श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ एकोनविंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
रावणेन अनरण्यस्य वधः ततस्तस्य शापप्राप्तिश्च -
रावणाच्या द्वारा अनरण्याचा वध तसेच त्यांच्या द्वारा त्याला शापाची प्राप्ति -
अथ जित्वा मरुत्तं स प्रययौ राक्षसाधिपः ।
नगराणि नरेन्द्राणां युद्धकाङ्‌क्षी दशाननः ॥ १ ॥
(अगस्त्य म्हणतात - रघुनंदना !) पूर्वोक्त रूपाने राजा मरूत्ताला जिंकल्यावर राक्षसराज दशग्रीव क्रमशः अन्य नरेशांच्या नगरांतही युद्धाच्या इच्छेने गेला. ॥१॥
समासाद्य तु राजेन्द्रान् महेन्द्रवरुणोपमान् ।
अब्रवीद् राक्षसेन्द्रस्तु युद्धं मे दीयतामिति ॥ २ ॥

निर्जिताः स्मेति वा ब्रूत एष मे हि सुनिश्चयः ।
अन्यथा कुर्वतामेवं मोक्षो नैवोपपद्यते ॥ ३ ॥
महेंद्र आणि वरूणासमान पराक्रमी त्या महाराजांच्या जवळ जाऊन तो राक्षसराजा त्यांना म्हणत असे - राजांनो ! तुम्ही माझ्या बरोबर युद्ध करा अथवा म्हणा की आम्ही हरलो आहोत. हाच माझा उत्तम प्रकारे ठरविलेला निश्चय आहे. याच्या विपरीत केल्याने तुमची सुटका होणार नाही. ॥२-३॥
ततस्त्वभीरवः प्राज्ञाः पार्थिवा धर्मनिश्चयाः ।
मन्त्रयित्वा ततोऽन्योन्यं राजानः सुमहाबलाः ॥ ४ ॥

निर्जिताः स्मेत्यभाषन्त ज्ञात्वा वरबलं रिपोः ।
तेव्हा निर्भय, बुद्धिमान्‌ तसेच धर्मपूर्ण विचार ठेवणार्‍या बर्‍याचशा महाबली राजांनी परस्परांत विचार करून शत्रूच्या प्रबलतेला समजून सांगितले - राक्षसराज ! आम्ही तुझ्याकडून हरल्याचे मान्य करीत आहो. ॥४ १/२॥
दुष्यन्तः सुरथो गाधिः गयो राजा पुरूरवाः ॥ ५ ॥

एते सर्वेऽब्रुवंस्तात निर्जिताः स्मेति पार्थिवाः ।
दुष्यंत, सुरथ, गाधि, गय, राजा पुरूवा - या सर्व भूपालांनी आपापल्या राज्यशासन काळात रावणासमोर आपला पराजय स्वीकार केला. ॥५ १/२॥
अथायोध्यां समासाद्य रावणो राक्षसाधिपः ॥ ६ ॥

सुगुप्तामनरण्येन शक्रेणेवामरावतीम् ।
स तं पुरुषशार्दूलं पुरन्दरसमं बले ॥ ७ ॥

प्राह राजानमासाद्य युद्धं देहीति रावणः ।
निर्जितोऽस्मीति वा ब्रूहि त्वमेवं मम शासनम् ॥ ८ ॥
त्यानंतर राक्षसांचा राजा रावण इंद्रद्वारा सुरक्षित अमरावतीप्रमाणे महाराज अनरण्य द्वारा पालित अयोध्यापुरीत आला. तेथे पुरंदरा (इंद्रा) समान पराक्रमी पुरुषसिंह राजा अनरण्याला भेटून म्हणाला -राजन्‌ ! तू माझ्याशी युद्ध करण्याचे वचन दे अथवा म्हण की मी हारलो ! हाच माझा आदेश आहे. ॥६-८॥
अयोध्याधिपतिस्तस्य श्रुत्वा पापात्मनो वचः ।
अनरण्यस्तु संक्रुद्धो राक्षसेन्द्रमथाब्रवीत् ॥ ९ ॥
त्या पापात्म्याचे हे वचन ऐकून अयोध्या नरेश अनरण्यांना फार क्रोध आला आणि ते त्या राक्षसराजास बोलले - ॥९॥
दीयते द्वन्द्वयुद्धं ते राक्षसाधिपते मया ।
सन्तिष्ठ क्षिप्रमायत्तो भव चैवं भवाम्यहम् ॥ १० ॥
निशाचरपते ! मी तुला द्वंद युद्धाचा अवसर देतो. थांब, तात्काळ युद्धासाठी तयार हो, मीही तयार होत आहे. ॥१०॥
अथ पूर्वं श्रुतार्थेन निर्जितं सुमहद् बलम् ।
निष्क्रामत् तन्नरेन्द्रस्य बलं रक्षोवधोद्यतम् ॥ ११ ॥
राजाने रावणाच्या दिग्विजयाची गोष्ट प्रथमच ऐकलेली होती, म्हणून त्यांनी फार मोठी सेना एकत्रित केली होती. नरेशाची ती सारी सेना त्यासमयी राक्षसाच्या वधासाठी उत्साहित होऊन नगरातून बाहेर पडली. ॥११॥
नागानां दशसाहस्रं वाजिनां नियुतं तथा ।
रथानां बहुसाहस्रं पत्तीनां च नरोत्तम ॥ १२ ॥

महीं संछाद्य निष्क्रान्तं सपदातिरथं रणे ।
नरश्रेष्ठ श्रीरामा ! दहा हजार हत्तीस्वार, एक लाख घोडेस्वार, कित्येक हजार रथ आणि पायदळ सैनिक पृथ्वीला आच्छादित करून युद्धासाठी पुढे सरसावले. रथ आणि पायदळ सैनिकांसह सारी सेना रणक्षेत्रात जाऊन पोहोंचली. ॥१२ १/२॥
ततः प्रवृत्तं सुमहद् युद्धं युद्धविशारद ॥ १३ ॥

अनरण्यस्य नृपते राक्षसेन्द्रस्य चाद्‌भुतम् ।
युद्धविशारद रघुवीरा ! नंतर तर राजा अनरण्य आणि निशाचर रावणात फार अद्‍भुत संग्राम होऊ लागला. ॥१३ १/२॥
तद् रावणबलं प्राप्य बलं तस्य महीपतेः ॥ १४ ॥

प्राणश्यत तदा सर्वं हव्यं हुतमिवानले ।
त्यासमयी अग्निमध्ये दिलेली आहुति जशी पूर्णतः भस्म होऊन जाते त्याप्रमाणे राजाची सारी सेना रावणाच्या सेनेशी टक्कर देऊन नष्ट होऊ लागली. ॥१४ १/२॥
युद्ध्वा च सुचिरं कालं कृत्वा विक्रममुत्तमम् ॥ १५ ॥

प्रज्वलन्तं तमासाद्य क्षिप्रमेवावशेषितम् ।
प्राविशर् संकुलं तत्र शलभा इव पावकम् ॥ १६ ॥
त्या सेनेने बराच काळ युद्ध केले, फार मोठा पराक्रम दाखविला, परंतु तेजस्वी रावणाचा सामना करून ती फार थोड्‍या संख्येमध्ये शिल्लक राहिली आणि अखेर पतंग जसे आगीत जळून भस्म होऊन जातात त्याप्रमाणे काळाच्या मुखात प्रवेश करती झाली. ॥१५-१६॥
सोऽपश्यत्तन्नरेन्द्रस्तु नश्यमानं महाबलम् ।
महार्णवं समासाद्य वनापगशतं यथा ॥ १७ ॥
राजाने पाहिले माझी विशाल सेना जलाने भरलेल्या शेकडो नद्या महासागराजवळ पोहोचल्यावर त्यात विलीन होऊन जातात त्याप्रमाणे नष्ट होऊन जात आहे. ॥१७॥
ततः शक्रधनुःप्रख्यं धनुर्विस्फारयन् स्वयम् ।
आससाद नरेन्द्रस्तं रावणं क्रोधमूर्च्छितः ॥ १८ ॥
तेव्हा महाराज अनरण्य क्रोधाने बेभान होऊन आपल्या इंद्रधनुष्यासमान महान्‌ शरासनाचा टणत्कार करीत रावणाचा सामना करण्यासाठी आले. ॥१८॥
अनरण्येन तेऽमात्या मारीचशुकसारणाः ।
प्रहस्तसहिता भग्ना व्यद्रवन्त मृगा इव ॥ १९ ॥
नंतर तर सिंहाला पाहून मृग ज्याप्रकारे पळून जातात त्याप्रमाणे मारीच, शुक, सारण तसेच प्रहस्त - हे चारी राक्षस मंत्री राजा अनरण्याकडून परास्त होऊन पळून गेले. ॥१९॥
ततो बाणशतान्यष्टौ पातयामास मूर्धनि ।
तस्य राक्षसराजस्य इक्ष्वाकुकुलनन्दनः ॥ २० ॥
त्यानंतर इक्ष्वाकुवंशाला आनंदित करणार्‍या राजा अनरण्याने राक्षसराज रावणाच्या मस्तकावर आठशे बाण मारले. ॥२०॥
तस्य बाणाः पतन्तस्ते चक्रिरे न क्षतं क्वचित् ।
वारिधारा इवाभ्रेभ्यः पतन्त्यो गिरिमूर्धनि ॥ २१ ॥
परंतु जशा पर्वतशिखरावर मेघातून वर्षणार्‍या जलधारा त्याला काही क्षति पोहोचवीत नाहीत, त्याप्रकारे ते वर्षणारे बाण त्या निशाचराच्या शरीरावर काही आघात करू शकले नाहीत. ॥२१॥
ततो राक्षसराजेन क्रुद्धेन नृपतिस्तदा ।
तलेनाभिहतो मूर्ध्नि स रथान् निपपात ह ॥ २२ ॥
यानंतर राक्षसराजाने कुपित होऊन राजाच्या मस्तकावर एक तडाखा मारला. त्यामुळे आहत होऊन राजा रथांतून खाली पडला. ॥२२॥
स राजा पतितो भूमौ विह्वलः प्रविवेपितः ।
वज्रदग्ध इवारण्ये सालो निपतितो यथा ॥ २३ ॥
ज्याप्रमाणे वनात वज्रपाताने दग्ध झालेला सालवृक्ष धराशायी होतो त्याप्रमाणे राजा अनरण्य व्याकुळ होऊन भूमीवर पडले आणि थरथर कापू लागले. ॥२३॥
तं प्रहस्याब्रवीद् रक्ष इक्ष्वाकुं पृथिवीपतिम् ।
किमिदानीं फलं प्राप्तं त्वया मां प्रति युध्यता ॥ २४ ॥
हे पाहून रावण जोरजोराने हसू लागला आणि त्या इक्ष्वाकुवंशी नरेशास म्हणाला - या समयी माझ्याशी युद्ध करून तू काय फळ प्राप्त केले आहेस ? ॥२४॥
त्रैलोक्ये नास्ति यो द्वन्द्वं मम दद्यान्नराधिप ।
शङ्‌के प्रसक्तो भोगेषु न शृणोषि बलं मम ॥ २५ ॥
नरेश्वर ! तीन्ही लोकात असा कोणी वीर नाही जो माझ्याशी द्वंदयुद्ध करू शकेल. असे कळून येत आहे की तू भोगात अधिक आसक्त राहिल्याने माझ्या बल-पराक्रमाविषयी ऐकलेले नव्हतेस. ॥२५॥
तस्यैवं ब्रुवतो राजा मन्दासुर्वाक्यमब्रवीत् ।
किं शक्यमिह कर्तुं वै कालो हि दुरतिक्रमः ॥ २६ ॥
राजाची प्राणशक्ति क्षीण होत होती, त्याने याप्रकारे बोलणार्‍या रावणाचे वचन ऐकून म्हटले -राक्षसराज ! आता येथे काय करता येणे शक्य आहे ? कारण काळाचे उल्लंघन करणे अत्यंत दुष्कर आहे. ॥२६॥
नह्यहं निर्जितो रक्षः त्वया चात्मप्रशंसिना ।
कालेनैव विपन्नोऽहं हेतुभूतस्तु मे भवान् ॥ २७ ॥
राक्षसा ! तू आपल्या मुखाने आपली प्रशंसा करीत आहेस, परंतु तू आज जे मला पराजित केले आहेस यात काळच कारणीभूत आहे. वास्तविक काळानेच मला मारले आहे. तू तर माझ्या मृत्युचे केवळ निमित्त बनला आहेस. ॥२७॥
किं त्विदानीं मया शक्यं कर्तुं प्राणपरिक्षये ।
नह्यहं विमुखी रक्षो युध्यमानस्त्वया हतः ॥ २८ ॥
माझे प्राण जात आहेत या समयी मी काय करू शकतो ? निशाचरा ! मी युद्धापासून विन्मुख झालो नाही याचा मला संतोष आहे. युद्ध करत असतांच मी तुझ्या हातून मारला गोलो आहे. ॥२८॥
इक्ष्वाकुपरिभावित्वाद् वचो वक्ष्यामि राक्षस ।
यदि दत्तं यदि हुतं यदि मे सुकृतं तपः ॥
यदि गुप्ताः प्रजाः सम्यक् तदा सत्यं वचोऽस्तु मे ॥ २९ ॥
परंतु राक्षसा ! तू आपल्या व्यङ्‌गपूर्ण वचनांनी इक्ष्वाकुकुळाचा अपमान केला आहेस, म्हणून मी तुला शाप देईन - तुझ्यासाठी अमंगलजनक वचन बोलेन. जर मी दान, पुण्य, होम आणि तप केलेले असेल, जर माझ्याद्वारा धर्माला अनुसरून प्रजाजनांचे चांगल्या प्रकारे पालन झाले असेल तर माझे वचन सत्यच होईल. ॥२९॥
उत्पत्स्यते कुले ह्यस्मिन् इक्ष्वाकूणां महात्मनाम् ।
रामो दाशरथिर्नाम यस्ते प्राणान् हरिष्यति ॥ ३० ॥
महात्मा इक्ष्वाकुवंशी नरेशांच्या या वंशातच दशरथनंदन राम प्रकट होतील, जे तुझ्या प्राणांचे अपहरण करतील. ॥३०॥
ततो जलधरोदग्रः ताडितो देवदुन्दुभिः ।
तस्मिन् उदाहृते शापे पुष्पवृष्टिश्च खाच्च्युता ॥ ३१ ॥
राजाने याप्रकारे शाप देताच मेघासमान गंभीर स्वरांत देवतांच्या दुंदुभि वाजू लागल्या आणि आकाशांतून फुलांचा वर्षाव होऊ लागला. ॥३१॥
ततः स राजा राजेन्द्र गतः स्थानं त्रिविष्टपम् ।
स्वर्गते च नृपे तस्मिन् राक्षसः सोऽपसर्पत ॥ ३२ ॥
राजाधिराज श्रीरामा ! त्यानंतर राजा अनरण्य स्वर्गलोकास गेले. ते स्वर्गास गेल्यावर राक्षस रावण तेथून अन्यत्र निघून गेला. ॥३२॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे एकोनविंशः सर्गः ॥ १९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा एकोणविसावा सर्ग पूरा झाला. ॥१९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP