उत्तम व्रतधारी महात्माचे दर्शन परत करू शकू ? ॥२४॥
अपि सत्यप्रतिज्ञेन सार्धं कुशलिना वयम् ।
निवृत्ते वनवासेऽस्मिन्नयोध्यां प्रविशेमहि ॥ २५ ॥
’काय वनवासाचा हा अवधी समाप्त झाल्यावर आम्ही सत्यप्रतिज्ञ श्रीरामा बरोबर कुशलपूर्वक अयोध्यापुरीत प्रवेश करू शकू ?’ ॥२५॥
परिदेवयमानस्य दुःखार्तस्य महात्मनः ।
तिष्ठतो राजपुत्रस्य शर्वरी सात्यवर्तत ॥ २६ ॥
या प्रकारे दुःखाने आर्त होऊन विलाप करीत महामना राजकुमार लक्ष्मणाची ती सारी रात्र जागत असताच निघून गेली. ॥२६॥
तथा हि सत्यं ब्रुवति प्रजाहिते
     नरेन्द्रसूनौ गुरुसौहृदाद् गुहः ।
मुमोच बाष्पं व्यसनाभिपीडितो
     ज्वरातुरो नाग इव व्यथातुरः ॥ २७ ॥
प्रजेच्या हितात संलग्न राहाणारे राजकुमार लक्ष्मण ज्यावेळी आपल्या मोठ्या भावाच्या प्रति सौहार्दवश उपर्युक्त प्रकारे यथार्थ गोष्टी बोलत होते त्यावेळी त्या ऐकून निषादराज गुह दुःखाने अत्यंत पीडित झाले आणि व्यथेमुळे व्याकुळ होऊन ज्वराने आतुर झालेल्या हत्ती प्रमाणे अश्रू ढाळू लागले. ॥२७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे एकपञ्चाशः सर्गः ॥ ५१ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्ष रामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा एक्कावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP