॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ युद्धकाण्ड ॥

॥ चतुर्थः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



समुद्रतरण, लंका निरीक्षण, आणि रावण व शुक यांचा संवाद


श्रीमहादेव उवाच
सेतुं आरभमाणस्तु तत्र रामेश्वरं शिवम् ।
संस्थाप्य पूजयित्वाह रामो लोकहिताय च ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले-हे पार्वती, सेतू बांधण्याचा आरंभ करताना, रामेश्वर नावाच्या शिवलिंगाची स्थापना करून व त्याची पूजा करून, लोकांच्या हितासाठी राम म्हणाले. (१)

प्रणमेत् सेतुवन्धं यो दृष्ट्वा रामेश्वरं शिवम् ।
ब्रह्महत्यादिपापेभो मुच्यते मदनुग्रहात् ॥ २ ॥
"रामेश्वर शिवाचे दर्शन घेऊन जो कोणी माणूस सेतुबंधाला प्रणाम करेल, तो माझ्या कृपेने ब्रह्महत्या इत्यादी पापांतून मुक्त होऊन जाईल. (२)

सेतुबन्धे नरः स्नात्वा दृष्ट्वा रामेश्वरं हरम् ।
सङ्‌कल्पनियतो भूत्वा गत्वा वारणसीं नरः ॥ ३ ॥
आनीय गङ्‌गासलिलं रामेशमभिषिच्य च ।
समुद्रे क्षिप्ततद्‌भारो ब्रह्म प्राप्नोत्यसंशयम् ॥ ४ ॥
सेतुबंधाच्या ठिकाणी स्नान करून, रामेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन, मग नियत संकल्प करून, वाराणसीला जाऊन, तेथून गंगा नदीचे पाणी आणून, त्या पाण्याने रामेश्वराला अभिषेक करून व उरलेले पाणी पात्रासह जो कोणी समुद्रामध्ये सोडील, तो निःसंशयपणे ब्रह्म प्राप्त करून घेईल." (३-४)

कृतानि प्रथमेनाह्ना योजनानि चतुर्दश ।
द्वितीयेन तथा चाह्ना योजनानि तु विंशतिः ॥ ५ ॥
तृतीयेन तथा चाह्ना योजनान्येकविंशतिः ।
चतुर्थेन तथा चाह्ना द्वाविंशतिरिति श्रुतम् ॥ ६ ॥
सेतू बांधताना नलाने पहिल्या दिवशी चौदा योजने, दुसऱ्या दिवशी वीस योजने, तिसऱ्या दिवशी एकवीस योजने, चौथ्या दिवशी बावीस योजने लांब सेतू बांधला, असे ऐकिवात आहे. (५-६)

पञ्चमेन त्रयोविशत् योजनानि समन्ततः ।
बबन्ध सागरे सेतुं नलो वानरसत्तमः ॥ ७ ॥
पाचवे दिवशी नलाने तेवीस योजने सेतू बांधला. अशा प्रकारे त्या समुद्रात सगळीकडे वानरश्रेष्ठ नलाने सेतू बांधला. (७)

तैनेव जग्मुः कपयो योजनानां शतं द्रुतम् ।
असङ्‌ख्याताः सुवेलाद्रिं रुरुधुः प्लवगोत्तमाः ॥ ८ ॥
आणि त्या सेतूवरूनच असंख्य वानर त्वरेने शंभर योजने विस्तीर्ण असलेला सागर ओलांडून पलीकडे गेले आणि मग तेथे वानरश्रेष्ठांनी सुवेल (त्रिकूट) पर्वताला वेढा घातला. (८)

आरुह्य मारुतीं रामो लक्ष्मणोऽप्यङ्‌गदं तथा ।
दिदृक्षू राघवो लङ्‌कां आरुरोहाचलं महत् ॥ ९ ॥
लंका पाहाण्याच्या इच्छेने श्रीराम मारुतीच्या खांद्यावर चढले आणि लक्ष्मण अंगदाच्या खांद्यावर चढला अशा प्रकारे ते दोघेही त्या महान पर्वतावर चढले. (९)

दृष्ट्वा लङ्‌कां सुविस्तीर्णा नानाचित्रध्वजाकुलाम् ।
चित्रप्रासादसम्बाधां स्वर्णप्राकारतोरणाम् ॥ १० ॥
परिखाभिः शतघ्निभिः सङ्‌क्रमैश्च विराजितम् ।
प्रासादोपरि विस्तीर्ण प्रदेशे दशकन्धरः ॥११ ॥
मंत्रिभिः सहितो वीरैः किरीटदशकोज्ज्वलः ।
नीलाद्रिशिखराकारः कालमेघसमप्रभः ॥१२ ॥
रत्‍नदण्डैः सितच्छत्रैः अनेकैः परिशोभितः ।
एतस्मिन्नन्तरे बद्धो मुक्तो रामेण वै शुकः ॥ १३ ॥
वानतैस्ताडितः सम्यक् दशाननमुपागतः ।
प्रहसन् रावणः प्राह पीडितः किं परैः शुक ॥१४ ॥
मग अतिशय विस्तीर्ण, नाना प्रकारच्या चित्रविचित्र ध्वजांनी भरलेली, एकमेकाजवळ असणाऱ्या चित्रविचित्र प्रासादांनी युक्त, सोन्याचे प्राकार आणि तोरणे असणारी, तसेच खंदक तोफा आणि पूल यांनी शोभायमान असणारी लंका त्यांनी पाहिली. राज-प्रासादाच्या वरील विस्तीर्ण भागावर वीर मंत्र्यांसह रावण बसलेला होता. दहा किरीटानी तो तेजःपुंज दिसत होता. नील पर्वताच्या शिखराप्रमाणे त्याचा आकार होता. काळ्या मेघाप्रमाणे त्याची अंगकांती होती. रत्नजडित दंड असणाऱ्या अनेक पांढऱ्या छत्रांनी तो अतिशय शोभत होता. इतक्यात वानरांनी शुकाला भरपूर मारून बांधले होते. त्याला रामांनी मुक्त केले, तो रावणाजवळ आला. त्याला पाहून रावण हसत हसत म्हणाला, अरे शुका, तुला शत्रूंनी फार त्रास दिला काय ?" (१ ०-१४)

रावणस्य वचः श्रुत्वा शुको वचनमब्रवीत् ।
सागस्योत्तरे नीरे अब्रवं ते वचनं यथा ।
तत उत्प्लुत्य कपयो गृहीत्वा मां क्षणात्ततः ॥ १५ ॥
मुष्टिभिर्नखदंतैश्च हन्तुं लोप्तुं प्रचक्रमुः ।
ततो मां राम रक्षेति क्रोशन्तं रघुपुङ्‌गवः ॥ १६ ॥
विसृज्यतामिति प्राह विसृष्टोऽहं कपीश्वरैः ।
ततोऽहमागतो भीत्या दृष्ट्वा तद्वानरं बलम् ॥ १७ ॥
रावणाचे वचन ऐकून शुक म्हणाला, "सागराच्या उत्तर तीरावर जाऊन, मी तुमचा संदेश जसाच्या तसा सांगितला; तेव्हा एका क्षणात वानरांनी उंच उड्या मारल्या आणि मला पकडले आणि मग बुक्क्यांनी, नखांनी व दातांनी ते मला त्रास देऊ लागले. शेवटी मला ठार मारू लागले. "हे रामा, माझे रक्षण कर" असे मी ओरडू लागलो. तेव्हा " सोडा रे त्याला " असे राम म्हणाले. मग वानरश्रेष्ठांनी मला सोडले. ते वानर सैन्य पाहून भिऊन मी येथे आलो. (१५-१७)

राक्षसानां बलौघस्य वानरेन्द्रबलस्य च ।
नैतयोर्विद्यते सन्धिः देवदानवयोरिव ॥ १८ ॥
ज्या प्रमाणे देव-दानवांत रसंधी होणे शक्य नाही त्याप्रमाणे राक्षस-सेना व वानर-सेना यामध्ये संधी होणे शक्य नाही, असे मला वाटते. (१८)

पुरप्राकारमायान्ति क्षिप्रं एकतरं कुरु ।
सीतां वास्मै प्रयच्छाशु युद्धं वा दीयतां प्रभो ॥१९ ॥
तेव्हा हे प्रभो, लौकरच ते वानर आपल्या नगरीच्या तटावर येतील. आता तुम्ही दोनपैकी कोणतीही एक गोष्ट लगेच करा. एक सीता तरी त्या रामांना सत्वर देऊन टाका अथवा रामांबरोबर युद्धाला तयार व्हा. (१९)

मामाह रामस्त्वं ब्रूहि रावणं मद्वचः शुक ।
यद्‌बलं च समाश्रित्य सीतां मे हृतवानसि ॥ २० ॥
तद्दर्शय यथाकामं ससैन्यः सहबान्धवः ।
श्वःकाले नगरीं लङ्‌कां सप्राकारां सतोरणाम् ॥ २१ ॥
राक्षसं च बलं पश्य शरैर्विध्वंसितं मया ।
घोररोषमहं मोक्ष्ये बलं धारय रावण ॥ २२ ॥
राम मला म्हणाले, 'अरे शुका, तू रावणाला माझा निरोप सांग की ज्या सामर्थ्याचा आधार घेऊन, तू माझ्या सीतेचे अपहरण केले आहेस ते सामर्थ्य आता तू तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व सैन्य आणि सर्व बंधू यांच्यासह मला दाखव. उद्याच्या उद्याच प्राकार व तोरणे यांचेसह लंकापुरी आणि तुझे राक्षस सैन्य मी बाणांनी नष्ट केलेले तू पाहशील. अरे रावणा, मी माझ्या भयंकर क्रोधाचा तुझ्यावर प्रयोग करीन. तेव्हा तू आपले सामर्थ्य राखून ठेव.' (२०-२२)

इत्युक्‍त्वोपररामाथ रामः कमललोचनः ।
एकस्थानगता यत्र चत्वारः पुरुषर्षभाः ॥ २३ ॥
श्रीरामो लक्ष्मणश्चैव सुग्रीवश्च विभीषणः ।
एत एव समर्थास्ते लङ्‌कां नाशयितुं प्रभो ॥ २४ ॥
उत्पाट्य भस्मीकरणे सर्वे तिष्ठन्तु वानराः ।
तस्य यादृक् बलं दृष्टं रूपं प्रहरणानि च ॥ २५ ॥
वधिष्यति पुरं सर्वं एकस्तिष्ठन्तु ते त्रयः ।
पश्य वानरसेनां तां असङ्‌ख्यातां प्रपूरिताम् ॥ २६ ॥
असे बोलून ते कमलनयन राम गप्प बसले. हे प्रभो, लंकेचा नाश करण्यास सर्व वानर तूर्त बाजूला राहू देत (कारण त्यांना फारसे महत्त्व नाही). श्रीराम, लक्ष्मण, सुग्रीव आणि बिभीषण हे चार पुरुषश्रेष्ठ एकाच स्थानी आले आहेत. ते चौघे लंकेला मुळासकट उपटून टाकून तिला भस्मसात् करण्यास अगदी समर्थ आहेत. किंबहुना त्या रामांचे जे बळ, रूप आणि शस्त्रे मी पाहिली आहेत. त्यावरून कळून येते की ते लक्ष्मण, सुग्रीव आणि बिभीषण हे तिघेही जरी बाजूला राहिले तरी एकटे श्रीराम तुझे सर्व नगर नष्ट क रून टाकतील. असंख्य वानरांनी भरलेली आणि सगळीकडे पसरलेली ही वानरांची सेना पाहा. (२३-२६)

गर्जन्ति वानरास्तत्र पश्य पर्वतसन्निभाः ।
न शक्यास्ते गणयितुं प्राधान्येन ब्रवीमि ते ॥ २७ ॥
पर्वताप्रमाणे आकार असणारे वानर तेथे गर्जना करीत आहेत, ते पाहा. त्या वानरांची मोजदाद करणेही शक्य नाही. तथापि त्यातील काही मुख्य वानरांबद्दल मी तुम्हांला सांगतो ऐक. (२७)

एष योऽभिमुखो लङ्‌कां नदंस्तिष्ठति वानरः ।
यूथपानां सहस्राणां शतेन परिवारितः ॥ २८ ॥
सुग्रीवसेनाधिपतिः नीलो नामाग्निनन्दनः ।
एष पर्वतशृङ्‌गाभः पद्मकिञ्जल्कसन्निभः ॥ २९ ॥
स्फोटयत्यभिसंरब्धो लाङ्‌गूलं च पुनः पुनः ।
युवराजोऽङ्‌गदो नाम वालिपुत्रोऽतिवीर्यवान् ॥ ३० ॥
हा जो वानर लंकेकडे तोंड करून गर्जना करीत उभा आहे आणि जो शेकडो, हजारो वानर-सेनापतींच्या समवेत आहे, तो नील नावाचा अग्नीचा पुत्र असून, तो सुग्रीवसेनेचा मुख्य सेनापती आहे. आणि हा जो पर्वताच्या शिखराप्रमाणे विशाल देह असणारा, कमळाच्या केसरांप्रमाणे तेज असणारा, आणि जो रागाने वारंवार आपली शेपटी आपटत आहे, तो अतिशय सामर्थ्य-संपन्न असा अंगद नावाचा वालीचा पुत्र असून तो युवराज आहे. (२८-३०)

येन दृष्टा जनकजा रामस्यातीव वल्लभा ।
हनूमानेष विख्यातो हतो येन तवात्मजः ॥ ३१ ॥
रामांना अतिशय प्रिय असणाऱ्या जनककन्या सीतेला ज्याने भेट दिली आणि ज्याने तुमच्या पुत्राला ठार केले तो हा प्रसिद्ध हनुमान आहे. (३१)

श्वेतो रजतसङ्‌काशो महाबुद्धिपराक्रमः ।
तूर्णं सुग्रीवमागत्य पुनर्गच्छति वानरः ॥ ३२ ॥
यस्त्वेष सिंहसं‌काशः पश्यत्यतुलविक्रमः ।
रम्भो नाम महासत्त्वो लङ्‌कां नाशयितुं क्षमः ॥ ३३ ॥
चांदीप्रमाणे शुभ्र वर्णाचा, महान बुद्धी व महान पराक्रम असणारा असा जो सुग्रीवाकडे त्वरित जाऊन पुनः परत जात आहे, आणि जो सिंहाप्रमाणे अतुलनीय पराक्रम करणारा वानर इकडे पाहात आहे, तो रंभ नावाचा महासामर्थ्य असणारा वानर आहे. तो एकटाच लंकेचा नाश करण्यास समर्थ आहे. (३२-३३)

एष पश्यति वै लङ्‌कां दिधक्षन्निव वानरः ।
शरभो नाम राजेन्द्र कोटियूथप नायकः ॥ ३४ ॥
हे राजेंद्रा, लंकेला जणू जाळून टाकण्याच्या इच्छेने जो लंकेकडे पाहात आहे, तो शरभ नावाचा वानर कोटी वानर-सेनापतींचा नायक आहे. (३४)

पनसश्च महावीर्यो मैन्दश्च द्विविदस्तथा ।
नलश्च सेतुकर्तासौ विश्वकर्मसुतो बली ॥ ३५ ॥
महापराक्रमी पनस, मैंद, तसेच द्विविद आणि सेतू बांधणारा, बलवान असा विश्वकर्म्याचा पुत्र नल, असे अन्य मुख्य वानर आहेत. (३५)

वानराणां वर्णने वा सङ्‍ख्याने वा क ईश्वरः ।
शूराः सर्वे महाकायाः सर्वे युद्धाभिकाङ्‌क्षिणः ॥ ३६ ॥
या सर्व वानरांचे वर्णन करण्यास अथवा त्यांची गणती करण्यास कोण समर्थ आहे ? हे सर्व वानर शूर आणि धिप्पाड असून ते सर्वच युद्ध करण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. (३६)

शक्ता सर्वे चूर्णयितुं लङ्‌कां रक्षोगणै सह ।
एतेषां बलसङ्‍ख्यानं प्रत्येकं वच्मि ते शृणु ॥३७ ॥
सर्व राक्षस-समूहांसह लंकेचा चुराडा करण्यास ते समर्थ आहेत. यांतील प्रत्येकाच्या हाताखाली असणाऱ्या सैन्याची संख्या मी तुला सांगतो ती तू ऐक. (३७)

एषां कोटिसहस्त्राणि नव पञ्च च सप्त च ।
तथा शङ्‌खसहस्राणि तथार्बुदशतानि च ॥ ३८ ॥
प्रत्येकाच्या नियंत्रणाखाली एकवीस हजार कोटी, हजारो शंख, आणि शेकडो अर्बुद सैन्य आहे. (३८)

सुग्रीवसचिवानां ते बलं एतत्‌प्रकीर्तितम् ।
अन्येषां तु बलं नाहं वक्तुं शक्तोऽस्मि रावण ॥ ३९ ॥
हे रावणा, हे मी तुला सुग्रीवाच्या मंत्र्यांचे सैन्य सांगितले आहे. याखेरीज इतरांचे सैन्य किती आहे, हे मी सांगू शकत नाही. (३९)

रामो न मानुषः सक्षात् आदिनारायण परः ।
सीता साक्षात् जगत् हेतुः चिच्छक्तिर्जगदात्मिका ॥ ४० ॥
श्रीराम हे सामान्य माणूस नाहीत. ते साक्षात आदिनारायण परमात्मा आहेत आणि सीता ही जगाचे साक्षात कारण असणारी जगद्‌रूपिणी चिच्छती आहे. (४०)

ताभ्यामेवसमुत्पन्नं जगत्स्थावरजङ्‌गमम् ।
तस्माद्‍रामश्च सीताच जगतस्तस्थुषश्च तौ ॥ ४१ ॥
पितरौ पृथिवीपाल तयोर्वैरी कथं भवेत् ।
अजानता त्वयानीता जगन्मातैव जानकी ॥ ४२ ॥
त्या दोघांचेपासूनच हे स्थावर जंगम विश्व उत्पन्न झाले आहे. म्हणून राम आणि सीता हे दोघे या जगाचे माता पिता आहेत. हे पृथिवीपते, त्यांचा शत्रू असा कोण व कसा असू शकेल ? अजाणतेपणाने ज्या सीतेला तू पळवून आणले आहेस, ती जानकी जगन्माता आहे. (४१-४२)

क्षणनाशिनि संसारे शरीरे क्षणभङ्‌गुरे ।
पञ्चभूतात्मके राजन् चतुर्विंशतितत्त्वके ॥ ४३ ॥
मलमांसास्थिदुर्गन्ध भूयिष्ठेऽहङ्‌कृतालये ।
कैवास्था व्यतिरिक्तस्य काये तव जडात्मके ॥ ४४ ॥
हे राजन्, क्षणोक्षणी नष्ट होणाऱ्या या संसारात, शरीर हे क्षणभंगुर, पाच भूतांनी बनलेले आणि चोवीस तत्त्वांचा समूह असणारे आहे. मल, मांस, अस्थी व दुर्गंधी पदार्थ यांचाच जास्त भरणा असणाऱ्या, अहंकाराचे आश्रयस्थान, अचेतन आणि तुझ्या आत्म्यापेक्षा वेगळे असणाऱ्या अशा या शरीराची तू कसली आस्था बाळगीत आहेस ? (४३-४४)

यत्कृते ब्रह्महत्यादि पातकानि कृतानि च ।
भोगभोक्ता तु यो देहः स देहोऽत्र पतिष्यति ॥ ४५ ॥
ज्या देहासाठी तू ब्रह्महत्या इत्यादी पातके केली आहेस आणि जो देह भोग भोगणारा आहे, तो देह मरणोत्तर येथेच पडणार आहे. (४५)

पुण्यपापे समायातो जीवेन सुखदुःखयोः ।
कारणे देहयोगादिन् आत्मनः कुरुतोऽनिशम् ॥४६ ॥
सुख-दुःखाची कारणे असणारी पुण्य-पापे तर जीवाबरोबर येतात आणि देहाशी संबंध असल्यामुळे ही पुण्य-पापे रात्रंदिवस जीवात्म्याला सुख-दुःखे देत असतात. (४६)

यावद्देहोऽस्मि कर्तास्मीति आत्माहंकुरुतेऽवशः ।
अध्यासात्तावदेव स्यात् जन्मनाशादिसम्भवः ॥ ४७ ॥
जो पर्यंत अज्ञानामुळे उत्पन्न होणाऱ्या अध्यासामुळे 'मी देह आहे, मी कर्ता आहे' असा अभिमान आत्मा करतो, तोपर्यंत अध्यासामुळे त्याला जन्म, मरण, इत्यादी असहायपणे भोगावे लागतात. (४७)

तस्मात्त्वं त्यज देहादौ अभिमानं महामते ।
आत्मातिनिर्मलः शुद्धो विज्ञानात्माचलोऽव्ययः ॥ ४८ ॥
म्हणून हे बुद्धिमान रावणा, तू देह इत्यादी वरील अभिमान सोडून दे. मुळात आत्मा हा अतिशय निर्मळ, शुद्ध, विज्ञान-स्वरूप, निश्चल आणि निर्विकार आहे. (४८)

स्व-अज्ञानवशतो बन्धं प्रतिपद्य विमुह्यति ।
तस्मात्त्वं शुद्धभावेन ज्ञात्वात्मानं सदा स्मर ॥ ४९ ॥
परंतु आपल्या अज्ञानामुळे तो आत्मा जन्म-मरणादी बंधनांत पडून मोहित होतो. म्हणून तू शुद्ध भावाने आत्म्याला जाणून नेहमी त्याचे स्मरण ठेव. (४९)

विरतिं भज सर्वत्र पुत्रदारगृहादिषु ।
निरयेष्वपि भोगः स्यात् श्वशूकरतनौ अपि ॥ ५० ॥
पुत्र, पत्नी, घरदार इत्यादी सर्वांविषयी वैराग्य धारण कर. कारण कुत्रा, डुक्कर इत्यादी योनींमध्येसुद्धा तसेच नरकांतसुद्धा भोग हे मिळत असतातच. (५०)

देहं लब्ध्वा विवेकाढ्यं द्विजत्वं च विशेषतः ।
तत्रापि भारते वर्षे कर्मभूमौ सुदुर्लभम् ॥ ५१ ॥
को विद्वानात्मसात्कृत्वा देहं भोगानुगो भवेत् ।
अतस्त्वं ब्राह्मणो भूत्वा पौलस्त्यतनयश्च सन् ॥ ५२ ॥
अज्ञानीव सदा भोगान् अनुधावसि किं मुधा ।
इतः परं वा त्यक्‍त्वा त्वं सर्वसङ्‌गं समाश्रयः ॥ ५३ ॥
राममेव परात्मनं भक्तिभावेन सर्वदा ।
सीतां समर्प्य रामाय तत्पादानुचरो भव ॥ ५४ ॥
खरे म्हणजे हा देह प्राप्त झाल्यावर, विशेषतः विवेकाने युक्त असे द्विजत्व प्राप्त झाल्यावर, तसेच कर्मभूमी असणाऱ्या या भारत वर्षात अतिशय दुर्लभ असा जन्म प्राप्त झाला असता, कोणता शहाणा माणूस देहाला आत्मा मानून भोगांच्या मागे लागेल ? तेव्हा तू स्वतः ब्राह्मण असून आणि त्यातही पुलस्त्यनंदन विश्रवा ऋषीचा पुत्र असतानासुद्धा, एखाद्या अज्ञानी माणसाप्रमाणे तू सदा भोगांच्या मागे फुकटच का लागला आहेस ? यापुढे तरी सर्व आसक्तीचा त्याग करून, अत्यंत भक्तीने नेहमी परमात्म्या रामांचा आश्रय घे. त्यांना सीता अर्पण करून त्यांच्या पायांची सेवा करणारा सेवक बन. (५१-५४)

विमुक्त सर्वपापेभ्यो विष्णुलोकं प्रयास्यसि ।
नो चेद्‍गमिष्यसेऽधोऽधः पुनरावृत्तिवर्जितः ।
अङ्‌गीकुरुष्व मद्वाक्यं हितमेव वदामि ते ॥ ५५ ॥
असे जर तू केलेस तर तू सर्व पापांतून मुक्त होऊन विष्णू-लोकाला जाशील आणि असे जर तू केले नाहीस तर तुला पुन्हा असे दुर्लभ मानव-शरीर मिळू शकणार नाही. तू उत्तरोत्तर अधोलोकांप्रत जाशील. मग तेधून पुनः वर येणे तुला शक्य होणार नाही. मी तुला हिताची गोष्ट सांगत आहे. या माझ्या बोलण्याचा तू स्वीकार कर. (५५)

सत्सङ्‌गतिं कुरु भजस्व हरिं शरण्यं
    श्रीराघवं मरकतोपलकान्तिकान्तम् ।
सीतासमेतमनिशं धृतचापबाणं
    सुग्रीवलक्ष्मणविभीषण सेविताङ्‌घ्रिम् ॥ ५६ ॥
अरे रावणा, तू सत्संगती कर. जे शरणागतांचे रक्षण करतात, मरकत-मण्याप्रमाणे ज्यांची अंगकांती सुंदर आहे, ज्यांच्या समवेत सीता आहे, जे धनुष्य व बाण धारण करतात, तसेच सुग्रीव, लक्ष्मण आणि बिभीषण हे ज्यांची चरणसेवा करतात, अशा त्या विष्णूरूप श्रीराघवांची तू रात्रंदिवस भक्ती कर." (५६)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
युद्धकाण्डे चतुर्थः सर्गः ॥ ४ ॥
इति श्रीमद्‌अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसवादे युद्धकाण्डे चतुर्थः सर्गः ॥ ४ ॥


GO TOP