श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ चतुरशीतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
अश्वमेधं प्रस्तुवता लक्ष्मणेन इन्द्रवृत्रयो कथाया उपस्थापनं वृत्रस्य तप इन्द्रस्य विष्णुं प्रति तद्वधार्थं अनुरोधः -
लक्ष्मणांचा अश्वमेध- यज्ञाचा प्रस्ताव करीत इंद्र आणि वृत्रासुराची कथा ऐकविणे, वृत्रासुराची तपस्या आणि इंद्रांचा भगवान्‌ विष्णुंना त्याच्या वधासाठी अनुरोध -
तथोक्तवति रामे तु भरते च महात्मनि ।
लक्ष्मणोऽथ शुभं वाक्यं उवाच रघुनन्दनम् ॥ १ ॥
श्रीराम आणि महात्मा भरत यांच्यात याप्रकारे संभाषण झाल्यावर लक्ष्मणांनी रघुनंदन रामांना उद्देश्यून हे शुभ वाक्य उच्चारले - ॥१॥
अश्वमेधो महायज्ञः पावनः सर्वपाप्मनाम् ।
पावनस्तव दुर्धर्षो रोचतां रघुनन्दन ॥ २ ॥
रघुनंदन ! अश्वमेघ नामक महान्‌ यज्ञ समस्त पापांना दूर करणारा परम पावन आणि दुष्कर आहे. म्हणून याचे अनुष्ठान आपण पसंत करावे. ॥२॥
श्रूयते हि पुरावृत्तं वासवे सुमहात्मनि ।
ब्रह्महत्यावृतः शक्रो हयमेधेन पावितः ॥ ३ ॥
महात्मा इंद्रांच्या विषयी हा प्राचीन वृत्तांत ऐकण्यात येत असतो की इंद्रांना जेव्हा ब्रह्महत्या लागली होती, तेव्हा ते अश्वमेघ यज्ञाचे अनुष्ठान करूनच पवित्र झाले होते. ॥३॥
पुरा किल महाबाहो देवासुरसमागमे ।
वृत्रो नाम महानासीद् दैतेयो लोकसम्मतः ॥ ४ ॥
महाबाहो ! पूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा देवता आणि असुर परस्पर मिळून मिसळून राहात असत, त्या काळात वृत्त नामांनी प्रसिद्ध एक फार मोठा असुर राहात होता. लोकात त्याच्याबद्दल फार आदर होता. ॥४॥
विस्तीर्णो योजनशतं उच्छ्रितस्त्रिगुणं ततः ।
अनुरागेण लोकांस्त्रीन् स्नेहात् पश्यति सर्वतः ॥ ५ ॥
तो शंभर योजन रूंद (आडवा) आणि तीनशे योजने उंच होता, तो तीन्ही लोकांना आत्मीय मानून प्रेम करत होता आणि सर्वांना स्नेहपूर्ण दृष्टीने बघत असे. ॥५॥
धर्मज्ञश्च कृतज्ञश्च बुद्ध्या च परिनिष्ठितः ।
शशास पृथिवीं स्फीतां धर्मेण सुसमाहितः ॥ ६ ॥
त्याला धर्माचे यथार्थ ज्ञान होते. तो कृतज्ञ आणि स्थितप्रज्ञ होता तसेच पूर्णतः सावधान राहून धन-धान्याने भरलेल्या पृथ्वीचे धर्मपूर्वक शासन करीत होता. ॥६॥
तस्मिन् प्रशासति तदा सर्वकामदुघा मही ।
रसवन्ति प्रभूनानि मूलानि च फलानि च ॥ ७ ॥
त्याच्या शासनकाळात पृथ्वी संपूर्ण कामना पूर्ण करणारी होती. येथे फळे, फुले आणि मुळे सर्व सरस होत होती. ॥७॥
अकृष्टपच्या पृथिवी सुसम्पन्ना महात्मनः ।
स राज्यं तादृशं भुङ्‌क्ते स्फीतमद्‌भुतदर्शनम् ॥ ८ ॥
महात्मा वृत्रासुराच्या राज्यात ही भूमि न नांगरता न पेरतांच अन्न उत्पन्न करत होती तसेच धन-धान्याने उत्तम प्रकारे संपन्न राहात होती. याप्रकारे तो असुर समृद्धशाली एवं अद्‍भुत राज्याचा उपभोग करीत होता. ॥८॥
तस्य बुद्धिः समुप्तन्ना तपः कुर्यामनुत्तमम् ।
तपो हि परमं श्रेयः सम्मोहमितरत् सुखम् ॥ ९ ॥
एका समयी वृत्रासुराच्या मनात हा विचार उत्पन्न झाला की मी परम उत्तम तप करीन, कारण की तपच परम कल्याणाचे साधन आहे. दुसरे सारे सुख तर मोहमात्रच आहे. ॥९॥
स निक्षिप्य सुतं ज्येष्ठं पौरेषु मधुरेश्वरम् ।
तप उग्रं समातिष्ठत् तापयन् सर्वदेवताः ॥ १० ॥
त्याने आपला ज्येष्ठ पुत्र मधुरेश्वराला (*) राजा बनवून पुरवासींच्यावर सोपवून दिले आणि संपूर्ण देवतांना ताप देत तो कठोर तपस्या करू लागला. ॥१०॥
(* - मधुरेश्वराचा अर्थ तिलककारांनी मधुर नामक राजा केला आहे. रामायणशिरोमणीकारांनी मधुर वक्त्याचा ईश्वर केला आहे. तसेच रामायणभूषणकारांनी मधुर - सौम्य स्वभावाचा राजा अथवा मधुरा नगरीचा स्वामी केला आहे.)
तपस्तप्यति वृत्रे तु वासवः परमार्तवत् ।
विष्णुं समुपसंक्रम्य वाक्यमेतदुवाच ह ॥ ११ ॥
वृत्रासुर तप करू लागल्यावर इंद्र फार दुःखी होऊन भगवान्‌ विष्णुंच्या जवळ गेले आणि याप्रकारे बोलले - ॥११॥
तपस्यता महाबाहो लोकाः सर्वे विनिर्जिताः ।
बलवान् स हि धर्मात्मा नैनं शक्ष्यामि शासितुम् ॥ १२ ॥
महाबाहो ! तपस्या करत असलेल्या वृत्रासुराने समस्त लोक जिंकले आहेत. तो धर्मात्मा असुर बलवान्‌ झालेला आहे, म्हणून आता त्याच्यावर माझे शासन चालू शकत नाही. ॥१२॥
यद्यसौ तप आतिष्ठेद् भूय एव सुरेश्वर ।
यावल्लोका धरिष्यन्ति तावदस्य वशानुगाः ॥ १३ ॥
सुरेश्वरा ! जर तो परत याप्रकारे तपस्या करत राहील तर जो पर्यंत हे तीन्ही लोक राहातील, तो पर्यंत आम्हा सर्व देवतांना त्याच्या अधीन होऊन राहावे लागेल. ॥१३॥
तं चैनं परमोदारं उपेक्षसि महाबलम् ।
क्षणं हि न भवेद् वृत्रः क्रुद्धे त्वयि सुरेश्वर ॥ १४ ॥
महाबली देवेश्वर ! त्या परम उदार असुराची आपण उपेक्षा करीत आहात म्हणून तो शक्तिशाली होत राहिला आहे. जर आपण कुपित झालात तर तो क्षणभरही जीवित राहू शकत नाही. ॥१४॥
यदा हि प्रीतिसंयोगं त्वया विष्णो समागतः ।
तदाप्रभृति लोकानां नाथत्वं उपलब्धवान् ॥ १५ ॥
विष्णो ! जेव्हा पासून आपल्यावर त्याचे प्रेम झाले आहे, तेव्हा पासून त्याने संपूर्ण लोकांचे अधिपत्य प्राप्त केले आहे. ॥१५॥
स त्वं प्रसादं लोकानां कुरुष्व सुसमाहितः ।
त्वत्कृतेन हि सर्वं स्यात् प्रशान्तमरुजं जगत् ॥ १६ ॥
म्हणून आपण चांगल्या प्रकारे ध्यान देऊन संपूर्ण लोकांवर कृपा करावी. आपण रक्षण केल्यानेच सारे जगत शान्त आणि निरोगी होऊ शकते. ॥१६॥
इमे हि सर्वे विष्णो त्वां निरीक्षन्ते दिवौकसः ।
वृत्रघातेन महता तेषां साह्यं कुरुष्व ह ॥ १७ ॥
विष्णो ! ह्या सर्व देवता (आशेने) आपल्याकडेच पहात आहेत. वृत्रासुराचा वध एक महान्‌ कार्य आहे. ते करून आपण त्या देवतांवर उपकार करावा. ॥१७॥
त्वया हि नित्यशः साह्यं कृतमेषां महात्मनाम् ।
असह्यं इदमन्येषां अगतीनां गतिर्भवान् ॥ १८ ॥
प्रभो ! आपण सदाच या महात्मा देवतांचे सहाय्य केले आहे. हा असुर दुसर्‍यांसाठी अजेय आहे म्हणून आपणच आम्हा निराश्रित देवतांचे आश्रयदाता व्हावे. ॥१८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे चतुरशीतितमः सर्गः ॥ ८४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा चौर्‍याऐंशीवा सर्ग पूरा झाला. ॥८४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP