श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। षट्‌त्रिंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
देवैः पार्वतीशिवयोः सुरतक्रीडातो निवर्तनमुमादेव्या देवान् भूदेवीं च उद्दिश शापदानम् - देवतांनी शिव-पार्वती यांना सुरतक्रीडेतून निवृत्त करणे, आणि उमादेवीने देवतांना व पृथ्वीला शाप देणे -
उक्तवाक्ये मुनौ तस्मिन्नुभौ राघवलक्ष्मणौ ।
अभिनन्द्य कथां वीरावूचतुर्मुनिपुङ्‍गवम् ॥ १ ॥
विश्वामित्रांचे बोलणे संपल्यावर श्रीराम आणि लक्ष्मण दोघा वीरांनी त्यांनी सांगितलेल्या कथेबद्दल अभिनन्दन करून मुनिवर विश्वामित्रांना म्हटले - ॥ १ ॥
धर्मयुक्तमिदं ब्रह्मन् कथितं परमं त्वया ।
दुहितुः शैलराजस्य ज्येष्ठाया वक्तुमर्हसि ।
विस्तरं विस्तरज्ञोऽसि दिव्यमानुषसम्भवम् ॥ २ ॥
'ब्रह्मन् ! आपण ही फार उत्तम धर्मयुक्त कथा ऐकविली. आता आपण गिरिराज हिमवानाची ज्येष्ठ कन्या गंगा हिचा दिव्यलोक आणि मनुष्यलोकाशी कसा संबंध आला, या संबंधीचा वृत्तांत विस्तारपूर्वक ऐकवावा. कारण आपण विस्तृत वृत्तांचे ज्ञाते आहात. ॥ २ ॥
त्रीन् पथो हेतुना केन प्लावयेल्लोकपावनी ।
कथं गङ्‍गा त्रिपथगा विश्रुता सरिदुत्तमा ॥ ३ ॥
लोकांना पवित्र करणारी गंगा कुठल्या कारणांनी तीन मार्गात प्रवाहित झाली आहे ? सरितांच्या मध्ये श्रेष्ठ गंगेची 'त्रिपथगा' म्हणून प्रसिद्धी का झाली ? ॥ ३ ॥
त्रिषु लोकेषु धर्मज्ञ कर्मभिः कैः समन्विता ।
तथा ब्रुवति काकुत्स्थे विश्वामित्रस्तपोधनः ॥ ४ ॥

निखिलेन कथां सर्वामृषिमध्ये न्यवेदयत् ।
'धर्मज्ञ महर्षि ! तिन्ही लोकात ती आपल्या तिन्ही धारांच्या द्वारे कोणते कार्य करीत आहे ? " श्रीरामचंद्रांनी असे विचारल्यावर तपोधन विश्वामित्रांनी मुनिमण्डळींच्या मध्ये गंगेशी संबंधीत सर्व गोष्टी सविस्तरपणे ऐकविल्या - ॥ ४ १/२ ॥
पुरा राम कृतोद्वाहः शितिकण्ठो महातपाः ॥ ५ ॥

दृष्ट्‍वा च भगवान् देवीं मैथुनायोपचक्रमे ।
"श्रीरामा ! पूर्वकाली महातपस्वी भगवान् नीलकण्ठाने उमादेवीशी विवाह करून तिला नववधूच्या रूपात आपल्या निकट आलेली पाहून तिच्याबरोबर रति-क्रीडा करण्यास आरंभ केला. ॥ ५ १/२ ॥
तस्य सङ्‍क्रीडमानस्य महादेवस्य धीमतः ।
शितिकण्ठस्य देवस्य दिव्यं वर्षशतं गतम् ॥ ६ ॥
'परम बुद्धिमान् महान् देवता भगवान् नीलकण्ठांची शंभर दिव्य वर्षे उमादेवीसह क्रीडा विहार करण्यात निघून गेली. ॥ ६ ॥
न चापि तनयो राम तस्यामासीत् परंतप ।
ततो देवाः समुद्युक्ताः पितामहपुरोगमाः ॥ ७ ॥
'शत्रूंना संताप देणार्‍या श्रीरामा ! इतकी वर्षे विहार करूनही महादेवांना उमादेवीच्या गर्भापासून एकही पुत्र झाला नाही. हे पाहून ब्रह्मदेव आदि सर्व देव त्यांना क्रीडेपासून रोखण्याचा प्रयत्‍न करू लागले. ॥ ७ ॥
यदिहोत्पद्यते भूतं कस्तत् प्रतिसहिष्यति ।
अभिगम्य सुराः सर्वे प्रणिपत्येदमब्रुवन् ॥ ८ ॥
'त्यांनी विचार केला - इतक्या दीर्घकालानंतर जर रुद्राच्या तेजाने उमादेवीच्या गर्भातून कुणी महान् प्राणी जर झालाच तर त्याचे तेज कोण सहन करू शकेल ? असा विचार करून सर्व देवता भगवान् शिवाजवळ जाऊन त्यांना प्रणाम करून या प्रकारे म्हणाल्या - ॥ ८ ॥
देवदेव महादेव लोकस्यास्य हिते रत ।
सुराणां प्रणिपातेन प्रसादं कर्तुमर्हसि ॥ ९ ॥
'या लोकाच्या हितामध्ये तत्पर राहणार्‍या देवाधिदेव महादेवा ! देवता आपल्या चरणी मस्तक नमवित आहेत. या योगे प्रसन्न होऊन आपण या देवतांच्यावर कृपा करावी. ॥ ९ ॥
न लोका धारयिष्यन्ति तव तेजः सुरोत्तम ।
ब्राह्मेण तपसा युक्तो देव्या सह तपश्चर ॥ १० ॥
'सुरश्रेष्ठ ! हे लोक आपले तेज धारण करू शकणार नाहीत. म्हणून आपण क्रीडेपासून निवृत्त होऊन वेदबोधित तपस्येने युक्त होऊन उमादेवीसह तप करावे. ॥ १० ॥
त्रैलोक्यहितकामार्थं तेजस्तेजसि धारय ।
रक्ष सर्वानिमाँल्लोकान् नालोकं कर्तुमर्हसि ॥ ११ ॥
तिन्ही लोकांच्या हिताच्या कामनेने आपण आपल्या तेजास (वीर्यास) तेजःस्वरूप आपल्याच ठिकाणी धारण करावे. या सर्व लोकांचे रक्षण करावे. लोकांचा विनाश करून टाकू नये.' ॥ ११ ॥
देवतानां वचः श्रुत्वा सर्वलोकमहेश्वरः ।
बाढमित्यब्रवीत् सर्वान् पुनश्चेदमुवाच ह ॥ १२ ॥
देवतांचे असे म्हणणे ऐकून सर्वलोकमहेश्वर शिवाने 'फार चांगले' असे म्हणून त्यांचा अनुरोध स्विकारला आणि त्यांना म्हणाले - ॥ १२ ॥
धारयिष्याम्यहं तेजः तेजस्येव सहोमया ।
त्रिदशाः पृथिवी चैव निर्वाणमधिगच्छतु ॥ १३ ॥
'देवतांनो ! उमेसहित मी, अर्थात् आम्ही दोघे आपल्या आपल्या तेजानेच या तेजास धारण करू. पृथ्वी आदि सर्व लोकांतील निवासी शान्ति लाभ करोत. ॥ १३ ॥
यदिदं क्षुभितं स्थानान्मम तेजो ह्यनुत्तमम् ।
धारयिष्यति कस्तन्मे ब्रुवन्तु सुरसत्तमाः ॥ १४ ॥
'परंतु सुरश्रेष्ठगण ! जर माझे हे सर्वोत्तम तेज (वीर्य) क्षुब्ध होऊन आपल्या स्थानापासून स्खलित होऊ लागले तर त्यास कोण धाराण करील, हे मला सांगा ' ॥ १४ ॥
एवमुक्तास्ततो देवाः प्रत्यूचुर्वृषभध्वजम् ।
यत्तेजः क्षुभितं ह्यद्य तद्धरा धारयिष्यति ॥ १५ ॥
त्यांनी असे म्हटल्यावर देवतांनी वृषभध्वज भगवान् शिवास म्हटले - 'भगवन् ! आज आपले जे तेज क्षुब्ध होऊन पडेल त्याला ही पृथ्वी धारण करील.' ॥ १५ ॥
एवमुक्तः सुरपतिः प्रमुमोच महाबलः ।
तेजसा पृथिवी येन व्याप्ता सगिरिकानना ॥ १६ ॥
देवतांचे हे कथन ऐकून महाबली देवेश्वर शिवाने आपले तेज सोडले, ज्याच्या योगाने पर्वत आणि वनांसह ही सारी पृथ्वी व्याप्त होऊन गेली. ॥ १६ ॥
ततो देवाः पुनरिदमूचुश्चापि हुताशनम् ।
आविश त्वं महातेजो रौद्रं वायुसमन्वितः ॥ १७ ॥
तेव्हां देवतांनी अग्निदेवास सांगितले - 'अग्ने ! तू वायुच्या सहयोगाने भगवान् शिवाचे हे महान् तेज आपल्या अंतरात धारण कर. ॥ १७ ॥
तदग्निना पुनर्व्याप्तं सञ्जातं श्वेतपर्वतम् ।
दिव्यं शरवणं चैव पावकादित्यसंनिभम् ॥ १८ ॥
अग्निने व्याप्त झाल्यावर ते महान तेज श्वेत पर्वताच्या रूपात परिणत झाले. त्याच बरोबर तेथे दिव्य बोरूचे (वेताचे) वनही प्रकट झाले, जे अग्नि आणि सूर्यासमान तेजस्वी प्रतीत होत होते. ॥ १८ ॥
यत्र जातो महातेजाः कार्तिकेयोऽग्निसम्भवः ।
अथोमां च शिवं चैव देवाः सर्षिगणास्था ॥ १९ ॥

पूजयामासुरत्यर्थं सुप्रीतमनसस्तदा ।
त्याच वनांत अग्निजनित महातेजस्वी कार्तिकेयाचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर ऋषिंच्या सहित देवतांनी अत्यंत प्रसन्नचित्त होऊन देवी उमा आणि भगवान् शिवाचे मोठ्या भक्तिभावाने पूजन केले. ॥ १९ १/२ ॥
अथ शैलसुता राम त्रिदशानिदमब्रवीत् ॥ २० ॥

समन्युरशपत् सर्वान् क्रोधसंरक्तलोचना ।
'श्रीरामा ! यानंतर गिरिराजनन्दिनी उमेचे नेत्र क्रोधाने लाल झाले. तिने समस्त देवतांना क्रोधाने शाप दिला. ती म्हणाली - ॥ २० १/२ ॥
यस्मान्निवारिता चाहं सङ्‍गता पुत्रकाम्यया ॥ २१ ॥

अपत्यं स्वेषु दारेषु नोत्पादयितुमर्हथ ।
अद्यप्रभृति युष्माकमप्रजाः सन्तु पत्‍नयः ॥ २२ ॥
'देवतांनो ! मी पुत्र प्राप्तिच्या इच्छेने पतिबरोबर समागम केला होता; परंतु तुम्ही मला रोखलेत. म्हणून आता तुम्ही सर्व लोकही आपल्या पत्‍नींच्या पासून संतान उत्पन्न करण्यायोग्य राहणार नाही. आजपासून तुमच्या भार्या संतनोत्पादन करू शकणार नाहीत, संतानहीन होऊन जातील. ॥ २१-२२ ॥
एवमुक्त्वा सुरान् सर्वाञ्शशाप पृथिवीमपि ।
अवने नैकरूपा त्वं बहुभार्या भविष्यसि ॥ २३ ॥
'सर्व देवतांना असे म्हणून उमादेवीने पृथ्वीलाही शाप दिला - 'भूमे ! तुझे एक रूप राहणार नाही. तू अनेकांची भार्या होशील.' ॥ २३ ॥
न च पुत्रकृतां प्रीतिं मत्क्रोधकलुषीकृता ।
प्राप्स्यसि त्वं सुदुर्मेधो मम पुत्रमनिच्छती ॥ २४ ॥
'हे दुर्मति पृथ्वी ! ज्या अर्थी मला पुत्र होऊ नये अशी तू इच्छा केलीस, त्या अर्थी माझ्या क्रोधाने कलुषित होऊन तूही पुत्रजनित सुखाचा अथवा प्रसन्नतेचा अनुभव करू शकणार नाहीस.' ॥ २४ ॥
तान् सर्वान् पीडितान् दृष्ट्‍वा सुरान् सुरपतिस्तदा ।
गमनायोपचक्राम दिशं वरुणपालिताम् ॥ २५ ॥
त्या सर्व देवता उमादेवीच्या शापाने पीडित झाल्या आहेत असे पाहून देवेश्वर भगवान् शिवांनी त्या समयी पश्चिम दिशेकडे प्रस्थान केले. ॥ २५ ॥
स गत्वा तप आतिष्ठत् पार्श्वे तस्योत्तरे गिरेः ।
हिमवत् प्रभवे शृङ्‍गे सह देव्या महेश्वरः ॥ २६ ॥
तेथून नंतर हिमालयाच्या उत्तर भागात् त्याच्याच एका शिखरावर उमादेवीसह भगवान् महेश्वर तप करून लागले. ॥ २६ ॥
एष ते विस्तरो राम शैलपुत्र्या निवेदितः ।
गङ्‍गायाः प्रभवं चैव शृणु मे सहलक्ष्मण ॥ २७ ॥
राम, लक्ष्मण ! तुम्हाला मी हा गिरिराज हिमवानाची धाकटी कन्या उमादेवी, हिचा विस्तृत वृत्तांत सांगितला आहे. आता माझ्याकडून गंगेच्या प्रादुर्भावाची कथा ऐका. ॥ २७ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे षट्‌त्रिंशः सर्गः ॥ ३६ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा छत्तीसावा सर्ग समाप्त झाला. ॥ ३६ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP